वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगाभ्यासामधे अशी बरीच आसने आहेत ज्याने थायरॉईडचा त्रास कमी हो़ शकतो. गळ्यावर ताण आणि दाब देणारी आसने सर्वांगासन, उष्ट्रासन, मत्स्यासन, हलासन, वज्रासनस्थ किंवा पद्मासनस्थ योगमुद्रा तसेच जालंदर बंध, उड्डियानबंध यांनी बराच फरक पडु शकतो. तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करा हे आवर्जुन सांगणं आहे.

नाने खुप छान आणि माहितीवर्धक लेख ! बराच अभ्यास करुन लिहीलाय हे जाणवतं वाचताना. त्यातही तुझ्या खुसखुशीत शैलीमुळे नेहमीप्रमाणे असे माहितीपर लेख वाचताना येणारा कंटाळा जाणवत नाही. धन्यवाद. Happy

नानबा,
ह्या धाग्यासाठी तुझं खुप कौतुक आणि मनापासुन आभार... सगळ्यांच्या वतीने...
अजुन येऊ दे असं काहीतरी

नानबा ,
किती साध्या आणि सोप्या शब्दांत तु हे "थायरॉईड प्रकरण" समजावुन सांगितलसं.
खुपचं छान . धन्यवाद ह्या माहितीबद्दल आणि हो काळजी घे स्वतःची . Happy

खुप माहिती मिळाली...thanks..and take care Happy

नानबा,
छान लिहीलं आहेत आणि सोपं करून लिहिलं आहेत. थायरॉईड चं महत्व खूप आहे. आपल्याकडे भारतात नवजात बाळांचं थायरॉईड स्क्रिनींग अजूनही केलं जात नाही. त्यामूळे बरेच वेळा बाळ वारंवार अशक्त कींव्वा रोगग्रस्त असतं.
अमेरीकेत देखिल फक्त काही निवडक राज्यातूनच thyroid screening at birth हे सक्तीचं असतं/अलिकडे झालं आहे. आमच्या मुलीच्या जन्माच्या वेळी ते केलं गेलं व त्याचा फायदा झाला.
बाकी बर्‍याच वेब्लिंक्स वर चांगली माहिती सापडते, जसे की thyroid.org
अजून सर्वात महत्वाचे म्हणजे thyoid testing अगदी अचूकपणे करणार्‍या labs खूप कमी आहेत. अशी टेस्ट करायची असेल तर third generation test करायचा आग्रह करायला विसरू नये. याचे रिसल्ट्स बरेच वेळा reliable आणि अधिक realistic असतात. त्याच्बरोबर antibodies tests करून घेणंही महत्वाचं.

>लढण्यासारखा रोग नाहीचे हा - ह्याला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.
hypo/hyperthyroid हा मुळात रोग नाहीये, its deficiency or some technical glitch in pitutary functioning. त्या अर्थाने या रोगाचे समूळ उच्चाटन वगैरे अशक्य आहे. पण रुग्णामध्ये hypo/hyper आढळून आल्यास त्याचा शरीरावर व एकंदर प्रकृती स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होवू नये म्हणून विविध औषधे किंव्वा replacement hormones उपलब्ध करून देण्यापर्यंत वैद्यकशास्त्राची प्रगती झाली आहे. dna research प्रमाणे याही विषयात प्रचंड संशोधन चालू आहेच.

hypo/hyperthyroid हा मुळात रोग नाहीये, its deficiency
>> अगदी बरोबर. खरंतर मी जंतूमधून होणारे रोग ह्या अर्थानं म्हटलं नव्हतं - तर शरीराला होणारा त्रास ह्या अर्थी रोग म्हटलेलं.
कळवल्याबद्द्ल धन्यवाद! मी रोग बदलून 'व्याधी' असं केलंय - बरोबर वाटतय का कळवा..

थायरोईड असणार्‍या माणसांनी काय खावू नये ह्यावर शोध घेताना - सोयाबद्दलची काही धक्कादायक माहिती सापडली.
खालच्या लिंकवर आहे - वाचा - आणि कुणाला प्रत्यक्ष काही अनुभव असेल (पॉझिटिव्ह/निगेटिव्ह काहिही) तर नक्की कळवा.
http://www.maayboli.com/node/13623

माहितीपूर्ण सुंदर लेख! आवडला.

