चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडीसीच्या संगीतात फक्त त्या काळाच्याच / किंवा तसल्याच जुन्या वाद्यांचा उपयोग केला आहे असे वाचले. त्यावरून आपल्या इकडच्या लोकांची फारच कीव आली विशेषत: शिवपट करणाऱ्या लोकांची..मध्येच राजेssssssssssss असा एक विचित्र सुफियाना मरायला टेकल्यागात आलाप वगैरे असतो आणि कसलेतरी विजोड संगीत अव्याहत निनादत असते कधी कधी वाटते बास करा की दोन प्रसंग तर निदान सोडा बिना संगीताचे येडझ*नो.

दोनेक लिटर कोक पेप्सी मारल्यामुळे >> घरून कार्ल्याचा रस घेऊन जावे. अधून मधून सिप मारत बघावा पिक्चर. अंधारात प्रॉब्लेम असेल तर गणेशोत्सवात मोकळ्ञा मैदानात बघावा.

ट्रॉय पाहतोय.
यातल्या युद्धापेक्षा जे नाट्य भरलेलं आहे ते भयंकर अपीलिंग आहे. उगीचच मारामार्‍या नंतर कंटाळा आणतात, तसे इथे होत नाही. युद्ध झाले असेल तर असेच असे वाटते. यात ओडिसी(यस) चे काम करणारा अभिनेता गेम ऑफ थॉर्न्स मधे पण आहे. यात खूप तरूण आहे.

इलियडचे संक्षिप्त पुस्तक कॉन्टिनेन्टल मधून आणले होते. पण ते इलियडवरचं तीन चार जणांचं भाष्य निघालं. भयंकर कंटाळवाणं होतं ते. अधून मधून काही छोटी पुस्तकं वाचनात आलेली. एकात अकिलीसची तुलना हनुमानाशी केली होती. ट्रॉय हे लंका. अ‍ॅगामेम्नमच्या भावाची बायको पॅरिस पळवून नेतो त्यासाठी मग अ‍ॅगामेग्मम ट्रॉयवर हल्ला करतो. तो ग्रीस मधल्या विविध राज्यांचं सैन्यं गोळा करतो. जगातल्या प्रमुख संस्कृतींमधे ही कथा वेगवेगळ्या रूपात प्रचलित आहे. प्रत्येक कथेत पुढे बदल झाले आहेत.

इथे हेलन स्वतःहून पळून जाते. रामायणात सीतेला कपटाने पळवले जाते. आदिवासींच्या कथेत वेगळी कथा आहे. थोडक्यात हे जागतिक महाकाव्य आहे.
इंग्रजी सिनेमाच्या मानाने जवळपास अडीच ते तीन तासाचा सिनेमा हा मोठाच आहे. पण बनलाच असा आहे कि माझ्यासारखा सलग सिनेमा न पाहू शकणारा दीड तासभरखिळून राहिला.

ट्रॉयच्या तटबंदीवरून आणि त्यांचे युद्धाचे सीन्स यावरून बाहुबली बेतला आहे असे वाटते. भारतात ग्रीकांप्रमाणे चपट्या ढाली नसणार. आपल्याकडे कासवाच्या पाठीच्या ढाली असत. बाहुबलीच्या सेटसना ट्रॉय पेक्षा जास्त गुण द्यावे लागतील.

यातले सुरूवातीचे स्पार्टाच्या महालात पॅरिस वर हेलनकडे जात असतानाचे जिने आणि त्याच्या भिंती फायबरला सिमेंट फासून दगडाचा आभास निर्माण केल्यासारख्या वाटतात. नितीन देसाई यांच्या नेपथ्यात सुद्धा काळ्या फायबरच्या तटबंदी खटकत. दुसरे दृश्य अपोलो च्या मंदीरातले. इथेही काळ्या रंगातले दगड क्रुत्रिम वाटतात. पण ट्रॉय चा सेट खराखुरा वाटतो.

