दमलेल्या तुमची आमची कहाणी

Submitted by अपूर्व on 9 July, 2014 - 03:14

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'

'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.

स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.

कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.

हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी
मला त्याच वेळेस लक्षात आलं कि हे काही खरे नाही आपल्याकडुन हे काही आयुष्यभर होणार नाही. गपचुप नोकरी बदलली. आताच्या नोकरी मधे चार पैसे कमी मिळतात पण चांगली आहे. चार पैसे म्हणजे माझे जे मित्र तिथे टिकून आहेत त्यांना माझ्या दुप्पट पगार आहेत पण कामची स्थिती जैसे थे.

मला त्यांच्या सारखी लाईफस्टाईल ठेवता येत नाही( महागडे मोबाईल, गाड्या, घडाळे, कपडे, हॉटेलींग ). पण मला वाईट वाटत नाही, आणि नशीबाने बायकोला पण या गोष्टींचं अप्रुप नाही. शांतपणे ९ ते ५ काम करतो, घरी येऊन मुलाशी खेळतो, वाचन, मित्र, छंद जपतो.

आमच्या कंपनी मधे पण, जास्त तास काम करणारे, मोठा हुद्दा, पगार, शाबासकी मिळविणारे लोक आहेत. हे सगळे तुमचे तुम्हाला लखलाभ असे म्हणून पाच वाजता बॅग उचलून घरी येतो.

मूळात मला कळत नाही सगळे लोक का पळत आहेत ? नक्की काय मिळवाय्चे आहे या सर्वाना?

ज्या लाईफ स्टाईल , ऐषोआरामा साठी हे सर्व लोक पळत आहेत तो या लोकांना स्वताला हवा आहे कि दुसरे करत आहेत मग आपण पण जगाच्या सोबत चालण्यासाठी ते करायला हवे म्हणून करतात ?

आपण आपले यश, आपला आनंद दुसर्‍याच्या फुटपट्टीने मोजत आहोत का ?

>>>>>>>>>>>>>>>>>

याउपर बोलायला मला काही ठेवलेच नाही, अगदी बॉटमलाईन सुद्धा माझ्याच मनातील विचार.

खरे तर तुम्ही नशीबवान आहात जे तुमच्या बायकोला असल्या गोष्टींचे अप्रूप नाही, पण माझ्या बायकोला थोडेफार आहे. किंबहुना आधी जास्त होते, सदैव मैत्रीणींशी आणि येस त्यांच्या नवर्‍यांशीही तुलना व्हायची, पण मी तिला हे सारे म्हणजे लाईफ नाही हे पटवून देण्यात बरेपैकी यशस्वी ठरलोय. अर्थात याचा उल्लेख मी इथे माझ्या बायकोला कमी लेखायला वा तिची चूक दाखवायला करत नाहीये, पण सुखी संसारासाठी / आयुष्यासाठी याबाबत दोघांचे विचार जुळणे, एकाच लाईनवर येणे गरजेचे असते.

@ ़कोरा,

>>"You have already sold your effort for a specific sum. Please give that much effort in return. अन्यथा, दुसरे काम शोधण्यास अथवा स्वतःचा नवा बिझिनेस सुरू करण्यास आपण मुखत्यार आहात."<<
हे,
>>एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.<<
या काँटेक्स्टमधे वाचावे.

नाईनटूफाईव्ह ही आदर्श संस्कृती?? कोणत्या कॉण्टेक्स्टमधे? बस/लोकल ५ वाजता बंद करायच्या का? पोलिसांनी ५ वाजता घरी जाऊन आपल्या मुलांशी स्ट्रेसफ्री खेळ खेळायचे का? सर्व दवाखाने फक्त ९ ते ५ चालतील. विकेण्ड्स बंद. चालेल का? हो, स्टाफला ९ ते ५च ड्यूटी हविये ना?

"गरज नसताना ऑफिसमधे थांबणार नाही" म्हणजे कुणाला गरज नसताना??

मला बुवा अमुक वाजेनंतर तिथे थांबायची/काम करायची अजिब्बात गरज वाटत नाही. मी थांबणार नाही, असे प्रत्येकाने स्वतःच ठरवले तर चालेल का?

