Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी तेच म्हटलेले आहे.
तुम्ही मोह कमी केला तरी चालेल किंवा डेथ क्लीनिंगचा पर्याय स्विकारला तरी चालेल.

मुद्दा जास्त योग्य काय हे जाणून ते स्विकारण्याचा आहे. अमूक एकच असे नाही स्विकारले तरी काहीही बिघडत नाही.

अरे वा !
रात्रीतून चित्रविचित्र नावाचे आयडी उगवून "माझ्यासाठी" गलिच्छ भाषेत भांडले नाहीत हे किती भारी आहे. नाही म्हणजे मग एक्सेल फाईल वाले गृहस्थ मला बोल लावू शकले असते. त्यांनी बिचार्‍यांनी आयुष्यात एकही ड्युआयडी बनवलेला नाही. शपथेवर सांगतील ते. हो ना हो ? Lol

माझ्या परिसरातल्या देवळापासून जवळच फुटपाथवर एक मोठा निर्माल्य कलश आहे. हल्लीच त्या कलशाच्या आजूबाजूला ७-८ देव्हारे आणि देवांच्या तसबिरी ठेवलेल्या दिसल्या. आठवडाभरानेही त्या तिथेच होत्या.

घराचं नूतनीकरण करताना लोक देव आणि देव्हारेही बदलतात. पण जुन्यांचं काय करायचं ते कळत नाही. याबद्दल काही धार्मिक कल्पनाही आहेत. की या गोष्टी वाहत्या पाण्यात सोडायच्या. तसंच दुसर्‍या कोणी वापरलेल्या या गोष्टी घेण्याचाही कोणाचा कल नसतो. साध्या मृत माणसाच्या कपड्यांना त्यांच्या भावभावना लालसा चिकटलेल्या असतात , त्यांचा त्या घेणार्‍यांना त्रास होत नाही का? अशा अर्थाचा प्रश्न या च धाग्यावर आला आहे.

तर हा देवांच्या तसबिरींचा प्रश्न माझ्याही समोर आहे. माझ्या जन्माच्या आधीपासूनच्या गणपती , साईबाबा आणि शंकरपार्वतीगणपतीच्या अशा तीन तसबिरी आहेत. बाबांनी त्यांच्या फ्रेम्स , काचा कधीतरी बदलून घेत ल्या होत्या. एकाची फ्रेम लाकडी आहे. या आणि इतरही नंतर ठेवलेल्या तसबिरींच्या फ्रेम्स धातूच्या आहेत.

बाबांना झेपायचं तोवर ते रोज त्या तसबिरींसमोर उभं राहून प्रार्थना इत्यादि करायचे. स्वच्छता मला जमेल तेव्हा मी करत असे. मला प्रार्थना करायला या तसबिरींची गरज नाही. पूजेसाठी म्हणून नाही, पण सुंदर दिसतात, बघून छान वाटतं ( शोपीसच की!) आणि आपलं सांस्कृतिक संचित म्हणून काही दैवतांच्या मूर्ती घ्यायची इच्छा होते आहे.

बघू हे कसं जमतं.

आहेत त्या तसबिरींचं काय करायचं याबद्दल काही विचार आहेत. प्रत्यक्षात आले तर आणि येतील तेव्हा इथे लिहितो.

तसबिरीतील कागद खराब झाला असेल, पण फ्रेम काच चांगली असेल तर कागद अपडेट करणे. यात देवांचे चित्र ते मंदिराचा कळस वगैरे ते कौटुंबिक आठवणीचे चित्र ते आवडलेले निसर्गचित्र ते आवडत्या व्यक्तीचे चित्र काहीही ठेवता येईल.
फ्रेम बादच करायची असेल तर कागद काढून बाय नथिंग टाईप ग्रुपवर देऊन टाकणं, फ्रेम फेकून काच रीपरपज ते रिसायकल जे जमेल ते करणे. कागद वेगळा ठेवून देणे. काही वर्षांनी तो आणखी फाटला, त्यातील भावना आणखी विरळ, सुट्या झाल्या की तो ही आपोआप रद्दीत जाईल. सध्या मूर्ती हव्या वाटतंय तर विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर, योगेश्वर, सरस्वती इ. काय आवडेल रुचेल सापडेल त्या ताबडतोब/ जमतील तशा घ्याव्या. परवडतील अशा मोठ्या आवडल्या आणि मनाजोगता घरात ठेवता आल्या तर त्या घ्याव्या.
आवड, इच्छा मारून डेथ क्लिनिंग करण्यासाठी 'न घेणे ' हे पाप आहे.
सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही तर गरीबी! हे असं सध्यातरी वैयक्तिक मत झालं आहे आणि ते पाळण्याचा प्रयत्न करतो.

