क्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा)

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 May, 2012 - 11:13
cranberry sauce
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
crnb_pkt.jpgcrnb_sz.jpg
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून

(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)

क्रमवार पाककृती: 

१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
crnb_wash.jpg
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्‍याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
crnb_mush.jpg
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.

cr_sauce.JPGcran.JPG

७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)

अधिक टिपा: 

नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)

माहितीचा स्रोत: 
एक ज्येष्ठ मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच बनवले आहे....

आगदि मस्स्स्त लागत चविला............ आता अजून करून ठेवीन

खुप खुप धन्यवाद

रेसिपी आणखी फूलप्रूफ करण्यासाठी मीठ मोजून घालून पाहिलं. एक टीस्पून बरोब्बर पुरतं.

सालाबादप्रमाणे आज केला. रेसिपी फूलप्रूफ असल्यामुळे मस्तच झाला हे सांगायला नकोच.

मागच्या वर्षी माझ्याकडच्या मोठ्या पार्टीला केला होता. प्रचंड आवडला सगळ्यांना. तेव्हा मी ही रेसिपी शेअर केली होती आणि सभासद होऊन इथे प्रतिसाद लिहा असंही सांगितलं होतं. एकीनंही ऐकलं नाही. ( सगळ्या मेल्या फेबुवर रोमन देवनागरी लिहीत पडीक असतात.) तर आता प्रत्येक पार्टीला या सॉसची मागणी असते आणि गरजेपेक्षा दुप्पट आण अशी नम्र ( का हावरट? ) विनंती पण! तर स्वाती, तू आमचे गावाला येणे केलेस तर भरघोस स्वागत नक्की.

धन्यवाद!! Happy
रेसिपी माझी नाही, इथे पोस्ट करण्यापलीकडे माझं काही श्रेय नाही - मी या साखळीतली एक कडी आहे फक्त. Happy

वीकेंडला या सीझनचा पहिला सॉस केला. एका मैत्रिणीकडे नेला तर त्यांना खूप्पच आवडला आहे. मैत्रिणीच्या आईला साखरेवर थोडा ताबा ठेवावा लागतो. तर यात साखरेऐवजी दुसरं स्वीटनर घालता येइल का? मी एरवी रॉ ब्राउन शुगर घालते.

अगव्ही नेक्टर चालायला हवं - ते घातल्यावर सॉस पातळ होईल हे लक्षात घेऊन आधी जास्त घट्ट/कोरडा शिजवावा लागेल बहुधा.

मीही रविवारी केला, यावेळी साखर कमी (पाऊण कप) घातली - तेवढी पुरेशी वाटली.

अगव्ही नेक्टर >>> ओके. एक बॅच करून बघते.

मी नेहमीच पाऊण कप घालते. भल्या माणसानं रेसिपी दिली की त्यात स्वतःचं घोडं दामटलंच पाहिजे Wink

काल अचानक डे ऑफ मिळाल्याने, पहिल्यांदा करून बघितला. मस्त झालाय एकदम Happy धन्यवाद!
आज ईथे सांगावं म्हणून आले, तर आपोआप धागा वर आलेला दिसला! सगळीकडे एकाच वेळी क्रॅनबेरीज आल्या वाटतं
Screen Shot 2017-10-10 at 12.49.10 PM.png

ह्या सिझनचा सॉस आज केला. १२ Oz च्या ऐवजी थेट 32 Oz च्या कोस्कोवाल्या पाकिटाचा करून टाकला म्हणजे परत पतर करत बसायला नको आता. बाकी घटकांचे प्रमाण अडीच पट घ्यावं का असा विचार करत होतो पण साखर आणि तेल दुप्पटच घेतले. मेथ्या आणि तिखट अडीचपट घातलं. छान आली आहे चव. तीन लहान बरण्या भरल्या. एक पुण्याला पाठवून द्यावी का विचार करतो आहे, फक्त बॅगेत उघडून बॅग क्रॅनबेरीमय व्हायला नको !

रेसिपीकरता (पुन्हा एकदा) धन्यवाद. Happy

पराग +१

माझी एक १२ औंस ची बॅच करून झाली आहे. आईला खूपच आवडलाय हा प्रकार, विशेषतः पराठ्याबरोबर खायला. तिच्याबरोबर बरणी पाठवावी असं वाटतंय पण सांडला तर प्रॉब्लेम. कोणी यशस्वीरीत्य हा सॉस भारतात नेला असेल तर लिहा जरा!

तीन चार फ्रीझर झिपलॉक मधे घालून पाठवा. पहिल्या झिपलॉकचं तोंड दुसर्‍या झिपलॉकच्या बॉटमला येईल असं घाला. त्याभोवती बबलरॅप लावा. क्रॅनबेरी सॉसची बाटली जगप्रदीक्षणा घालायला तयार होईल.

मागच्या वर्षी अडीचपट केला होता. दुप्पट तेल फार झाले. तेल आटलं नाही म्हणून थोडं काढून बाजूला ठेवलं. पूर्ण सॉस शिजवून घेऊन मग त्यात तेल घालून शिजवले तर पटकन शिजले. यावर्षीचा अजून व्हायचा आहे. ६४ oz करावा लागेल. लोकांना ख्रिसमस भेट म्हणून देणार.

