या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
अनिंद्य पण कंगवे लागतात हो.
अनिंद्य,
अनिंद्य,
तुमच्या गृहपाठामुळे मला बरीच मोलाची माहिती मिळतेय.
दसरा झाला की एकदा साफ सफाई मोहीम हाती घ्यायची आहे.
आज रद्दी काढली. बऱ्याच वर्तमानपत्रांच्या पुरवण्या त्यातील लेख वाचू म्हणून ठेवल्या होत्या. आज ती चळत पाहून त्यातील निवडक लेखांची कात्रणे काढून हातावेगळी केली.
>>>>निवडक लेखांची कात्रणे
>>>>निवडक लेखांची कात्रणे
वाह! खूप छान.
@ लेखांची कात्रणे
@ लेखांची कात्रणे
चित्रयुक्त रेफरंस मटेरियल असल्यास ठीक. अन्यथा Scan करून फोनवर ठेवा, स्वत:ला मेल पाठवून ठेवा. कात्रणं सांभाळावी लागणार नाहीत आणि मेलमधे subject योग्य लिहिलात तर लागेल तेव्हां क्षणात तो संदर्भ मिळेल.
.. कंगवे लागतात हो..
.. कंगवे लागतात हो..
मान्य. म्हणून प्रत्येकी तीन + ४ कोरे असे ठेवले आहेत. Use the very best ones you have and leave the rest अशी मल्लीनाथी करून 🙂
आता पुढची धाड वापर नसलेल्या kitchen knives/ चाकू, nail cutters, कात्र्या आणि पादत्राणांवर घालण्याचा विचार आहे. इंशागोविंदा, उद्याच.
चित्रयुक्त रेफरंस मटेरियल
चित्रयुक्त रेफरंस मटेरियल असल्यास ठीक. अन्यथा Scan करून फोनवर ठेवा, स्वत:ला मेल पाठवून ठेवा. कात्रणं सांभाळावी लागणार नाहीत आणि मेलमधे subject योग्य लिहिलात तर लागेल तेव्हां क्षणात तो संदर्भ मिळेल.>>>> लफ़्ज़-ब-लफ़्ज़ अंमलात आणतो, अनिंद्य
आमच्या वडिलांनी सांगितलेली
आमच्या वडिलांनी सांगितलेली उत्तम गोष्ट.
आपल्याला एखादी गोष्ट नकोशी झाली आहे. उदा चप्पल/ सॅंडल वापरून झिजली आणि सेल मध्ये अर्ध्या किमतीत उत्तम सॅंडल मिळाली कि आपण जुनी वापरणे बंद करतो आणि कधीतरी कामाला येईल म्हणून ठेवून दिली जाते.
असे करण्याऐवजी जुनी चप्पल घरच्या कर्मचाऱ्यांना( मोलकरीण/ वॉचमन याना विचारायचं) त्यांना नको असेल तर सरळ रस्त्यावर ठेवून द्यायची. ज्याला गरज आहे तो ती घेऊन जाईल.
असेच मी अनेक गोष्टीनबद्दल करतो. उदा छत्रीची ताडी तुटली तर एकदा दुरुस्त करायची दुसऱ्यांदा दुरुस्त करायच्या ऐवजी सरळ रस्त्यावर ठेवून द्यायची. एक दिवसात कुणीतरी घेऊन जातो. त्यातून उगाच कुणावर उपकार करतो आहे किंवा त्याने कृतज्ञ राहायला हवे अशी अपेक्षाही नको.
हीच गोष्ट मी कपडे किंवा इतर वस्तु याबद्दल करतो.
हीच गोष्ट खोटे दागिने बद्दल करता येते. कधीतरी वापरायला होईल म्हणून घरात पाच वर्षे पडून राहिलेले ऑक्सिडाइज्ड सोनेरी पाणी चढवलेले दागिने इ शांतपणे रस्त्यावर ठेवून देतो. मोलकरणीला विचारायचं मग ती नाक मुरडणार यापेक्षा हे उत्तम.
… लफ़्ज़-ब-लफ़्ज़ अमली जामा पहना
… लफ़्ज़-ब-लफ़्ज़ अमली जामा पहना रहे हो ?
