गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

Submitted by सुबोध खरे on 14 March, 2020 - 04:32

गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

१) गरोदर स्त्रीला आपल्या बाळाबद्दल सदा काळजी लागलेली असते. त्यातून शेजारची बाई काही तरी असे बोलून जाते. अगं तू काहीच खात नाहीस मग मुलाचा पिंड कसा पोसला जाणार? बस एवढं पुरेसं असतं.

एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. गर्भारपण हे ४० आठवड्याचं असतं त्यात २० आठवड्याला गर्भाचे वजन साधारण २५० ते ३०० ग्रॅम असतं आणि लांबी ५ इंच म्हणजे साधारण ५ इंच लांबीची पाव किलोची काकडी.
जर आपले वजन ५० किलो असेल आणि आपण जास्तीत जास्त दिवसात ४ मॅगी नूडल्स खाऊ म्हणजेच ४०० ग्राम
मग पाव किलोच्या वाढत्या मुलाला खायला किती लागेल? २ ते ४ ग्राम. म्हणजे ताणून कितीही ताणले तरी ग्लुकोजचे एक बिस्कीट.
मग असे असताना गर्भाचे कुपोषण होईल का?

संततिनियमनाची साधने उपलब्ध होण्यापूर्वी पूर्वी मुलींचे १०-१२ वर्षे वयाला लग्न होत असे आणि १४-१५ व्य वर्षी गर्भारपण येत असे आणि दर दोन तीन वर्षाला पाळणा हालत असे अशा वेळेस कोवळ्या मुलीला जिची स्वतःचीच वाढ पूर्ण झालेली नसते तिला स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असे. यास्तव तिला भरपूर खायला घालणे हि आपली परंपरा बनली आहे.

आता परिस्थिती खूपच वेगळी आहे. मुली उशिरा लग्न करतात तो वर त्यांच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली असते त्यातुन एक किंवा दोनच मुले होतात. यामुळे आहारा बाबत इतका बाऊ करण्याचे कारण राहिलेले नाही.
लक्षात ठेवा -- विहिरीत पाणी किती आहे याचे पंपाला काही घेणे देणं नसते. पाणी संपेपर्यंत पम्प आपल्या गतीने पाणी खेचत असतो.
तसेच बाळाला जितके हवे आहे ते स्वतः आईकडून घेत असते. आईच्या शरीरात कमालीची कमतरता होईपर्यंत बाळाच्या पोषणात कमी येत नाही. आणि अशी स्थिती निदान ज्या स्त्रिया हा लेख वाचत आहेत त्यांची येणार नाही अशी माझी खात्री आहे.

२) गरोदरपण हि एक निसर्गाची किमया आहे. सख्ख्या आई किंवा बापाकडून रोपण(transplant) केलेली किडनी जगवण्यासाठी फार कष्ट काढावे लागतात. इथे तर नवरा आणि बायकोत कोणतेही रक्ताचे नाते नसताना स्त्रीच्या गर्भाशयात राहिलेले गर्भ नुसताच जगत नाही तर हजारो पटीने वाढतो. आता हे बाहेरून आलेलं बाळ स्विकारण्याच्या अगोदर स्त्रीचे शरीर काही तरी प्रतिक्रिया देणारच.
याला GVHD (GRAFT VERSUS HOST DISEASE) म्हणतात. स्त्रीच्या शरीरात वाढत्या गर्भामुळे संप्रेरके(हॉर्मोन्स) मोठ्या प्रमाणात तयार होतात. यामुळेच पहिल्या काही महिन्यात स्त्रीला मळमळणे उलट्या होणे चक्कर येणे अशी लक्षणे होतात. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना "पोटात पाणी सुद्धा टिकत नाही"सारखा सुद्धा त्रास होतो.
पण यामुळे वाढणाऱ्या बाळाला काहीही अपाय होत नाही किंवा बाळाची वाढ कमी होत नाही. पहिल्या २० आठवड्यात आईचे वजन अजिबात वाढले नाही तरी बाळावर कोणता परिणाम झाल्याचे अजूनपर्यंत तरी निदर्शनास आलेले नाही.

