अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लर्क पाहिला. (सुन्न झालेला चेहरा!!)
कुठून सुरु करु तेच कळत नाही. छे एक स्वतंत्र धागादेखील कमीच पडेल कदाचित.
हार्ट अ‍ॅटॅक सीन काही दिवसांपूर्वी इथे शेअर झाला होता. त्याला फक्त ट्रेलर समजा. त्याच्या कैक पटीने अतर्क्य गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील याची खात्री बाळगा.
१) भारत उर्फ मनोज कुमारचा मुख्य धंदा कारकूनीचा नसून सिगारेटी फूंकण्याचा आहे. पठ्ठ्या इतक्या सिगारेटी ओढतो कि सामान्य माणूस असता तर कर्करोगाने कमीत कमी २ वेळा तरी मेला असता. ९० साली कारकूनाला पगार किती होता? याला परवडते कसे कोणास ठाऊक?
२) अनिता राज आणि सोनू वालियाला केवळ आचरटपणा साठी घेतलंय. एका सीन मध्ये भारत भाऊ सिगारेट ओढत असतात (म्हटलं ना, दुसरं काही करत नाही तो). त्याने सोडलेला धूर अनिता स्ट्रॉने ओढल्यासारखा ओढून घेते आणि पुन्हा सोडते व हे सर्व हापिसात. आणि सोनू वालियाचं नाव काय तर म्हणे टिच!
३) अशोक कुमार नंतर हृदयविकाराच्या झटक्यानेच मरतो. तेव्हा कुणाला ते गाणे परत वाजवायला सुचत नाही. अरे हो सेल संपले असतील नाही का!!
४) जाता जाता काही मासलेवाईक संवाद. यापेक्षा विचित्र डायलॉग्ज आहेत पण सगळंच फोडायला नको, नाही का? नाहीतर शहीद व्हायला कोण तयार होईल?
"मै अपना भूतकाल अंधकार के कुए मे डूबो चुका हूं"
"साहब खाने का वो सोचते है, जिनके पास खाने के लिए लंच हो, याने के खाना, याने के लंच." (हावभावांसहित)
(आणि खालील संवादात भाग घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव तुम्हीच ओळखा)
"१५ अगस्त को लोग खुशिया मनाएंगे और हम बैंक मे डाका डालेंगे. बैंक का चौकीदार नशे का आदी है. उसे नशेवाली सिगारेट(पुन्हा सिगारेट, देवा!) पिलाएंगे और टिच कर डालेंगे"
"क्या उससे हम सचमुच अमीर बन जाएंगे?" "टिच!"

एवढ्यानंतरही जे हा सिनेमा पूर्ण बघणार असतील त्यांना परमवीर चक्र द्यायला हरकत नाही. काही नाही तर त्यांनी स्वतःला अव्वल दर्जाचे देशभक्त समजावे.

एवढ्यानंतरही जे हा सिनेमा पूर्ण बघणार असतील त्यांना परमवीर चक्र द्यायला हरकत नाही. काही नाही तर त्यांनी स्वतःला अव्वल दर्जाचे देशभक्त समजावे. >>> ज्यांनी हा चित्रपट आधीच भोगला आहे त्यांना पण रिट्रॉस्पेक्टीव्ह इफेक्टने (मागील थकबाकी सकट : इति कणेकर) मिळणार का ? Biggrin

काल तिरंगा टिव्हीवर पाहीला
त्यात एक दृश्य आहे गुंडेलोक राजकुमारला मारण्याचा प्लान बनवत असताना अचानक तिथे राजकुमार टपकतो. तो बोलत पुढे येत असताना गुंडलोक त्याला सुचना देतात की जमीनीवर लँडमाईन्स आहेत. जर या लोकांना त्याला मारायचेच आहे तर सांगत का आहेत? येऊ द्या की पुढे उगाचच सत्यवचन बोलायचे म्हणून सांगत बसले

क्लर्क न बघितलेल्या व्यक्तीला सरळ नरकात धाडण्यात यावे अशी शिफारस मी यमराजाकडे केव्हाच केलेली आहे. क्लर्क महानोत्तम कलाकृती आहे.

