माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडं धपाट्याला पोळपटावर रुमाल अंथरुन त्यावर पाण्यावर थापतात. आणि तो रुमाल तव्यावर पालथा टाकतात , भोके पण असतात..

गर्रम चहा मधे शंकरपाळे टाकायचे आणि चमच्याने उचलून खायचे.
पोळीबरोबर केळं+ सायीचे दही + साखर
गरम पोळीला साजूक तूप + काकडीची कोशिंबिर किंवा गरम परतलेली पालेभाजी
दहीदूध भात + आमटी + भजी तर अगदी जिव्हाळ्याचा बेत आहे.
चमचमीत कांदे+बटाटे पोहे/ साबुदाणा खिचडी/ उपमा/सांजा + दही हे निव्वळ सुख आहे...

तांदळाच्या भाकर्‍यांना कोण ते नावं ठेवतंय.>>> त्यांना दहा धपाट्यांची शिक्षा फर्मावण्यात यावी. >> माझ्याकडून आणखी दहा.
तांदळाच्या भाकरीसोबत लसणीची चटणी किंवा भरल्या वांग्याची चमचमीत भाजी....आहाहा ! >>>++११

तांदळाच्या भाकरीसोबत आमलेट...ं मस्त...

आपल्याकडच्या मोसंब्यांपेक्षा आफ्रिकेतल्या मोसंब्या वेगळ्या असतात. त्या किंचीत आंबटगोड लागतात.
त्या खायची एक खास नायजेरियन पद्धत आहे. मोसंबीचे वरचे फक्त पिवळे साल काढतात, आतली पांढरी साल जराही धक्का न लावता तशीच ठेवतात, मग देठाकडची एक चकती काढून, त्या बाजूने रस चोखून पितात. त्यासाठी हळू हळू मोसंबी पिळतात. आतली साल तशीच ठेवल्याने, तिला एक मऊसरपणा आलेला असतो आणि ती अखंड ठेवल्याने, तिच्यातून रस बाहेर येत नाही.

नायजेरियातील विक्रेत्यांचे, हे सोलण्याचे कौशल्य बघत बसावे असे असते. अगदी साधा चाकू वापरून, भराभर ते मोसंबी सोलत असतात. अशी मोसंबी (बिया कापल्या न गेल्याने) जास्त गोड लागते.
मी बरीच वर्षे सराव करुन ते तंत्र थोडेफार जमवलेय (तरी त्यांच्यासारखे नाही जमत) आता अंगोलात तशीच मोसंबी मिळतात, त्यामूळे तशीच खातो मी. (इथले लोक मात्र तशी सोलत नाहीत.)

थंडगार मोठ्ठा ग्लास भर फ्रेश मोसंबीचा नाहीतर संत्र्याचा ज्यूस. घरी काढलेला. फार मस्त.
फ्रेश फ्रूट चाट.

ताजा चितळे चक्का आणि साखर. चक्का गार व फ्रेश हवा. साखरेचे बारके कण लागावेत. पुढे त्याचे श्रीखंड वगैरे करायची गरज नाही खरे तर

खोवलेले ताजे ओले खोबरे आणि साखर.

कुळथाचं पातळ पिठलं + वाफेवरचा भात
भाकरीचा पापुदरा उघडून आतमध्ये गोडा मसाला + मेतकूट + मीठ + तिखट + तेल भरून त्याचा रोल
मू. डाळीची खिचडी + साजुक तूप + उडदाचा पापड + आमसुलाचे सार + आंब्याचे लोणचे
अर्धवट सुकलेल्या चिकोड्या
उडदाच्या लाट्या
चुरमुर्‍यामधे तेल + तिखट + मिठ
ताजी बेरी
दाण्याचा कूट + साजूक तूप + बारिक चिरलेला गूळ

अनघा,
धपाटे लाटून केले जात नाहीत. धपाट्यासाठी ज्वारीचं पीठ, त्यात अगदी थोडं डाळीचं पीठ, तिखट-मीठ-हळद, कोथिंबीर घालून भाकरीसारखीच थापायची. भाजताना पाणी न लावता तेल लावून भाजायची. पीठात चांगल्या पिकलेल्या पपईचा गर, लाल भोपळा शिजवून त्याचा गर घालूनही करतात. प्रवासाला जाताना आवर्जून केली जातात. ३-४ दिवस सहज टिकतात. ही पण बहुतेक सोलापूर भागातली खासियत आहे (?).

हे घ्या, enjoy Happy

IMG_0078.jpg

आहा हा काय सुंदर बाफ ... आजारी माणसांनी वाचावा असा... अनिवार ईच्छा शक्ती ने बरे होतील सगळे स्वःनुभव सांगतोय सकाळपासुन बरं नसल्याग्त झालं होत आत्ताच घरी बाय्कोला गुरगुत्या भात करायला सांगितलाय. मि निघतो सरळ रिक्शा घरापयंत

आमच्याकडे धपाटे करण्यासाठी ज्वारी, बाजरी, कणिक अशी पिठे एकत्र घेऊन त्यात कच्चा किसलेला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची वाटून घालतात. कांद्याच्या पाण्यातच बहुतेकवेळा पिठे भिजवता येतात, लागल्यास पाण्याचा हात. लाटून किंवा थापून कसेही चालते. तव्यावर घतल्यावर जरा पाण्याचा पुसट हात फिरवायचा (पण भाकती पचवण्याइतके नाही.) आणि उलटायचा. शिळे खाण्याची पद्धत आहे, लोणी, दही, लोणचे इ. बरोबर

धपाट्यामधे आदल्या रात्रीची आमटी अथवा रस्सा भाजी पण घालतात.