नाट्य आणि संवाद जान आणतात. तोच प्लसपॉईण्ट वाटतो.
पॅरिस पळून येतो. त्याला हेलनच्या नजरेला नजर मिळवता येत नाही. तो सतत पश्चात्ताप व्यक्त करत असतो. आपल्या भ्याडपणाला दूषणे देत असतो. तेव्हां ती त्याची समजूत काढताना म्हणते कि "तू एका महान योद्ध्याला आव्हान दिलंस, हे सुद्धा शौर्यच आहे" इथपर्यंत ती समजावते.
पण नंतर ती जे बोलते त्याला दाद द्यावी लागेल..
"ती म्हणते तो फक्त जिंकण्यासाठी जगत होता. मला हिरो नकोय, आय वॉन्ट माय मॅन"
पुरूषाच्या गळ्यात पराक्रम आणि स्त्रीच्या गळ्यात त्या पराक्रमावर भाळणे एव्हढेच रंगवलेल्या आपल्या साहीत्याला हे छेद देणारं आहे.

नग्नता नसती तरी चालले असते. काहीच काम नाही तिचं. मुलांसोबत पाहता आला असता. अ‍ॅकिलिस ब्रॅड पिट आहे. या नावाचा एक टेनिस खेळाडू आवडता आहे. पीटर ओटुल ट्रॉयचा राजा वाटत नाही. हेक्टरची बायको राणी वाटत नाही. तिकडची आशा पारेख वाटते.

सुरूवातीच्या अ‍ॅगामेम्नमच्या विजयानंतर अनेक नर्तकी येतात तिथे बॉलीवूडवाल्यांनी एखादे आयटेम साँग घातले असते.
मै आयी हूं पायलॉस ट्रॉय लुटने..

हा आजपर्यंत पाहिला नाही याचं एकच कारण कंटाळा आणि आळस. त्या लोकांचं काही बघण्याचं जिवावर येतं म्हणून.
गोल्ड मिस केलं.

ट्रॉयचा उर्वरीत भाग संपवला.
भावभावनांचा कल्लोळ यात होता. अकिलीसचे ट्रॉयच्या दरवाजावर येऊन हेक्टरला ललकारणे थोडेसे फिल्मी असले तरी ते खटकले नाही. हेक्टरच्या मृत्यूनंतर सिनेमा बराचसा फिलॉसॉफिकल होत जातो. कुणाच्याही मृत्यूने कुणाचातरी बदला घेतल्याचे समाधान त्या पात्रालाही मिळत नाही ,ना प्रेक्षकांना मिळते.

एका अपरिहार्य शेवटाकडे सिनेमा निघतो आणि ट्रॉय पडत असतानाचा सैनिकांचा उन्माद, जनसंहाराच्या वेळी पार्श्वसंगीत शोकांतिकेचं रूप धारण करतंं. ते लाऊड होत जातं. त्या पार्श्वभूमीवर किंकाळ्यांचे आवाज अस्वस्थ करत जातात. कुठेच कुणाच्याही विजयाचा आनंद नाही. उलट विजयी सैन्याच्या बाजूने आपण कधीही नसतो.

इलियड जसं महाकाव्य आहे तसंच हा सिनेमाही.
सिनेमा बनवताना त्यांनी स्वातंत्र्य घेतलं ते कुठेच खटकलं नाही. ब्रेसस, पॅरीस हे प्रत्यक्षात मरतात पण इथे ते वाचतात. अ‍ॅगामेग्मम ची हत्या यात ब्रेसस करते, प्रत्यक्षात त्याची पत्नी हत्या करते. हेक्टरच्या मृत्यूने इलियडचा शेवट होतो. इथे तो द्वंद्वात मारला जातो. ट्रॉयच्या घोड्याचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे इलियड मधे नाही. पण जसे रामायणात, महाभारतात प्रक्षेप आहेत, तसेच ट्रॉयच्या घोड्याचा प्रक्षेप यात कधी तरी आला असावा. ट्रॉयचे युद्ध दहा वर्षे चालले. यात ते अंदाजे सतरा दिवस चालले असेल.

अकिलीसची आई देवता किंवा परी होती. तिने त्याच्या शरीराला कसला तरी लेप लावला होता, पण टाच राहिली होती. हेच महाभारतात कृष्ण आणि दुरोधनाच्या बाबत होते. पॅरिसचा बाण बरोब्बर तिथेच घुसतो. अकिचेसचे हे मर्मस्थान असते.

ओडिसीयसला यामधे जास्त मोठा किंवा महत्वाचा रोल नाही. पण तरीही तो अकिलीसला वारंवार युद्धासाठी तयार करतो. याचं कॅरेक्टर महाभारतातल्या कृष्णासारखं चालू आहे (किंवा शरद पवारांसारखे).

