वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thyroid test करतात कशी हे कोणी सांगेल का? म्हणजे जसं सोनोग्राफी machine, xray machine असतं तसं ह्यासाठी काही नसतं का?
मला हेमोग्लोबिन आणि thyroid अशा दोन्ही test करायला सांगितल्या. पण lab मध्ये फक्त रक्ताचं sample घेतलं. फक्त त्यावरून माझ्या गळ्यात काय गडबड आहे हे कसं कळणार?

माझी अंगकाठी बारीक आहे. गेल्या ४-५ महिन्यापासून दिवसाही खूप झोप येतीये. सारखी भूक लागते. खूप घाम येतोय.
प्लीज हेल्प!

पण lab मध्ये फक्त रक्ताचं sample घेतलं. फक्त त्यावरून माझ्या गळ्यात काय गडबड आहे हे कसं कळणार?>>>
Happy

थायरॉईडची टेस्ट म्हणजे टी ३ , टी ४ आणि टी एस एच या रक्तातील घटकांची मोजणी.
या वरून थायरॉईड्ची क्षमता कळते आणि यात दोन प्रकार आहेत.
हाय्पो आणि हायपर.
बाकी तुमच्या डॉक्टरांकडून सविस्तर माहिती काढावी.

thanks रेव्ह्यू. म्हणजे माझं bloodsample घेतलं ते बरोबर होतं.
आज 'सकाळ' मध्ये thyroid वर आयुर्वेदिक उपचार म्हणून जो लेख आलाय, त्या मध्ये जे चित्र दाखवलंय
मला वाटल खरी test अशी करतात का काय आणि माझ्या डॉ. नी माझी फक्त blood टेस्ट वर बोळवण केली आणि ५०० रु. उकळले!

चैत्राली, ब्लड टेस्टच करतात. काही प्रसंगी डॉ सोनोग्राफी देखील करायला सांगतात सुरुवातीला. मला सांगितली होती.
पण आता रेग्युलर टेस्ट म्हणून ब्लड टेस्टच करतात. मी दर २-३ महिन्यांनी करते तपासणी. टि३, टि४, टिएसएच टेस्ट करते. क्वचित डॉ. फ्री टि३ टि४ टेस्ट करायला सांगतात (अशी फ्री टि३, टि४ टेस्ट मला सुरुवातीला २-३ वेळा सांगितली होती)

आता लेव्हल विदिन लिमिट आहे ना गोळी घेऊन हे तपासत रहाण्यासाठी मला दर २-३ क्वचित ४ महिन्यांनी (डॉ सांगेल तसं) टेस्ट करुन बघावी लागते

कविन, तुमचा हायपो की हायपर? गोळ्या कायमच्या बंद होऊ शकतात का?

मी गेल्या २ वर्षापासुन हायपर आहे. ८० mg वरुन ५mg वर आहे सध्या पण पूढे काय हे समजत नाही.

thanks कवीन.
पण जर reports +ve आले तर हे कायमचं मागे लागणार?

अविकुमार ,
माझा detect झाला तर हायपर चं होईल! मी शेअर करीनच इथे मला डॉ . नी काय सांगितलय ते.
तुमचं वजन कमी झाल होतं ना? मग वाढलं का परत? हे मी स्वतः साठीच विचारतीये. माझा वजन खूप कमी झालय.
औषध- उपचारांनी थोडं वाढलं तर बरंच होईल.

माझं वजन वाढलं होतं, लेव्हल विदिन रेंज आल्यावर पुन्हा नॉर्मल झालं. ह्या गोळ्यांना आपली मैत्रिण मानायचं आणि न विसरता घ्यायच्या त्या. त्यामुळेच लेव्हल नॉर्मल रहातेय हे विसरायचं नाही. गोळ्या कमी मात्रेच्या करायच्या का नाही, करायच्या तर कधी हे डॉ ला ठरवू दे. आपण आपलं गोळ्या घेणं आणि अधून मधून टेस्ट करणं विसरायचं नाही.