मला कंटाळा आला की मी युट्युबवर क्लर्क किंवा गुंडा किंवा लोहा किंवा तत्सम सिनेमे लावून बसते. नीव्वळ डायलॉग ऐकतनाच कंटाळा निघून जातो.

दिया और तुफान नामक मिठूनदांच्या सिनेमातला अजरामर सीन..
मिठूनदाला विलन मंडळी गोळ्या घालून ठार मारतात. त्यांच्या लाश जवळ त्यांचा डॉ. मित्र सुरेश ओबेरॉय सर्वात आधी पोचतो. पोलीसांना बोलवायला जातो; पोलीस येई पर्यंत लाश मात्र गायब होते. ती लाश सुरेश ओबेरॉय चा डॉक्टर सदृश मित्र कादर खान लंपास करतो. का ??? हे तोच सांगतो की, मिठूनदा मेल्यानंतरही आपल्यात असू शकतील. कसे ??? तर त्यांचा मेंदू काढून दुसर्‍या गरजवंताला बसवावा. डिकीतून स्टेपनी काढून पंक्चर टायरच जणू बदलायचा आहे.

....तर.... मिठूनदांच्या डोक्यातून मेंदू काढला जातो. आणि ऑपरेशन थिएटर मधल्या मायक्रोवेव मधे ठेवला जातो... मायक्रोवेव ????? हो मायक्रोवेवच... दिग्दर्शकाने कवरअप करायचा प्रयत्न केला आहे. या मायक्रोवेव च्या खाली काळ्या मोठ्या अक्षरात 'DEEP FREEZER' असं लिहिलंय. आपल्या सारखे खोचक प्रेक्षक तरीही शंका काढणार हे त्या चाणाक्ष दिग्दर्शकाच्या आधीच लक्षात आलं होतं. म्हणून त्या फ्रिजरच्या खालच्या भागात दारुच्या ग्लासात घालायचे आइस क्यूब्स सुद्धा खच्चून भरुन ठेवलेत. मग सुरेश ओबेरॉय मिठूनदांचा इवलासा मेंदु आपल्या हातात अलगद उचलून फ्रिजरमधे एका थर्माकोलच्या प्लेटीत ठेवतो.

तिकडे दुसरीकडे सुहागनच्या लाल भडक कपड्यात मधू आडवी तिडवी नाचत असते. मनसोक्त नाचून होता होताच, तिला मिठूनदांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी देण्यात येते. जी बाई ही बातमी सांगते, मधू तिच्या कानठळात हाणते 'ये नही हो सकता' म्हणत. प्रेक्षकांनी या प्रसंगात त्या बातमी सांगणार्‍या बाईचा अभिनय चुकवू नये. प्लीजच. ऑस्करच्या तोडीचा अभिनय ही माऊली त्या क्षणी करते.

यथावकाश मधू मंदीर की सिडीयोंसे लडबडा पडते.... पडते म्हणजे खरंच डोक्यावर पडते आणि डोकं (उरलंसुरलं) बाद करुन घेते. हॉस्पीटल मधे हिचं आता काय करावं हा विचार करत असताना सुरेश ओबेरॉय ला कादर खान सल्ला देतो की वो घडी आगयी हैय... फ्रिजरसे मेंदु निकालो और इसको लगावो. ऑपरेशन होते !!! यशस्वी होते हे वेगळं सांगायची आता गरज नाहीये.

मधू हळूहळू शुद्धीत येते. इथे प्रेक्षकांनी अजून एका गोष्टीची नोंद घ्यावी. ऑपरेशन पूर्वी मधूचे लांब केस, मिठूनदांचा मेंदु लावल्यावर अचानक बॉब होतात. एवढंच नाही तर ती मिठूनदांच्या स्टाईल मधे चुटकी वाजवत पुरषी अवाजात बोलते आणि अचानक तिच्या अंगावर हॉस्पीटल मधे ही फ्रिलफ्रिल चा मोरपंखी नाईट ड्रेसही येतो !!!

