मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचलेल्या पुस्तकाबद्दल नाही, पण येऊ घातलेल्या पुस्तकाबद्दल. नेमाड्यांची 'हिंदू' ही अनेक वर्षं येणार म्हणून चर्चेत असलेली कादंबरी पॉप्युलर प्रकाशनातर्फे १५ जुलैला प्रकाशित होते आहे. तिचा लोकसत्तेत आलेला हा काही भाग -

चिं.त्र्यं. खानोलकर यांचे 'गणुराया आणि चानी' वाचले. जि.एं च्या कथांसारख्या अत्यंत अस्वस्थ करणार्‍या कथा.

'गणुराया' मधला फक्त पत्रातुन भेटणारा बाळकोबा अगदी संताप आणतो. 'चानी' चा शेवट तर कितीतरी वेळ मनातुन जातच नाही. पण तिच्या वागण्याचे कोडेही सुटत नाही.

एकदा जरुर वाचा. अगदी वेगळ्या आहेत दोन्ही कथा.

जगन्नाथ कुंटेंची 'नर्मदे, हर हर' वाचली.
लॉजिक, रिझनिंग इ.इ. बुप्रा आयुधे बाजूला ठेऊन आपल्याला काही वाचता येउ शकते हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. प्रत्येक पानावर स्वतःचा मोठेपणा ठसवायचा प्रयत्न लेखकाने का केला आहे ते मात्र कळले नाही. पण परिक्रमेचे वातावरण, निसर्ग,रितीरिवाज इ. माहितीमुळे एका सररिअल जगाची ओळख होते.

मी कॉलेजात असताना म्हणजे २०+ वर्षांपूर्वे गणुराया आणि चानी, एक शून्य बाजीराव ही खानोलकरांची पुस्तके वाचली. चानीचा शेवट पाठलाग करतो, खरे आहे.

कालच "एका स्टुडिओचे आत्मवृत्त" वाचले. मला तरी पुस्तक आवडले.. जयप्रभा स्टुडिओच्या सर्वच वादविवादाना दूर ठेवून फक्त आणि फक्त चित्र निर्मिती, त्या अनुषंगाने येणारे लोक एवढ्यावरच पुस्तक लिहिलय.

दंगलीत जळालेल्या स्टुडिओचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. मला सर्वात जास्त "मोहित्याची मंजुळा" हे प्रकरण आवडले. Happy छान लिहिलय.. पुस्तकाचे फोटो न वापरता रेखाचित्रे वापरली आहेत, त्यामुळे पुस्तक वाचताना स्टुडिओचा फील येत राहतो. (ज्याने सेटवर काम केलय त्याला हे नक्कीच जाणवेल)

सध्या मी शिवाजी सावंत यांची "छावा" कादंबरी वाचतोय. त्यातील "आग्र्याहून सुटका" हा प्रसंग मला वेगळा वाटला. आतापर्यंत मी ऐकलं होतं की, महाराज आणि शंभुराजे मिठाइच्या पेठार्‍यातून फरार होतात.
पण या कादंबरीत महाराज हिरोजीचं वेशांतर करून पलायन करतात (अर्थात हिरोजी महाराजांचं वेशांतर करून बंदीवासात राहतो.) आणि शंभुराजे अटकेत नसल्यामुळे ते आधीच कुंभारवाड्यात असतात...

यातील नक्की प्रसंग कोणता ?

पेठार्‍यातून पलायनाचा की "छावा"मधला?

'गानयोगी' नावाचे पंडीत मल्लीकार्जून मन्सूर यांच्यावरचे पुस्तक वाचले. पं. मन्सूरांनी कानडीमधे जे आत्मचरित्रपर लेख लिहिलाय त्याचे उमा कुलकर्णी यांनी केलेले भाषांतर, राजशेखर मन्सूर (त्यांचा मुलगा), लक्ष्मी पाटील (मुलगी), पुल, सुनिताबाई वगैरेंचे लेख आहेत. पं. मन्सूरांबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक एक्दम छान आहे. त्यांच्या गाण्याबद्दल खुप लिहिले आहे. संग्राह्य पुस्तक आहे.

आधी कधी लिहिलं असेल तर सॉरी.. पण शिवराम कारंथांची 'डोंगराएवढा' ही कादंबरी वाचाच..
अत्यंत तरल, साधं, सरळ आणि सुंदर पुस्तक आहे!

ॠजुता दिवेकरचे 'लूज युवर वेट नॉट युअर माईंड' वाचले. भाषांतर अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला वजन कमी करायची गरज असो वा नसो, केवळ त्यातल्या फ्रेशनेससाठी वाचा.

