या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
या धाग्यावर आलेल्या
या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांमुळे वेगळा विषय निर्माण झाला आहे. इथे अवांतर आहे फक्त सूतोवाच.
सुटसुटीत मराठी संज्ञांचा अभाव किंवा विस्मरण. जागतिक मराठी भाषा दिवस आहे. त्यानिमित्ताने कुणी तरी पुढाकार घ्यावा.
इथले काही चर्चा/ प्रतिसाद
इथले काही चर्चा/ प्रतिसाद पहाता मला "धागा भरकटण्याचा धोका" या धाग्याची आठवण आली
दीड वर्षांपूर्वी माझी मुलगी,
दीड वर्षांपूर्वी माझी मुलगी, मुलगा, जावै मिळून घरातले ९० टक्के सामान विकले, देऊन टाकले किंवा फेकून दिले. आता दोन बेडरूमच्या छोट्या घरात रहातो, नि ग्रोसरीखेरीज काहीहि विकत आणत नाही.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे नुसतेच म्हणत नाही, आचरणात आणायचा प्रयत्न करतो.
झोपडीत नाही?
झोपडीत नाही?
पूजेत 'आता नाकाला हात लावा' असं गुरुजी सांगतात आणि तेवढ्याने प्राणायाम होतो, तसं झालं की हे.
६६ नवीन म्हणून उत्सुकतेने
६६ नवीन म्हणून उत्सुकतेने क्लिक केलं तर पुन्हा तेच. अॅडमिन का उडवत नाहीत असले आयडी ?
इच्छाच मेली पुढे वाचायची.
@ प्रकाश घाटपांडे,
@ प्रकाश घाटपांडे,
धागा भरकटण्याचा धोका ???
भरकटण्याच्या पुढच्या पायरीला दोन वर्षात दोनदा जाऊन आला आहे हा धागा. आता “धोका” कसला ? आपण सगळेच सरावलोय 😀
जाण्याची चाहूल लागल्यावर आवराआवरी करणे मुख्य लेखातला मुख्य विचार. त्याबद्दल योग्य चर्चा- व्यक्तिगत अनुभवांची देवाण-घेवाण अनेक प्रतिसादांतून झाली आहे, विशेषतः सुरुवातीच्या.
परंतु ज्यांना “चाहूल लागण्यापूर्वी” यातली काही पावलं चालावीशी वाटली तर खुशाल चालावे, मृत्यूची चाहूलच लागण्याचीच वाटच पहाच असे नाही हा मुद्दा पुढे-पुढे चर्चेत येत गेला, मला पटला. त्याला मी “सततचा गृहपाठ” असे नाव दिले आणि त्याबद्दलचे व्यक्तिगत अपडेट्स मधेमधे इथे लिहितो. छोट्या-छोट्या organic steps. जास्त जीव Mindful consumption आणि by extension, mindful living कडे थोडे लक्ष देते व्हावेत हा हेतू. तसे केले-नाही केले तरी सब अपनी अपनी मर्जी के मालिक हैं, नो प्रॉब्लम.
वस्तूंमधली आसक्ती कमी करणे जमले तर उत्तम पण नाही जमले तर ? तर “कमी वस्तूंवर जास्त आसक्ती” हे जमवता आले तरी बरेच साध्य होते. हा साधा-सोपा-practical approach घेता आला तर आपल्यानंतर मागे राहिलेल्या प्रियजनांसाठी आवराआवर थोडीतरी सोपी होते, व्हावी.
This OR that ऐवजी This AND that असले तरी काही बिघडत नाही असा या अल्पमतीचा विचार.
इथल्या विद्वत्तापूर्ण चर्चांचे थोडे दडपण येते. त्यामुळेच इथे एका विदुषीला “सर” म्हटले मी
त्यांनी sportingly घेतले असावे ही अपेक्षा.
विषयाला अनुसरून कुणी केलेली एखादी कृती, कितीही छोटी-साधी का असेना अनेक शब्दांपेक्षा जास्त आकर्षक, जास्त महत्वाची वाटते. तस्मात् त्याबद्दलसुद्धा लिहित रहावे, एकमेकांचा हुरूप वाढवत रहावा ही विनंती आहे.
मध्यंतरी मित्र परीवारात काही
मध्यंतरी मित्र परीवारात काही घटना घडल्या ज्यामुळे 'जाण्याची चाहूल लागल्यावर आवराआवर' हे काही खरे नाही, नियमितपणे अडगळ कमी करत रहाणे जमवायलाच हवे नाहीतर चाहूल लागल्याने आधीच तणावाची झालेली परीस्थिती अजूनच तणावाची होते यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आळस झटकून पुन्हा एकदा क्लटर काढून टाकणे सुरु केले आहे. सोबत 'योग्य खरेदी' या सदराखाली नव्या खरेद्याही होत आहेत. एका गेस्ट बेडरुमचे वॉक इन क्लॉझेट कॅच ऑल झाले होते ते रिकामे केले. आता होम ऑफिस+ गेस्ट बेडरुम वाल्या दुसर्या खोलीवर फोकस आहे.