चोखंदळ रसिक प्रेक्षकांनी या मिठून-मधू मिलनाचा लाभ घेण्याकरता तूनळीवर Mithun Chakraborty's brain transplant असे टायपावे व या ६ मिनिट २७ सेकंदाच्या शीण चा सोहळा पाहावा..

डिकीतून स्टेपनी काढून पंक्चर टायरच जणू बदलायचा आहे. >>>>> खल्लास झाले हसुन

काल झी सिनेमावर जानी दुश्मन लागला होता. मला वाटत याच धाग्यावर चर्चा झालेली आहे या बद्दल.. त्यात एका सीनमध्ये अक्षयकुमार व्हिलनच्या मागे गच्चीतुन उडी मारण्यासाठी टिव्ही अँटेनाच्या लटकत्या वायरचा उपयोग करतो.. सर्कशीत दोरी वापरतात तसा.. Uhoh नंतर त्या दोघांचा बाईकवरचा पाठलाग.. यामध्ये व्हिलन आपल्या डोळ्यातील शक्तीद्वारे समोरुन जात असणारा ऑईल टँकर उधळुन लावतो ज्यामुळे अ.कुची बाईक घसरते.. तेव्हा अ.कु बाईकसकट अक्षरशः रस्त्याला घासत अनेक मीटर दूर जातो पण अंगावर एक ओरखडा नाही की कपड्याचा साधा टाका सुद्धा उसवलेला नाही..

ब्रेन ट्रन्स्प्लँट वरून आठवलं .. कोणी " हार्ट्लेस " मधला हार्ट ट्रन्स्प्लँटचा सीन बघितला का ?

ती हिरॉईन , हातात सन्त्र धरतात तसं हार्ट धरून सिनिअर सुमनशी ३-४ मिनिटे हुज्जत घालते , आणि मग एका हाताने त्याला ( हार्टला ,सि. सुमनला नाही ) एन्जेक्शन देते .
त्यात पण काही काही सिन्स भयानक अचाट आहेत .

https://www.youtube.com/watch?v=C9kONjRJ_dg
THE MOST INCREDIBLE TORTURE SCENE EVER!
खर तर टॉर्चर देवानंदचे चालु आहे पण बघितल्यानंतर आपणच एका भल्यामोठ्ठ्या टॉर्चर मधुन सहिसलामत बाहेर पडल्यासारखे वाटते. अतिसहनशिल व्यक्तींनेच बघावे

मी मध्यन्तरी एका अश्याच सिनेमाचा एक सीन बघितला. असा सीन बघण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल दैवाचे आभार कुठल्या शब्दांत मागावेत कळत नाही. सिनेमा माहीत नाही आणि अ‍ॅक्टर्स ची नावेही माहीत नाहीत. कामानिमित्त दिल्लीला गेलेले असताना तिथल्या रूमच्या टिव्हीवर हा सीन पहाण्याचा योग आला. पूर्ण किनेमा पहायची इच्छा होती पण माझ्यासोबत असलेल्या सिनियर वकिल बाईना माझ्या बौद्धिक प्रगती आणि आकलन क्षमतेचा दर्जा याबाबत गंभिर शंका येऊ लागल्या म्हणून केवळ नोकरीपायी मी त्या संधीचा त्याग केला. तेंव्हापसून तो सिनेमा पुन्हा एकदा पहायला मिळावा अशी प्रतिक्षा करते आहे.

