दमलेल्या तुमची आमची कहाणी

Submitted by अपूर्व on 9 July, 2014 - 03:14

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'

'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.

स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.

कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.

हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मोदक देऊ?

एखादी कंपनी एका माणसाला दोन माणसांचा पगार देते आणि त्याच्याकडून चार माणसांच काम करून घेते. हे बघून बाजूच्या कंपन्या एका माणसाला पाच दहा टक्के जास्त पगार देतात आणि काम पुन्हा चार माणसांचं करून घेतात.

हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कोणी जबरदस्ती करत नाहीये.
उगाचच गरजा वाढवायच्या ( गरजा म्हणणे पण चुकीचे आहे ), आणि मग रडत बसायचे.

ऑफिस मधे वेळेवर आले, नीट आणि चुका नसलेले काम केले, कँटीन मधे वेळ घालवला नाही की व्यवस्थित वेळेवर निघता येते. प्रत्येक मॅनेजर ला काम करणारी माणसे हवी असतात, ते काम जर आपण करत असु तर वेळेवर निघता येते.

कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे देते. Timer लावुन ६ तास जरी काम केले तर तुम्हाला/मला A रेटींग मिळेल.

ऑफिस मधुन माबो वर टाइमपास केला तर थांबावे लागणारच ना.

छान लिहिलंय आवडलं.

डिपार्ट्मेंटमधले इतर सहकारी बसुन काम करत असताना, एखादा जर वेळेवर बॅग उचलून घरी जाऊ लागला तर त्याने किती महत्पाप केल्यासारखे कटाक्ष त्याच्याकडे टाकले जातात आणि ते टाळण्यासाठी उशीरा थांबणे घडते, अशी सबबही ऐकली आहे, लेट सिटिंगबद्दल.

खरंय , आमच्या कडे तर वेळेवर निघाल्यास कित्येकदा "अरे! ६ वाजले वाटतं??" असा शेरा ऐकायला मिळतो. बरं असंही नाही की ही माणसे दिवसभर कामाला अगदी जुंपलेली असतात पण वेळेवर निघणे म्हणजे आपल्याला काही काम नाही असा त्यांचा समज.

लेखाशी बर्‍याच अंशी सहमत आहे.

माझ्या एका माजी नोकरीत साडेसात तासांची (सकाळ, दुपार) शिफ्ट होती (व नऊ तासांची रात्रीची). तीनही शिफ्ट मधे २० मिनिटांचा एक व ३० मिनिटांचा दुसरा असे एकूण ५० मिनिटांचे ब्रेक होते. मात्र ऑफिसात बीबीसी आणि युकेतले पोस्टल कोड शोधणारी साईट वगळली तर इतर एकही साईट चालायची नाही. अगदी बँकांच्याही साईट्स नाही. त्यामुळे अजिबातच डिस्ट्रॅक्शन नसल्याने, एरवी आपण नऊ-दहा तास बसून जितके काम होते तितके काम, रात्रपाळीचा अपवाद वगळता, ६ तास ४० मिनिटात आटपायचे.

आताही मी ऑफिस सुटण्याच्या ठरलेल्या वेळी उठून चालू लागलो की चेष्टेच्या सुरात लोक "अरे, हा निघाला, म्हणजे अमुक वाजले असणार" असे म्हणून चेष्टा करायचे/करतात. पण मुख्य बॉस काही बोलत नाही, आणि मुख्य म्हणजे मी माझे काम लक्ष केंद्रित करुन टाईमपास न करता, टंगळमंगळ न करता व्यवस्थित करतो त्यामुळे कुणाला त्यावरुन बोलायची संधी मिळत नाही. (थोडे अवांतरः आणखी एक म्हणजे गरज असते तेव्हा लेट सिटिंग करतो, काही तातडीचे काम आल्यास घरून रात्री करुन देतो, अनेकदा तर नेहमीचे काम कुणीही न सांगता घरून करतो, अगदी शनिवार-रविवारी सुद्धा. त्यामुळे कामाचा भार सर्वसाधारण असेल तर मी अगदी वेळच्यावेळी निघालो, (अगोदर सांगून) थोडा उशीरा आलो, किंवा काम नसताना/कमी असताना लवकर गेलो तर कुणाला काही बोलायला तोंड राहत नाही.)

