गर्भारपण आणि काळजी -१

Submitted by सुबोध खरे on 13 March, 2020 - 12:29

गर्भारपण आणि काळजी

माझ्याकडे सोनोग्राफीसाठी येणाऱ्या सर्व स्त्रियांना मी जे सांगतो ते असे

१) गर्भारपण हे आजारपण नाही. १०० वर्षपूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हते आणि क्षकिरण तज्ज्ञ हि नव्हते. आपल्या आई आजी पणजी ने यातील काहीही नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थच असा कि सोनोग्राफी करणे इ अत्यावश्यक नाही

२) सोनोग्राफी करणे किंवा गरोदरपणातील चाचण्या करणे हे विमा उतरवण्यासारखे आहे. आपण विमा उतरवला नाही म्हणजे आपण उद्या मरणार असे नाही. या गोष्टी ९९% मानसिक शांतीसाठी करता आणि १ % जर काही कमतरता असेल तर त्याचा वेळेवर इलाज करता यावा यासाठी आहे.

३) अंबानी टाटा यांच्या घरात ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत आणि आदिवासींच्या घरात १.५ किलोची मुले जन्माला येत नाहीत.
याचा साधा सरळ अर्थ असा आहे कि निसर्ग आपले काम करत असतो. आपण काय खाता पिता याचा मुलावर फारसा परिणाम होत नाही. आपण रोज बदामाची पोळी आणि काजूची उसळ खाल्ली म्हणून बाळ ५ किलोचं होणार नाही.

आदिवासी बायकांना होणारी मुले पण अडीच ते तीन किलोची असतात. आणि ती सहा महिनेपर्यंत सुदृढ असतात. असं होत नाही कि गरीब आईचं दूध कमी प्रतीचं आणि श्रीमंत आईंचं दूध जास्त चांगलं.

सहा महिन्यानंतर जेंव्हा मुलाला घन आहार देण्याचा प्रसंग येतो तेंव्हा आदिवासी आयांकडे पैसे नसतात. तेंव्हा आईचं दूध अपर पडतं आणि भाताची पेज नाचणीची पातळ आंबील सारखं अन्न मुलाच्या वाढीस पुरेसा नसतं म्हणून मग मुलांचं कुपोषण होतं.

४) गरोदरपण विशेषतः पहिले गरोदरपण स्त्रियांच्या आयुष्यात सर्वात आनंदाचा काळ असतो. या काळात आपण सासूबाईंकडूनसुद्धा काम करून घेऊ शकता आणि त्या आनंदाने करतात. आपण त्यांना मला शिरा/ चिकन खावंसं वाटतंय आहे सांगितलं तर त्या आनंदाने करून देतात. हेच ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो आणि आपली आई बाळाचे कपडे बदलत असेल तेंव्हा आपण आईला सांगितले कि मला चहा करून दे तेंव्हा आपली आई सांगेल आता मला वेळ नाही तुला आत्ताच हवा असेल तर करून घे

५) आपण पपई मटण कलिंगड आणि असे "तथाकथीत उष्ण" पदार्थ खाल्ले तर काहीही होणार नाही. आम्ही( मी आणि माझे मित्र) गेली काही दशके कुमारी माता सोंनोग्राफीसाठी येताना पाहत आलो आहे. त्या असं सर्व उष्ण खाऊन येतात पण काही कुणाचा गर्भपात होत नाही मग गर्भपात करण्यासाठी नाईलाजाने त्या डॉक्टरकडे येतात. मुसलमान बायका १२ महिने ३२ काळ मटण चिकन खात असतात त्यांना गर्भपात जास्त होतो असा कोणताही पुरावा अजून तरी सापडलेला नाही

६) मायबोलीवर /जालावरयेणाऱ्या कोणीही स्त्रिया फार कष्टाचं काम करत नाहीत. त्यामुळे दुसरं कोणताही कारण नसेल. (उदा. रक्तस्त्राव होणे) तर श्रम करू नका विश्रांती घ्या याला कोणताही शास्त्राधार नाही. रस्त्यावर दगड फोडणाऱ्या किंवा इमारतीवर मजुरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा सुदृढ बाळांना जन्म देतच असतात.

