पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुक्तेच एका मैत्रीणीकडे बंगाली पंचफोरन घालून केलेले बटाटेपोहे खाल्ले. वेगळेच लागले चवीला पण छान झाले होते.

अरुंधती - तांदळाची कणी भिजवून, ती फुलवून तिचे नेहमीसारखे फोडणीचे पोहे करायचे. रुचकर लागतात अतिशय! - कनी फुलवून पोहे कसे करायचे. डिटेल्स मध्ये सांग ना.

सगळ्या रेसिपी वाचून तोपासु नाही तर पोटात कावळे कलकलायला लागले ... पोहे आहाहा कोणत्याही फोर्म मध्ये.

आपण पोहे फक्त तांदळाचेच धरूया नको.
मक्याचे, गव्हाचे पोहे पण भारी असतात.
मक्याच्या पोह्याचा भरपूर दाणे आणि खोबरं घातलेला चिवडा, त्यावरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर... आणि बरोबर एक कडक आल्याचा चहा... अहाहा स्वर्ग!!

गव्हाचे पोहे डोंबिवलीत मिळतात. इथे तांदळाचे सुद्धा पफ पोहे म्हणून एक प्रक्कर मिळतो. मी तेच वापरते दड्पे पोहे करायला!! अजिबात वातड होत नाहीत ते केल्यावर बराच वेळ ठेवले तरी!!!

कोकणात गेल्यावर माझ्या माहेरी, आमचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. आम्ही जेव्हा डोंगरावर फिरायला जात असू तेव्हा घरून तेल, तिखट, मीठ, कांदा, कैरी (मे महिन्यात गेलो तर) आणि ओले खोबरे घालून केलेले पोहे आणि पळसाची पाने असे बरोबर घ्यायचो, डोंगरावर गेल्यावर थोडी सपाट जागा आणि झरा शोधून बसायचो, मस्त पळसाच्या पानावर पोहे खायचो आणि झऱ्याचे पाणी प्यायचो.

मक्याचे पोहे तर कुठेही मिळतात. तो तसला वरील चिवडा मला मस्त बनवता येतो. तळीव मक्याचे पोहे खाण्यात काहीतरी ग्रेट सूख आहे. बिग बास्केट . कॉम वर ऑनलाइन खरेदी करता येतील. मुंबईत होम डिलेवरी आहे.

ऑरगॅनिक फूड स्टोअर्स म ध्ये गव्हाचे पोहे असतात.

अंजु, गव्हाचे पोहे मानपाडा रोड्वर आरती स्टोअर्स आहे ना, तिकडे मिळतील!! तीथेच तांदळाचे पफ पोहे पण मिळतील!!! त्याचे दडपे पोहे खुप छान होतात!!! ते ही आणून बघ!!!

वल्लरीच : काकूने सांगितलेली कृती :

तांदळाच्या कणीचे पोहे :

तांदळाच्या कण्या गुलाबीसर रंगावर कोरड्या परतून घ्यायच्या व किमान २-३ तास थंड पाण्यात भिजवायच्या. पोहे करायचे असतील तेव्हा तांदळाच्या कण्या पाण्यातून उपसायच्या, निथळून घ्यायच्या. फोडणीच्या पोह्यांना करतो त्याप्रमाणे पण थोड्या जास्त तेलाची फोडणी करायची (हळद, मोहरी, हिरवी मिरची इ.) व त्यात ह्या निथळलेल्या कण्या घालून परतायच्या. चवीनुसार मीठ घालायचे. थोडा वेळ पुरेश्या परतल्या की वाफेचे झाकण ठेवायचे व दर पाच-पाच मिनिटांनी कण्यांवर पाण्याचा एक हबका मारून परतत राहायचे. असे साधारण तासभर करावे लागते, इति काकू. जर वेळेवर परतले नाही तर कण्या खालून करपू शकतात. खायला देताना वरून कोथिंबीर, सुके खोबरे, लिंबाचा रस घालून देणे.

>>>मानपाडा रोड वर कुठेशी आहे हे आरती स्टोअर्स??