पण जर reports +ve आले तर हे कायमचं मागे लागणार?>>> होय. बर्‍याच लोकांना बरच काही मागे लागतं त्यामानाने ही तर एक छोटीशी गोळी आहे. बस्स.

चैत्राली
मागे लागलय वगैरे भावना मनात आणू नका.
मी रेग्युलेटेड डोज दर रोज २ वर्षांपासून घेतोय प॑ण खूप रीलीफ आहे.
आणि अनेकांना हा त्रास असतो पण अगदी नक्की कमी होतो.

तुमचं वजन कमी झाल होतं ना? मग वाढलं का परत? हे मी स्वतः साठीच विचारतीये. माझा वजन खूप कमी झालय.>>>चैत्राली, वजनाची चिंता करु नका. ते होतं परत नॉर्मल.

माझं वजन ९० किग्रॅ होतं ते हायपरमुळे ५७ किग्रॅ झालं होतं. सध्या ९७ आहे!!! (हायपो झाला का काय?!!!!) Happy

वेळेवर न चुकता गोळी घेत रहायचं, काही प्रॉब्लेम्स होत नाहीत.

५७ होईपर्यंत निदानच झालं नाही. डॉ.ला वाटलंच नाही की थायरॉईड असेल म्हणून. एकदा का निदान झालं की लगेच कंट्रोल होतं.

हाय, कविन, दे टाळी... मलापण थायरॉईड आहे... हायपो. वजन वाढतं हायपोमधे म्हणून माझ्या लेकाच्या भाषेत हिप्पो Happy
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला थायरॉईडिझम आहे हे स्वीकारायचं. काही विशेष विचित्रं झालय हे मनातून काढून टाकायचं.
सुरुवातीच्या काळात डोस रेग्युलेट होण्यासाठी, तुझ्या शरीराला गोळ्यांची सवय होण्यासाठी काही वेळ लागेल, वरचेवर टेस्ट्स कराव्या लागतील. चिडचिड, वैताग, क्वचित डिप्रेशन... हा सगळा आपण ह्याला सरावण्याचा भाग असेल...
घरातल्यांना विश्वासात घ्यायचं, मुलं समजण्याइतकी मोठी असतिल तर त्यांनाही. आपण मोठ्यानं ह्या गोष्टी बोलायला लागलो की त्याची तीव्रता कमी होते.
मी फटकन चिडायचे... अगदी काहीही बोललेय. मग स्वतःचा राग, मग गिल्टी... रडारड. काय नव्हेच ते.
स्वतःला जरा सुधरलं की चक्कं माफी मागून टाकायची घरातल्यांची, अगदी मुलांचीही. काहीच दिवसांत वजन, हे मनाचं संतूलन वगैरे सगळं ताळ्यावर येईल.

अजून एक... थायरॉईड काम न करणं म्हणजे आपला बॅटरी चार्जर काम न करणं हे लक्षात ठेवायचं. बाहेरून थायरॉक्सिन घेणं म्हणजे बॅटरी चार्ज करणं. त्याचा डोस आपल्या नेहमीच्या कामांसाठी, आयुष्यासाठी ठरवलेला असतो. मग गोळी विसरणं आणि अती काम किंवा मज्जा किंवा काहीही (ज्यात शक्ती खर्चं होते) हे वरचेवर झालं की, संतूलन बिघडतं.
तेव्हा गोळी घेत रहाणे, आपली एनर्जी लेव्हल लक्षात घेऊन काम ओढवून घेणे (किंवा माझ्यासाठी एकाचवेळी किती दगडांवर पाय ठेवायचा ते ठरवणे)... वगैरे आयुष्याचा सहज भाग होऊन जातो...
चक दे फट्टे... थायरॉईडकी ऐशी की तैशी.

