'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर
भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.
काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.
उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.
२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'
एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.
त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.
''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्या डावर्या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''
''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''
वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.
''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.
काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''
उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!
समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.
माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.
समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्चात्त्य आहे!
समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.
इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!
आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?
लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.
आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.
आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.
आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्चित होते.' जन्मतः निश्चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.
याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.
समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.
नताशा, मोनोगॅमीची तुलना थोडी
नताशा, मोनोगॅमीची तुलना थोडी फार फेच्ड होत आहे. ती 'तडजोड' फार तर 'अरे घरी स्वैपाक केलेला असताना बाहेर का जेवतोस' असं म्हणण्यापैकी आहे. 'तू घरी-बाहेर कुठेच कधीच जेवूच नकोस, जेवलास तर तो गुन्हा आहे' याला काय म्हणणार?
परस्पर संमती आणि इतर कोणाच्याही हक्कांची वा सुरक्षिततेची पायमल्ली न होणं या दोन मोठ्या बाबी पुन्हापुन्हा का लिहायला लागतात कळत नाही.
म्हणूनच विषम लिंगी साथ न
म्हणूनच विषम लिंगी साथ न मिळाल्यास "दुधाची तहान … " म्हणून समलिंगी साथ घेतल्यास त्यात वावगे ते काय? >> घ्या अजून एक नवीन.
काय काय कल्पना असतात लोकांच्या डोक्यात ईतरांबद्दल, कमाल आहे.
मा. अॅडमिन, आपली वॉर्निंग
मा. अॅडमिन,
आपली वॉर्निंग शिरसावंद्य.
पुनः एकदा माझा वावर व शब्दप्रयोग आवरता घेईन.
चुकल्यास असेच सांगावे ही विनंती.
धन्यवाद!
नताशा, मगाशी लिहायचं राहिलं.
नताशा, मगाशी लिहायचं राहिलं. पुढे भविष्यात काही सामाजिक कारणांमुळे जर पॉलीगमीची खुप उदाहरणं यायला लागली तर समाजाच्या कायदे व्यवस्थेला त्यामागच्या कारणांची शहानिशा करुन कायद्यात योग्य ते बदल हे करावेच लागतील. पॉलिगमी मध्ये सध्याच्या परिस्थितीत केओस होईल पण पुढे जर परिस्थितीच जर लोकांना प्रवृत्त्त करत असेल तर त्याला सतत गुन्हा म्हणून चालणार नाही. म्हणूनच खरं मी वरच्या पोस्ट मध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार असं लिहिलं कारण पुढे समाज कसा इवॉल्व होईल कोणाला माहित?
सर्वांना विनंती. आयसीडी-१०
सर्वांना विनंती.
आयसीडी-१० ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यातील आजारांची यादी बघा. समलैंगिकतेचा या यादीत उल्लेख नाही.
तेव्हा बायपोलर डिसऑर्डर, नेक्रोफिलीया, पीडोफिलिया, अॅनोरेक्स्झिया, झोपेत चालणे, पॅराफिलिया यांच्या पंक्तीत समलैंगिकतेला बसवू नका.
एकंदर कन्फ्युजनचा मामला
एकंदर कन्फ्युजनचा मामला आहे........
हापिसातले कोवर्कर गे असताना एकंदर वातावरणात काही फरक पडलेला कधीही जाणवलेला नाही....
राहता राहिली बाब नैसर्गिक वि. अनैसर्गिक याची - तर हा सतत इव्हॉल्व होत राहणारा मुद्दा आहे. आणि दोन समलैंगिक(अथवा भिन्नलैंगिकही) आपल्या बेडरूममध्ये काय करतात याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. पण समलैगिकतेने समाज बिघडेल वगैरे भिती पूर्णच अनाठायी आहे.
लग्नाचा उद्देश मुले जन्माला घालणे हा तर काकाका मुद्दा.......