आपल्या विकारनिवृत्तीचा शास्त्रीय अन्वयार्थ लावून, सारी तथ्ये अभिनिवेषविरहित, सर्वसमान्यांना सादर करणे ही हल्ली काळाची गरज आहे. बरे होणारे सारेच लोक काही असे कष्ट घेत नाहीत. मात्र, आपण ते घेतलेत आणि सहज उपलब्ध होऊ शकणार्‍या माहितीअभावी, कमी गुणवत्तेचे जीवन जगण्याची पाळी इतरांवर येऊ नये याची काळजी घेतलीत, याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

नानबा, अतिशय सुंदर लिहिलयंस!!
मला जरा जास्तच पटतंय कारण मी सध्या त्यातूनच जातीये. डीटेल स्टोरी सांगू का?
सहा महिन्यांपूर्वी अगदी टोकाचं डिप्रेशन आल्यामुळे antidepressants चालू केली.फरक वाटेना म्हणून एका डॉक्टर मैत्रिणीच्या सल्ल्याने complete hormonal profile---LH,FSH,TSH etc करून घेतलं.तर काय....
TSH - 87 !!!! 100mcg thyroxin चालू केलं.चुकत-माकत ३ महिने घेतलं,नंतर कामाच्या गडबडीत आणि तू म्हटलंस तसं कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - असंच वाटून मी गोळ्या बंद केल्या !!!
३-४ महिन्यांपासून डोकेदुखीचा भयानक त्रास चालू झाला आहे. गेल्या महिन्यात मुंबईतल्या एका 5-star हॉस्पिटलमधल्या प्रसिध्द Headache clinic मध्ये दाखवलं. निदान---MIGRAINE !
पण त्या ओषधांनीही बरं वाटेना.दरम्यान वजन वाढत चाललं होतं.म्हणून चालायला सुरूवात केली...अगदी nike चे नवीन जोडे आणून! पण २-३ र्‍या दिवशीच डाव्या घोट्याजवळची शीर दुखायला लागली. ऑर्थो.ने सांगितलं, brisk walking बंद!!
आता काय? अचानक ते थायरॉईड प्रकरण आठवलं. त्याच दरम्यान तुझा लेख वाचनात आला.
म्हट्लं बघू या तरी खरंच आहे की गेल्यावेळी चुकीचा रिपोर्ट आला होता ते.
पण कसचं काय.....ह्या ही वेळेला TSH > 60 !!
आता मात्र वेळेवर गोळ्या घेतेय!!!
सध्या वेगळ्याच संकटात आहे....."त्या" डोकेदुखीचं निदान sinusitis असं झाल्यामुळे antibiotics चालू आहेत.
त्याच्याने सारखी भुक लागते , खाल्लं की वजन वाढतं , आणि सध्या कामाचा लोड एवढा आहे की व्यायाम करायला जमत नाहीये...............आणि खरंतर वजन कमी होइल की नाही ही धास्ती वाटतेय त्यामुळे नैराश्य येऊन " व्यायाम-बियाम काही नको " असं वाटतंय!
सॉरी,खूप मोठठी पोस्ट लिहिलीये ना!

श्या श्या....

रुटीन चेक अप मध्ये बायकोचे TSH ७ आले. आता ५0 mcg ची र्रोज एक गोळी सुरु केली आहे. बाकि त्रास काहिच नाही. ८७ आणि ६० वाचुन चक्कर च आली. ( शंका: ८७ ला १०० mcg, तर ७ ला किती?) मला तर ५० mcg जास्तच वाटतेय.. (गणिती डोकं).... Happy

अजुन कोणि आहे का अस ७ वगैर असुन गोळी खाणारं?

निवांत - दोन वेगवेगळी एककं असतील ह्या दोन्ही काऊंटस मध्ये.
माझी बँगलोरची लॅब वेगळं वापरायची आणि पुण्यातली लॅब वेगळं वापरते. (इथं रिपोर्ट हातात नाही देत Sad ) अर्थातच पुण्याच्या आकड्यांमधे आणि बँगलोरच्या आकड्यांमधे लईच फरक होता..
हवं असेल तर रिपोर्टस् शोधून सांगू शकते!

