वाचून पहा तरी एकदा! प्रकरण-ए-थायरॉईड...

Submitted by नानबा on 15 December, 2009 - 16:36

१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)

------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही Wink ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! Proud ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.

पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.

मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)

नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्‍याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)

BEHIND THE SCENE

हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!

आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा

ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अ‍ॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअ‍ॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.

ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं Wink )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.

इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!

विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mahitipurn lekh lihilyabaddal thanks, continue medicine gheun suddha maze wajan gelya 7 warshat wadhatech ahe, tyamule adhik depress hote , ha ajar apale ayushya wyapun takato & to hou naye mhanun apan kay karayala hawe- 1> wayat yenarya mulina palisambandhi mahiti yogyaritya purwayala hawi. 2> deliveryt aaila mansik tan honar nahi yakade laksh purwayala hawe . 3> menopause madhe also, because ya teenhi samayi harmonse unbalance chi shakyata sarwat adhik asate.....I think so. Marathi typing nasalyamule kshamasw.

डॉक्टर चा सल्ला घ्यावा.>>+१००००
आणि लगेचच घ्यावा. इथे किंवा कुठेही काहीही वाचून कोणतेही उपाय स्वतः ठरवून, डॉक्टरी सल्ल्याविना करू नयेत.

सगळ्यात आधी डॉक्टरला भेटा.
तुम्ही करणार असलेले अधिक उपाययोजना (होमिओपाथिक, आयुर्वेदिक, आज्जीचा बटवा इ. इ.) ह्या सुद्धा डॉक्टरांशी बोलूनच करायला हव्यात.

>>डॉक्टर चा सल्ला घ्यावा.
Happy तो घेतलेला आहेच. थायरोनोर्म ५० चालु आहे. दर ३ महिन्यांनी चेकिंग पण करते आहे. त्या व्यतिरीक्त विचारत आहे.
मुळात टि ३, ४ आणि TSH लेवल वाढण्याचे परीणाम वेगवेगळे असतात का?? काय खावं, काय नाही??
प्रोटिन्स ची या संदर्भात काय भुमिका असते, ते घ्याचे तर कसे घ्यावे वगैरे........

आईला नुकताच थायरॉईड डीटेक्ट झालाय.
टीसीएच २८.
७५mg ची थायरॉक्सची गोळी दिलीय डॉक. ने!
पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा.

पुर्वी बरेच दिवस मलासुद्धा खूप राग येत होता, जबरदस्त चिडचिड व्हायची. सगळा राग अर्थातच मुलावर निघायचा. त्याने एखादी छोटीसी चूक केली तरी मला अजिबात सहन होत नसे. नंतर मला कळायचे ही माझी चूक आहे, पण काही उपयोग होत नव्हता. असंच कधीतरी थायरॉईड बद्दल वाचनात आले, आणि मी ठरविले की ह्या टेस्ट करून बघाव्यात. डॉ. ना सगळं सांगितल्यावर त्यानी सुद्धा ह्या टेस्ट करायला सांगितल्या. आणि चक्क टीएसएच ८३.२७ Uhoh
अ‍ॅलोपथि आणि आयुर्वेदिक दोन्ही औषधे चालू केली आणि ३ महिन्यातच टीएसएच आले ९.५२ Happy
आणि खरेच माझा पुर्वीचा शांत स्वभाव जागृत झाला. त्यावेळपासून थायरॉईडची गोळी चालू झाली. ती अजून पर्यंत.
गेले वर्षभर माझे टीएसएच १०.५६ वगैरे होते. परत एकदा आयुर्वेदिक औषधे सुरु केली आणि आता टीएसएच आहे ०.०३. आता हे थोडे वाढले पाहिजे म्हणजे रेंजमधे येईल.

आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सर्व प्रथम Antibodies for Thyroid ही टेस्ट करायला सांगितले होते आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या रिपोर्ट मधेच सर्व क्लीअर झाले आणि त्यांचा अंदाज १००% खरा ठरला. ते रिपोर्ट पाहून त्यानी औषधे दिली आणि ३ महन्यातच हा फरक पडला. Happy

वर्षभरापूर्वी माझ्या बहिणीला thyroid चा आजार ( बहुतेक हायपो thyroid ) निदान झाला होता. वय = २५ वर्षे, TSH = ५.४ T३, T४ = नॉर्मल. थाय्रोक्सीन सोडियम २५ mg च्या गोळ्या वर्षभर घेतल्या; पण काही फरक पडला नाही.
लक्षणे व त्रास कायम आहे. उदा. जास्त झोप, अगदी थोड्या कामानंतरही प्रचंड थकवा, उदासी, चिडचिड, थोड्या कारणावरून रडायला येणे, केस खूप गळणे. वजन वाढले आहे असे वाटत नाही. पण गळया जवळ थोडी सूज दिसते आहे. आहार सुद्धा प्रमाणापेक्षा थोडा कमी आहे.

