'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर
भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.
काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.
उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.
२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'
एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.
त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.
''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्या डावर्या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''
''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''
वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.
''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.
काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''
उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!
समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.
माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.
समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्चात्त्य आहे!
समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.
इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!
आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?
लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.
आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.
आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.
आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्चित होते.' जन्मतः निश्चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.
याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.
समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.
बाकी गे लोकांबद्द्ल काय
बाकी गे लोकांबद्द्ल काय वाटावे हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे , पण वागताना तो एक माणुस आहे म्हणून वागावे इतकेच .>>> करेक्ट. पण हेच न समजता, जनावरांपेक्षाही जास्त हिडिस फिडीस करुन अत्यंत वाईट प्रकारचे प्रतिसाद दिले जातात तेव्हा बोलायची वेळ येते. ज्या समाजात कुष्ठरोग्यांना बरं झाल्यावरही सामावून घेतलं जात नाही, वाईट जीवन सोडून चांगलं जीवन जगायची इच्छा असलेल्या वेश्यांनाही संधी नाकारली जाते....त्याच्याबद्दल काय बोलणार? स्टँप घेऊन बसलेलेच असतात लोक्स. जिथे कोण कुठल्या पायरीवर उभं आहे हे कुणालाच स्वतःबद्दलही माहित नसतं तिथे लोक्स दुसर्याला हीन ठरवायला मात्र पुढे असतात. खरा धर्म, खरा देव, खरी संस्कृती हे सगळं मानत नाही....जाणत नाही....म्हणूनच वेश्येच्या घरी जन्मलेली कान्होपात्राही संत ठरु शकते.
कविमनाच्या लोकांना काहिही
कविमनाच्या लोकांना काहिही आवडतं!

बाकी गे लोकांबद्द्ल काय
बाकी गे लोकांबद्द्ल काय वाटावे हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे , पण वागताना तो एक माणुस आहे म्हणून वागावे इतकेच .>>>>>>>>>>>>> केदार, १००% सहमत.
के. अश्विनी, >>
के. अश्विनी,
>> जनावरांपेक्षाही जास्त हिडिस फिडीस करुन अत्यंत वाईट प्रकारचे प्रतिसाद दिले जातात तेव्हा बोलायची वेळ येते
हे जर माझ्याकडून घडलं असेल तर ते खऱ्या गे लोकांना उद्देशून नसून तोतया गे लोकांसाठी आहे.
आ.न.,
-गा.पै.
सर्वोच्च न्यायालयाने का
सर्वोच्च न्यायालयाने का नाकारले? सॉरी मला बातमी वाचायला नीट वेळ मिळाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या निकानुसार कलम ३७७ रद्द करणे हे न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसून, ते संसदेचं काम आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला.
भारत सरकारच्या मते सर्वोच्च न्यायालय हे कलम रद्द करू शकतं. त्यामुळे भारत सरकार आता सर्वोच्च न्यायालयात हे कलम रद्द करण्यासाठी क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करणार आहे. ही पीटिशनही जर सर्वोच्च न्यायालयानं नाकारली, तर मात्र संसदेतच हा कायदा बदलावा लागेल.
समलैंगीकतेच्या विषयावर इतर
समलैंगीकतेच्या विषयावर इतर सर्वांप्रमाणे मीही माझी मते नोंदवली. पण आज पेपरमधील बातमी वाचून एका गोष्टीचा मात्र उलगडा झालेला नाही.
'सर्वोच्च न्यायालयाच्या मते समलैंगीक संबंध हा गुन्हाच' - ही ती बातमी!
फार फार तर समलैंगीकता एखादी विकृती आहे किंवा विचित्र तर्हेची आवड आहे असे काहीतरी निष्पन्न झाले असते तर समजता आले असते. पण हा 'गुन्हा' कसा काय होऊ शकतो?
(कृपयाच, हे मतपरिवर्तन आहे असे समजले जाऊ नये कारण काहीतरी वेगळे म्हणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे ह्या प्रतिसादाद्वारे).