नानबा, काही शंका आहेत,
आजकाल तळपायांची खूपच जळजळ होते, हे सुध्दा hypothyroid मुळे असेल का आणि त्याला काही उपाय माहीत आहे का?
प्रचंड झोप येण्याचं प्रमाण कधी कमी होईल? तुझा अनुभव काय ह्याबद्द्ल ?
माझ्या आईने ५-६ वर्षे थायरॉईडच्या गोळ्या घेतल्यात ....पण surprisingly गेल्या ३-४ वर्षांपासून गोळ्या बंद असूनही ( डॉ़क्टरांनीच केल्यात ) तिचे रिपोर्टस नॉर्मल येतात. असं अजून कोणाच्या बाबत घड्लंय का?

आजकाल तळपायांची खूपच जळजळ होते, हे सुध्दा hypothyroid मुळे असेल का आणि त्याला काही उपाय माहीत आहे का?
>> कधी ऐकलं नाहिये! काशाच्या वाटीला तेल लावून ती पायावर घासायची. डोळ्यांवर गार पाण्याच्या पट्ट्या. केसांना तेल (मला कधी त्रास झाला तर ह्या उपायांनी मदत होते - मात्र थायरॉईड संदर्भात नाही)

प्रचंड झोप येण्याचं प्रमाण कधी कमी होईल? तुझा अनुभव काय ह्याबद्द्ल ?
>> बहुतेक सहा महिन्यांपेक्षा जरा जास्त वेळ लागलेला सगळं नॉर्मलला यायला..

माझ्या आईने ५-६ वर्षे थायरॉईडच्या गोळ्या घेतल्यात ....पण surprisingly गेल्या ३-४ वर्षांपासून गोळ्या बंद असूनही ( डॉ़क्टरांनीच केल्यात ) तिचे रिपोर्टस नॉर्मल येतात. असं अजून कोणाच्या बाबत घड्लंय का?
>> WOW!रामदेवबाबा म्हणतात की काही आसनं केल्यानं फरक पडतो. अनुभव नाही.
माझा डोस दिडशे वरून १०६ mcg वर आलाय.

चांगला लेख अगदी सोप्या भाषेत माहिती दिली आहे.
माझी एक अकॅडेमिक शंका- 'हायपरथायरॉईडचे प्रमाण लोकसंख्येत साधारणपणे वाढले आहे काय? असल्यास त्याचा आपल्या आहारात आयोडाईड मीठाचे प्रमाण वाढण्याचा काही संबंध आहे का?'

नानबा, अतिशय उपयुक्तं माहितीपूर्णं लेख. कुठेही बोजड न होता सगळी माहिती सोप्प्या शब्दांत, योग्य त्या डिटेल लेव्हलला मिळतेय. खरच, धन्यवाद.
आता माझा अण्भव!!
किंचित थकवा ह्यापासून लक्षणांना सुरूवात झाली.
रोजच्या खाणे व व्यायाम ह्यापैकी कशातही बदल न करता, वजन हळू हळू वाढत(च) राहिलं (माझा लेक ह्याला हिप्पोथायरॉइडिझम म्हणतो).
लहान स्नायूंवरचा ताबा हळू हळू जाऊ लागला. (माझं खणखणित तबला वाजवणं, बरळल्यासारखं बोबडं वाजू लागलं.)
पापण्यांना जडपणा येऊन सुजल्यासारख्या झाल्या - झोप पूर्णं न झाल्यासारखे किंवा अती झोप झाल्यासारखे डोळे दिसू लागले.
शॉर्ट टर्म मेमरीवर किंचित परिणाम झाला होता.
आणि शेवटी.... एक दिवस चक्कर येऊन पडले!!

टेस्ट्स झाल्या. तेव्हा TSH4 ने आसमान गाठलं होतं. बीपी कमाल वाढलं होतं. कोलेस्ट्रॉल अमाप वाढलं होतं (इथे आकडे मुद्दाम देत नाहीये.)

थायरॉक्सिन चालू झालं, त्याचबरोबर बीपीसाठी औषध. हायपोथायरॉइडिझम अनट्रीटेड राहिल्यास शरीरातल्या इतर अनेक स्नायूंच्या शैथिल्याप्रमाणेच हृदयाचे स्नायूही शिथिल पडू शकतात. त्याचा दूरगामी परिणाम म्हणजे हार्ट एन्लार्जमेन्ट. माझी ती सुद्धा टेस्ट झाली.
काही दिवस, कुणीतरी सोबत असल्याशिवाय कुठेही (बाथरूममधेही) जाण्याची परवानगी नव्हती. तीन आठवडे पूर्णं विश्रांती आणि त्यानंतर कमी वेळ काम.
थायरॊक्सिन बरोबर, प्राणायाम अधिक नियमाने सुरू केला. दोनच आठवड्यांत बीपी ताळ्यावर यायला ह्याचा खूप उपयोग झाला. बीपीच्या गोळ्या त्यानंतर बंद आहेत.
गेल्या दीड वर्षात सुरुवातीला दर तीन महिन्यांनी आणि आता सहा महिन्यांनी संपूर्णं ब्लड प्रोफ़ाईल टेस्ट केली जाते. मधेच काही "वेगळं" वाटल्यास परत टेस्ट. पण सगळं बऱ्यापैकी सुधरायला आठेक महिनेतरी लागले.