७) प्रवास करण्यात सर्वात सुरक्षित रेल्वे आहे याचे कारण रेल्वे ला स्पीडब्रेकर किंवा खड्डा लागत नाही. रेल्वे धक्का मारून चालू होत नाही किंवा धक्का देऊन थांबत नाही. सर्वात वाईट वाहन म्हणजे रिक्षा. कारण त्याच्या तीनातील एक चाक नक्की खड्यात जातं. आणि ते बहुतेक वेळेस मागचे असते कारण रिक्षावाला पुढचे चाक खड्डा टाळून नेतो( पुढचा चाक मोडला तर फार महाग पडतं). रेल्वे नंतर सुरक्षित वाहन म्हणजे बसचा पुढचा भाग तेथे खड्डे कमी लागतात

८) ग्रहणात बाहेर पडल्यामुळे गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. आपण कधी ग्रहणात बाहेर पडल्यामुळे गाईचा वासरू किंवा कुत्र्या मांजराचं पिल्लू लुळं लंगडं झालेलं पाहिलेले आहे का? परंतु घरची कोणी तरी वयस्क स्त्रीच सांगते तुझं काय अडलं आहे चार तास बाहेर पडली नाहीस तर? उगाच विषाची परीक्षा कशाला पाहायची? यामुळे ती स्त्री बाहेर पडत नाही आणि हि अंधश्रद्धा वाढीस लागते

९) ७० टक्के गरोदरपणात गर्भपात होऊन जातो. यापैकी बहुसंख्य गर्भ हे विकलान्ग किंवा गुणसूत्रात कमतरता असल्यामुळे असतात. लक्षात ठेवा सडक आंबा तुम्ही झाडाला चिकटवू शकत नाही. तसेच व्यंग असेलला गर्भ टिकत नाही. हि एक निसर्गाची किमया आहे कि सदोष जीव जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहत नाहीत
अर्थात हे गर्भपात मागच्या पाळीपासून ६ आठवड्यात होतात. यामुळे हे गर्भपात झाला आहे हे समजतच नाही. पूर्वी स्त्रियांना असे वाटत असे कि आपली पाळी उशिरा आली म्हणून रक्तस्त्राव जास्त होतो आहे. परंतु तो गर्भपात असे. आता पाळी चुकण्याचा ७ दिवस अगोदर गरोदरपणाची चाचणीने खात्री करता येते. परंतु डॉक्टर सहा आठवडे होईपर्यंत चाचणी करा असे सांगत नाहीत याचे कारण हेच आहे. येथे बऱ्याच स्त्रिया अशा असतील ज्यांना एकदा किंवा दोनदा गर्भपात झाला आहे आणि नंतर सुदृढ बाळ झालं आहे.

१०) तणाव घेणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे. याला कारण काहीही नाही. काहीच कारण नसेल तर अज्ञाताची भीती (FEAR OF UNKNOWN) असतेच. आपलं विश्वास नसेल तर १० वि किंवा १२ ची बोर्डाची परीक्षा चालू असेल तेथे जाऊन पहा. मुली उगाच भयंकर तणावात वावरत असतात.( हे वाचणाऱ्या मुलींनी आपले १०-१२ वि चे दिवस आठवू पाहावे). मुलगे आरामात फिरत असतात.दहावीला एक दोन टक्के गुण कमी पडले तर आयुष्यात फार काही क्रांती होत नाही.

हा लेख वाचून झाल्यावर दिलासा मिळणाऱ्या मुलींना परत दुसऱ्या दिंशी टेन्शन येणारच आहे याची मला खात्री आहे.