समलैंगीकतेला कायदेशीर केले तर अनेक गुन्हे त्या आधारे केले जातील हे समजू शकतो, पण मुळातच समलैंगीकता हाच एक गुन्हा आहे असा निर्वाळा कसा काय दिला गेला?
ह्या धाग्यावरील प्रामुख्याने झालेली चर्चा 'नैसर्गीक की अनैसर्गीक' हा एक चर्चेचा विषय ठरू शकेल कारण येथे (म्हणजे आपल्या संस्कृतीत) नुसतेच बहुतांशी लोक भिन्नलिंगीय नाहीत तर समलैंगीकतेला विचित्र समजणारेही बहुसंख्य आहेत. पण तो गुन्हा आहे असे का ठरले असावे?
पुढे अनेक प्रकारचे संभाव्य गुन्हे घडू नयेत म्हणून बेकायदेशीर ठरवणे हेही समजू शकतो, पण मुळात हा प्रकारच एक गुन्हा आहे हे नाही समजू शकलो.
जेव्हा कायदा बनवला तेव्हा
जेव्हा कायदा बनवला तेव्हा ह्याना अनैसर्गिकच समजायचे म्हणून तसे करणे "कायद्याने गुन्हा" होते. आताच्या ह्या बातमीनुसार त्यात काही बदल करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला त्यामुळे तो गुन्हाच "राहिला" आणि म्हणून बातमीच "गुन्हाच" असं आलं माझ्यामते.
बेफिकीर, तुम्ही बहुतेक सगळी
बेफिकीर,
तुम्ही बहुतेक सगळी पोस्टं, लेख किंवा या लेखाची प्रस्तावना वाचली नसावी.
नैसर्गिक / अनैसर्गिक / विकृती हे मुद्दे फार नंतरचे आहेत. मूळ लेखात आणि प्रस्तावनेतही 'गुन्ह्या'चा प्रामुख्यानं उल्लेख आहे.
कलम ३७७नुसार भारतात समलिंगी संबंध ठेवणं हा गुन्हा आहे, आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
या कलमानुसार फक्त समलिंगी संबंधच नव्हे, तर भिन्नलिंगी व्यक्तींनी मुखमैथुन आणि गुदमैथुन करणे हाही गुन्हा आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने हे कलम भारतीय घटनेच्या विरोधात असल्याचं सांगून रद्द केलं होतं.
धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, की या कलमाशी फार कमी लोकसंख्येचा संबंध येतो, फार कमी लोकांना शिक्षा झाली आहे, त्यामुळे संसदेनं काय तो कायदा बदलावा.
मग श्याम बेनेगल, समलिंगी मुलामुलींचे पालक आणि नाझ फाऊंडेशन व भारत सरकार या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पीटिशन दाखल केले. काल न्यायालयानं आधीचाच निर्णय कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं 'समलिंगी संबंध ठेवणे ही विकृती आहे, किंवा तो गुन्हा आहे' असं कुठेही म्हटलेलं नाही. न्यायालयानं फक्त कलम रद्द करायला नकार दिला आहे, आणि ते काम संसदेवर सोपवलं आहे. पण दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द झाल्याने समलिंगी संबंध पुन्हा गुन्हा ठरले आहेत.
समलैंगीकतेला कायदेशीर केले तर
समलैंगीकतेला कायदेशीर केले तर अनेक गुन्हे त्या आधारे केले जातील हे समजू शकतो, >>
हे कसे काय ? जरा स्पष्ट करणार का? समलैंगीकता कायदेशीर केली गेल्याने कोणते गुन्हे लोक त्या कायद्याच्या आधारे करतील ?
बाकी हेटरो पुरुषांवर समलैंगिक पुरुषांकडून लैंगिक अत्याचार , बलात्कार हेच गुन्हे अपेक्षित असतील तर ते या कायद्यामुळे थांबणार आहेत किन्वा वाढणार आहेत असे काही आहे का ?
