होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा तुम्ही ग्रेट आहात. काय अप्रतिम अपडेट्स देता!!
डोळ्यांसमोर उभं करता चित्र अगदी.
एवढ कसं लक्षात रहात तुमच्या !!!
कालचा श्री चा अभिनय मला सुद्धा फार आवडला.

आवर्जून सर्वांनी कालचा वृत्तांत आवडल्याचे कळविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. वास्तविक इतका सविस्तर वृत्तांत द्यायचे कारणच मुळात जान्हवीने स्त्री च्या बाजूने घेतलेली भूमिका आग्रहाने सर्वांना कळावी हा त्यामागील विचार होता. पती प्रेमाचा आणि घरातील प्रमुख स्थानाचा असला तरी त्याच घरातील एका स्त्री ला जर समजून घ्यायचे असेल तर तिच्या जीवनात असलेल्या पुरुषाला अगोदर समजून घे आणि मगच त्याच्याविरोधात तू बोल, असे जेव्हा जान्हवी श्री ला सांगते तो प्रसंग तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे मला प्रतीक वाटले.

संवाद देणे मला गरजेचे वाटले, अन्यथा काल नेमके काय घडले हे त्रोटकपणे सांगितले असते तर त्याची तीव्रता समजली नसती.

शुक्रवार दि. १४ मार्च २०१४ : अपडेट्स

~ काल जितका भाग प्रभावी झाला तितका आज होणे शक्य नव्हतेच, कारण काल एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात तत्त्वाविषयी वादविवाद सुरू होता तर आज तो मुद्दा नसल्याने केवळ घरात आत्ता काय घडत आहे यावरच दिग्दर्शकाने आपले लक्ष केन्द्रीत केल्याचे जाणवत होते.

शरयू आजारी असून झोपून आहे. तिची जान्हवी सेवा करीत आहे. थंड पाण्याच्या पट्ट्या बदलणे, गोळी देणे, तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करणे इ..... दुसरीकडे इंदूबाई तिच्यासाठी खीर घेऊन आल्या आहेत आणि आग्रहाने मायेने तिला खायाला घालतात. नंतर शरयू आणि जान्हवी यांच्यातील संवाद, ज्यात शरयू जान्हवीला तेच दु:ख सांगत बसते. जान्हवी तिथे जास्त काही बोलत नाही पण आपल्या रूममध्ये आल्यावर श्री ला तिची अवस्था सांगते. श्री व्यथीत होतो. त्याला वाटते आपण आपल्या छोट्या आईशी नको तितके कठोर वागत आहे. तो जान्हवीला विचारतो की मी काय केले पाहिजे अशा परिस्थितीत. जान्हवी शांतपणे एकच वाक्य बोलते, "तू तिला तुझ्या शपथेमधून मोकळी कर..." श्री काही बोलत नाही पण तिथून तो शरयूच्या रूममध्ये येतो. कपाळावर हात ठेवून ताप कितपत आहे ते पाहतो. त्याच्या हाताच्या स्पर्शामुळे शरयू जागी होते. आपल्या मुलाला पाहिल्यासारखे तिला वाटते. ती रडतच आहे आणि श्री जवळ म्हणते, "आता त्या वरच्याने मला न्यावे आपल्याजवळ म्हणजे मी त्याला विचारीन की माझ्या कपाळी असले कसले भाग्य तू लिहिले आहेस की ज्यामुळे माझ्या अवतीभवती असलेल्या सार्‍यानाच मी दु:ख देत आले आहे...." श्री तिला कसेबसे समजावत राहतो. शपथेचा विषय निघतच नाही.

जान्हवी चहा घेऊन आईआजीच्या रूममध्ये आली आहे. चहा ठेवते आणि मग दोघी बोलत राहतात. आजींनाही "माझी शिस्त अती झाली की काय असेच वाटते आणी त्यामुळेच घरातील वातावरण बिघडले आहे हे नक्की..." जान्हवी त्यावर काही बोलत नाही पण धाडसाने म्हणते, "आईआजी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारायचे आहे मला..." आजी तिला उलट धीर देतात आणि म्हणतात, "जरूर विचार..." जान्हवी त्यांच्याकडे पाहात घाबरत विचारते, "काकांकडून असे काय घडले होते की तुम्ही त्याना बाहेर काढले ?" आईआजी तिच्याकडे रोखून पाहतात तरीही उत्तर देतात, "अगं तो दारुच्या नादाला तर लागलाच होता....पण काही काम करायचा नाही, फक्त जुगार आणि जागरणे....वाईट मित्रांच्या संगती....शरयूला मारहाण....हे सारे अती होत चालले होते...." इथे जान्हवी आजीना थांबविते..."हे सारे मला माहीत आहे....पण अशी कोणती वेळ वा प्रसंग आला होता की ज्यामुळे तुम्ही त्याना कायमचे घराबाहेर काढले ?" आजी काहीच बोलू शकत नाही...त्या फक्त या नातसूनेकडे पाहात राहतात.

