वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा छान माहिती, मस्त स्टाईलमधे सांगितलीस, थँक्यु ग Happy
बाकी सगळ्यांनापण खुप छान सांगितलय, सर्वांनाच धन्यवाद .
आता नवीन दोस्ताशी छान मैत्री करता येईल Happy

हो ग बस्के. हायपो डिटेक्ट झालाय.TSH 6, डोस 25 चा.
दाद तुझे अनुभव वाचताना अजून काही गोष्टी किलिअर झाल्या. मलाही गेली 4-5वर्षे सांधेदुखीचा त्रास वाटतो. स्पेसिफिकली सकाळी बोटं कडक होणं. आता हे नक्की संधिवाताचे की थायरॉईडचे, बोलले पाहिजे डॉक्टरांशी.
वरती कोणातरी बहुदा झुमरु, मायग्रेनबद्दल लिहिलय. मलाही मायग्रेनचा सिव्हिअर अॅटॅक आला. अन तेव्हा वजन भक्कन वाढलेले लक्षात आले. सो थायरॉईड टेस्ट केली, अन डिटेकिट झालय.
इथली सगळी चर्चा वाचून काढली. सर्वांनीच खुप छान माहिती, सल्ले दिलेत. आता ही सगळी माहिती उपयोगी पडेल.
नानबा ,,दाद मनापासून थँक्यु. बस्के बरोब्बर आताच हा धागा वर काढलास म्हणून तुलाही थांकु Happy

ओह.. अवल, मायग्रेनचा काही संबंध आहे का ह्याच्याशी? मला गेले काही वर्षं फारच त्रास व्हायला लागला होता मायग्रेनचा. हल्ली जरा बरं आहे.. (टचवूड)

आपण निवडक आहोत (इंग्रजीत चोझन म्हटलं की स्पेश्यल वाटतय)... आणि 'भारी' (शब्दशः) झालोय.
ह्या ऑटोइम्यूनची ब्लड टेस्ट आहे. ती करून घ्या प्लीज.
भारतात माझ्या नात्यात ल्यांना हायपो आहे हायपो आहे असंम्हणत गोळ्या दिल्यात. त्यांनी मनोभावे घेतल्याही. पण बाकीचे गोंधळ कशाने ते ध्यानी येईना.
अख्खं बोचकं ऑटोइम्यूनचं आहे की नुस्तच थायरॉईड ते कळणं माझ्यासाठी फार चांगलं ठरलं. मग बाकीच्या किडुक-मिडुकचा अर्थं लागणं अधिक सोप्पं होत गेलं आणि ते गळी उतरणं ही.

एकुणात ऑटोइम्यून एपिडेमिक असल्यासारखा ऐकतेय मी ... सगळीचकडे.

आहा.... हा धागा विसरलोच होतो. levothyroxine 25mcg हा आयटम भारतात मिळतच नाहिय. गेली ३ वर्षे कसातरी मिळवला अगदी जिथे प्रॉडक्शन होते तेथुन. या वर्षी नाही मिळाला. तो भारतात विकणे बॅन आहे असे तेथील लोकांनी सांगीतले. आणि ऑर्डर असेल तेंव्हाच बनवुन एक्सपोर्ट करतात हे समजले .

तर इथे कुठे मिळत असेल तर प्लिज सांगा. levothyroxine ५०mcg हवी आहे. इथे असलेले थायरॉक्झिन सोडियम वापरुन पाहिले होते पण ते सुट नाहि होत. सध्या १० दिवस झाले इथे मिळते तेच सुरु आहे.

धन्यवाद.

ओह.. लिवोथायरॉक्सिन का मिळत नाही? का बरं बॅन?

नानबा कुठे गेली? तिने लिहिले होते ना.. टी ४ बरोबर टटी ३ पण घेतले तर खूप फायदा होतो.. इकडे आर्मर बद्दल खूप ऐकते मी. लोकांचे म्हणणे असते की लिवोथायरॉसीन/ सिंथ्रॉईड हे सगळे सिंथेटीक हार्मोन्स आहेत. तर आर्मर हे नॅचरल. त्यामुळे आर्मरचा खूप फायदा होतो. ( पण ते पिग्ज डिराइव्हड असल्याने मला जरा Uhoh असे होते..)