तुम्हाला जर थांबायची गरज नसेल, तर ऑफिस/एंप्लॉयरलाही तुम्ही नोकरीवरच थांबायची गरज नसते, हे लक्षात घेतले तर बरे होईल.

अमुक वाजले की खिडकी बंद करून उठून जाणार्‍या कारकुना सारखे बेजबाबदारपणे वागले, तरी नोकरीवरून काढता न येण्याची सोय फक्त सरकारी नोकरीत आहे, कारण तिथे मालक स्वतः सरकारी नोकरच आहेत, अन पगार देणारे आपण सगळे मूर्ख ट्याक्सपेयर्स.

परदेशी ९ टू ५ चे गुणगान करताना तिथलं वर्क कल्चर अन ऑनेस्टी लक्षात घेतलीत तर बरे होईल. Happy

दंतपंक्तीप्रदर्शनम् किम् कारणर्थम्? (रादर बोळकंवेंगाडणम् म्हणू या. त्या स्मायलीत दात दिसत नाहियेत Proud )

अचानक संस्कृत चालू केले ? त्या पुरूषसूक्ताच्या धाग्यावर असे करू नका हं !
ती वरची पुर्ण पोस्ट वाचून हसू आले, बरेचसे मुद्दे बरोबर आहेत या अर्थाने.

एखाद्याला नोकरी मिळते तेव्हा जे करारपत्र असते त्यामधे कामाचे तास पण लिहिलेले असतात की नाही.
मग जर ते तंतोतंत पाळायचे ठरविले तर बिघडले कुठे ?
हा झाला एक भाग, काही नोकर्‍यांमधे जादा तासाचे वेतन किती, इ. पण नियम असतात.
समजा तसे नसेल आणि काही कारणाने जर जास्त वेळ थांबावे लागले तरी थांबावे असे माझे मत आहे.
खरेतर टाळी एका हाताने वाजत नाही, काम देणारा आणि काम करणारा, दोघांना सारखीच भिती वाटत असते की ही व्यक्ती माझा उगाचच जास्त वापर करून घेत नाही ना.

आत्तापर्यंतच्या चर्चेत काही क्षेत्रांचा पुसटसा उल्लेख झाला होता, पण खरे तर तीच क्षेत्रे जास्त प्रभावी आहेत. आणि त्यांच्यासाठी बदल होण्याची खुप म्हणजे खुपच आवश्यकता आहे. आयटी वगैरे काहीच नाही त्यापुढे.

पोलिस आणि परिचारिका (डॉक्टर सोडून अन्य स्टाफ)
यामधे सुद्धा पोलिसांचे हाल जरा जास्तच. Sad

पोलिसांचे हाल फार.
आता श्रावण म्हणजे दहिहंडी तेव्हापासून पोलिसांच्या मागे जे नष्टचर्य सुरू होतं ते पार नाताळानंतर थांबतं.
तीन तीन चार चार दिवस सलग ड्युटी. अधेमधे बसायला मिळणे ही चैन असला प्रकार.
आणि पोलिसांचे पगार पाह्यले तर हास्यास्पद आकडे आहेत.

>>जे काम अनेक जण करू शकतात त्यात पैसे कमी मिळतात.

पोलिसांच्या बाबतीत ती पण बोंब आहे. जागा शिल्लक असुन भरती होत नाही. तसेच एखाद्या नागरी वस्तीमधे पोलिसांचे प्रमाण जेवढे असायला हवे त्यापेक्षा ते फार कमी असते, इ. इ.

कामाचे तास पण लिहिलेले असतात >>>>>>> फक्त कामाचे तास लिहिलेले नसतात, त्याच्याच बरोबर काम काय करणे expected आहे, कसली जबाबदारी आहे हे पण लिहीलेले असते.

खरे तर, काम काय आहे ते Open Ended ठेवलेले असते.
दिलेले काम वेळेत पूर्ण करणे ही मुख्य जबाबदारी आहे. कामाच्या वेळेत ऑफिस मधे हजर असणे पुरेसे नाही.

आणि हे सर्व सोडुन द्या. नोकरी करणार्‍यावर काही जबरदस्ती नाहीये. नसेल पटत तर सोडुन द्यायची.