चिनुक्सचा <<इथे संमतीचा प्रश्न येतो. त्यामुळे नैसर्गिक / अनैसर्गिक हे बाजूला ठेवता येतं. बेस्टियालिटी, पीडिफिलिया यांत संमती नसते.'पंचवीस नवरे आणि पन्नास बायका का नकोत?' या प्रश्नाचं उत्तर असं की मुळात लग्न करणं हेच बेकायदेशीर नाहीये. आधीच्या दहा बायकांची संमती असेल, तर अकरावी बायको करता येतेच. >> हा मुद्दा पटला. पण माबोवरील सन्मान्य वैद्यकीय आयडी <<'सार्थ' अश्यसाठी की माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती / पेशंटस या पूर्ण समलैंगिकतेकडून पूर्ण विषमलैंगिकतेकडे वळून आनंदाने जीवन जगताना मी रोज पाहतेय. >> असे म्हणतात तेव्हा कन्फ्युजन आणि वादविवाद वाढणारच.......त्यात काही चूक नाही.
चिनुक्स, मुग्धमानसी, बेफि आणि चैतन्यच्या पोस्ट आवडल्या.......
कोण कुणासोबत झोपतंय याचाच
कोण कुणासोबत झोपतंय याचाच प्रॉब्लेम झालेला दिसतोय बर्याचशा लोकांना इथे.
माझा प्रॉब्लेम हा आहे की मी ज्या समाजात राहतोय तिथे असा एक कायदा आहे ज्यामुळे १३० कोटीतल्या एखाद्याला का होईना काहीच गुन्हा न करता जन्मठेप होऊ शकते. मला त्या एखाद्याबद्दल दया वा करुणा वा सहानुभुती वगैरे नसून त्याला माणूस म्हणून डावलण्याबद्दल खंत आहे. त्यासाठी मी या समाजातल्या कुणालाच माफ करू शकत नाही, अगदी स्वतःलाही.
वैद्यबुवा, हो नक्कीच. परस्पर
वैद्यबुवा, हो नक्कीच.
परस्पर संमती आणि इतर कोणाच्याही हक्कांची वा सुरक्षिततेची पायमल्ली न होणं या दोन मोठ्या बाबी पुन्हापुन्हा का लिहायला लागतात कळत नाही.>>
स्वाती, मग ओपन मॅरेजेसमध्ये परस्पर संमती नसते का? कुणाच्या हक्कांची/सुरक्षिततेची पायमल्ली होते? ते का कायदेशीर नाहिये भारतात?
एक सांगायचं राहिलं.. माझी या विषयावरची सगळी मतं ही "सध्याच्या भारतीय समाजाच्या" अनुषंगाने आहेत. युके, युएस मधल्या समाजात यावरुन केओस होत नाही, म्हणजे भारतातही होणार नाही असं नाही.
इब्लिस, सुप्रिम कोर्टाने जरी
इब्लिस, सुप्रिम कोर्टाने जरी त्यांचे काम योग्यरित्या केले असले तरी संसदेत असलेले आपले लोक किती लोकप्रतिनिधी "पानी से बिजली निकाल लेंगे तो पानी मे क्या बचता हय" टाईप आहेत? ते काय निर्णय देतिल ह्या करता फार विचार करायची गरज नाही. थोडक्यात काय तर समाजातले गैरसमज आधी दूर झाले पाहिजेत. म्हणूनच लोकं असे लेख लिहायचे प्रपंच करतात.
नताशा, भारतीय समाजात आजही
नताशा,
भारतीय समाजात आजही खुलेआम खापपंचायती आहेत. समाजाचा तो हिस्सा सहजपणे आंतरजातीय विवाह करणार्यांचा खून करतो. बाईवर शिक्षा म्हणून बलात्कार करतो. कोवळ्या मुलींना मारणं आजही सहज स्वीकारलं जातं. समाजातल्या एका फार्फार मोठ्या वर्गाला बाईवर बलात्कार झाला कारण तिनं कमी कपडे घातले होते, असं वाटतं. समाजातला फार मोठा वर्ग रोजच्या रोज भ्रष्टाचार करतो. समाजातला फार मोठा वर्ग दलितांना दूर ठेवतो. त्यामुळे समाजमान्यतेपेक्षा समानता महत्त्वाची. समान हक्क महत्त्वाचे.
बाकी, ओपन मॅरेजच्या कायदेशीरतेबद्दल याच धाग्यावर अगोदर सविस्तर लिहिलं आहे. दोन्ही जोडप्यांची संमती असेल, तर तो भारतात गुन्हा नाही.
वर झालेल्या चर्चेत सर्व
वर झालेल्या चर्चेत सर्व सहभागींची संमती असेल तर पार्टनर स्वॅपिंग हा भारतात गुन्हा नाही असा उल्लेख वाचला. तेव्हा ओपन मॅरेजेसचा प्रश्न निकालात निघतो.