एका गल्लीतील दृष्य. एक बंद घर आहे...त्या घराबाहेर काही लोक उभे आहेत....आतून "तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे..." या गाण्याचे शब्द बाहेर ऐकू येत आहेत...ती व्यक्ती घराचे दार उघडून बाहेर येते आणि बाहेर जमा झालेल्यांना उद्धट बोलू लागते....तो लक्ष्मीकांत आहे. त्याला श्री पाहात आहे.

मामा मस्त अपडेट्स. हे काका प्रकरण खूपच ताणतायत. अजून अनेक प्रकरणे आहेत की. एकेका प्रकरणावर दोन-तीन महिने घालवले तर मालिका आहे त्यापेक्षा अजून बोअर होणार, मामा तुमच्या सहनशक्तीला मात्र दाद द्यावी तितकी थोडी, जरी ही एकच मालिका तुम्ही बघत असलात तरीही.

अन्जू...

गणित असे आहे या मालिकेचे, उणीपुरी २२ मिनिटे असतात कथानकाला....८ मिनिटे जाहिराती. त्यामुळे दिवसातील एवढा वेळ काढून ठेवणे मला अशक्य वाटत नाही. बरे, आता मालिका पाहायचीच आहे असा एकदा निर्णय झाल्यामुळे तिथे काय दाखविले जाईल त्यावर आपली तरी काही अधिकार नसतोच....सबब कथानकाच्या ज्या पायर्‍या समोर येत राहतात त्याकडे लक्ष देत राहणे एवढेच आपल्या हाती राहते. कधीकधी कालच्यासारखा एखादा चांगलाही भाग समोर येतो, त्याचेही समाधान लाभतेच.

बाकी तू म्हणतेस तसे हे काका प्रकरण तुटेल इतके ताणले जात आहे हे दिसत्येच....पण आता श्री व काका समोर आल्यामुळे ही नाव आता नीट प्रवाहाला लागेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

वा, मामा मस्त अपडेटस.... माझ्या ताईला पण अशाच प्रकारे अपडेटस आवडतात, म्हणजे अगदी त्या पात्राचे हावभाव, वळून वगैरे पाहणे असं सगळं... आणि लीना भागवत किती ताकदीची आहे हे कालच्या एप वरून कळतं

शनिवार दि. १५ मार्च २०१४ : अपडेट्स

~ आजी नातसूनेला आपल्या तिन्ही मुलांचा इतिहास सांगत आहेत...."रमाकांत, उमाकांत, लक्ष्मीकांत अशी तीन मुले आणि मग बेबी. रमाकांत विदेशाला गेला आणि उमाकांत व्यवसायात गुंतला त्यामुळे माझ्याजवळ लक्ष्मीकांत फार लाडात राहिला....मीही उद्योगात गुंतले.... तो हुशार होता, गायचाही चांगला...त्यामुळे त्याच्यावर कसलीही सक्तीही मी केली नाही. पण तो एकूणच नेटाने काम करणार्‍यामध्ये कधीच दिसला नाही. त्याला प्रेम मात्र मिळाले... आणि हा बाहेरच्या नादाला लागला. पैसा हातात असल्यामुळे खर्चही आपसूकच होत राहिले. मग याला दारूचा नाद लागला....जुगारीही झाला...त्याला हे वाईट नाद कसे लागले याचा कधी उलगडा झालाही नाही. लग्नानंतर सुधारेल असे वाटले. शरयूसारखी छान बायको मिळाली....पण तिच्या आयुष्याची नासाडी होत आहे हे पाहून मी व्यथीत होऊ लागले. पण लक्ष्मीकांत काही सुधारण्याची चिन्हे दिसत नव्हती....तो दारू पिऊन घरी येऊ लागला, शरयूला मारहाण करू लागला.....दारू आणि वाईट संगतीने तो हाताबाहेर गेला आणि त्या रात्री कांताबरोबर मी कडाक्याचे भांडण केले. भांडले मी पण तो हा काही बोलेनाच. शरयूदेखील त्याची बाजू घेऊ लागली. बायको आपलीच आहे आणि ती कायम माझीच बाजू घेणार हे त्याने गृहित धरले होते. शरयू तसेच करत होती. त्या रात्री त्याला माफ केले मी, पण मला माहीत होते की यातून काही निष्पण्ण होणार नाही. नेमके तसेच झाले. एके दिवशी तो परत दारू पिऊन घरी आला आणि नर्मदा, इंदू, बेबी यांच्यासमोरच तो शरयूला मारत घराबाहेर काढू लागला....त्यावेळी मी तिथे नव्हते पण आरडाओरडा पाहून आले. शरयूचा यात काहीच दोष नसतानाही हा वाया गेलेला आपला मुलगा तिच्याशी असे वागत आहे हे पाहून मात्र मी लागलीच निर्णय घेतला आणि त्याला घराबाहेर काढले ते काढलेच....या नंतरही आजही तो निर्णय कायम आहे माझा....बाकी काहीही होऊ दे पण त्या वाया गेलेल्या व्यक्तीला इथे स्थान नाही." ~ जान्हवी विचारशक्ती खुंटल्यासारखीच सुन्न झाली आहे.

