वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेक शंका पाचदहा वर्ष ट्रेन्डिंग असतात -
टॅान्सिलाइटिस,
आइअन कमतरता,
कॅल्शम,
बी कॅाम्प्लेक्स,
थाइरॅाइड,
कुठलातरी मोटर सिन्ड्रोम.

अर्धा तास इट ईज!
थायरॉईड मध्ये ट्रेंडींग काय आहे डोंबलाचं !!! ती काय ऑरगॅनिक आणि घरच्या छतावर शेती आहे! का डाएटचा काही तरी अतरंगी प्लान आहे!

खूप उपयुक्त माहिती दिली आहे, आपले खुप आभार..

Me char mahinyanchya balachi aai ahe.. Mala pahilyanda 7th month madhe blood test madhe TSH vadhlyache kalale.. TSH - 6.5.. Ji third trimester madhe 3 paryant asne aavashyak ahe..
Doc ni thyronorm 25 chya golya suru kelya.. Mag level 1.75 itki aatokyat aali..
Mala thyroid chi itar kontihi lakshane navhati.. Ani chidchide pana, mood swings he balantpanamadhe hormonal changes mule hota asa samaj hota..

Balachya janmanantr mala 3-4 mahine golya thambavinyas sangitle.. Ani ata report kadhla tar TSH level 11.5 ahe.
majhya ghari 1-1.5 varshanpasun Saidhav meeth vaprat aslyamule iodine chi kamtarata jhali asu shakte..
Ata me punha thyronorm 25 suru keli ahe..
Tari please mala mahiti dya ki hyatun bare honyasathi me konti yogasane, pranayam karu? Ratri bheejat ghatlelya dhanyachya panyala sakali ukalun ek cha ardha glass karun pine ha upay yogya ahe ka? Ani homeopathy ne upchar ghetlyas bare hota yete ka?
Kripya margadarshan karave.

Mahatvache -
DOC ANI PATHOLOGIST YANNI SANGITLELI AJUN EK GOSHTA NAMUD KARAVISHI VATATE KI THYROID DISFUNCTIONING CHE PRAMAN STREEYANMADHE JAST AHE.. ANI PERIODICALLY REPORT KADHTANA TYANNI MENSTRUAL CYCLE CHALU ASTANA HA REPORT KADHU NAYE.. TYAT KHUP TAFAVAT ASU SHAKTE. KARAN TEVHA SHARIRAT HORMONAL BADAL KHUP HOT ASTAT.. SHAKYATO DATE YEUN GELYAVAR 5-6 DIVSANNI REPORT KADHNE SOYISKAR ASE HI MHANALE.. PRATYEK VEL HA NIYAM PALAVA..

खुप वर्शा अधि २०१५ मध्ये याच बाफ वर पोस्ट केलि होती. तेव्हा TSH - ५.४ होता. डॉक्टर ने पण दुर्लक्ष केल. आता गळ्यावर सूज आली म्हणून ent कडे गेले तर थायरॉईड ची sonography करायला सांगितली त्यांनी. आणि ब्लड रिपोर्ट पण. TSH - ५३ आल. आणि थायरॉईड ला सूज आली होती. फायनली २५ mg ची गोळी सुरु केली. पहिल्या महिन्यात बर वाटलं पण मग दुसर्या महिन्या पासून लक्षण वाढली उलट. आता या महिन्याच्या शेवटी परत ब्लड रिपोर्ट काढून मग डोस वाढवू असा बोलले डॉक्टर.

डोस कमी पडत असेल. सेकंड ओपिनियन घ्या.

माझं थायरॉईड लवकर लक्षात नाही आलं, TSH ४० आला पहिल्याच तपासणीत मग ५० mg ची गोळी होती काही दिवस, नंतर तीही वाढवावी लागली. सध्या १०० mg आहे. तपासणी हल्ली वर्ष दोन वर्ष केलेली नाहीये.

हो करायची आहे पण सध्याच्या वातावरणात जरा भीती वाटतेय lab मध्ये जायची किंवा कोणाला घरी बोलाऊन ब्लड sample द्यायची.

२५mg ची गोळी घेऊन ३ महिने होत आले पण डॉक्टर बोलले की आता ब्लड रिपोर्ट काढून कळेल कि २५ ने किती कमी झाले TSH मग तशी गोळी वाढवून देतील. पण आता सहन होताच नाहीये बॉडी पेन आणि पाय इतके दुखतात की रडायला येत. कोणाला असे सिम्पटम्स आहेत का? इथे डोंबिवली मध्ये कोणी एन्डोक्रोनॉलॉजिस्ट पण नाही. मी ent कडून मेडिसिन्स घेतेय.

