पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावण पोहे नाही लिहिले कुणी? Happy माझी आजी करायची. व्याप आहेत पण जबरी लागतात.
पोहे तळून घ्यायचे. चणाडाळ भिजवून, शिजवून, तिची गूळ, गोडा मसाला घालून उसळ करायची. तळलेल्या पोह्यांवर ही उसळ, भरपूर लाल ति़खट आणि आले-लिंबाचा रस घालून खायचे... स्वर्गसुख!!!
ह्या पोह्यांना हे नाव कुणी ठेवलं राम जाणे Happy

पोहे तळायचे! कमीच आहे म्हणायचा व्याप अन कॅलरीज!

गंमतीचं राहू देत पण खरंच मस्त लागत असणार हे. गणपतीविसर्जनाची आठवण येते ही डाळ पाहून. एक अत्यंत आवडता प्रकार. एक वेरीएशन म्हणजे पोहे तळायच्या ऐवजी कुरकुरीत भाजून घेता येतील... करून पहायला हवं Happy

करून बघायला हवं.

आमच्या इथे इंदोरी नमकीन नावाची आउटलेट्स आहेत. स्विगीवर आहेत. आम्हाला हल्लीच शोध लागला आहे. मस्त असतात तिथले पोहे!

ईथेही गेल्या काही काळात ईंदोरी पोह्याचे स्टॉल बरेच आढळू लागलेत.
मी कधी गेलो नाही अजून चव बघायला.
ते गार्निशिंग बघूनच ईच्छा होत नाही बहुतेक
मला पोहे किंवा अंडाभुर्जी कमी फाफटपसारा असलेले आवडतात.

मला शेंगदाण्यात पोहे आवडत नाहीत, पण पोह्यात शेंगदाणे आवडतात. मात्र ते चांगले भाजले गेलेले असले पाहिजेत. ते म्हणजे शेंगदाणे, पोहे नाही.

मलाही पोह्यात शेंगदाणे आवडत नाहीत, फोडणीच्या भातात वगैरे पण नाहीत. नवऱ्यासाठी घालावे लागतात, मी एकही खात नाही त्यातला, हा हा हा.

ते गार्निशिंग बघूनच ईच्छा होत नाही बहुतेक>>> अगदी अनुमोदन. इंदौरी पोह्यात फरसाण घालून भेळ बनवून ठेवतात.

शेंगदाणे अगदी कुरकुरीत तळलेले असतिल तर छान लागतात पोह्यात.

कोथरुडात खाल्लेले इंदोरी पोहे फार फार फार फार गोड होते.

आपले नेहमीचे वाफाळते कांदेपोहे, वरून घातलेलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि मिरगुंड ह्याला तोड नाही.
इंदोरला जाऊन ह्या पोह्यांचा स्टाॅल टाकण्याची इच्छा होते आहे.

पोह्यात शेंगदाणे देशावरचे लोकं जास्त टाकतात बहुधा.
काही ठिकाणी तर शेंगदाण्यात पोहे टाकलेले पाहिले आहेत.
आमच्याकडे कधीच नाही टाकत. ते मुळातच टाकत नव्हते वा मला पित्ताचा फार त्रास आहे म्हणून टाकत नाही याची कल्पना नाही.
मी सिंधुदुर्ग आणि बायको कराड-सातारा असल्याने हा शेंगदाणा डिफरन्स आमच्याकडे नेहमी वादाचा विषय असतो.

बाकी वैयक्तिक आवड म्हणाल तर जसे लाडवात बेदाणा वा मनुका तसे एखाद्या घासाला पोह्यात शेंगदाणा ठिक आहे. पण कांदेपोह्याचे शेंगदाणा पोहे करू नये.. दर दुसर्‍या चमच्याला येणारा शेंगदाणा वेचून बायकोच्या ताटात सरकवणे हा छळ आहे Happy

इंदोरी पोहे खाल्ले नाहीत कधी..सोसायटीच्या बाहेर च एक स्टॉल आहे.. पण कधी खायची इच्छा झाली नाही..
बटाटे पोहे आवडतात.. भरपूर बटाटे, ओले खोबरे, कोथिंबीर घातलेला. थोडासा लिंबू पिळलेला.
प्रत्येक घासाला एक बटाट्याची फोड आली पाहिजे..

पोह्यात शेंगदाणे हवेत, बटाटे हवेत, कोथिंबीर हवी, वरुन किसुन शिवरलेले ओलं खोबरं हव आणी आवडत असल्यास झिरो साईजची पिवळी शेवही हवीच सोबत लिंबाची फोड.

लिंबाची फोड कामाची नाही. लिंबू तर अख्खा पिळावा. ते सुद्धा आधी कोथींबीर टाकावी. मग लिंबू पिळायला घ्यावे. कोथींबीर तरंगेपर्यंत पिळत राहावा.

जोक्स द अपार्ट,
आमच्याकडे लिंबू आहे की नाही हे बघूनच पोहे केले जातात. नो लिंबू नो पोहे.

मुद्दा 10 आणि 11 अगदी अगदी मनाला भिडले.
नीट कांदा परतलेले, थोडा कढीपत्ता, थोडी मिरची, थोडे बटाटे तुकडे,नीट भिजलेले आणि 7 मिनिट शिजवलेले, मीठ आणि थोडी साखर घातलेले, बनवतानाच लिंबू पिळलेले आणि वर हिरवीगार कोथिंबीर घातलेले पोहे आवडतात.
पोह्यांवर सांबार किंवा चटणी टाकणे बोअर होते.
शेव घातल्यास 1 साईझ ची, 0 साईझ शेव ला स्वतःची चव नसते.
(इतके लिहिल्यावर उद्या पोहे करावे लागणारच Happy )

मी पोह्यात साखर नाही घालत. ती अगदी चिमुटभर घातली तरी मला पोहे गोड लागतात, सेम सांज्यात वगैरे. तीच चव पुढे येते.

मी पण पोहे फॅन क्लब मध्ये.
ही वाचुन आता पोहे खावेसे वाटत आहे. मला ओले खोबरे आवडत नाही पोह्या मध्ये. आणी मोहरी पेक्षा जीरे च लागते . कोथिंबीर हवीच.
फोडणीला.शेंगदाणे घातलेले पोहे मी अजुन नाही खाल्ले आहेत.

आमच्याकडे पोहे केले तर वरून (इतर) मंडळींना भाजलेले दाणे लागत्तातच, शिवाय वरून बारीक चिरलेला टोमॅटो. नाहीतर पोहे कोरडे लागतात; कितीही पाण्याचा अगदी हबका मारून शिजवले तरी. मला टोमॅटॉ - दाणे नको असतात, पण सवयीने दाणे घालून खाते. टोमॅटॉ बिग नो!!
मला साधे कांदेपोहे, कधीतरी त्यातच बटाटा पातळ काचर्‍या करून, मऊ लुसलुशीत शिजले की ताजं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इतकंच फक्त मनापासून आवडतं मला. बाकी चातुर्मासात कोबी- बटाटे - असल्यास फ्रोझन मटार, वरून तेच पुन्हा टो- दा - खो - को...

Pages