श्री त्याच्याकडे असलेल्या पत्त्याच्या आधारे आपला काका लक्ष्मीकांतच्या घरचा पत्ता शोधत आहे. एका गल्लीत त्याला ते घर दाखविले जाते. घराजवळ जातो तर तिथे घराबाहेर आठदहा लोक शांत उभे आहेत आणि घरातून ऐकू येणारे गाणे मन लावून ऐकत आहेत. आत लक्ष्मीकांत गात आहे..."तुझे गीत गाण्यासाठी सूर लाऊ दे रे..." त्याच्या आवाजावर लोक भुलले आहेत असे दिसते....लक्ष्मीकांत बाहेर येतो आणि या लोकांच्यावर त्रासतो. "कान लाऊन कसली गाणी ऐकता...तुम्हाला काय फुकट गाणी ऐकायची आहेत ? चला इथून" असे म्हणून झिडकारतो.....श्री ला काकाचे हे वर्तन अजिबात आवडत नाहीच, पण तो काही बोलत नाही. लोक तिथून गेल्यानंतर तो दरवाजा वाजवतो. आतून काका येतो. श्री त्याला आपली ओळख करून देतो....तो जास्त काही बोलत नाही, फक्त म्हणतो, "माझं माझ्या आईवर प्रेम आहे आणि म्हणूनच ज्या माणसाचा मला चेहराही कधी बघायचा नव्हता त्याच्याकडे मी मदत मागण्यासाठी आलो आहे." काकाच्या डोळ्यात पाणी तरळले आहे, "माझी मदत हवी आहे तुला...." श्री "हो...पण तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला याचा पुरेपूर मोबदला दिला जाईल." असे म्हणतो.

मामा, आज इतक्या उशिरा अपडेट्स, तो लक्ष्मीकांत वाईट वागून शरयुला त्याचा पुळका का? त्याला पैसे पुरवण्यापेक्षा तो सुधारण्यासाठी प्रयत्न केले असते तर बरे झाले असते.

लोक तिथून गेल्यानंतर तो दरवाजा वाजवतो. आतून काका येतो. श्री त्याला आपली ओळख करून देतो....तो जास्त काही बोलत नाही, फक्त म्हणतो, "माझं माझ्या आईवर प्रेम आहे आणि म्हणूनच ज्या माणसाचा मला चेहराही कधी बघायचा नव्हता त्याच्याकडे मी मदत मागण्यासाठी आलो आहे." काकाच्या डोळ्यात पाणी तरळले आहे, "माझी मदत हवी आहे तुला...." श्री "हो...पण तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला याचा पुरेपूर मोबदला दिला जाईल." असे म्हणतो.
Uhoh हे कधी दाखवलं? मी नाही बघितलं?

मी नताशा....

कार्यक्रम संपण्यापूर्वी एखाद मिनिट उद्याच्या भागाची झलक दाखवितात त्या प्रसंगी वरील संवाद दाखविला गेला. सविस्तरपणे हा संवाद आजच्या भागात येईलच.

पण तरीही तुला हा छोटासा भाग कसा पाहता आला नाही ? काही तांत्रिक अडचण ? असो.

@ अन्जू....

काल वेळाने वृत्तांत (जवळपास रात्रीचा १ वाजला होता) द्यायचे कारण म्हणजे आमचे नेट महाशय झोपूनच गेले होते... टायपिंग ११ वाजता पूर्ण झाले होते....पण पोस्टिंगच्या वेळी पाहिले तर कनेक्शनच बंद....मग वाट पाहात बसलो... त्याला तब्बल १ वाजला.

लक्ष्मीकांतचे वर्तन वाईट आहेच आहे, पण तरीही शरयू ज्या गरीब घरातून इतक्या श्रीमंत घराण्यात सून म्हणून आली आहे, ते पाहता तिच्या स्वभावाची रचनाच अशी झाली आहे की कोणत्याही स्थितीत ती पडतेच घेते, दुय्यम समजते स्वतःला...अशा मवाळ मुलीचा एकमेव आधार असतो तो पती...मग तो कितीही सुधाकरचा मित्र असला तरी हिच्या दृष्टीने परमेश्वरच......त्यामुळेच ती जास्तीतजास्त त्याला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

....आणि अशा मीनाकुमारी स्वभावाच्या मुली आपल्या समाजात दिसून येत असतातच.