ह्या धाग्यातील काही कमेंट वाचून, आता डॉक्टर बदलून endocrinologist कडे जाण्याचा विचार करत आहे. कोणी आणखी काय सांगू शकेल काय?

दोन आठवड्यापूर्वी endocrinologist कडे जाऊन आलो. त्यांनी थाय्रोक्सीन सोडियम चा डोस वाढवून दिला. २५ mg वरून ५० mg. पण अजून तरी काही फरक जाणवत नाही. साधारण किती वेळ लागेल फरक जाणवायला?
लक्षणे कायम आहेत. प्रचंड झोप, व थकवा. कोणी काही सांगू शकेल काय ??

बाकी डॉ. वैशाली देशमुख ह्या विषयातील सुप्रसिद्ध तज्ञ असून दीनानाथशी कनेक्टेड आहेत.

मी हायपर थायरॉईडचा पेशंट! डोळे भयंकर बाहेर आलेले होते, आता बरेच नेहमीसारखे झालेले असले तरीही अजूनही अ‍ॅबनॉर्मल दिसतातच थोडेसे! जुने फोटो आणि आत्ताचे फोटो ह्यात डोळ्यांतील फरक लगेच समजतो.

वजन कमी होत होते, रेस्टलेसनेस अतिशय! भयंकर चिडचिडा स्वभाव! टीएसएच ०.००१५ वगैरे! टी ३ आणि टी ४ चे आकडे वाट्टेल ते, २४ वगैरेच्या वर! मसल मास कमी व्हायला लागले. शेवटी कोणाच्यातरी सजेशनवरून समजले की थायरॉईडही असू शकेल व टेस्ट्स केल्या तर हे वरचे स्टॅट्स आले रिपोर्टमध्ये!

निओ मर्केझॉलचा हेवी डोस (६० एम जी पर डे) सुरू केला गेला. तो आता वर्ष-दिड वर्षाने २० एम जी वर आलेला आहे.

आता सर्व पॅरामीटर्स नॉर्मल रेंजमध्ये गेले तीन एक महिने आहेत. शरीराला व मनालाही बरेच बरे वाटते. घाम येणे फारच कमी झालेले आहे, विशेषतः कपाळावर फार घाम यायचा. ह्या थायरॉईड प्रकरणामुळे आय एन आर सुद्धा वाटेल तसा व्हेरी व्हायचा, तोही आता नियंत्रणात असतो.

एक अवांतर पण महत्वाचे:

नमाज पढताना मान हालवतात त्याप्रमाणे खांदे न हालवता मान डावीकडे उजवीकडे हालवून काही श्वास घ्यावेत. तसेच मान नकारार्थी, होकारार्थी व वरखाली अशी खांदे न हालवता हालवावी. हे टीव्हीवर ऐकले/पाहिले होते तेव्हापासून करतो, थोडा फरक जाणवत आहे. ग्रंथी बाहेरून दिसू शकायच्या त्या आता दिसत नाहीत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे,

@ बेफिकीर, हो डॉ. देशमुख यांच्याकडेच गेलो होतो. त्यांनी अजून काही टेस्ट सांगितल्या आहेत त्याही कराव्या लागतील. फरक दिसायला किती दिवस लागतील? बाकी मानेचा व्यायाम करून पाहीन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

कमालीचा थकवा व झोप, लिथार्जी व सततची थंडी वाजणे इत्यादी सगळ्यांमुळे त्रस्त होऊन डॉक्टरशी बोलून ह्या टेस्ट्स करायला लावल्या. TSH ८.५ आले. डॉ.ने महिन्यापूर्वी २५ एम्सीजीची गोळी दिली.
मला सुरवातीचे काही दिवस बरे वाटले. जरा जास्त एनर्जेटीक. पण अलिकडे परत झोपाळल्यासारखे वाटू लागले आहे. विशेषतः आय बॅग्ज फार पफी दिसतात. गोळी घ्यायला लागल्यापासूनच की काय पण टाचा फार दुखतात, खांद्याचे मसल्स फारच आखडतात. व्यायाम म्हणून चालायला जायचा प्रयत्न केला पण पूर्वीसारखे जमत नाहीये चालणे. Sad असं का होत असावं? डॉ.ला नोव्हेंबरमध्ये भेटणार आहे, परत एकदा ब्लड वर्क व इन जनरल बोलायला. परंतू त्याआधी म्हटलं इकडे विचारून पाहावे. अजुन मोठा डोस हवा असेल का?? मला कंटाळा आलाय लिथार्जीचा. पण त्यातून बाहेर पडणे फारच अवघड जातंय.