मातीच्या जुन्या मूर्ती असतील तर बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांना घालावे.

सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही >>> १००++
थोडंसं अवांतर - आम्ही नाही कधी अमुक (कुठलीही लीगल) गोष्ट केली/करत म्हणताना आपण त्यातून आनंद मिळतो/सोय होते की नाही हे पाहिलं आहे का हाच प्रश्न स्वतःला विचारावा.

(कुठलीही लीगल) >> हो. आमच्याकडे रिक्रिएशनल मेरवाना लीगल झाल्यापासून मला तो चाखायची फार इच्छा आहे. पण मम मन अजून त्या दुकानात जाऊ शकलेलं नाही. हे काशीस जावे नित्य वदावे स्टाईलने लिहित असतो. होईल कधीतरी वाटतं. Lol अगदीच अवांतर. सॉरी!

अनिंद्य
तुम्ही माझे प्रतिसाद पूर्ण वाचलेत हे समजले. आनंद झाला.
संन्यास / सर्वसंगपरित्याग किंवा तत्सम अर्थाने माझा प्रतिसाद नाही. एक लेखक यांचा फेंगशुई, ची हा उल्लेख वगळता बऱ्यापैकी त्यांनी मला काय म्हणायचे ते सांगितले आहे.

फ्रेम काच चांगली असेल तर कागद अपडेट करणे

- अनुमोदन.

मला प्रार्थना करायला तसबिरींची गरज नाही…. ❤

माझ्या पार्टीत आहात मग. इथेच एका धाग्यात लिहिले होते मानसपूजेबद्दल.

जुने देवाचे फोटो, फ्रेम आणि मूर्तींचे शास्त्रोक्त विसर्जन करण्यासाठी महाराष्ट्रात कोल्हापुरातील रुग्वेद चॅरिटेबल ट्रस्ट (Rugveda Charitable Trust) आणि नाशिक/पुणे/मुंबईमधील संपूर्णम् ग्रुप (Sampurnam Group) यांसारख्या स्वयंसेवी संस्था काम करतात. या संस्था मूर्तींचे आदरपूर्वक आणि धार्मिक पद्धतीने विसर्जन करतात, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही आणि भाविकांच्या भावनाही जपल्या जातील.

छान चर्चा.
सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही >>> १००++ पटतंय.

सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही >>> का? (प्रश्न जेन्युइनली विचारला आहे)

या धग्यावर कुठला विषय कसा येईल आणि कुठला विषय कुठून कुठे जाईल याचा काहीही नेम नाही. कुणीही काहीही भन्नाट अर्थ लावू शकतं आणि जाऊद्या आता. Lol

सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही >>

आधी किंवा नंतर असं नसतं, तुम्ही अनुभव घेत घेत त्याबद्दल तीव्र भावना येणं थांबणं म्हणजे विरक्ती. आयुष्य थांबवून ठेवायची गरज नसते त्याला. Before enlightenment chop wood carry water, after enlightenment chop wood carry water अशी म्हण आहे. विरक्त झाल्यावर काहीही बदलत नाही फक्त दृष्टिकोन सोडून! तो मात्र साफ बदलून जातो. औदासिन्य, नैराश्य, स्मशानवैराग्य नाही - विरक्ती. निसर्ग सर्रासपणे देतच नाही ती क्षमता, त्यामुळे चुकून मला विरक्ती तर येणार नाही ह्याची काळजी करणं म्हणजे चुकून मला ऑलिंपिकचे गोल्ड मेडल तर मिळणार नाही किंवा आयुष्य छान भोगून मी ऑलिंपिक मधे गोल्ड मिळवून आणेन म्हंटल्यासारखंच आहे. Happy खूप खूप दुर्मिळ गोष्ट आहे. ज्याची क्षमताच नाही त्याचं कसलं प्लॅनिंग? Lol

सोनाली, किती दिवसांनी दिसलीस. Hope all is well! Happy

आध्यात्मिक, एनलायटनमेंट वगैरेत मला रस नाही आणि ज्ञान त्याहुन नाही.
अनेकदा एखादी गोष्ट जमत नाही, परवडत नाही, आवाक्यात नाही म्हणून ती न करण्याला आपण पांघरुन घालतो. ते अध्यात्मिक असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग, सेव्ह द अर्थ असं काहीही लार्जर दॅन लाईफ असेल. काही उदाहरणे देऊन मला काय म्हणायचं आहे ते लिहितो.