....आणि अशा मीनाकुमारी स्वभावाच्या मुली आपल्या समाजात दिसून येत असतातच.>>>++१ १ १

.

.

सोमवार दि. १७ मार्च २०१४ : अपडेट्स

~ आईआजी लक्ष्मीकांतला घराबाहेर काढण्याच्या समर्थनार्थ आपली कारणे जान्हवीला सांगत आहेत. "ज्या माणसाला आपल्या बायकोवर हात टाकण्यामध्ये कमीपणा वाटत नव्हता...पश्चातापही होत नव्हता असल्या माणसाला घरात ठेवणे बरोबर नव्हतेच. चुकलो म्हणण्यामध्ये त्याचा ईगो आड येत होता. सारा राग शरयूवर काढून तो नामानिराळा होत होता. खूप ताणले मग त्याने एके दिवशी....एवढा ताण त्याने केला नसता तर आज चित्र इथे वेगळे दिसले असते. पण त्याच्या हट्टीपणाने मला ते पाऊल उचलायला भाग पाडले. मला नव्हते त्याला घराबाहेर काढणे; पण त्यानेच तसे करायला लावले. असे होऊ नये याचा मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत राहिले. लक्ष्मीकांतने मात्र माझ्यासमोर काही पर्यायच ठेवला नाही. आजही मला त्या निर्णयाचा तितकाच त्रास होतो जितका त्या दिवशी झाला...."

फ्लॅशबॅक....
दारू पिऊन झिंग झालेला लक्ष्मीकांत शरयूचा हात पकडून तिला खेचून घराबाहेर काढत आहे....ती रडत आहे... नर्मदा, इंदू, बेबी असहाय्यपणे ते चित्र पाहात आहेत....तर आईआजी संतापल्या आहेत...."कांता हात सोड तिचा..." आईच्या कठोर आवाजाने तो मागे वळून आईकडे पाहतो व नशेतच बरळू लागतो...." ए आई, मला ही बायको नकोय...मला तू हिच्याबरोबर संसार करायला भाग नाही पाडू शकत..." आई म्हणते, "हे सांगण्याची सभ्य पद्धती असते हे तुला काय शिकवायला हवे ? आणि आज अचानकच काय झालं की तुला शरयू नकोशी झालीयं ?" यावर तो नशेबाज म्हणतो, "आतापासून नाही...अगदी खूप खूप आधीपासूनच..." शरयूच्या डोक्यावर हात आपटत म्हणतो, "ही...ही...बेअक्कल आहे. बिनडोक आहे, बिनडोक. हिच्याबरोबर माझी बौद्धिक पातळी मॅच होत नाही. ..." आई चिडून म्हणते, "म्हणजे हे तुला एक रात्र लॉकअपमध्ये राहिल्यानंतर कळले, हो ना ?" दारुडा नवरा म्हणतो, "मग मला हिनं लॉकअपमधून बाहेर का नाही काढलं ? नवर्‍याला बायकोनं मदत करायला पाहिजे की नको, ते सांग.." अशी उलट आईलाच धमकी दिल्यासारखे बोलतो...."दारू पिऊन गाडी चालविलीस आणि अपघात केलास..." असे आई म्हणत आहे तोच तो आईला थांबवितो, "का ? का मी दारू प्यायला लागलो ? तर हिच्यामुळेच...असली बायको मला मिळाली म्हणून मी दारु पित गेलोय. तू आत्ता हिला घराबाहेर काढ. मी एकदम तुला सुधारून दाखवितो...." हे सांगत असताना त्याच्या झोकांड्या सर्वांसमोर जात आहेत. आईचा संताप अनावर होतो....ती एका हाताने शरयूचा हात आपल्या हाती घेऊन तिला पाठीशी घालते आणि दुसर्‍या हाताने त्या दारू पिऊन बडबड करणार्‍या स्वतःच्या मुलाच्या थोबाडीत लगावते...."ही माझी सून आहे...ही याच घरात राहिल. मात्र तुझ्यासारख्या नशेबाजाला या घरात स्थान नाही....तू आत्ताच्या आता इथून चालता हो...." असा हुकूम बजावतात. लक्ष्मीकांत सुन्न होऊन ब्र ही न काढता आईकडे पाहात राहतो तर शरयू..."आई नको ना...नको" अशी विनवणी करीत आहे. तिला आई म्हणतात, "शरयू, एक आई बोलत असताना मध्ये बोलायचे नसते...".....लक्ष्मीकांत अजूनही घरातच थांबला आहे हे पाहून आईआजी निर्वाणीचे बोलतात, "मी तीन म्हणायच्या आत तू इथून गेला नाहीस....तर मी पोलिसांना फोन करीन...." अन त्या १-२-३ म्हणत आहेच....तीन नंतर मागे वळून पाहतात तर लक्ष्मीकांत घराबाहेर गेल्याचे दिसते....बेबीला त्या दरवाजा बंद करून घे असा आदेश देतात.

