दमलेल्या तुमची आमची कहाणी

Submitted by अपूर्व on 9 July, 2014 - 03:14

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'

'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.

स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.

कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.

हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या आवडी, निवडी वा छंद याच गोष्टींच्यातून करीअर केलेलं असेल तर जनरली तासाचं गणित लक्षातही रहात नाही, स्ट्रेसही जाणवत नाही आणि रिकामेही वाटत नाही. काम असलं की मजा येत असते.
केवळ उत्तम अर्थार्जन किंवा सामाजिक दर्जा अश्या गोष्टी मध्यभागी ठेवून मग करीअर केले असेल तर किंवा नोकरी धरली असेल तर मग सगळे प्रॉब्लेम्स येतात उफाळून.

आयटीमधली सुबत्ता जाऊन आता ६ वर्षे झाली... कॉस्टकटिग सुरु झालं आहे... आमच्या कंपनीत तर कामाचे तास ९ आहेत.. पण एक खरं, बाकी इतर फिल्ड्सपेक्षा हे Relaxed आहे आणि पैसेपण जास्त मिळता पण ते तुमच्या टेक्ननॉल्जीस, अनुभव, कंपनी, रिपोटिग मॅनेजर आणि सध्या हातात असलेल्या प्रोजेक्टवर अवलंबून असते.. मला तर डॉक्टर लोकांचे वाईट वाटते... किती मोठे झाले, पैसे मिळत असले तरी कॉलवर जावे लागते...

मला तर डॉक्टर लोकांचे वाईट वाटते... किती मोठे झाले, पैसे मिळत असले तरी कॉलवर जावे लागते... <<
सर्व डॉक्टर्सना कॉलवर जावे लागते? माझ्या अंदाजाप्रमाणे सर्व स्पेशालिटीजना नाही जावे लागत इमर्जन्सीला. खखोडॉजा!
पण डॉक्टरला हे खरंच वाईट किंवा त्रासदायक होत असेल का नेहमीच?
काही डॉक्टरांना होत असेल. डॉक्टरांना काही वेळा होत असेल.
पण बहुतेक शिक्षणाला सुरूवात होतानाच इमर्जन्सी कॉलला जावे लागणे वगैरे याची तयारी होत असणार ना मनाची.

आयटी ची लोक बाकीच्या फिल्ड पेक्षा नक्कीच लाडावलेली आहेत. आणि ते सुद्धा फारच.

पैसे जेव्हडे मिळतात त्याला जर कष्ट कीती करावे लागतात याने भागले तर हा रेशो आयटी साठी बराच जास्त येइल.

लाडावलेले आहेत की नाहीत, पैसे जास्त मिळतात की नाहीत हे मला काही माहित नाही. पण कामाचे ताण, कामाचे तास वगैरे यांच्याबद्दल नेटवर जिकडे तिकडे जास्त करून आयटीवालेच रडताना बघितलेत.

ण कामाचे ताण, कामाचे तास वगैरे यांच्याबद्दल नेटवर जिकडे तिकडे जास्त करून आयटीवालेच रडताना बघितलेत.>>>>>> कारण ऑफिस मधुन नेट वर असणे हे टक्केवारी प्रमाणे आयटी मधलेच जास्त असतात.
मेकॅनिकल, सिविल मधले लोक कसे नेट वर बसू शकतील दिवस भर?

आयटी, मेकॅनिकल, सिविल सोडूनही जग बरंच आहे.
इतर डिमांडिंग प्रोफेशन्समधले लोक आहेत ज्यांचा नेटवर मुक्त संचार असतो.
तरीही या बाबतीत रडतात आयटीवालेच असे माझे निरीक्षण आहे.

आयटी, मेकॅनिकल, सिविल सोडूनही जग बरंच आहे.
इतर डिमांडिंग प्रोफेशन्समधले लोक आहेत ज्यांचा नेटवर मुक्त संचार असतो.
तरीही या बाबतीत रडतात आयटीवालेच असे माझे निरीक्षण आहे. >.
नीधप , स्वतः आय टी वाला (पार्ट्ली) असूनही तुम्हाला अनुमोदन .
त्याच एक कारणही तुमच्या वरच्या प्रतिसादात आहे अस मला वाटत . बहुसंख्य आयटी वाले अर्थार्जन म्हणूनच इथे काम करत असतात . डेव्हलपमेंट , टेस्टींग ई . मनापासून आवडते म्हणून करणारे कमीच .
पण याला दुसरीही बाजू आहे , अनेक सर्विसेस कंपन्या क्लाएंट्सना १ वर्षे अनुभव असलेले लोक ३-४ वर्षे आहे म्हणून सांगतात . त्यामुळे ते कव्हर करण्यासाठी जास्ती तास थांबाबे लागते (हा माझ्या बहिणीचाही अनुभव आहे)
आता असे कंपन्या का करतात हे सुज्ञास सांगणे न लगे Happy