बेस्ट है 👍
… कधीतरी कामाला येईल…
ही क्याटेगिरी खरेच फार डेंजर आहे, शेकडो वस्तू अशाच साठत जातात. duplicating the duplicate ! 🙂
दुसऱ्यांदा दुरुस्त करायच्या
दुसऱ्यांदा दुरुस्त करायच्या ऐवजी सरळ रस्त्यावर ठेवून द्यायची. एक दिवसात कुणीतरी घेऊन जातो. त्यातून उगाच कुणावर उपकार करतो आहे किंवा त्याने कृतज्ञ राहायला हवे अशी अपेक्षाही नको. >> सहमत
सध्या ई-कचरा साफ करत आहे. जवळपास १५,००० फोटो पडून आहेत, जे बघितलेही जात नाहीत. घरातली जागा व्यापली जात नाही, पण तरीही त्याची अडगळ वाटत आहे. माझ्या माघारी त्याची किंमत शून्य आहे.
..सध्या ई-कचरा साफ करत आहे….
..सध्या ई-कचरा साफ करत आहे….
उत्तम कृती. Power to you 👍
डिजिटल कचरा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालाय हे खरेच.
Phone cam असल्याने भरमसाठ फोटो काढले जातात, प्रत्येक प्रसंगाचे किमान २५. फोनचे स्टोअरेज संपत आल्याशिवाय ते sort / delete करावे हे कुणाच्या मनातही येत नाही. व्हिडिओ तर खूपच जागा व्यापतात. त्याऐवजी प्रत्येक प्रसंगाचे ३-४ बेस्ट फोटो ठेऊन बाकी डिलिट करणे हेच योग्य.
हीच गत व्हॉट्सअप संदेशांची, विशेषत: family groups, गुड मॉर्निंग वाले अंकल्स-आंटीज्, टुकार clips पाठवणारे मित्र…. हे तर auto delete ला ठेवावे, ठेवतो. भिडेपोटी काहींना ब्लॉक करता येत नाही; त्यांना chat archives मधे टाकतो आणि मग आठवडी कत्तलबाजार 🪓
SMS आता वापरात नाही म्हणतो आपण पण OTPs चे SMS काम झाल्याबरोबर डिलिट केले नाहीत तर dozen a month असे साचून राहतात. “One Time Password” हा लॉंग फॉर्म असूनही लोक ते वापरानंतर डिलीट करत नाहीत याचे हसू येते.
मला फोनमधला , ईमेलमधला कचरा
मला फोनमधला , ईमेलमधला कचरा नेमाने काढून टाकायची सवय आहे. पण काही वेळा असे डिलीट केलेले फोटो दुसर्यांकडून मागायची वेळ आली आहे. तेव्हापासून माझ्याशी संबंधित फोटो डेस्कटॉपमध्ये कॉपी करून ठेवतो.
कायद्याशी संबंधित एका प्रकरणासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. आमच्या दृष्टीने ते प्रकरण संपलं म्हणून माझ्या फोनमधून तिथलं चॅट क्लीअर केलं आणि काही महिन्यांनी तिसरीच व्यक्ती त्यात नाक खुपसू लागली, तेव्हा तिथल्या डॉक्युमेंट्सची पुन्हा गरज भासली. ग्रुपमधल्या अन्य व्यक्तींना माझ्यासारखी चॅट क्लीअर करायची सवय नसल्याने ती मिळाली. अर्थात मूळ कागदपत्रे त्यांच्या योग्य जागी सुरक्षित आहेत. पण त्यांच्या स्कॅन्ड इमेजेस हाताशी असल्याने अनेकदा उपयोगी पडल्या होत्या.
--
अनिंद्य , तुमच्या कंगव्यांचा किस्सा आवडला.
---
ऋतुराज , वृत्तपत्रांच्या पुरवण्यांबाबत मी तुझ्या काही स्टेशन्स मागे आहे. माझ्याकडे लोकसत्ता लोकमुद्रा पुरवण्याही आहेत. त्या सगळ्या पुरवण्या सावकाश वाचाव्या म्हणून ठेवलेल्या. वाचून , किमान नजरेखाली घालून रद्दीत द्यायचा बेत आळसामुळे आणि इतर कारणांनी पुढे पुढे जातो आहे.
