मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धारा, मला का तो फ्लिपकार्टवाला नॉट अव्हेलेबल सांगतोय??

धन्यवाद, मंडळी Happy

या पुस्तकाबद्दल फोर्टमधल्या 'स्ट्रँड बुक डेपो'त मागे विचारणा केली होती याबद्दल, पण त्यांच्याकडे नव्हतं. माझ्याकडे जी प्रत आहे ती जेमतेम ९४ पानांची आहे - पण ती इथल्या 'बार्न्स अँड नोबल'मधून घेतलेली.

फ्लिपकार्टवर दोन्ही आवृत्त्या पाहिल्या. २२४ पानांच्या आवृत्तीत हेलन हँफची दोन पुस्तकं दिसताहेत - ८४, चेरिंग क्रॉस रोड आणि त्याचाच पुढचा भाग/कम्पॅनियन रीडिंग म्हणता येईल असं 'द डचेस ऑफ ब्लूम्सबरी स्ट्रीट' (दुवा). दोन जोड-पुस्तकांचं संकलन अधिकच उत्तम. फक्त ८४, चेरिंग क्रॉस उपलब्ध नाही असं दिसतंय.

नंदन, मस्त पुस्तक ओळख Happy

मी नुकतेच 'माचीवरला बुधा' वाचले. अतिशय आवडलं, सहज लिखाण आणि ओघवतं निसर्गवर्णन. एका बैठकीत संपवलं आणि वाचून झाल्यावर आत्ता राजमाचीला गेलच पाहिजे हे ठरवलयं.

सध्या 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' वाचतोय. आवडतयं.

रेडर्स फ्रॉम नॉर्थ संपवले....
फारच मस्त पुस्तक आहे...आणि इंग्रजीमध्ये वाचतानाही काहीही अडचण येत नाही.
आपण बाबर आणि मुघलांचा इतिहास शिकलो ते पानिपताच्या लढाईनंतर....पण पानिपताच्या लढाईनंतर जेमतेम पाच वर्षातच त्याचा मृत्यू झाला...त्यापूर्वीच्या बाबरने काय काय सोसले त्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. थोडे यापूर्वीच्या पोस्ट मध्ये लिहीले आहे...त्या अजून थोडे...
बाबर शूर, हुशार, धोरणी वगैरे वगैरे असला तरी त्याच्या मायदेशात त्याची डाळ फारशी शिजली नाही. त्याचा जन्म झाला तो फरगणा प्रांत त्याला भावाला देउन टाकावा लागला. समरकंदवर राज्य करण्यासाठी आपला जन्म झाला आहे अशी त्याची धारणा होती ते समरकंद चारवेळेस ताब्यात येऊनही काही काळातच सोडावे लागले...एकदा तर जीव वाचवण्यासाठी सख्ख्या बहीणीला शत्रुच्या जनानखान्यात पाठवावे लागले. दैवयोगाने काबूलचे राज्य मिळवल्यानंतरही त्याला समरकंदवर कबजा करता आला नाही आणि नागरिकांनीच उठाव करून त्याला शहर सोडण्यास भाग पाडले.
अशा परिस्थितीत त्याने हिंदुस्थानवर नजर वळवली आणि हाहा म्हणता दिल्ली काबीज केली. ती देखील इब्राहीम लोदीच्या प्रचंड सैन्याचा जेमतेम काही तासात फडशा पाडत..
यामागची कारणे वाचताना आपली आपल्याल लाज वाटायला लागते..ज्यावेळी बाबराला तुर्की साम्राज्याकडून तोफा आणि बंदुकांची माहीती कळते त्यावेळी तो पहिल्यांदा असे काही भारतीय राजांनीही मिळवले आहे का याची चाचपणी करतो. ज्यावेळी त्याला कळते की भारतीय राजांनी गेल्या काही दशकात त्यांच्या युद्धतंत्रात अजिबात बदल केलेला नाही त्याचवेळी त्याची खात्री पटते की सरशी त्याचीच होणार...
राजपूतांविरुद्धच्या युद्धातही तेच...आपले राजे कायमच असे सुस्त आणि चुकांपासून काहीही न शिकणारे असताना परक्यांनी आपल्यावर आक्रमण केले म्हणून रडण्यात काय अर्थ आहे...
बाबरच्या मृत्यूबरोबरच पहिला भाग संपतो. मरणापूर्वी तो आपल्या मोठ्या मुलाला ह्युमायुनला उत्तराधिकारी नेमतो आणि या निवडीला बाकी मुलांचा विरोध आहे आणि तो हुयमायुनच्या जीवावर उठले आहेत...
आता ब्रदर्स अॅट वॉर वाचायला सुरुवात केली आहे...सुरुवात पहिल्या पुस्तकाईतकीच रोमांचकारी आणि उत्कंठावर्धक आहे....