त्यामुळे टोचाला अनुमोदन.

टोचा, झोपाळू, तुमचा मुद्दा बरोबर असला तरी दुर्दैवाने अनेक ठिकाणी असे नसते. तुमचे काम झालेले असले आणि वेळेत निघाले तरी तु.क. टाकणारे लोक, प्रसंगी टोचून बोलणारे आणि त्यापुढे जाऊन डुख धरणारे लोक असतात.

जपानमधे तर या प्रकाराचा अतिरेक आहे. माझ्या माहितीमधे काही लोकांना जबर्‍या त्रास झालेला आहे याचा, एवढा की त्यांना नोकरी बदलावी लागली, आणि नविन नोकरीत त्रास कमी असला तरी पुर्णपणे आलबेल ही नव्हते.

यावर उपाय म्हणुन जपान मधे अनेक कंपन्यांनी आता अशी सुरूवात केली आहे की आठवड्यातला एक दिवस संध्याकाळी ६ वाजता बेल वाजणार आणि अनाऊन्समेन्ट होणार की आज "नो स्ट्रेच्ड अवर डे" आहे.

कॉर्पोरेटवाल्यांचा प्रॉब्लेम समजू शकते.
पण फक्त हेच एक क्षेत्र नाही की जिथे कामाचे तास डिफाईन्ड नसतात. इतर अनेको तुलनेने कमी पैसे देणार्‍या/न देणार्‍या, अमाप पैसे देणार्‍या क्षेत्रांमधेही दिवसाला अनेक तास काम करायला लागतंच की. वकील,डॉक्टर,, स्वतःचे व्यवसाय असणारे लोक, दुकानदार/ हॉटेलवाले (घाला यादीत भर जशी आठवले तशी).. कुणीच दिवसाला ९ ते ६ काम करून नंतर आराम करत नाही.
मी शिक्षण-संशोधनक्षेत्रात आहे आणि जे माझ्या क्षेत्रात सिन्सिअरली काम करतात त्यांना दिवसाचे १५-१६ तास काम केलं तरी वेळ कमीच पडतो. नोकरीचे तास अस्तील तेवढे (बहुतेकांना तेच दिसतात फक्त) पण त्यात कामं कधीच संपत नसतात. अनेकोनेक डेडलाईन्स असतात. कितीतरी शनि-रविवार हे पेन्डिंग घरकाम आणि तुंबलेली व्यावसायिक कामं यातच गेलेले आहेत्/जातात. याचे आर्थिक परतावे कमी किंवा शून्यही असू शकतात. पण म्हणून कामाचे तास व ताण कमी होत नाहीत. कितीही आवडीने या क्षेत्रात आलेलो असलो तरीही हा ताण कधीकधी अति होतोच. जे शास्त्रशाखेत संशोधन करतात त्यांचे (विशेषतः परदेशातील लॅब्समधील) किस्से, अडचणी, वगैरे वाचलं तर ते आणखीच गंभीर आहे हे लक्षात येईल

या सगळ्यातून आपणच आपला सुवर्णमध्य शोधायचा असतो. बरेच जणांना आकर्षक पगारपण हवे आणि कामाचे तास इतके सोसवत नाहीत/नकोत असं हवं असतं. कुठेतरी आपल्या प्रायॉरिटीज निश्चित कराव्या लागतात किंवा आहे ती परिस्थिती उमजून स्वीकारावी लागते....

नाईन टू फाईव्ह हे कदाचित खूप प्रयत्नांनंतर ऑफिसेसमधे लागू करताही येईल पण बाकीच्या क्षेत्रांमधे लागू होईल की नाही शंकाच आहे Happy दॅट विल बी टू युटोपिअन!!

महेश यांच्या मताशी सहमत.
किती ठिकाणी खरेच व्यवस्थित काम केले कि नाही हे पाहिले जाते?

जरी कामे आवरून निघालात तरीही कुणीतरी टोचून बोलतेच ना…

आणी आता तर असा पायंडाच पडलाय की उशिरा पर्यंत थांबणाराच काम करतो, जो लवकर (म्हणजे वेळेवर) घरी जातो तो काम करत नाही.