फॉसिल फ्युएन न वापरुन रिन्युएबल इंधन वापरणे ही एक प्रकारे आज विरक्ती मानली तर ते पाश्मिमात्य प्रगत देशांनी करणे वि. भारतासारख्या देशांना एकाच तराजूत घालून त्यांना बळजबरी करायला लावणे हे लेव्हल प्लेईंग फील्ड नाही. विकासाच्या एका टप्प्यावर गेल्यावर विरक्ती आली असेल तर चांगलंच आहे, पण म्हणून इतरांंनी तेच करावं असं त्यांना (पक्षी भारताला वाटणे) किंवा तुम्ही ते भारताच्या गळी उतरवणे सर्वस्वी अयोग्य आहे. झाला पृथ्वीचा विनाश तर होवो. त्याला विकसनशील देश कारणीभूत हा रंग देणे मला पटत नाही.

आपण लहानपणा पासून उत्तम प्रथिनयुक्त डाएट घेतला आणि आता अचानक तुम्हाला उकडलेल्या भाज्यांत ईश्वर दिसायला लागला असेल तर कुपोषित लोकांना नुसत्याच भाज्या देणे योग्य नाही.
अंतू बर्वा म्हणतो तसं गांधीच्या पंचाचे कोकण्यास काय कौतुक! अर्थ कोकण उघडे आणि अर्धपोटी.
साखर वाईट, स्टार्ची पदार्थ वाईट म्हणून खाल्लेच नाही तर नंतर ती इच्छा उफाळून येणारच. अनावर इच्छा उफाळून न येणे, त्यांच्यावर सहजी नियंत्रण ठेवणे हवे असेल तर त्या इच्छा/ भोग हे अनुभवले पाहिजे ना? अत्यंत विस्कळित लिहिलं आहे याची कल्पना आहे.
न जमणे, न परवडणे, आवाक्यात नसणे, उशीर झालेला असणे इ. प्रकार ही आहेत आणि होताना दिसतात.

परत इतरांनी कोणी काही केलं तर माझी हो का ना काहीही नाही. मी माझ्या जीवनात कशावर काट मारण्यापूर्वी ती 'काट का मारतो आहे? ', त्याच्या साठी काही लार्जर दॅन लाईफ कारण तर नाही ना इतका विचार करुन बघतो.

हो, ते झाले. ते तर आहेच- जे आपल्याला नको आहे तिकडे आपण आपोआपच जात नाही, त्यात चूक- बरोबर काही नाही आणि तरीही काही बाबत आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी फारशी चॉईसही नाही हेही खरे एवढे लिहायचे होते. Happy चॉईस आणि रस नाही म्हणून एखाद्या गोष्टीकडे न वळणं वेगळं आणि असताना ठरवून न करणं/ करणं वेगळं.

>>> सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही तर गरीबी!
पण यात विरक्ती ही 'ऑल ऑर नन' आहे हे गृहितक नाही का?
उदा. मला एक विषय कधीच आवडला नाही, चार विषयांत आता रस उरला नाही, पण दुसरे दोन विषय फार पॅशनेटली आवडतात तर मी विरक्त आहे की नाही?
मुळात स-ग-ळ्या-च बाबतीतली आसक्ती संपली तर ते डिप्रेशन असेल ना?
माझ्या मते आयडिया इज टु फाइंड समथिंग बेटर. बेटर म्हणजे जे अधिक रिवॉर्डिंग, अधिक प्रोफाउंड, दुसर्‍या कोणा किंवा कशावर अवलंबून नसलेलं, इतर कोणाला त्रास न देता आपल्याला आनंद देणारं अशा अर्थी बेटर.

जशी सायंटिफिक मेथड 'येस, बट व्हाय' हा एक प्रश्न विचारत अधिकाधिक खोलात जात राहाते तसं.