दाद, खरी मैत्रिण ग तू!!! मी पण हिप्पो माझ्या मुलीच्या भाषेत. Happy
आणि आता ही रोजची एक गोळी म्हणजे आयुष्याची सखी आहे. पण नाही घेतली की शरीर थकून जातं, मन उगीच घाबरं होतं. ज्यांना ही गोळी घ्यावी लागते आहे त्यांनी - मैत्रिणी आणि मित्रांनी - नकारात्मक विचार करू नका. मला पण काही महिने लागले हा मानसिक बदल करण्यासाठी. पण जेव्हा केला तेव्हा या गोळीचे महत्व पटले. आयुष्याकडे सकारात्मक होऊन बघु शकते.
थायरॉईडचे विकार - हायपर्/हायपो जगातल्या २०% लोकांना असतात - माझ्या डॉ च्या म्हणण्यानुसार. त्यामुळे आपण एकटे नाही आहोत. यावर उपाय सापडला आहे आणि तो सोपा आहे हे पण काही कमी नाही. योगासनांमुळे हा त्रास कमी होतो असं आताच वजनाच्या धाग्यावर वाचले. याबद्दल अधिक माहिती मिळेल का?

जे हायपोथॉयरॉयड साठी गोळी घेत असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की गोळी घेतल्यावर कमीतकमी एक तास काहीही खाऊ पिऊ नये. मी झोपताना गोळीची बाटली जवळ ठेवते.पहाटे ४,५ला जाग आली की गोळी घेते.परत झोप. हे केल्यानंतर वजन कंट्रोल झाले.

माझ्या आईलाही आहे- हायपो. डॉ नी मलाही होणार सांगितलं आहे! Happy
त्यांनी एक टिप दिली ती म्हणजे कच्चा कोबी खायचा नाही. कोबी खायचा असेल (भाजी वगैरे) तर
२० मिनिट शिजवायचा मग खायचा.

मी पण याच नावेत...
T3 & T4 नॉरमल आहे, अ‍ॅन्टीबॉडी ABS पण नॉरमल आहे.
आता जी टेस्ट केली.. thyroglobulin ति आहे @ > 500.00 नॉरमल रेंज <= ६०.००

माझी Endocrinologist ची अपॉइनमेन्ट बुधवारी आहे.. काय म्हणतात काय माहीती..

मी पण फार चिडकी झाली आहे, वजन वाढले आहे, आळशी झाले आहे.. बघू काय होते.. पण टेन्शन आले आहे आता... Sad

योगिता, << मी पण फार चिडकी झाली आहे, वजन वाढले आहे, आळशी झाले आहे.. बघू काय होते.. पण टेन्शन आले आहे आता... >>
आळशी - नाही. तू लवकर थकते आहेस. काहीही करावसं वाटू नये (स्लगिशनेस) हे लक्षणच आहे, हिप्पोचं Happy
मी वर म्हटलं तसं बॅटरी चार्जिंगमधे गोंधळ आहे. गोळ्या-डोस अ‍ॅड्जस्ट झालं की, हळू हळू सगळं ठीक होईल. टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस.

मी साधारण १ वर्ष घेतेय हायपोसाठी ..सुरुवातीला tsh 6.4 काहीसे होते..२५mcgने 5 वर आले, मग ६ महिने ५० mcg घेत होते..हल्लीच परत बघितले तर tsh 0.75. डॉक्टर म्हणे tsh नॉर्मल रेंजच्या खाली आले तर हाडांची झीज होत जाणार..आता ५ दिवस ५०mcg मग २ दिवस अर्धी गोळी (२५mcg) असं चाललंय..१ महिन्याने पुन्हा टेस्ट करुन बोलवलंय.

NANBA khup chaan lekh lihala ahes, actual mala hi thyroid cha tras ahe gelya 5 varshan pasun pan mi niymit goli ghete (THYRONORM 50 MCG) tyamule pushkal recover ahe. tasech doctor yoga pan sangital ahe pan mi karat nahi .jamat hi nahi v kahi alashipana. pan hi goli ayushbhar ghyavich lagnar ahe ka hyavar kahi upay nahi ka.