म्हणजे ३-४ वर्षाचा अनुभव सांगून पैसे जास्त घ्यायचे आणि १ वर्षाचा अनुभव वाले लोक घेऊन ते वाचवायचे वर त्यांना ३-४ वर्षाच्या अनुभवाइतके राबवायचे असे का?
पण नुसते जास्त तास राबवून अनुभवाची कमतरता भरली जाते का?

म्हणजे ३-४ वर्षाचा अनुभव सांगून पैसे जास्त घ्यायचे आणि १ वर्षाचा अनुभव वाले लोक घेऊन ते वाचवायचे वर त्यांना ३-४ वर्षाच्या अनुभवाइतके राबवायचे असे का?
पण नुसते जास्त तास राबवून अनुभवाची कमतरता भरली जाते का? >>

बरोबर नीधप .
तेच ना , क्लाएंट कडून ३ वर्षे अनुभवाच्या माणसाच्या ८ तासाचे पैसे घ्यायचे (जनरली पर अवर बिलिंग असते)
मग तेच काम करायला बिचारा फ्रेशर १२-१४ तास राबतो , त्यातूनही तेवढी क्वालिटी मिळत नाहीच . पण क्वालिटीची काळजी आहे कुणाला ?

लबाड आणि कामचुकार लोक आयटीत जास्त आहेत, एकंदर जगाच्या वर्क कल्चरची वाट यांनीच लावली आहे. चंगळवादालाही खतपाणी घालणारे आयटीतलेच लोक आहेत.आयटी आणि बीपीओ सेक्टरमुळे भारतात व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण वाढले आहे.
यांच्या ऐशोरामी चंगळवादी नोकर्या पाहून इतर क्षेत्रातल्या लोकांमध्येही कष्टाचं व कामा बाबतीतल्या सचोटीचं महत्व कमी होत आहे.

आपल्या आवडी, निवडी वा छंद याच गोष्टींच्यातून करीअर केलेलं असेल तर जनरली तासाचं गणित लक्षातही रहात नाही, स्ट्रेसही जाणवत नाही आणि रिकामेही वाटत नाही. काम असलं की मजा येत असते. केवळ उत्तम अर्थार्जन किंवा सामाजिक दर्जा अश्या गोष्टी मध्यभागी ठेवून मग करीअर केले असेल तर किंवा नोकरी धरली असेल तर मग सगळे प्रॉब्लेम्स येतात उफाळून.>>> प्रचंड अनुमोदन!

आपल्या आवडी, निवडी वा छंद याच गोष्टींच्यातून करीअर केलेलं असेल तर जनरली तासाचं गणित लक्षातही रहात नाही, स्ट्रेसही जाणवत नाही आणि रिकामेही वाटत नाही. काम असलं की मजा येत असते. केवळ उत्तम अर्थार्जन किंवा सामाजिक दर्जा अश्या गोष्टी मध्यभागी ठेवून मग करीअर केले असेल तर किंवा नोकरी धरली असेल तर मग सगळे प्रॉब्लेम्स येतात उफाळून.>>> याला अनुमोदनच. पण कुठल्याही समाजात अशा लोकांचं प्रमाण जाणवण्याइतकं असणारच. फक्त भारतात काय होतं, की आपल्याला काय आवडतं याचा विचार करायला शिकवलं जात नाही. आर्थिक स्थैर्य आणि त्याबरोबर येणारं सामाजिक स्थान या आपल्या मानसिकतेत सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे बहुसंख्य बर्‍यापैकी हुशार जनता 'फ्लो' बरोबर जाते. जे वेगळं काही करू बघायला जातात त्यातले निम्मे घरच्या-दारच्या विरोधाने मागे फिरतात. यात मी चूक-बरोबर करत नाहीये. तर प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते आणि कुठल्याच करिअरमधे विन-विन सिच्युएशन बहुदा नसते हे लोकांना आधी कळत नाही. तुम्ही फक्त अर्थार्जन करायला उतरणार असाल तर मग हे प्रॉब्लेम्स येऊच शकतात. जर तुम्ही आवडीच्या क्षेत्रात उतरणार असाल तर मनाजोगे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक स्थैर्य लाभेलच, ती करिअर यशस्वी होईलच याचा भरवसा असतोच असं नाही - हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
तुम्ही काय करायचं ते तुमच्या हातात