तर सीन बद्दल काय सांगावे महाराजा...
एक गावातले टिपिकल शेणाने सारवलेले 'प्रशस्त' वगैरे घर. घरात एक पांढर्‍या दाढीचा म्हातारा आणि त्याची तरुण, सुंदर मुलगी (अर्थातच हिरोईन असावी). घरात एव्ढेच जण होते का? तर नाही. घरात काही 'नाग' आपल्या घरात पाळलेली कुत्री-मांजरी फिरतात तितक्या आरामात फिरत होती. हो 'नाग' आईशप्पथ!
तर नंतर एक हिरो वाटावा असा चकचकीत तरुण घरात डायरेक्ट एन्ट्री मारतो. त्याला बघून ती नटवी हिरोईन चिडते वगैरे. का? तर त्या पोराने कुठल्यातरी शिकारीच्या नादात एका पक्ष्याला जखमी केलेलं असतं. प्रत्यक्षात तो जो कोण असतो त्याने आयुष्यात एखादा डास मारला असावा का अशी शंका येते. पण असो. तो हिरोईनची माफी मागतो आणि मग हिरोईन आणि पांढरी दाढीवाला आळीपाळीने त्याला 'हमारी संस्कृती हमे जानवरोसे प्यार करना सिखाती है...' छाप लेक्चर देतात. ते ऐकण्यापेक्षा त्या हिरोने स्वतःहून गांधिवादाचा स्वीकार करून प्रायश्चित्त घेण्यासाठी तत्काळ गंगेकडे प्रयाण करत असल्याचे जाहीर करून तिथून काढता पाय घ्यावा असे वाटत होते. पण दिग्दर्शक (अस्तित्वात असल्यास) या मताचा नसल्याने तो हिरो शिक्षा झालेल्या मुलाचा चेहरा घेउन सगळं लेक्चर निमूटपणे ऐकून घेतो. नंतर वातावरण निवळते आणि मग त्याला तिथल्या एका खाटल्यावर बसण्यास सांगण्यात येते.

खरा अचाटपणा तर यानंतर आहे...
पांढरी दाढीवाले गृहस्थ हिरोईनला सांगतात 'बेटा आज रक्षाबंधन है. अपने भाईयोंको राखी तो बांधो.'
यावर 'हां बापू ये दिन मै कैसे भूल सकती हू?' असे काहीतरी म्हणते आणि खूप उशीरा आणि भयंकर कष्टाने लग्न जमल्यानंतर मुलगा आपल्या वाग्दग्ध वधूच्या चिमुरड्या भावंडांना जितक्या प्रेमाने हाक मारेल तश्याच स्वरात ती हिरोईन 'राजू... टिल्लू...' वगैरे हाका मारते. आणि अहो आश्चर्यम... इतका वे़ळ इकडे तिकडे वळवळत उंडारणारे सगळे नाग चुलीपाशीच्या बैठकीवर रांगेत बसतात. काय ती शिस्त! कसे काय ट्रेन केले असेल नागांना असा प्रश्न पडला पण तोवर पुढचे अद्भूत दिसले. सगळ्या नागांना हिरोईनने मोठ्या वाट्यांतून काहीतरी वाढले. बहूदा खिर असावी. आणि सगळे नाग निमूटपणे त्या वाटीत तोंड बुडवून खिर चापू लागले. अगदी साग्रसंगित जिभल्या चाटत. Lol मधून मधून 'शांतीसे खाओ भैया... कैसी बनी है भैया...' सारखे आग्रहमिश्रित संवाद होतेच. खाटल्यावर बसलेला हिरो हे सगळं अचंभित होऊन बघत होता पण ढुंगणाला पाय लावून पळाला मात्र नाही हे ही अचाटच!

भोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर हिरोईनने सर्व नागांचे शास्त्रोक्त 'औक्षण' केले आणि 'आता ही राखी कशी बरं बांधणार नागांना?' हा माझा प्रश्न अगदिच बिनबुडाचा असल्याचं सिद्ध करित नागांचा फण्याखाली (त्याला गळा म्हणता येईल का?) लाडाने राखी बांधली. Uhoh

यानंतर मात्र माझ्या सहकारी बाईंचा संयम संपला!