नोकरी चं पहिलं उद्दिष्ट अर्थार्जन हे असणं हे अनेकांच्या बाबतीत खरं आहे. आवड म्हणून नोकरी, धंदा करणे हे काहींच्या बाबतीत खरे असेल , सर्वांना शक्य नाही. काम आवडून घेणं हे व्यवहार्य आहे. अगदी आवडीचं क्षेत्र मिळालं तरी अनेक नावडीच्या लोकांना, ज्यांचं काम करावंसं वाटणार नाही, तोंड द्यावं लागतं. तडजोडीशिवाय तर संसार पण चालत नाही. आवडीनिवडीला मुरड घालून वेगळ्या क्षेत्रात करीयर केली आणि झोकून दिलं तर यशही मिळतो आणि समाधानही. अर्थात झोकून देणं हे स्वभाववैशिष्ट्यांवर अवलंबून असतं. तडजोड सर्वांनाच मानवते असंही नाही. एकच एक निष्कर्ष काढणे जरा घाईचे वाटते अशा बाबतीत..

नाईनटूफाईव्ह ही आदर्श संस्कृती?? कोणत्या कॉण्टेक्स्टमधे? बस/लोकल ५ वाजता बंद करायच्या का? पोलिसांनी ५ वाजता घरी जाऊन आपल्या मुलांशी स्ट्रेसफ्री खेळ खेळायचे का? सर्व दवाखाने फक्त ९ ते ५ चालतील. विकेण्ड्स बंद. चालेल का? हो, स्टाफला ९ ते ५च ड्यूटी हविये ना?
>>>>>
९-५ आदर्श संस्कृती तिथे, जिथे ९-५ काम करणे अपेक्षित आहे.

काही उद्योग आणि सेवा २४ तास चालू ठेवणे आवश्यक असते, त्या ठिकाणी पाळ्यांमध्ये काम केले जाते. यात वाहतुक, वैद्यकीय सेवा, मॅन्युफॅक्चरिंग, पोलिस, इ. चा समावेश होतो. तिथे साधारण पाळी व्यतिरिक्त काम केल्यास मोबदला जास्त मिळतो.
तिथे अर्थात ९-५ नाही तर पाळीच्या वेळेतच काम व्हावे असा युक्तिवाद असू शकतो.

बस ड्रायव्हर, पोलीस, डॉक्टर (नोकरदार डॉक्टर, खाजगी व्यवसाय असणारे नव्हे) जर ठरल्या वेळी घरी जाऊ शकत नसतील तर त्यांचा एंप्लॉयर पुरेशा लोकांना कामावर ठेवत नाही असा अर्थ निघतो. आणि ही चूक एंप्लॉयर ने सुधारावी, एंप्लॉयीज ने नव्हे.

"गरज नसताना ऑफिसमधे थांबणार नाही" म्हणजे कुणाला गरज नसताना??
>> एक उदाहरण दिले तर मला माझा मुद्दा मांडणे सोपे जाईल.

शर्ट चा उत्पादक १००० शर्टां ची ऑर्डर मिळवतो, जी २० दिवसांत पूर्ण करायची आहे. रोज माणशी १० शर्ट या हिशोबाने ५ जणांना त्या कामास लावतो. आता येथे प्रत्येक कर्मचारी अपेक्षित काम अपेक्षित वेळेत करत असेल तर अपेक्षित वेळेपेक्ष जास्त वेळ काम करण्याची गरज पडणार नाही.

जर काही असर्वसाधारण कारण घडले, जसे की १८ व्या दिवशी उंदराने १० शर्ट कुरतडले, किंवा ५ पैकी एकजण आजारी पडला तर १-२ दिवस जास्त काम करायची गरज उत्पन्न होते, आणि त्याबद्दल शक्यतो कुणाचीच तक्रार नसते.
अर्थात उत्पादका ने अश्या आणीबाणी च्या वेळेचा विचार आधी करायला हवा (आणि बरेचसे करतातही).

आता जर अशी घटना पहिल्या आठ दहा दिवसात घडत असेल तर उत्पादकाने एक जास्त कर्मचारी टाकून तूट भरून काढणे योग्य, कारण या उपाययोजने साठी त्याच्याकडे पुरेसा अवधी असतो. यावेळेस त्यांनी जास्त वेळ काम करावे ही अपेक्षा चुकीची आहे.

