मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीश तांब्यांचं 'रसातळाला खपच' याचा बराच गवगवा झालेला ऐकला म्हणून वाचलं.
कंटाळा आला. कथांमधे मधेमधे जे समाजावरचे भाष्य आहे ते फारच वरवरचे वाटले किंवा passe वाटले. नवीन सत्य, नवीन शैली, नवीन मांडणी मिळाली नाही.
लेखक पहिल्या कथेमधे मध्यमवर्ग ख प आणि च (लेखकाच्या स्पष्टीकरणात खाणे, पिणे आणि चढणे) पलिकडे जात नाही म्हणतात आणि संपूर्ण पुस्तक च च्या पलिकडे जात नाही. सतत तेच तेच तेच तेच. ते असायला हरकत नाही पण नवीन अर्थ, नवीन संकल्पना, नवीन दृष्टीकोन, नवीन अनुभूती काहीतरी असायला हवी ते नाहीच. रॉ, ग्रोटेस्क यातल्या कशाचे वावडे मला नाही पण त्या प्रकारच्या नॅरेटिव्हमधूनही एक सणसणीत लख्ख अनुभव मिळायला हवा की नको? मला वाटतं मिळायला हवा. तो मला यत्किंचितही मिळाला नाही.
स्त्रियांकडे ऑब्जेक्ट म्हणून बघणं हे नवीन नाही त्यामुळे तेच परत कथेत आल्यावर नवीन संवेदनेचे लिखाण होत नाही. मन्डेन होते. लैंगिकतेबद्दल बोलायचं तर कोण कुणाबरोबर कश्यासाठी झोपते याच्या तपशीलांपेक्षा लैगिकता ही संकल्पना बरीच व्यापक असते. लैंगिकतेचा स्पेक्ट्रम खूप मोठा असतो.

तस्मात बोर झालं. आपल्या जबाबदारीवर वाचा Happy

@केदार -
मेलुहा म्हणजे सिंधु संस्कृतीने व्यापलेला भाग, खासकरून गुजरातचा भाग असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हडप्पा शहराचा याच्या आयडेन्टिफिकेशनशी संबंध नाही. तिबेटशी तर का ही ही संबंध नाही. तिबेट सिंधू संस्कृतीच्या प्रभावाखाली असायचाही कुठलाच प्रश्न येत नाही.
जरी मेलुहा शब्दाचं मूळ सेमेटिक असावं असं मानलं जातं तरी लू/ऑईल (मी हे न पडताळता तुझं कॉपी मारलंय -चुकीचं असूच शकतं) याच्याशीही त्याचा संबंध जोडला गेलेला दिसत नाही.

सिंधू संस्कृतीच्या काळात सुमेरिया ते चीन व्हाया सिल्क रूट वगैरे व्यापार नव्हता. ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो तोही त्या पूर्ण दळणवळण व्यवस्थेला आपण नंतर बहाल केलेलं नाव आहे. एकसंध हमरस्ता असल्यासारखा हा मार्ग नव्हता. हा व्यापारी मार्ग प्रामुख्याने दोनहजार वर्षांपूर्वी उदयाला आला, त्या आधी आदिम ग्रामसंस्कृती या भागात होत्या व त्यांची एकमेकाशी छोटी छोटी एक्स्चेन्ज नेटवर्क्स होती. यामधेही तिबेटचा समावेश नव्हता.

ट्रायॉलॉजीबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. लेखकाने स्वातंत्र्य किती आणि कसं घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे, पण म्हणून त्यावरून ऐतिहासिक माहितीविषयी गैरसमज होऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद Happy

धन्यवाद वरदा.. वरती आलेल्या अनेक पोस्टी वाचून शंका आलीच होती पण इनफ अभ्यास नाही म्हणून गप्प बसले होते.

दिनेशदा - संशोधक लिहित नाहीत या विधानाबद्दल जोरदार आक्षेप. मुळात भारतीय संशोधकही त्यांचं लिखाण इतर संशोधकांसाठी विविध पीअर रीव्यूड किंवा अनरीव्यूड जर्नल्समधे, सेमिनार प्रोसीडिंग्जमधे, इ. किंवा पुस्तकांच्या रूपात लिहितात. सर्वसामान्य वाचकांसाठी लिहायला त्यांना फारसे कुणी प्रकाशकही मिळत नाहीत आणि रोजच्या धकाधकीत वेळही.
त्यापेक्षा सनसनाटी विधानं करणारी स्यूडोहिस्टॉरिअन्सची पुस्तकं जास्त खपतात, असली पुस्तकं लिहायला वेळही कमीच लागतो. Proud

आणि आपल्यापैकी किती जणं खरंच या विषयावर संशोधक काय म्हणतात हे बघण्याचे कष्ट घेतात? कारण गूगलवर यातलं बहुतांशी संशोधन नाही......