११) लक्षात ठेवा जोवर आपल्या पहिल्या मुलाचा जन्म होत नाही तोवर आपण जितके तणावमुक्त असता तितकी तणावमुक्ती आपल्याला आयुष्यात कधीही मिळणार नाही. ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो तेंव्हा "मुली"ची "आई" होते आणि मुलाचा विचार/ काळजी कधीही आपल्या डोक्यातून जात नाही. ८५ वर्षांच्या स्त्रियांना सुद्धा आपल्या ६५ वर्षाच्या बाळाची काळजी सतत डोक्यात असतेच.
हे प्रसूतीच्या वेळेस निर्माण होणारे हॉर्मोन्स(संप्रेरके) उदा HUMAN PLACENTAL LACTOGEN, OXYTOCIN, PROLACTIN इ त्या मुलीच्या मेंदूवर कायमचा प्रभाव निर्माण करतात असा सिद्धांत आहे.

१२) जोवर आपण गरोदर आहात तोवर आपण सिनेमाला जाऊ शकता, मॉल मध्ये दिवसभर फिरून बाहेर जेवून आईस्क्रीम खाऊन रात्री १२ वाजता परत येऊ शकता. ज्यादिवशी पहिल्या बाळाचा जन्म होतो त्यानंर इतके काळजीमुक्त आयुष्य आपल्याला फार क्वचित मिळते. अगदी आपण आपल्या आईकडे बाळाला देऊन फिरू लागलात तरी तास दोन तासाने बाळाचं विचार डोक्यात परत परत येऊ लागतोच. तेंव्हा आहेत ते दिवस एन्जॉय करून घ्या. मुलींना वाईट सवय असते कि एकदा कसा बाळाचा जन्म व्यवस्थित झाला कि सुटले.परंतु वस्तुस्थिती उलटीच असते. बाळ रात्री जागवू लागला तर आपण काहीही करू शकत नाही
आपण आपल्या आई कडे बाळाला देऊन झोपलात तरी २-३ तासांनी दूध पाजायला आपल्यालाच उठावे लागणार आहे हे लक्षात ठेवा.
यासाठी एक म्हण आहे ती लक्षात ठेवावी. "मूल होईपर्यंत खाऊन आणि झोपून घ्यावं आणि सून येईपर्यंत लेवून घ्यावं"

१३) गरोदर पणात सरासरी १२ किलो वजन वाढतं. यातील ३ किलो बाळाचं असतं , ३ किलो गर्भाशयाचं, ३ किलो वार(PLACENTA) आणि गर्भजल याचं आणि ३ किलो आईचं वजन वाढतं. याचा अर्थ असा आहे कि आईचं वजन १८ किलो वाढलं तर मूल काही ५ किलोचं होत नाही.
हे वाढलेलं वजन आईच्या शरीरावर चढलेली चरबी असते आणि ती सहसा उतरत नाही.

१४) आता तुला दोन जीवांसाठी खायचं आहे त्यामुळे भरपूर खाणं आवश्यक आहे यासारखा भंपक सल्ला दुसरा नसेल. जन्माचे वेळेस बाळाचं वजन ३ किलो असतं आणि आईचं वजन ६० किलो असेल तर बाळाचं वजन ५ % (पाच टक्के फक्त) आहे. तेंव्हा या १०५ टक्क्यासाठी तुम्ही (२०० टक्के) दुप्पट खाल्लं तर तुमचा अंग वाढण्यापलीकडे दुसरं काही होणार नाही.
सोनोग्राफी उपलब्ध होण्याच्या पूर्वी बाळंतपणात आईचं वाढलेलं वजन हा बाळाच्या वाढीचा एकमेव निकष होता. दुर्दैवाने बरेच जुने स्त्रीरोग तज्ज्ञ अजूनही त्यावर भरोसा ठेवतात यामुळे आईचे वजन वाढत नसेल तर ते जास्त काळजी घ्या सांगतात. सोनोग्राफीत बाळाचा वजन नीट वाढत असले तर आईचे वजन वाढे नाही तर फारशी काळजी करण्याचे कारण नसते. मी शेकडो निम्न वर्गातील स्त्रियांचे वजन जेमतेम ६-७ किलो वाढलेले असताना सुदृढ मुले जन्माला येताना गेली ३० वर्ष पाहत आलो आहे. (माझ्या पत्नीचे वजन अख्ख्या गरोदरपणात फक्त साडे पाच किलो वाढले होते)

