वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब hypothyroid मध्ये वजन वाढते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच metabolism साठी व पुढचे संभाव्य धोके (Diabetes,heart problems)टाळ्ण्यासाठी व्यायाम करणे जरुरीचे आहे.
थोडी मागची पाने चाळा.बाकी तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतीलच.

आबासाहेब, <<थायरॉइडमध्ये वजन घटणे किंवा वाढणे मस्टं असते का ?? म्हणजे वजन फॅक्टर हा खुप म्हत्त्वाचा आहे का ?>>
वजन वाढणं किंवा घटणं हे बाह्य लक्षण आहे. हायपो मधे थायरॉक्सिन कमी उत्पादित होतं किंवा बंद होतं. ज्याने वजन वाढतं (मेटॅबॉलिझम कमी होऊन). हायपर मधे ह्याच्या अगदी उलट.

पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं >>> नानबा, म्हणजे काय दिसलं नक्की? काय symptoms असतात? मला अतिशय झोप यायची म्हणनु काही वर्षांपुर्वी टेस्ट करुन घेतली. लेवल्स नॉर्मल होत्या. रिपोर्ट निगेटिव . बहुतेक त्या पिरियड मधे मी जनरली आळशी झाले असावे. आता फिटनेस आणि झोप नॉर्मल आहे, पण आजुबाजुला इतक्या केसेस पाहुन काळजी वाटतेच.

पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं >>

मनिमाऊ.. ते आयोडीनच्या कमतरतेच्या सरकारी जाहीरातीत दाखवायचे तसे गळ्याला फुगवटा येतो. हा असा: http://images.medicinenet.com/images/slideshow/thyroid-symptoms-and-solu...

नवीन संशोधन :
'मायग्रेन' च्या रुग्णांमध्ये हायपोथायरॉइडचे प्रमाण अधिक असते.
यावर अधिक अभ्यास चालू आहे.

बीपीप्रमाणे थायरॉईड ची गोळी एकदा घ्यायला सुरुवात केली की आयुष्यभर चिकटते का? माझ्या आईचे (वय 55) TSH जास्त होते म्हणून डॉक ने तिला 75 mg च्या गोळ्या वाढवून 100 mg च्या दिल्या. मग नंतर TSH बरेच कमी झाल्यावर डोस कमी व्हावा / गोळ्या बंद व्हाव्यात अशी अपेक्षा होती तेव्हा डॉक्टर म्हणाले की TSH गोळ्यांमुळे कमी आलेले आहे. पण डोस कमी केल्यास परत वाढेल. त्यामुळे डोस बदलला ही नाही आणि कमीही केला नाही. तर आईने दुसऱ्या डॉक चा सल्ला घ्यावा का? की हे नॉर्मल / बरोबर आहे? तिचे बीपी सुद्धा यावेळी जास्त आले आहे. मला भीती वाटतेय की हे गरजेपेक्षा जास्त डोस घेतल्याने तर नसेल ना?

(अवांतर: बीपी मध्ये देखील गोळी चालू असताना बीपी नॉर्मल आले की डॉक्टर म्हणतात की बीपी गोळी मुळे कमी आले आहे त्यामुळे गोळी बंद करण्यात अर्थ नाही. त्यामुळे एकदा बीपीची गोळी घ्यायला सुरुवात केली की ती आयुष्यभर घ्यावी लागते, कधीच बंद होत नाही. हे खरे आहे का?)

बीपीप्रमाणे थायरॉईड ची गोळी एकदा घ्यायला सुरुवात केली की आयुष्यभर चिकटते का? माझ्या आईचे (वय 55) TSH जास्त होते म्हणून डॉक ने तिला 75 mg च्या गोळ्या वाढवून 100 mg च्या दिल्या. मग नंतर TSH बरेच कमी झाल्यावर डोस कमी व्हावा / गोळ्या बंद व्हाव्यात अशी अपेक्षा होती तेव्हा डॉक्टर म्हणाले की TSH गोळ्यांमुळे कमी आलेले आहे. पण डोस कमी केल्यास परत वाढेल. त्यामुळे डोस बदलला ही नाही आणि कमीही केला नाही. तर आईने दुसऱ्या डॉक चा सल्ला घ्यावा का? की हे नॉर्मल / बरोबर आहे?>>> बरोबर आहे! मनाने गोळ्या बन्द करु नका.