मेलुहा म्हणजे सिंधु संस्कृतीने व्यापलेला भाग, खासकरून गुजरातचा भाग असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हडप्पा शहराचा याच्या आयडेन्टिफिकेशनशी संबंध नाही. >>

अनेक ठिकाणी मी हडप्पा हे देखील मेलुहा असे असेल हे वाचले आहे (खाली त्यातील एक पुरावा) त्यामुळे ते लिहिले आहे. अर्थात मेलुहा अजून कुठे आहे हे ज्ञात नाही हे तुझे मत माझेही आहे नक्कीच.

सिंधू संस्कृतीच्या काळात सुमेरिया ते चीन व्हाया सिल्क रूट वगैरे व्यापार नव्हता. यामधेही तिबेटचा समावेश नव्हता. >>

पुरावा म्हणून मी महाभारतातील एक वस्त्र, चिनापट्टम हे नाव घेऊन इच्छितो. त्यामुळे महाभारतकाळी सिल्क अस्तित्वात होते असे मानले जाते. मग महाभारताचा सर्वसाधारण काळ हा बुद्धाअगोदर असायला हवा कारण नाहीतर तो लिखित स्वरूपात आढळला गेला असता, शिवाय गांधार / अंग ही नावे नंतरच्या काळात बदलत गेली.

हा व्यापारी मार्ग प्रामुख्याने दोनहजार वर्षांपूर्वी उदयाला आला >> नाही त्या आधीही व्यापारी मार्ग अस्तित्वात होता. सिर्का २६०० ची सिल सापडेली आहेत. आणि असे बघ सरस्वती नदी १९०० बिसी मध्ये ड्राय झाली. म्हणजे ह्याच गणितानुसार आजपासून ४००० वर्षांपूर्वी (किमान) सिंधू सरस्वती संस्कृती होती असे म्हणावे लागेल.

दुसरा विचार असा की,

हडप्पा / मोहंजोदारो आणि आता राजस्थानच्या बॉर्डरवर सापडलेले आणखी एक हडप्पापेक्षाही मोठे शहर (गानेवाला की कुठलेतरी वाला, ज्याला इंडस्ट्रियल सिटी असेही म्हणले जाते) ह्या सिंधूसंस्कृतीचाच भाग आहेत. हडप्पा / मोहंजोदारो हे इतकी मोठी आणि आजच्या भारतापेक्षाही सुनोजियत शहरं आहेत असे असताना तिथे व्यापार रूट नव्हता असे कसे म्हणता येईल. सिल्क रुट नाव आज दिले हे मान्य केले तरी व्यापार रुट असणारच. भलेही तिबेट कदाचित त्याचा भाग नसेल पण काश्मिर- पाक - अफगाण हा सिंधू मार्ग तेंव्हाही होताच की. मग ही शहरं दळवळण कुठल्यामार्गाने करत?

त्यांची एकमेकाशी छोटी छोटी एक्स्चेन्ज नेटवर्क्स होती. > सिंधू मध्ये नौकानयन चालायचे. ती इतकी सुधारलेली होती की २६०० बिसी मध्ये पिक्चरोग्राफिक रायटिंग होती. आजही हडप्पाचे (मोहंजोदाडो) सिल कोणी डिक्रिप्ट करू शकले नाहीत जे ह्या काळातील आहेत.

हां, हा काळ कुठला ह्यावर जरूर मतभिन्नता आहे पण जी शहरं सापडली / सापडत आहेत त्यानुसार सिंधू फार प्रगत होती हा पुरावा ठरू शकतो.

