राजस्थानी दाल बाटी

Submitted by मानुषी on 4 November, 2014 - 07:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दाल : तूर डाळ १ वाटी, मूग डाळ व मसूर डाळ प्रत्येकी पाव वाटी, डाळ शिजवताना घालण्यासाठी हिंग, हळद, पाणी, १ तमालपत्र, फ़ोडणीसाठी तूप, हिंग, हळद, जिरे, वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला.
वाटण: २ कांदे, ७/८ लसूण पाकळ्या, २ सुक्या मिरच्या, एक छोटा आल्याचा छोटा तुकडा, सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी.

बाटी: २ वाट्या जाड/भरड दळून आणलेली कणीक, पाव वाटी रवा, १ चमचा तेल, चिमूटभर मीठ, चिमूटभर सोडा किंवा पाव चमचा बेकिंग पावडर. आप्पेपात्रात बाट्या तळण्यासाठी अगदी थोडं तूप.

http://www.maayboli.com/comment/edit/3337752

क्रमवार पाककृती: 

( इथे मारवाडी समाज बराच मोठा असल्याने त्यांच्या समारंभात दाल बाटीचा आस्वाद घेता येतो. आणि इथे एक दोन हॉटेलातही अगदी अप्रतीम दाल बाटी मिळते. तर सांगण्याचा मुद्दा हाच की दाल बाटी हा माझा एक आवडता पदार्थ झाला आहे. पण तो कसा करायचा याची ऑथेन्टिक रेसिपी माहिती नव्हती.

पण ४/५ वर्षापूर्वी पुण्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या घरी जमलो. तिथून तिच्या भोरच्या फार्म हाऊसवर रहायला गेलो. तिथे त्या मैत्रिणीने दाल बाटी केली. व्वा..........अजून चव जिभेवर आहे.
मग काय? अगदी समोरच एखादा पदार्थ केला गेला तर बर्‍याच गोष्टी क्लिअर होतात.
अगदी तस्संच झालं. फक्त या मैत्रिणीने या बाट्यांसाठी घरातली नेहेमीची कणीकच वापरली. आणि त्या बाट्या गॅसवर जाळी ठेऊन भाजल्या. मी त्यात थोडा बदल केला.
एक तर सगळा शाळेपासूनचा ग्रुप खूप दिवसांनी जमलेला.........त्यामुळे ती दाल बाटी विशेष चविष्ट लागली!)
असो.........तर दाल बाटीची माझी रेसिपी...........
दालः
वाटणः कांदे उभे चिरून थेंबभर तेलात चांगले छान परतून घ्यावे. बाजूला ठेवावेत, त्याच कढईत थेंबभर तेल टाकून २ सुक्या मिरच्या छान भाजून त्यातच खिसलेलं सुकं खोबरंही भाजून घ्यावं. मिरच्या भाजून झाल्यावर गॆस बंद करावा. तेवढ्या उष्णतेत खोबऱ्याचा खीस चांगला भाजला जातो. आता या सर्व भाजलेल्या जिनसांत वाटणाचे उरलेले जिन्नस घालून मिक्सरला छान वाटून घ्यावे.

दालः सगळ्या डाळी हिंग हळद घालून कुकरमधे छान शिजवून घ्या. झाकण पडल्यावर व्यवस्थित हाटून घ्या.
एक चमचा तुपाची फ़ोडणी करा. त्यात जिरं, हिंग, तमालपत्र टाकून त्यावर वरील वाटण परतून घ्या. मग शिजवलेल्या डाळींचं वरण घालून मिक्स करा. गरम मसाला, चवीपुरते मीठ घाला. एक उकळी काढा. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
दाल तयार!

बाटी:
बाटीचे सर्व साहित्य फ़ूड प्रोसेसरमधून मळा.(तूप सोडून बाकीचे). पाणी अंदाजाने घाला. पिठाचा गोळा अगदी घट्ट असावा.
हा पिठाचा गोळा १ तास झाकून ठेऊन द्या. १ तासाने मग आप्पेपात्राच्या खळग्यांचा अंदाज घेऊन त्यात मावणारे गोळे बनवा.
गोळे बनवताना कणीक घट्ट असावी. व ती खूप मळू नये. ओबडधोबडच असू द्यावी. म्हणजे त्यात हवा राहून बाट्या हलक्या होतील. तळहातावर कणीक घेऊन दुस़ऱ्या हाताने अलगद दाब देत गोलगोल फ़िरवून गोळे बनवावेत.
एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा. आधण आल्यावर निम्मे गोळे या उकळीच्या पाण्यात टाका. आधी हे गोळे तळाशी असतील. शिजल्यावर ते पाण्यात वर येऊन तरंगू लागतील. मग ४/५ मि. झाकण ठेऊन शिजवा. गॅस बंद करून या बाट्या एका फ़डक्यावर निथळा. गॅसवर आप्पेपात्रात थोडं थोडं तूप टाकून आप्पेपात्र गरम झालं की मग या चांगल्या कोरड्या झालेल्या बाट्या चांगल्या भाजून घ्या. एका बाजूने चांगल्या खरपूस झाल्या की मग पलटा. ३/४ मिनिटांनी गॅस बंद करा. भाजताना या आप्पेपात्रावर झाकण ठेवा.
एका बाऊलमधे २ बाट्या ठेवा. तळहाताने कुस्करा. त्यावर भरपूर दाल घालून वरून थोडं तूप घालून खायला द्या.
याच बाट्या गरम असतानाच कुस्करून त्यात फ़क्त तूप आणि पिठी साखर घालूनही चविष्ट लागतात.
यासाठी प्रत्येकाने एखादी तरी बाटी बाजूला ठेवावी.