गे पुरुषांविषयी माहित नाही पण हेटरो पुरुषांनी लहान मुलग्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या २ केसेस माझ्या प्रत्यक्ष पहाण्यात आल्या होत्या.
रच्याकने, वरती बी च्या प्रतिसदात थोडाफार उल्लेख आहे, पण पुरुष स्वतःवर इतर पुरुषांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराविरूद्ध बोलताना आढळत नाहीत. त्यामुळे या प्रकाराविषयी काहीच जनजागृती नाही.
तो कायदा रद्द होईल, बदल होईल
तो कायदा रद्द होईल, बदल होईल जे काय होईल त्याला जो वेळ लागेल तो लागेल पण. समलैगिकांशी वागताना ती व्यक्ती एक माणुस आहे म्हणून वागावे इतकेच > हेच खरे.
मनात समलैंगिकतेबद्दल अजुन काही शंका आहेत, पण त्याचे एक दिवस विज्ञानाकडुन उत्तर मिळेल ह्याची खात्री आहे. स्वतःच्या प्रिय व्यक्तीवर अशी वेळ आली आणि त्याचा 'स्विकार वा धुत्कार' हे दोनच पर्याय समोर असतील तर 'स्विकार' हाच पर्याय निवडणार.
अवांतर : चिनूक्स, >> शिवाय
अवांतर :
चिनूक्स,
>> शिवाय 'समलिंगिकतेचे कट्टर पुरस्कर्ते' याऐवजी 'समानतेचे कट्टर पुरस्कर्ते' असा वापर केल्यास अधिक आवडेल.
सृष्टी चालते ती विषमतेच्या जोरावर. तर समानता हे मृगजळ नव्हे काय? जर समानता ही एक अमूर्त संकल्पना मानली तर ती समलैंगिक आणि भिन्नलैंगिक या भेदान्वये व्यक्त करण्याचं प्रयोजन काय?
तुम्ही समलैंगिकता सोडून समानतेकडे वळलात याचं कुतूहल वाटतंय. म्हणून हे तात्विक प्रश्न विचारलेत.
आ.न.,
-गा.पै.
<तुम्ही समलैंगिकता सोडून
<तुम्ही समलैंगिकता सोडून समानतेकडे वळलात याचं कुतूहल वाटतंय.>
सुरुवातीपासूनच समानतेबद्दल बोलणं सुरू आहे.
सृष्टीतल्या 'विषमते'साठी कायद्यात शिक्षेची तरतूद कशाला?
चिन्मय लेख टाकल्या बद्दल
चिन्मय लेख टाकल्या बद्दल धन्यवाद. लेखाविषयी ऐकल होत आणि वाचायची इच्छा होती. ह्या वर्षीच्या माहेर मध्ये आलेली प्रतिक्रिया हल्लीच वाचलेली.
चर्चा वाचतोय. अनेक असंबद्ध आणि चिथावणीखोर पोस्ट्स येवूनही संयंत प्रतिक्रिया दिल्या की चर्चा भरकटत नाही याचा नमुना आहे.
बेफकीर तुझा जेन्युअन
बेफकीर तुझा जेन्युअन प्रॉब्लेम हा आहे की तुला बर्याच गोष्टी धड कळत नाहीत आनी त्या कळण्याधी तु फार धांगड्धिंगा करतोस. बरे कळाल्यावर लाजेकाजे गप्प बसावे तर तेही नाही. तुझा भंपक इगो मग थयथयाट करतो आणी कधी तु बालीश तर कधी मुर्ख वाचाळ बडबड करतोस.
'वैयक्तिक शेरेबाज फकीर'
फकिर बरोबर ओळखलंत
फकिर
बरोबर ओळखलंत
सृष्टी चालते ती विषमतेच्या
सृष्टी चालते ती विषमतेच्या जोरावर. >>> गामा, अगदी बरोबर. पण त्याच बरोबर सर्व विषमतेखाली एकच आत्मतत्व असते हे खरे नाही का? पण तो या बाफचा मुद्दा नाहीये तेंव्हा तो बाजूला ठेऊया.