हो! विरक्तीची खरी व्याख्या मला माहित नाही (तरी चार वेळा तो शब्द वापरला! ). फारच लूजली वापरतो आहे तो शब्द.
पण चित्रपटांत, पुस्तकांत, इतिहासात हिमालयात वगैरे गेला टाईप विरक्ती असते ते काही खरं नाही. माझ्या दृष्टीने जे आहे ते आनंदात जगणे, काही तरी नवे करत रहाणे, आतल्या आत ग्रो आणि अन-ग्रो होत रहाणे. आणि जे आवडत आहे ते करणे जे आवडत नाही त्यातून अंग काढून घेणे असंच जगावे. विरक्त असेल का नसेल हु केअर्स! पॅशनही बदलतेच. बदलू द्यावी. कशालाच कायमचे चिकटुन राहू नये, किंवा वाटलं तर रहावे. फक्त आनंदी रहावे. बाकी सगळं सेकंडरी!

>>> >>> फक्त आनंदी रहावे.

मला कोणी असं म्हटलं की हटकून हे आठवतं Proud :
Screen Shot 2026-02-11 at 2.32.41 PM.png

इतकं सोपं असेल तर छानच आहे, पण अनेकदा नसतं. Happy

अनिंद्यंना याच धाग्याचं क्लीनिंग करावंसं वाटायला लागलं असेल एव्हाना. किती अडगळ आणून ओतली आहे आपण सगळ्यांनी इथे! Lol

आपण पुन्हा सार काढूयात सर्वसंगपरित्याग, संन्यास याबाबतीत स्ट्रॉ मॅन ऑर्ग्युमेण्ट ला बळी पडलेल्यांसाठी.

धाग्याचा विषय - मोकळ्या हाताने जाणे. कधी ? तरूणपणी ? नाही.
धाग्यातली संकल्पना - "चाहूल लागयावर" वस्तू दान करणे.
ही स्विकारयची कि अजून बेटर ऑप्शन शोधायचा ? का नाही ?

मोकळ्या हातांनी याचा अर्थ मोकळ्या मनाने सुद्धा. आसक्ती कमी करायची.
कधी ? उपभोग घेण्यापूर्वी का ?
धाग्याचा विषय काय आहे ? "चाहूल लागल्यावर"
म्हणजे कधी ?
पुढचं संत्रं सोलायची गरज आहे ?

आम्ही फार पूर्वीपासून अशी तयारी करत आहोत म्हणजे आवरा आवर, आटोपशीर सामान इ.इ.
आतापर्यंत चार ,पाच देशात एक एक decade पेक्षा जास्त काळ राहिल्यामुळे देश बदलताना जड सामान सहजपणे डिसकार्ड करून पुढील प्रवासाला लागत होतो. पर्यायाने जरूरीपेक्षा जास्त भांडीही नाही जमवली. .हां पूर्वीचे भरमसाठ फोटो अल्बम डिसकार्ड केले. Exclusive फोटो digitalised करून घेतले. वीस खोकी भरून पुस्तके लायब्ररीला देऊन टाकून आम्ही एकेक किंडल विकत घेतले. गाड्या, घरं ते ते देश सोडून जाताना तिथेच विकून टाकले. Absolutely no attachmentwith the वस्तूज .. आता आमच्यानंतर मुलीला आमचा पसारा आवरायची गरज पडणार नाही. माझ्या आईवडलांनी देखील सतरा वर्षांपूर्वी अशीच तरतूद करून ठेवली होती. ते हयात असतानाच त्यांनी तांब्याची जड, मोठी भांडी वगैरे या काळात न लागणारे सामान आधीच dispose of करून टाकले होते. I think we need to be practical and not too senti about the वस्तूज.

मोह नसणे : - प्रत्येकासाठी त्याच्या जीवनशैलीप्रमाणे ही कल्पना वेगवेगळी असेल.

मोह नसण्याचा फायदा तसाच असेल. एखादी कल्पना समजून घेण्यासाठी आता संत्रं सोलून दाखवण्याची अजिबात आवश्यकता उरलेली नाही. आज मोठ मोठी पुस्तकं न वाचता, प्रवचनं न ऐकताही एखादी कल्पना समजून घेण्यासाठी अनेक टूल्स आहेत. समजून घेण्याची इच्छा असेल तर ते अवघड नाही. ती जबरदस्ती करता येत नाही. त्यामुळं एखाद्याला कल्पना समजलेली नसताना त्याने व्यक्त केलेल्या मतांवर त्याच तीव्रतेने व्यक्त होण्याची गरज नाही. करूणा असायला हवी.