समजून घेणारे बॉस किती असतील?

माझ्या सुदैवाने माझा बॉस चांगला आहे पण सहकार्यांची अवस्था पाहिले की नकोसे वाटते…

पाच दिवसांचा आठवडा ही मुर्ख पद्धत आहे, चंगळवादाला सरावलेल्या अमेरिकनांची....
खरेतर आठवड्यातले सहा दिवस काम असावे व कामाचे आठ तास असावेत! वेळेआधी कुणालाही सोडु नये. पाच दिवसाचा आठवडा म्हणजे एका महीण्यात आठ दिवस सुट्टी ,म्हणजे वर्षाचे ९६ दिवस +पगारी रजा २५+ सीक लिव्ह १०+ सर्कारी सुट्ट्या २०= १५१ दिवस रिकामटेकडे राहयचे, वर गलेलठ्ठ पगार घ्यायचे ,कपडे बदलावेत तशा कंपन्या बदलायच्या ,सेकंड सॅटरडेला बँका सरकारी कार्यालये बंद म्हणुन त्यांच्या नावे इवळायचे.अशा कामचुकारांना कंपन्या लाथ देतात ते योग्यच आहे.
कंपन्या व्यावसायिक व्यवस्था असतात, तुमच्यावर उपकार करणार्या व एंटरटेन करणार्या , तुमच्या इशार्यावर चालणार्या तुमच्या तिर्थरुपांच्या खाजगी व्यवस्था नव्हेत ..... एखादी कंपनी जास्त काम सांगत असेल तर तो कामाचा अपरीहार्य भाग आहे तुमची भांडीवाली एखाद्या दिवशी तुमच्याकडे पाहुणे आल्यास जास्त काम करते, तसेच आहे कॉर्पोरेट धुणेवाल्यांचं Proud

कचकून अनुमोदन धीरज काटकर साहेब..

साल्या ह्या IT वाल्यांना २० २० तास राबवायला हव

जेमतेम ४ तास काम करतात , त्यातही टिवल्या बावल्या , वर्षातले ६ महिने बेंच वर फुकट पगार, जिम, गेम्स खेळतात , घरी आणायला सोडायला गाडी , फुकटच्या परदेश वार्या , तरी स्वताला हमाल म्हणवून घेतात...

जेमतेम ४ तास काम करतात , त्यातही टिवल्या बावल्या , वर्षातले ६ महिने बेंच वर फुकट पगार, जिम, गेम्स खेळतात , घरी आणायला सोडायला गाडी , फुकटच्या परदेश वार्या , तरी स्वताला हमाल म्हणवून घेतात...>>>> बन्या भाव सगळ्याना एकाच तागडीत तोलु नका हो. ऑफिसमधले इतर कर्मचारी निघुन गेले तरी मॅनेजर बरोबर रात्री ८ पर्यन्त, शनीवार फुल डे आणी कधी कधी रविवारी सुद्धा काम करणार्‍या माझ्या नवर्‍याबरोबर माझे सुट्टीवरुन वाद होत होते. घरी सोडायला गाडी नाही.

२ तासात घरी येतो असे सान्गुन पाडव्याच्या दिवशी ( दिवाळीचा हो ) सकाळी गेलेला नवर्‍याचा मित्र ( दुसर्‍या कम्पनीत ) रात्री ८:३० ला घरी आला, का तर कम्पनीचे सर्व्हर डाऊन झाले होते. एवढे सोपे आहे का आय टी फिल्ड.

आणी बेन्चवरच का? नोकरी पण जाऊ शकते की. आय टी फिल्ड चा एकदा नीट सर्व्हे करा आणी मग बोला/ लिहा. तरी बरे आय टी आहे म्हणूनच मायबोलीवर आलात.:फिदी:

माझ्या पूर्वीच्या नोकरीत जो बॉस होता तो या लेट सिटिंग ने पछाड्लेला होता
सगाळ्या स्टाफला लेट सिटिंगचे धड़े एकदातरी देण हे त्याच आठवडयामधल मुख्य काम
यात त्याला खुश करण्यासाठी काही लोक मुद्दामहुन लेट सिटिंग करायचे
थोडक्यात चापलूसी
बर या लेट सिटिंगची दखल सैलरी शीट मध्ये घेतली जाईल ही अपेक्षा व्यर्थ
शेवटी शेवटी तर दुर्लक्ष करायला सुरुवात केली आम्ही

महेश यांच्या पोस्टिला अनुमोदन

ignore>>>खरे बोलले की इग्नोरास्त्र ,सरळ सांगुन टाकावं प्रतिवाद करता येत नाही ते!