तुमच्या मुद्द्यानुसार भेद मानून त्यानुसार कायदे करायचे झाले तर काळ्या डोळ्यांच्या माणसांसाठी एक कायदा आणि घार्या डोळ्यांच्या माणसांसाठी दुसरा कायदा, सरळ केसांच्या माणसांसाठी एक कायदा आणि कुरळ्या केसांच्या माणसांसाठी दुसरा कायदा (ही यादी अमर्यादपणे वाढवता येइल कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माणसा-माणसांत विविधता आहेच) असे करणे योग्य होइल का?
समरतींबद्दल समाजमन बदलणे सोपे नाहीये हे या बाफवरून चांगलेच समजून आले आहे. पण निदान कायदा हा तरी सर्वांकरता समानच हवा. विषमरतींना जे सुख उपभोगता येते ते समरतींना का नाकारायचे? त्यांच्या डोक्यावर कायद्याची टांगती तलवार का?
जी विषमता निसर्गदत्त आहे ती विषमता कायदा मानत नाही (मानली नाही पाहिजे). तसे नसेल तर परदेशात भारतीयांवर होणारे हल्ले कायदेशीर होऊ शकतील की! आपण भारतीय गोर्या कातडीचे नाही. मग गोरे लोक बहुसंख्य असलेल्या देशांतल्या लोकांना आपल्याबद्दल घृणा वाटणे काय चुकीचे आहे? आणि ही विषमता जर कायदेबद्ध झाली तर भारतीय वंशाच्या लोकांवर त्या देशांत किती हल्ले होऊ शकतात याची कल्पना करू शकता का?
चिनूक्स, >> सृष्टीतल्या
चिनूक्स,
>> सृष्टीतल्या 'विषमते'साठी कायद्यात शिक्षेची तरतूद कशाला?
मला वाटतं की गे लोकांना कलम ३७७ मधून वगळावं याबद्दल आपलं एकमत आहे. या लेखाचा हेतू तेव्हढाच मर्यादित नसावा. क्षणभर धरून चला की गे लोकांना हे कलम लागू नाहीये. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन बघा. प्रश्न परत सांगतो :
>> जर समानता ही एक अमूर्त संकल्पना मानली तर ती समलैंगिक आणि भिन्नलैंगिक या भेदान्वये व्यक्त
>> करण्याचं प्रयोजन काय? तसंही पाहता सृष्टी चालते ती विषमतेच्या जोरावर.
हा भेद रास्त मानला तर त्यामुळे गे समूहास समलैंगिकत्वामुळे एक सकारात्मक ओळख (पॉझीटिव्ह आयडेंटिटी) मिळते. तर मग उरलेल्या भिन्नलिंगी समूहास देखील स्वत:ची ओळख आहे असं धरूया का?
आ.न.,
-गा.पै.
माधव, >> तुमच्या
माधव,
>> तुमच्या मुद्द्यानुसार भेद मानून त्यानुसार कायदे करायचे झाले तर ...
भेद मानून त्यानुसार कायदे करा असं मी आजिबात म्हंटलं नाहीये. ते चिनूक्स यांचं उदाहरण आहे.
आ.न.,
-गा.पै.
चिनूक्स, हा लेख इथे
चिनूक्स,
हा लेख इथे दिल्याबद्दल शतशः आभार.
लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया मुद्दाम सगळ्या वाचून काढल्या. समलैंगिक असणे हा गुन्हा नाही हे सर्वतोपरी पटवून देण्याचा प्रयत्न करणार्या सगळ्यांचे आणि शंका विचारणार्यांचेही आभारच.
दुसर्याच्या समलैंगिकतेबाबत आपण (म्हणजे मी) नक्की कोणता वैचारिक पवित्रा घ्यायचा ह्याबद्दल आधी (लेख वाचण्यापूर्वी) साशंक होतो. लेख वाचल्यानंतर (आणि विशेष म्हणजे सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर) मात्र संभ्रम मिटला आहे.