बस्के, पहिल्या काही महिन्यांमधे डोस कमी जास्त करावा लागतो. त्या काळात असं होण्याची शक्यता आहे.
हा ऑटोइम्यून असेल तर त्या च्याशी निगडीत इतर ऑटोइम्यून आजार होण्याची शक्यता असते.

मला हायपो आहे आणि हा आजार ध्यानात आल्यावर काही महिन्यांत आर्थरायटिसही झाला (र्‍हुमटॉईड).

सांधे आखडणे... विशेष्तः सकाळी उठल्यावर हाताची बोटं आखडलेली असणे हे एक लक्षण आहे. ब्लड टेस्ट मधे हे निदान होतं. पुढल्या ब्लड टेस्ट्मधे हे जरूर तपासुन बघ.

वाटलं तर मला संपर्क कर... मी तुला फोनही करू शकते. घाबरण्यासारखं काही नाही. माझा तबला-बिबला चालू आहे अजून Happy

अरे बापरे. हो का. बोलते हे सुद्धा डॉ.बरोबर.
माझी मागच्या वर्षी व्हिटॅमिन डी व बी१२ची डेफिशिअन्सी डिटेक्ट झाली होती. मी काही महिने घेतल्या गोळ्या, पण नंतर विसरत गेले. आताच्या ब्लडटेस्टमध्ये हे काही बघितले नव्हते. हे पण तपासून घेऊ का परत?

बस्के, 'बापरे' वगैरे नाही... एकदा अख्खं ब्लड प्रोफाईल करून घे. सगळ्या डेफिशिअन्स वगैरे. मग डॉ सांगतिल तशी उपाययोजना कराय्ची.
आर्थरायटिससाठी मला संपर्कं कर, मी तुला काही सांगू शकेन.
दिवाळीच्या शुभेच्छा...

बस्कू किती महिने झाले टेस्ट करून ? ३ ते ४ महिन्यांनी करावी लागते टेस्ट .
मला पण करावी लागेल टेस्ट, थकवा असतो आणि गुढगे पण दुखतात माझे .

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टेस्ट्स झाल्या. डॉ. इमेलवर म्हटली नोव्हेंबरमध्ये परत करू.
तेव्हा अ‍ॅन्युअल चेकअप असल्याने बाकी सगळं(बरचसं) चेक केले आहे. कोलेस्टेरॉल जरा जास्त आले व आयर्न अत्यंत कमी. आयर्नच्या सप्लिमेंट्स सांगितल्या आहेत तिने. घेत आहे मी. आता भेटून सगळं परत बोलते.

दाद, डॉ. ला काय र्‍हुमटॉईड आर्थ्राईटीसचे विचारू का डायरेक्ट? त्याचं काय होतंय ते सांगते तुला. थँक्स.
स्वराली, हो गुढघ्यांतून पण कळ येत असते. (काय म्हातारं फिलिंग येतंय हे लिहीताना!) Happy

येस. बस्के, डॉक्टरांशी बोल ह्यावर.
तुझा हायपो किंवा हायपर हा ऑटोइम्यून आहे का? की, आयोडीनच्या डेफिशिएन्ची मुळे आहे, की व्हायरल फीवर वगैरे मुळे?
थोड गुगलुन बघितलस तर ह्यावर माहिती मिळेल. त्या बेसिस वर डॉक्टरांशी बोलता येईल तुला. तुला झालेल्या आजाराचं नक्की स्वरूप काय आहे, तो का झालाय.... तात्पुरता आहे की कायमचा? त्याची औषधयोजना, त्याचे साईड इफेक्ट्स...
हे सगळं तुला जाणून घ्यायचय.
भारतात डोक्टर्स (मी होते तेव्हा आणि आमचे जेष्ठं नागरिक जातात ते सगळे डॉक्टर्स) पेशंन्ट्स्ना ही माहिती देण्यात उत्सुक असतातच असं नाही. स्वतःहून देतिल असं नाही. पण तू विचारल्यावरतरी सांगायला हरकत नाही.