तसेच सुरुवातीपासूनच कमी लोकांना कामाला लावल्या मुळे, चुकीचे एस्टिमेट केल्याने (आणि ते माहीत असून वा वेळेत लक्षात येऊनही), वा तत्सम कारणांनी जास्त वेळ काम करावे लागत असेल तर तेही चूकच.

जर कर्मचारी त्याच्या स्वतःच्या चुकीने अपेक्षित वेळेत अपेक्षित काम करत नसेल आणि त्यामुळे जास्त वेळ्थांबावे लागत असेल तर तक्रारीला जागा नाही.

अर्थात खाजगी व्यवसाय आणि नोकरी यात खूप फरक आहे, त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही.

तुम्हाला जर थांबायची गरज नसेल, तर ऑफिस/एंप्लॉयरलाही तुम्ही नोकरीवरच थांबायची गरज नसते, हे लक्षात घेतले तर बरे होईल.
>>
अहो नोकर्‍या या परस्पर गरजेवरच चालतात. एंप्लॉयी अथवा एंप्लॉयर कुणीही एकमेकांवर उपकार करत नाहीत. एंप्लॉयी जर म्हटला, चला आज मी ४ तास जास्त काम करतो तुम्हाला गरज नसेल तरी, आणि मला तुम्ही त्याचा मोबदला द्या, तर कुठला एंप्लॉयर ते मान्य करेल? याउलट परिस्थिती येते तेव्हा एंप्लॉयीज कडून जादा कामाची, तेही बर्‍याचदा विनामोबदला, अपेक्षा ठेवणे कितपत रास्त आहे? तरीदेखिल बरेचसे एंप्लॉयर्स अगदी वेळ पडलीच तर सौजन्य दाखवून विनातक्रार काम करतात.

अमुक वाजले की खिडकी बंद करून उठून जाणार्‍या कारकुना सारखे बेजबाबदारपणे >>

यात बेजबाबदार पणा कुठे आला? त्याच्याकडून अमुक वाजेपर्यंत खिडकीत थांबणे अपेक्षित असेल, आणि तो अमुक वाजेच्या आधी उठत असेल तर बेजबाबदार पणा होईल.

परदेशी ९ टू ५ चे गुणगान करताना तिथलं वर्क कल्चर अन ऑनेस्टी लक्षात घेतलीत तर बरे होईल.
>> ऑनेस्टी गृहित धरलेली आहेच हो. दॅट इज नॉन निगोशिएबल. आता ऑनेस्ट लोकांनी तरी 'अपेक्षित वेळेइतकेच काम" असा आग्रह धरला तर चालेल ना?

अमुक वाजले की खिडकी बंद करून उठून जाणार्‍या कारकुना सारखे बेजबाबदारपणे >>

यात बेजबाबदार पणा कुठे आला? त्याच्याकडून अमुक वाजेपर्यंत खिडकीत थांबणे अपेक्षित असेल, आणि तो अमुक वाजेच्या आधी उठत असेल तर बेजबाबदार पणा होईल.

परदेशी ९ टू ५ चे गुणगान करताना तिथलं वर्क कल्चर अन ऑनेस्टी लक्षात घेतलीत तर बरे होईल.
>> ऑनेस्टी गृहित धरलेली आहेच हो. दॅट इज नॉन निगोशिएबल. आता ऑनेस्ट लोकांनी तरी 'अपेक्षित वेळेइतकेच काम" असा आग्रह धरला तर चालेल ना?

इब्लिस - तुमचे सगळे मुद्दे पटले तरीही प्रत्येक फिल्ड मधला इमर्जन्सीचा भाग सोडला तर इतर वेळी उगाचच दिखाऊ पणा करण्यासाठी किंवा टवाळक्या करण्यासाठी ऑफिसात थांबायचे आणि इतरांकडूनही ऑफिसच्या वेळे नंतर थांबायची अपेक्षा करणे चूक.