ज्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन मेजॉरिटीनुसार (मुद्दाम नॉर्मल/ नॅचरल हे शब्द लिहीत नाहिये) आहे.
म्हणजे, मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा आवडतो, अशांसाठी "मुलाला/मुलीला मुलगाच/मुलगीच कसा आवडू शकतो"? असा प्रश्न पडणे किंवा त्याबद्दल नापसंती असणे साहजिक आहे.
जर माझ्यासमोर उभा ठाकलेला पुरुष गे आहे असे मला समजले, तर क्षणभर का होईना, त्या व्यक्तीबद्दल "काहीतरी वेगळं" वाटू शकतं. हे वेगळं वाटणं [समोरची व्यक्ती डावखुरी आहे असे समजल्यावर वाटते] त्यापेक्षाही जास्त तीव्रच असण्याची जास्त शक्यता आहे. त्याला कारण बहुतांशी अशा लोकांबद्दलचा मीडियाकडून होणारा अपप्रचार (कॉमेडी शोज इ.) आणि घरगुती/शालेय/महाविद्यालयीन पातळीवर "ह्या" किंवा एकूणच "सेक्स" ह्या विषयाबद्दलचा मोकळ्या संवादाचा/चर्चेचा अभाव.
आजकाल पूर्वीपेक्षा(म्हणजे नक्की कधीपेक्षा हे सांगणं अवघड आहे) एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीकडे पाहण्याचे आणि त्या व्यक्तीशी असलेले आपले संबंध/वागणं ठरवण्यासाठीचे क्रायटेरिया वाढलेत. दुर्दैवाने समोरच्या व्यक्तीचा "लैंगिक कल" हाही त्यातलाच एक क्रायटेरिया झालाय असं म्हणायला खूप वाव आहे. आणि म्हणूनच अशा लेखांची जास्त गरज आहे.
लेख, प्रतिक्रिया वाचून माझ्यापुरता निश्चय असा की-
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच !
जर एखादी व्यक्ती माझ्या
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच ! <<<
+ १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
जर एखादी व्यक्ती माझ्या
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच !<<<<<
संपूर्ण सहमत!
विशेष्तः इथे (परदेशात) अशा दोन आया किंवा दोन बाबा अशा कुटुंबांतून छान वाढलेली, समजदार, हुशार आणि सुसंस्कृत नागरिक मुलं बघितली की साप साप म्हणून भुई धोपटणार्या इथल्याही काहींची कीव करावीशी वाटते.
समलैंगीकतेच्या विषयावर इतर
समलैंगीकतेच्या विषयावर इतर सर्वांप्रमाणे मीही माझी मते नोंदवली. पण आज पेपरमधील बातमी वाचून एका गोष्टीचा मात्र उलगडा झालेला नाही.
'सर्वोच्च न्यायालयाच्या मते समलैंगीक संबंध हा गुन्हाच' - ही ती बातमी!
>> मलाही विचित्र वाटले. "सर्वोच्च न्यायालयाच्या मते उच्च न्यायालयाकडे समलैंगिकता कायदेशीर करण्याचे हक्क नाहीत" असं हवं होतं. पण बातमी देतांना तिचं शिर्षक शक्य तितकं लहान, कॅची आणि अचुक असावं असं काहीतरी वाचल्याचं आठवतंय. म्हणुन हे असं शिर्षक दिलं असावं.
गेले १२ दिवस हा धागा आणि
गेले १२ दिवस हा धागा आणि त्यावरची एकन् एक प्रतिक्रीया वाचते आहे. मी शक्यतो कुठल्या वादात पडत नाही. अश्या धाग्यांवर प्रतिक्रीया देणं मी टाळते. पण या धाग्याचं, विषयाचं आणि इथं प्रतिक्रीया देणार्या अनेकांच्या संयमित अभ्यासपुर्ण विचारांचं फार कौतूक वाटलं म्हणून लिहायचं धाडस करते आहे. आणि प्रामाणिकपणे कबूल करायचं झालं तर या लेखाने आणि चर्चेने मला स्वत:चे एक ठाम मत बनवणे आणि त्याशी प्रामाणिक राहणे यासाठी मदत केली आहे. धन्यवाद चिनुक्स आणि सर्व प्रतिसादक (सर्व प्रकारचे)... .