ज्याप्रमाणे सर्व धर्मात संन्यस्त जीवन आणि संसारी गृहस्थ यांच्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या दिल्या आहेत त्याच प्रमाणे आजच्या काळात मोह-माया पासून मुक्ती याकडेही विवेकानेच पहावं लागतं.

एखादी कल्पना अंमलात आणण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं असतं. जाणून घेतल्यानंतर लगेचच ती अंमलात आणली असे होत नाही. माझा कामाचे पैसे मिळतात, त्याने अनेकांचे संसार चालतात. पैशांचा मोह सोडून जगायचे कसे हा आजच्या जगातला प्रश्न आहे. मोह नसणे म्हणजे प्रसिद्धीचा मोह नसणे, सन्मानाचा मोह नसणी. याचे फायदे सुद्धा असतात. जसे कि तुम्हाला मान सन्मानाचा मोह नसेल तर बदनामीची भीती नसेल. त्यामुळं दीपस्तंभासारखे संकटांना सामोरे जाता येते. फोकस्ड राहता येते.

पुढे ज्या वेळी निवृत्त व्हायची वेळ येईल तेव्हां आजच्या पेक्षा जास्त गोष्टींचा मोह सुटलेला असेल. आसक्ती नसेल.
गाडीचा मोह नसेल तर माझं चालणे वाढेल. ज्याचा फायदा माझ्या शरीराला होईल. जेव्हां वेळेत पोहोचणे हे कर्तव्य असेल तेव्हां गाडीचा वापर हा गुन्हा नसेल. अशा हजारो गोष्टी आहेत, ज्यावर इथे बोलणे योग्य नसेल.

अस्मिता आपल्या प्रतिसादात करूणा जाणवते. आशयाबद्दल सहमती असो नसो.

छान चर्चा.
मला वाटते की विरक्ती (मलाही व्याख्या नीट माहित नाही) येणे किंवा आसक्ती कमी होणे यामागे आता त्या गोष्टींचे आपल्या आयुष्यातील महत्त्व कमी झाले आहे किंवा आता ती गरज उरली नाही.
आयुष्याच्या एका टप्प्यावर अगदी महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी नंतर कालांतराने कमी महत्वाच्या किंवा निरर्थक वाटू शकतात/ वाटतात. त्यामुळे ही लाँग टर्म प्रोसेस आहे. उपभोग घेतला आणि झटक्यात विरक्ती आली असे म्हणता येणार नाही. त्याला अपेक्षित वेळ जाणार हे नक्की.
माफ करा फारच विस्कळीत लिहिले आहे.

किती अडगळ आणून ओतली आहे आपण सगळ्यांनी इथे!>>>> Lol

राज अज्ञानी, धन्यवाद. वॅल्यूज माझ्यासाठी लेखनापेक्षा महत्त्वाच्या आहेत. Thank you for noticing! Happy

अनिंद्य, धुमाकूळ सहन केल्याबद्दल धन्यवाद. Happy

आसक्ती व विरक्ती यात सरमिसळ होत आहे का?
मागच्या दोन पानांवरचे प्रतिसाद जरा पटले नाहीत.

सगळे फोल वाटून काही करावेसे न वाटणे ही विरक्ती.
विरक्ती हा या धाग्याचा विषय नाही.

गरजेनुसार/आवडीनुसार वस्तू घेणे, वापरणे यात काहीच प्रॉब्लेम नाही.
प्रॅाब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा वस्तूची गरज संपते तरी ती वस्तू dispose off न करता संभाळली जाते. ती आसक्ती.
कारणे काहीही असू शकतात. पण bottom line is की ती वस्तू आता वापरली जात नाही व पुढेही वापरायची शक्यता नाही? तरी ती ठेवली जाते. घरोघरी अशा किती तरी गोष्टी विनाकारण संभाळून ठेवलेल्या असतात.

आपल्या हातापायात ताकद असतानाच अशा गोष्टी वेळोवेळी कमी करत न्याव्या, जेणेकरून आपल्या नंतर कोणाला तो व्याप होऊ नये. मला तरी धाग्याचे एवढेच सार वाटले. त्यात बाकी एवढे मुद्दे येण्याचे प्रयोजन कळले नाही.