आई ग! Rofl

@मुग्धमानसी
जबरदस्त वर्णन केलंयस!
बहुतेक या सिनेमाचे नाव 'नाग मेरा भाई' असे आहे. B4U मूव्हीज वर मध्ये लागला होता. हा सीन मिसला माझा पण ही आयडीआ कमालीची ओरिजिनल असल्याने दुसरा कुठला असेल असे वाटत नाही. मूळ दक्षिण भारतीय आहे.
मी जेवढा पाहिला त्यात ती अनेक संकटात पडून तिची खीर पूर्णपणे वसूल करते.

https://www.youtube.com/watch?v=SSPvq2YBPF0&list=UUq8Yusbf7RZM5coSvKFKjGg

हिरो बिचारा हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट आहे. तिथे बघायला त्याला बहीन येते. थोड्या वेळेने हिरोईन येते. परत थोड्यावेळेने हिरोईनचा मित्र येतो मग काही न ओळखीचे ना पाळखीचे लोक येतात. ते सगळे वर्तमानपत्र वाचतच येतात. हिरोची तब्येत गेली खड्ड्यात. ते इतक्या जोरात बोलत असतात की त्यांचे ऐकुन अजुन लोक येतात. मग सगळे मिळुन अजुन जोरात बोलतात ते ऐकुन देवानंद येतो. हिरोला बोलतो चल उठ पटकन डॉक्टरने सांगितले २ दिवसात तुला उभा करेन. (या आधी हिरो विव्हळत बेड वर झोपुन असतो) हिरोला थंड हवा मिळावी म्हणुन देवानंद खिडकी उघडतो. आणि लगेचच ट्विन्स टॉवरला विमान धडकते. सगळे हिरोला सोडुन खिडकी जवळ येतात. हिरोपण लगेच उठुन येतो. मग देवानंद घोषणा करतो हे कृत्य मोठ्या अतिरेकी गटाचेच आहे. सगळे कळल्यासारखे हो म्हणतात

देवानंदच्या चित्रपटांना माझा अखेरचा दंडवत

https://www.youtube.com/watch?v=ALXA5XLB0R8&list=UUq8Yusbf7RZM5coSvKFKjGg

चित्रपटात बाँम्ब सीन काहीतरी कारण असल्यामुळे चित्रपटात टाकतात. पण या चित्रपटात बॉम्ब सीन का टाकला आहे हेच दिग्दर्शक विसरुन गेला. मुलगी एक बॅग हातातुन खाली टाकते त्यावर मोठ्या अक्षरात बाँम्ब लिहिलेले आहे. खलनायक लांबुन ते बघतो. तेवढ्यात एक रस्त्यावर चालणारा माणुस ती बॅग उचलतो. आत काय आहे ते बघतो. बॉम्ब लिहिलेली चिठ्ठी बघुन फाडुन टाकतो. बॅग खांद्याला लावुन चालु लागतो.
संपला सीन. Uhoh THE MOST CONFUSING BOMB SCENE EVER! HILARIOUS!

खतरनाक सीन आहे तो दिदे... हे शूटिंग अँटवर्प, बेल्जियम मधलं आहे. असलं अ आणि अ शूटींग करायला हे लोक परदेशात जातात हे पण अ आणी अ आहे Wink

आज आपण एका अभिजात गाण्याचे रसग्रहण करताना अभिनयाचाही वस्तुपाठ पाहणार आहोत. सायरा बानो व राजेन्द्रकुमार यांच्या या गाण्यात सेकंदासेकंदाला अभिनयाचे, नृत्याचे धडे मिळतात ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पाहा. पण आधी गाणे पाहा:
https://www.youtube.com/watch?v=XDtWktfR0aI

