मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला- धन्यवाद. वाचला तो लेख. शहाण्यांचे हे काम माहितच नव्हते.

'उदकाचिया आर्ती' - मिलिंद बोकील. मौज प्रकाशन. कथासंग्रह

आज एका झटक्यात वाचले आणि 'मौजे'ची क्षणिक अ‍ॅलर्जी उद्भवली. बहुतेक मला आता मौजेपासून काही काळ फारकत घेणे गरजेचे आहे. बोकील जिथे थांबतात तिथेच नेहमी सत्याची सुरवात होते असे वाटते. 'शाळा' मध्ये तेच. ते प्रत्येक प्रश्न विशीष्ट पद्धतीने मांडतात. Mind you, the questions are hardhitting, the answers maybe a bit superficial.
(कार्यकर्त्यांच्या उर्मी, त्यांचे श्रेयस आणि प्रेयस यांच्या कथा).हे जे प्रश्न तुम्हाला पडतात ते असे उभे आडवे सोलुन काढणारे असतात पण उत्तरे ? ती अशी 'रुचतील' अशीच का? अंमळ सुलभीकरण होतय हो काका.... असे म्हणावेसे वाटते कधीकधी.
(आणि सगळ्याच कथांमध्ये बायका (फुला)फुलांच्या साड्या का नेसतात ते लेखक जाणे. फुलाफुलांच्या साड्या हे इतके म्हणजे इतके क्लिशेड आहे की शै.रा.यो.जो वगैरेंचे राखीव कुरण. बायका त्या फुलाफुलांच्या साड्या नेसून जो काही प्रसन्नतेचा, उत्फुल्लतेचा शिडकावा करणार की वाचल्याबरोबर मला ताबडतोब उभे राहुन 'ऑब्जेशन मिलॉर्ड. मेरे काबिल दोस्त.....' वगैरे म्हणावेसे वाटते. शिवाय ते त्या कार्यकर्त्या बायकांबाबत खरे नाही वाटत समहाऊ. मी अजून वाट पहात होते की कोणी बाई शिवाय त्या फुलाफुलांच्या साड्यांचे पडदे शिवतेय की काय.)
आणि हो स्त्रीपात्रे बरीच तपशीलवार आणि कणखरही रंगवतात ते एकुणात तेही मला कधीकधी आवडते हे नमुद न करणे कृतघ्नपणाचे ठरेल. असो.
तरीपण बोकील मला आवडतात. By elimination rather than choice अनेकजण तसेच आवडतात आजकाल. Sad

'आर्ती' म्हणजे काय? कोणाला माहित असेल तर सांगा कृपया. शब्दकोशातही पाहते. 'आर्ति' (र्‍हस्व) असा शब्दही स्मरतोय.

आर्ती म्हणजे आर्तता . अटलजींच्या हृदय चाहिये कवितेतील ओळी देते म्हणजे लक्षात येईल
आर्त जनोंकी आर्ती मिटाता हृदय चाहिये ..

'एका दिशेचा शोध' - परिचय वाचून मलाही ते अतिशय वाचनीय असेल असं वाटलं होतं. लवकरात लवकर वाचायलाच हवं हे डोक्यात ठेवून ते मिळवलं. पण वाचायला सुरूवात केल्यावर, प्रामाणिकपणे सांगते, मला झोपच येते Sad या पुस्तकाची एक सलग १५-२० पानंही मी एकावेळी वाचू शकत नाहीये. ते काही केल्या पकडच घेत नाहीये. 'लज्जा' नंतर झालेला माझा मोठा भ्रमनिरास Sad

>>> 'लज्जा' नंतर झालेला माझा मोठा भ्रमनिरास

श्याम मनोहर, किरण नगरकर इं. च्या पुस्तकांनी माझा असाच भ्रमनिरास केलेला आहे. ह्यांची पुस्तके वाचवतच नाहीत इतकी दुर्बोध व कंटाळवाणी असतात.

>>> 'खेकसून म्हणतो आय लव्ह यू' वाचलेय का कुणी?

या कादंबरीचे खरे नाव "खेकसून सांगणे, आय लव्ह यू" असे आहे. श्याम मनोहरांच्या इतर पुस्तकांचा अनुभव लक्षात घेता आणि कांदबरीचे शीर्षक बघता, ही कांदबरी सुध्दा अत्यंत दुर्बोध व कंटाळवाणी असण्याची शक्यता आहे.

शाम मनोहरांच्या इतर पुस्तकांचा 'माझा' अनुभव पाहता हे पुस्तकही तितकेच इंटरेस्टींग, अफलातून आणि विचार करायला भाग पाडणारे असेल अशी माझी अपेक्षा आहे. कुणी वाचले असल्यास सांगावे.

अतुल कहाते यांच " च' ची भाषा' नावाचं पुस्तक वाचलं. देशोदेशी पुरातन काळापासुन वापरल्या गेलेल्या सांकेतिक भाषंची खूप छान माहिती आहे.
पहिल्या विशेषतः दुसर्या महायुद्धातली वर्णनं फारच रोचक आहेत.
भारताबद्दल मात्र विशेष माहिती नाही. फक्त चाणक्याचा एकदा उल्लेख आहे.
सत्य हे कल्पिताहून अद्भूत असते हेच खरं !