एका जोडीदाराच्या संमतीशिवाय दुसर्याशी संबंध ठेवल्याने पहिल्याच्या नाय्य हक्कांची पायमल्ली होते.
<न लिहिलेला प्रतिसाद>
<न लिहिलेला प्रतिसाद>
चिनुक्स, मी
चिनुक्स, मी "समाजमान्यते"विषयी बोलत नाहिये. यातनं तयार झालेले कॉम्प्लिकेशन्स झेलण्याइतका भारतीय समाज आजतरी परिपक्व नाही, असं मला म्हणायचंय.
अ स्त्री सोबत ढ पुरुषाचे
अ स्त्री सोबत ढ पुरुषाचे संबंध असतील व त्यास अ च्या पतीची संमती नसेल, तर तो गुन्हा आहे. संमती असेल, (म्हणजे अ च्या पतीची) तर तो गुन्हा नाही, असा तो कायदा आहे, @ इबा.
व्हेरी प्रोग्रेसिव्ह लॉज. सगळा प्रश्न निकालात निघतो.
ता.क.
यात अ व ढ यांच्या परस्पर संमतीचा संबंध नाही. अ च्या नवर्याच्या संमतीचा प्रश्न आहे फक्त
< मी "समाजमान्यते"विषयी बोलत
< मी "समाजमान्यते"विषयी बोलत नाहिये. यातनं तयार झालेले कॉम्प्लिकेशन्स झेलण्याइतका भारतीय समाज आजतरी परिपक्व नाही, असं मला म्हणायचंय.>
कुठली कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतील असं वाटतं?
शेजारच्या नेपाळमध्ये हा गुन्हा नाही. नेपाळ एक हिंदू राष्ट्र आहे. इराक, बाहरिन, अझरबैजान अशा देशांमध्ये हा गुन्हा नाही. युरोपात गुन्हा नाही. ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांत गुन्हा नाही. मग फक्त भारतातच नक्की काय वाईट होऊ शकेल?
समलिंगी संबंधामुळे सध्या काय
समलिंगी संबंधामुळे सध्या काय काँप्लिकेशन्स निर्माण होऊ शकतील नताशा?
>> ओपन मॅरेजच्या
>> ओपन मॅरेजच्या कायदेशीरतेबद्दल याच धाग्यावर अगोदर सविस्तर लिहिलं आहे. दोन्ही जोडप्यांची संमती असेल, तर तो भारतात गुन्हा नाही.
दोन्ही जोडप्यांची संमती असेल तर तो गुन्हा नाही पण म्हणून अशा संबंधांतून लग्नं होऊ शकत नाहीत ना? म्हणजे एकापेक्षा जास्त लग्नं बेकायदेशीरच ना जरी त्यातल्या सर्वांची संमती असली तरी?
तसंच समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही पण लग्न, त्या द्रूष्टीने मिळणारे कायदेशीर हक्क, मुलं इ. साठी कायद्याची मान्यता नको असं म्हणायचं आहे का नताशाला?
चीनुक्स, इराक मध्ये गुन्हा
चीनुक्स, इराक मध्ये गुन्हा नाही??!!! (माफ करा, उगीच कायद्याचे प्रश्न मी सारखे तुमच्यापुढे काढते. पण फारच आश्चर्य वाटले कि भारतात वाईफ स्वापिंग चालते, इराक़ मध्ये होमो चालतात)
यात अ व ढ यांच्या परस्पर संमतीचा संबंध नाही. >> नाही इब्लीसदादा. आधीच्या चर्चेत तेच तर चीनुक्स यांनी समजावलं. अ आणि ढ यांची संमती हवी (नायतर तो रेपचा गुन्हा होईल).
सशल, गे लग्न भारतात अजून दूरचा विचार आहेत. आधी हे सम्बन्ध गुन्हा नाही हे मान्य हवे. मग पुढे लग्न हवे कि नको हा मुद्दा. एकापेक्षा अधिक लग्ने अनेक संस्कृतीना मान्य आहेत, भारतात ही स्वातंत्र्यपूर्व काळात होत होती. त्यामुळे गे लोकांची लग्न मान्य करायला हरकत कसली? (फक्त तिथे पण लिंगभेद करून गे पुरुषांना लग्न करू द्या नायतर ते सरळ पुरुषांवर रेप करीत सुटतील पण बायकांना नको कारण शेवटी ती बाईच असला काहीतरी आचरटपणा केला नाही म्हणजे बास!)