सिनेमामधे देवांचा रोलच कट केला. तो जास्त विश्वसनीय आणि मानवी बनवला आहे. मूळ इलियडमधल्या अलौकिकपणाला फाटा दिला आहे. त्यामुळं ट्रॉय एक मानवी शोकांतिका बनत जातो. हे ब्रिलियंट आहे. मनावर रेंगाळत राहणारा अनुभव आहे. अस्वस्थ करणारा.

ट्रोजन हॉर्स प्रक्षिप्त नाही.

इलियड हे अनेक महाकाव्यांपैकी एक आहे. इलियड मध्ये संपूर्ण कथा नाहीये, मात्र इतर फ्रॅगमेंट्स मधून ती कथा समजते. एकूण १० महाकाव्य होती ज्याला एपिक सायकल म्हणत. ही विविध कवींची होती. ह्यातल्या आता फक्त इलियड आणि ओडिसी शिल्लक राहिल्या आहेत. पण त्यांच्या मागे पुढे ही ह्या युद्धाच्या संलग्न महाकाव्ये होती. किप्रिया हे इलियड आधीचे होते ज्यात युद्धाआधीची पार्श्वभूमी होती (पॅरिसचा जन्म आणि त्याने ओढवलेला अथेना आणि हेराचा राग, आणि सोबत आफ्रॉडेटी कडून मिळालेला वर.) इलियड नंतर इथिओपिस नामक काव्य होते. आता इलियड ओडिसी सोडून इतर काव्ये जपली गेली नाहीयेत, पण अनेक संक्षिप्त कथांमधून पूर्ण कथा अजूनही माहीत आहे.

ओडिसी नंतर टेलिगोनी नामक ओडिस्यस आणि सर्सीच्या मुलाची गोष्ट सांगणारे काव्य होते. ह्यात सुद्धा गंमत आहे. अनेक ग्रीक गोष्टींप्रमाणे एका गैरसमजातून ओडिस्यस आपल्या टेलिगोनस ह्या मुलाच्या हातानेच मरतो. ओडिस्यस आणि पेनेलोपीचा मुलगा टेलीमाकस सर्सी ह्या चेटकीशी लग्न करतो. तर टेलिगोनस पेनेलोपीसोबत!

इंटरेस्टिंग आहे हे. ही माहिती पुरवल्याबद्दल अनेक आभार.

ही एपिक सायकलची भानगड माहिती नव्हती. लायब्ररीत इलिअस मायक्रा पाहिले होते (लिटल इलियड) पण कधी घेऊन वाचले नाही. आता वाचावेसे वाटते,

प्रायमेट - अ‍ॅमेझॉन प्राइम.

एकदा बघायला सुरूवात केली की पूर्णच बघायचा अशा निश्चयामुळे पाहिला. तसा बोअर होत नाही पण काही भारी बिरी नाही. एका पाळीव चिंपांझीला मुंगूस चावून रेबीज होतो आणि तो ज्या कुटुंबाने पाळलेला असतो त्यांना व त्यांच्याकडे पार्टीकरता आलेल्या तरूण पोरापोरींना चावत आणि मारत सुटतो. हवाईतील एका बेटावरच्या निर्मनुष्य भागातले घर, या माकडाने ट्रॅप केलेले लोक आणि सुटायचे मार्ग अवघड झालेले असा सेट अप आहे. बाकी मॉन्स्टर ड्रामा. पण रेबीज मुळे जर एखादा प्राणी पिसाळला तर तो दिसेल त्याला चावत सुटण्यापेक्षा तो आणखी इंटेलिजंट होऊन लपूनछपून "अ‍ॅम्बुश" करतोय, इनोसंट असल्याचे भासवून एकदम हल्ला करतोय, डिटेल्ड प्लॅनिग करतोय असले प्रकार दाखवलेत.

अशी ब्रेन पॉवर अचानक वाढलेले प्राणी (डीप ब्लू सी मधले शार्क्स, जुरासिक वर्ल्ड मधले डायनोज) त्यांच्यावर "मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूने" किंवा "जालीम कॉर्पोरेट नफेखोरांनी आणखी पैसे कमवायला केलेल्या उद्योगांंनी" तयार होतात हा मॉन्स्टरपटांचा एक नियम आहे. इथे तसेही काही कारण नाही. माकडाला मुंगूस चावला तर त्यांची उत्क्रांतीच झाली हे नवीन आहे Happy

पूर्ण कडवे असे आहे...