सिल्करुट शिवाच्या वेळेस नसावाही. तो असेलच असे माझे म्हणने नाही पण मग सद्य पुराव्यानुसार शिवकाल हा त्यापेक्षाही मागे जातो. गंधमादन, मेरू आणि कैलास पर्वत हे तिन्ही शिवकालातील आहेत. शिवाचे स्थान कोणते हे नक्की करायला तेच उपयोगी पडतील. शिव हा आजच्या तिबेटातील असे त्यामुळेच मानले जाते. (अर्थात मेरू कुठे आहे हे अजून कोणालाच माहिती नाही, कोणी अफगाण तर कोणी तिबेट तर कोणी पाक मधील बाल्टिस्तान जिल्हा असे निष्कर्ष मांडत आहे, जे अर्थातच तुला मी सांगन्यात पॉंईट नाही, कारण तुला हे माहिती असणारच. Happy


आता मग मेलुहा हे नाव लेखकाने का दिले?
ते ही शिवा संबंधात तर बहुतेक ह्या संदिग्धतेनेच. जी अजून त्याने विषद केली नाही. ज्यामुळेच मी हा प्रश्न उपस्थित केला आणि तिबेट किंवा ह्डप्पा असे म्हणालो. Happy

आता मेलुहा तू म्हणाल्याप्रमाणे जर गुजराथ मध्ये घेतले तर तो सरस्वतीचा भाग होईल. म्हणजेच जिथे अशी मोठी शहरं (हडप्पा, कालिबंगन सारखी) जी एकमेकांशी आणि त्यांचा परदेशात व्यवहार होता. पण मी आधी लिहिलेल्या सिंधू संस्कृतीतील एका प्रगत शहराला देखील मेलुहा का म्हणले जाते ह्याचा एक पुरावा म्हणून ही लिंक देतो.

कल्यानरामन एस ह्या संशोधकांने २००६ मध्ये हे मांडले आहे. http://www.indoeurohome.com/Meluhha-Dilmun.html

रायॉलॉजीबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. लेखकाने स्वातंत्र्य किती आणि कसं घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे, पण म्हणून त्यावरून ऐतिहासिक माहितीविषयी गैरसमज होऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद स्मित >>> ह्याबद्दल निदान माझ्याबाबतीत तरी मेलुहा हे पुस्तक आहे, रिसर्च पेपर नाही. ऐतिहासिक माहिती ही कांदबरीत शोधू नका असे मीच एका ऐतिहासिक पुस्तकांच्या बाफवर मांडले आहे. Happy

अर्थात इथे मत खोडने वगैरे नाही तर आहे ती माहिती शेअर करणे, नवीन मिळवणे हा विचार आहे. Happy
मेलुहाच्या पोस्ट इथून काढून नवीन बाफवर मांडल्या जाव्यात. जिथे अजून आपण लिहू शकतो. ह्या पूर्ण विवेचनात सिंधू तिबेट मधून भारतात आल्यावरच्या गोष्टी आहेत. खुद्द आजच्या तिबेट बद्दल लिहिले नाही.

अजून एक ( धक्कादायक काही लोकांकरता) निष्कर्ष निघत आहे / लोक मांडत आहेत तो म्हणजे कदाचित म्लेच्छ शब्दच मुळी मेलुहा चा अपभ्रंश असावा. आणि सिंधूतीरी हे म्लेच्छ राहत असावेत.

जर म्लेछ हे सरस्वतीतीरी राहत असले असते तर म्लेछ म्हणजे नक्की कोण हे कळाले असते, पण म्लेछ हे सिंधू पुढे राहतात असे उल्लेख आहेत.

अश्या उल्लेखांमुळे स्वा सावरकरांनी जरी हा शब्द इतर म्हणून वापरला असेल तरी त्यांच्याकाळी सिंधू सरस्वतीबद्दल इतके उत्खनन आणि माहिती नव्हती. त्यामुळे अर्थातच त्यांनी व इतर अनेकांनी नदीपारचे लोक असा अर्थ घेतला. (अ‍ॅव्हेलेबल पुराव्यावरून) व अर्थातच ते पुरातत्वविभागाचे नव्हते.

कदाचित सिंधूनदी काठावरील लोकं हे उद्या म्लेंछ ठरले तर मला आश्चर्य वाटणार नाही. Happy तुला काही माहिती असेल तर लिही किंवा निदान मला मेल पाठव. Happy

म्लेंच्छ चा अर्थ प्रायः मुसलमान घेतला जात असला तरी बहुधा स्थानिकेतर सर्वच आक्रमकांना ही संज्ञा असावी.