सिमन्तिनी , नाही. भारतीय
सिमन्तिनी , नाही.
भारतीय कायद्यानुसार स्त्री ही पतीची संपत्ती असल्याने (अजूनतरी) अॅडल्टरी करिता पुरुषाने बायकोच्या पार्टनरविषयी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.
तसे न केल्यास ती अॅडल्टरी गुन्हा नाही.
या नियमावर बोट ठेऊन जेव्हा कधी न्यायालयाचा निकाल येतो तेव्हा त्यावेळेपुरता स्त्री संघटनांकडून आरडाओरडा होतो मग सगळं शांतं होतं.
बेफिकीर, या विषयावर दोन तीन संस्थळांवर ल्हिले असल्याने आणि माबोवरही मागे एकदोनदा लिहिले असल्याने समुपदेशाने बदललेले लैंगिकत्व या मुद्द्यावर या चर्चेत काही लिहिले होते का हे लक्षात आले नाही.

इथल्या एवढ्या प्रतिसादांत असा काही मुद्दा आला/ निसटला हे वाचले नाही किंवा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा लिहिले.
बहुतेक धागाकर्ता आणि अॅडमिन
बहुतेक धागाकर्ता आणि अॅडमिन यांना ही चर्चा इथल्या सगळ्या आयडींनी छातीवर हात ठेऊन
>'होय, आमच्या मते समलैंगिकता हा गुन्हा नाही आणि भारतातला ही बाब गुन्हा ठरवणारा कायदा रद्द झाला पाहिजे'
अशी शपथ घेईपर्यंत चालवायचाय.
हा विनोद नाही, माझे प्रामाणिक मत आहे. कृपया प्रशासन हुकूमशाहीच्या नादात नसेल तर उडवून लावू नये.
मुग्धमानसी आणि नताशा यांच्या
मुग्धमानसी आणि नताशा यांच्या पोस्ट पटल्या.
समानतेच्या बाजुने बोलणार्यांनी 'किमान समलैगिकाला समान वागणुक द्या' हे काही लोकांच्या मनात ठसवले, हे त्यांचे यशच म्हणावे लागेल.
राहिला कायद्याचा प्रश्न, तर भारतात हा कायदा संमत होणे, अवघड आहे (मात्र अशक्य नाही.) लोकांचे मतपरिवर्तन करणे अधिक गरजेचे असावे, असे वाटते. असो.
ज्या मुद्देसुदपणाने, चिकाटीने समानतेचा मुद्दा लिहिल्या जातोय, त्यासाठी या सर्व लोकांचे कौतुक.
बेफिकीर यांनी पहिल्याच पानावर
बेफिकीर यांनी पहिल्याच पानावर पुरे करा लिहिले. साती यांनी त्या म्हणण्याला अनुमोदन दिले. तेच इब्लिस यांनी लिहायला वीस पाने जावी लागली एवढेच कळले.
भारतीय समाज अजूनही समलैंगिकतेला स्वीकारायला (याचा अर्थ सर्वांनी समलैंगिक होणे असा नसून केवळ समलैंगिकांना समान दर्जा देणे, समाजात स्वीकारणे इतकाच आहे, कृपया
) तयार नाही. जोवर समाज बदलत नाही तोवर कायदा बदलणेही कठीण आहे. कायदा बदललाच तरी तेही पुरेसे ठरतेच असे नाही. त्यामुळे असे लेख सातत्याने येणे ही संपूर्ण समाजाचीच गरज आहे. लेख वाचून ज्यांची भूमिका, याचा आपल्याशी काय संबंध अशी होती, अशा अनेकांना या विषयावर विचार करावा, मत बनवावे असे वाटले यात या लेखाचे आणि चर्चेचे यश आहे.
साती, समुपदेशनाने बदलणारा लैंगिक कल याबद्दल "समलिंगी संबंध - एक धोका" याबद्दल तुम्ही लिहिलेले वाचलेले आहे. तुमच्या निरीक्षणावरची मते/निरीक्षणेही तिथे नोंदवली गेली आहेत.
