वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा आज प्रथमच हा धागा पाहिला.मी २००० सालापासून १०० mcg चा डोस घेत आहे. हा धागा सुरु केल्याबद्दल धन्स!
calcium ची गोळी देखील घेत आहे.ती हायपोवरील गोळी घेतल्यावर ४ तासांनी घ्यावी ही उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार!
@समई >वेबसाईट नक्की बघेन.

नानबा, मस्त माहिती लिहिली . एक अ‍ॅडिशन कराविशी वाटते. हा त्रास अनुवंशिक असु शकतो. त्यावर वेळीच उपाय न केल्यानी (निदान उशिरा ) रक्तदाब वगैरे इतर व्याधी जडण्याची शक्यता ही वाढते.
रच्याकने . माझ्या आई, मावशीला असल्यामुळे, माझा आळशिपणा वजन वाढ मी थायरॉइड वर ढकलायचा प्रयत्न केला. तपासण्या केल्यावर आमचे डॉक्टर म्हणाले आयोडीन नाही व्यायाम कमी आहे. Wink

कृपया Borderline हायपोथायरॉईडीझमच्या उपचारांसाठी पुण्यातील तज्ञ Doctor सुचवा.
- मनी

मला हायपोथायरॉईडीझम चा त्रास मागच्या वर्षि सुरु झाला. मी इथे एका नामवंत endocrinologist ला भेटले. त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या. त्यात vitamin D खुप कमी आले. मग ५० mg ची गोळी सुरु झाली.
endocrinologist ने सांगितले कि vitamin D कमी असेल तर त्रास सुरु होउ शकतो. मग vitamin D चा डोस पण सुरु केला. आता गोळ्यामुळे सगळे नियन्त्रणात आहे. ईथे शिकागो मध्ये सुर्य कमी असल्याने endocrinologist म्हणाले कि खुप भारतीय लोकंना हा त्रास आहे.
परत भारतात आले कि आयुर्वेदिक वैद्यांना दाखवणार आहे.

कृपया Borderline हायपोथायरॉईडीझमच्या उपचारांसाठी पुण्यातील तज्ञ Doctor सुचवा.
- मनी

थायरॉइड मध्ये खाण्या पिण्यावर खूप कटाक्ष पाळावे लागते.
मला योग्य आहार, योगा ह्यानेच बराच फायदा झाला. डॉक्टरांकडे जावू नका सांगत नाहीये पण अश्या उपचाराने मला फायदा झालाय.

थायरॉइड मध्ये खाण्या पिण्यावर खूप कटाक्ष पाळावे लागते.>>
कोणते ते लिहा न झम्पी.मी मागच्या महिन्यात थायरॉइड टेस्ट केली तर आता गोळ्या सुरु झाल्यात.

लिहिते सविस्तर..

बरेच उलटे सुलटे डॉक्टर, उपाय करून झाले व मी थकले(थकलेले असायचे व आणखी थकले)..

मग एक सुदैवाने भेटला डॉक्टर, त्याचा सल्ला घेतला.
रोज आपणच लिहायचे वहीत. काय खाल्ले, किती स्ट्रेस घेतला(आज मी घबरले उशीरा उठले म्हणून मग एकदम थकल्यासारखे झाले... अगदी ह्या बारीक गोष्टी). व आहारावर केंद्रीत केले लक्ष.

मुळात म्हणजे त्रास करून घ्यायचा नाही हि सर्वात पहिली गोष्ट केली. कामं झाली नाही झाली..(कुठलेही काम) विचार नाही करायचा.
शिस्त लावून घेतली की ठराविक वेळात , ठराविक वेळी खाणं, झोपणं. तेलकट, तूपकट बंद. पापड, लोणची मसालेदार बंद. बाहेर खाणं पुर्ण बंद( हो, पुर्ण बंद..).
चहा बंद.
मटण बंद,
दूध बंद,दही वाढवले,
गोड बंद
काही गोष्टी नीट पाळल्या,
vitamin B12, omega 3 घेत होते ते वाढवले भाज्या/फळातून/मासे
vitamin D वाढवले.
नाचणीची पेज सुरु केली,
पाणी ३३ oz प्यायचे सांगितले होते,