Kalpana..........

pan maze hat pay dukhat rahtat v hatapayal mungya pan khup yetat yavar side by side kahi heomiopathic or ayurvedic upay ahe ka...................

Kalpana........

मी पण आले ह्याच नावेत.. हायपोथायराईड आहे आजच कळले ५० mcg ची गोळी सुरु झालीय
अगोदर माहीतीच नव्हते की वजन का वाढतेय मला वाटले खाण्यामुळे असेल तर असो.
इकडे बरीच चर्चा झालीय लक्षणांची पण अजुन एक लक्षण आहे स्त्रियांमधे जे म्हणजे छाती दाबल्यावर दुध येणे.. प्रेग्नेट नसल्यावर पण

कनन, तुम्हाला झालेला हायपोथायरॉइडिझम हा कोणत्या कारणामुळे झालाय ते माहीत करून घ्या. तो जर ऑटोइम्यून ऑफ थायरॉइड असेल तर ही गोळी नक्की आयुष्य्भर घ्यायची आहे. तसच ह्या ऑटोइम्यून चा साईड बिझनेस Happy म्हणजे आर्थरायटिस. तो र्हुमॉटॉईडही असू शकतो. हात पाय (सांधे) दुखतात ह्याचं ते ही कारण असू शकेल.
ह्यात घाबरण्यासारखं काहीही नाही... मला हे दोन्ही आहेत आणि मी मज्जेत आहे. डोक्टरांशी बोलून बघा. काही व्हायटॅमिन डेफिशिअन्सीमुळे सुद्धा हातपाय दुखू शकतात. (डी, कॅल्शियम). पण ते आपण नाही ठरवायचं... डोक्टरनी टेस्ट्स करून बघायच्या आणि उपाय सांगायचे. मग ते आपण नियमीत करायचे.
योगासने, प्राणायाम, नियमीतपणा, खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण... हे सगळं न केल्याने क्रॉनिक डिझिझेस होतात... आपणच आपल्याला त्या कड्यावरून ढकलून देतो. किती अजून खाली पडायचं ते ही आपल्याच हातात आहे.
प्राणायाम, आसनं ह्यानं सांध्यांचं आरोग्य नीट राहतय माझं. त्यावाचून उपाय नाही. त्यावरच कोणतही पेन किलर न घेता जगता येतय.
वेळ नाही किंवा आळस हे कारण मला परवडणारं नाही हे कळलं आणि जमलं सगळं.... जमवलं.
माझ्याकडून शुभेच्छा. औषधं काही प्रमाणात उपयोगी आहेत... पण शिस्तं, नियमीतपणा ह्याला उपाय नाही... हे सत्य मला उशीराने कळलय... ते तुम्हाला सांगितल्याविना रहावलं नाही. राग नसावा.

ऑटोइम्यून ऑफ थायरॉइड याचा अर्थ काय.??......

मी कालच डोक्टरानकडे (आयुर्वेदीक) जाऊन आले. हातपाय सारखे दुखतात त्यावर त्यानी म ला b12 & calcium test सागीतल्या आहेत . करुन बघते काय report येतात...... ५० mcg ची गोळी चालुच आहे . सध्या शनीवार व रविवार नाही घ्यायला लावली आहे अस साधराण २ महीन्यापासुन सुरु आहे व आता थायरॉइड test पण करायाला सागीतली आहे बघु या काय reports येतात. व हे खरच आहे की आळस करुन चालणार नाही..

दाद, तुम्ही खुप छान माहीती दिली त्त्याबद्द्ल धन्यवाद...........