अपूर्व, चांगला विषय.
वरदा, अनुमोदन. अशी अनेक फिल्ड्स असतात की जिथे तास मोजुन काम करणे शक्य नाही. शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, पोलिस, सैन्यदल अशा पेशातले लोक ठराविक वेळी आठ तासाची ड्युटी संपवुन घरी परततील ही शक्यताच कमी. कित्येक यशस्वी डॉक्टरना स्वतःच्या जेवणखाण्याकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो असे बघितले आहे. ( लगेच पैशाची हाव हा मुद्दा येईलही पण सगळेच तसे करत नसतात. )
आयटीमधल्या लोकांवरतर नेहेमीच आगपाखड होत असते. अर्थात असेही लोक असतात जे मुद्दाम ऑफिसात वेळ काढतात हे मान्य. पण सरसकट सगळेच तसे नसतात. उदाहरणच घ्यायचं तर २४ तास ऑनलाईन बँकींग सुरु असते. तिथे काही प्रॉब्लेम आला तर आयटी इंजिनीअरला वेळी अवेळी बघावेच लागणार. वेब्साईट बंद ठेवून चालणार नाही. तसेच स्टॉक मार्केट साठी काम करत असणार्‍या आयटी इंजिनीअरला त्या दिवशीचा प्रॉब्लेम त्याच दिवशी सॉल्व करावा लागतो. पुढचे मार्केट उघडायच्या आत काही इश्युज सोडवावे लागतात त्याला इलाज नाही. डॉक जसे ऑपरेशन करताना माझी घरी जायची वेळ झाली म्हणुन अर्धवट सोडुन जाऊ शकत नाही तसेच हे.

<<ऑफिस मधे वेळेवर आले, नीट आणि चुका नसलेले काम केले, कँटीन मधे वेळ घालवला नाही की व्यवस्थित वेळेवर निघता येते. >>> हे नेहेमीचे क्लर्क किंवा रुटीन काम असेल तर ठिक आहे. नेमके घरी निघताना एखादा अस्त्यव्यस्त पेशंट आला किंवा एखादी अर्जंट ऑर्डर प्रोसेस नाही झाली किंवा सर्वर डाऊन झाले तर उद्या ९ वाजता येऊन बघतो असे सांगता येत नाही. फोटोग्राफर हायर केलात आणि लग्न समारंभ उशिरा पर्यंत चालला तर तो काही असं म्हणु शकत नाही की थांबा उरलेले लग्न उद्या लावा.

धिरज, बन्या, तुम्ही जे बोलताय असे किती लोक असतील आयटीमधे ? मी पाहिलेल्या लोकांमधे मला जेमतेम एखादा टक्का दिसले असतील. थोड्या लोकांमुळे कृपया पुर्ण आयटी क्षेत्राला नावे ठेवू नका.
अजुन एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे आयटीच्या लोकांचे काम अनेक वेळा बाहेरील देशांसाठी असते, त्यामुळे त्या देशाच्या वेळेनुसार देखील काम करावे लागते. अनेकदा शिफ्ट्च्या वेळा तशा ठरविल्या जातात, पण काही इश्यूज असतील तर वर रश्मी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे वेळ लागू शकतो. मी हे केवळ कोरडे सांगत नाहीये, अनुभवाचे बोल आहेत.