मी बर्‍याच आधी, लिहिले होते इथे,

मी आहारात बदल करून रीवर्स केला आहे.
हे लक्षात घ्या, ईट कांट बी क्युअर्ड. आणि मला जे उपयुक्त आहे ते तसेच असेल सगळ्यांना तसेही नाही.
पण हेतु हाच की, नुसत्या गोळ्यां घेवून रहाण्यापेक्षा, आहार तपासून पहा. गोळ्यांबद्दल डॉक सांगेलच.

आहारातील बदल खुपच मदत करत, गोळ्यांबरोबर.

हा बरा होत नाही माहित आहे पण त्याचे जे side इफेक्ट आहेत ते सहन होत नाहीत. आहार म्हणाल तर सोया, कोबी खायच नाही इतकच माहित आहे. बाकी वेगळं असा काहीच खात नाही. allergy सारखं लक्ष ठेऊन पाहावं लागेल

साधारण असा होता/आहे,
सफेद पदार्थ बंद( भात, ब्रेड, मैदा),
कच्च बंद,
गरम अन्न घेणं,
फळांचे रस बंद,
गोड बंद,
बाहेरचं तेलकट बंद( जुनी तेलं असतात),
चालणं,
मसाज ( बॉडी मसाज टू काल्म माईंड),
वगैरे वगैरे

काय खाते?
ज्वारी, बाजरी, नाचणी आंबील,
भरपूर रसाळ भाज्या( दूधी, वगैरे),
सूप( भाज्यांचे)
अर्क( आलं/ लिंबू)
मासे, मी चिकन , मटण खात नाही बरीच वर्षे.
आता, हे बदल मला उपयोगी आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाचं शरीर सांगतेच काय हवय ते( आहारत).
वजन २५ वर्षे सांभाळून आहे. सध्या वयाच्या बरोबर आहे वजन.
सुरुवातीला गोड बंदच होते पण आताशा जर खाल्लेच तर चालते भरपूर. आणि हावरटासारखं खात नाही( अर्धाच गुजा, पुपो वगैरे).

@झंपी हो सर्वात आधी साखर पुर्न बन्द करणार, भात सोडणे खुप जिवावर आलय पण रोज रोज सर्वान्ग दुखुन रडण्यापेक्श हे सोप्प आहे. एक निरिक्श्ण आहे की मासे वगरे खाल्ले की दुसरा दिवस वाईट जातो. खूप स्ट्रेस वगरे आला (ऑफिस चा ) की सर्व सांधे धरून येतात. सो आता अव्हॉइड करणार हे सर्व.

'गार पाण्यानं आंघोळ ' , cold showers help as well. गार पाण्यानं आंघोळ = सौ दुखोंकी एक दवा असं claim करतात बरेच.

Check this podcast, its bit long but interesting,
https://youtu.be/MYp5NmlEpIE

मी गार पाण्यानं आंघोळ करते, रोज; सगळ्या ऋतूत

नुकतीच TSH टेस्ट केली .त्यात प्रमाण ०.६९५३ दाखवलं आहे. डॉक्टर म्हणतात सध्या ठीक आहे.
हे प्रमाण काळजीच आहे का ?

Free T3_ 3.34
FreeT4- 1.12
TSH- 2.25
असा माझा रिपोर्ट् आज आलाय थायरॉईड आहे की नाही समजत नाहीये .. dr १week नंतर भेटणार आहेत plz help

टेस्ट समोर नॉर्मल रेंज असते. प्रत्येक लॅब प्रमाणे हे बदलू शकते. क्राऊड ज्ञानाचा काही फायदा नाही. डॉक्टर ची वेळ घेतली आहे तोवर थांबा. हायपो/ हायपर / नॉर्मल जे काय असेल चार दिवसांनी समजलं तर काय फरक पडणार आहे?
हे काही इ आर मध्ये जाल इतकं सिरियस प्रकरण नाही. कळेल निवांत. ह्यावर इलाज फक्त गोळ्या असतो, आहार/ व्यायाम याने काही फरक होत नाही. त्यामुळे प्रिस्कृपशन मिळेपर्यंत तसं ही काही होणार नाहीये.

दिलेल्या युनिट मध्ये रेंज गुगल वर तपासली असता नॉर्मल दिसतेय म्हणजे काळजीचे नसावेसे वाटते.
बाकी डॉक्टर सांगतीलच. का करायला लावली वगैरे बघून.

Thank u ... माझे हात पाय खूप सुजत आहेत & सुजेवर
दाबल की दुखतय आणि सर्व हाड दुखत आहेत

Pages