श्रीरंग गोखले लक्ष्मीकांत गोखले यांच्या घरच्या दारावर टकटक करतो. लक्ष्मीकांतला वाटते फुकट गाणी ऐकणारा कुणीतरी नित्याचा श्रोता आहे, तो आतूनच त्याला "अहो, थांबू नका...हे काही थिएटर नाही..." असे ओरडतो. पण श्री परत दार वाजवितो. मग काका बाहेर येतो व परत त्याच स्वरात त्याच्याशी वाद घालतो. श्री काही न बोलता शांत राहतो...काकाचे बोलणे संपल्यावर म्हणतो, "मी तुमचे गाणे ऐकायला आलेलो नाही. माझी आई आजारी आहे...त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे." लक्ष्मीकांत त्यामुळे भानावर येतो..."मग माझी मदत कशाला....? आजारी आहेत तर त्याना डॉक्टरकडे न्या..." श्री म्हणतो, "मी आत येऊन सांगू का ?" काका त्याला आत घेतो...आता श्री आपली ओळख करून देतो..."माझे नाव श्रीरंग रमाकांत गोखले....मी भागीरथीबाईंचा नातू"....ही ओळख ऐकल्यावर लक्ष्मीकांत कावराबावराच होतो...तो गडबडून जातो....पुतण्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो...पण श्री त्याला थांबवितो. "मला फक्त आईसाठी तुमच्याकडे यावे लागले आहे. तुमच्यामुळे तिला बरे वाटणार आहे...आणि त्याबद्दल तुम्हाला फी देखील मिळेल. मी तुमच्याकडे आलो आहे हे काही अन्य कुठल्या नात्याने नव्हे तर माझ्या आईसाठी...जिची तब्येत बरी नाही..." इथे लक्ष्मीकांत त्याला विचारतो, "काय झाले नर्मदावहिनींना ?" श्री त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणतो, "मी जरी नर्मदाबाईंचा मुलगा असलो तरी गोखल्यांच्या घरात मला सहा आया आहेत....त्यातील शरयूआई एक....ती आजारी आहे." पुतण्याच्या बोलण्याच्या धाटणीकडे लक्ष देत असलेल्या लक्ष्मीकांतला त्याच्यात आपल्या भावाच्या खुणा दिसतात. ते तो आनंदाने श्री ला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण श्री म्हणतो, "मला असल्या गोष्टी ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही....मी फक्त आलोय तुमची आईच्या आजारपणासाठी मदत मागण्यासाठी आणि त्याचा मोबदलाही आर्थिक स्वरुपात तुम्हाला दिला जाईल...." लक्ष्मीकांतला शरयूला काय झालेय हे विचारायचे आहे, "शरा, शरा ला काय झालंय ?" श्री फक्त इतकेच म्हणतो, "तुमच्याशी झालेलं लग्न हाच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रॉब्लेम झालाय....."

दुसरा दिवस....जान्हवी लक्ष्मीकांतच्या घरी आली आहे....तो "काल इथे श्री आला होता..." ही बातमी सांगतो.

मामा गुड as usual. शरयू त्या काकाला नकोशी असते मग ती का जात असते भेटायला? आणि आता हा शरा, शरा का करतो?

नवरा-बायकोची भांडणं... आज भांडणार आणि उद्या गोड होणार! आणि जे मध्ये पडतात तेच नंतर जास्त वाईट-खडूस ठरतात.

अन्जू....

वर सोनाली म्हणते त्यात बरेच तथ्य आहे...शेवटी नवराबायकोची ती भांडणे....कभी सावन तर कभी भादो या धर्तीची. शिवाय लक्ष्मीकांत तिच्याविरूद्ध जे वागतो ते तो दारूच्या नशेत असतो त्यावेळी....शुद्धीत तो तिच्यावर प्रेम करतोच...[असे शरयूने जान्हवीला सांगितले आहेच]....त्यामुळे नवरा आता एकटा पडलाय आणि जर आजाराने ग्रस्त असेल तर कोणत्याही बायकोला अशा परिस्थितीत नवर्‍याला शक्य ती मदत करावी असे वाटणे हे नैसर्गिकच आहे.... नाही का ?

हो मामा करेक्ट पण त्याला व्यसनातून बाहेर काढणं हीपण बायको, आई आणि त्याची स्वतःची जबाबदारी नव्हती का?