थायरॉइडिझम ही लाईफ थ्रेटनिंग किंवा लाईफस्टाईल चेंजिंग व्याधी नसल्याने त्यासाठी फार संशोधन झालेलं नाही.
मला झालेला (हायपो)थायरॉइड मालफ़ंक्शन हा थायरॉइडच्या ऑटोइम्यून डिझीजमुळे झाला (ह्याला हाशिमोटोज डिझीजही म्हणतात) आहे. एका भल्या दिवशी माझ्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला असा (अचरट) साक्षात्कार झाला की, हे थायरॉइड ग्रंथींचं कामच मुळात अवैध आहे. त्यामुळे बिच्चाऱ्या ग्रंथींकडे पुरेसा कच्चा माल असतो (आयोडीन इ.) पण त्यांनी काम सुरू केलं रे केलं की, ती फॅक्टरी तात्काळ बंद करण्यात येते... आता बोला!

नानबा म्हणतेय ते तंतोतंत खरं! आपल्याला "हायपो-थायरॉइडिझम" असल्या चक्रम नावाचं काही झालय हेच मुळात विसरायचं. म्हणजे, क्षणोक्षणी आठवणीत ठेऊन काळजी घ्यायची, वागायची ही गोष्टच नव्हे.

सगळ्यातच नियमितपणा आणायचा प्रयत्नं करतेय. आणि इतकं पुरे आहे सध्या -
नियमित व्यायाम - प्राणायाम, योगासनं, चालणं.
नियमित - खाणे. ठरवून काहीही पथ्यं नाही. पण दिवसाचा ठरलेला चौरस आहार ठरलेल्या पाच वेळात विभागून.
नियमित - झोपणे. हे एक मला मनावर घ्यावच लागलं. दिवसाला ठराविक इतकी झोप (कमीतकमी सहा तास), ठरलेल्या वेळी घ्यायचीच.
आणि रोज ठरलेला थायरॉक्सिनचा डोस
(आता ऑटोइम्यूनचे काही इतर साईड धंदे आहेत. ते जरा वेगळे संभाळावे लागतात... पण त्यासाठी ही जागा नाही.)

अजून - ह्यातली काही टिपिकल लक्षणं माझ्यात दिसली नाहीत. ग्रंथींनी सूज वगैरे.
मला येत असलेला थकवा आणि वजनात वाढ इतकी हळू हळू होत राहिली की, माझं शरीर, मन आणि माझी दैनंदिन आयुष्यं ह्याला ऍडजस्ट करीत राहिलं.
१. आपल्याच्याने होत नसतानाही, निव्वळ आंतरिक शक्तीवर दिवसच्या दिवस मारून नेल्याने, "थकवा-बिकवा काही नाही... जमतय आपल्याला" असला मूर्खपणाचा विचार करीत रहाणं,
२. "आपण ना, हवा तितका व्यायाम करत नाहीओत. मग वजन वाढेल नाहीतर काय" असला माझा मीच काढलेला निष्कर्ष.
३. स्त्रीयांच्या एक विशिष्टं वयानंतर जो रोलरकोस्टर चालू होतो त्याचाच हा भाग असणार, असा पुन्हा माझा मीच काढलेला निष्कर्ष.
त्यामुळे होणारा बदल कळला पण वळायला वेळ लागला. मी मुळात डॉक्टरांकडे गेलेच नाही आणि निदान व्हायला खूप वेळ लागला.

माझ्या अनुभवापासून (मूर्खपणातून) कुणी शिकावं ह्यासाठी हा पोस्टं प्रपंच.