मी करुन पाहिला आज, झटपट तयार झाला ! चव आणि रंग दोन्ही केवळ अप्रतिम! मेथी दाणे आणि पूड मुळे मेथी चा स्वाद छान आलाय. मी वर लिहिलेले सगळे घटक पदार्थ घातले, optional and required both.

नवर्‍याने ह्युस्टनहून क्रॅनबेरी सॉस आणला आहे ज्यात चिली फ्लेक्स आणि पिकान्स आहेत. मस्त चव आहे त्याचीही.

माझा यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग तीन वेळा करून झाला आणि स-ग-ळा वाटण्यात संपला. शेवटची बॅच १२ औंसाची दोन पाकिटांचा एकदमच केला. मी पण दुप्पट प्रमाण नाही घातलं तेलाचं आणि साखरेचं. तिखट मात्र ऑन-डिमान्ड दुप्पट घातलं.

यंदा हा साॅस इन्स्टंट पाॅटमध्ये केला. फोडणीवर नुसत्या निथळून घेतलेल्या क्रॅनबेरी टाकल्या, पेपर टाॅवेलने पुसून घ्यायची गरज नाही. मीठ, मसाला आणि १/४ कप क्रॅनबेरी ज्यूस टाकला. ( ॲपल किंवा आॅरेंज ज्यूस टाकला तरी चवीत फरक पडेल असं वाटत नाही) प्रेशरवर ३ मिनिटं शिजवून प्रेशर खाली आल्यावर झाकण उघडून क्रॅनबेरी पोटॅटो मॅशरने ठेचल्या. अजिबात पाणी सुटलं नव्हतं. मग परत साॅटे मोडवर चालू केला पण त्या तपमानावर पोचायच्या आधीच मिश्रण खदखदायला लागलं , मग इन्स्टंट पाॅट आॅफ करून ब्राऊन शुगर घातली. मूळ रेसिपी छान आणि सोप्पी आहे आणि इन्स्टंट पाॅटमध्ये केल्याने अजूनच सोप्पी झाली.

मध्यंतरी हा धागा वर आला होता तेंव्हापासून हे करायचं मनात होतं . हल्ली मुलगी सगळं वाणसामान, भाजीपाला ऑनलाइन ऑर्डर करते . पण ह्या फ्रेश क्रॅनबेरी मिळतच नव्हत्या ऑनलाईन. आता सीझन संपायची वेळ आली. काल शेवटी मीच गेले बसने दुकानात आणि घेऊन आले.

रात्री लगेच केला . क्रॅनबेऱ्या धुवून कोरडया करून घेतल्या होत्या आणि पातेलं ही मोठं घेतलं होतं त्यामुळे जरा ही बाहेर उडल्या बिडल्या नाहीत . उलट त्या पॉप होताना बघायला मजाच आली . सॉस मस्तच झाला . रंग चव आणि consistency सगळं बेस्ट जमलं . मी बाटलीत भरतानाच खूप हाणलाय. मस्तच झालाय. आज सकाळी टोस्ट ला लावून मुलांना दिला . त्याना पण सॉलिड आवडला .

ह्या ट्रिप मध्ये हा सॉस करायचं खूप मनात होतं . म्हणून तो केला आणि आवडला सगळ्याना म्हणून खूप छान वाटतय.
स्वाती, ह्या भारी रेसिपी साठी खूप खूप धन्स.

हा फोटो

IMG_20171224_105044.jpg

२०१८ चा नोव्हेंबर उजाडला. बाजारात क्रॅनबेरीज आल्या. आज हा सॉस केला . धागा वर आणला.

परागचा प्रतिसाद वाचून मी पण कॉस्टकोतल्या २ पौंडाच्या सगळ्या पाकीटाचा केला. तेल आणि ब्राऊन शुगर दुप्पट घेतली. तरी तेल जास्त वाटलं, म्हणून जवळजवळ अर्धा कप काढून टाकले.

सॉस अफलातून मस्त झाला आहे हे सांगायला नकोच. ख्रिसमस होईपर्यंत य वेळेला करावा लागणार आहे. गिफ्ट म्हणूनही वापरणार आहे.

स्वाती धन्स पुन्हा एकदा!

काल भाजी आणायला गेलो तिथे हे करवंद समजून कॅनबेरीचं पाकीट घेतलं गुळांबा करायला. पण नक्की करवंद आहेत की नाही शंका आली दिसायला तरी अगदी डीट्टो करवंदच. नेहमी केल्या जाणार्या पाक्रु धागा वाचताना स्वातीची ही रेसिपी दिसली. डीट्टो तेच पाकीट होतं कॅनबेरीच मग काय दिली सद्गती ! रंग, चव सु रे ख आणि झटपट विनासायास ! बरण्या तर नेता नाही येणार एअर टाईट डब्यांमध्ये घेऊन जाईन. थ्यांकु स्वाती image_1.jpeg

Pages