आज इंदूवहिनी-बाकीच्या आया आणि आईआज्जी श्री ने शरयूला शपथ घातली, परत घेतली यावर काथ्याकूट करत होत्या... एकाच घरात राहतात ना हे सगळेजण, मग सरळ समोरासमोर बसून चर्चा करून हा गुंता सुटु शकत नाही का, काहिही दाखवतात :रागः

मंगळवार दि. १८ मार्च २०१४ : अपडेट्स

~ आईआजीनी शरयूची तडफ़ड आणि लक्ष्मीकांतची हकालपट्टी याबाबतीत जान्हवीला सविस्तर सांगितल्यावर जान्हवीला आपल्या आजेसासूविषयी अपार आदर वाटू लागतो. जी आई स्वत:च्या मुलाला त्याच्या दुर्गुणाबाबत घराबाहेर काढते आणि तुलनेने परक्या असलेल्या मुलीला घरची सून म्हणून आपल्या घरात हक्काने स्थान देते, याबद्दल करावे तितके कौतुक कमीच पडणार असे जान्हवी बोलून दाखविते. आजी प्रेमाने या नातसुनेला जवळ घेतात.

जान्हवी त्यानंतर चहा घेऊन शरयूच्या खोलीत येते. तिच्या प्रकृतीविषयी चौकशी करते. तापही पाहते. हसत बोलत असतानाच श्री तिथे येतो. शरयूचा ताप उतरत असल्याचे पाहून त्याला समाधान वाटते. तिच्याशी तो खुल्या मनाने बोलतोही. इतकेच नव्हे तर "मी तुला शपथेमध्ये गुंतवायला नको होतो..." असे म्हणतो. "ती शपथ मी मागे घेतो, छोटी आई..." असे म्हटल्यावर शरयूला मोठा हर्ष होणे स्वाभाविक पण दुसरीकडे जान्हवी कोड्यात पडते. तिला कळत नाही की अचानक असे काय घडले की एकाएकी श्री मध्ये असा बदल घडून आला. ती विचारण्याचा प्रयत्न करते पण श्री "मी जरा जाऊन येतो..." असे कारण सांगून शरयूच्या खोलीतून बाहेर जातो व आपल्या खोलीत येऊन अस्वस्थपणे बसतो. थोड्या वेळाने जान्हवी तिथे येते व त्याला शपथेबाबतचा खुलासा विचारते...."तू शपथ घालताना आमच्यासमोर घातलीस, आम्हाला त्यात सामील करून घेतलेस, पण ती मागे घेताना तू आम्हाला कसे विचारले नाहीस...?" याला खरे तर श्री कडे ठोस उत्तर नाही. काकाला भेटून आल्याचे तो सांगणार नाही. म्हणून फक्त म्हणतो, "माझ्यापुढे दुसरा कुठलाच इलाज नव्हता. जान्हवी तुला सांगतो की तशीच वेळ आली तर मी त्याचे पायही धरायला तयार आहे." जान्हवी काळजीने विचारते, "म्हणजे तुला असे वाटते का छोट्या आईला बरे वाटावे यासाठी त्यानी काकांना भेटणे हा एकमेव उपाय आहे का ?" श्री ला काही सुचत नाही, तो एवढेच म्हणतो, "हो. असं मला वाटतं खरं..." जान्हवी विचारते, "श्री, उद्या काकाना घरी बोलवा असं म्हणून त्या हट्टाला पेटल्या तर ? आणि त्यासाठी त्या आजारी पडल्या तर ते पाहून तू काकांना घरी बोलावणार आहेस का ?" श्री वैतागलेल्या स्वरात म्हणतो, "नाही गं...अशी वेळ येणार नाही." जान्हवी "असं कसं ? तू त्यांच्या आशा वाढवितोस ना !" श्री "जान्हवी, मी छोट्या आईला शपथ घातली होती...ते तुला आवडले नव्हते ना...?" जान्हवी निक्षून सांगते, "इट्स नॉट अबाऊट मी. तू शपथ घातलीस ते तुझे ठाम मत म्हणून आम्ही सगळ्यांनी ते अ‍ॅक्सेप्ट केले होते. त्यामुळे मला आवडले किंवा नाही हा प्रश्नच नव्हता. तुझी शपथ तू इतक्या सहज मागे घेतलीस हेच जरा विचित्र वाटते आहे." श्री अजूनही गोंधळलेला आहे "असो, आता छोटी आई खूष आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. " जान्हवी म्हणते, "अरे, पण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असे नाही वाटत मला." श्री तिला विश्वासाने सांगत आहे, "सगळं ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नकोस..." जान्हवी, "पण अरे असे काय घडले एका दिवसात तुझे मत इतके बदलले ? नाही म्हणजे एरव्ही होत नाही असं तुझं." श्री इकडेतिकडे पाहतो आणि विषय बंद करावा म्हणून "बरं, ऐक ना....मला भूक लागली आहे, काहीतरी खायाला दे ना...मी आलोच" असे म्हणून खोलीबाहेर जातो. जान्हवी विचारात पडली आहे.