हे काही Gems. पहिले आकडे गाण्याच्या क्लिप मधले मिनीट व सेकंद दाखवतात.
१:३०: मिथुनच्या सायकल च्या मागे लपण्याच्या तोडीचा सायरा चा झावळीमागे "लपण्याचा" सीन
१:२२: "येथे समोर दिसत नाही. कोठे गेली?" हीरॉइन्/हीरो तेथेच जवळपास असणार हे उघड असताना चेहर्‍यावर उगाचच काळजी दाखवणारे एक्स्प्रेशन्स असतात तसा चेहरा
१:३०: हीरॉइन समोर शोधत असताना मागून येणे हा अशा गाण्यांत अत्यंत आवश्यक असलेला सीन. सुमारे ३०-४० चौरस फुटांमधे दोघे फिरत असताना हे असे कन्फ्युजन कसे काय होते हे एक आश्चर्यच आहे.
१:३८: "दो दिलोंकी कश्ती" मधे ते दो दिल कोणते हा प्रश्न प्रेक्षकांना पडू नये म्हणून एकदा सायरा कडे व एकदा स्वतःकडे बोट. याला दोघांची माना डोलावून सहमती.
१:४८: हेअर कट् केल्यानंतर एक दोन दिवस कानामागच्या केसांत हात फिरवायचा आपण प्रयत्न करतो पण तेथे केस नसतात तसा एक सीन. "अरे हो, आज केस कापलेत नाही का!"
२:१४-२:१६: गरिबांचा दिलीपकुमार हे नाव सार्थ करणारे हातवारे
२:२१: एक पाय उचलून नटराज पोज मधे नमस्कार. यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
२:४०: स्प्रिन्ग लावलेल्या बाहुलीचा डान्स (राजेन्द्र कुमार करतो. सायरा नव्हे)
२:४९: "देखते है तारे" म्हंटल्यावर कम्पल्सिवली आकाशाकडे बघायलाच हवे. तेव्हढ्यात आज दाढी केलीय का हे विसरल्यामुळे एकदा चेक
३:०८: सायराबानो च्या डान्स पोजेस स्वतःच करून टाकणे
३:३७: मला डान्स करता येत नाही हे हावभाव करून सांगणे
३:४७: "पंछी" चा उल्लेख आल्यामुळे हाताने पंख हालवतानाचे हावभाव करायलाच हवेत. त्याशिवाय लोकांना कसे कळणार
४:०५: भजन
४:११: बॉक्सिंग ची प्रॅक्टिस
४:३२: ज्याच्या मधून राम गोपाल वर्माने क्लोज अप कसा असावाचे धडे घ्यावेत असा क्लोज अप. भरतनाट्यम-भुवया उडवण्याचाही एक प्रयत्न.

एकाच गाण्यात एवढा अभिनय ठासून भरला आहे असे सहसा नसावे. रिस्पेक्ट!

फा, अगदी सुरूवातीचे काही सेकंद का सोडलेस? मसाज सीन Happy

कस्लं भयाण लिहिलं आहेस. याआधी स्लार्टीनं राजेंद्रकुमारच्या कौन है जो सपनो मे आया चं असलं खतरा पोस्ट मार्टम टाकलं होतं. भ्जन आणि नटराज पोझ अशक्य आहे!!!!! स्प्रिंगचा बाहुला Lol

मुग्धमानसी , फारेण्डा>>>>

आप दोनोंके चरणकमल कहा है प्रभु !!!!!
>>मधून मधून 'शांतीसे खाओ भैया... कैसी बनी है भैया...' सारखे आग्रहमिश्रित संवाद होतेच. खाटल्यावर बसलेला हिरो हे सगळं अचंभित होऊन बघत होता पण ढुंगणाला पाय लावून पळाला मात्र नाही हे ही अचाटच!<<

>>"देखते है तारे" म्हंटल्यावर कम्पल्सिवली आकाशाकडे बघायलाच हवे. तेव्हढ्यात आज दाढी केलीय का हे विसरल्यामुळे एकदा चेक<<

मी मेलोय हसुन हसुन ते ही हापिसात !!
नम्र विनंती...कृपया डिसक्लेमर टाकत जावा..कि हापिसात वाचु नये.....:हहगलो:

Rofl

Pages