ज्वारीची इतकी आठवण काढताय लोकहो, हुरडा नाय आठवला कुणाला? शेतात जाऊन करायची मस्त हुरडा पार्टी. सोबत वांग्याचं भरीत, घट्ट दही आणि रात्र संपली तरी न संपणार्‍ञा गप्पा.

आमच्या कडं धपाट्याला पोळपटावर रुमाल अंथरुन त्यावर पाण्यावर थापतात. आणि तो रुमाल तव्यावर पालथा टाकतात , भोके पण असतात..>>+१

किती त्या खाण्याच्या गप्पा. Proud
कंटाळा नाही येत.. :फिदी:दोन घास कमी खाल्लेत तर बर असतं जीवाला... (दुसर्‍याच्या).;)

परवाचा गुजराती(मुलगी) व मारवाडी(मुलगा) लग्नाचा मिक्स मेनु : ढोकळा, भेळ, फरसाण, फाफडा, गाठिया नाश्यात.. जेवणात लिट्टी, चणा बेसन लावून करी, अळू तुरिया भाजी, मूग डाळ कचोरी.. मूगाचा शिरा.. कढी......आणि काय काय...
८०% चणा व बेसन जेवणात..तेल- तूपाने लथपथलेले डिशमध्ये पडले पुढ्यात..... हरे राम हरे कृष्ण!

बर, हे इथे लिहायचे कारण ह्यातले सगळे पदार्थ खायला बरे वाटतात कधी तरी ..पण एकाच दिवशी.. नाही. Proud

फोडणीची पोळी/कुसकरा आणि गोड दही.त्या साठी मुद्दम जास्त पोळ्या करू उरवायच्या.
मिक्सर मधून न काढलेला हापूस आंब्याचा रस सोबत गरम गरम फुलके

फोडणीची भाकरी (कांदा घालून) + दही

उडदाचा पापड (भाजून कुस्करलेला) + कांदा-कोथिंबीर चिरून + मीठ-साखर : सॅलडसारखं नुसतं खायला आवडतं.

जे एम रोड वर मॅक डी वरून झेड ब्रिज कडे वळतानाच काल कॉर्नरलाच पण जे एम रोडवर एक हातगाडी उभी पाहिली त्यावर लिहीले होते 'लोणी धपाटे'.... Happy ती गाडी फक्त धपाट्यांचीच होती . चरचरीत धपाटे भाजण्याचे /तळण्याचे काम चालू होते. आसमन्तात धपाट्यांचा मंद दरवळ सुटला होता. खिशात पैसे नसल्याने काहीच करता आले नाही Sad

फोडणीची भाकरी (कांदा घालून) + दही>>> वाह!!!!!!!!!!!११

भाकरी शिळी पाहिजे. त्याला चुरुन पाणी लावुन मौ करुन भरपुर कांदा आणि तिखट घालुन मस्त फोडणी द्यायची.
गरमागरम दह्यासोबत हाणायची. Happy

गरम गरम ज्वारीची भाकरी + घोळूची भाजी किंवा भरल्या वांग्याची भाजी + कांदा +भाजलेले शेंगदाणे. तथास्तु.

बाजो,
या गाड्या आता पुण्यात अनेक ठिकाणी दिसतात. फर्गसन रस्त्यावर सागर आर्केडाच्या बाहेर, टिळक रस्त्यावर न्यू इंग्लिश शाळेसमोर गाड्या असतात. या दोन्ही ठिकाणचे धपाटे अतिशय चविष्ट आहेत. अगदी घरच्यासारखे.

अंजली, धपाटे खासच. Happy पातळ मग ते लाटलेले असोत की थापलेले ते धपाटे अन थापलेले - जाड/पातळ (आवडीप्रमाणे), मधे भोके असलेले ते थालिपीठ. सोलापूर साईडला थापून्च करत असतील, मराठवाड्यात (मला माहित असलेल्या काही भागात ) धपाटे लाटूनच करतात. लसूण, कोथिंबिर, हि.मी. घातलेले आणि लसून नसेल घातली तर ताक (बर्याचदा धपाट्यात घालतात ) . थापि जसे आदल्या दिवशीची वरन-भाजी-भात युक्त असू शकते तसे धपाट्यात काही घालता येते पण खरतर धपाटे सगळ फ्रेश वापरूनच कराव्/करतात. गावाला जाताना नेले जातात बरेचदा. Happy आजकाल ची पोरे जशी पराठे (हिंदी सिनेमाचा वाढता प्रभाव) खातात तस आम्ही धपाट्येप्रेमी. Happy

अहो बाळू जोशी, घरच्यासारखे धपाटे नको म्हणताय, बघा हं, तुमची घरवाली हे वाचेल तर नेहमी बाहेरचेच खायला पाठवेल Wink

मधे भोके असलेले ते थालिपीठ<<<
असं काही नाही. आमच्याकडे थालिपीठाला भोकं पाडत नाहीत.

Pages