हल्ली २-३ व्हॉट्सॅप ग्रुप्स वर हे लेटर दिसले - खरे खोटे माहित नाही पण नारायणमूर्तींनी लिहिले आहे म्हणे इन्फोसिस एम्प्लॉयीज ना - त्याची आठवण झाली हा बाफ वाचूनः

PLEASE READ & THINK....... Narayana Murthy's views on staying late in the office
To: Dear All,

It's half past 8 in the office but the lights are still on... PCs still running, coffee machines still buzzing... and who's at work? Most of them??? Take a closer look...
All or most specimens are??-something male species of the human race... Look closer... again all or most of them are bachelors...
and why are they sitting late? Working hard? No way!!!
Any guesses???
Let's ask one of them...
Here's what he says... "What's there 2 do after going home... here we get to surf, AC, phone, food, coffee... that is why I am working late...
importantly no bossssssss!! !!!!!!!!!
This is the scene in most research centers and software companies and other off-shore offices. Bachelors "time-passing" during late hours in the office just bcoz they
say they've nothing else to do... Now what r the consequences. .. read on... "Working"(for the record only) late hours soon becomes part of the
institute or company culture. With bosses more than eager to provide support to those "working" late in the form of taxi vouchers, food vouchers and of course good
feedback,(oh, he's a hard worker... goes home only to change..!!). They aren't helping things too... To hell with bosses who don't understand the difference between "sitting" late and "working" late!!!
Very soon, the boss starts expecting all employees to put in extra working hours. So, My dear Bachelors let me tell you, life changes when u get married
and start having a family... office is no longer a priority, family is... and that's when the problem starts... becoz u start having commitments at
home too.
For your boss, the earlier "hardworking" guy suddenly seems to become an "early leaver" even if u leaves an hour after regular time. .. after doing
the same amount of work.
People leaving on time after doing their tasks for the day are labeled as work-shirkers. ..

Girls who thankfully always (its changing nowadays... though) leave on time are labeled as "not up to it". All the while, the bachelors pat their
own backs and carry on "working" not realizing that they r spoiling the work culture at their own place and never realize that they would have to
regret at one point of time.

* So what's the moral of the story?? *
* Very clear, LEAVE ON TIME!!!
* Never put in extra time " *unless really needed *"
* don't stay back un-necessarily and spoil your company work culture
which will in turn cause inconvenience to you and your colleagues.
There are hundred other things to do in the evening...
Learn music...
Learn a foreign language...
try a sport... TT, cricket..... ....
Importantly Get a girl friend or gal friend, take him/her around town...

* and for heaven's sake net cafe rates have dropped to an all-time low
(plus, no fire-walls) and try cooking for a change.

Take a tip from the Smirnoff ad: *"Life's calling, where are you??"*
....
....

अ‍ॅडमिन - काही कॉपीराइट किंवा तत्सम इश्यू वाटले तर उडवून टाका Happy

'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'

हे मात्र अगदीच खरंय. सर्वच बाबतीत. नुसतं कामाचे तासच नव्हे, तर वशिलेबाजी, आपली भाषा (तेलगू, हिंदी, गुजराती) बोलत असलेल्यांना(च) मदत करणे, इथल्या सार्वजनिक मालमत्तेचा हवा तसा वापर करणे- कठीण आहे अमेरिकेचं!

मैत्रेयी, हो असे पत्र मेल्स मधे फिरत होते, खरेच ना.मु.नी लिहिले आहे का ते माहित नाही, पण मला नाही वाटत की खुद्द इन्फोमधे याचा सुपरिणाम झाला असेल लगेच.

तर वशिलेबाजी, आपली भाषा (तेलगू, हिंदी, गुजराती) बोलत असलेल्यांना(च) मदत करणे, इथल्या सार्वजनिक मालमत्तेचा हवा तसा वापर करणे- कठीण आहे अमेरिकेचं!
<<
झक्कींना भेटा.
ज्यू लोकांच्या याच गुणांवरचे कीर्तन ऐकायला मिळेल Wink

आपल्या आवडी, निवडी वा छंद याच गोष्टींच्यातून करीअर केलेलं असेल तर जनरली तासाचं गणित लक्षातही रहात नाही, स्ट्रेसही जाणवत नाही आणि रिकामेही वाटत नाही. काम असलं की मजा येत असते.
केवळ उत्तम अर्थार्जन किंवा सामाजिक दर्जा अश्या गोष्टी मध्यभागी ठेवून मग करीअर केले असेल तर किंवा नोकरी धरली असेल तर मग सगळे प्रॉब्लेम्स येतात उफाळून.

Pages