१५) गरोदरपणात जमेल तितके दिवस नोकरी करत राहिलात तर बाळाला दूध पाजण्यासाठी आपल्याला जास्त दिवस बाळंतपणाची रजा घेता येईल. माझी पत्नी पूर्ण गरोदरपणात पुण्याच्या रुबि हॉलच्या CASUALTY मध्यें डॉक्टर म्हणून काम करत होती जेथे चाकू मारला आहे हृदयविकार लकवा अपघात सारख्या तातडीच्या केसेस ९ महिने पर्यंत हाताळत होती. परंतु माझ्या मुलीची वाढ आणि वजन व्यवस्थित होते.

१६) गरोदरपणात अगं अगं इथे बसू नको. असं उठू नको इ सांगणाऱ्या बायका फार असतात.
शेजारची बाई हा एक उच्छाद प्रकार असतो. जातायेता काही तरी टिप्पणी करतात उदा. अगं, पाच महिने झाले तुझं पोट दिसत नाही बाळाची वाढ नीट आहे कि नाही ते बघून घे.
झालं, ती मुलगी पुढची सोनोग्राफी होईपर्यंत तणावात असते.
जोवर सोनोग्राफीत सर्व काही ठीक आहे हा रिपोर्ट येत नाही तोवर ती मुलगी भरपूर तणावात असते. देवाने आपल्याला दोन कान दिलेले आहेत याचे हेच कारण आहे.

लक्षात ठेवा तुम्हाला काहीही झालं तरी हि शेजारीण तुमच्या काही उपयोगास येणार नाही तेंव्हा आपल्या स्त्रीरोग तज्ञाचेच ऐका.

१७)गर्भारपणात मुलीची वृत्ती आनंदी असावी हे जुन्या काळातील अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
असे होत नाही कि बलात्कारातुन जन्माला आलेली संतती मतिमंद असते.
परंतु आईची मानसिक स्थिती आनंदी असेल तर मुलाची मानसिक स्थिती EQ जास्त संतुलित असते असे सांख्यिकी सांगते.
आय आय टी सारख्या संस्थेत जेथून पास होताच एक लाख रुपये महिना ची नोकरी मिळते ती मुले का आत्महत्या करतात? हि अत्यंत हुशार मुले मानसिक रित्या असमतोल असतात म्हणून. तेंव्हा बुद्धिमत्ता आणि मानसिक समतोल या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

यासाठी गरोदर पणात आनंदी रहा आणि गरोदरपण एन्जॉय करायला शिका.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Dr majya vhinila dr ni pani jast jaly as sangitly tila ata 9va Suri jalay sijer kayla lagel as bolat. tr pani kshya mule vadt??

चांगला लेख आहे डॉक्टर. आता हा टप्पा ओलांडून गेल्यामुळे यातल्या मिश्किलपणाची मजा घेता आली. Happy
९ व्या नंबरचा मुद्दा अजिबातच माहिती नव्हता.
शेजारची बाई कशाला, एकूणच कुठलीही बाई, जिने एकदा तरी बाळाला जन्म दिला आहे, ती जणू काही आपल्यालाच बालसंगोपनाचं गमक सापडलेलं आहे अशा प्रकारे सल्ले देत असते Lol
हे लक्षात ठेवून मी कुणालाही, अगदी बहिणीला/ जवळच्या मैत्रिणीलाही बाळाच्या बाबतीत तिने विचारल्याशिवाय सल्ला देत नाही (कितीही मोह झाला तरी Wink )