<'होय, आमच्या मते समलैंगिकता हा गुन्हा नाही आणि भारतातला ही बाब गुन्हा ठरवणारा कायदा रद्द झाला पाहिजे'> यापेक्षा वेगळी भूमिका कोणी घेतल्याचे दिसलेले नाही. तुमचे मत तसे असल्यास स्पष्टपणे लिहा की.
जोवर समाज बदलत नाही तोवर
जोवर समाज बदलत नाही तोवर कायदा बदलणेही कठीण आहे. कायदा बदललाच तरी तेही पुरेसे ठरतेच असे नाही. त्यामुळे असे लेख सातत्याने येणे ही संपूर्ण समाजाचीच गरज आहे. लेख वाचून ज्यांची भूमिका, याचा आपल्याशी काय संबंध अशी होती, अशा अनेकांना या विषयावर विचार करावा, मत बनवावे असे वाटले यात या लेखाचे आणि चर्चेचे यश आहे.<<<
असहमत!
१. असे लेख सातत्याने येणे ही (संपूर्ण) समाजाची गरज नाही, समलिंगींची गरज आहे. ह्या विधानात समलिंगींना कमी, तुच्छ समजणे किंवा त्यांच्याबाबत इनह्यूमन वागणे मुळीच नसून ती एक फॅक्ट आहे की बहुसंख्य लोक भिन्नलिंगी असतील तेथे असे लेख सातत्याने समोर आणणे ही 'समाजाची' गरज असूच शकत नाही, ती त्या घटकाची गरज असू शकते. (पुन्हा एकदा, जगभरात काय चालते ह्याची उदाहरणे देत बसण्याची आवश्यकता - वाटत - नाही).
२. हा लेख, त्यावरील चर्चा यशस्वी झाली व अनेकांचे मतपरिवर्तन झाले किंवा होण्याचा आरंभ झाला असा काहीतरी निष्कर्ष काढण्याची जरा घाई होत आहे. डॉक्टर साती ह्यांनी नव्याने काढलेला मुद्दा लेखाचा पायाच हालवत आहे. त्याकडे (बहुधा मुद्दाम) दुल्रक्ष केले जात आहे असे म्हणण्यास वाव आहे.
बेफिकीर, साती यांनी काढलेला
बेफिकीर, साती यांनी काढलेला मुद्दा तुमच्यासाठी नवा असेल. या विषयावरच्या चर्चेत आधीपासून सहभागी झालेल्यासांठी नाही. कसा ते आधीच्या प्रतिसाद लिहिले आहे.
साती, तुम्हांला या धाग्याकडे
साती,
तुम्हांला या धाग्याकडे दुर्लक्ष करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.
बाकी, आयसीडी-१०च्या यादीत समलैंगिकता नाही. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या यादीतही समलैंगिकतेचा समावेश नाही. त्यामुळे आतातरी भारतीय डॉक्टरांनी समलैंगिकतेला डिसॉर्डर म्हणत 'इलाज करून घ्या' किंवा 'इलाज केल्याने ती बरी होते' असं सांगण्याचं टाळावं, असं वाटतं. तसं नसेल, तर आपली निरीक्षणं, ऑब्झर्वेशन्स पीअर रिव्ह्यूड जर्नलात प्रकाशित करून आयसीडीत समलैंगिकता पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावा.
बेफिकीर,
तुम्हांला नम्र विनंती. कृपया सगळा लेख, सगळे प्रतिसाद वाचा.
असे लेख सातत्याने समोर आणणे
असे लेख सातत्याने समोर आणणे ही 'समाजाची' गरज असूच शकत नाही, ती त्या घटकाची गरज असू शकते.
<<
परफेक्ट्ली पुट
+१ इ.
विधवांना समाजात इतरांसारखेच
विधवांना समाजात इतरांसारखेच (इथे इतर स्त्रियांसारखेच असे म्हणत नाही हे लक्षात घ्या) वागवले जायला हवे असेल तर केवळ त्या विधवा स्त्रियांचे प्रबोधन करणे पुरेसे आहे का?
स्त्रीपुरुष समानता प्रस्थापित करायची असेल तर केवळ स्त्रियांचे मतपरिवर्तन पुरेसे आहे का?
(डॉ. कैलास गायकवाड यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमात सांगितले की) कुष्ठरोगाला अनेक जण देवाचा शाप, केलेल्या पापांचे फळ मानतात. त्याबद्दल केवळ कुष्ठरोग्यांचे प्रबोधन पुरेसे आहे का?