बकूल ऑइल डेपो माहीत आहे का??त्याच्या शेजारीच आहे. जेमिनीचं चपलांचं दूकान आहे ना, त्याच्या सामोरच्या बाजूला (रस्ता क्रॉस करून) साधारण!!! तुम्ही दोघीजणी पश्चिमेला रहाता का??

प्राची, तू दिलेली पहिलीच मेतकूट घातलेल्या पोह्यांची रेसिपी आमच्याकडे जबरदस्त हिट झालीये. एकदम मस्त, यम्मी...

सिकेपी स्टाईल सोडे घालून पोहे - माझ्या काकीआजीची पद्धत

आले, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची असे हिरवे वाटण १/४ कप धूवून घेतलेल्या सोड्यांना चोळून ठेवायचे. पातेल्यात १ चमचा तेल तापवून त्यात सोडे परतायचे. वरुन हळद, तिखट आणि मीठ घालून अगदी थोडे पाणी घालून एक वाफ काढायची. सोडे शिजेपर्यंत दुसर्‍या पातेल्यात हिंग, मोहरी कढीपत्त्याची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा घालायचा. जरा रंग बदलला की एका बटाट्याच्या पातळ काचर्‍या टाकून परतून घ्यायचे. परतताना हळद आणि हिरवी मिरची चिरुन टाकायची. थोडे पाणी घालायचे. बटाटा शिजला की भिजवून ठेवलेले १ कप पोहे, मीठ आणि साखर घालून नीट ढवळायचे आणि एक वाफ काढायची. आता त्यात शिजवून घेतलेले सोडे घालून हलक्या हाताने परतायचे. वर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असेल तर ओले खोबरे घालायचे. वाढताना जोडीला लिंबाची फोड!

रोचीन, मी मानपाडा रोडला, आगरवाल हॉलच्या पुढच्या गल्लीत राहते, तुम्ही सांगता ते नाना-नानी पार्कच्या जवळपास आहे का? ओके, मी शोधून काढेन बकुल ऑईल डेपो.

>>नाना-नानी पार्कच्या जवळपास आहे का?
नाही, नाही ते खुप पुढे राहीलें. हे स्टेशन्च्या जवळ आहे. शिवाजी पुतळा आहे ना, त्याच्या समोरच्या लाईनीत, आरती स्टो. आणि बकूल ऑईल डेपो फेमस आहे. तीथे कोणालाही विचारलं तर कोणीहि सांगेल.

आज अखेर मेतकूट पोहे करून खाण्याचा योग जुळून आला. भाजलेले पातळ पोहे आयते मिळाले होतेच, त्यात तिखट मीठ साखर आणि भरपूर मेतकूट घालून कालवले आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घालून खाल्ले. फोडणी घातली नाही. एकदम मस्त झाले होते. आवडलेच.

आज मी मेतकुट घालून पोहे केले, कोकणातून अनायासे पोहे आलेच आहेत, ते मावेमध्ये १ मिनिट भाजले, त्यात तेल, तिखट, मीठ, मेतकुट आणि थोडे जिरे एवढंच घातले, छान झाले, आवडले मला.

रोचीन, नवऱ्याला आज आरती स्टो. सापडले, त्याने गव्हाचे पोहे आणि तांदुळाचे पफ पोहे आणले. आज मी डाळिंब्याची आमटी केली होती त्यात घालून खाल्ले, चांगले लागले, आता इतर प्रकार करून बघेन.

माझ्या साबुंच्या माहेरगावचे(हैदराबाद्जवळ) कालवलेले पोहे लिहिलेत का कोणी ऑलरेडी? त्यात मेतकूट आणि चटणीची पूड असं दोन्ही भरपूर असतं. दरवेळी भारतातून निघालो की एक मोठी पिशवी भरून कालवलेले पोहे बॅगेत असतातच.

मला मात्र दडपे पोहेच फार आवडतात. आणि मग कांदे/बटाटे/मटार पोहे इ. इ.

चटणीची पूड म्हणजे काय?

कालवलेले पोहे म्हणजे हे असे का? त्या मसाल्यालाच चटणी म्हणते आहेस का?

Pages