लेकाच्या खोलीचे काय करायचे या प्रश्नाला अजून उत्तर नाही. आमच्या बाबतीत आमच्या लग्नानंतर दोघांच्या पालकांनी घरे बदलली आणि आम्ही परदेशात कायम रहाणार हे गृहित धरत आमचे सामान काढून टाकले होते. आता काही वाटत नाही पण तेव्हा ते मनाला खूप लागले होते. साहाजिकच लेकाच्या खोलीबाबत काही करायला जीव धजावत नाही. बरे त्याच्या धकाधकीतून तो वर्षातून ४-६ दिवस निवांत रहायला येणार तर त्यात कुठे कटकट करायची असे होते. तरी या वेळी त्याला नविन कुकी शीट घेवून दिले तर त्या निमित्ताने त्याची बेकिंगची पुस्तके आणि एकंदरीत क्राफ्ट बद्दल बोलत ओरीगामी पेपर्स आणि पुस्तके असे एक खोके त्याच्या सोबत गेले.
लेकाच्या खोलीची जबाबदारी
लेकाच्या खोलीची जबाबदारी त्याच्यावर टाकून द्या. घर जोवर डाउनसाईझ/ बदलण्याचा विचार नाही तोवर कशाला ती रिकामी करायला बघता? प्रोक्रॅस्टिनेट करत रहा ते काम.
… नियमितपणे अडगळ कमी करत
… नियमितपणे अडगळ कमी करत रहाणे जमवायलाच हवे…
+ १
त्याने एकूणच फ़ोकस वाढतो आणि बिनकामाची नवी खरेदी / impulsive shopping कमी होते.
पैसे देऊन विकत आणलेली वस्तू घरातून काढून टाकायची म्हटले की त्यासाठी आपण केलेला खर्च कळत - नकळत आठवतोच.
एकदा वस्तू “टाकून दिल्याची“ टोचणी लागली की बिनकामाच्या नवीन वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेला थोडातरी चाप बसतो.
“अडगळ” आणि “All that is clutter today used to be money / cash” हे लक्षात येते आणि आवश्यकता नसलेल्या नवीन वस्तू घरात येणे कमी होऊ लागते असा अनुभव आहे.
BTW, भरत यांनी बिग
BTW, भरत यांनी बिग बास्केटवाल्यांना त्यांच्या कागदी पिशव्या परत केल्या असे लिहिले इथे आणि मी सुद्धा नुकताच तसा प्रयत्न केला…. तो मुलगा इतका बुचकाळ्यात पडला की सांगता सोय नाही. असे कुणीच पिशव्या परत देत नाही म्हणाला, मग फोन करून त्याच्या सुपरवाइज़रला विचारले त्यानी, बराच वेळ गोंधळ सुरु होता पण नेल्या त्याने पिशव्या. त्या पुन्हा वापरल्या की जाता-जाता गेटजवळच्या trash bin मधे टाकल्या ते समजले नाही 😀
जरा आश्चर्य वाटले ते बॅग परत
जरा आश्चर्य वाटले ते बॅग परत केली तर गोंधळले याचे.
मी बिग बास्केट वापरत नाही आता ३-४ वर्षे होत आली.
Instamart आणि zepto मध्ये I don't need delivery bag असा ऑप्शन आहे. तो साधारण वर्ष भरापूर्वी निवडला. ते त्यांच्या बॅगेतून वस्तु काढुन देतात, जास्त वस्तु असतील व आपली वेगळी बॅग असेल तर ती देऊन आपण वस्तु काढुन परत देई पर्यँत थांबतात. कागदी बॅग असेल तरीही.
अनिंद्य
अनिंद्य
हो बिग बास्केटवाले आधी त्यांच्या बॅगेतून आणायचे. आपल्या प्रवासी बॅगांसारख्या बॅगा असत, तेव्हा सगळ्या वस्तू काढून द्यायचे. मग बिग बास्केट नाउ सुरू केलं तेव्हा कागदी पिशवीतून देऊ लागले. आता सगळ्याच डिलिव्हर्यांना कागदी पिशव्या वापरतात.
आताही त्यांच्या त्या प्रवासी बॅगा आणतातच. त्यात कागदी पिशव्या.
हल्ली लिस्टप्रमाणे वस्तू तपासतही नाहीत.
मी ड्राय वेस्ट - प्लास्टिक पॅकेजिंग, दुधाच्या पिशव्या बाटल्या, खोकी हे बिग बास्केटच्या पिश व्यांमध्ये भरून आमच्या कचरा गोळा करणार्या बाईना देतो. आधी मी हे तिन्ही वेगवेगळे ठेवायचो. सॉर्टिंगचं काम त्यांच्यावर पडू नये हा हेतू. मग ते तीन डबे / पिशव्या भरेपर्यंत घरात जास्त जागा घ्यायचे. आणि बाकी कोणीच सॉर्ट करून देत नाही. माझ्या एकट्याने सॉर्ट केल्याने काही फरक पडत नाही, म्हणून एकाच पिशवीत भरतो आणि ती भरली की देतो.
ओला कचरा आणि सुका कचरा वेगळाच असतो.
DMart home delivery वाले
DMart home delivery वाले प्लास्टिक किंवा कागदी कोणतीच बॅग देत नाहीत, which is good. ते त्यांच्या cart मधून सामान आणतात आणि घरात ठेवतात.
बिग बास्केट मात्र सगळ्याच डिलिव्हर्यांना कागदी पिशव्या वापरतात. खूप घाईत असतात. पुढच्या ऑर्डरला पिशवी नको हा ऑप्शन आहे का ते नीट पाहीन 👍
बिगबास्केट मधे पिशवी नको असा
बिगबास्केट मधे पिशवी नको असा पर्याय दिला तरी कधी कधी ते पाठवतात. मी त्यांना लगेच परत देऊन टाकते.
Pages