वाढणी/प्रमाण: 
जसा ताव माराल तसे................
अधिक टिपा: 

बाटीसाठी कणीक भरड/जाड वेगळी दळून आणावी. घरातल्या नेहेमीच्या बारीक कणकेच्या बाट्या इतक्या चांगल्या होत नाहीत.
हा पदार्थ करण्यासाठीचा आयडियल आदर्श सीझन येऊ घातला आहे. तस्मात......थंडीत या पदार्थाची लज्जत काही औरच!
दाल बाटी, गट्टीका साग आणि चुरमा असा ऑथेन्टिक राजस्थानी मेनू म्हणजे अगदी तोंपासु!

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दालबाटी माझ्या एका (ऑफकोर्स) मारवाडी मैत्रिणीचा आवडीचा पदार्थ! ती नेहेमी करत असते.. मी एकदाच राजस्थानला खाऊ शकले असते पण त्यावेळेस मला भयंकर तोंड आल्याने खाणं जमलंच नाही. Sad शूम्पी म्हणते ते चुरमा गोड प्रकार मात्र खाल्ला होता. तो आवडला होता.

आता एकदा करून पाहीन. फोटो खल्लास आले आहेत!

माधुरी
आता काही ट्रायल आणि एरर नंतर मला कच्च्या न लागणार्‍या बाट्या जमतात अवनमध्ये. तळलेल्या बाट्यांची सर येत नाही हे खरे पण मला दालबाटी इतकी आवडते आणि इतकी वारंवार केली जाते की दरवेळी तळणे परवडणार नाही तब्येतीला.

व्वा! देखणे, जीवघेणे फोटो! मस्त पाकृ! या आधी कधीच घरी करायचा धीर झाला नाही. पण या थंडीत नक्की करणार.

मला कच्च्या न लागणार्‍या बाट्या जमतात अवनमध्ये>> आधी वाफवुन घेतल्या की नाही लागत कच्च्या!

दाल बाटीला भरपुर तुप घेतात वरुन! भरपुर हाय कॅलरी पदार्थ आहे हा! अर्थात मानुशी चे व्हर्जन आवडले आहेच!

मला इथे रवाळ कणिक मिळणार नाहीये आणि आप्पेपात्रही बाजारात शोधावं लागेल.तस्मात्, फोटो टाकलेत - कुफेहेपा? >>>>>>>>>>>वरदा ???आँ ??काय चाल्लंय ? Wink
मैत्रेयी ...........गरम मसाला ..........मी एकदा रत्नागिरीहून "खातु" गरम मसाला आणला होता. तो फार मस्त लागतो या डाळीत. पण मला वाटतं केप्र(क्रेप????:डोमा:), एवरेस्ट, बादशहा ...हे लोकही गरम मसाला बनवत असतील.
एक चमचा तेलात राजस्थानी/मारवाडी पदार्थ होणे शक्यच नाही हे अगदी खरंय.
मूगडाळ म्हणजे पिवळी की हिरवी सालासकट?>>>>>>>>>>>>> सायो खरंच सगळं अगदी कमी तेला तुपात मस्त होतं. आणि माझं आप्पेपात्र बिडाचं आहे. त्यामुळे अगदी १ चमचा तुपात सगळ्या बाट्या खरपूस होतात.
आणि मूग डाळ रेग्युलर पिवळीच.
माधुरी १०१........आतून अगदी भरपूर तेलात डीप फ्राय केल्यासारख्या नाही होत पण जवळपास होतातच. अगदी खरपूस. बहुतेक बिडाच्या आप्पेपात्रामुळे असेल.
सर्वांना धन्यवाद.
आणि मुलींनो इथे त्या हॉटेलात बाट्या वाढायला आणताना चौफुल्यातल्या एका पाळ्यात भरपूर तुपात डुंबणार्‍या बाट्याच घेऊन येतात. तिथे मग सांगावं लागतं आधीच की............माझ्यासाठी कोरड्या बाट्या आणा मी वरून तूप घालून घेईन. एकतात बिचारे पण एक करुणार्द्र दृष्टिक्षेपासह!

yummy! आवडीचा पदार्थ Happy

मी सुलेखाताईंच्या पद्धतीने करते दाल-बाटी... बाट्या आधी इडलीच्या स्टँडवर ठेऊन वाफवुन घेते आणि मग बेक करते... सो नो तेल... Happy बाट्या आधी वाफवुन आयत्या वेळेला बेक करायच्या... मग गरम असताना फोडुन त्यावर हवे तर तूप घालायचे...