मी सध्या 'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' नावाचा एक कथासंग्रह वाचते आहे. पुस्तकाचं शीर्षक जरा अवघड आहे. पण पुस्तक चांगलं आहे. लेखक आहेत, प्रशान्त बागड. यातली 'गढी' नावाची कथा मला विशेष आवडली. ४-५ वाचून झाल्या आहेत. जरा वेगळ्या प्रकारचं लिखाण आहे. मराठीत मी तरी अश्या कथा वाचल्याच नाहियेत. ज्यांना ताजं नवं काही वाचयच असेल त्यांनी जरूर वाचा असं सुचवेन मी.

Web Small.jpg

आगावा, एक दोन पानं मागे जा. लिहिलंय मी.
मला श्याम मनोहरांची किंचित बदललेली शैली जाम आवडली. मला आवडले. मनोहरांची नाटकं जितकी कंटाळवाणी तितक्याच त्यांच्या कादंबर्‍या विंटरेस्टिंग.
तर एरवी मनोहर आवडले असतील तर जरूर वाच.

श्याम मनोहर यांचे 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचलं. मुळीच नाही आवडलं. यानंतर त्यांची पुस्तके म्हणजे निदान माझ्यासाठी तरी 'कानाला खडा'!

राजेन्द्र खेर यांचे 'देवांच्या राज्यात' वाचलं. डिस्कवरीसारख्या वाहिन्यांवर पाहिलेल्या विविध माहितीपटांचे चांगले संग्रहण असे मी म्हणेन. काहिसं अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकांसारखं... Very Good (mostly precise) collection of information, but no addition from the author himself. अर्थात वाचक म्हणून माझ्या डोक्यात जास्त माहिती जमा झाल्याशी मतलब, असा माझा दृष्टीकोन असल्याने मला ते तितकसं खुपत नाही. तरी त्या अनुषंगाने कंटाळा आल्याने हे पुस्तक अधून-मधून उगाच वाचिक-सहनशक्तिची परीक्षा घेते.

नरेन्द्र दाभोलकर यांचे 'ठरलं... डोळस व्हायचंच!' वाचलं. अप्रतिम पुस्तक. हातात पडल्यावर वाचून पूर्ण संपल्याशिवाय सोडवलं गेलं नाही. दाभोलकरांचं इकडचं-तिकडचं लिखाण वाचताना त्यांची तर्कशुद्ध मांडणी मला नेहेमीच आवडायची. त्यामुळेही असेल की त्यांचे पुस्तक तेवढेच आवडले.

शांता शेळके यांचे 'संस्मरणे' आणि पुलंचे 'मैत्र' वाचलेत. अपेक्षेपेक्षा 'अती-उच्च' पुस्तके आहेत. मी अगदी पुरवून पुरवून वाचली. अशी पुस्तके कधी संपावी, असं वाटतच नाही, हो की नाही?

आता लक्ष्मीबाई टिळक यांचे 'स्मृतीचित्रे' संपत आलंय. सुरुवातीला त्यांच्या भुमिकेत शिरायला मला थोडा वेळ लागलाच. पण त्यांचा लेखनातला प्रामाणिकपणा इतका छान आहे की शेवटी आपण त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतोच. 'मराठीतले आद्य आत्मचरीत्र' असा जो त्याचा उल्लेख सगळे करतात, तो सार्थ असल्याची खात्री पटायला लागली आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे इतके काही आहे की मी हे पुस्तक इतक्या उशिरा का वाचतेय, याचा मला पःश्चाताप होतोय.

यानंतर सुनीताबाईंचं 'सोयरे सकळ' आणि पुलंचं 'मुक्काम शांतिनिकेतन' वाचायला घ्यायचीय.

धारा,
यु मेड माय डे. गोडबोल्यांबद्दल अनुमोदन. Happy
गोडबोले वरून ती माहिती जशी काय आपणच निर्माण केली असाही आव आणतात. अरे.. माहितीच आहे ना नुसती? ज्ञान आहे का ते ? मग एवढ्या डिंगा कशाला?
हुशार असावेतच, पण अति झालं नी हसु आलं त्यातली गत.

बाकी त्यांनाच का दोष द्या म्हणा. लै माज हे आपल्या साहित्यिकांचे व्यवच्छेदक लक्षण. अत्र्यांपासून नेमाड्यांपर्यंतची दैदिप्यमान परंपरा.