आता एखादा हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारा कार्डियॉलॉजिस्ट म्हणेल की मला इमर्जन्सी पाहायला माझ्या वेळेपेक्षा जास्त काम करावं लागतं म्हणून सायकिअ‍ॅट्रिस्टने, स्किन स्पेशलिस्टने आणि डेंटिस्टने त्यांना इमर्जन्सी केस नसतानाही वेळेपेक्षा जास्त थांबावं तर ते चूकच ना.

मला वाटतं अपूर्व हेच म्हणत आहेत. मी कोर आयटीत होते, आयटी सपोर्ट आणि आता आयटीच्या सुद्धा फारशा महत्वाच्या नसलेल्या ब्रांच मध्ये आयटी ऑडीट मध्ये आहे. सपोर्ट मध्ये होते तेव्हा गरज पडेल तेव्हा दिवस रात्र अक्षरश: ४८ तास सुद्धा काम केलय आणि आता ऑडीट मध्ये असल्याने वेळ संपली की निघता येतं.

अगदी आत्ताच गेले काही दिवस ही सिच्युएशन फेस करत आहोत आम्ही. एका क्लायेंटकडे प्रोसेस कन्सल्टंट म्हणून काम करत आहोत. आमचे काम इतर टीम्सने दिलेल्या वेळेवर अवलंबून असते. त्यामुळे ऑफिसच्या वेळेत क्लायेंट टीमने सहकार्य केले नाही की अख्खादिवस फुकट जातो आणि अशा वेळेला वेळेवर निघालं की कोऑर्डिनेटर ऐकवतो की तुम्ही लोक सूर्य प्रकाशात येता आणि सूर्यप्रकाशात जाता. आम्ही सकाळी नऊ वाजता येतो रात्री आठ वाजता जातो. बरं नसताना सुट्टी घेतली की बोलतो आम्ही गेले आठ महिने एकही दिवस सुट्टी नाही घेतली. तेव्हा राग येतो, विचारावसं वाटतं की तू वेडा आहेस म्हणून आम्ही सुद्धा वेडे आहोत काय? तरी बरं जेव्हा एका टीमला वेळ नव्हता तेव्हा त्या टीमसाठी मुद्दाम उशीरा पर्यंत थांबून काम पूर्ण केलं होतं.

म्हणणं एवढच की प्रत्येकाने रोज वेळेपेक्षा जास्त थांबून काम करण्याची गरज नसते. ह्याने चुकीचे ट्रेण्ड्स सेट होतात. आणि कामाच्या ठिकाणी गरज असेल तेव्हा घर गाठण्याची घाई करणंही योग्य नाही. शिवाय मला वाटतं म्हणून किंवा मी करते/तो माझ्या हाताखाली किंवा सोबत काम करणार्‍यांनी रोज रोज थांबून राहावं ही अपेक्षा करणंही चूक आहे., इथे दोन अधिक दोन चार असा सरधोपट हा नियम बनवणं/ न्याय लावणं शक्य नाही

अपेक्षा इतकीच आहे की "कुरकुर" करणे थांबवावे.
आपण आपल्या स्वार्था साठीच काम करतो आहे. जर स्वार्थ साधला जातो आहे तर कुरकुर कशाला?

यु आर राईट टोचा - कुरकुर करणे प्रत्येकानेच थांबवावे.

पण तसे थांबवले तर माबोवरचे अर्धे लेख बंद पडतील त्याचं काय Wink

पण तसे थांबवले तर माबोवरचे अर्धे लेख बंद पडतील त्याचं काय <<<

अर्धे लेख नव्हेत, पंचाहत्तर टक्के आय डी बंद पडतील

चांगली चर्चा चालू आहे सर्व बाजूंनी.
मला वाटतं, अपूर्व यांना म्हणायचं आहे ते अतरंगी यांनी नीट मांडलं आहे. ट्राय टू से नो. मी ही काही चांगल्या आयटी कंपन्यात काम केले आहे ज्या लोकांचे इनआऊट टाईमवर प्रोजेक्टचा रेडनेस ठरतो. एखीगी टीम रेग्युलरली एक्स््ट्रा अवर्स देते आहे म्हणजे एस्टिमेटस, असाईनमेंट, स्किल्समध्ये मेजर लोचा आहे. लगेच मॆनेजरला कारणे दाखवा नोटीस आलेली मी पाहिली आहे.
तसेच जर लेट थांबता येत नसेल तर ते वेळीच क्लियर करा आणि सो कॉल्ड अप्रेजल बेनिफिट वर पाणी सोडा. ते शक्या नसेल तर न रडता काम करा. दुसरी नोकरी मिळेपर्यंत. तडजोड कधी, कशाबाबत करावी ते तर कायम तुमच्याच हातात आहे.
पोलिसांचे बोलू नका हो.. त्यांच्या तर मुलामुलींची लग्न न ठरण्यालाही तेच जबाबदार आहेत म्हणे! Lol