@ भरत,
@ भरत,
दुसरी एक ट्रिक म्हणजे चॅट क्लीअर केले तरी महत्वाची कागदपत्रे scan करून स्वत:लाच मेल करून ठेवतो. मेलचा “Subject” योग्य key words सकट लिहिला तर क्षणात तो संदर्भ सापडतो.
तुम्ही महत्वाची कागदपत्र योग्य जागी/ हार्ड डिस्कमधे ठेवता तेही योग्यच आहे. माझा मुद्दा बिनकामी भरताड/ chats बद्दल होता.
हा धागा काढल्याबद्दल आणि
हा धागा काढल्याबद्दल आणि वेळोवेळी अपडेट्स देत राहिल्याबद्दल अनिन्द्य यांचे आभार. माझ्यासारख्या आळशी प्राण्याला त्यातून प्रेरणा मिळते. वर भरतनी लिहिल्याप्रमाणे माझ्याकडेही लोकसत्ता पुरवण्यांचा गठ्ठा पडलाय ते आठवलं. मध्यंतरी कपाट आवरलं तेव्हा बऱ्याच गोष्टी ज्यांना हव्या होत्या त्यांना दिल्या. काही गोष्टी टाकल्या. डिजिटल सफाई हा प्रवासातला नेहमीचा उद्योग आहे. खास करून व्हिडीओ.
.. प्रवासातला नेहमीचा उद्योग.
.. प्रवासातला नेहमीचा उद्योग..
+१
लॉंग हॉल प्रवासात फोटो- व्हिडीओ डिलिट सर्वात बेस्ट विरंगुळा 👍
डिजिटल स्वच्छतेबद्दल सध्याची
डिजिटल स्वच्छतेबद्दल सध्याची मतं:
मी काढलेले फोटो गूगल फोटोवर ठेवतो. त्यातले ड्युप्लिकेट दिसले तर काढतो. ते तारखेप्रमाणे गूगल ठेवतोच, त्याच प्रमाणे फोटोत काय आहे त्याप्रमाने गूगल ते रँकही करतो. मी काही चेहर्यांना नावं देऊन ठेवली आहेत. ती द्या असं अजिबात म्हणणं नाही, पण चेहर्यांना नावं दिली तर तसे फोटो ही गूगल शोधतो.
व्हॉट्सअॅपवर आलेलं मात्र काहीही- कधीही ऑटो बॅकअप करत नाही. करावसं वाटलं तर मॅन्युअल करतो. विसरलो तर कत्तलबाजीत जातं. जे मी तयार केलेलं नाही, जे एकदा बघितल्यावर कधी लागलं ही नाही ते कत्तलबाजीत गेलं तर हळहळण्यासारखं काही नाही.
डिजिटल सगळीच खाती मी मेल्यानंतर त्यांचे सर्वर स्मरणपत्रे टाकून टाकून काही प्रतिसाद आला नाही तर गंगार्पण करतीलच. त्यासाठी मी काही अॅक्शन घ्यायची गरज नाही. गूगल स्टोरेजच्या बाहेर जाऊ लागलं तर आधी डिलीट मारुन जमलं तर बघतो. नाही तर मग आणखी पैसे भरुन स्टोरेज घेतो. फोटो बघायला मला अजुन तरी फार आवडतं. हार्डडिस्क हा माझ्यासाठी सहजी अॅक्सेसिबक मिडिया नाही. त्यामुळे गूगलला त्यासाठी पैसे द्यायला काही वाटत नाही.
बाकी डिजिटल गोष्टी गूगल मेलवर स्वतःला मेल करुन ठेवतो. त्यात व्यवस्थित विषय आणि माझ्यासाठी सर्च फ्रेंडली फ्रेजेस मेल मध्ये आस्की मध्ये लिहून ठेवतो. की नॉन आस्की मिडिया सहज मिळतो.
त्यातही स्टोरेज स्वस्त असल्याने आणि शोध सोपा आणि जलद असल्याने कचर्याची चिंता करत नाही.
आता हे कदाचित आळस, चालढकल, स्वत:चे समाधन करुन घेणे वाटेल. पण त्याने माझं खरंच समाधान झालं आहे.