केदार -
म्लेंच्छ - मेलुहा संबंध यावर ढवळीकरांनी (१९९७) ला मत मांडलेलं आहे त्यातच त्यांनी म्लेंच्छ आणि गुजरातचा संभाव्य संबंध आणि म्हणून मेलुहा गुजरात या मताला पुष्टी (हे मत रोमिला थापर यांनी प्रथम मांडलं) दिली आहे. यावर यापुढे आणखी मूलग्राही संशोधन झालेले नाही.
सिंधू संस्कृतीत व्यापारी मार्ग नव्हते हे कुणीच म्हणणार नाही. काश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळेच याचा भाग होते. अमुदर्या पर्यंत संबंध होते. तू जी सील्स म्हणतोयस ती बॅक्ट्रिआना-मर्जियाना कॉम्प्लेक्स (बीएमसीसी) शी संबंधित आहेत. आंद्रोनोव्हो संस्कृती उत्तर सिंधुकाळाला समकालीन आहे. शहरीकरण काळाला नव्हे. आणि नकाशा बघितलास तर लक्षात येईल की सिल्करूट हा मुळात या सगळ्या प्रदेशाच्या पल्याड, सुरखानदर्याच्या उत्तरेला उझबेकिस्तान वगैरे भागात केंद्रित होता. या भागाचा सिंधू संस्कृतीशी व्यापारी संबंध नव्हता. तिथल्या छोट्या नेटवर्क्सच्या एकत्रीकरणावरच आद्य ऐतिहासिक (अर्ली हिस्टॉरिक) काळातील सिल्करूट व्यापारी जाळं अस्तित्वात आलं. या दोन्ही टप्प्यांमधे, त्याच्या स्वरूपांमधे निश्चितच फरक आहे (ट्रायबल लेव्हल एक्स्चेन्ज आणि ट्रेड रूट)
पिक्टॉग्राफिक रायटींग होतं ते पूर्णपणे व्यापाराशी संबंधित होतं. आणि लिपीवरून उन्नती ठरवायची असेल तर आपल्या आधीच क्युनिफॉर्म लिपी अस्तित्वात आली होती. सिंधुलिपी वाचली गेली नाहीये कारण त्याची फोनेटिक आणि लिन्ग्विस्टिक की (भाषा आणि त्याचं उच्चारण) आपल्याला गवसलेली नाहीये. आणि गनवेरीवाला हे अनुत्खनित सिंधू शहर हडप्पा आणि मोहेन्जोदडोच्या मधे आहे. पाकिस्तान एरवीच चिंचोळा देश असल्याने बहुतेक सगळं राजस्थान किंवा पंजाबसीमेच्या जवळच येतं.

महाभारतात चायनीज सिल्कचा उल्लेख येतो. पण मुळात महाभारत हा एकटाकी ग्रंथ नाही. जवळजवळ हजार वर्षे घडत गेलेला ग्रंथ आहे. त्यामुळे चायनीज सिल्कचा उल्लेख साधारणपण इंडोरोमन व्यापाराच्या काळात (दोनहजार वर्षांपूर्वी) त्यात आला असं मानलं जातं. ग्रंथातल्या उल्लेखाचा काळ त्यातल्या घडामोडींच्या समकालीन आहे असं मानायचं कारण नाही. (अधिक माहितीसाठी - वि.स. सुखटणकर आणि गौरी लाड यांची पुस्तकं वाचणं)

आणि शेवटी - शिव ही ऐतिहासिक व्यक्ती आहे मानण्यासाठी काय पुरावा आहे? शिवकाल कुठला? तो काय पुराव्यावर तुम्ही मांडणार? तो तिबेटमधे होता असं कोण म्हणतं? 'मेलुहा'चा लेखक?? तो कादंबरी लिहितोय.
एरवी प्रत्येकवेळी प्रत्येक देवतेला ऐतिहासिक व्यक्ती का मानायचे? मुळात तो कादंबरी लिहितोय हे मान्य केल्यावर त्याने जे काही स्वातंत्र्य घेतलंय त्यात कसले डोंबलाची तर्कसुसंगती शोधायचे? शिव सायबेरियात आहे का तिबेटमधे का मेलुहा म्हणजे चीन/आसाम/ तमिळनाडू - काय फरक पडतो?