आधीच मर्कट तशात मद्य प्याला
झाला तशातही मग वृश्चिकदंश त्याला
झाली तयास तदनंतर भूतबाधा
चेष्टा मग किती वर्णू त्या कपीच्या अगाधा

आधीच मदन तशात मद्य प्यायला
झाला तशातही मग माबोदंश तयाला
तयाने माबोवरी बिनकामी धागा काढियेला
झाली तयास तदनंतर भूतबाधा
चेष्टा मग किती वर्णू त्या हंकाच्या अगाधा

धन्यवाद.

निरू, हो. हे पूर्णपणे जुळतेय. सगळं परीक्षण आलं या चार ओळींत. Proud

आधीच मर्कट तशात लाडावलेला
झाला तशातही मग नकुलदंश त्याला
झाली तयास तदनंतर रेबीजबाधा
उत्क्रांत कसला पिसाळूनी तो चावत सुटला
चेष्टा मग किती वर्णू त्या कपीच्या अगाधा

चार श्लोकी रामायणासारखं झालं. Proud

माझेमन - नाही ते एका निर्मनुष्य जागी असलेल्या घरात अडकलेले दाखवलेत. घराच्या एका बाजूला असलेल्या स्विमिंग पूल मधे ते ट्रॅप झालेले असतात. तेवढा भाग ठीक आहे. पण ते माकड पिसाळलेला प्राणी वाटण्यापेक्षा मेंदू विकसित होऊन कसलातरी बदला घेतल्यासारखे यांच्या मागे लागलेले दाखवलेले आहे, इव्हन ज्या कुटुंबाने त्याला पाळलेले असते त्यांच्याविरूद्धही. तो भाग अचाट आहे.

आधीच मर्कट तशात लाडावलेला
झाला तशातही मग नकुलदंश त्याला
झाली तयास तदनंतर रेबीजबाधा
उत्क्रांत कसला पिसाळूनी तो चावत सुटला
चेष्टा मग किती वर्णू त्या कपीच्या अगाधा >>>> Lol खरोखरच पूर्ण परीक्षण आले यात!

ऑडिसी (इथे असा उच्चार आहे असे मला माझ्या एका कलिगने सांगीतले) आवडला. मॅट डॅमन आणि अ‍ॅना हाथवे किती वयस्क दिसतात आता. ती मधे मधे येणारी मुलगी म्हणे त्याचे इष्ट दैवत असते. किंवा त्याचे ट्रॉय बद्दलचे गिल्टी फीलिंग असते. त्याची गिल्ट असते हे पटले मला.

धनुषचा कारा पाहिला. वेगळीच रॉबरीची कथा.
वध प्रमाणे अपेक्षा खूप उंचावत नाहीत. दोन घटका मनोरंजन आहे.

इम्तियाज अलीचा ' मैं वापस आऊंगा' चित्रपट पाहिला. एक भावूक आणि हळवी कहाणी असलेला चित्रपट !
त्याने फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित एक हळवी , संवेदनशील तसेच मनाला भिडणारी प्रेमकथा चित्रपटात साकारली आहे.

सुरुवात ९५ वर्षांच्या ईशर सिंग ग्रेवाल (नसीरुद्दीन शाह) यांच्यापासून होते. वय आणि आजारपणामुळे त्यांचे शरीर कमजोर झाले आहे... स्मृतीभ्रंश झालायं पण त्यांचा एक हट्ट अजूनही बाकी आहे. त्यांना पाकिस्तानमधील त्यांच्या मुळगावी सरगोधा येथे परत जायचे आहे जे फाळणीनंतर पाकिस्तानचा एक भाग झाले आहे. त्यांचा नातू दिलजीत दोसांझ याला समजत नाही की आजोबा वारंवार त्याच ठिकाणी परत जाण्याबद्दल का बोलतात..? का त्यांचा जीव अजून तिथेच अडकलायं?

काही आठवणी अश्या असतात ज्या माणसाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याचा पाठलाग करत राहतात. जीव त्यात अडकून राहतो.

