माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा. पातळ ज्वारीच्या भाकर्‍या सोलापूराकडेच मिळतात, असे काही नाही. मी ज्वारीच्या पातळ भाकर्‍या कोल्हापूर-बेळगाव्-धारवाड्-सोलापूर्-विजापूर-मुधोळ-गदग्-कोप्पळ्-बेळ्लारी-रायचूर्-बिदर अशा कित्येक गावातून खाल्ल्या आहेत. ज्वारीच्या भाकर्‍या या उत्तर कर्नाटक आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधे जास्त फेमस आहेत. घरोघरी सकाळची सुरूवात या भाकर्‍या बडवण्यापासून होते. आमच्या अख्ख्या घराण्यामधे ज्वारीच्या भाकर्‍या न बडवता येणार्‍या आम्ही तीनचारच माहेरवाशिणी आहोत. गावाकडे गेलं की यावरून आमची अजून चेष्टा होते.

ज्वारीच्या भाकर्‍या सर्वत्रच बडवल्या जातात. पातळ बडवण्यासाठी वेळेची नाही पण कौशल्याची आणि सवयीची गरज असते. ज्या लिंगायत खाणावळीचा मी वर उल्लेख केला आहे तशा ठिकाणी जेवणाच्या एक किंवा दोन बायका भाकरी बडवत असतात. बाहेर लोकाना त्या "ऑन डिमांड" मिळतात इतक्या वेगाने थापल्या जात असतात. या बायकांना भाकर्‍या बडवताना बघायचे. अगदी तालात लयीत बडवत असतात. आमची आत्या एकेकाळी सकाळी पन्नास आणि रात्री चाळीस भाकर्‍या बडवायची.

पण या भाकर्‍या कडक नसतात, चपातीपेक्षा जास्त मऊसूत असतात. कडक भाकर्‍या करण्यासाठी भाजलेली भाकरी चुलीमागे ठेवून देतात. सगळा स्वैपाक होइस्स्तोवर चुलीच्या मंद आचेने त्या भाकर्‍या कडक होतात. अशा कडक भाकर्‍या आठवडा पंधरादिवस सहज टिकतात.

तांदळाच्या भाकर्‍या अथवा ज्वारीच्या भाकर्‍या दोन्ही माझ्या आवडत्या आहेत. फक्त उत्तम रीतीने बडवलेल्या आणि "आयत्या ताटात येऊन पडणार्‍या" हव्या. Proud

हो ना, तशा भाकर्‍या हॉटेल मधूनच केल्या जातात. कोल्हापूरला कलेक्टर बंगल्याच्या गल्लीत, एक बांबू हट (बहुतेक) नावाचे छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्याकडे भाकरी, मटकीची उसळ, पिठले, दही असे मोजकेच पदार्थ मिळतात. त्यांच्याकडे स्वतःची गिरणीपण आहे. तिथेही दोन बायका भाकर्‍या करत असतात. त्या अगदी टम्म फुगलेल्या अशा असतात. इतक्या सुंदर फुगलेल्या असतात कि दोन क्षण त्या मोडायचा पण धीर होत नाही.

(आधी हाताला चटके, या गाण्यात भाकरी भाजणार्‍या रत्नमालाबाई, प्रत्यक्षात पण सुंदर भाकर्‍या करत असत, असे दुर्गाबाईंनी लिहून ठेवले आहे.)

माझ्या आजोळी पुर्वी मक्याची भाकरी असायची. ती पचवायला थंड हवामानाची गरज असते.
मलकापूरच्या कोबीची भाजी, किंवा तिथल्याच शेतातल्या वांगी पावट्याची उसळ आणि हि भाकरी.. वा !

ज्वारी बाजरीच्या पातळ मऊसूत भाकर्‍या कधी बघितल्या नाहीत काय? की करता येत नाहीत कुणाला?
<<<<<<<

आम्हाला तांदुळ, ज्वारी, बाजरी, नाचणी , अजुनही जेवढे असतील तेवढया सर्व धान्य प्रकारांच्या पिठाची मउसूत भाकरी बनवता येते हो..... पण दिपीकाचे बारीक असणे व श्रीदेवीचे बारीक असणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक तांदुळ व ज्वारी-बाजरीच्या भाकरांच्या पातळ असण्यात आहे , आम्हाला तर बाई दोन्ही आवडतात..... पण तांदुळाची भाकरी ही भाकरीच नाही, रबर लागते, कशीतरी पर्याय नाही म्हणुन संपवावी लागते असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी अस्सल तांदळाची भाकरी खाल्लीच नाही किंवा करता येत नाही असे समजावे