प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते आणि कुठल्याच करिअरमधे विन-विन सिच्युएशन बहुदा नसते <<<
हे आणि जे काम आपल्याला भाकरी (वरून तूप सुद्धा!) मिळवून देतंय त्या कामाशी आपली वैयक्तिक पातळीवर कमिटमेंट असायला हवी. कमिटमेंटच्या भावनेतून जबाबदारी घेतली जायला हवी हे..
या दोन्ही गोष्टी भारतीय समाजात फार कमी शिकवल्या जातात.

हो ते लिहायचं राहून गेलं, नी.
आपल्याला जे पैसे मिळतात, ज्या कामासाठी मिळतात ते कितीही नावडतं असलं तरी मनापासून बांधिलकी ठेवून करायचं असतं हेही आपल्याकडे क्वचित समजावून सांगितलं जातं. एकुणात आपण भारतीयांना रडगाणी गायला जास्त आवडतात. शिवाय तशीही श्रमप्रतिष्ठा आपल्याकडे नाहीच. बरेच मुद्दे आहेत. पण आत्ता लिहायला वेळ नाही

इथले काही प्रतिसाद वाचून मस्त करमणुक होतेय

बरेच लोकं आयटीला अशी नावं ठेवतात जसं काही ते आयटीत काम करून आलेत आणि आवडलं नाही क्षेत्र म्हणुन सोडुन देऊन नवं काहीतरी करतायेत सो त्यांना आयटीतली सगळीच्या सगळी रिअ‍ॅलिटी आणि कोपरान् कोपरा, खाचा खोचा माहीत आहेत. Rofl

असो!

एकंदरीत आयटीवाल्यांवरची सामाजिक जळजळ बघुन लै मज्जा वाटते Happy

बाकी चालू द्यातच!

कंदरीत आयटीवाल्यांवरची सामाजिक जळजळ बघुन लै मज्जा वाटते<<< ते आयटीवालेच जळीस्थळी़ लेख लिहितात, इतकं काम आहे, फॅमिली लाईफ नाही, जीवनाचा आनंद घेता येत नाही, पैसा असला तरी त्याचा उपयोग नाही.. ते वाचून तर त्याहून जास्त मज्जा वाटते. त्यातून काही जणांनी सगळीकडे "आम्ही आयटीवाले असे नी र्तस" असा झेंडा घेऊन केलेले लिखाण वाचून अजून मज्जा वाटते.

(जळजळ वगैरे काही होत नाही. डोन्ट वरी. वी आर वेरी मच हॅपी इन अवर फिल्ड. अ‍ॅण्ड वी नेव्हर कंप्लेन अबाऊट इट. वी जस्ट एंजॉय सच पोस्ट्स!!व्व्हेरी मच मज्जा मज्जा!!)

हो, वरच्या दोनतीन भडकाऊ - मुद्दाम लिहिलेल्या - पोस्टी सोडल्या तर कुठल्याही प्रतिसादात आयटीबद्दल सामाजिक जळजळ वगैरे व्यक्त होतेय असं काही वाटत नाही. मी तर एकुणात कॉर्पोरेट जॉब्जबद्दल लिहिलं आहे, त्यात आय टी सोडून इतरही असंख्य क्षेत्रं आहेत.

पण हेही सत्यच आहे की आयटी/कॉर्पोरेट पेक्षाही जास्त कामाचे तास असणारी, त्यापेक्षाही डिमान्डिंग आणि वर्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत कमी सोयीसुविधा असलेली क्षेत्रे खूप आहेत. आणि त्यातली माणसे (सगळेच जण आवड म्हणूनही जातात तिथे असं नाही, त्यात्या क्षेत्रातही पोटार्थी लोक असतातच) इतक्या सातत्याने सोशल मीडीयात तक्रार करताना आढळत नाहीत हेही तितकंच खरं!

गपा गं वरदा आणि नंदीनी.. तुम्हाला ना प्रवेश मिळाला नव्हता आणि सामाजिक जळजळ आहे तुमच्यात. कळ्ळं?