व्यायामात,
योगाची स्पेशल पोज आहे जी थायरॉइड ला अ‍ॅक्टीवेट करते ती सकाळी करायची.(मी विसरले नाव त्याचे)
पोहणे सुरु केले,
रात्री चालणे,
स्ट्रेंग्थ ट्रेनिंग घेत राहिले,
सात नंतर तोंड बंद(खाणं)

हे केल्यावर पहिल्या तीन महिन्यात ७ पाँडस कमी झाले. मग उलट फास्ट झाले.. मग एका वर्षात २० पाँड्स. असे दोन वर्षे केले. बरेच आटोक्यात आले वजन. आता थोडेसेच (५-६ पाँड्स) ज्यास्त आहे पण सरसर वाढत मात्र नाही.

माझ्याकडचा चार्ट आहे तोच लिहिते, मला एकदम सगळं खाणं आठवत नाही.... तेव्हा क्रमशः

कृपया Borderline हायपोथायरॉईडीझमच्या उपचारांसाठी पुण्यातील तज्ञ Doctor सुचवा.
कोणी हि मदत करु शकत नाही का ??
- मनी

उत्तम माहीती

माझ्या मामांना हायपर थायरॉईड डिटेक्ट झाले सहा महिन्यांपूर्वी. लेवल ८५ होती अ‍ॅज अगेनस्ट ४ अलाऊड. ते सद्या मेडीकेशनवर आहेत.

थायरोनॉर्म ही गोळी रोज एक - आता आजीवन बहुधा.

योगाची स्पेशल पोज आहे जी थायरॉइड ला अ‍ॅक्टीवेट करते ती सकाळी करायची.(मी विसरले नाव त्याचे)>>
बहुतेक शीर्षासन आणि सर्वांगासन असेल.
शुम्पी माहिती बद्दल धन्यवाद!
मला एका डॉक्टरांनी सांगितले कि सोयाबीन चंक्स खावु नका.कोणाला असा सल्ला मिळाला आहे का ?

मी ह्याकरता धागा काढलेला मागे.
सोयाबीन, कच्चा कोबी, मुळा (आणि इतर काही भाज्या - शिजवल्यावर प्रॉब्लेम नाही) - थायरॉईडसाठी त्रासदायक.
खाऊ नका शक्यतो.

माझे TSH ३ महिन्यापुर्वी १.२३ होते ते आता १०.३ झाले आहे. डॉ नी ५० MCG चा डोस ६२.५ केला आहे कारण ५० कमि पडेल आणि ७५ जास्त होइल असे त्याचे म्हणणे!!

झंपी - प्लीज त्या डॉ. चे नाव व पत्ता मिळु शकेल का? माझ्या आईला हायपोथायरॉईडीझम चे निदान झालेले आहे गोळ्या चालु आहे पण तरीही हात व पायांवर सुज दिसते.

एक बेसिक प्रश्न आहे -
थायरॉईड ची योग्य रेन्ज किती असते?

माझे थायरॉईड ४.३५ आहे. रिपोर्ट मध्ये योग्य रेन्ज ०.४ ते ४ सान्गितली आहे. पण फमिली डॉ म्हणताहेत की ५ पर्यन्त योग्य आहे.

त्यान्नी मला कोणतेहि गोळ्या दिलेल्या नाहीत. हे योग्य आहे का? की मी कोणा दुसर्या तज्ञ डॉ ला दाखवावे?

शिल्पा, सॉरी बरेच दिवस इथे फिरले नाही. मी शोधते व सांगते. (खरे सांगायचे तर बर्‍याच वर्षापुर्वीची गोष्ट आहे ).