हा लेख वाचण्यापुर्वी मला कुणी हा प्रश्न विचारला असता की "समलिंगीसंबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी असं तुमचं मत आहे का?" तर मी काय उत्तर दिलं असतं? कदाचित तत्काळ प्रतिक्रीया असती की 'छे छे! काहितरीच काय?' अजून थोडा विचार केल्यावर उत्तर कदाचित असलं असतं 'माझा काय संबंध या सगळ्याशी? मी नाही अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालवत! आणि विचार करावा अशी मला गरजही नाही वाटत.'
पण गेल्या काही दिवसांत या चर्चीच्या निमित्ताने मला माझीच सगळी मतं माझ्याच तत्त्वांच्या, विचारांच्या आणि नैतिकतेच्याही कसोट्यांवर पारखून बघाविशी वाटली. आणि जे निष्कर्ष निघाले ते खालीलप्रमाणे -
१. मी स्त्री आहे, मी काळी आहे, मी अपंग आहे, मी अमुक एका जातीची आहे वगैरे वगैरे या माझ्या किंवा कुणाच्याच कह्यात नसलेल्या गोष्टींवरून कुणी माझी पात्रता आणि समाजात वावरण्याची लायकी ठरवत असेल तर मला संताप येतो. कुणालाही येईल. अशा समाजाची माझी गुणवत्ता समजून घेण्याची पात्रता नसेल तर त्या समाजाला मी फाट्यावर का मारू नये? आणि या समाजाच्या तथाकथित मुल्यवान संस्कृतीबद्दल (ज्यात मला स्थान नाही) माझी मते कटू आणि द्वेषपूर्ण झाली तर त्याला जबाबदार कोण? या सगळ्यात 'मी लेस्बियन आहे' ही भरही असू शकतेच की!
२. आयुष्याचा जोडीदार कसाही असला, विरुद्ध स्वभावाचा असला तरी त्याच्या गुण-दोषांसकट त्याचा स्वीकार करून सहचर्य निभाऊन नेणं हे जर नैतिकतेत बसत असेल तर केवळ एका भिन्न लैगिकता असलेल्या माणसाला माझ्या आयुष्यात 'माणूस', 'मित्र', 'सोबती' म्हणून स्वीकारणं माझ्या उदार नैतिकतेत का बसू नये? त्याला 'माणूसपणाचे' हक्क नाकारणारी मी कोण?
३. आपल्या हक्कांसाठी प्रामाणिक लढा देणं, देत राहणं हीच या देशाची संस्कृती आणि परंपरा आहे. याऊलट 'मला मिळोत न मिळोत पण इतरांना मी हक्क मिळू देणार नाही' असं म्हणणं ही खरी विकृती! या अर्थाने पाहिलं तर आपल्या मुलभूत हक्कांसाठी प्रामाणिक लढा देणारेच खर्या अर्थी सुसंस्कृत आहेत. आणि संस्कृतीचे फुकटचे टेंभे मिरवणारे, बदलांना, खुल्या विचारांना नाकारणारे खरे विकृत... संस्कृतीघातक!
बाकी...
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच ! >>>>>> हेच मलाही म्हणायचे आहे!
जर एखादी व्यक्ती माझ्या
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच !>>>>>>. एकदम योग्य विचारसरणी आहे!
मुग्धमानसी.. पोस्ट आवडली.
मुग्धमानसी.. पोस्ट आवडली.
जर एखादी व्यक्ती माझ्या
जर एखादी व्यक्ती माझ्या लैंगिक कलाविरुद्ध माझ्यावर जबरदस्ती करत नसेल, जर माझ्या नागरी हक्कांवर गदा आणत नसेल, तर तिच्या लैंगिक कलाबद्दल, इतर नागरी हक्कांबद्दल हरकत घेण्याचा मला काहीही अधिकार नाही.