ऑटोइम्यून ऑफ थायरॉईड (ह्याला हशिमोटोज डिझीस असंही छान नाव आहे) - गुगलून बघितल्यास भरपूर माहिती मिळेल. सगळेच ऑटोइम्युन रोग हे इम्यून सिस्टिमच्या डिसॉर्डर मुळे आहेत.
साध्या शब्दांत सांगायचं तर एका भल्या दिवशी इम्यून सिस्टिमच्या अंगात येतं. अन माणसाला प्रोटेक्ट करण्याऐवजी ती त्याच्याच चांगल्या चाललेल्या प्रक्रियांवर हल्ला करते.... हल्ला सुरू ठेवते.
माझ्या थायरॉइड ग्रंथी (कारखाना) छानच आहे. अंगात आयोडीन वगैरे कच्चा माल पुरेसा आहे. पण माझी इम्यून सिस्टिम कारखान्याची शिफ्ट सुरू झाली की... कारखानाच बंद पाडते Happy
का? त्यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही.
आपल्याला काही भयंकर झालय हे आधी डोक्यातून काढून टाकायचं. मधूमेहा सारखाच हा सुद्धा रोग. गोळी ही बाहेरून घ्यायचं ते थायरॉक्सिन आहे... जे अदरवाईज आपल्या ग्रंथी तयार करतात. किंचित कमी, किंचित जास्तण ... ह्याचं संतूलन आपला मेंदू त्या कारखान्याशी बोलून ठरवतो. पण ठराविकच डोस बाहेरून घेत असू तर हे बॅटरी चार्जिंग सारखं आहे. आपला दिवस आपल्या बॅटरीप्रमाणे आखून घ्यायचा अन बॅटरी कमी होत असल्याचं लक्षात आल्यावर आराम करायचा. स्ट्रेस, दगदग टाळायची.... सोप्पय.

असो... तर ही ऑटॉइम्यूनची कथा... 'रोगी अन रोग दोघेही सुखाने नांदू लागले...' अशीच संपवायची आहे आपल्याला. अगदी अशीच... ह्या कथेला दुसरा कोणताही अंत मला मान्य नाही... तुलाही नसावा. इथे येऊन माहिती घेऊन अन देऊन आपल्याला सगळ्यांना हे आणि हेच साधायचय.

खुपच छान माहिती..
माझ्या काही शंका..
घसा/ गळा बाहेरुन थोडा सुजल्यासारखा तसेच चेहरा पण थोडी सुज आल्यासारखा वटतो आहे...
आधी जवळ जवळ २ वर्षा पुर्वी थायरॉइड टेस्ट केली होती तेव्हा सगळ नॉर्मल होत...
PCOS (polysicystic Ovary Syndrome)चा आणि थायरॉइड चा काही संबंध आहे का?
थायरॉइड ची टेस्ट डॉ. च्या प्रिस्क्रिब्शन शिवाय करु शकतो का?
त्या टेस्ट चे नाव काय?

>>PCOS (polysicystic Ovary Syndrome)चा आणि थायरॉइड चा काही संबंध आहे क>><
सगळे हॉरमोनल इम्बॅलस्नस चे शिकारी आहेत.
त्यामुळे इन्डायरेक्टली हो.

>>थायरॉइड ची टेस्ट डॉ. च्या प्रिस्क्रिब्शन शिवाय करु शकतो क>><<
नाही.

मागची पाने चाळा. मी निबंध लिवलाय कोणत्या टेस्ट करायच्या ते.

ज्या मुख्य असतात त्याच सोडून काही डॉ सांगतात्.(म्हणजे डीटेल मध्ये जात नाहीत... कधी कधी काही डॉ. )

जिथे जिथे हा प्रश्न योग्य वाटत आहे तिथे तिथे लिहित आहे..
जर पेशंट पीसीओएस डिटेक्ट झालेला असेल तर..
१) वजन कमी करण्यातला एक उपाय म्हणुन सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घ्यायला सांगतात .. यात मध पीसीओएस ला चांगला पडेल काय ?
कारण मध शुगर लेव्हल वाढवु शकतो.. मग अगदी एक टी स्पून मध आणि २-३ टी स्पून लिंबू रस घेतला तर चालेल काय?
२) नुसते लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेतले तर फरक पडतो का?

Pages