बॅन्केत जान्हवी व गीता यांच्यासमोर मॅनेजर बोरकर आपल्या लग्नाच्या वाढदिवसासंदर्भात बातमी देत असून स्टाफ त्यांच्याकडे पार्टी मागत आहे. ती चर्चा चालू असतानाच लक्ष्मीकांत जान्हवीसमोर येऊन उभारतो व तिला "आपण दोन मिनिटे बाहेर जाऊन बोलू या का ?" असे विचारतो. जान्हवी काही न बोलता तशीच उभारते. ते पाहून काका "शरयूची तब्येत कशी आहे ? बरी आहे ना ?" असे विचारतो. जान्हवी "हो ठीक आहे..." असे उत्तर देते पण अचानक विचारते "छोट्या आईची तब्येत बरी नाही हे तुम्हाला कसे कळले ?" काका सरळ उत्तर देतो, "मला श्री कडून समजले...." यावेळी जान्हवीला समजते की श्री आपल्याला नकळत याना भेटला आहे.

घरातून बेबीआत्या श्री ला फोन करून "तू शरयूला घातलेली शपथ मागे का घेतलीस ?" असा जाब विचारीत आहे. श्री तिला उत्तर देतो काहीतरी पण तोपर्यंत टेबलवरील दुसरा फोन वाजतो. तो मीटिंगबाबत असतो. त्याबद्दल तो बेबीला सांगतो, "मी रात्री घरी आल्यानंतर या विषयावर आपण बोलू या..."

नाही अन्जू....आज काहीही घडले नाही....सारी इमारत केवळ त्या शपथेच्या भुसभुशीत पायावरच. सध्याच्या आधुनिक जगात "शपथ" ह्या प्रकारावर इतका वेळ दळण दळत बसतात हे सुशिक्षित लोक हे पाहून नापसंती व्यक्त करावीशी वाटते....पण करून करून कुठे करणार ? त्यामुळे जे काही चित्रीत केले गेले ते पाहात बसलो मी.

सध्या पिंट्या नाही दाखवतना जास्त? रोहन गुजर मला दुसऱ्या सिरीयलमध्ये दिसतो त्यात त्याचा रोल चांगला आहे, क्रिकेटपटूचा.

बुधवार दि. १९ मार्च २०१४ : अपडेट्स

~ शरयूच्या बाबतीत श्री ने जे वातावरण निर्माण केले आहे त्याबद्दल बेबी आणि आईआजी बोलत आहेत. बेबी आपल्या आईला फोनवरील संभाषणाचे सार सांगताना म्हणते, "तो म्हणतोय की तिचा आजार जास्त करून मानसिक असल्यामुळे आपण तिच्या कलाने घेऊ या." आजी नापसंतीने मान हलवून म्हणतात, "एक विचार म्हणून ठीक आहे, पण काहीही झाले तरी लक्ष्मीकांतला शरयूने कोणत्याही निमित्ताने भेटणे हे मला तरी पटत नाही. श्री ने विचार करूनच निर्णय घेतला असेल, पण त्याच्या निर्णयामुळे माझे मत बदलेल अशी अपेक्षा कुणी ठेवू नये. कारण कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कडू ते कडूच राहते. लक्ष्मीकांत बदलला आहे यावर माझा तरी विश्वास बसणे शक्य नाही. आई आहे मी त्याची. माझ्यापेक्षा त्याला जास्त कोण ओळखणार ?" बेबी यावर काहीही न बोलता चूप बसते.

बॅन्केच्या गेस्ट रूममध्ये जान्हवी आणि लक्ष्मीकांत बोलत बसले आहेत. तो म्हणतो, "मी ज्यावेळी श्री ला माझ्या घरात पाहिले त्यावेळी विश्वासच बसला नाही की श्री असा माझ्या घरी येईल आणि आपली ओळख करून देईल. मला तो खूप काही बोलत होता. तिरस्कार वगैरे...पण मला ते काहीच ऐकू येत नव्हते. मी फक्त त्याच्याकडे पाहातच बसलो. शेवटी मीच त्याला म्हणालो की बाबा मला सगळ्या तुझ्या अटी मान्य आहेत....बरोबर केलं ना मी ?" असे जान्हवीकडे तो पाहत म्हणतो. शरयूच्या प्रकृतीचीही तो चौकशी करतो. जान्हवी म्हणते, "आहेत त्या बर्‍या...मला सांगायचं होतं ते हे की..." इथे जान्हवी थांबते. ते पाहून लक्ष्मीकांत म्हणतो, "बोल, जान्हवी. तुझा अधिकार आहे...काही बोलायचं असेल ते बोलून टाक. सून आहेस तू माझी..." पण जान्हवी म्हणते, "नको, त्यासाठी तुम्हाला छोट्या आईचा नवरा व्हावे लागेल." लक्ष्मीकांतला काही कळत नाही, तो म्हणतो, "तो तर मी आहेच ?" जान्हवी रोखून त्याच्याकडे पाहते, "असणे आणि होणे यात फरक आहे ना." लक्ष्मीकांतला ह्या प्रश्नातील गोम कळते आणि तो काहीच न बोलता गप्प बसतो. थोड्यावेळाने जान्हवीचा निरोप घेऊन तिथून निघून जातो.

