क्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा)

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 May, 2012 - 11:13
cranberry sauce
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
crnb_pkt.jpgcrnb_sz.jpg
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून

(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)

क्रमवार पाककृती: 

१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
crnb_wash.jpg
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्‍याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
crnb_mush.jpg
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.

cr_sauce.JPGcran.JPG

७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)

अधिक टिपा: 

नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)

माहितीचा स्रोत: 
एक ज्येष्ठ मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षीचा घाणा केला. पुन्यांदा धन्यवाद स्वाती आंबोळे. फार म्हणजे फारच हँडी पडते ही चटणी. मागच्या वर्षी ३४ ओंस केला होता... तो अगदी दोन चमचे उरलाय... मस्त टिकला. प्रिझर्व्हेटिव्ह नसल्याने फारच मस्त..

क्रॅनबेरीचा हा देशी पदार्थ म्हणजे इथल्या पाकक्रियांचा क्राऊन ज्यूल अर्थात मुकुटमणी आहे!
महिना दोन महिनाभर मिळणार्‍या ताज्या क्रॅनबेरींचे चीज होते!

मागच्या हिवाळ्यात आम्ही उसगावात होतो. तेव्हा तिकडे जायच्या आधी मी इथून ठरवूनच गेले होते की स्वातीच्या रेस्पीने हे करायचंच.
तिकडे हा पदार्थ खाल्ल्यावर सगळ्यांना आवडला मग मी इतक्या जणींना याची दीक्षा दिली.........आता या हिवाळ्यात मला इकडे खबर येतेय कुणी कुणी केला हा क्रॅनबरांबा!
छान वाटतय!

हा सॉस केला परवा.. चव आणि रंग दोन्ही मस्त एकदम !! अर्धा संपला पण..
मेथांब्यासारखी चव आहे बरीच.. त्यामुळे आवडली कदाचित..

रेस्पी इथे दिल्याबद्दल धन्यवाद.. Happy

क्रॅनबेरी सीझन संपत आल्यावर का होइना पण एकदाचा केला हा सॉस. पाकिटांचा करू नये असा सल्ला मिळाल्याने एका छोट्या डब्याचा केला. भारी झाला आहे. करायला सोपा आहे तसा, मी उगीच घाबरत होते.

आज प्रथमच केला. सुरेख स्वाद आणि रंग आहे. एकदम व्हर्सटाईल चव आहे. ख्रिसमसला या सॉसच्या बरण्या भेट देता आल्या असत्या :).

परवा आणलेल्या क्रॅनबेरीज पावन झाल्या एकदाच्या. आधीच्या बॅचपेक्षा जास्त आंबट असाव्यात कारण सॉस एकदम चटपटीत आंबटगोड झाला आहे.

फोटु

photo(1)_0.JPG

खूप म्हणजे खूपच छान!!
अर्धा संपवला सुद्धा :-प

आता विचार करतेय ट्राय करु का स्टॉप न शॉप मध्ये एकदा, मिळाल्याच अजून क्रॅन्बेर्या तर कित्ति कित्ति रेस्प्या आहेत ट्राय करायला...

धन्यवाद!

आज केला. इंग्रोमधे पहिल्यांदाच हे पाकिट दिसले लगेच ही रेसिपी मनात आली. खूप धन्यवाद या वेगळ्या आणि सोप्या कृतीसाठी.
मस्त लागतोय चवीला. मी थोडा गुळ थोडी साखर असं घातलंय.

हा एक जगात भारी प्रकार आहे.. एकदा ताज्या बेरीज वापरुन केल्यावर खुपच आवडला म्हणून परत करायचा घाट घालुपर्यंत सीझन संपला होता. मग न राहवुन फ्रोजन वापरुन केल्या. चवीत थोड़ा फरक होता पण इतकी चटक होती की फ्रोजनच्याही 2-3 बॅच झाल्याच! Proud

cran.JPG

मी ही ३२ औंसचा केला. मला वर्षभर पुरतो. फ्रीजमधे छान रहातो. दिवाळी पार्टीतला हिट आयटम होता.

या सिझनचा पहिला सॉस केलाय, नेहमीप्रमाणेच झकास जमलाय...
स्वाती, तुला अनेकनेक धन्यवाद...बेस्ट रेसिपी आहे

कसली भारी रेसिपी आहे ही!
माझी अर्धा कप तेल घालायची हिंमतच झाली नाही, रविवारच्या आस्वपूमध्येच वेळ काढून करताना जिर्‍याची पूड घरात नसल्याचे लक्षात आले, ताजी करायला वेळ नसल्याने ती घातली नाही- पण सॉस झकास जमला आहे. मेथीदाणे वापरले. लाईट ब्राऊन शुगर वापरली. हा सॉस पोळी, पराठयासोबत भराभरा संपतोय!

Pages