या नॉशिया साठी आले लिंबाचे पाचक बऱ्याच दुकानात मिळते ते दिवसात ५-७ वेळेस घ्यावे. नाहीतर आले किसून त्यात लिंबाचा रस मीठ साखर आणि हलकेसे पादेलोण घालून फ्रिज मध्ये ठेवा आणि दर दोन तीन तासांनी हे मिश्रण चमचा भर खात राहा. लक्षात ठेवा आल्याच्या रसात उलटी थांबवणे आणि नॉशिया कमी करणे हा गुण आहे असे सिद्ध झाले आहे. बाकी सारे घटक केवळ त्याला पूरक/ चव वाढवणारे आहेत. डॉक्सीनेट हे औषध सुद्धा उलटी साठी मिळते जे गर्भारपणात सुरक्षित आहे ते आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच घ्यावे. परंतु शक्य असेल तर औषध टाळून वरील नैसर्गिक उपाय प्रथम करून पाहावा. अगदीच निरुपाय झाला तर औषध घ्यावे अशा मताचा मी आहे.

३) गरोदरपणामुळे जी स्त्रीच्या शरीरात संप्रेरके तयार होतात त्यामुळे तिची पचन संस्था मंद होते. यामुळे स्त्रीयाना जेवण लवकर खाली न उतरणे आम्ल पित्त होणे हा त्रास होतो. यासाठी एका वेळेस भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळेस हळू हळू थोडे थोडे खाणे हे श्रेयस्कर असते. आम्ल पित्त झाल्यास गोड ताक, दूध सारखे साधे सोपे उपाय करावेत आणि शतपावली सारखे थोडे फार चलन वलन करावे ज्यामुळे अन्न खाली जाण्यास मदत होते. अँटासिड शक्य असेल तर टाळावे. "जरा काही झाले" तर डायजीन/ जेल्युसील च्या किंवा ranitidine/ ओमेप्रॅझॉल च्या गोळ्या घेणाऱ्या सर्रास दिसतात.
लक्षात ठेवा पोटात आम्ल तयार होते ते प्रथिनाचे पचन होण्यासाठी आणि अन्नातील जंतू मारण्यासाठी.
तुम्ही सदा सर्वकाळ अँटासिड घेतले तर या दोन्ही गोष्टींना प्रतिबंध होईल.

३) काही स्त्रियांना जुळं आहे असे सोनोग्राफीत दिसतं तेंव्हा पासून त्यांना चिंता लागून राहते कि आपलं कसं होणार. एक लक्षात ठेवा कि जुळी मुले होणं हे काही विशेष किंवा वेगळं नाही. दर २५० गरोदरपणात एका स्त्रीला जुळं होतं. वंध्यत्व वरील उपचारामुळे आता हे प्रमाण पाच पट म्हणजे पन्नासात एकीला होतं.
मुळात जुळी मुलं होणं हे काही अप्रूप आश्चर्य नाही रामायण काळापासून जुळी मुलं होत आली आहेत. लव आणि कुश हे जुळे होते.
निसर्गाने शरीर रचनाच अशी केली आहे कि पोटाशी हाडे नसतात त्यामुळे पोट कितीही मोठे होऊ शकते.
जुळ्या मुलांची वाढ कमी असते, त्यांना रक्तपुरवठा कमी पडतो याला कोणताही शास्त्राधार नाही. अर्थात दोन मुले पोटात असल्यावर स्त्रीला जास्त त्रास होतो हि वस्तुस्थिती. पण त्याचा एवढा तणाव घेण्याची गरज नाही.
ज्या स्त्रियांना असा तणाव होतो त्यांनी सीतामाई चा फोटो आपल्या मोबाईल वर वॉल पेपर म्हणून लावावा. जर कधी निराश विचार मनात आले तर त्या कडे पहा
सीता माईने दोन्ही मुलांना वनात नवरा जवळ नसताना जन्म दिला आणि वाढवले होते.मग आपण त्यापेक्षा किती तरी सुखात आहोत.