उगाचच दिखाऊ पणा करण्यासाठी किंवा टवाळक्या करण्यासाठी ऑफिसात थांबायचे आणि इतरांकडूनही ऑफिसच्या वेळे नंतर थांबायची अपेक्षा करणे चूक.
<<
चूकच आहे ते. बरोबर आहे असे अजिब्बात म्हणणे नाहिये माझे.

*

अमुक वाजता खिडकी आपटायची असेल, तर खिडकी उघडी असण्याच्या काळात इमानदारीत काम केले पाहिजे. थोडावेळ चहाला. मग तिकडच्या टेबलला, मधेच फोनवर बोलायला अलाऊड नाही.

मी आधीच म्हटलोय, घेतलेल्या पगाराचा योग्य मोबदला देत असाल, तर तुम्हाला जरूरीपेक्षा जास्त राबवून घ्यायची एम्प्लॉयरचीही इच्छा नसते. इमानदार व कष्टाळू एम्प्लॉयी मिळवणे व टिकवणे किती कठीण असते ते मला ठाऊक आहे.

पण उगा कुठले तरी पाहून यायचे, अन 'त्या तिक्डे नैक्का, अमुकच वाज्ता बंद कर्तात बर्का काम!' असं क्रिब मारायचं असेल, तर 'बर्का, त्या तिक्डेच जावा नोक्री पहाय्ला!' हे मला एम्प्लॉयर्सच्या वतीने सांगायचं होतं.

इतके बोलून मी माझे भाषण संपवतो.

माझे दोन शब्द आपण शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद!

जै हिंद, जै महाराष्ट्र! (<-- हे राहून गेल्तं टंकायचं.)

Lol
पण माणूस म्हणजे मशिन नाहीये हो, अगदी ठराविक वेळात आला, खुर्चीत बसला, अजिबात इकडे तिकडे न बघता काम चालू केले, बरोब्बर चहाच्या, जेवणाच्या वेळेस उठला, ठराविक वेळात परत आला आणि पुन्हा दिवस संपेपर्यंत अजिबात इकडे तिकडे न बघता काम केले. हे असे फॅक्टरीमधे चालते बर्‍याच प्रमाणात, पण इतर ठिकाणी लोक असे मशिनसारखे काम नाही करू शकत. Sad

बरोबर पाचच्या टोल्याला एखाद्या मशीनसारखे ऑफीस एक्झीटचे काम कसे एक्झीक्युट होते?

राजू७६,
गरजेपेक्षा जास्त असलेला पैसा कित्येक प्रकारे वापरता येतो मान्य. तुम्ही दिलेली लिंक पाहिली पण मी शक्यतो पुस्तके विकत घेत नाही. वाचनालयात आहे का पाहतो. (आणि नसेल तर आमच्या वाचनालयात असलेली ४१२३ पुस्तके वाचून झाली कि मग विचार करेन Wink )

ईथे चर्चेचा मुद्दा तो नाही, आणि मी पैसा नकोच किंवा वाईटच असेहि म्हणत नाही. प्रश्न आहे तो पैसा कमाविण्यासाठी किती श्रम करायचे याचा.

समजा मी फक्त ८ तास काम करतो आणि माझा पगार "Y" आहे. मी रोज दहा ते बारा तास काम केले तर मला "X" पगार मिळेल. आता मला माझ्या वैयक्तिक आयुष्याची बोंबाबोंब करुन, कामाचे डोंगर उपसुन "X-Y" या रकमेची खरेच गरज आहे का? भले ती रक्कम मी कोणत्याही धर्मदाय (चांगल्या ऊद्देशासाठी) वापरेन, पण त्या रकमे साठी मला जर माणूस म्हणून न जगता वेळेचा, कंपनीचा गुलाम किंवा यंत्रमानवा सारखे जगावे लागत असेल तर त्याचा काय उपयोग ?