TSH कमी झाले हे गोळ्यांमुळे हे बरोबर आहे. ते जर नॉर्मल रेंजच्या लोअर लिमिट पेक्षा कमी झालं तर डोस परत adjust करावा लागेल डॉ.ना.
पण तुम्ही फक्त बरंच कमी झालं लिहिलंय. आधी जर बरंच वाढलं असेल तर नंतर बरंच कमी झालं हे योग्यच आहे. बरंच या शब्दाला फार काही अर्थ नाही. रेंज बघा आणि त्या रेंजच्या बाहेर आहे का ठरवा.
आणि हो थायरॉईड गोळी घेत रहाणे. गोळी चिकटली असले शब्द प्रयोग न करणे. डॉ.ना विचारून काय ते करणे. आता मला बरं वाटतंय मग अर्धीच गोळी घेणे हे बेसिक नियम त्यांना कटाक्षाने पाळायला सांगा.
दुसऱ्या डॉ.ला विचारायचं असेल तर मोडर्न मेडिसिनच्याच विचारा. डायरेक्ट चूर्ण आणि साबुदाणा गोळ्या देणारा डॉ. गाठू नका ही कळकळीची विनंती.

गोळी बंद करून थायरॉईड रेंज बाहेर गेले तर काही अभ्यासांपमाणे रक्तदाब वाढू शकतो. सो फोरम वर लोक काय सांगतील त्याकडे साफ दुर्लक्ष करून डॉ म्हणेल तसं वागा.

बीपीप्रमाणे थायरॉईड ची गोळी एकदा घ्यायला सुरुवात केली की आयुष्यभर चिकटते का?>>> ते डॉक्टर ठरवतात. माझ्या बाबतीत माझे टी एस एच मध्यबिंदुवर आल्यावर आठवड्यातून ७ ते ५ ते ३ दिवस नियोमर्कोझोलचा डोझ कमी करत आता गेले ५ महिने बंद आहे पण दर ३ महिन्यांनी मॉनिटर केले जाते.
रक्त दाबाच्या बाबतीत टेल्मि काइंड २० नंतर ६ महिने १२०/८० झाले.आध्धी १४०-१५०/९०-१०० असायचे. मग डोज टेपर करत(डॉक्टरांनी) आता आठ्वड्यातून ३ दिवस केला आहे.
टीपः माझे डॉक्टर एम डी (अ‍ॅलोपाथी) स्वर्ण पदक विजेते आहेत, Happy

ओके रेव्यु. तुमच्या डॉक्टरांचे नाव सांगू शकाल का प्लीज?>>>
पियू जी
वि पु मध्ये पाठवलय

माझ्या आईला थायरॉईड चा त्रास आहे. टीएसेच लेव्हल २२ ,टी३,टी४ लेव्हल नॉर्मल होती. डॉक्टरांनी थायरोनॉर्म ७५ घ्यायला सांगितली. एका महिन्यात टीएसेच ०.०३ ., टी३ नॉर्मल, टी४- १३.२ पण तरीही थायरोनॉर्म७५ सुरु ठेवली आहे.
टेस्ट किती महिन्यांनी करायच्या असतात.

टेस्ट किती महिन्यांनी करायच्या असतात.>> ३ महिने
अशी त्रैमासिक रीडिंग्ज कमीत कमी ५ ते ६ सातत्याने रेंज मध्ये अस्ल्यास गोळ्याचा पुनर्विचार करता येतो पण ते डॉक्ट्रांवर अवलंबून असते. दोन्ही विचार धारा( थांबवणे/जन्मभर चालू) अस्तित्वात आहेत!

माझी आतापर्यंत ४-5 वेळेस रक्ततपासणी झाली, कारण लक्षणं सगळी थायरॉइडची असतात, पण प्रत्येक वेळेस रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. तर अजून काहि तपासण्या करु शकतो का?
sub clinical level म्हणजे काय?

sub clinical level म्हणजे काय?>>>>
जेव्हा रुग्णास कोणतीच लक्षणे नसतात आणि शारीरिक तपासणीत काही सापडत नाही पण एकाद्या हॉर्मोन ची पातळी वाढलेली असते. या आजाराच्या स्थितीला sub clinical स्टेट म्हणतात

हाताची उडणारी नाडी
(पल्स);हातांची थरथर ;झोप नीट न
हि सगळी
लक्षणं माझ्यात दिसतात पण thyroid
रिपोर्ट नॉर्मल आहेत ,काही तरी माहिती द्या

मी पण हल्लीच थाइरोइड चेक केल तर TSH level 53.5 होते. लक्षण जाणवत होती पन का अस होतय ते काही कळत नव्हतं. झोप येणे भूक लागणे प्रचंड थकवा टेंशन अस काहिस होतं.वजन तर वाढत च जात होत. आता डॉक्टर नी 25 mgची गोळी चालू केलि आहे..तेव्हापासून जरा बर वाटतंय.