ऑफिसमध्ये श्री स्वतःशीच त्याने काकासमवेत घेतलेल्या बैठकीबाबत विचार करत आहे. आपण लक्ष्मीकांतला भेटल्याचे जान्हवीला सांगावे की नको ? आजीला समजले तर तिला काय वाटेल ? अशा प्रश्नांवर विचार करत आहे. तेवढ्यात ऑफिसचे लीगल अ‍ॅडव्हायझर तिथे येतात. कार्यालयीन कामाबाबत बोलताना उद्या होणार्‍या इंटरव्ह्यूसाठी आलेल्या अर्जांवर चर्चा केली जाते. रात्री घरी आला आहे आणि खोलीत लॅपटॉपवर काम करीत आहे. जान्हवी येते...बाजूला बसते. नवर्‍याकडे पाहत असते...विचार करते "श्री आपणहून काकांबद्दल बोलेल का ? तो त्याना भेटलाय हे सांगेल का ? त्याने जर ते सांगितले तर मीदेखील त्याना अशीच भेटले आहे हे सांगावे लागेल मला. पण त्याला ते आवडेल का ?" श्री तिला "जान्हवी..." म्हणून हाक मारत आहे, पण तिचे त्याच्या हाकेकडे लक्ष नाही....श्री तिच्याकडे रोखून पाहतो....परत हाक मारतो, ती "हं..." म्हणते. श्री म्हणतो, "मला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे तुझ्या चेहर्‍यावरील हे प्रश्नचिन्ह. मला असं वाटायला हवं की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असायला हवं." जान्हवी हसून म्हणते, "अरे, प्रश्न वगैरे काही नाही. अगदी जनरल...खरंच असं काही नाही." श्री परत तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो, "माझ्याकडे बघ..." जान्हवी पाहते, म्हणते, "कसा गेला तुझा दिवस ?" श्री उत्तरतो, "गेला नेहमीसारखा....का?" जान्हवी चाचपडते आणि म्हणते, "म्हणजे तुला कुणी खास असे भेटायला आले नाही का ?" श्री सांगतो, "नाही, ऑफिसमधीलच लोक, दुसरे कुणी नाही...." जान्हवी धीर एकत्र करते आणि म्हणते, "श्री मला तुला काही सांगायचं आहे..." श्री ओळखतो, "होय ते मी जाणले, बोल तू." जान्हवी खुलासा करते, "आईआजीनी मला सांगितले काकांना त्यानी घराबाहेर का काढले..." श्री सुस्कारा सोडतो, "ते होय. मला माहीत आहे." जान्हवी म्हणते, "अंगावर काटा आला रे...केवढं भयंकर आहे हे सगळं. म्हणजे आईआजीनी जे काही केलं ते सगळं बरोबर आहे असे वाटते....काकांच तोंडही पाहू नये असेच वाटते." श्री ही त्याच भाषेत बोलतो...."हो, आणि त्याला काका वगैरे काही म्हणायची गरज नाही. अगदी शपथ, कुणीच त्याचे तोंडही पाहू नये असेच वाटते." जान्हवी म्हणते, "शपथ वगैरे घेऊ नकोस श्री. कधी काय होईल हे काही सांगता येत नाही." जान्हवी तिथून उठते आणि पाणी आणायला जाते. श्री विचार करत बसतो, "त्याचे तोंड पाहू नये असे वाटते खरे, पण छोट्या आईसाठी त्याच्याकडे तिला घेऊन एकदा जावे लागणार..."

सकाळी तो सार्‍या आयांना व आजीला सांगतो की तो छोट्या आईला बरे वाटावे म्हणून तिला घेऊन विघ्नेश्वराच्या मंदिरात जाणार आहे. सार्‍यांना आनंद होतो. फक्त जान्हवीला शंका येते की विघ्नेश्वराकडे जाणे हे एक बहाणा आहे. खरे कारण वेगळेच असणार आहे. पण ती काही बोलत नाही.

पुढच्या भागात श्री शरयूला घेऊन लक्ष्मीकांतच्या घरी आला आहे. ती आनंदात आहे.

मामा, आज मला ८ वाजता सिरिअल पाहायला नाही जमलं म्हणून आता ११ वाजता पाहिली, तसेच तुमचे अपडेट्स ही वाचले. वा छान वाटते वाचून.

Pages