इथे डीडी (बहुतेक) यांची पण दाल-बाटीची रेसिपी आहे. ती पण छान आहे... त्यावरचे फोटो एकदम कातिल आहेत Happy

लाजो +१

बरीच चीटिंग केलीय हां रेसिपीत. कणकेत एक चमचा तेही तेल घालून दाल बाटी? डाएट दाल बाटी म्हणायचं का?
अर्थात राजस्थानसारख्या शुष्क हवामानाच्या प्रदेशातल्या लोकांना कणकेत अर्धी वाटी तूप , मग त्या भाजलेल्या बाट्यांना तुपाच्या टबात लोळत ठेवून मग खाणे मानवेल, तसे अन्यत्र होईल असे नाही. पण मग तीच चव येईल की नाही, हे माहीत नाही.

पण वाफवण्याच्या स्टेजलाच बाट्यांना (की यांना बाफल्यांना म्हणायचं?) तडे गेले पाहिजेत, भाजल्यावर त्यांची भगदाडे झाली पाहिजेत, तसे झालेले दिसत नाही.

बाकी मला दालबाटीचा बेत तिच्या अकंपनीमेंट्स् साठीच जास्त आवडायचा.

मानुषी ताई मस्त रेसिपी ! फोटो पण मस्त !

मी कणिक आणि रव्याच्या बाटया केल्या होत्या ओवन मध्ये ,पहिल्या ४,५ दगडी झाल्या मग सोडा घातला थोडा मग छान झाल्या .तुमची पद्धत सोपी आहे ,करून पाहिल आणि कमी वेळात पण होईल ,ओवन मध्ये फार वेळ जातो .
ओंकारेश्वर ला तुपाची धार असलेल्या बाटया खाल्ल्या होत्या त्यांची आठवण झाली

मी इतकं ऐकलंय पण कधीच खाल्ला नाहीये हा पदार्थ! ही बरीच सोपी कृती वाटत्येय त्यामुळे करून पाहण्याचा मोह होतोय! एक प्रश्न आहे, ह्या बाट्या ताज्याच चांगल्या लागतात का? म्हणजे समजा रात्री केल्या तर दुसऱ्या दिवशी डब्यात घेऊन जाता येतील का?

जिज्ञासा, दाल बाट्या विशेष प्रसंगी, पंगतीला आग्रह करून खिलवायची चीज आहे. डब्ब्यात नेऊन खाद्यसंस्कृतीला धक्का देऊ नका.

तोंपासु धागा आहे. Happy

माबो कृपेनेच एक मैत्रीण मिळाली आहे.
अधुन मधुन दाल बाट्या खाउ घालते.

मानुषी, मस्त आहे फोटो.
प्रतिसादातला फोटोचा कोड कट करून पाकृत पेस्ट करा. नेहमी आपण असंच करतो.

बाकी लाळगाळू हेल्थ कॉन्शस पब्लिक, डीडी यांनी अप्रतिम फोटोंसकट बेक केलेल्या बाट्यांची दालबाटी इथे लिहिली आहे. फार उच्च होते ती.

मी मीठ तेल घालून कणीक घट्ट मळ्ते. कोथिंबीर वडी जशी रोल करतो तसा रोल करुन चाळ्णीत वाफवते.नंतर वड्या पाडून डीप फ्राय करते. बाटी तैयार. तेल काही फार लागत नाही व एकदम क्रिस्पि होतात.

मानुषी राजस्थानला आम्ही गेलो होतो तेंव्हा राजस्थानी केर-सांगरी आणि दाल-बाटी खाऊन खरच खुप कंटाळा आला होता. पण आता तुझी रेसिपी
पाहून कराविशी वाटते.

फोटो मस्त तोंपासु
हा ऑथेन्टिक राजस्थानी पदार्थ मी फक्त हॉटेलातच खाल्ला आहे .त्यामुळे घरी बनवताना तो तसा लागणार नाही असं किंवा तसा बनवता येईल पण चव तशी लागेल का अशी शंका होती .पण तुमची अप्पेपात्राची कल्पना मस्त आहे .आप्पेपात्र मनाजोगं बिडाचं मिळत नसल्यामुळे घ्यायचे राहीलेय .आता लवकर घ्यावे लागेल या डाल बाटी चुर्मा साठी तरी. तुमच्या फोटोतलं तुपाचं भांड ही छान आहे .

चीटिंग म्हणजे कॅलरीज चोरल्यात हो. दुसरं काही म्हणायचं नव्हतं. स्मित>>>>>>>>>>>>>>>
ते कळ्ळं म्हणूनच स्मित!
हो ........सिनि..........अगदी थेंब थेंब तेलातुपातली दाल बाटी म्हणजे अगदी अस्सल मारवाडी पदार्थ वाटतच नाही. म्हणून म्हटलं शेजारी तरी तुपाचं भांडं ठेवावं ! एनीवे......ठांकू!

आता ते चुरमा दाल बाटीमध्ये {बाटीच्या आत चुरमा }कसा भरतात ?ही चुरमा बाटी उज्जैन मांडू (मप्र) अबूला खाल्ली आहे.

Pages