आशुचँप
छान ओळख करुन दिलीत. मला पहिला भाग नाही मिळाला तर दुसरा भाग घेतला आहे वाचायला.
ही पुस्तके संग्रही ठेवण्यासारखी आहेत का? काय वाटते?

माधवी शक्यतो पहिला भाग मिळवून मगच पुढे वाचा असा माझा सल्ला आहे..कारण हुमायुनलाच का उत्तराधिकारी नेमला हे पहिल्या भागात दिले आहे.
ही पुस्तके म्हणजे ऐतिहासिक ऐवज नाहीयेत...जसे स्वामी किंवा राऊ त्यासारखीच ही ऐतिहासिक आधार असेल्या कादंबर्या आहेत. त्यात मूळ ऐतिहासिक व्यक्तींबरोबरच थोडी रंजकता यावी यासाठी काल्पनिक पात्रेही घुसडण्यात आली आहेत. त्यामुळे इतिहासाला बाध येत नसला तरी ही पुस्तके म्हणजेच खरा इतिहास नव्हे..केवळ बाबर किंवा मुघल कसे होते याची एक चांगली ओळख ही पुस्तक करुन देतात...

लक्ष्मीबाई टिळकांच 'स्मृतीचित्रे' वाचलं.
साधे सरळ आत्मकथन. कुठलाही अभिनिवेश नसलेलं. सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीची टिपीकल ब्राह्मण घरातल्या पण स्वतःशी कमालीच्या प्रामाणिक असलेल्या बाईची कथा.
पुस्तकात त्या वेळच्या संक्रमणावस्थेत असलेल्या सामाजिक रीतिरिवाजांचे खूप छान चित्रण आहे. त्या वेळचे स्त्रियांचे सामाजिक स्थान. पुरोगामी विचार असणार्या आणि ख्रिस्ती धर्म स्विकारण्याचे धाडस असलेल्या माणसाची (ना. वा. टिळक) पत्नी म्हणून झालेली ओढाताण.....फरपट. आत्महत्येचे विचार मागे सारून स्वतःमध्ये धैर्याने घडवून आणलेले बदल, सेवाभावी पण आवश्यक तिथे व्यवहारी वृती.
व्यक्तित्व विकासाचे टप्पे खूपच प्रामाणिक पणे मांडलेले आहेत. काही प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.
आपल्याच समाजातली एक तीन पिढ्यांपूर्वीची बाई म्हणून पाहिलं तर खूप रिलेट होतं. त्यापुढ्च्या पिढ्या म्हणजे माझी आजी, मग आई. मी आणि आता माझी मुलगी अशी एक स्त्री व्यक्तित्व विकासाची साखळीच माझ्या मनात तयार झाली.

http://kharedi.maayboli.com/shop/R.D.Karve-book-set.html

र.धो. कर्व्यांच्या लेखांचा/ पुस्तकांचा हा संग्रह अक्षरधारा मध्ये पाहिला. दुर्दैवाने आधीच घेऊन ठेवलेल्या पुस्तकांमुळे सामानात अजिबात जागा नव्हती म्हणुन घेतला नाही आणि आता हळहळ वाटते आहे.
अक्षरधारा मध्ये मुल्य १८०० रुपये होते, इथे सूटही दिसते आहे.