४) गर्भसंस्कार-- हा एक अत्यंत वादाचा मुद्दा आहे. गर्भ संस्कार केले म्हणून मूल हुशार होईल आणि नाही केले म्हणून ते सुसंस्कारित होणार नाही याला कोणताही आधार नाही. आताशा याची दुकाने बरीच निघाली आहेत आणि ते याचा जोरदार प्रचार हि करत असतात. जोवर आपण काही मंत्र किंवा संस्कार आपल्या मनाला आधार म्हणून करत आहात तोवर ठीक आहे.
कोणी आपल्याला हे विकू पाहत असेल तर त्याला मनाई करा असेच माझे मत आहे.
माझ्याकडे आलेल्या एका गर्भसंस्कारांच्या खंद्या पुरस्कर्त्याशी सोनोग्राफी करताना झाला संवाद असा आहे.
खंपु -- डॉक्टर बाळाला कान असतात ना?
मी -- हो. ते दिसत आहेत ना?
खंपु-- मग त्याला ऐकू येतच असेल.
मी-- हे कसं ठरवणार?
खंपु-- मग अभिमन्यूने कसं चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान आत्मसात केलं?
मी -- तुम्ही म्हणत आहात तर ऐकू येतं असं आपण मान्य करू
खंपु-- बाळाला ऐकू येत असेल तर त्याला मंत्र समजत पण असतील.
मी -- हे कसं काय? मी जर तामिळ मध्ये मंत्र म्हटले तर तुम्हाला ऐकू येतील कि नाही?
खंपु-- हो
मी -- पण तुम्हाला ते समजतील का?
खंपु-- नाही
मी -- का?
खंपु-- माहित नाही
मी -- जोवर तुम्ही तामिळ भाषा शिकत नाही म्हणजेच तुमच्या मेंदूत तामिळ भाषेचं ऍप डाउनलोड होत नाही तोवर तुम्हाला ते समजणार नाही. बरोबर?
खंपु-- हो बरोबर. पण मंत्रांचा काही तरी चांगला परिणाम होतच असेल कि नाही?
मी -- होत असेलही. पण तुम्ही गर्भसंस्कार किती वेळ घेता?
खंपु-- आठवड्यात तीन वेळेस एक तास असे चार आठवडे म्हणजे बारा तास ( याची किंमत २४००० होती)
मी -- जर आठवड्यात ती स्त्री तीन तास गर्भसंस्काराचे मंत्र ऐकत असेल आणि त्याचा चांगला परिणाम होत असेल तर ती रोज सासूसुनेची धारावाहिक दोन तास पाहते म्हणजे आठवड्यात १४ तास तर त्याचा दुष्परिणाम पण व्हायला पाहिजे कि नाही? कारण नेहमी यात सासू सुने विरुद्ध कट करत असते आणि सून सासू ला सरळ कसे करायचे याचे कारस्थान करत असते किंवा दोन स्त्रिया एकाच नायकावर लाईन मारत असतात आणि एकमेकींना मात कशी द्यायची याचे खल करत असतात. मग जास्त परिणाम कशाचा होईल
खंपु-- नाही म्हणेज तसंच काही नाही .....
मी -- जर मंत्र ऐकू येत असतील आणि त्याच्या ध्वनीचा सुपरिणाम होत असेल तर या कट , कारस्थान, खल आणि आरडा ओरडा याचाही दुष्परिणाम व्हायला पाहिजे कि नाही?
खंपु -- कदाचित तुमचं बरोबरहि असेल ......
असं गुळमुळीत उत्तर देऊन गायब झाले.

५) जालावर किंवा व्हॉट्स ऍप विद्यापीठात मिळते ती माहिती असते आणि त्याचा स्रोत खात्रीचा असेलच असे सांगता येत नाही.दुर्दैवाने आपले जवळचे नातेवाईकसुद्धा अशी ढकलपत्रे खरी मानून यंव कर त्यंव कर सांगत असतात. तेंव्हा आपल्याला दोन कान आहेत हे ध्यानात ठेवावे. आपले स्त्रीरोग तज्ज्ञ काय सांगतात तेच बरोबर असे गृहीत धरा. प्रत्येक स्त्रीने एक डायरी करुन ठेवावी ज्यात आपल्याला आलेल्या शंका नोंद करून ठेवा म्हणजे जेंव्हा आपण डॉक्टरला भेटायला जाता तेंव्हा त्याचे निरसन तेथेच होऊ शकेल. कारण बहुसंख्य स्त्रियांना काही गोष्टी डॉक्टरला भेटायला जातात तेंव्हा आठवत नाही पण घरी आल्यावर आठवतात. आपली स्मरणशक्ती नवर्यापेक्षा नक्कीच जास्त चांगली आहे हे मान्य केले तरीही शंका डोक्यात राहतात. याला डायरी ठेवणे हा एक चांगला उपाय आहे.