ओह, ते नाही लिहीले का. हायपोथायरॉईडीझम आहे. टीएसएच जास्त व टी४ खूप कमी.
पण मी माझ्या नेहेमीच्या डॉक्टरशीच बोलले आहे. एंडोक्रायनॉलॉजिस्टशी नाही. कदाचित तीही अपॉईंटमेंट घ्यावी आता.

ऑटोइम्यून असल्यास त्या अ‍ॅन्टिबॉडीज रक्तात असतात. त्याची टेस्ट असते. ती करयला सांगतिल डॉक्टर. ऑटोइम्यून नसल्यास, र्‍हुमटॉईड इ. ची शक्यता कमी आहे. म्हणून मी सारखं सारखं तेच तेच म्हणतेय Happy

is anyone trying t3 supplements also along with t4?
I have read that its more effective - so wanna try them out..

भयंकर hairfall होतो आहे. हे टीएसएच वाढल्याच लक्षण आहे की कमी झाल्याचं?? नुकताच डोस वाढवला आहे Thyronorm चा.

इथे परत लिहीलेच नाही.
नोव्हेंबरमध्ये टेस्ट करायची होती त्याला एप्रिल उजाडला! Sad वैताग म्हणजे आधी टीएसएच ८.५ होते ते आता ८.८ आले आहे. हे तर काहीच नाही म्हणावे असं आयर्न पॅनल - हिमोग्लोबिन, फेरिटीन अन काय काय सगळं प्रचंड लो आले आहे. अ‍ॅनिमिया झाला आहे.
तर डॉ.ने सांगितले levothyroxine 25mcg ही आधी सांगितलेलीच गोळी अजुन दोन महिने घे. व इतर सप्लिमेंट्स घेत राहा व जुलै मध्ये तपासू परत. बाकी गोळ्यांचे काही नाही, परंतू आयर्नने अत्यंत त्रास झाला. सलग दोन दिवस डोकं दुखले.. मळमळत राहीले वगैरे. मग कुठे तरी वाचून आयर्नबरोबर व्हिट सी ची गोळी घेऊ लागले. मग त्रास दूर झाले. आता डॉ. कडे जायची वेळ आली आहे. तेव्हाच लिपिड प्रोफाईलही करून घेईन.

मला एक प्रश्न आहे. हायपोथायरॉईड व हाशिमोटोज मध्ये काय फरक? मला एक कळले की हाशिमोटोज म्हणजे ऑटोइम्युन डिसिज आहे. पण दोन्हीची लक्षणं सेमच ना?
शिवाय थायरॉईडशी रिलेटेड आहे की नाही माहीत नाही. धडधड वाढणे व कधीकधी पूर्ण श्वास घेता न येणे हे थायरॉईडशी संबंधित आहे का? कोणाला असे होते का? डॉक्टरांना सांगायला बरोबर निबंधच घ्यावा लागणार आहे आता.. किती प्रश्न!

बस्के, हशिमोटोज हा ऑटोइम्यून चा थायरॉईड प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऑटोइन्यून वेगवेगळ्या अवयवांना ग्रासू शकतं. त्यातलं हाशिमोटोज म्हणजे ऑटोइम्यून मधे थायरॉईड्स्ना ग्रासणं.

यात कारखाना (ग्रंथी) चालू आहेत, अंगात आयोडिन वगैरे कच्चा माल आहे. पण ग्रंथी काम करू लागल्या की इम्यून सिस्टिमच्या अंगात येतं आणि कारखाना बंद पाडण्यात येतो. (मॅड्कॅप तर काय). थायरॉक्सिन चं पृओडक्शन बंद.
म्हणून मेंदू परत परत सांगत रहातो अजून हवय अजून हवय (म्हणून टीएसएश चे प्रमाण खूप)... त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणायचं.
अशी चित्तरकथा आहे.

साईड एफेक्ट्स पैकी पचन क्रियेत अ‍ॅब्सॉर्ब्शन कमी होतं... मग अनेक गोष्टींची कमतरता ( उदा. आयर्न).

तुला ऑतोइम्यून आहे का ते तपासून घेण्याचा लकडा लाव. मग अनेक गोष्टूईं अधिक सोप्य होतील.

माझं हे वक्तव्यं स्वनुभवातून आहे पण महितीतली चूक डॉक्टर्लोकांनी सुधारावी. आणि तू नक्की तुझ्या डॉक्टरशी बोल गं, बस्के.

Pages