हातांच्या बोटाची थरथर पन व्हायची. झोपेच पन खोबर झाल होत. सहज मनात शंका आली म्हणून फॅमिली डॉक्टरला सांगून थाइरोइड चेक करुन घेतले. आणि त्या मैडम नी दुसऱ्या डॉक्टर ला दाखवा अस सांगितले. पन अस चालते का?? की thyroid स्पेशलिस्ट कडून च चेक करूँ घ्यायचे??

हातांच्या बोटाची थरथर पन व्हायची. झोपेच पन खोबर झाल होत. सहज मनात शंका आली म्हणून फॅमिली डॉक्टरला सांगून थाइरोइड चेक करुन घेतले. आणि त्या मैडम नी दुसऱ्या डॉक्टर ला दाखवा अस सांगितले. पन अस चालते का?? की thyroid स्पेशलिस्ट कडून च चेक करूँ घ्यायचे??

बरेचदा family डॉक्टर स्पेशालीस्टकडे पाठवतात रिपोर्टस आल्यावर थायरॉईड असेल तर. मलाही पाठवलेलं, स्पेशालीस्ट डॉकनी मला गोळी रेकमेंड केली eltroxin 50 mg. आता १०० सुरु आहे. दोन वर्ष चेक नाही केलं, करायला हवं. आता family डॉक्टरपण रिपोर्ट्स बघून कमी जास्त करतात गोळ्या. सुरुवातीला स्पेशालीस्टकडेच पाठवायच्या.

कालच धागा आणि सगळे प्रतिसाद वाचले. माहितीपूर्ण आहेत.

===
स्त्री
वय २९+
FT3 -> 1.56 pg/ml (Range 1.5 - 4.1)
FT4 -> 0.89 ng/ml Chemiluminescence (CLIA) (Range 0.8 - 1.9)
TSH 15.5 uIU/ml Chemiluminescence (CLIA) (Range 0.3 - 5.5)
Vit D, (25-OH), serum (CMIA) -> 13.3 ng/ml

ही व्यक्ती सकाळी ७.१५ ला उपाशीपोटी एक ग्लास (हिवाळा असल्याने सध्या कोमट) पाणी आणि Thyronorm 50 mcg घेते.
मग ८.४५ ला हापिसात नाश्ता (पोहे इडली रवा उपमा,मेदूवडा, ठेपला, उत्तपा) घेऊन त्यानंतर लगेच ९.१५ ला Ossivite 500 घेते.

हे चुकीचे आहे का? कारण धाग्यात लिहले आहे
> ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या. >

आठवड्यातून एकदा Dhup 60k सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगितले आहे. ते Thyronorm सोबतच घेतले तर चालते का?

===
पान ५ वर हे खाऊ नका ते खा सांगितले आहे ते कितपत बरोबर आहे?

हल्ली उठसूट "थायराइडची शंका येते, तपासणी करून घ्या" असा सल्ला डॅाक्टरांकडूनही मिळतो.
अगोदर दुसऱ्या कोणत्या औषधाोपचारांचे साइडइफेक्टस असावेत का?
जेवढी नवनवीन औषधे वापरात येत आहेत ती दोषकारक असू शकतात.

Thyroid test is simple. If doctor suspect something wrong, easy enough to do and get a peace of mind!

आठवड्यातून एकदा Dhup 60k सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगितले आहे. ते Thyronorm सोबतच घेतले तर चालते का?
>> dhup 60k kaay aahe Mahit nahi

> dhup 60k kaay aahe Mahit nahi > व्हिटॅमिन डी. धूप (औषधाचे नाव आवडले :D)

> ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या. >
काल भारतातल्या डॉक्टरला स्पेसिफिकली विचारले कि "थायरोनॉर्म घेतल्यानंतर चार तासांनी कॅल्शिअम घ्यायचे का? तेवढा वेळ मधे जाऊ देणे आवश्यक आहे का?" तर ते म्हणाले कि "तसे काही जरुरी नाही. अर्धा तासदेखील पुरेसा आहे. थायरोनॉर्म उपाशीपोटीच घ्यायची पण!"

Pages