नानबा,
थायरॉईड या आजारावरच १९ डिसें २००९ ला लिहिलेला हा धागा आणि त्यावरचे सगळे प्रतिसाद आज वाचून काढला, लेख अगदी मस्त लिहिलात आणि त्यावर माबोकरांचे प्रतिसाद देखील माहितीपर आहेत.

दोन महिन्याभरापूर्वी माझ्या बायकोला हायपोथायरॉईड निदान झाला होता. वय = २४ वर्षे, आणि टीएसएच चक्क १००+ Uhoh

टीएसएच ने शंभरी पार केल्यावर डॉक्टर ला देखील विश्वास नाही बसला. डॉक्टरने परत दुसऱ्यांदा टेस्ट करायला सांगितलं, तर तिकडूनहि तसाच रिपोर्ट. मग झाली ना सुरु धडधड. Uhoh

सध्या ती थायरोनोर्म १०० mg च्या गोळ्या घेते ; थोडाफार फरक जाणवतोय. बघू पुढे काय होता ते

सायटीका साठी डॉक्टर कडे गेले, निघाला हायपो. टीएसएच ५.८. डॉक्टर बोलले नॉर्मल आहे....पण नेट वर तर ३.० च्या वर असलं तरी काळजी घ्या सांगेतलेल आहे. काय करु?

my doctor said, armer (nt sure of spelling) may create heart related problems, so he doesn't suggest that unless the reason is that prevalent.

nivant patil, u get thyronorm in india which is levothyroxine in essence is what my doctor says.
I go to doctor unnikrishnan (chellaram) in pune.
in my experience - Vaishali Deshmukh is always busy, doesn't keep appointment is not sympathetic at all. once she gave wrong medication to my sis without explaining side effects (not for thyroid) and my sis suffered unnecessarily. so net net, I don't go to her any longer.
I pay more to unnikrishnan, but get better treated (not medical treatment, I guess its the same).

थायरॉईड या आजारावरच १९ डिसें २००९ ला लिहिलेला हा धागा आणि त्यावरचे सगळे प्रतिसाद आज वाचून काढला, लेख अगदी मस्त लिहिलात आणि त्यावर माबोकरांचे प्रतिसाद देखील माहितीपर आहेत.<<<<+१

हायपर डिटेक्ट झालाय. टीएसएचरर ०.४९ डॉक्टर बोलले नॉर्मल आहे. विटयामिन D साठी व इतर काही औषधे दिली आणि डिसेंबर १५ ला पुन्हा टेस्ट करायला सांगितले आहे. बघू पुढे काय होत ते

नानबा मी पण तुझ्याच बोटीत आले आहे. आजच गोळ्या आणलया.
तुझा लेख या आधी वाचलाच होता आता पुन्हा २ वेळा वाचुन काढला आहे.

मला जरा मदत करा,

लेख वाचला. खुप सोप्या भाषेत समजावले आहेस. बाकि पोस्ट पण बर्‍याचशा वाचल्या.
नवर्‍याचे टि एस एच ५.३ होते. हे अ‍ॅन्युअल चेक अप मधे निदान झाले. ( नेहमिच्या टेस्ट मधे)
डॉ ने आधी सांगीतले ६ वीक्स ने परत करु टेस्ट.
त्या वेळी ३.५ आले.
नंतर दिड महिन्याने त्याचे पाय खुप दुखत आहेत. परत टेस्ट पण द्यु होती.
आता ४.९.
तरी पण डॉ म्हणत आहे कि गोळ्या सुरु करा ( ५० माय्क्रो) . मी खुप वेळा विचारते अहे कि अजुन एकदा नको क बघायला? कारण इतक काही नाहि जास्त ( मी तज्ञ नाही. पण रेंज साधारण ५ च्या आत अशी आधी होती. आता ती बदलुन ३ केली आहे... हे डॉ नेच सांगीतलेय.
कॉणाला काही अनुभव , माहिती असल्यास प्लिज सांगा.

दुसर्‍या डॉ ला पण कंसल्ट करणार आहे. पण गोळ्या आज सुरु केल्या.