हळूहळू कथा भूतकाळाकडे जाते आणि ईशर व जियाची प्रेमकथा समोर येते. त्यांच्या दोघांच्या प्रेमकथेत स्वप्ने आहेत आणि एकत्र जगण्याची, एकत्र संसार करण्याची आशा आहे. पण अचानक फाळणी होते आणि सर्व काही झटक्यात बदलून जाते.

दिग्दर्शकाने चित्रपटात फाळणी ही एक राजकीय घटना न दाखवता लोकांच्या मनातल्या वेदना, त्यावेळच्या त्यांच्या भावना, फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातील दाहकता दाखवली आहे.

शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या आजोबांचा शेवटचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नातू कोणते पाऊल उचलतो .. आणि आजोबांचा हट्ट पूर्ण होतो का त्यासाठी खरंतर चित्रपट पाहायला हवा..

चित्रपटाचा शेवटही उत्कट वाटला मला..!

सिनेमॅटोग्राफी हा चित्रपटाचा मोठा प्लस पॉइंट आहे. सरगोधाच्या गल्ल्या, जुनी घरे, शेते आणि त्या काळातील वातावरण पडद्यावर सुंदर दाखवलंय.

या चित्रपटातले सर्वात मजबूत पात्र आहेत ते नसीरुद्दीन शाह..!.
त्यांनी ईशर सिंगची भूमिका फक्त केली नाही, तर ते ती भूमिका अक्षरशः जगले आहेत.

विरत गेलेल्या आठवणी, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, फाळणीच्या वेळी हरवलेले प्रेम आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणी निसटून गेलेल्या भूतकाळाला स्पर्श करण्याची अस्वस्थता, हतबलता हे सर्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जिथे संवाद न बोलताही ते प्रेक्षकांना भावूक करतात.

त्यांच्या तरुणपणीची भूमिका केलेल्या कलाकाराचा अभिनय आणि निरागस चेहरा मला खूप भावला. चित्रपटातील नायिका शर्वरी वाघ ही आवडली.

दिलजीत दोसांझचा कदाचित मी पाहिलेला हा पहिलाच चित्रपट असेल .. छान आहे त्याचं काम ..!

चित्रपट पावणे तीन तासांचा आहे. मध्येच संथ वाटतो पण कंटाळवाणा नाही वाटला मलातरी. मी आधी पावणे दोन तासांचा पाहून उरलेला एक तासाचा नंतर पाहिला.

चुलत भावाने सांगितले होते, त्याची मामेबहिण ह्या चित्रपटाच्या छायाचित्रण टिममध्ये काम करतेयं.. श्रेय नामावलीत तिचं नाव पाहून एका सुंदर कलाकृतीचा ती एक भाग आहे हे पाहून कौतुक वाटलं तिचं.. !

मै वापस ....

मलाही आवडला.
थोडा स्लो आहे पण आवडलाच.
फाळणी , त्याचे लोकांच्या मनातील माझे गाव, घर सोडून का जावे? ज्याला जिथे राहायचे आहे त्याला तिथे राहायला परवानगी आहे वै विचार ( सरळमार्गी माणसं ) , नंतरचा trauma, तुटातुट, आलेला निरस कडवटपणा , प्रेम, प्रेमातल्या हळव्या भावना, भाउ बहिणीचे एकमेकांच्या खोड्या काढत असले तरी प्रेम, आणि मोजक्या दृश्यातून फाळणीची दाहकता बरंच काही दाखवतो हा चित्रपट.
Stand up कॉमेडी च्या मोजक्या प्रसंगातून ब्रिटिश लोकांची उडवलेली खिल्ली देखील लक्षात राहते.
नसरउद्दीन शहा तर कसला बाप ऍक्टर आहे.
हल्ली 2 कामं पाहिली.
एक टायटन मधील JRD टाटा ह्यांचे character आणि एक हे. भूमिकेत एकरूप एकदम.
काही बाबतीत दिलजितला सहज मदत मिळते हे जरासे पटले नव्हते पण चित्रपट आहे.
इम्तियाज अली ची चमक दिसतेच चित्रपटात.

मैं वापस आऊंगा पाहिला.