१. असंग्रहित र. धों. कर्वे
२. बुद्धिप्रामाण्यवाद
३. मोपांसाच्या कथा
४. निवडक "शारदेची पत्रे "
५. र. धों. कर्वे : मते आणि मतांतरे
६. 'समाजस्वास्थ्य' कार
७. शेष समाजस्वास्थ्य
८. 'समाजस्वास्थ्य ' मधील निवडक लेख

ज्यांना थोडासा रधो फ्लेवर हवा आहे त्यांनी लोकसत्तेतील चतुरंग मध्ये मंगला आठलेकर एक सदर लिहित 'रधोंच्या निमित्ताने' ते वाचावे. त्यांची परखड मते वाचून या बदललेल्या काळात सुद्धा घाम फुटतो. या व्यक्तीची विचारप्रक्रिया आणि धैर्य आणि अर्थातच त्यांचे अनमोल कार्य याने भारावून जायला होते. त्यांचे लेख मुळातून वाचण्याची या संचाच्या निमीत्ताने संधी मिळते आहे ती घ्यावीच.

हे काही मीवापु नाही.. कोणी 'कोणते पुस्तक घ्यावे' असा बाफ काढला तर तिकडे हलवेन. वाचनकट्ट्यावर लिहीले असते पण तिकडे धा मिनीटात वाहुन जाईल. Happy

बुद्धिप्रामाण्यवाद
र. धों. कर्वे : मते आणि मतांतरे

वाचले होते. ज्या वयात वाचले होते त्या वयात त्यांची काही काही मते वाचून "असा विचार करूच कसा शकतात?" वगैरे प्रश्न पडले होते. इतर पुस्तके देखील वाचायची आहेत.

hi sagali pustaka maayboli chya kharedi vibhagat aahet.

प्रिय बाबुआण्णा हे नंदा पैठणकरांनी लिहिलेले पुस्तक वाचले. प्रसिद्ध साहित्यकार जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या नंदा पैठणकर ह्या मावस भगिनी. एकदम साध्या, सरळ भाषेत नंदा पैठणकरांनी जी ए कुलकर्णी ह्यांच्या आणि इतर कुटुंबियांच्या घरगुती आठवणींना ह्या पुस्तकाद्वारे उजाळा दिला आहे. जी ए ह्यांच्या लिखाणाबद्दल ह्या पुस्तकात काही नाही, किंबहुना जी एं चे सारे लिखाण समजायची आपली कुवत नाही, हेही त्यांनी प्रांजळपणे सुरुवातीला नमूद केले आहे.जी एं च्या लिखाणाबद्दल लिहिणे हा उद्देश नसून, स्वतःच्या भावाबद्दल लिहिणं, जी एं चा त्यांच्या बहिणींना मिळालेला सहवास, माया, प्रेम आणि त्यासंबंधित घरगुती आठवणी, त्याबद्दलचं हे पुस्तक. नंदा पैठणकरांनाही आपल्या भावाबद्दल जो जिव्हाळा, प्रेम आणि आदर वाटतो, तो वाचन करताना जाणवत राहतो.

साध्यासुध्या शैलीतलं हे पुस्तक मला खूप आवडलं.

फिरस्ता - वसंत पोतदार
पुस्तक जुने आहे. आणिबाणीच्या आसपासच्या काळात लिहिले गेलेले. पण अनेक गोष्टी आजही चपखल बसतात. लेखनाची शैली आवडली.

नंदन खरच खूपच छान पुस्तक ओळख . Happy
र. धो . कर्व्यांच एकही पुस्तक वाचाल नाही . मेजेस्टिक मध्ये विचारायला पाहिजे

शहेनशहा मी पार शाळेत असताना वाचलयं
आता, औरंगजेबाच्या सगळ्या मुलींची नावं 'झ' वरून आहेत एवढचं आठवतयं Happy
झेबा, झेबुन्निसा, झिनत..

झेबुन्निसा, झिनत >>
दोनच आहेत.
झेबा नाहीय. शहेनशहा मध्ये तरी ह्या दोघींचाच उल्लेख आहे.