आपल्याच समाजातील काही व्यक्तींबद्दल आपला दृष्टिकोण निकोप असणे गरजेचे नाही का?
समलैंगिक पृथ्वीवर वसतीला आलेले कुणी परग्रहवासी नाहीत. इथल्याच समाजात जन्माला आलेले आहेत. ते समलिंगी निघाले म्हणून त्यांनी परग्रहावर राहायला जायचे नसेल, तर इथल्या समाजाला त्यांच्याबद्दलची भूमिका घ्यावीच लागेल.
असे लेख सातत्याने समोर आणणे
असे लेख सातत्याने समोर आणणे ही 'समाजाची' गरज असूच शकत नाही, ती त्या घटकाची गरज असू शकते.>> तो घटक या समाजाचाच एक हिस्सा आहे ना? मग? त्या घटकाची गरज म्हणजेच समाजाच्या एका ठराविक भागाची गरज नव्हे, तर संपूर्ण समाजाची गरज!!!!
अल्पसंख्य असलेल्या, वंचित
अल्पसंख्य असलेल्या, वंचित असलेल्या घटकांबद्दल जाणीव निर्माण होणं, ही समाजाचीच गरज आहे. तुम्ही एका सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न घरात जन्म घेतला, तो केवळ एक अपघात. उद्या तुम्ही फासेपारधी असता, आणि पोलिसांनी तुम्हांला पकडून नेलं असतं, केवळ संशयावरून, तरी हीच भूमिका राहिली असती का?
समाजाचा एक मोठा वर्ग आज या ना त्या प्रकारे अन्यायग्रस्त आहे. त्यांच्यावर नक्की काय अन्याय होतो आहे, जाणता किंवा अजाणता, हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे.
'आम्हांला तुमच्या समाजाची गरज नाही', असं आनंदवनातले एक कुष्ठरुग्ण मला म्हणाले होते. का, ते लक्षात आल्यावर वाईट वाटतं.
उदाहरणे देताना 'माणूसकी,
उदाहरणे देताना 'माणूसकी, मानवता' वगैरे गोष्टी दुर्क्लक्षित केल्या जात आहेत असे आधीपासून म्हणत आहे.
केशवपन, अंधारकोठडीत राहायला लावल्याप्रमाणे ठेवणे, छळ करणे, समाजात येऊ न देणे ही सर्व अमानवी कृत्ये होती. सती हे अत्यंत राक्षसी कृत्य होते. त्यामुळे समाजाचे प्रबोधन करून समाजाला ह्यापासून दूर ठेवणे हे मानवतावादी होते. (प्रतिसाद संपादीत करताना चिनूक्स ह्यांनी दिलेली फासेपारधी वगैरे उदाहरणेही गृहीत धरत आहे).
हाच व असाच मानवतावाद समलिंगींना लागू होतो असे म्हणणार्यांना एवढेच सांगणे आहे की:
१. न्यायालयाने त्याला गुन्हा ठरवले असले तरी गुन्हा ठरवल्यामुळे समलिंगी संबंध संपणार नाहीत हे समलैंगीकतेला अनैसर्गीक मानणार्यांनाही माहीत आहेच.
२. चार भिंतींच्या आत कोण काय करतो ह्याच्याशी इतरांचा संबंध नाही हेही सर्वांनाच मान्य आहे.
३. फक्त त्या समलैंगीकतेला मानवतावाद, नॉमिनेशन्स व लग्नबिग्न करण्याच्या परवानगीचे औदार्य, अमेरिका युरोप येथील दाखले ह्या आधाराने 'नैसर्गीक' मानायला लावू नयेत. ती अस्तित्वात आहे हे मान्य आहे, ती अनैसर्गीक वाटणे हेही तितकेच नैसर्गीक आहे.
सातींचा मुद्दा आधी आलेला असेल आणि तरीही ही चर्चा अशीच दामटली गेली असेल तर अमाप आश्चर्य वाटत आहे. निव्वळ संयत चर्चा करण्याच्या कौशल्याने बेसलेस चर्चा करण्यात हशील नाही. समलैंगीकत्व समुपदेशनाने किंवा इतर घटकांनी प्रभावित होऊन बदलवले जाऊ शकत असेल तर पूर्ण धाग्यातील मध्यवर्ती संकल्पना उभी राहात नाही.
Pages