मेरूपर्वत कुठला यावर काही तज्ज्ञांनी मतं मांडायचा प्रयत्न केलाय पण त्यातही ते शिवाबद्दल काहीही बोलत नाहीत.
असो. इथे आणखी लिहिण्याएवढा पेशन्स आणि वेळ नाही Happy

शिव ही ऐतिहासिक व्यक्ती आहे मानण्यासाठी काय पुरावा आहे? शिवकाल कुठला? तो काय पुराव्यावर तुम्ही मांडणार? तो तिबेटमधे होता असं कोण म्हणतं? 'मेलुहा'चा लेखक?? तो कादंबरी लिहितोय.
एरवी प्रत्येकवेळी प्रत्येक देवतेला ऐतिहासिक व्यक्ती का मानायचे? मुळात तो कादंबरी लिहितोय हे मान्य केल्यावर त्याने जे काही स्वातंत्र्य घेतलंय त्यात कसले डोंबलाची तर्कसुसंगती शोधायचे? शिव सायबेरियात आहे का तिबेटमधे का मेलुहा म्हणजे चीन/आसाम/ तमिळनाडू - काय फरक पडतो? >>

पण मी तर्कसंगती कुठे लावत आहे? तो लेखक उद्या मेलुहा म्हणजे पुणे म्हणाला तरी तसा मला काहिही फरक पडत नाही. मेलुहाचे पोस्टच मुळी वेगळे आहे, जे कांदबरी शिवाय मी मांडले आहे. मुळात आपण कोणासंबंधी लिहितो तर त्याबद्दल थोडा रिसर्च करणे अभिप्रेत आहे, म्हणून मी तिसर्‍या पुस्तकात हे येईल का? असा आशावाद मांडला आहे. मत नाही.

अर्थात शिव सिल्क राऊट वरील एक महत्वाची व्यक्ती होती / असावी हे वाक्य वापरून मी थोडी चुकच केली कारण शिव खरा आहे की नाही / कधी होता, कुठे होता हे अननोन आहे. मला फक्त तिसर्‍या पुस्तकात तो काही प्रकाश टाकेल का? असे म्हणायचे होते.

वरील चर्चेचा आणि त्या लेखकुचा काहीच संबंध नाही. असो हे मला परत परत सांगावेसे लागतेय म्हणजे मी सांगन्यात कमी पडतोय असे दिसते.

शिव आहे का? की नाही काल्पनिक असला तरी मला काही फरक पडतच नाही. कारण त्या पुस्तकावरून मी माझी मतं बनवत नाहीय, ती स्वतंत्र अभ्यासावरून बनवत आहे.

होय मी गनेरीवालाबद्दलच बोलत होतो.

पिक्टॉग्राफिक रायटींग होतं ते पूर्णपणे व्यापाराशी संबंधित होतं >> तेच मी वर मी मांडल आहे.

सिल्क राउट : थोडे क्लॅरिफिकेश. इथे तू आणि मी जो सिल्क राउट विचारात घेत आहोत तो थोडा वेगळा दिसतोय. तू एक्झॅट राऊट विचारात घेते आहेस, आणि मी केवळ त्याला जोडणारा ट्रिब्युटरी ( जो सिंधूशीच निगडीत आहे, कारण मी सिंधू बद्दलच बोलतोय) जो तक्षशिला वरून सिंधू खोर्‍यातून जातो, तो विचारात घेत होतो त्यामुळे दोघांचाही गोंधळ उडालेला. मला हे क्लिअर करायला हवे होते की मी केवळ सिंधू बद्दल बोलत आहे.

अर्थात तो राऊट नंतर डेव्हलप झाला, सिल्क कदाचित २००० वर्षांपूर्वीच इथे आले असेल, पण हा व्यापारी मार्ग आधीपासून होता (पिक्टोग्राफी) हे त्यामुळे मी माडंले.लेह मधील हान डायनेस्टी देखील सिल्क व्यापारात होती ( १ & २ सेंच्युरी)

हा नकाशा बघ. ह्यात तो ट्रिब्युटरी दाखवला आहे.
http://worldhistoryconnected.press.illinois.edu/6.1/anderson.html

असो तुला वेळ नाही आणि ( पेशन्स ही ) Happy असे म्हणाल्यामुळे आवरते घेतो. अर्थात दिर्घचर्चा आणि त्यातून मिळणारे ज्ञान / माहिती ह्यासाठी मी कधीही तयार आहेच. Happy