काही फोटो अल्बम निकालात काढले
काही फोटो अल्बम निकालात काढले व त्यातले काही फोटो फाडून टाकले तर काही कागदी पाकिटात ठेवलेत. इन्स्टंट कॅमेराने काढलेल्या फोटोंची विल्हेवाट लावणे हे मात्र कटकटीचे आहे; त्यांच्यात रसायन भरलेले असते आणि ते फाडता येत नाहीत.
लॉंग हॉल प्रवासात फोटो-
लॉंग हॉल प्रवासात फोटो- व्हिडीओ डिलिट सर्वात बेस्ट विरंगुळा>>>>>> अनिंद्य, आज हे मनावर घेऊन, सकाळी ट्रेन मधे 350 फोटो डिलीट केले.
@ अमितव,
@ अमितव,
.. हार्डडिस्क हा माझ्यासाठी सहजी अॅक्सेसिबल मिडिया नाही. … हे पटलं. पूर्वी काही त्यावर ठेवले होते; disk corrupt झाल्यापासून भरवसा वाटेना झालाय.
गरज वाटल्यास Apple storage / गूगल storage चा पर्याय बघता येईल.
फोटो sort मधे चेहर्यांना नावं देण्याची आयडिया बेस्ट. ते न करताही photo sort & retrieve होतात ना ? सफरचंदी फोनमधे तरी होतात.
@ कुमार१,
बेस्ट. आधी कमी केले तरी फोटो प्रिंट अजूनही बरेच आहेत माझ्याकडे. Will follow your lead.
@ ऋतुराज,
बेस्ट केले
सॉर्ट आणि रिट्रीव्ह म्हणजे
सॉर्ट आणि रिट्रीव्ह म्हणजे अमित नाव देऊन फक्त अमितचा चेहरा असलेले फोटो हवे असतील तर .. असं म्हणत होतो.
चेहर्यावर हॉवर करुन 'हा' (इनस्टेड ऑफ अमित) चेहरा असलेले फोटो दे हे ही शक्य असेलच. शेवटी अल्गोरिदम तेच करतो आहे. आस्की सर्च आपल्याला फक्त सोपा म्हणून, अर्थात अॅट द कॉस्ट ऑफ प्रायव्हसी. त्यामुळे आपापली कंफर्ट लेव्हल, रिस्क इ. लक्षात घेऊनच कोणीही करा.
Got it
Got it 👍
Some Updates @ सततचा गृहपाठ:
Some Updates @ सततचा गृहपाठ:
सो कॉल्ड “दिवाळीची साफसफाई” हा कार्यक्रम गेली काही वर्ष माझ्याकडे नसतो. घर एरवीही स्वच्छ ठेवत असल्याने सणाच्या दिवसात त्या कामात स्वत:ला जुंपून घेत नाही. पण माझ्यासाठी हे थोडे slow paced दिवस असल्याने “सततचा गृहपाठ” मात्र विसरत- इग्नोरत नाही.
* यंदा गरम कपडे/ वुलन्सवर फोकस केला होता. मी+ कुटुंबियांनी फिट न होणारे/ out of fashion किंवा नावडते असे सर्व स्वेटर, शाली, कार्डिगन्स, ब्लँकेट्स घाऊक प्रमाणावर निवृत केले. सोबत काही रेनकोट / water proof clothings आणि पादत्राणे. ज्यांना या वस्तू हव्या होत्या त्यांनी पटकन नेल्या, ३० मिनिटात बॉक्स मोकळा.
* यावर्षी “दिवाली गिफ़्ट” म्हणून मोठमोठ्या नटवलेल्या कार्डबोर्डच्या बॉक्सेसमधून पणत्या, प्लास्टिकची तोरणं, तथाकथित डेकोरच्या अन्य वस्तू (यांना Diwali goodies असे नाव असते) आणि सोबत पावकिलो मिठाई / फराळाचे पदार्थ किंवा छटाकभर मिक्स सुकामेवा देण्याचा उपचार अनेक कंपन्या, व्यापारी आणि सामान्य जनतेने पाळला.
* मोजके अपवाद वगळता कामाच्या ठिकाणी स्वत:साठी आलेल्या या दिवाळी भेटी कधीच घरी घेवून येत नाही. यावर्षीही आणल्या नाहीत, तिथेच वाटून टाकल्या. अपवाद = एक सिरेमिक पेन होल्डर.
