गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझि पुतणि जन्म झाली तेव्हा लालसर काळी होति. पाण आता १० महिने झालेत तिला विश्वास बसणार नाही एवढी गोरी झाली आहे.

mala garbhadharna kashi hote ya baddal purna detail denari site aahe ka kiva koni mala sangel ka?

रिमा, माझा मुलगा आता १५ महिन्यांचा आहे. मला नाही वाटत त्याचा रंग उजळेल. अर्थात, ते काही फार महत्वाचे नाही. गुणांनी "गोरे" असणे महत्वाचे! मला फक्त एवढेच सांगायचे होते की, आपले काही गैरसमज असतात आणि, आजुबाजुची माणसे त्यात भर घालत असतात. मलाही प्रत्यक्ष अनुभवानेच पटले.

हे फक्त इथल्या नवीन मातांसाठी! उगीच जास्त विचार करु नका. "Enjoy your pregnancy. These are very special days. Make yourself feel special"

रिमा, माझा मुलगा आता १५ महिन्यांचा आहे. मला नाही वाटत त्याचा रंग उजळेल. अर्थात, ते काही फार महत्वाचे नाही. गुणांनी "गोरे" असणे महत्वाचे! मला फक्त एवढेच सांगायचे होते की, आपले काही गैरसमज असतात आणि, आजुबाजुची माणसे त्यात भर घालत असतात. मलाही प्रत्यक्ष अनुभवानेच पटले.>>

अगदी अगदी. हि गोष्ट अगदि १००% बरोबर आहे.
अश्विनी मि हि पोस्ट माझा केवळ एक अनुभव जो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठीसुध्धा (माझ्या शिवाय माझे सगळे फ्यामेलि मेंबर डॉक्टर आहेत) पहिलाच होता म्हणुन टाकला. म्हटल शेयर करुयात मायबोलिकरांबरोबर. तिचा रंग तिसर्‍या महिन्यापासुन उजळायला सुरवात झाली. मला तरी फार आश्चर्य वाटल पाहुन.

Thank you, Ashwini
mala marathitun konti site milel ka? jyamade he sarva dile aahe.

मला साडेचार महिने झालेत.
सोनोग्राफी मधे डॉ. म्हणले की सर्व नॉर्मल आहे. बाळाचे वजन १८४ ग्राम इतके दाखवले. ट्रिपल मार्कर रिपोर्ट देखील नॉर्मल आलाय. माझे खाणे पिणे अजिबात बदललेले नाही. उलट आईकडे असल्यामुळे निवांत आरामात आहे.
पहिले चार महिने मी योगासने करत होते. सध्या बंद केलय.

पण माझे वजन अजिब्बात वाढत नाही. पोट देखील दिसत नाही. आता मी काय करू??? Sad

Madhurani23,
होम प्रेग्नन्सी टेस्ट घ्यायला सांगा की तिला! भारतात ५० रु ला मिळते! सोपी असते!
(मी उत्तर द्यायला खूप उशिर नाही केला, अशी आशा आहे)

नंदिनी, तू एकटीच नाहीस. बर्‍याच जणींचं पोट आणि इन जनरल वजन ५-६ महिन्यांपर्यंत सुद्धा वाढत नाही, पण नंतर झपाट्यानं वाढतं. मला वाटतं त्यात काहीच अ‍ॅबनॉर्मल नाहीये. काळजी न करता मस्त एंजॉय कर हे दिवस.

बर्‍याच जणींचं पोट आणि इन जनरल वजन ५-६ महिन्यांपर्यंत सुद्धा वाढत नाही
>> कित्ती छान! माझं वजन आणि पोट (काहीच नसतानाही) जाता येता वाढतं.. २ दिवस व्यायाम बुडला- काही अवांतर खाल्लं, की लगेच तिसर्‍या दिवशी परिणाम दिसतो Sad
(विषयांतराबद्दल क्षमस्व.. हे दु:ख मी खरतर 'कुणाशीतरी बोलायचय' बाफ वर टाकलं पाहिजे Wink )

जोकस अपार्ट, नंदिनी, माझी एक मैत्रिण सात महिन्याची आहे, तिचही वजन फारसं वाढलं नव्हतं पाचव्या महिन्या पर्यंत... त्यामुळे मो म्हणतेय तसच होईल!

नंदिनी पहिलीच वेळ असेल तर शक्यतो पाच महिने पुर्ण होईपर्यंत नाही दिसत पोट. बाकी सगळे नॉर्मल असेल तर कशाला काळजी करायची. वजनाचे म्हणशील तर पहिल्या तीन महिन्यात उलट्या-मळमळीने कमी होते वजन आणि चवथ्यात ते वाढुन नॉर्मलला येते.त्यामुळे दिसत नाही. त्यानण्तर वाढलेले मात्र दिसेल लगेच म्हणजे काटा दाखवेल. Happy
ऑल द बेस्ट गं.

मला उलटी मळमळ चक्कर वगैरे काहीच त्रास झाला नाही. Happy

आणि आता वजन वाढत नाही हीच एक चिन्ता. मला तर अजून मी गरोदर असल्यासारखे वाटत पण नाही.