'गॅब्रिएल गार्सिआ मार्केझ' या नोबेलविजेत्या कोलंबिअन लेखकाच्या 'क्रॉनिकल्स ऑफ अ डेथ फोरटोल्ड' या स्पॅनिश
कादंबरीचा इंग्रजी अनुवाद नुकताच वाचला. निव्वळ भन्नाट प्रकार आहे!
मार्केझ कादंबरीकार आणि पत्रकार दोन्हीही आहे त्यामुळे ही कादंबरी थोडीशी 'रिपोर्ताज' च्या शैलीने जाते. सर्व गावाच्या साक्षीने झालेला एक खून हे कथासूत्र आणि त्याचे नॉन-लिनिअर नॅरेटीव्ह अफलातून आहे. कित्येक पात्रे असूनही प्रत्येक पात्र तुम्हाला स्पष्ट, जिवंत दिसते; त्यांचे राग लोभ प्रेम असूया आपल्यालाही भिडतात. आणि हे सर्व फक्त सव्वाशे पानांच्या लघुकादंबरीत. एका व्यक्तीचा खून वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्याला दिसत राहतो आणि लक्षात येते की सगळे गावच गुन्हेगार आहे.
विज्ञानात कोणत्याही फिनॉमेननकडे पाहण्याच्या 'रिडक्शनीझम' आणि 'सिस्टीम्स अ‍ॅप्रोच' अशा दोन पद्धती आहेत. बर्‍याचदा सामाजिक भाष्य असलेल्या कादंबर्‍या मला सिस्टीम्स अ‍ॅप्रोच सारख्या वाटतात. त्यामधे विस्तृत कालपट असतो, अनेक एकत्र गुंतलेले संदर्भ, अनेक घटना असतात आणि त्या सर्वांचा एका किंवा अनेक आयुष्यांवरती पडलेला प्रभाव दाखवलेला असतो. अनेकवेळा एका अलीप्त, त्रयस्थ नजरेने अशा कादंबरीचा आस्वाद घेता येतो.
'क्रॉनिकल्स...' मात्र रिडक्शनीझमच्या वाटेने जाते. एकच छोटी घटना अनेकांच्या काही एक निर्णय घेण्याने वा न घेण्याने कशी घडते आणि तिचा प्रभाव पुन्हा उलटा त्याच लोकांवर कसा पडतो असा तिचा प्रवास आहे.त्यामुळे ही कादंबरी तुम्हाला त्रयस्थ राहू देत नाही. तुमच्या नकळत तुम्ही त्या जमावाचा भाग बनता आणि म्हणून त्या खुनाचे गुन्हेगारही.

ज्जेब्बात, आगावा Happy
माझी फार्फार आवडती कादंबरी. याच बाफवर आधीही मी कुठेतरी लिहिलं होतं. मार्केझबद्दल दोनतीन ओळी

आगावा, अनुवाद कसा जमला आहे? मार्क्वेच्या कादंबर्‍यांचा अनुवाद करायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. क्रॉनिकल्स ऑफ अ डेथ फोरटोल्ड ही मार्क्वेची मी वाचलेली सगळ्यात भारी कादंब्री आहे, अगदी १०० वर्षांच्या विश्रांतीपेक्षाही..

टण्या, अनुवाद कसा जमला आहे हे कसे कळणार? भाषा प्रवाही वाटली, कुठेही प्रभाव ओसरला नाही त्याअर्थी चांगलाच झाला असावा.

नाय, मी इंग्रजीतूनच वाचली आहेत. त्यामुळे ज्याने इंग्रजी अनुवाद केला त्याच्या भरोसेच आम्ही.

पण एखादा अनुवाद वाचताना लक्षात येतं की तो जमलाय की नाही. किमान माझा तरी असा अनुभव आहे. मी मध्यंतरी शिवराम कारंथांच्या एका कादंबरीचा मराठी अनुवाद वाचला होता. तो मुळीच जमला नव्हता कारण वाचताना जाम अडखळत होतं. पण १९८४ चा मी वाचलेला अनुवाद जबरी होता. ती मुळ इंग्रजी कादंब्री असेल असे वाटत नव्हते. माझ्या मते जर अनुवादित पुस्तक वाचताना तुम्हाला 'अरे ही भाषा काही जमलेली नाहिये' असे वाटत असेल तर तो अनुवाद फसला (उदा: एका कोळियाने Proud घाला आता शिव्या)

