मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍमेझॉन प्राईम वर घबाडकुंड पहिला. खूप खूप आवडला. भय-रहस्य कथा आहे. सुरुवातीपासूनच खिळवून ठेवते. तुंबाड ची आठवण आली. तुंबाड पेक्षा सरसच आहे. तांत्रिकदृष्ट्या खूप छान चित्रपट आहे. सर्वांचा अभिनय मस्त आहे.

ललित प्रभाकरचा सुपर डुपर पाहिला. पाहून खूप दिवस झाले. इथे लिहायचं राहिलं होतं.
तुकड्यातुकड्यात पाहिला. चित्रपट बनवलाही तुकडे तुकडे जोडून . त्यात सलग धागा दिसत नाही.
ललित हा स्ट्रगलिंग म्युझिशियन. त्याची लिव्ह इन पार्टनर स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर. त्यांच्या भाड्याच्या घरच्या पार्टीने सिनेमा सुरू होतो. . वाद्य वाजवत सुट्टा व तत्सम शब्द असलेलं गाणं - त्यावर नाचणं. सोसायटी ऑब्जे क्शन घेतं. असली पार्टी करायला नाइट क्लब मिळत नाहीत का यांना? आणि यांच्या घराचा हॉल पॉटर वर्ल्ड मधल्या रूम ऑफ रिक्वायरमेंटसारखा एवढा मोठा होतो का?
मग ललित म्हणतो. भाड्याच्या घरात राहणं बास. आता आपलं घर घ्यायचं. माझ्या बापाचा पैसा वापरून. एका एजंटकडून घेतात. घरमालकाचा पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी म्हणून तो एजंटच सही करतो. हे सामान घेऊन राहायला जातात तर तिथे एक खेडवळ कुटुंब सुद्धा राहायला येत असतं - निर्मिती सावंत, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, , बकरी इ,
मग यांच्यात तुंबळ भांडण . मॅनेजिंग कमिटी. इ. दोघांना घर विकून एजंट पळून गेलाय.
हाउसिंग सोसायटीत घर विकत घेताना शेअर सर्टिफिकेट, त्यावरची एंडोर्समेंट , इ. म्ह सोपस्कार पार पडले नाहीत की असं होतं.

तर हे दोघे कुटुंबव्यवस्थेवर विश्वास नसलेले. आणि ते संयुक्त कुटुंब. गावचं सगळं विकून मुंबईत आलेत.
मग तो प्रमोट केलेला सीन. ललित प्रभाकर उघड्या अंगाने घरात फिरतोय. आणि त्या बायकांचं कधी असा देखणा पुरुष उघडा पाहिला नसल्यासारख्या भान हरपतं. नवर्‍याकडून बोलणी. पण काहीच क्षणात ललितची पार्टनर तोकड्या कपड्यांत तिथे आल्यावर आणि त्यांच्या नवर्‍यांची चित्ते विचलीत झाल्यावर परतफेड.
या बायांना मॉडर्न अंतर्वस्त्रे माहीत नसतात.

स्त्रीला स्वयंपाक आला नाही तर ती स्त्री नसते का असा एक ललित डायलॉग.

दोन पार्टीजची भांडाभांड हातघाई होते, तेव्हा मला लहानपणी पाहिलेल्या मी करीन ती पूर्व या नाटकातला शेवटचा प्रवेश आठवला.
दोन मावळे एका बाजूने जखमी मरणोन्मुख बाजीप्रभूंना सावरत शत्रू सैन्याशी लढतात. ललित आपल्या त्या पार्टनरला थोपवत या कुटुंबाशी लढतो.
मग यांच्यातल्या युद्धाचे काही ओटीटी प्रसंग. मांस पाहून बायांचं किंचाळणं (वारकरी कुटुंब. विष प्रयोग वगैरे )
पुढे एकमेकांच्या समस्या समजून घेता घेता मूक सहानुभूती.
दरम्यान दोन्ही पार्टी कोर्टात गेलेल्या आहेत. कुटुं ब केस हरतं. त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय ते होईतो त्यांना राहायला द्यायला ललित राजी. त्यांच्या फॅमिली फोटोत या दोघांना घेणं आणि डॅन्स.

मुख्य नटांना ललित , निर्मिती, हृषिकेश एकेक भावखाऊ सीन दिलेला आहे.

संपला अभिप्राय.

