लेमन राईस (लिंबू भात)

Submitted by नीधप on 12 August, 2011 - 02:41
lemon rice
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

हि तयारी
lemonrice1.jpg

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

या फोडण्या
lemonrice2.jpg

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

lemonrice3.jpglemonrice4.jpg
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. Proud

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!!! मस्तचं रेसिपी. लिंबांच्या चकत्याची आयडिया मस्तचं.

मला लेमन राईस खूप आवडतो पण नेहमी करायला गेलं कि आपला मराठी फोडणीचा भात व्ह्यायचा आणी कळायचच नाही कि काय चुकतयं. चव पण लेमन राईस साऱखी यायची नाही.

आता कळालं कि भात फोडणी ला न घालता, फोडणी भातात घालायची.

आज केला होता हा भात, बरोबर रस्सम. रस्सम हुकुमी एक्का आहे पण भात छानच झाला होता. वेळेअभावी फोटो नाही काढला.

रेसिपीबद्दल धन्यवाद. Happy

काल स्वातीस्टाईल नारळीभात केला. आज उरलेल्या ओल्या खोबर्‍याचा लेमन राईस करणार विथ लिंबाच्या चकत्या, वेगवेगळ्या फोडण्या आणि लेयर्स. चव जमली तर आभाराचा एसेमेस करणेत येईल.

जोरात आहे लेमन राईस Happy

सोबत रस्सम किंवा टॉमेटो सार म्हणजे सगळं आंबट चिंबट जेवण आहे म्हणायचं. सोबत चव पालटीसाठी काय घेता येईल?

सोबत चव पालटीसाठी काय घेता येईल?>>>>>> घट्ट दह्यातली गोडसर चवीची कोशिंबीर चांगली लागेल असं मला वाटतंय किंवा सौम्य चवीचे पालक सूप.

मी केला. एकदम मस्त. लिंबाची चव मस्त आली.
पण भात खूपच मोकळा झाला. फडफडीत म्हणता येईल असा. की असेच अपेक्षित आहे?

फडफडीतला १ पायरी कमी असा अपेक्षित आहे पण माझ्या मातेने काय अगदीच फडफडीत असे त्याचे वर्णन केले होते.. तेव्हा तुझं काही गंडलं नाही. Happy
चव पालटीसाठी सांडग्याच्या मिरच्या तळून वरून चुरणे, पापड बरोबर घेणे, दही घेणे असं करता येईल.
केश्वे, सौदिंडियन पदार्थ असल्याने आंबटपणाला पर्याय नाही. पण लेमन राइस असला तरी आंबटढाण भात नसतो हा. आणि रस्सम चिंचेच्या कोळावरचं असलं तरी तू ते झणझणीत करू शकतेस, चिंच कमी करू शकतेस.

हो ना केलेल्यांनो आडो, पौर्णिमा?

पूनम, भात नुसताच शिजवून घेण्यापेक्षा तांदूळ धुवून तुपात परतून आधणाचं पाणी घालून शिजवून घेतले तर फडफडीत होणार नाही असं मला वाटतं.

माझा भात फडफडीत नाही पण मोकळा झाला होता, पुलावासारखा. तोही नी म्हणते तसं आंबटढाण वै नव्हता झालेला.

हो अश्विनी, झणझणीत खाऊ शकत असशील तर तसं कर रस्सम किंवा नंदिनीला विचार पेपर रस्समची कृती.

हो, इतका आंबटढाण नाही लागत, लिंबाची सुरेख चव येते.

मन्जू, मी कूकरात नाही, आधणाचं पाणी घालून थेट शिजवला भात. बरोब्बर दुप्पट पाणी. पण अशाने भात मोकळाच होणे अपेक्षित असते ना? हा मोकळ्याच्याही पुढचा झाला. तांदूळ जुना आहे, बहुधा पाणी जास्त लागेल. आता नारळीभात करणार आहे. त्याला घालते जास्त पाणी जरा.

धन्स नी...

मी काल बनवला लिंबू भात Happy
फक्त ओला नारळ available नसल्याले घातला नाही

छान झालेला माझ्या पप्पानां खुप आवडेश!!!!!!

आज केला मी लिंबू भात या पद्धतीने. लिंबाचा सालींचा सौम्य आणि छान फ्लेव्हर उतरलाय. फोडण्याही छान दिसताहेत. सोबत आख्क्या मसुराची झणझणीत गरम मसाल्याची आमटी केली होती. मस्त लागलं कॉम्बो.

केला केला आज हा भात केला Happy
मस्त लागतोय.

पण ओला नारळ, कोथिंबिर मिळण्याचा स्कोप नसल्याने तसाच केला.

सावली, ओला नारळ मिळणार नाही बरोबर. अगं डेसिकेटेड कोकोनट १०-१५ मि. दूधात भिजवला की अगदी ओल्या नारळासारखा होतो.

Pages