जेवणानंतर १५ मिनीटाने सुरु करायचे व तासभर भरभर चालायचे नित्य नेमाने. कितीही वाटले तरी जेवणानंतर अजिबात अंग टाकून झोपायचे नाही. घरातच फेर्‍या घाला.
चांगला योगा गूरु पकडा व प्राणायाम व पचनासाठी असलेल्या काही पोझ आहेत त्या शिका. स्वतंत्र वर्ग घेतला तर बरे असते, त्या पोझ नीट शिकून केलेल्याच बर्‍या. योगा वाचून काही जमत नाही.

मीठ कमी करा व झोपताना पाय जरासे उंच करून झोपा( हा उपाय जर बीपीचा कुठलाच त्रास नसेल तर).
पाणी भरपूर प्या. काकडी कच्ची, दूधीच्या फोडी शिजवून असे पदार्थ खा नुसते चावून. मीठ, चाट मसाला नका टाकू.
सूज जायला वेळ लागतो. जशी लेवल(थायरॉईडची बॅलेन्स होइल तशी जाईल) पण तोवर हे करत रहा.

थंड कुठलाही पदार्थ टाळाच, आंबवलेले पण शक्यतो टाळा. आधीच जठराग्नी मंद असतो त्यामुळे असले पदार्थ बंद करा. चहा, कॉफी बंद, सफेद भात, सोया बंद(कुठल्याच फॉर्म मध्ये, कच्चा, शिजवला तरी बंद).
जेवताना गरम व सहसा ताजं खा. मटण बंद.
पडवळ, तोंडली, दूधी अश्या भाज्या मला खायला सांगितलेले.
कोबी, फ्लॉवर शिजवूनच खा जर खाल्लं तर.
कडधान्या व डाळी रात्री भिजवून शिजवायच्या.
मासे भरपूर खा ज्यात मर्क्युरी कमी असे. खेकडे व कोळंबी बंद.
ह्याच्यात काय आहे ना, पचनक्रिया मंद असते , त्यामुळे त्यावर दाब येणार नाही असे पदार्थ खायचे. पांढरी साखर पुर्ण बंद. रात्री लवकर जेवण व चालणं मस्ट.
खूप फरक पडतोच असे पाळल्याने. गोळ्या चालू ठेवा डॉकच्या सल्ल्याने. चार एक महिन्यात साधारण फरक दिसतो तुमच्या प्रकृतीनुसार व खाणे-पिणं व्यायाम नीट केला तर.

चित्रा, TSH 4.5 च्या खाली असावे. आदर्श पातळी १.५ पर्यंत असे बहुतेक डॉक सांगतात. भारतात तर ५ पण नॉर्मल धरतात. Happy
पण घाबरायचे कारण नाही, तुम्ही बॉर्डरलाईन आहात.

नानबा,
सर्वप्रथम हा विषय इतक्या डिटेल्डमध्ये लिहिल्याबद्दल आभार...होतं काय आपण सगळेच जण अशाप्रकारे आजारांचे अनुभव घेत असतो पण अशा प्रकारे सगळीच जण लिहित नाही..त्यामुळे आपल्या या पोस्टचा खूप जणांना फ़ायदा होणार आहे हे नक्की..
माझ्यापुरता म्हणायचं तर नॉर्मली मी आजारांची लक्षणं वाचली की हे मला पण आहे का असं वाटत राहात ते या केसमध्ये झालं नाहीये म्हणून मी सुदैवी आहे असं म्हणेन..पण माझ्या माहितीत निदान एक व्यक्ती अशी आहे जिला या सगळ्या माहितीचा खूप फ़ायदा होणार आहे....
वरती कुणीतरी लिहिलं आहे नं की कन्सिव्ह करण्यासाठी थायरॉइड लेव्हल नीट असणं जरुरीचं आहे होय ते अगदी बरोबर आहे आणि मला वाटतं साधारण सगळे गायनॅक सगळ्यात पहिले ते तपासून घेतातच.....

रेव्यू , झंपी:

उत्तराबद्दल धन्यवाद!!

जर मी बॉर्डरलाईन आहे तर वर सुचवलेले नियम पाळून माझी थायरॉईड लेव्हल १.५ पर्यंत येवू शकेलसं दिसतयं.

बरोबर ना ? की हे नियम फक्त हायपोथायरॉईड असेल तरच पाळावयाचे आहेत?