नुकताच हायपोथायरॉईड डिटेक्ट झाला. (TSH 5.20)

नंतर केलेल्या डिटेल्ड टेस्ट मध्ये
T3: 2.24 nmol/L
T4: 113.28 nmol/L
TSH: 4.83 uIU/L

२५ एम्जीची थायरोनॉर्म अशी गोळी प्रिस्क्राईब केली. ती अवेलेबल नसल्याने डॉकनेच थायरोफिट २५ अशी एक गोळी दिली आहे रोज सकाळी अगदी उपाशीपोटी घ्यायला. मला नंतरचे ४ तास काही खायचे नाही वगैरे काही सांगितले नव्हते डॉकने. तरीपण इथले वाचून मी सकाळी अलार्म लावून लवकर उठुन गोळी घेऊन पुन्हा झोपुन जाते. म्हणजे रुटीन तसेच चालू ठेवूनही आपसूक ४ तासांचा गॅप पडतो.

आज एकांशी बोलतांना कळले कि कोथिंबीरीचा आहारात जास्तीत जास्त समावेश केला तर कदाचित फायदा होऊ शकतो. किमान एक ग्लासभर कोथिंबीरीचा रस प्यावा असे त्यांनी सांगितले. शिवाय प्राणायामाचा पण फायदा होतो म्हणाले.

तर थायरॉईडमध्ये उपयोगी पडणारे प्राणायामाचे प्रकार कोणते आहेत? ते कधी/ कसे करावेत?
शिवाय मूड स्विंग्स, चीडचीड किंवा रडारड यावर नियंत्रण कसे आणावे?

पियु
मला जास्त माहिती नाहि पण....गोळ्या घेवुन झोपु नये. असे एका डॉ ने सांगीतले होते. तु चौकशी करुन बघ.
गोळ्या पोटात गेल्यावर तुम्हि आडवे होणे योग्य नाहि,

गोळी घेतल्यावर ४ तास कॅल्शियम (आणि प्रोटीन पण, हे नक्की आठवत नाही) खाऊ नये कारण गोळीतील घटक शोषले जात नाहीत. मला वाटतं रात्रीचं जेवण झाल्यावर १/१.५ तासाने झोपाण्यापुवी घेण्यास हरकत नसावी. फार्मसिस्टला विचारा एकदा.
गोळ्या घेऊन का झोपू नये?

पियू, गोळी घेतल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने खायला सांगितलं आहे मला डॉकनी पण मी एक तास थांबते आणि कॉफी पिते, खात काहीच नाही लवकर. मला हायपो आहे. ५ वर्षापूर्वी टेस्ट केली तेव्हा TSH ४० च्या वर होतं. फार वजन वाढलं होतं, घसा, कानाची एक बाजू खूप दुखायची, खोकला असायचा अधे मधे. बरेच दिवस हा त्रास चालू होता.

सध्या Eltroxin १०० चालू आहे, मध्ये TSH 6 होतं. दोन महिन्यापूर्वी.

ऊष्ट्रासन, अर्ध वक्रासन, मस्त्यासन अशी गळ्याला ताण पडणारी आसने. उज्जयनी व भ्रामरी प्राणायाम. तसंही निरोगत्वासाठी प्राणायाम रोज करावापण ह्यात कपालभाती ही शुध्दीक्रियाकरून नाडीशोधन, भ्रामरी करावे

मला जास्त माहिती नाहि पण....गोळ्या घेवुन झोपु नये. असे एका डॉ ने सांगीतले होते. तु चौकशी करुन बघ.
>> डॉकला विचारून बघते.

बादवे.. गोळ्यांचा डोस सुट होतोय का/ अ‍ॅडजस्ट करायची गरज आहे का हे किती कालावधीनंतर चेक करावे? मध्यंतरी एका ट्रीटमेंटपुर्व तपासणीमध्ये थायरॉईड डिटेक्ट झाले तेव्हा त्यांनी ह्या गोळ्या दिल्या होत्या त्याला आता बरोबर १ महिना झाला. तर आता ती ट्रीटमेंट पण संपली. पण थायरॉईडच्या गोळ्या कायम घ्याव्या लागणार याची मला कल्पना आहे. तर मी फॅमिली फिजिशिअन कडे जाऊन एकदा टेस्ट करून घेऊ का आहे तो डोस कंटिन्यु करू कळत नाहीये.