टण्या - सहमत Happy
मला भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद अज्जिबात आवडले नाहीयेत. खूप अडखळत वाचतेय, खूपसं काही निसटतंय असंच वाटत राहिलंय कायम. मार्केझ/मार्क्वेच्या मात्र कुठल्याच इंग्लिश पुस्तकांत असं वाटलं नाहीये. पण मुळातच युरोपीअन भाषांमधे अनुवाद/भाषांतर याचंही एक शास्त्र/तंत्र झालेलं आहे. त्याचं प्रशिक्षणही घेता येतं. या सगळ्यावर सैद्धांतिक विचार झालाय. बहुतेक सगळे अनुवादक या सगळ्याशी परिचित असतात. तेव्हा अगदी वाईट अनुवाद असतील तर ते प्रकाशितच होत नसतील असंही शक्य आहे. आपल्याकडे असं कुठं काय असतं?? ज्यांना ती प्रतिभा आहे त्यांचेच अनुवाद किंवा रूपांतरं दर्जेदार होतात, बाकीच्या तंत्राविषयी बर्‍यापैकी ठणठणाट असतो.

एका कोळियाने भाषांतर्/अनुवाद म्हणून फसलेले पुस्तक आहे या विधानाला शिव्या घालण्यासारखं काय आहे? पुल कितीही आवडत असले तरी ते काही देव नव्हेत. त्यांच्या पुस्तकांमधेही चांगलीवाईट प्रतवारी आहेच. जसं त्यांना पूर्णपणे कंडम/टाकाऊ ठरवता येत नाही तसंच त्यांनी लिहिलेली ओळन्ओळ उत्तम आहे असंही म्हणता येत नाही. हे सगळ्याच साहित्यकारांना लागू होतं! (यानिमित्ताने पुल गेल्यानंतरचा दिलीप पाडगावकरांचा दुटप्पीपणा आठवला - एकीकडे एलीट लेफ्टिस्ट्स लोकांनी चालवलेल्या बिब्लिओ या साहित्यविषयक नियतकालिकांत त्यांनी पुलंची मॉकिश ह्यूमर, मध्यमवर्गीयांचं लांगूलचालन वगैरे टिपिकल संभावना केली होती आणि टाईम्स ऑफ इंडियात मात्र तुलनेने गदगद सुरात ऑबिट लिहिलेली.... टार्गेट वाचक बदलता असला तरी स्वतःच्या मतांत तरी माणसाने प्रामाणिक असावं ना..)

मराठीत मला आवडलेली भाषांतरं पटकन डोळ्यापुढे येत नाहीयेत पण दोन-तीन रूपांतरं फार मनापासून आवडली आहेत
१. द मा मिरासदार - नावेतील तीन प्रवासी (थ्री मेन इन अ बोट - जेरोम के जेरोम). यात काही ठिकाणी तपशील भारतीय पार्श्वभूमीत सुसंगत वाटत नाहीत, अडखळायला होतं पण विनोद मस्तच जमलेत
२. द मा मिरासदार - दत्तू चष्मेवाला (रॅन्सम ऑफ द रेड चीफ - ओ हेन्री)
३. वि वि बोकिल - वसंताच्या कथांमधली त्याच्या आईच्या काटेकोर डाएट पाळणार्‍या मैत्रिणीची गोष्ट (वूडहाऊसच्या एका बर्टी वूस्टरच्या मित्राच्या गोष्टीवर आधारित आहे)

आणखीही असतील, आत्ता पटकन आठवत नाहीये

आणखीही असतील, आत्ता पटकन आठवत नाहीये >> विजय देवधरांची बहुतेक भाषांतरे चपखल असत. भा रा भागवतांची भाषांतरे नाहि म्हणता येणार पण रुपांतरे अचूक नि वाचनीय असत. गाडगिळांचे Tom sawyer चे भाषांतर पण चांगले होते.

टण्या तुझा बाँब अगदीच फुसका निघाला रे. एका कोळीया पेक्षाही कान्होजी आंग्रे अधिक तापदायक वाटलेले मला.