पुरोगामी लोकांनी खूप जास्त कौतुक करून ठेवल्याने हा चित्रपट लांबणीवर पडत गेला होता. पण पुरोगाम्यांना ज्या गोष्टींसाठी तो आवडतो (धुरंधरला दिलेला एक अँटीथीसिस) त्याच गोष्टींसाठी तो पाहावा लागू नये म्हणून आता आल्यावर पाहिला.

सिनेमा म्हणून तो फारच चांगला आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या सहज नजरअंदाज होतात त्या जाणवलेल्या म्हणजे, कट्स चांगले आहेत. म्हाताऱ्याचे बरळणे हे नुसते स्टोरी डिवाइस ना राहता ते अस्सल वाटते ही लेखनाची आणि दिग्दर्शनाची स्ट्रेंथ वाटते. चित्रपटाने खूप ठिकाणी हात आखडता घेऊन प्रेक्षकांवर खूप गोष्टी सोडून दिलेल्या आहेत त्यामुळे जी टोकाची हिंसा दाखवण्याचा चान्स एखाद्या कमी प्रतीच्या माणसाने घेतला असता तो इथे पूर्ण टाळला आहे. चित्रपटात काही ठिकाणी अभिनयाला दिलेले खूप महत्त्व जाणवत, कलर टोन साजेसा आहेच पण संगीत देखील बऱ्यापैकी apt वाटले म्हणजे रेहमान देखील वाहवत न जाता चित्रपटापेक्षा भारी संगीत द्यायला जात नाही.

दोन गोष्टी खूप जास्त खटकल्या त्या म्हणजे, अभिनयाच्या बाबतीत शर्वरी आणि वेदांग रैना, बनीता संधू यांचा अगदी एवरेज अभिनय करण रजत कपूर म्हणा किंवा अगदी जयप्रीत सिंग किंवा दोसांज हे त्यांना खाऊन टाकतात.

मराठी मुलगी आणि उत्तर भारतीय मुलगा असे घेण्याऐवजी उलटे झाले असते आणि अजून चांगले तरुण यांना सापडले असते तर चित्रपट अजून जास्त आवडला असता.

वध २ सुरू केला. पण पकडच घेईना.
तेच कलाकार घेऊन वेगळी पात्रे दाखवली तर नाव तरी बदलायचे. काय चाललंय तेच कळेना. म्हणून धनुषचा कारा पाहिला काल.
धनुषचे सिनेमे आता खेडेगावात जास्त घडतात आणि ते भगभगीत असतात, चमकदार नाहीत. गावं खूपच रिअल वाटतात, पूर्वीच्या मराठी पिक्चर सारखी. ग्लॅमर नसलेली खरी गावं. धनुष साधारण आहे दिसायला हेच त्याचं शक्तीस्थान आहे. अजाय देवगण प्रमाणे. केस बारीक केले कि तो मॅच्युअर्ड वाटतो नाहीतर अजूनही रांझना तला धनुष वाटतो. पण त्याच्या सिनेमात कुणी आप्त दगावल्यावर जी हिंदी डब्ड गाणं असतात ती भयानक असतात. भावनेला हात घालणारी नाही तर मृत्यूप्रसंगात एखादी तरी बाई मोठ्याने हंबरडा फोडून गाण्याच्या चालीत शोक व्यक्त करते तशी असतात.

"Strays" पाहिला. इथे पीकॉ़कवर आहे.

नको असलेल्या पाळीव कुत्र्याला त्याचा मालक लांबवर सोडून येतो. तो कुत्रा इतर मोकाट कुत्र्यांबरोबर दोस्ती करतो व नंतर त्याच्या लक्षात येते की त्याचा मालक इतके दिवस त्याच्याशी वाईट वागत होता. तेव्हा त्याचा बदला घ्यायला ते सगळे जातात. यात बोलणारी कुत्री आहेत. पण त्यावर जाऊ नका. हा पिक्चर मुलांकरता अजिबात नाही!

लीड रोल मधल्या कुत्र्याला विल फेरेलचा आवाज आहे त्यावरून एक अंदाज येईल. पण यातले काहीही मुलांकरता नाही. पूर्णपणे अ‍ॅडल्ट ह्यूमर आहे. गलिच्छ प्रकार खूप आहेत पण जर तुम्ही त्याबद्दलचा टॉलरन्स बाजूला ठेवलात तर प्रचंड धमाल संवाद आहेत. काही काही सीन्स तुफान हसवतात.