अतिशय छान आणि माहितीपूर्ण लेख आहे सर तुमचा..
काही काळापूर्वीच या अनुभवातून गेल्यामुळे बरेच मुद्दे पटले आणि मलाही तेव्हा ही माहिती वाचता आली असती तर माझं गर्भारपण अजून निवांतपणे एन्जॉय करता आलं असतं असंही वाटलं.
वावे म्हणाल्या तसं 9 वा मुद्दा खूप पटला
बरेच किस्से, अनाहूत सल्ले आणि सततच्या सूचना ऐकून मन एवढं साशंक होतं आपलं.. आणि हा अनुभव अगदी ताजा असल्याने शक्यतो मी कोणत्याही गर्भार स्त्री, मैत्रिणीला सल्ले देत नाही, प्रत्यक स्त्री वेगळी सो तिचं गर्भारपणही वेगळं ना!!!
Anyway खरंच खूप मस्त लेख, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!!

खूप छान लिहिलंय.

मी स्वत: जास्त खोलात चौकशी करत नाही व फुकट सल्ले देत नाही कारण रुढि परंपरा व senior बायकांच्या सूचना, अंधश्रद्धा चा प्रभाव इतका जास्त असतो की माझ्या च लँब मधल्या बायका सुद्धा ग्रहण असले की हमखास सुट्टी घेतात व नंतर चर्चा ही करतात की सासूबाईंनी मला काही करू दिलं नाही, खुर्ची वर बसून होते , झोपलेसुद्धा नाही . ई...... आपण काही सांगावे तर त्यांच्या नात्यात कसं कुणाला cleft palate झालं इ. ऐकवतात

शेजार पाजारच्या व कायदेशीर नात्यातल्या बायकांच्या मुक्ताफलांमधून कुणाचीच (अगदी pregnant बाई स्वत: डॉक्टर असली तरी) सुटका नसते हा स्वानुभव. त्यामुळे कुणीही काहीही बोल्ले तरी त्याचा विचार करू नये. व शक्यतो हसण्यावारी न्यावे.

यासाठी एक म्हण आहे ती लक्षात ठेवावी. "मूल होईपर्यंत खाऊन आणि झोपून घ्यावं आणि सून येईपर्यंत लेवून घ्यावं>> लक्षातच ठेवण्यासारखी म्हण आहे. वरील काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे जर आधी तुमचा लेख वाचायला मिळाला असता तर माझंही गर्भारपण अधिक चांगल्या पद्धतीने जगता आलं असतं. तरीही चांगला माहितीपूर्ण व दिलासादायक लेख आहे त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर.
एक आणखी गोंधळून टाकणारा अनुभव बाळ मोठं होतानाही येतो. कारण सभोवतालच्या लोकांचे अनाहूतपणे दिलेले सल्ले वा नात्यांमधील सापेक्षता.

जर आधी तुमचा लेख वाचायला मिळाला असता तर माझंही गर्भारपण अधिक चांगल्या पद्धतीने जगता आलं असतं. तरीही चांगला माहितीपूर्ण व दिलासादायक लेख आहे त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. ---+1

तणाव घेणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे. याला कारण काहीही नाही. काहीच कारण नसेल तर अज्ञाताची भीती (FEAR OF UNKNOWN) असतेच. आपलं विश्वास नसेल तर १० वि किंवा १२ ची बोर्डाची परीक्षा चालू असेल तेथे जाऊन पहा. मुली उगाच भयंकर तणावात वावरत असतात.( हे वाचणाऱ्या मुलींनी आपले १०-१२ वि चे दिवस आठवू पाहावे). मुलगे आरामात फिरत असतात.दहावीला एक दोन टक्के गुण कमी पडले तर आयुष्यात फार काही क्रांती होत नाही.

हा लेख वाचून झाल्यावर दिलासा मिळणाऱ्या मुलींना परत दुसऱ्या दिंशी टेन्शन येणारच आहे याची मला खात्री आहे. ----- ह्या माहितीबद्दल खूप धन्यवाद. अजिबात माहीत नव्हतं. Life will become a little easier Happy

लेख एकंदरित चांगला आहे।
>> हे वाढलेलं वजन आईच्या शरीरावर चढलेली चरबी असते आणि ती सहसा उतरत नाही
हे फारच धाडसी विधान आहे.