माझा टीएसएच >१०० >> एवढा जास्त कसा काय असेल टिएसेच? Uhoh काही त्रास होत नाही का?

हे भोंदू फॉरवर्ड आहे किंवा काय ते माहित नाही. परंतु योगायोगाने आत्ताच व्हॉट्सअ‍ॅपवर हा मेसेज आला आहे.

थाइराइड का अचूक उपचार

आज के समय में ज़्यादातर लोगों को थाइराइड की समस्या है, इसके कारण सैकड़ों बीमारियां घेर लेती है।
मोटापा इसी के कारण बढ़ जाता है।
लोग दवा खाते रहते हैं लेकिन ये ठीक नही होता।
इसलिए दवा के साथ कुछ नियम जान लें 10 दिन में थाइराइड से आराम मिल जायेगा।

1: घर से रिफाइंड तेल बिलकुल हटा दीजिये, न सोयाबीन न सूरजमुखी, भोजन के लिए सरसों का तेल, तिल का तेल या देशी घी का प्रयोग करें।

2: आयोडीन नमक के नाम से बिकने वाला ज़हर बंद करके सेंधा नमक का प्रयोग करें, समुद्री नमक BP, थाइराइड, त्वचा रोग और हार्ट के रोगों को जन्म देता है।

3: दाल बनाते समय सीधे कुकर में दाल डाल कर सीटी न लगाएं, पहले उसे खुला रखें, जब एक उबाल आ जाये तब दाल से फेना जैसा निकलेगा, उसे किसी चमचे से निकाल कर फेंक दें, फिर सीटी लगा कर दाल पकाएं।

इन तीन उपायों को अगर अपना लिया तो पहले तो किसी को थाइराइड होगा नही और अगर पहले से है तो दवा खा कर 10 दिन में ठीक हो जायेगा।

थाइराइड की दवा:

2 चम्मच गाजर का रस
3 चम्मच खीरे का रस
1 चम्मच पिसी अलसी
तीनो को आपस में मिला कर सुबह खाली पेट खा लें।
इसे खाने के आधे घंटे बाद तक कुछ नही खाना है। ये इलाज़ रोज सुबह खाली पेट कर लें 7 दिन में परिणाम देख लें।

इसके साथ उज्जायी प्राणायाम व् सिंह आसान जरूर करें।कृपया जनहित मे सभी को भेजें।

माझा टीएसएच >१०० >> एवढा जास्त कसा काय असेल टिएसेच? अ ओ, आता काय करायचं काही त्रास होत नाही का?

>>>>>>>>>

होत होता ना! वजन वाढलेलं, चेहरा सुजल्यासारखा दिसायचा, बोलताना जीभ जड होत होती, थकवा, निरूत्साह, हातापायला गोळे आल्यासारखं वाटायच. गेला १ महिना डोस चालू आहे. सोमवारी डॉकची अपॉइमेंट आहे.

सकाळी टेस्ट करण्या पूर्वी lyvothyroxin घ्यावी का अचूक निदान येण्यासाठी काय करावे ? >>>
मागे माझे डॉक्टर म्हणालेले, गोळीतल्या आयोडीनचे half life साधारण २७-२८ दिवसाचे असते. त्यामुळे दिवसाचा डोस टेस्ट करण्याआधी किवा नंतर घेतल्याने काही फरक पडत नाही.

साधारण दहा वर्षापूर्वी डॉ शशांक जोशी (endocrinology dept head - लीलावती हॉस्पिटल) ह्यांचा विविध तेलांचा अभ्यास करणारा लेख वाचलेला. त्यानुसार निरोगी माणसांना सफोला, कॅनोला वगैरे विशेष तेलांची काही गरज नाही. तेलाच्या उपयुक्ततेची क्रमवारी खालीलप्रमाणे दिलेली - १. olive, २. rice bran, ३. भुईमुग ई.ई. त्या काळातच एक लेख वाचलेला about.com वर. त्याप्रमाणे खोबरेल तेल शरीराचे चयापचय सुधारते. डॉ. जोशींच्या लेखातसुद्धा खोबरेल तेल चांगले म्हटलेले पण त्याची क्रमवारी आठवत नाही.