भाषांतर न जमल्याचे अजून एक उदाहरण म्हणजे
माय फ्यूडल लॉर्ड - तहमिना दुराणी
भाषांतर कुणी केलंय लक्षात नाहीये पण इतकं वाईट भाषांतर आजतागायत नाही वाचलं.
उदाहरणादाखल
Marriage gone sour - विवाह आंबट झाला
The song 'Strangers in the night' - 'रात्रीचे अनोळखी' हे गाणे. (शक्यतो अशी नावे असतात ती भाषांतरीत करत नाहीत किंवा जरूरीपुरती केली तरी मूळ शब्द ठेवून कंसात भाषांतरीत नाव असते असे बघितले आहे)

असामी, मी कान्होजी आंग्रे वाचायच्या फंदातच पडले नाहीये Proud

भा रां ची तर भाषांतरेच आहेत की! रूपांतरं कुठेत? अगदी चपखल अनुवाद. ज्यूल्स व्हर्नच्या सगळ्याच अनुवादित पुस्तकांची फॅन आहे मी. शिवाय शेरलॉक होम्स (किशोरमधे आल्या होत्या) आणि सत्यजित राय यांच्या गोष्टी प्रथम मी भा रां च्याच अनुवादामुळे वाचल्या.
गाडगीळांनी टॉम सॉयर चं रूपांतर केलंय रे, भाषांतर नव्हे. धाडसी चंदू का असंच काहीतरी नाव आहे. ते मात्र मला आवडलं नाही
विजय देवधर खूपच बरे होते. रवीन्द्र गुर्जर म्हणजे शाळकरी वयात नाईलाज म्हणून वाचले होते.

रच्याकने, मधुकर तोरडमलांनी केलेले अगाथा ख्रिस्तीचे अनुवाद कुणी वाचलेत का? कितपत जमलेत?

'कान्होजी आंग्रे' च्या मुद्द्याला अनुमोदन. पण त्या व्यक्तीची फारशी माहिती नसल्याने वाचायला आवडले. मार्केझची कादंबरी वाचताना अजून एक असं जाणवलं की कोलंबिअन, स्पॅनिश, रोमन कॅथलिक इ.इ. संस्कृतीची माहिती नसलेल्या वाचकाला 'अडचण' येउ नये म्हणून कुठेही एखाद्या प्रथेची पानपानभर वर्णने करायची त्याला गरज वाटत नाही. आपण मांडतो आहोत तो मुद्दा महत्वाचा आहे, त्याभोवतीचे आवरण नव्हे याची त्याला स्पष्ट जाण आहे. त्यामुळेही कदाचित अनुवाद इतका क्रिस्प झाला आहे.

भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद उमा कुलकर्णींनी केले आहेत ना?
त्यांनीच अनुवाद केलेल्या पूर्णचंद्र तेजस्वींच्या निवडक कथांचं पुस्तक सध्या मी वाचते आहे. चांगले आहे.

मंजूडी - हो.
आगावा, तू म्हणतोस तो मुद्दा आहेच पण मला असंही वाटतं की यात बर्‍यापैकी भाषिक साम्याचाही वाटा आहे. स्पॅनिश काय किंवा इंग्लिश या भाषाभगिनी आहेत. तेव्हा अनुवाद करताना तुलनेने सोपे जात असणार.

वरदा, भाषाभगिनींच्या मुद्द्याला +१

बरं, मला सांगा, व्हर्जिनिया वूल्फचं A Room of One's Own कुणी वाचलं आहे का?

मधुकर तोरडमलांनी केलेले अगाथा ख्रिस्तीचे अनुवाद कुणी वाचलेत का? कितपत जमलेत?
>> नुकतेच वाचले तीन. नाही जमलेले Sad

आणखीही असतील, आत्ता पटकन आठवत नाहीये>>>
पाडस - राम पटवर्धन (मार्जोरी किनन रौलिंग्स) हे माझं अत्यंत आवडतं. फार गोड भाषा वापरलिये पटवर्धनांनी. मुळ कादंबरीपेक्षा चांगलं झाल्यासारखे वाटते.

मला वाटतं डॉ. प्रमोद जोगळेकरांनी मायकल क्रायटनच्या पुस्तकांची केलली भाषांतरेही खूप सरस उतरली आहेत..विशेषत तांत्रिक बाबींबद्दल लिहीताना हे मराठीतच लिहीले गेले असावे असे वाटावे इतपत...
विशेष उल्लेखनीय म्हणजे जुरासिक पार्कमध्ये हमाची हूड बद्दलची माहीती

पाडस मलाही आवडले होते.

व्हर्जिनिया वुल्फ- अ रुम ऑफ हर ओनः ललिता मी वाचलंय. अ‍ॅक्चुअली तो एक एसे आहे. मला वाटतं नेटवरही उपलब्ध असावा. एनसिपेच्या लायब्ररीमधे वाचता येईल. मस्ट रिड.

Pages