भरपूर शिळं जेवण उरलंय? रात्रीची चपाती, भाजी, भात, आमटी, भाकरी वगैरे..?
एवढं जेवण फेकून द्यायचं? छ्या!
मग?
मग 'वडे' बनवायचे,
सगळा शीळा मालमसाला एकत्र घ्यायचा, कुस्करायचा. चपाती-भाकरी सरळ मिक्सरमध्ये बारीक करायची. त्याच चवीपुरते मीठ, थोडासा गरम मसाला, गूळ (१०-१५ वडे बनवायचे असतील तर लिंबाएवढा गूळ घायचा), चिरलेला कांदा, तांदळाचं पीठ वगैरे टाकून दहा-पंधरा मिनटे मुरु द्यावं. (असलंच तर थोडंसं ताकही मिसळावं) मग दुधाच्या पिशवीवर, तेलावर हाताने थापून वडे बनवायचे अन् सोडायचे गरम तेलात! वड्यांसोबत छोले वगैरेची लथपथ भाजी!

एकदम 'झक्कास' लागतात हे वडॅ!

हो ना, तशा भाकर्‍या हॉटेल मधूनच केल्या जातात.>> नाही, उलट हॉटेलामधून मिळणार्‍या भाकर्‍या जाड असतात, पातळ भाकर्‍या बडवणे हे सरावाचे काम आहे.

मला कुठल्याच भाकर्‍या करता येत नाहीत आणि त्याने कणभरही कमीपणा वाटत नाही. प्रयत्न करून शिकेन की नाही तर तेही माहित नाही.

बाकी हिच अस्सल म्हणत इतक्या लोकांनी मला तांदळाची भाकरी खायला लावलीये की आता मला प्रयोग करण्यात आणि तो चिकट गोळा चावत बसण्यात इंटरेस्ट उरला नाही. त्यामुळे ती भाकरी नाही, रबर असते आणि पर्याय नाही म्हणून संपवावी लागते या माझ्या मतात आता बदल घडणे अवघडच. पण तुम्हाला इतकं का टोचतंय?

dreamgirl >>>> Happy

मला अजून एक गोष्ट आवडते उडदाचा पापड भाजून चुरा करायचा त्यात तिखट, मीठ, कच्चे तेल, कांदा बारेक कापून टाकायचा आणि कोणत्याही बाजारी, ज्वारी, नाचणी, तांदूळ भाकरी किवा पोळी (चपाती) बरोबर खायचा मी व्हेजिटेरियन असल्याने हे उपद्व्याप Wink

नॉनव्हेजवाले त्यात बारेक सुकट भाजून टाकून खातात पापडा एवजी Happy त्याला खरोणी म्हणतात

नॉनव्हेजवाले त्यात बारेक सुकट भाजून टाकून खातात पापडा एवजी त्याला खरोणी म्हणतात>> अगदी अगदी खारोणी/ खारवणी म्हणतात. झटपट तोंडी लावणं.

@ नीधप

तुम्हाला भाकरया येतात की नाही किंवा त्या येत नाहीत म्हणुन कमीपणा वाटायला हवा असे तुम्हाला कोणीही विचारले नाही उलट तुम्हीच प्रश्न केलात की अश्या पातळ भाकरया बघितल्या नाहीत की करता येत नाही कुणाला?

बाकी टोचत वगैरे काही नाही हो , लहानपणापासुन आईच्या हातच्या चांगल्या मउसुत तांदळांच्या भाकरीची चव चाखली आहे, तिला देखील तिच्या नोकरीमुळे रोजच्या रोज करुन घालता आल्या नाहीत पण ज्या ज्या वेळी तिने केल्या तेव्हा कधीही तिची भाकरी रबरी,चिकट गोळा झाली आहे असे झाले नाही..... माझ्या साबा देखील नाश्टयाला तांदुळाच्या भाकरया उत्तम करतात .तुम्हाला आलेल्या अनुभवांचा व त्यामुळे तुमचे जे काही मत बनले आहे त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही, ते तुमचे वैयक्तिक मत आहे व त्याचा मला आदरच आहे.