हे फारच धाडसी विधान आहे.

हे अजिबात धाडसी विधान नाही तर हि वस्तुस्थिती आहे आणि मी गेली ३० वर्षे हे पाहात आलो आहे.

@ MeghaSK

बायकांच्या मुक्ताफलांमधून कुणाचीच (अगदी pregnant बाई स्वत: डॉक्टर असली तरी) सुटका नसते हा स्वानुभव.

अगदी सत्य आहे.

मी बऱ्याच स्त्रीरोगतज्ज्ञांची सुद्धा सोनोग्राफी केली आहे आणि स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ असूनहि त्यांना जास्तच तणाव होता कारण त्या सर्वात जास्त गुंतागुंत(complications) काय होऊ शकेल याचाच विचार करत असतात. त्यातून तिची आई सासू नणंद भावजय यांनी काही सांगितले कि त्यांच्या शंका अजूनच वाढतात. आणि शेवटी पालुपद असंच असतं कि विषाची परीक्षा कशाला पहा.

अगदी साधं गॅसने पोटात दुखत असेलत तरी त्यांना वरच्या मागे रक्तस्त्राव ( retro placental bleeding) आहे का अशी शंका येऊ लागते.

याला कारण स्त्रीस्वभाव.

माझी स्वतःची पत्नी पण डॉक्टर आहे परंतु तिला स्वतःला किंवा मुलांना अगदी साधा आजार झाला तरी तिला भरपूर टेन्शन येतं. आणि मुलं लहान असताना जरा काही झालं कि आमच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊया म्हणून ती धोशा लावत असे.
एकदा आमच्या मुलीने दीड वर्षाची असताना गुड नाईटची वापरलेली निळी मॅट तोंडात घातली होती आणि तिने फार काही गिळले नसावे मुळात पायरेथ्रीन्सचा मानवावर काहीही परिणाम होत नाही पण पत्नीचे समाधानच होईना. मी आमच्या आर्मीच्या बालरोग तज्ज्ञांकडे शेवटी तिला आणि मुलीला घेऊन गेलो. मुलगी छान पणे आनंदात खेळत होती. मी सरांकडे त्यांना त्रास दिल्याबद्दल माफी मागत होतो.

त्यावर ते म्हणाले कि हे बघ तुझी बायको डॉक्टर असली तरी ती प्रथम आई आहे आणि तू किती सांगितलेस तरी तिचे समाधान होणार नाही तेंव्हा नि:संकोचपणे माझ्याकडे घेऊन येत जा.

माझी स्वतःची पत्नी पण डॉक्टर आहे परंतु तिला स्वतःला किंवा मुलांना अगदी साधा आजार झाला तरी तिला भरपूर टेन्शन येतं. आणि मुलं लहान असताना जरा काही झालं कि आमच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊया म्हणून ती धोशा लावत असे. --- धन्यवाद.
मुलाला बरं नसलं की मला नेहमी वाटतं की एखादी डॉक्टर आई आता किती cool असेल! आपल्याला मुलांबद्दल सगळ्याबद्दल सगळं कळत असेल आपण रात्री जास्त शांतपणे झोपू शकलो असतो!

मधुमेह असताना घेणे ची काळजी सांगा किंवा एक वेगळा लेख टाका सर
माझ्या बहिणी ला मधुमेह आहे आणि ती आता गर्भवती असून काय वेगली काळजी घ्यावी

वजन वाढीबद्दल मात्र अगदी खरे आहे
माझ्या मुलाच्या वेळी मी आवर्जून फक्त हेल्दी खाल्लेय,लोणी तूप ,तेल अति साखर सुकामेवा वगैरेअगदी कमी,नगण्यच
आणि माझ्या मुलाचे वजन अतिशय उत्तम आहे आणि माझे सुद्धा,पूर्ण नऊ महिन्यात माझे वजन थोडेसेच वाढले आणि जन्मानंतर वजन बांधा वगैरे पूर्वीइतकच झालं