म्हणजे ३-४ वर्षाचा अनुभव सांगून पैसे जास्त घ्यायचे आणि १ वर्षाचा अनुभव वाले लोक घेऊन ते वाचवायचे वर त्यांना ३-४ वर्षाच्या अनुभवाइतके राबवायचे असे का?
पण नुसते जास्त तास राबवून अनुभवाची कमतरता भरली जाते का?>>>>> @ नीधप. ह्यावरुन तुम्हाला आयटी मधल्या हमाली ची आणि आयटी मधे Customer Expectation कीती low असु शकते हे कळले असेल.

बरेच लोकं आयटीला अशी नावं ठेवतात जसं काही ते आयटीत काम करून आलेत आणि आवडलं नाही क्षेत्र म्हणुन सोडुन देऊन नवं काहीतरी करतायेत सो त्यांना आयटीतली सगळीच्या सगळी रिअ‍ॅलिटी आणि कोपरान् कोपरा, खाचा खोचा माहीत आहेत>>>>> @ रीया. मी आयटी त च आहे आणि ते देखिल बरीच वर्ष.
आणि हे क्षेत्र सोडण्याचा विचार पण नाही. वर मी म्हणल्या प्रमाणे मिळणारे पैसे भागिले कष्ट, बुद्धी, तणाव हा रेशो आयटी मधे सर्वात जास्त आहे.

ह्यावरुन तुम्हाला आयटी मधल्या हमाली ची आणि Customer Expectation कीती low असु शकते हे कळले असेल. <<
छे हो असे काही नाही. मला प्रवेश मिळाला नव्हता आणि मला सामाजिक जळजळ आहे म्हणून म्हणाले मी. जास्त नका मनावर घेऊ.

वरदा, अनुमोदन.
खरोखरच असे किती टक्के लोक असतील ज्यांना स्वतःची आवड काय आहे आणि काय करायचे हे कळते / असा विचार करायला शिकवले जाते हा मुद्दा आहे. सर्वसामान्य मुलं /मुली जिथे साधारण बरे पैसे मिळतात अशा क्षेत्राला प्राधान्य देतातच. त्यात त्यांची चुक फार आहे असे मी म्हणणार नाही. एखाद्या साधारण विद्यार्थ्यालाही कॉम्प्युटर रिलेटेड कोर्सेस करुन काहीतरी नोकरी मिळत असेल तर त्याच्या आजुबाजूची मुले तेच अनुकरण करणार.

मुळात जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तिथे कामाचे समाधान पेक्षा पगार हा महत्वाचा मुद्दा होतो ( होऊ नये असे वाटले तरी) . समजा मी डॉक आहे, हा पेशा मला आवडतो आणि मी दिवसरात्र काम केलं. तर त्यात माझं समाधान आहे, पैसाही असेल शिवाय समाजात उत्तम डॉक म्हणुन मान्यता / प्रसिद्धी ही मिळेल. तेच मी फोटोग्राफर असेन, दिवसरात्र काम केलं तर पुन्हा समाधान, पैसा, मान्यता / प्रसिद्धी मिळते मी मला प्रत्यक्ष मिळते.
पण समजा मी एखाद्या कंपनीत नोकरी करते आणि दिवसरात्र काम करते तर पैसा मिळतो, आवडीचे काम असेल तेव्हा समाधान मिळेल पण कंपनीतल्या रोजच्या कामातले सगळेच आवडीचे काम असेल असे नाही, जे असाईन होईल ते करावे लागेलच त्याशिवाय एक व्यक्ती म्हणुन समाजात वेगळी मान्यता नाही. पण तरिही महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, म्हणुन ते काम स्विकारणारे लोक अनेक असतात. पडेल ते काम आनंदाने करणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. ( ही तीन फक्त उदाहरणे म्हणुन घेतली, इतरही अनेक विविध क्षेत्रे आहेत ज्यात वेगळे मुद्दे पुढे येऊ शकतील )

आयटीमधे पगार जास्त हे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे. का पगार जास्त दिला जातो? कंपन्या काही चॅरिटी चालवत नाहीत. त्या कंपन्यांना त्याच्या कित्येक पट फायदा होतो. कंपन्यांना रॉ मटेरियल विकत घेणे, बाजारात माल विक्रीसाठी पाठवणे असे खर्च नसतात ( इतर असतात अर्थातच) त्यामुळे लोकांना पगार जास्त दिला जातो. केवळ पगार जास्त आहे म्हणुन खरच कोणी इतर काही तक्रार करायची नाही का? आयटी मधे कामगार युनियन वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे जर एखाद्या आयटी इंजिनीयरवर खरच अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध बोलण्यासाठी जागाच नाही.