एम्पायर्स ऑफ मुघल्स चा दुसरा भाग ब्रदर्स अँट वॉर वाचला...
पहिल्या भागाइतकाच उत्कंठावर्धक आणि अप्रतिम...
दुसर्या भागाची सुरुवात होते ती हुमायुनच्या विरुद्ध त्याच्या भावांनी केलेल्या बंडाळीने. जरी शांत स्वभावाचा हुमायुन त्यांना माफ करून आपले राज्य वाढवण्याच्या प्रयत्नाला लागतो तरी अफूची नशा आणि युद्धभूमीवर घेतलेले चुकीचे निर्णय त्याला अक्षरश रस्त्यावर आणतात...कामरान आणि असकरी स्वभावानुरुप उलटतातच आणि शत्रु छाताडावर बसून राजधानीतून हुसकाऊन लावतो आणि एके काळच्या या मुघल राजावर मुठभर लोकांसह मदतीची याचना करत दारोदार फिरण्याची वेळ येते हे पाहून खरोखर नियती, नशिब अशा काही गोष्टी असाव्यात यावर विश्वास बसतो.
आपण विचारही करू शकत नाही पण या सत्ताधीशाने त्याच्या कसोटीच्या काळात प्रसंगी घोड्यावरून, कधी पायी चालत भणंग अवस्थेत दिवस काढलेत. त्यात त्याची बायको प्रसूत होऊन भावी राजा अकबराचा जन्म झालेला, खायला घोड्याचे मांस, तेही सैनिकांच्या शिरस्त्राणात पाणी घेऊन त्यात शिजवलेले...ना पुरेशी शस्त्रे, ना सैनिक आणि बरोबर जनानखाना अशा परिस्थितीतही केवळ जिद्दीच्या जोरावर हुमायुन कसे पुनरागमन करतो हे फार सुरेखरित्या या पुस्तकात मांडले आहे...
काहीसा स्वप्नाळू, भाबडा आणि ग्रहतार्यांचा अभ्यास करणारा हा पातशहा पुन्हा एकदा मुघल सत्तेची भारतात स्थापना करतो आणि त्याचा उपभोग घेण्यापूर्वीच मृत्यू पावतो...
पण या पुस्तकाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. ज्यावेळी हुमायुन भणंग अवस्थेत फिरत होता त्यावेळी काही राजपूत राजांनीच त्याला मदत केली आणि मुघल राज्य टिकवले. साधी गोष्ट होती की पुढे जाऊन तोच मुघल राजा बनून राजपूत राजवटींचा घास घेणार हे निश्चित होते. पण तरीही आपली घातक अतिथी देवा भव संस्कृती काय सुटली नाही आणि ज्या मुघल राजवटीविरुद्ध लढताना राणा संगाने प्राण वेचले त्याच्या वारसदारांना मदत करून त्यांनी केवळ आपल्याच नव्हे तर आख्ख्या भारतावर परकिय आक्रमणाची कुर्हाड ओढवून घेतली...
जर त्यांनी त्याच वेळी हुमायुनचा निकाल लावला असता तर...
भारताचे चित्र काही वेगळे झाले असते का

कहाणी कवितेची हे कवी नारायण सुर्वे लिखित पुस्तक वाचले.

दैनिक सकाळच्या साप्ताहिक पुरवणीमध्ये कहाणी कवितेची नामक एक सदर नारायण सुर्वे लिहित असत. ह्या सदरामधील १८ लेखांचे हे पुस्तक. स्वतःच्या कवितांविषयी -त्या कशा सुचल्या, काय अनुभव देऊन गेल्या - सुर्वेंनी अतिशय सहजरीत्या वाचकांशी संवाद साधला आहे. कवितांबद्दलचे काही अनुभव तर मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.

मुद्दाम वाचण्यासारखे पुस्तक.

झेबा नाहीय. शहेनशहा मध्ये तरी ह्या दोघींचाच उल्लेख आहे. >> हम्म्म... काहीतरी कन्फुजन झालं असणार माझं निंबुडा.

आशुचँप
तुमचा संपलाही दुसरा भाग वाचुन. मी अजुन ३३ व्या पानावरच आहे Sad
पण हुमायुन ची आत्या त्याला तिच्या वरच्या अन्यायाची आठवण करुन देताना सांगते ना की बाबर कसा त्या प्रतिस्पर्ध्याला मारून त्याच्या कवटीतून पाणी पितो ते वाचून असे वाटले की अशा बर्‍याच गोष्टी असतील बहुतेक पुस्तकात.

माधवी यापेक्षा खूप भयानक गोष्टी पहिल्याच भागात आहे...लोकांचे क्रौर्य पाहून वाचून शहारा येतो अंगावर..असे करू कसे शकतात हेच कळत नाही....