सकाळचा १ ऑफ द बेस्ट नाष्टा आयटम,

गरमा गरम लिंबु मारलेले पोहे, वरती कोथिंबीर, खिसलेले खोबरे, बारीक शेव आणि यावर सांबार किंवा कट...

पण दिपीकाचे बारीक असणे व श्रीदेवीचे बारीक असणे यात जेवढा फरक आहे
>>> Rofl
यावरू दादा कोंडके विच्छा माझी पुरी करा मध्ये करीत असलेला एक विनोद आठवला. दादाना विचारतात की 'कटी' आणि 'कंबर' यात काय फरक आहे. तेव्हा दादा साभिनय सांगतात" अरे हेलनची ती कटी आणि जयश्री गडकरचं त्ये कंबाsssssss र........"

माझा एक मित्र गरम मसालेभाताबरोबर चपाटी लावुन खातो. त्याला म्हणे तेच आवडते.

माझा एक मामेभाऊ पोळी आणि कॅडबरी, पोळी आणि मीठ खाय्चा.. असो..

पातळ पोहे भाजून त्यावर कच्च तेल, ओलं खोबर नि खाराची मिर्ची (मिर्च्यांचं लोणच) घालायची.. हा तोंपासु नाश्ता २ मिन्ट्स नुडल्सपेक्षाही कमी वेळात तयार होतो..

यावरू दादा कोंडके विच्छा माझी पुरी करा मध्ये करीत असलेला एक विनोद आठवला. दादाना विचारतात की 'कटी' आणि 'कंबर' यात काय फरक आहे. तेव्हा दादा साभिनय सांगतात" अरे हेलनची ती कटी आणि जयश्री गडकरचं त्ये कंबाsssssss र........" <<<<<<<<

Lol

त्यात पुन्हा हेलनची ती कटी म्हणतानी हाताचे तळवे उभे जवळ जवळ आणायचे आणि जयश्री गडकरचं त्ये कंबार म्हणताना ते तळवे एकदम एकमेकापासून दूर पसरून त्याची 'व्याप्ती' दाखवणारी अ‍ॅक्शन Proud

अवाकाडो अर्धा कापायचा, त्यातली बी काढायची त्या खळग्यात साखर आणि चमचाभर दूध टाकायचे. मग चमच्याने हळू हळू गर उकरत एकजीव करायचा, आणि खायचे. आमच्याकडे अवाकाडो मुबलक असल्याने, हा अगदी नेहमीचा प्रकार.

तिखट आणि मीठ एकत्र करुन एका तळव्यात घ्यायचे, दुसर्‍या हाताने झाडावरच्या पोपटी बिमल्या तोडून, त्यात बुडवून एका घासात खायच्या. दुसरा घास घ्यायला किमान अर्धा मिनिट धीर धरावा लागतो.
डोंगरी आवळे असेच खायचे आणि वर पाणी प्यायचे.

कच्च्या चिंचा, शेकोटीत भाजून.. हा लता मंगेशकरचा देखील आवडता खाऊ होता >> मी कधी खाल्ल्या नाहीत. पण लताला आवडतात मग आता खाऊन बघणार.

नी ,
मला पण भाकरी आवडते खूप (ज्वारी, तांदूळ दोन्ही) पण अजिब्बात जमत नाहीत. एकदा गव्हाच्या पीठाच्या भाकरी करण्याचा दिव्य प्रकार मी आणि माझ्या मैत्रिणीने आईच्या अनुपस्थितीत केला होता Proud

