लेमन राईस (लिंबू भात)

Submitted by नीधप on 12 August, 2011 - 02:41
lemon rice
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

हि तयारी
lemonrice1.jpg

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

या फोडण्या
lemonrice2.jpg

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

lemonrice3.jpglemonrice4.jpg
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. Proud

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, मस्त आहे पाकृ. Happy
जागू, गजानन, फोटो आणि भात दोन्ही मस्त दिसतायेत. Happy

मी जरा बदल करून केला होता भात परवा. जेवायला येणार्‍या पाहुण्यांची फर्माईश पोटॅटो राईस होती आणि मला ही कृती वाचल्यापासून लेमन राईस करायचा होता. मग म्हटलं चला आज पोटॅटो लेमन राईस करुयात.
दिड कप तांदूळ धुवून भिजत ठेवला अर्धा तास. मग त्यात मिठ घालून कच्चा शिजवून घेतला. गाळणीत गाळून थंड पाण्याखाली जरावेळ धरला.
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कोथिंबीर, बारीक चिरून हिरवी मिरची वापरली.
ही फोडणी, जरासे मिठ, केशरपाणी, लिंबूरस भातावर टाकून चांगले मिसळुन घेतले. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकून त्यावर बटाट्याच्या चकत्या पसरवून त्यावर अर्धा भात पसरवला. त्यावर लिंबाच्या पातळ चकत्या करून पसरवल्या. त्यावर राहिलेला सर्व भात पसरवला. पातेल्यावर स्वच्छ रुमाल टाकून घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर १०-१५ मि. भात ठेवला.
जेवणापुर्वी ५ मि. आधी ताटलीत पालथा मारला. मग लगेच फोटो काढला. जरासा मधे उकरून दुसरा फोटो काढला आणि नीरजाची आठवण काढत भातावर ताव मारला. भाता सोबत छोले होते. पण त्यात भाताचा स्वाद प्रत्येक घासाला जाणवत होता.
नी, एवढी छान कृती ईथे दिल्याबद्दल धन्यवाद.

bhat.jpgbhat_1.jpg

अगं म्हणता म्हणता मस्त रेसिपी दिलीस की.
पॉटेटो राइस हे मी पहिल्यांदाच ऐकलंय. असंच करतात की अजून काही वेगळी रेसिपी आहे. तपशीलात सांग ना जरा.

पॉटेटो राइस हा असाच करतात. त्यात केशर सढळ हाताने वापरतात. एक कुठलेसे इराणी स्पाईसपण टाकतात त्यात.

मी कालच केला होता लेमन राईस. फक्त बदल म्हणजे शेंगदाणे शिल्लक नव्हते, पण काजूगर होते. तेच घातले. मस्त झालेला!

मी दुरंगी केला. हिरव्या फोडणीमधे हळद नाही घातली.दुसर्‍या फोडणीमधे घातली.ओले खोबरे घरी नव्हते,सरळ कीस घातला सुका.काजू पण घातले. आणि लिंबं नसल्यामुळे चकत्या नाही घातल्या.(पुढच्या वेळी नक्की घालीन Happy ) पण तरीही खूप छान झाला, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लेकीला आवडला. अजून काय हवे?

नी, आज मी पण तुझ्या पद्धतीने लेमन राईस केला. हिरव्या फोडणीत मिरच्या व हळद घातली आणि लाल फोडणी बिन हळदीची, काश्मीरी लाल तिखट घालुन केली. खुपच मस्त झालेला. घरातल्यांना सगळ्यांनाच आवडला.

परदेशातल्यांसाठीची लिंबाची सूचना तंतोतंत पाळली.<<
त्या हिरव्या लांबुडक्या लिंबांची चव थोडी वेगळी उतरते (हीच ती लिंबे जी ट शॉ बरोबर जास्त चांगली लागतात! Wink ). मी हे तिथे असतानाच करायला शिकले आणि तिथेच य वेळा केला त्यामुळे कधी पिवळी तर कधी हिरवी लिंबे मिळत त्यात भागवलं जाई. शेवटी पिवळ्या प्लास्टिक बॉटलमधला रस घ्यायचा आणि हिरव्याच्या चकत्या ह्या कॉम्बोवर टिकमार्क झाला. Happy

नी.......ये "ट शॉ ट शॉ" क्या है?........नाही म्हणजे पुढे एक मारलेला वगैरे डोळा दिसतोय!
"ट शॉ" म्हणजे काय गं नी?(दारू म्हणजे काय रे भाऊऊऊऊऊऊउ? च्या चालीवर!!)
असो पण इथली जी पिवळी लिंबं असतात(लाइम) त्याचा स्वाद फार मस्त असतो.

अरे.. इतकी लिंबं घालत्यावर भात आंबटढाण होत नाही का ?

बाकी नीरजा ऐकत नाही हा ! (बहूतेक) पहिलीच रेस्पी आणि १५० पोस्टी !!!!! Proud

पराग ..न करता कृपया शंका काढू नयेत, स्वता: करून बघणे !(दिवे घे रे बाबा!)
नाही होत आंबट. मस्त होतो. अर्थातच चव थोडी आंबटावरच असते. ज्याला चटकमटक आवडते त्यालाच आवडेल.
(हे पहा मी करून, दु सर्‍याला खायला घालून मी स्वता: खाऊनम मगच बोलते.)

अरे हे काय आहे? माझ्या नवर्‍यासारखी मी ना भातवेडी आहे ना आंबटशोकीन... पण तरी नुसते फोटो पाहून मला आत्ताच्या आत्ता पाहिजे हा लिंबू भात! साबांच्या भाषेत 'जीभ खवळलीच' माझी..
आजचं Saturday lunch नवर्‍याला लक्षात राहिलंच पाहीजे! नाही राहीलं तर मी 'नी'चंच नाव पुढे करणार. Wink

रेस्पी तिसरी आहे पग्या. (पहिली उडवली). खतखत्याला पण भरपूर पोस्टी आहेत पण ते ले रा इतके सोप्पे नसल्याने सगळ्यांनी लगेच करून बघितले नाही इतकेच. अर्थात तिथे उलटं ऑथेन्टिक खतखत्याच्या बर्‍याच रेस्पी आल्यात. Happy

गजाभौ, स्पेशली तुमची प्रतिक्रिया वाचायला आलेले हो. मस्त आलेत फोटो.
जागूतैंविषयी न बोललेच बरे. Proud

उद्याच करून बघते.

जागूतैंविषयी न बोललेच बरे.

अरे वा म्हणजे मला कोणीतरी घाबरत तर ! Happy नको नको पण मला डेंजर नाही व्हायचय साधच रहायचय.

सांगायचं राहिलंच... शनीवारी दुपारी मी ले.रा. केला होता. 'वदनी कवळ घेता' झाल्यावर आम्ही दोघांनी जे खायला सुरूवात केली, ते भाताचा पूर्ण फडशा पाडूनच थांबलो. त्यानंतर दोघांना लक्षात आले की जेवणभर आम्ही एक शब्दही बोललो नाहीत इतके त्यावर तूटून पडलो होतो. फोटो-बिटो पुढल्यावेळी करीन तेव्हा टाकीन.
नी, तू हा भात इथे पोस्ट करून आमच्यावर अनंत उपकार केले आहेस. धन्यवाद बायो!

Pages