परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.
नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'
'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.
स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.
कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
एका ठराविक वयापर्यंत खूप
एका ठराविक वयापर्यंत खूप अभ्यास आणि मग उमेदीच्या वर्षांत खूप काम केलेच पाहिजे असे मला वाटते.
आणि हे करतानादेखिल जीवनाचा माफक आस्वाद घेऊ शकतो. >>>>>
माझी विचारसरणी बरोबर उलटी आहे.
जीवनाचा खूप (परिपुर्ण), जमेल तितका आस्वाद, माफक अभ्यास, माफक काम.
चरितार्थ चालला कि बास.
जो जे वांछील तो ते लाहो
जो जे वांछील तो ते लाहो
अतरंगी, तुमचे तुमच्या
अतरंगी, तुमचे तुमच्या आयुष्याबद्दल हे तत्वज्ञान असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण सगळ्यांचे तसेच असावे कींवा तेच आदर्श असे असत नाही.
खूप काम आणि जीवनाचा आस्वाद हे कायमस्वरूपी परस्परविरोधीच असतील असे का धरून चालायचे? अनेकांच्या बाबतीत अनेकदा या दोन्ही गोष्टी एकत्र/ ओव्हरलॅपिंग वगैरे असू शकतात की.
एखादा शास्त्रीय गायक रोज अमुक तास रियाझ करतो. ते तसे म्हणले तर काम आहे पण शास्त्रीय गायकाला विचारा एखाद्या की रियाझामुळे स्ट्रेस बिस येतो का?
अनेक शिक्षक आहेत असे की ज्यांना शिकवण्याने समाधान मिळते. नवीन पिढीशी सतत होत रहाणारा संवाद हा एक महत्वाचा आणि रिफ्रेशिंग फॅक्टर वाटतो आपल्या कामामधला. त्यांचं काय?
जीवनाचा आस्वाद म्हणजे कुटुंबाबरोबर वेळ घालवणे एवढेच नसते. जीवनाच्या आस्वादाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलू शकते. अनेकांना कामामधेच जीवनाचा आस्वाद सापडू शकतो, काहींना जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी पैसा कमवावा लागू शकतो उदाहरणार्थ क्ष व्यक्तीची जीवनाच्या आस्वादाची व्याख्या जग फिरून जगभरचा अनुभव घेणे ही आहे. त्याला कचकून पैसा कमावल्याशिवाय पर्याय आहे का?
चरितार्थाच्या अनेकांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला जे गरजेचं वाटेल ते दुसर्यांना चैनीचं वाटेल आणि व्हाइस व्हर्सा.
क्ष व्यक्तीची जीवनाच्या
क्ष व्यक्तीची जीवनाच्या आस्वादाची व्याख्या जग फिरून जगभरचा अनुभव घेणे ही आहे. त्याला कचकून पैसा कमावल्याशिवाय पर्याय आहे का?>>>>>>>>
हे सोडुन सर्व मुद्दे मान्य.
ही माझी मते आहेत. सर्वांची अशीच आणि हीच मते असावीत असे माझे आजिबात म्हणणे नाही. मी असे कुठे लिहिले असल्यास सांगावे, मी माझी चूक असल्यास नक्कीच मान्य करेन.
वर चाललेल्या चर्चे मधे मी फक्त असेही असू शकते, असेही जगता येउ शकते हे मांडले. सर्वांनी तसेच जगावे असा माझा अजिबात अट्टहास नाही. फक्त आपण जसे जगत आहोत त्यात आपल्या स्वताच्या सुखाच्या व्याख्येने जगत आहोत कि नाही हे महत्वाचे.
इथे चूक बरोबरचा मुद्दा कुठे
इथे चूक बरोबरचा मुद्दा कुठे आला?
तुम्ही म्हणालात त्याच्यापेक्षा उलटी मते, उलटी परिस्थिती असू शकते एवढेच सांगितले.
फक्त आपण जसे जगत आहोत त्यात
फक्त आपण जसे जगत आहोत त्यात आपल्या स्वताच्या सुखाच्या व्याख्येने जगत आहोत कि नाही हे महत्वाचे. << अनुमोदन
तुम्ही लिहिलेल्या पहिल्या
तुम्ही लिहिलेल्या पहिल्या वाक्यामुळे तुमची argument मला assertive पेक्षा agressive वाटली. म्हणून प्रतिसाद दिला. तसे नसेलही कदाचित
माझ्या मताच्या विरुद्ध मते असु शकतात आणि त्यांची मते त्यांच्या मते बरोबरच असु शकतात.यात वाद नाही
काम करणे म्हणजे फक्त आणि फक्त
काम करणे म्हणजे फक्त आणि फक्त पैसा कमवणे इतकाच उद्देश आयटीवाल्यांचा दिसतोय.
Pages