थाईरॉईडचा आजार पर्वतीय प्रदेशात आढळायचे प्रमुख कारण समुद्री मासे आणि समुद्री मिठाचे जेवणात नसणे. त्यामुळेच सरकारने आयोडीन मिठाची सक्ती केली आणि त्याचा त्या भागामध्ये फरक दिसला असे सरकारी जाहिरातीमध्ये म्हटले जाते.
डाळीच्या वरचा फेस लहानपणी काढताना बघितलेले आहे. त्याचा फायदा किवा तोटा माहीत नाही.

lyvothyroxin ची शरीराला सवय झाल्यावर ते न घेणे चालत नसावे. साधारण १०-१२ वर्षे गोळ्या घेतल्यावर एकदा PCOD साठी आयुर्वेद डॉक्टर कडे गेलेले. ते म्हणाले, आयुर्वेद सर्वांगाने विचार करतो आणि PCOD वर उपचार करण्यापेक्षा थायरॉईड वर उपचार करणे आवश्यक आहे. lyvothyroxin गोळ्या बंद करून आयुर्वेदिक गोळ्या दिलेल्या. एखाद्या आठवड्यातच कसेसे वाटायला लागले. त्यांच्या संमतीने lyvothyroxin पण दिवसाआड चालू केल्या. ५-६ महिने प्रयत्न केला पण फायदा काही दिसत नव्हता. मग त्याचा नाद सोडला.
परंतु माझ्या दोन सहकाऱ्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार alternet थेरपीचा फायदा झालेला. एकीला लहानपणापासून होमिओपॅथीची सवय होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला lyvothyroxin न घेता TSH आटोक्यात आले. कधी कधी परत वाढले तर त्या काळापुरते होमिओपॅथी औषध परत घेते. पण मला तिच्या सांगण्याबद्दल पुरेसा विश्वास नाही. दुसरीने थाईरॉईड समजल्यावर एका वर्षात आयुर्वेद आणि योग केले. त्यानंतर एक-दोन वर्षे काही त्रास नव्हता. पण बहुतेक नंतर गरोदरपणात परत त्रास झालेला. आता परिस्थिती माहीत नाही.

थायरॉईड हॉर्मोनच्या गोळ्या कशासाठी देतात तर ते काम आपल्या शरीरतून होत नसते म्हणून. तयारच होत नाही किंवा ऑप्टिमली वापरले जात नाही. असे असताना गोळ्या बंद करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अनट्रीटेड हायपो/हायपर थायरॉईडीझ्म हा थेट हार्टला देखील हानी करू शकतो. इट बेसिकली कंट्रोल्स एवेरीथिंग बिकॉज इट इज रिलेटेड टू मेट्बॉलिझ्म..
दुसरे म्हणजे बर्याचदा थायरॉईड काम न करण्याचे कारण अटोईम्युन डिसॉर्डर हे असते. हाशिमोतो/ग्रेव्ह्ज इत्यादी. अटोइम्युन डिसॉर्डर्सबद्दल मी वाचले आहे की एक जर ट्रीट नाही केला नीट तर इतर अटोइम्युन डिसॉर्डर्स पण मागे लागू शाकतात. उदा/: र्ह्युमॅटॉईड अर्थ्रायटिस..

Thanks vt220, माझा सुरुवातीचा TSH 27.तेव्हा EUTHYROX 75 चालू केली.नंतर 0.655 झाला.. डॉकनी डोस कमी केला EUTHYROX 50. आज सकाळीEuthyrox न घेता TSH,FT4 टेस्ट केली. आता पाहू काय रिपोर्ट येतोय ते. खरे आहे thyroid मुळे autoimmune diseeases होतात. Dr.नी ही गोळी life long घ्यायला सांगितली आहे.
नानबा, लेख अगदी मस्त लिहिलात.

काल झाली भेट डॉकची. अजुन २ महिने सेम डोस चालू ठेवायला सांगितलाय. २ महिन्यांनी पुन्हा टेस्ट करून रिपोर्ट घेऊन बोलावलयं. त्यावरून डोस कमी कि जास्त ते ठरवू असे बोललेत.

थायरॉइडमध्ये वजन घटणे किंवा वाढणे मस्टं असते का ??

म्हणजे वजन फॅक्टर हा खुप म्हत्त्वाचा आहे का ?

Pages