मुळात जगात हि गरीब श्रीमंत दरी ईतकी असमानता निर्माण कशी होते ? काही लोक हावरटा सारखे ओरबडल्यासारखे या जगातली साधन संपत्ती वापरतात म्हणून कि नाही ??????

प्रश्न आहे तो पैसा कमाविण्यासाठी किती श्रम करायचे याचा. >>>>>>>
हा वैयक्तीक प्रश्न आहे. कोणाला ऑफिस मधे उशीरा पर्यंत थांबुन जास्त रेटींग्/प्रमोशन ( म्हणजे जास्त पैसे ) मिळवायचे असतील तर त्यात चुक काय?

ईब्लिस यांनी मांडलेला पोलिस खाते, दवाखाने यांचा प्रश्न सद्य परिस्थिती मधे मान्य.

पण याला खरेच काही उपाय नाही का? आपण ही परिस्थिती बदलू शकत नाही का ? पोलिस, डॉक्टर, या सर्वांना कामाचे तास भयानक रीतीने का वाढवावे लागतात ? जिथे पोलिस भरती ३०० लोकांची आहे तिथे १३००० उमेद्वार परिक्षे साठी येतात. मग तरीही पोलिस खाते मनुष्यबळ कमकरते मूळे आहे त्या लोकांना राबवते असे का? कारण त्यांना असलेला अपुरा निधी आणि बाकी काही कारणे.

ज्या देशामधे हजारो कोटी रुपये विकासावर, रस्ते, विमानतळे बांधण्यावर खर्च होतो, जो देश अफ्रिके मधले देश्,अफगाणिस्तान, भुतान, श्रीलंका, या देशांना कोट्यावधी रुपयांची मदत करतो तिथे पोलिसांना पाहिजे तेवढे मनुष्यबळ का दिले जात नाही? जीडीपी मधला संरक्षक दले आणि पोलिस खाते यांच्यावर होणारा खर्च किती ?

डॉक्टर, दवाखाने यांचे मनुष्यबळ का कमी पडते? ते वाढवता येणे शक्य नाही का ?

एखादा माणुस घर चालविण्यासाठी राबतो म्हणून त्याला मशिन असल्यासारखा दिवसातले १२ ते १४ तास राबविणे कोणत्या नैतिकते मधे बसते ?

हा वैयक्तीक प्रश्न आहे. कोणाला ऑफिस मधे उशीरा पर्यंत थांबुन जास्त रेटींग्/प्रमोशन ( म्हणजे जास्त पैसे ) मिळवायचे असतील तर त्यात चुक काय?>>>>>

काहीही नाही, पण मग त्यांनी मला खुप काम करावे लागते, 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' , माझ्यावर अन्याय होतो असल्या तक्रारी करु नये. सिम्पल......

एखादा माणुस घर चालविण्यासाठी राबतो म्हणून त्याला मशिन असल्यासारखा दिवसातले १२ ते १४ तास राबविणे कोणत्या नैतिकते मधे बसते ?>>>>>>>>>>

कोणी राबवत वैगैरे नाही हो. तो स्वताहुन राबतो.
ज्याला नसेल राबायचे, त्याने लग्न, मुले असल्या फंदात पडु नये.

या बीबी चा मूळ विषय हा प्रायव्हेट सेक्टर मधे काम करणार्‍या लोकांचा आहे. आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग ची उदाहरणे पाहिली तर मला खरेच त्यांची किव येते. साला एवढं शिकुन जर गुराढोरा सारखं राबायचं असेल, माणूस म्हणून जगता येत नसेल, ईतकी हतबलता, ईनसिक्युरिटी वाट्याला येणार असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग तरी काय?

कोणी राबवत वैगैरे नाही हो. तो स्वताहुन राबतो.
ज्याला नसेल राबायचे, त्याने लग्न, मुले असल्या फंदात पडु नये.>>>>>>>>>>>>

असहमत

Pages