मी शाळा-कॉलेजात असताना ते वर्तमानपत्रात विदेशी व्यावसायिकांबद्दल, शास्त्रज्ञांबद्दल, अर्थतज्ज्ञांबद्दल एवढं लिहायचे.. मी अक्षरशः भारावून जायचो.. किती अभ्यास या माणसाचा. त्यांनी एवढं तेही चक्क मराठीत आणून पुढ्यात ठेवलंय आणि आपण वाचायचे नाही म्हणजे करंटेपणा असं वाटून वाचून काढायचो. नंतर ते सगळं नेटवरून घेतात असं वाचनात आलं.. तरी धारा म्हणतात तसं 'वाचक म्हणून माझ्या डोक्यात जास्त माहिती जमा झाल्याशी मतलब, असा माझा दृष्टीकोन असल्याने मला ते तितकसं खुपत नाही.' असं काहीसं.

श्याम मनोहरांची 'मी उत्सुकतेने झोपलो', 'कळ', 'शीतयुद्ध सदानंद', 'हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव' वगैरे लईच आवडल्याने त्यांची इतरही पुस्तके आणून ठेवली आहेत.

धारा, गोडबोल्यांबद्दल अगदी अगदी सेम मत!!!
'मुक्काम शांतिनिकेतन' बरोबर वंगचित्रे ही वाचच, आणि 'रविंद्रनाथ- तीन व्याख्याने' देखील.
रसग्रहण स्पर्धेसाठी ''उत्सुकतेने मी झोपलो'च पहिला चॉइस होता, पण ते बहुतेक २००८ नंतरचे असावे

गोडबोले इकडुन तिकडुन गोळा करुन लिहित असतीलही पण ते रंजक/रोचक असते. प्रत्येक लेखकाचे स्वतःचे addition हवे अशी अपेक्षा का? आणि ते माज करतात(कुठे? कधी?) हे बघायला कोण जातय ?

लहान मुलांना वाचायला / भेट द्यायची असतील तर दोन चांगली पुस्तके आहेत हॅनाची सुटकेस ,आजी आजोबांची पत्रे दोन्ही अनुवाद चांगले आहेत.

प्रत्येक लेखकाचे स्वतःचे addition हवे अशी अपेक्षा का?>>> एकदम बरोबर त्यापेक्षा 'विकीपीडीया'च वाचावा Wink

नुकतेच 'शांताराम' वाचले. अपर्णा वेलणकरांनी अनुवाद केला आहे.
स्पीड पोस्ट, ब्रेड विनर, फौजीया ही पुस्तके आवडली होती.
god of small things चा अनुवाद ही वाचला होता.
पण यावेळी मात्र 'शांताराम' अर्धेही रेटवू शकले नाही.
गुन्हेगारी ,झोपडपट्टीतले जगणे , ड्रग्स ची दुनिया ,गूढ पात्रे याचा नंतर उबग येतो.
अर्धे पुस्तक फक्त चाळले.
एवढया 'मोठया' (पानांची संख्या) पुस्तकाचा अनुवाद - त्यासाठी hats off !

@arc : लहान मुलांच्या पुस्तकाच्या सल्ल्याबद्दल मनापासून आभार. माझा नेहेमीच तो घोळ असतो. त्यामुळे मी 'तोत्तोचान' आणि 'देनीस' सोडून दुसरे काही भेट तरी देऊ शकेन. Happy

गोडबोले इकडुन तिकडुन गोळा करुन लिहित असतीलही पण ते रंजक/रोचक असते.
>>> पूर्ण मान्य. म्हणून तर आपण त्यांची पुस्तके वाचतो. त्यांच्या बुद्धी किंवा कर्तृत्वाविषयी शंकाच नाही.

प्रत्येक लेखकाचे स्वतःचे addition हवे अशी अपेक्षा का? आणि ते माज करतात(कुठे? कधी?) हे बघायला कोण जातय ?
>>> मला वाटते की प्रत्येक लेखकाने काही तरी स्वतःहून लिहिलं असेल तरच 'लेखक' म्हणून स्वतःचं नाव टाकावं. नाही तर 'संग्राहक' किंवा तत्सम काही तरी उपाधी घ्यावी. अगदीच नाही तर किमान कुठून माहिती गोळा केलीय, ते स्पष्टपणे लिहावं. तसं न केल्याने 'माज करतात' सारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया रास्त ठरतात.

एकदम बरोबर त्यापेक्षा 'विकीपीडीया'च वाचावा
>>> पण ते सगळ्यांना शक्य नसतं. शिवाय विकीपीडीया वाचणं गोडबोलेंच्या पुस्तकापेक्षा जास्त कंटाळवाणं असू शकतं. माझ्या आई-वडीलांवर तो प्रयोग मी करून पाहिला आहे. सामान्य/कधीतरीच वाचणार्‍या वाचकाला त्यांच्या पुस्तकांतून्/सदरांतून योग्य ती माहिती योग्य प्रकारे मिळते, हे जास्त महत्वाचे! त्यामुळे मी खरं तर अशा पुस्तकांचे स्वागत करते.

'खेकसून म्हणतो आय लव्ह यू' वा "खेकसून सांगणे, आय लव्ह यू" असे नसून ते 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' असेय. काही का असेना पण पेशन्स ठेऊन वाचलं. नाही आवडलं!
त्यांच 'उत्सुकतेने मी झोपलो' हेच चांगलं वाटतं आतापर्यंततरी.

Pages