कोणी सेल्फ हेल्प बुक्स वाचते का? आनि त्याचा काही उपयोग होतो का?
मी time management वरचे एक पुस्तक वाचले होते, आणि त्यातल्या काही गोष्टी खुप छान होत्या. फक्त लेखकाचा कामसाठी, उत्पादकतेसाठी काम हा दृष्टिकोन अतिरेकी वाटला. आनंदासाठी समाधानासाठीही काम केले जाते, हे त्याला मान्य नसावे. लेखकाचे नाव शोधून लिहीन.

भरत, तू वरती लिहिले आहेस त्याप्रमाणे वाचली तर ही पुस्तके चांगली असतात, विथ अ पिंच ऑफ सॉल्ट!
कोणत्यातरी पुस्तकात आपल्या सर्व प्रॉब्लेम्सचे उत्तर मिळेल किंवा त्याप्रमाणे वागल्यास प्रॉब्लेम सुटतील हे निव्वळ भाबडेपणाचे असते. त्यामुळे ही पुस्तके आपले अनुभव, गरज, याबरोबर सतत पडताळून पाहणे केंव्हाही चांगलेच.
ते फार मनावर घेउ नये! अशा पुस्तकाने व्यक्तिमत्व विकास होतो याबद्दल मला जाम शंका आहे
मला आत्तापर्यंत सगळ्यात पटलेले सेल्फ हेल्प पुस्तक - 'सेव्हन हॅबिट्स ओफ हायली इफेक्टीव्ह पीपल'. त्यातल्या काही कंसेप्ट्स एकदम जबरदस्त आहेत.

'सेव्हन हॅबिट्स ओफ हायली इफेक्टीव्ह पीपल'.>>> बाबत सहमत त्यातील तो Quadrants concept प्रचंड उपयोगी आहे. मलाही असे वाटते की या पुस्तकांतील काही snippets चांगले असतात. बाकी पुस्तक म्हणजे त्यावरच एक २००-३०० पानी पुस्तक निर्माण करण्यासाठी घातलेले फिलर्स वाटतात.

मधे अमेरिकेत Getting things done चे बरेच फॅड आलेले होते. ते ही चांगले आहे, पण एका मर्यादेपर्यंतच त्याचा उपयोग आहे. येथे माहिती मिळेल.

व्यक्तिमत्व विकास होतो की नाही माहित नाही, पण आपल्या काही चुकीच्या सवयी घालवायची, चांगल्या सवयी बाणवायची जाणीव तरी होऊ शकते. वर्तनसुधार नक्कीच होत असावा.

भरता, नाहितरी मनाचे श्लोक तरी वेगळं काय सांगतात >> 'सेवन हॅबिट्स' ची सुरुवातच 'यात नविन काहीही नाही जे आहे ते सर्व भाषा-धर्म-संस्कृतींनी आधीच' सांगीतले आहे' या कबुलीने होते. त्यांचा हा प्रांजळ्पणा मला आवडला.

सेल्फ हेल्प पुस्तकांची खिल्ली उडवणारे "i moved your cheese' नक्कि वाचा. अर्पणपत्रिकेपासुन,अभिप्रायापर्यंत प्रचंड पाय खेचलेले आहेत्.पण ते समजायला आधी who moved my cheese वाचावे लागेल.

कविता महाजनचं भिन्न वाचलं.. डोकं सुन्न झालय गेले २ दिवस! दुसरं कुठलं पुस्तक हातातच नाही घेऊ शकले अजून.. Sad
आपण आणि आपली मध्यमवर्गीय सुखदु:ख.. छोट्या छोट्या गैरसोयींवर कुरकुर करायची सवय - सगळच चाकोरीतलं..
आपल्या चाकोरी बाहेरही जग आहे आणि आपण त्या जगाचा भाग नाही हे जाणवलं - तर आहे त्या आयुष्याबद्दल कृतज्ञताही वाटायला लागते आणि ज्यांचं आयुष्य असं नाही त्यांच्याबद्दलची आपली तटस्थताही गळून पडते!

खरच सुन्न झालय डोकं!

जमेल तेव्हा रिव्ह्यू लिहिन..

भिन्न वाचायचय, लायब्ररित क्लेम लावलाय.

कविता महाजनच "ग्राफिटी वॉल" वाचलं. वाचताना तिच्या बरोबरिने अस्वस्थ झाले, कधी वेगळच जग भस्सकन अंगावर आल्यामुळेची अस्वस्थता त्यात मिसळत होती.एकुणात आवडल पुस्तक.

Pages