जर एकजण म्हणाला की दिवसातले १८ तास मी ऑफिसमधे राबणार नाही तर पुढच्या महिन्यात त्याच्याजागी दुसरा कोणीतरी असेल. तुमची नोकरी किती दिवस असेल हे नक्की नाहीच. नोकर्‍या मिळतात म्हणुन काहिही करुन आयटीमधे येणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे खरोखरच कामाची क्वालिटी कमी होते. ज्यांना आवड आहे, जमते ते आपल्याबरोबर इतरही दोन जणांचे काम करत असतात हे सत्य आहे. खराब टिममुळे एखादे महत्वाचे काम झाले नाही तर कंपनीतुन लगेच उचलबांगडी.

बरं, महिन्यातले काही दिवस , किंवा काही आठवडे नाही तर वर्षानुवर्ष तुमच्याकडुन दिवसेंदिवस राबण्याची अपेक्षा कंपन्या ठेवतात. जिथे कामाला दहा जण हवेत तिथे चार किंवा पाच जणांना हायर करतात. त्यांना जाब विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही. इतर बहुतांश प्रकारच्या वर्करना ठराविक तासाच्या वर काम झाले तर का ते सांगावे लागते, त्यांच्या बाजुने कोणीतरी बोलणारे असते. पण आयटी मधे ते शक्य नाही. पण आयटी मधल्या लोकांना वेंट आऊट व्हायला इंटरनेट हेच एक माध्यम आहे त्यामुळे नेट वापरणार्‍या सगळ्यांना ते दिसते. ( आत्ता यावेळेस तरी 'कामगारांच्या बाजुने कोणी नाही असा 'या व्यतिरिक्त इतर पेशा आठवत नाहीये, अजुन आहेत हे मान्य आहे)

अर्थातच आयटीमधेही कामचुकार लोक अनेक आहेत आणि त्यांच्यामुळे सगळ्या पेशाचे नाव बदनाम होत असते. पण हे कुठल्या क्षेत्रात नाही?
पॅराडॉक्स असा की ज्या माध्यमातुन हे नाव बदनाम होतेय ते माध्यमच मुळात आयटी या फिल्डमुळे उपलब्ध झालेले आहे. आज मी इथे टाईप करतेय, तुम्ही वाचताय कारण कुठल्यातरी आयटी इंजिनीअर टिमने आपले काम योग्य केलेय.

अपूर्व, तुम्ही म्हणालात तसे वर्क कल्चर येणे कितीही हवे हवेसे असले तरी फारसे शक्य नाही असे वाटते.

सावली, एखाद्या क्षेत्रात किती पगार असावा हे बहुतांशी मार्केट्सवर ठरतं. आयटीत किंवा कॉर्पोरेटमधे पगार जास्त असतील तर त्याबद्दल इतरांना - निदान मला तरी - असूया नाही. त्या क्षेत्रात अडचणी नाहीत असंही कुणी म्हणत नाही. पण इतरही क्षेत्रात अडचणी असतातच, त्याही तितक्याच सीरियस असतात, इ. मुद्दे कॉर्पोरेट/आयटी मधले तक्रारखोर लोक सहसा लक्षात घेत नाहीत.
वरती लिहिलं आहे तसं विन-विन सिच्युएशन कधी कुठल्या क्षेत्रात असते? आणि एकाने नोकरी सोडली तर मागे शंभरजण त्याची जागा घ्यायला उभे हे इतरही नोकर्‍यांत असतंच की. आणि हेही खरं की आयटीवाल्यांना सहजी नेट अ‍ॅक्सेस असतो म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व सोशल मीडियात जास्त दिसतं. फक्त इतर ग्रुप्सचं दिसत नाही म्हणजे ते नाहीत असं नाही एवढंच म्हणायचं आहे

मुळात व्हाईट कॉलर जॉब्जमधे युनियन नसते ही आपल्या देशातल्या धोरणकर्त्यांनी पण लक्ष घालायची जबाबदारीची गोष्ट असते.

मला तो 'सामाजिक जळजळ' वगैरेवाला मुद्दा अतीव खटकला म्हणून एवढं लिहिलं.

Pages