लेमन राईस (लिंबू भात)

Submitted by नीधप on 12 August, 2011 - 02:41
lemon rice
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

हि तयारी
lemonrice1.jpg

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

या फोडण्या
lemonrice2.jpg

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

lemonrice3.jpglemonrice4.jpg
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. Proud

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम्डी, Happy मिळतो मिळतो. पण त्याच्या पॅकेटा सकट पाण्यात गरम करायचा असतो आणि त्याच्या रॅपर वर MTR असे लिहिलेले असते Proud

मंजूडी Lol काश.

आडो हो पण दूध आणि लिंबू वगैरे सगळं गडबड होईल का काय असे वाटले.
शँकी, त्या कोथिंबिरीला काहीच चव नसते, निदान माझ्याकडे आहे तीला तरी नाहीये. नुसतेच सुकलेला पाचोळा वाटतोय !

नाहीना. तसच MTR ची चटनी पावडर सोडुन सगळी रेडी टू ईट प्रोडक्ट्स चंडलबच असतात Angry
मला चटनी पावडर आवडते जरी R2E नसली तरी. Proud

१०० Happy

मी `सुगरण' नाही, तरीही फोटो टाकायचं धाडस करतोय.
काल दुपारी हा भात केला तेव्हा घाईघाईत फोटो काढता आला नाही. संध्याकाळी (दोन्ही फोडणी घातलेला भात वेगवेगळा शिल्लक ठेवला होता त्याचा थर दुपारच्या उरलेल्या लावून) फोटो काढलाय. हिरव्या फोडणीचा भात कोथिंबिरीमुळे जरासा वेगळा दिसतो. नाहीतर थर बाहेरून वेगळे दिसले नाहीत. हिरवा आणि लाल रंग दिसणार नाही, म्हणून मी फोडणीत हळद घातली नव्हती. चवीला साखर घातली.
लिंबाचा रस शिजल्याने किंचित कडवट चव येते, तीही छान लागते.
इतक्या जास्त प्रमाणात कच्ची कोथिंबीर कोणत्याही पदार्थात प्रथमच वापरली आणि तिची चव मस्तच लागते.
लिंबाच्या चकत्या करणे इज द ट्रिकी पार्ट. वर दिसताहेत त्या कडेच्या चकत्या आहेत.
नीधप रेसिपी शेअर केल्याबद्दल :).
लाल फोडणीत रंगासाठी तिखटही घालावे का?

हिरवी फोडणी खरोखरीची हिरवी दिसत नाही आणि लाल फोडणी खरोखरीची लाल दिसत नाही. हळदीचा पिवळा रंग आणि त्यात हिरव्या रंगाची रेलचेल(हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता) म्हणजे हिरवी फोडणी वाला भात आणि ह चा पि रंग आणि त्यात लाल मिरच्या, दाणे, चुरचुरलेली उडदाची डाळ यांच्या लालसर रंगाची रेलचेल म्हणजे लाल फोडणी वाला भात असा प्रकार असतो. Happy
माझ्याकडूनच राह्यलं हे स्पष्ट करायचं. माफ करणे. Happy

बादवे लिंबाच्या चकत्या विळीवर जास्त चांगल्या होतात किंवा मग सुरीला अल्टीमेट धार पाहिजे.

<हिरवी फोडणी खरोखरीची हिरवी दिसत नाही आणि लाल फोडणी खरोखरीची लाल दिसत नाही. ........>
आता हे लेमन राइस फॉर डमीज झालं. फोटोबिटो काढून कौतुक करायचं होतं, यासाठी हळद नाही घातली आणि थर बाजूने वेगळे दिसत नाहीत असं म्हटलं Happy
चकत्या विळीवरच कापल्या तेव्हा झाल्या. सुरीने लिंबाची पिळवणूकच होते Happy

नीधप सर्वप्रथम तुझ्या झालेल्या शंभर पोस्ट बद्दल अभिनंदन. आणि इतकी छान रेसिपी शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

कालच मी पण तुझ्या पद्धतीने लेमन राईस केला. चविला उत्तम. घरातल्यांना सगळ्यांनाच आवडला. मी पुर्ण तुझ्याच पद्धतीने केला. फक्त हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे ठेवले व लाल मिरच्या आख्याच ठेवल्या कारण त्यांची दळे भातात येउन लहान मुलांच्या वगैरे तोंडात येतात तसेच आमच्या घरात आख्या मिरचीचे बारीक तुकडे करण्यांचा घरातल्यांचा ३६ चा आकडा आहे. मी तुझ्या रेसिपीची प्रिंट हातात घेउनच हा भात बनविला. तो खालील प्रमाणे झाला.

भात शिजवत ठेउन ह्या फोडण्या करुन घेतल्या.

भात मोकळा करुन त्याचे दोन प्लेट मधे दोन भाग करुन एक एक फोडणी भातात मिस्क केली.

ही हिरवी फोडणी

ही लाल फोडणी

आता काचेच्या बाउल मध्ये थोडा लाल फोडणीचा भात घेतला व वरुन दोन लिंबाच्या चकत्या टाकल्या. नंतर हिरव्या फोडणीचा भात टाकुन त्यावर लिंबे टाकुन असेच पुढचे थर केले.

हे थर पुर्ण झाले आणि वरुन लिंबाच्या चकत्या लावल्या.

मग मायक्रोवेव्ह मध्ये दोन मिनीटे ठेवले. मस्त लिंबाचा सुगंध दरवळला.

फक्त एकच सुचवावस वाटत की जर पार्टी वगैरे असेल आणि हे थर उठुन दिसायला हवे असतील तर लाल फोडणी बिन हळदीची करायची.

मस्तच जागुले.. याला म्हणतात एक्स्पर्ट टच .. Happy

फक्त एकच सुचवावस वाटत की जर पार्टी वगैरे असेल आणि हे थर उठुन दिसायला हवे असतील तर लाल फोडणी बिन हळदीची करायची.<<<
आयडीया मस्त आहे किंवा मग लाल मिरच्यांच्या ऐवजी लाल तिखट? ते अर्थातच फोडणीत घालायचे नाही. गॅस बंद केल्यावर नारळाबरोबर घालायचे. Happy

सह्ही फोटोज!! छान दिसतोय लिंबूराईस जागू! Happy
हिरव्या फोडणीत मिरच्या व कोथिंबीर वाटून घातल्यावर देखील रंगात फरक वाटेल बहुतेक.

नीधप, माझ्यासारख्याला करायला सोपी पाकृ इथं शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आज केला.

फोटू टाकेपर्यंत वर बडे उस्ताद जागूच्या पोष्टी आल्यामुळे पुढे बोलायचे धाडस होत नाही. Proud

.
हे फायनल प्रॉडक्ट.

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स......... छ्या.... आता तोंडाला इतकं पाणी सुटलंय वरचे फोटो पाहून की आता हा भात केल्याशिवाय मला चैन पडेल असं वाटत नाही!! Lol

मी केलेला काल. चव मस्तच. पण जरा जास्तच फडफडीत झाला. नारळाचा चव मिक्स केल्यावर जास्त कोरडा वाटला. मी मावेत ३ मिनीट फिरवला. ( १ मिनीटात गरम पण झाला नव्हता म्हणुन)
जागुली आणी गजाननचा ओलसर वाटतोय?

पुढच्या वेळी बासमती एवजी दुसरा तांदुळ घेउन ट्राय करेल Happy

थोडी आमटी घेउन मस्तच लागला. Happy

Pages