पण मला आता लेखकाची मते थोडी बायस्ड वाटू लागली आहेत. तिसरा भाग वाचतो आहे. त्यात हेमूचे पात्र इतके विकृत आणि चमत्कारीक रंगवले आहे की ते तद्दन खोटे वाटू लागते. अशीच परिस्थिती आधीच्या भागात पण असेल का असे वाटून लेखकाच्या हेतूबद्दल शंका यायला लागली आहे....

जबरदस्त!
साहित्य विश्‍वात ‘आयडियल’ क्रांती
मराठी पुस्तक खरेदीसाठी रांग लागली

मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) - पुस्तकावरील अवाच्यासवा किंमत पाहून खिशात हात घालण्यास कचरणार्‍या पुस्तकप्रेमींना ‘आयडियल बुक डेपो’ने अवघ्या ५० रुपयांत पुस्तक खरेदीची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झुंबड उडत असून ही झुंबड २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभर कायम राहणार आहे.
मुंबईत अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आयडियल बुक डेपोने भरविले आहे. याविषयी बुक डेपोचे संचालक मंदार नेरूरकर म्हणाले, वाचकांना जास्तीत जास्त पुस्तके वाचायला मिळावीत आणि तीही अगदी कमी किमतीत हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे. पुस्तक २५०, ४००, ६०० रुपयांचे असो, ते ५० रुपयांत मिळणार आहे. दादरबरोबरच ठाणे, पनवेल, विलेपार्ले, डोंबिवली आणि बोरिवली या सहा सेंटर्समध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात कथा, कविता, कादंबरी, ललितबरोबर बालसाहित्य, आरोग्य, करीयर, ज्योषित, पाककृती अशा पुस्तकांचा समावेश आहे. आतापर्यंत भरविण्यात आलेल्या सहा सेंटर्समधील पुस्तक प्रदर्शनात २० हजारांहून अधिक पुस्तके विक्रीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

- महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरदार महिला, आबालवृद्ध यांची आज लक्षणीय गर्दी होती. गर्दीतील एकजण म्हणाला, सिद्धिविनायकाच्या रांगेत उभे राहिल्यासारखे वाटते... यावरून गर्दीचा अंदाज यावा! पुस्तक प्रदर्शनात शापित राजहंस, नेपोलियन चरित्र, माझी जन्मठेप, १८५७चे स्वातंत्र्यसमर, काळे पाणी, दिग्विजय, श्यामची आई, महाराणी लक्ष्मीबाई चरित्र, वीरधवल, वज्राघात यांना प्रचंड मागणी आहे.

सौजन्य दैनिक सामना (१८ जानेवारी २०१३)

डॉ. उज्ज्वला दळवी यांचे, सोन्याच्या धुराचे ठसके, या पुस्तकाची आठवडाभरात ३ पारायणे झाली.
त्यांचे काही लेख आधी वाचले होते आणि त्यांची लेखनशैली खुपच आवडती झाली आहे.
१९८५ पासून २५ वर्षे सौदी अरेबियात, एक डॉक्टर म्हणून काम करताना आलेले अनुभव आहेत हे. मी साधारण १९९० नंतर ओमान मधे होतो. त्या काळात कानावर पडलेले, सौदी मधे राहून आलेल्या लोकांचे अनुभव अंगावर शहारे आणायचे. ( सौदीच्या मानाने, ओमान स्वर्गच होता ) डॉक्टरांनी लिहिलेले अनुभव अजूनच विलक्षण आहेत. खरे तर त्यांच्या कार्यक्षेत्रामूळेच त्यांना इतके विविध अनुभव आले. शिवाय गेल्या २५ वर्षांत त्या देशात झालेली स्थित्यंतरे त्यांना बघता आली, त्याबद्दलही खुप छान लिहिले आहे.

सौदी अरेबिया देशाबद्दलचा त्यांचा जिव्हाळा लपत नाही. तिथल्या लोकांचे अत्यंत नेमके चित्रण त्यांनी केलेय.
सौदी मधे सहज येऊ शकतील असे मुतव्वा, सार्वजनिक शिरच्छेद, पोलिस कार्यवाही असेही अनुभव आहेत पण
तिथल्या स्त्रियांच्या कहाण्याही विलक्षण आहेत. काही विनोदी तर काही अत्यंत करुण आहेत.

शेवटच्या प्रकरणातले चिंतन मला खासच आवडले.

या पुस्तकाची माझ्याकडून अनेक पारायणे होणार, हे नक्की.

Pages