Problem is not in possessing the things, problem is being possessed by things!
Jay Shetty

अनुभव घेत घेत त्याबद्दल तीव्र भावना येणं थांबणं
>>>
मला असंच काहीसं म्हणायचं आहे.
तीव्र भावना असतील तर अनुभव का घेऊ नये? आणि अनुभव घेतल्यावर त्या बाबतीत तीव्र भावना नाही उरल्या तर त्याची विरक्ती म्हणता येईल.
मला आध्यात्मिक बाबतीत समज नाही पण असं वाटत की जिथे आसक्ती असेल तिथेच विरक्ती येऊ शकते. एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र भावनाच नसतील, आपण इनडिफरंट असू तर ती गोष्ट असेल काय किंवा नसेल काय फरकच पडणार नाही.

आणि अमितव म्हणतो तसं "गांधीच्या पंचाचे कोकण्यास काय कौतुक" हे ही पटतं.

Problem is not in possessing the things, problem is being possessed by things! >> हे आवडलं.

बाकी या चर्चेला अडगळ म्हणायचंच असेल तर निदान समृद्ध अडगळ तरी म्हणूया का Wink त्या निमित्ताने जरा मनातल्या विचारांनाही मोकळा वारा लागतोय.

धाग्यावर प्रतिसादांची आसक्ती कमी झाली असे वाटत असतांनाच इथे भरघोस प्रतिसाद आणि रंगलेली चर्चा बघून आनंद वाटला. 😀

होते आहे तशी तात्विक चर्चा होणे उत्तम आहे. त्याने मुद्दे स्पष्ट होतात, जे विषयापासून दूर आहेत ते किमान एकदा वाचतात, काही विचार करतात. जे काठावर आहेत ते कुठल्यातरी बाजूला कलंडतात आणि ज्यांना पटले ते छोटी-मोठी अनुषांगिक कृती करतात.

नवनीत.

@ स्वाती,

what an idea ! Why didn’t I think of that … 😂

सगळे भोग, लालसा भोगून मग सर्वसंग परित्याग/ विरक्ती आली तर त्यात मजा. कुठली गोष्ट अनुभवण्यासाठी/ चाखण्या आधीच विरक्ती आली तर ती विरक्ती नाही >>> इच्छा आणि आसक्ती यात किंचित फरक आहे ना? एकदा इच्छापूर्ती होऊनही जी संपत नाही ती आसक्ती. भुंगा जोपर्यंत एका कमळावरून दुसर्‍या कमळावर जात मध पीत असतो तोपर्यंत सगळं आलबेल असते पण जर त्याला एखाद्या कमळातला मध जरा जास्तच आवडला आणि तो प्यायला तो जास्त वेळ त्या कमळावर थांबला तर ते कमळ मिटून भुंगा आत अडकण्याची शक्यता वाढते.

भोग, लालसा अपरिमीत आहेत. n इच्छा भोगून झाल्या तरी (n+1) th मनात येणारच. आणि तेंव्हा ती प्राप्त करायची आणि भोगायची शक्ती उरली नसेल तर? एखाद्याला प्रवासाची आसक्ती आहे. त्याने २० देश बघितले. आता तो म्हातारा झालाय पण त्याने इन्स्टावर २१व्या देशाचे रील बघितले आणि त्याला तिकडे जायचय. पण शरीर थकलंय आता त्यामुळे तो जाऊ शकत नाही. मग त्याचे जगणे फोल म्हणायचे का?

विरक्त झाल्यावर काहीही बदलत नाही फक्त दृष्टिकोन सोडून! >>> पते की बात, अस्मिता! विरक्ती म्हणजे काय हे मीराबाईने "चाला बाही देस" मध्ये सुरेख सांगितले आहे. ते ऐकले तर लताच्या गाण्यावरची आसक्ती आणि विरक्तीची माहिती दोन्ही समजते. विरक्तीची माहिती असली तरी त्यचा अनुभव घ्यायचा की नाही ही वैयक्तिक बाब झाली. आणि अस्मिताने म्हटल्याप्रमाणे अनुभव घ्यायचा झाला तरी तो मिळेलच याची शाश्वती नाही. कारण आसक्ती हा स्थायीभाव आहे प्रत्येकाचा - जगण्याची आसक्ती घेऊनच माणूस (इतर प्राणीही) जन्माला येतो.

बेटर म्हणजे जे अधिक रिवॉर्डिंग, अधिक प्रोफाउंड, दुसर्‍या कोणा किंवा कशावर अवलंबून नसलेलं, इतर कोणाला त्रास न देता आपल्याला आनंद देणारं अशा अर्थी बेटर. >>> आनंदाची आसक्ती ! ही असावीच, असतेच.

Pages