आणि जेवताना अजिबात बघू नका Happy

स्ट्रेज मधे चक्क काही ठिकाणी खूप हसायला आलं होतं.

प्रायमेटची वातावरण निर्मिती चांगली आहे. एकदा पहाण्यासारखा आहे.
प्राईमवरची नवा डेव्हिल्स माऊथ पण जमलाय. किंचीत ताणतो काही ठिकाणी पण वातावरण निर्मिती, समुद्रातली भितीदायक गुहा , त्यात अडकलेली आगाव पोरंपोरी व कोणत्यातरी प्रचंड खिडकीतुन आत शिरलेले शार्क वगैरे पहायला टाईमपास आहे. अगदीच शार्कनाडो सारखा फालतु नाही.

आणि रॉन्ग टर्न हा नवा आलेला पण डिसेंट हॉरर आहे. कथा आठवेना पण पुर्ण पहावासा वाटला होता हे आठवतंय.

पती पत्नी और वो दो अजिबात पाहू नका, असं अस्मिताने इथे लिहिलं होतं. ते लक्षात राहिलं नाही. आणि पाहिला. मला मजा आली. आणखी खूप चांगला होऊ शकला असता. गोलमाल (अमोल पालेकरचा) आणि हंगामाची आठवण येत होती.
तिन्ही नट्या नाभिनयात तोडीस तोड. त्यामुळे त्यांच्याही वाटचा अभिनय आयुषमान करत होता म्हणून एकाच वेळी त्याचं कौतुकही वाटत होतं आणि त्याच्यासाठी वाईटही वाटत होतं. तरी विजय राज आणि तिग्मांशु धुलियाने थोडाफार भार उचलला.

बनारस, कानपूर आणि प्रयागराज अशा ठिकाणी घटना घडतात. ही शहरं इतकी मॉडर्न , स्वच्छ नीटनेटकी आणि तिथल्या स्त्रिया अशा आधुनिक पाहून छान वाटलं. सारा दिसली की बिंदिया गोस्वामी आठवायची. साराने संवादांना लिटरली पंक्चर केलं.

बरेच संवाद चुरचुरीत आहेत. कुठे द्व्यर्थी आणि अश्लील आहेत. कधीमधी हसू आलं.

क्लायमॅक्स फ्लॅट आहे. भेडिया अगदीच खेळण्यातला वाटला.

एवढ्या सगळ्या जाळ्यांत पडूनही प्रजापती पांडे एकदा तरी प्रचंड वैतागलेला, हतबल झालेला वाटायला हवा होता. पेपर फुटलाय आणि परीक्षक सेट आहे, असं त्याचं कठीण प्रसंगांतलं वागणं होतं.

चंचल कुमारीच्या आत्याचा नवरा कुठे असतो? वो होते तो खुष होते म्हणते आणि मग त्याचं पोट सुटलंय असं वर्तमानकाळात म्हणते. तिचा आवाज फरीदा जलालचा वाटला.

आयुष्यमानचे फॅन असाल तर बघा. मला या चित्रपटानंतर तो आणखी आवडला.

भरत +१

मला पण टाइमपास वाटला तो पिक्चर. जुन्या डेव्हिड धवन गोविंद चित्रपटांच्या इतका भारी नसला तरी त्याच पठडीतला होता. राहून राहून हा रोल गोविंदाने खूप मस्त केला असता असे वाटून गेले. एकच गोष्ट खटकली की त्या आयुष्मान चे डायलॉग उगीच शुद्ध हिंदीत टाकायचा प्रयत्न केलाय.

म्हणजेच अस्मिता चे रीव्ह्यु फसवे असू शकतात. रीड ऑफर डोक्युमेंट केयरफुली...सबजेक्टेड टू मार्केट रिस्क वगैरे..

"मै वापस आउंगा" या सिनेमाची स्टोरी आणि अर्जुन कपूरच्या "सरदार का ग्रँडसन" नावाच्या सिनेमाची स्टोरी शेम टू शेम आहे.
सरदार का ग्रँडसन मध्ये अर्जुन कपूर आपल्या आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन तिथे फाळणीआधी आजोबांनी बांधलेलं घर उखडून भारतात घेऊन येतो.

Pages