कित्ती छान! वजन आणि पोट (काहीच नसतानाही) जाता येता वाढतं.. २ दिवस व्यायाम बुडला- काही अवांतर खाल्लं, की लगेच तिसर्‍या दिवशी परिणाम दिसतो>>> तुला अजून जळवू का??? मी किती खाल्लं. तूप्/लोणी किंवा अजून काहीही जंक फूड. किंवा घरातच बसून असले तरी माझे वजन वाढत नाही.

सर्वानी "आता चांगली गुटगुटीत होशील" वगैरे सांगितले होते. मी अजून तशीच खुटखुटीतच आहे Proud

मी ५.४ वीक्स प्रेग्नन्ट आहे. ब्राउनिश डिस्चार्ज होतो आहे. ते कॉमन आहे का? कुणीतरी सान्गा क्रुपा करुन. प्लीज प्लीज प्लीज.

Namaskar,

Majhe naav Uma aahe. Mi Singapore la aaste. Mi 5 weeks pregnant aahe.

Niyamit shatavari ghet aahe. Balaji Tambe yanche Garbhasanskar vachat aahe.

Tyamadhe Suvarnasidhha Jal pinyas sangitale aahe.

Majhi prakuti jatyach ushna aahe.

Tyamule majha prashna aasa aahe ki, jar mi Suvarnasiddha jal pinyas suruvat keli tar balala kahi problem tat nahi na honar?

Aani aajun ek mhanje, mala ulatya vagire kontach pregnancy chi lakshane janvat nahiye. So is it normal?

pls pls madat haviye.

Dhanyavad...

Namaskar,
Mala ek vicharayache aahe. Aamhi balasati prayatna karto aahot? Gelya Mahinaya mazhe period chukun 5 divas extra zale. Ani mag 10 divsanantar period aala. Koni mala Bal honyasati guide karel ka? Mazya prashnache uttar dya.

Aani aajun ek mhanje, mala ulatya vagire kontach pregnancy chi lakshane janvat nahiye. So is it normal?

>> हे नॉर्मल आहे, बर्‍याच जणांना काहीच त्रास होत नाही. काहिंना ५ महिने,७ महिने अगदी डिलीव्हरी पर्यंत सुद्धा उलट्या होतात...
नंदु अभिनंदन!

Namaskar saglyana

Mala ek vicharayache aahe. Majya period 30 tarek la aala. (28 Days) ne regular period yeto. Mala Bal honyasati Kontya Divsat Praytna Kele Pahije tya Dates Sanga. Ani Tyasati konta timing asto ka? Konta course asto ka? yasati uttar have aahe.

laggech uttar denyat yave hi apeksha.

isha_2083 :
fertility calculator असे गुगल वर search करा. सगळी शास्त्रशुद्ध माहिती मिळेल.

थोडस विषयांतर आहे, माफी असावी पण कुठे विचाराव कळत नाहीय म्हणुन इथे लिहितेय,
डिलीव्हरी नंतर येणारी मासिक पाळी आधीप्रमाणेच एकदा चालु झाली की नियमीत दर महिन्याला येते का?
की थोडा गॅप ठेवुन? माझी डिलीव्हरी नंतरची पाळी प्रथमच फेब. मध्ये आली होती त्यानंतर अजुन पर्यंत नाही तर अस होऊ शकत का? माझी आधी रेग्युलर असायची महिन्याच्या महिन्याला. पाळी लवकर येण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का? पपई खाऊन झाला Happy गावी जायच आहे हा 'प्रोग्राम' आटपुन. तरी योग्य मार्गदर्शन करावे.........

शिल्पा परत एकदा प्रेगनसी टेस्ट करून घे. कधी कधी परत लगेच कन्सीव होउ शकते.( राग मानू नकोस )

धन्यवाद मामी, पण ती शक्यताच नव्हती तरी टेस्ट करुन झालीय, निगेटिव्ह्च आहे. पाय, कंबर, पाठ अतिशय भयंकर दुखतायत, एकंदर लक्षण सगळी पाळी येण्याच्यावेळचीच आहेत गेले ८-१० दि. पण काही परिणाम दिसत नाहीय, जितके माहीत आहेत तेवढे गरम पदार्थ खाऊन झालेत तरीही सुद्धा काहीच नाही.
कसलातरी काढा घेतात अस खुप आधी ऐकल होत कोणाला माहीत आहे का?

़कहर आहे. या गोष्टी तज्ज्ञ डॉक्टरांना विचारायच्या सोडून इथे का विचारताय? असतील नसतील ते गरम पदार्थ खाऊन बघणे, कसल्या काढ्याची चौकशी.... स्वतःच्या तब्येतीशी असले नसते खेळ कशाला?

श्रद्धा डॉक्टरांना विचारुन झालेय म्हणुन तर टेस्ट केली त्यांच्या समाधानाखातर, त्यांच्या मते काहीच प्रॉब्लेम नाहीय, आणि तरिही डिले होतोय म्हणुनच टेन्शन आलय, सहन होत नाही नी सांगताही येत नाही असे झालेय Happy शिवाय सुटिचे सगळे प्लॅन्सहि कोलमडतायत. म्हणुन इथ्ल्या जाणकार नी अनुभवी स्त्रियांची मदत घेतेय कळ्ळ?? काहि वेळा डॉक्टरी सल्ल्यापेक्षा अनुभवच उपयोगी पडतो........

Pages