केदार.......उडदाचा पापड भाजून चुरा करायचा त्यात तिखट, मीठ, कच्चे तेल, कांदा बारेक कापून टाकायचा आणि कोणत्याही बाजारी, ज्वारी, नाचणी, तांदूळ भाकरी किवा पोळी (चपाती) बरोबर खायचा.... हे माझ्याही खुप आवडीचे.
dreamgirl..... हो ग हो. तुझ्या आवडीचे बरेच प्रकार माझ्याही आवडीचे आहेत्....वालाची खिचडी, तुप, पापड, लोणचे..... आता श्रावणात होईलच.. सोडे भात, पावसाळ्यात मिळणारी करंदी त्याचा भात, बोंबील...... आता एकदा पावसाळ्यात भारतात यायला पाहीजे.....करंदी, बोंबलासाठी
पुरणपोळी +तुप
पातळ पोहे कुरकुरीत भाजलेले त्यात कच्चे तेल, भरपुर लाल तिखट, मीठ, साखर मग हे सर्व एकत्र करुन हाss हुsss करत खायचे.
जेजुरीला देवदर्शन करुन खाली आल्यावर एका घरगुती खाणावळीत आम्ही जेवत असु.... गरमागरम भाकरी+ वांग्याची भाजी+ आमटी +भात+ तुप .... काय मस्त जेवण असायचे.... खुप वर्ष झाली या गोष्टीला अजुनही तसेच जेवण मिळते कि नाही ते माहित नाही.
लसुण घातलेला फोडणीचा भात त्याबरोबर तळलेले ओले बोंबील.

गरम इडली, मोठ्या वाडग्यात मग त्यावर वाफाळते सांबार आणि थोडेसेच पांढरे लोणी.
साखि आणि ताक/ दही
कडक दोसा आणि वर कोरडी चटणी आणि पांढरे लोणी.
मक्याचे दाणे व भाजलेले शेंगाचेदाणे फोड्णीस टाकून.
गरम उपमा/ पोहे व शेव.
क्रिस्प मेदू वडा चट्णी.
क्रिस्प केलेला मलबार पराठा व बटर चिकन. लिंबू, कांदा
चीज ऑमलेट व ब्रेड, ऑरे़ज ज्यूस
बटाटा किसून घातलेले साबुदाणा थालिपीट. , दही साबुदाणा, वर्‍याचे तांदूळ आमटी, उपासाची भाजी बटाट्याची
कढी भात./ व्हेज पुलाव आणि दही रायते
खारी बुंदी व दही. चकली, भाज्णीचे कडबोळे व दही.
पर्फेक्ट चिकन सँडविच. ग्रिल्ड प्रॉन्स - हिरवी चटणी.
बरोबर उत्तम पुस्तके नाहीतर विनोदी वेबसाइट.

त्यांना दहा धपाट्यांची शिक्षा फर्मावण्यात यावी>>>>

ह्यावरुन धपाटे आठवले.

नागपंचमीला आणि श्रावणातल्या मंगळवारच्या उपासाला आई धपाटे बनवायचे. दिसताना थालिपिठाचा भाउ आहे हा पदार्थ. हिरव्या मिर्च्या चेचुन घालुन केलेला गरमागरम धपाटा दह्यासोबत खायला जगात भारी प्रकार.

ह्याच धपाटे प्रकारामुळे मला शालेत असतानाचा एक सुविचार कळलाच नव्हता.
"गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे" Uhoh
मला तर धपाटे कधी टोचले नाहीत खाताना अस वाटायच. Biggrin

धपाटे आणि थलिपीठ यात रिअली काय फरक आहे की खेड्यात ज्याला धपाटे म्हणतात त्याला भद्रजन थालीपीठ म्हणतात?:अओ:
?

धपाटे आणि थलिपीठ यात रिअली काय फरक आहे की खेड्यात ज्याला धपाटे म्हणतात त्याला भद्रजन थालीपीठ म्हणतात?>>>

मला वाटतं की पीठात फरक आहे. धपाट्यांचं पीठ हे आहेत ती पीठं एकत्र करुन मळतात. तर थालीपीठ हे विशिष्ठ प्रमाणात धान्य घेवुन मग एकत्र दळतात. तसच धपाट्यांना मधे किंवा आजु बाजुला भोक करत नाहीत. थालीपीठाला भोक ठेवावे लागते.

मी धपाटे एक-दोन वेळाच खाल्लेत. थालीपीठ महिन्यातुन २/३ वेळा तरी खातेच. आर्थात मी फक्त ज्वारीच्या पीठाची थालीपीठं करते. तीही एकदम कमी तेलात. (भाजणीची थालीपीठं घशाशी येतात हल्ली मला.)

बाजो, धपाटे लाटण्याने लाटून करतात अन थालिपीठे थापून . धपाटे थालिपीठापेक्षा पातळ असतात. ते पराठ्यांप्रमाणे तेल सोडून भाजतात. थालिपीठ एका बाजूने झाकण ठेवून, दोन्ही बाजूंनी तेल सोडून करतात.

Pages