६) गरोदरपणात ज्यांना आम्ल पित्त जास्त होते त्यांनी आणि ज्यांचे वजन अगोदरच जास्त आहे त्यांनी प्रक्रिया केलेलं पदार्थ (ज्यात कोंडा/ रफेज/ तंतुमय पदार्थ काढून टाकले आहेत) उदा. मैद्याचे केक पिझा पास्ता इ कमी खावे
आणि नैसर्गिक पदार्थ ज्यात (कोंडा/ रफेज/ तंतुमय पदार्थ जास्त आहेत) म्हणजे फळे, सुकामेव,, कडधान्,,, सामिष पदार्थ इ आहारात जास्त उपयोगात आणावे. याचा अर्थ असा नव्हे कि पिझ्झा चे डोहाळे लागले असतील तरी तो खायचाच नाही. अतिसर्वञ वर्जयेत हे लक्षात ठेवा.

आपला आहार वेळच्या वेळेस प्रसन्न वातावरणात आणि आनंदी मनस्थितीत सेवन करावा. एखादा पदार्थ आवडत नसेल तर खाऊ नये आणि आवडत असेल तर जास्त खा. आपला आहार संतुलित असेल तर जीवनसत्त्वाची किंवा खनिजांची कोणतीही कमतरता आपल्याला होणार नाही आणि बाळाला तर नाहीच नाही.

कोणताही अन्नपदार्थ विशेष कारण नसेल तर वर्ज्य नाही

७) मी येथे दिलेला सल्ला हा सर्वसाधारण आहे तो त्रिकालाबाधित सत्य आहे असा माझा दावा नाही आणि तुम्ही सुद्धा तसेच मानू नये अशी आपल्याला विनंती आहे. आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना विचारून आपला आहारविहार ठेवा आणि आपले गरोदरपण एन्जॉय करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मधुमेह असताना घेणे ची काळजी सांगा किंवा एक वेगळा लेख टाका सर
माझ्या बहिणी ला मधुमेह आहे आणि ती आता गर्भवती असून काय वेगली काळजी घ्यावी

आईला मधुमेह असेल तर आईच्या रक्तात साखर जास्त असते हि साखर(ग्लुकोज) पटकन बाळाकडे पोहोचते. ज्यामुळे अतिरिक्त साखरेमुळे बाळाची वाढ(GROWTH) जास्त होते(MACROSOMIA). पण तितका अवयवांच्या विकास (MATURITY) होत नाही. त्यामुळे जन्माला येताना बाळाचे वजन जास्त असते. त्या शिवाय आईला मधुमेह असल्याने बाळाभोवती असलेले गर्भजल पण जास्त असते. यामुळे गर्भाशय जास्त मोठे होते (आणि पर्यायाने आईचे पोट जास्त मोठे दिसते.) मोठे बाळ आणि जास्त गर्भजल यामुळे गर्भाशयाचे तोंड लवकर उघडून वेळे अगोदर प्रसूती( PREMATURE DELIVERY) होण्याची शक्यता असते.

प्रसूती होत असताना बाळाला आई कडून अतिरिक्त ग्लुकोज मिळत असल्याने बाळ आपल्या शरीरात जास्त इन्स्युलिन तयार करते. परंतु प्रसूती झाली आणि नाळ विलग झाली कि बाळाला होणार ग्लुकोजचा पुरवठा बंद होतो पण सह्रीरात असलेल्या अतिरिक्त इन्स्युलिन मुळे बाळाची रक्तातील ग्लुकोज एकदम कमी होऊन बाळ कोमा मध्ये जाण्याची शक्यता असते. यासाठी बाळ जन्माला आल्यावर त्याला ग्लुकोजचे इंजेक्शन चाहलू करावे लागते आणि हि इन्स्युलिनची पातळी हळू हळू खाली आणावी लागते.

या अतिरिक्त ग्लुकोज मुळे बाळाच्या शरीरात चरबीच्या पेशींची अतिरिक्त वाढ होते यामुळे सुरुवातीला पाहिले एक दोन वर्ष मूल छान गोंडस गट्टू दिसत असले तरी मूळ चरबीच्या पेशी जास्त असल्यामुले मोठे झाल्यावर बाळंत लठ्ठ्पणा येतो.

आईला जर गरोदर पणात मधुमेह असले तर पुढे चाळीशी नंतर मधुमेह येण्याची शक्यता बरीच वाढते. आपल्या आई किंवा वडिलांना मधुमेह आहे का? ताई असल्यास आपण आणि आपल्या बहिणीला
आता पासूनच काळजी घेणे आवश्यक आहे कारण आपल्याला मधुमेह वयाची शक्यता बरीच वाढलेली असते.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आणि आपल्या बहिणीचे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जितके वजन जास्त तितकि मधुमेह होण्याची शक्यता आणि कमी वयात होण्याची शक्यता वाढते.

काळजी घ्या