मला झालेला (हायपो)थायरॉइड मालफ़ंक्शन हा थायरॉइडच्या ऑटोइम्यून डिझीजमुळे झाला (ह्याला हाशिमोटोज डिझीजही म्हणतात) आहे. एका भल्या दिवशी माझ्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला असा (अचरट) साक्षात्कार झाला की, हे थायरॉइड ग्रंथींचं कामच मुळात अवैध आहे. त्यामुळे बिच्चाऱ्या ग्रंथींकडे पुरेसा कच्चा माल असतो (आयोडीन इ.) पण त्यांनी काम सुरू केलं रे केलं की, ती फॅक्टरी तात्काळ बंद करण्यात येते... आता बोला!>>>>>दाद अग डिट्टो माझ्याही बाबतीत हेच होतय. मला सध्या तरी ५२ mcg चा डोस चालु आहे. आता वर्ष होईल. अधुन मधुन ठरवुन दिलेल्या वेळी टेस्ट नेमाने करतेय. अजुन तरी रोपोर्ट्स नॉर्मल आहेत. माझ तर वजन वगैरे विशेष वेगाने बिगाने वाढत नव्हत. मी मुळात काठी यष्टीची त्यामुळे सगळ्यांना वाटायच थोड वाढलय वजन तर बरच आहे की. पण बाकीचे त्रास व्हायला लागले. थायरॉईड ग्रंथी सुजल्या सारख्या वाटत होत्या म्हणून मीच फॅमिली डॉ. कडे आग्रह धरुन टेस्ट करुन घेतल्या. पण बरच झाल अ‍ॅटलिस्ट वेळेवर निदान तरी झाल.

आपण ना, हवा तितका व्यायाम करत नाहीओत. मग वजन वाढेल नाहीतर काय
>> माझ्या डॉ न मला सगळ्यात पहिल्या भेटीत मला तेच सांगितलं - की "Few people blame it on lifestyle - eating habbits/lack of exercise. पण काहिही केलं असतं तरी वजन वाढलच असतं.. कारण ते काही ह्या गोष्टींमुळे वाढलेलं नाहिये."
मी लगेच नवर्‍याकडे 'विजयी' मुद्रेनं पाहिलं (बघ, आणि मला म्हणायचास.. अशा नजरेनं) Happy

हाशिमोटो बद्दल ऐकून होते, पण येवढ्या डिटेल मध्ये माहिती नव्हती..

१०६ mcg>>>> मला वाटत होतं असं odd प्रमाण कधी नसतं. २५ ५० ७५ १००..... अस्च असत...
>> निवांत, मला १०० चा डोस कमी पडतो आणि ११२ चा जास्त होतो (आता घ्या!). म्हणून मला १०० चा एक दिवस आणि ११२ चा एकदिवस असं आलटून पालटून घ्यावा लागतो. (म्हणून १०६ लिहिलं Happy )

आगाऊ, कदाचित पूर्वीच्या काळीही होत असेल पण 'आळशीच आहे ती/तो, सारखं झोपायला हवं, वजन कसं वाढलय' वगैरे टोमणे ऐकून घ्यायला लागत असेल. (आम्हाला शंका आहे की कदाचित माझ्या आजीला (आईची आई) पण होता.. एका विशिष्ट वयानंतर जाड झाली.. थकली त्यावरून. पण डायग्नोस कधीच नाही झालं!)

मी लगेच नवर्‍याकडे 'विजयी' मुद्रेनं पाहिलं ....
नानबा, तुमच्या विनोदबुद्धीला सलाम!
अपघाताने का होईना डिटेक्ट झाला हायपो याचे मला समाधान वाटत आहे. आजच पहिला डोस सुरु केला. लोकहो, लिहित रहा. एकाच बोटीतून जाणारे प्रवासी जरा बोलत राहिले तर प्रवास सुखाचा होतो!

हुश्श्य, सापडला एकदाचा हा धागा Happy
लिम्बीकरता काल डॉक्टर म्हणले की चेक करुन घ्या, म्हणल आधी वाचाव तरी, अन लिम्बीलाही वाचायला द्याव की नेमक काय आहे! Happy
कित्ती ती शोधाशोध करायला लागली!

हायपोथायरॉईडीझमची बहुतेक सगळीच लक्षण माझ्यात मला गेल्या काही दिवसांपासुन आढळतायत, तपासणी लवकरच करेन, मला एक शंका विचारायची आहे ती म्हणजे मी नर्सिंग करते तर जर मला हायपोथायरॉईडीझम असेल तर तो माझ्यामुळे माझ्या बाळाला (१० महीने) पण होऊ शकतो का?

Pages