मला एक शंका आहे.
हायपो आणि हायपर हे दोन्ही परस्पराविरोधी प्रकार आहेत असे दिसते. तर मग एकासाठी चालणारा व्यायामप्रकार, पथ्यकारक खाणे इ. दुसर्‍या केस मध्ये टाळायचे का?

थायरॉइडला मुळा आणी सोयाबीन अजीबात चालत नाही असे एका वाचनात आलेय. कितपत खरे आहे माहित नाही. पण इथे नानबाचे कितीही आभार मानले तरी कमी आहे कारण हा आता बर्‍याच प्रमाणात फोफावलेला आजार आहे, त्यावर त्यांच्यामुळे प्रकाश टाकला गेला.

अनुवांशिक असु द्या नाहीतर काही इतर कमतरता. असे म्हणतात ( अर्थात यावर मागे ३ ते ४ वर्षापूर्वी एका आयुर्वेदीक डॉ. ची मुलाखत बघितली होती त्यात त्या म्हणाल्या होत्या) की हा आजार पुर्णपणे बरा होत नाही, मधुमेहासारखा हा पण कायम रहातो.

मात्र पथ्ये पाळावी लागतात. सिंधी लोकांमध्ये मुळा खायचे प्रमाण खूपच असते, त्यांच्या देहयष्टीमुळे हे समजुन येतेच.

जंक फुड, त्यातच मैदा, बेकरी पदार्थ, बर्गर, पिझ्झा टाळणे हिताचे. वर झंपीने बरेच उपाय दिलेतच.

म्हणुनच कुठल्याही वयात आलेल्या ( आणी यंदा कर्तव्य असलेल्या ) मुला-मुलींनी लग्ना आधीच थायरॉईड, मधुमेह अशा तपासण्या करुन घेणे श्रेयस्कर ठरते, कारण येणार्‍या बाळावर त्याचा परिणाम होवुन ते मतीमंद निघु शकते, किंवा शारीरिक वाढ खुंटु शकते. योग्य तज्ञांशी याची जरुर चर्चा करावी. अशी २ उदाहरणे सध्या डोळ्यासमोर आहेत.

नानबा किती सोप्या शब्दात छान लिहिलय.२५ वर्षे मी थॉयरॉइडसाठी गोळ्या घेते आहे.आयोडीन कमी म्हणुन बाहेरुन घ्यायच इतक ढोबळ माहित होत.तुमच्या लेखान आजाराच स्वरुप निट समजल.धन्यवाद.सुरुवातिपासुन असलेला १००चा डोस कायम आहे.
स्वामी रामदेव यासाठी उज्जायी प्राणायाम करायला सांगतात.

बापरे..२५ वर्शे treatment घ्यावि लागते..? माझा हायपो जुन ११ मधे ९८.५ होता ..आता ६.३ आहे. मी homeopathy घेत आहे.. खुप चान्गला अनुभव आहे.. मला नाही वाटत मला इतका काळ treatment घावि लागेल.

मी हा लेख २२ जुलै २०११ ला वाचला... वर्षभरापुर्वी मला माहिती नव्हते की मला असा काहि त्रास होईल म्हणुन... आज अचानक टेस्ट करुन आले तर हायपो थायराईड आहे तुम्हाला...इती डॉक्टर....मला एकदम नानबाचा लेख आठ्वला Happy वरती लिहलेले सगळे लक्षणे मला ह्या दोन महि्न्यापासनं जाणवत होते, पण दवाखान्यात जाण्याचा आळ्स केला... थकवा खुप येत होता, पण येत्त असेल म्हणुन दुर्लक्ष केले... आता घ्या नेहमीकरिता गोळी Happy

मी ही या नावेत... टी एस एच ६० ! सध्या १५० चा डोस घेतेय. दीड महिन्याने पुन्हा टेस्ट आहे. बाकी झोप, थकवा आहेच. सूजही आहे. चिडचिड वाढलेली... बराच काळ उपचार घ्यावे लागणार याची मानसिक तयारी करतेय.

Pages