घबाडकुंड बघायला सुरूवात केली. इंटरेस्टिंग आहे, गावाकडची लोकेशन्स असल्याने कथा विश्वास ठेवण्यासारखी वाटते. विहीरीचा सेट का बनवलाय कळत नाही. फायबरच्या दगडांची चकचकीत कठडे असलेली आणि अंधारातही चमकणारी विहीर प्रचंड खटकते.
खटकणारी दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्ता हनमघर. मकरंद अनासपुरेची एव्हढी तंतोतंत नक्कल केलीये कि डोक्यातच जाते.

संदीप पाठक आता आवडतो. यातलं काम आवडलंच. अगदी सुरूवातीला सुरूवातीला नव्हता आवडला. केव्हढा फरक पडलाय त्याच्यात. बहुतेक वर्‍हाडपासून असेल, कातच टाकली त्याने.

घकुं पाहून झाला. तुंबाडची स्वस्त कॉपी आहे.
मराठी चित्रपटांबद्दल आस्था आहे. थोडा पार्शल सुद्धा आहे. पण हा सरळ सरळ तुंबाडची जी थीम आहे त्याची नक्कल करतो. लालसेने काहीच हाती लागत नाही हा आधीच देऊन झालेला मेसेज देताना वाईट नेपथ्य, ठिसूळ पटकथा, मोजक्याच लोकेशनमधे फिरत राहणारी बंदीस्त कथा यामुळे खजिन्याचा भाग सुरू झाल्यावर कंटाळवाणा होत जातो. भूतांचे सीन्स हास्यास्पद झाले आहेत. त्यातच भूताची करूण कहाणी दाखवून वेगळेपणा ठसवण्ञाचा प्रयत्न बालिश झाला आहे. विहीरीच्या तळाला गुप्त दरवाजा त्यातून भुयारं आणि पुढे महाल . ही अशी विहीर कुठला हौशी बांधेल?

देवदत्त नागेचा कायिक अभिनय जोवर तो सदरा काढून फेकत नाही तोवर दिसत नाही. मांत्रिक कम पुजारी मंगेश देसाई असावा असे वाटले पण त्याचे नाव श्रेयनामावलीत नाही. बोअर करण्यात त्याने प्राजक्ता हनमघरला तोलामोलाची साथ दिली आहे. प्राजक्ता ताईंना आपला रोल कजाग बायकोचा आहे कि मकरंद अनासपुरे छापाच्या विनोदी अंगाचा आहे हेच समजलेले नाही, पण दिग्दर्शकालाही ते खटकलेलं दिसत नाही. चांगलं करतेय, राहू द्या, आपण तरी काय अभिनय काढून घेणार हे धोरण असावं.

ज्या घरात हे राहत असतात, त्या घराची फक्त ओसरीच दिसते. ओसरीतच सगळी पात्रं दाटीवाटीनं बसतात आणि घबाडकुंदबद्दल बोलत राहतात. बहुतेक जे घर शूटींगकरता भाड्याने घेतलेलं असावं त्या घराच्या मालकांनी "आम्ही कुठं जायचं मग?" असा खडा सवाल केला असावा. एकच प्रसंग फक्त घराच्या आत आहे. तो त्याच घरातला आहे कि घरातल्या लोकांना शिमला कुलु मनाली महाबळेश्वर बघायला पाठवून तो उरकलाय हे कळत नाही.

ते घर, एक शेत आणि विहीर एहढ्याच लोकेशन्सवर शूट करून पैसा वाचवला आहे. विहीरीच्या आतले सेटस अगम्य आणि पुण्यातल्या गणपती मंडळांच्या सेटसच्या गुणवत्तेला फुल्ल मार्क्स द्यावेत असे आहेत. विहीरीखाली एव्हढा राजवाडा खोदताना त्यात भिंतींवर मुखवटे, नक्षीकाम पण कोरणारा मनुष्य किती हौशी असावा, कारण हे पाण्यातच जाणार आहे हे त्याला माहीत असणार.

हे युनिवर्स आहे म्हणे.. पार्ट २ ची सोय केली आहे. दांडगा आत्मविश्वास आहे.

तुंबाडची मंजुळा पाहिला...आवडला >>>> +१

काहीकाही सीन्स पाहून काय हा पांचटपणा अस वाटतं आणि काही ठिकाणी खूप हसू येतं.
एकंदरीत आवडला चित्रपट!

Pages