उलट, कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल, तिचे किमान नागरी हक्क देत नसेल, तर असा कायदा/समाज निषेधार्हच ! >>>> +१
कायदा/ समाज जर कोणत्याही
कायदा/ समाज जर कोणत्याही व्यक्तीला तिच्या लैंगिक कलानुसार वागू देत नसेल,
<<
'लैंगिक कल' व 'निसर्गदत्त' या विषयाचा अभ्यास इथल्या सग्ळ्यांनीच वाढवावा असे म्हणतो.
मागे एक फोरेन्सिक मेडिसिनची पुस्तके मायबोलीवर विकायला ठेवा अशी पोस्ट टाकली आहे.
इथले सगळे डॉक्टर्स लैंगिकतेबद्दल या ना त्या प्रकाराने काहीतरी वेगळं बोलताहेत.
जरा कारणे समजावून घ्या.
'क्रिमिनल' असणे. --> या संदर्भात माझी पहिली पोस्ट वाचा या धाग्यावरची.
खूनी, बलात्कारी, चोर (क्लेप्टोमॅनिआ हे सर्वज्ञात उदाहरण), दरवडेखोर इ.इ. असणे हे देखिल 'आजार' आहेत म्हणे. आजार असे लेबल केले असले, तरी 'जेनेटिक व्हेरिएशन' आहेत, असू शकतात असेही माझ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांत लिहिलेले आहे. या सगळ्यांना 'ट्रीटमेंट' द्यायला हवी, 'शिक्षा' नाही असेही तिथल्या 'रिसर्च'मधे लिहिलेले आहे. (याच्या लिंका मी देत नाही. आपल्याकडे एक लिंकपटू आहेत. फटाफट शिंका याव्यात तश्या लिंका येतात यांच्या कडून, 'हे वाचा' म्हणत.)
लैंगिक कल व त्यांतील व्हेरिएशन्स अन मायथॉलॉजिकल, हिस्टॉरिकल इत्यादि लिंका द्यायच्या झाल्या तर बेस्टिअलिटी, इन्सेस्ट, पेडोफिलिया, एल्जीबीटी, हे फाऽरच फालतू सेक्सुअल व्हेरिएशन्स आहेत. स्नफ, नेक्रोफिलिया, स्कॅट असल्या शब्दांनी झीट येऊन पडाल, ते तसे शब्द , अन त्यांचे अर्थ, अन त्यांनी ग्रासलेल्या माणसांना तितक्याच व त्याच सहानूभूतीने उपचार देणे हा माझा (हिप्पोक्रेटिसच्या)शपथपूर्वक स्वीकारलेला 'धंदा' आहे.
तुमची 'समानता' व 'पुरोगामी' विचार मान्य आहेत, त्याच्याच बाजूने बोलतोही आहे, पण आता हा अन या आधीचाही या विषयावरचा धागा जरा अती होतोय.
कुणाला कपाटाबाहेर यायला मदत हवी म्हणून धागा असेल, तर असू द्यात, कुणाचे सेक्सुअल ओरिएंटेशन काय आहे त्यामुळे मला काडीचा (काडी ऐवजी इथे कोणता शब्द योजावयास हवा, ते सूज्ञास सांगणे नलगे) फरक पडत नाही . जे असेल ते असो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जोडिदारावर अत्याच्यार करीत नाहीत, अॅडल्ट कन्सेन्सुअल आहे, तोपर्यंत मला त्रास असायचे कारण नाही.
पण तरीही, लोकहो, आवरा आता.
धन्यवाद!! क्रुपया
(ही पुपु स्टाईल)
इब्लिस, तुमची पोस्ट अजिबात
इब्लिस, तुमची पोस्ट अजिबात समजली नाहीये. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?
मला हे म्हणायचं आहे, की आता
मला हे म्हणायचं आहे,
की आता या विषयावरील चर्चा पुरे
Pages