* घरातील मेंब्रांना आधीच prime केल्याने त्यांनीही त्यांना आलेल्या gifts ची झटपट विल्हेवाट लावली.
* बर्फ़ी टाईप मिठाई घरी कुणीच खात नसल्याने स्टाफला वाटून टाकली.
* जे हवाबंद पाकिटातले चांगल्या प्रतीचे काजू बदाम होते ते ग्रेव्हीत वापरले, काही भाजून घेतले ते पाहुण्यांसोबत+ मद्यासोबत फस्त केले.
Natural / Floral Decor ची आवड पुढच्या पीढीत पूरेपूर उतरली आहे याची खात्री घरातल्या गणपती- दीपावलीची सजावट बघून पटली-पटते. मातीच्या पणत्या, ताजी फुले, फुलांच्या रांगोळ्या. सण संपल्यावर सर्व निर्माल्याचे नीट कंपोस्ट, न सांगता-विचारता थेट योग्य कृती. ❤
आणखी दोन अपडेट्स:
आणखी दोन अपडेट्स:
१)
माझ्या सततच्या बडबडीतून प्रेरणा घेवून एका जेष्ठ नातेवाईक स्त्रीने तिच्याकडची वापरात नसलेली खूप जुनी चांदीची भांडी-समया-दिवे वगैरे समृद्ध अडगळ विकून घसघशीत पैसे मिळवले, चांदीचे गगनाला भिडलेले भाव त्यांना लाभी ठरले.
त्या पैशातून आता सिंगापुर वारी करणार आहेत त्यांच्या कन्येसोबत. अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या बंदिस्त आयुष्यातली पहिलावहिली विदेशयात्रा.
२) मला रिकामा बसलेला बघून दुसऱ्या एका ज्येनांनी त्यांची “महत्वाची कागदपत्रे” sort करायला मदत मागितली होती, ती केली.
UTI Bank, Andhra Bank, Dena Bank अशा merger वगैरे होऊन नाव बदललेल्या बँकामधल्या त्यांच्या accounts ची जुनी पासबुके, चेकबुके, pay in slips, कोरे चेक्स, account statements असा बिनकामाचा ऐवज, त्यांच्या घर+ ऑफिसच्या maintenance ची २०+ वर्षांची बिले, भाडेकरांराच्या ३-३ प्रती, टेलिफोन-विजेची २० वर्षांची बिले वगैरे कागदपत्रे असा मोठाच पसारा होता.
What we did :
* Housing society कडून “No dues Certificate” घेतले आणि सर्व जुने monthly maintenance invoices चे कागद काढून टाकले.
* Continuous Stay चा पुरावा म्हणून दर वर्षाचे जानेवारीचे वीज बिल ठेवून बाकी बिले नष्ट केली. डिट्टो टेलिफोन बिलांचे.
* बँकामधल्या त्यांच्या जुन्या defunct accounts ची पासबुके, चेकबुके, कोरे चेक्स, account statements नष्ट केले.
* वापराअभावी बंद पडलेल्या बँक खात्यांना चालू करून, त्यातले सर्व पैसे काढून मग बंद करण्याचे त्यांनी आता ठरवले आहे. त्या-त्या बँकांचे फॉर्म आणून तशी सुरुवात केली.
* अनेक वर्ष साचलेली जुन्या लग्नपत्रिका, दुधाची मासिक बिले, कात्रणे, विमानप्रवासाची छापिल तिकिटे+बोर्डिंग पासेस, पर्यटनाची माहितीपत्रके अशी कागदपत्रे आता 80+ वय असतांना जपून ठेवण्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी स्वखुशीने टाकून दिली.
त्यांच्या दोन-तीन कपाटे व्यापून उरलेला पसारा ८-१० फाईलींमधे नीट लावून दिला म्हणून मला थियोब्रोमा च्या आवडत्या पेस्ट्रीची treat मिळाली. 😍
Our Joint Takeaway :
Make the space work for you, not against you
खूप छान काम.
खूप छान काम.
असा पसारा कमी केली की मला तर डोक्यावरचे ओझे कमी झाले आहे असे वाटते..
तुम्ही हा धागा एकदम योग्य पद्धतीने active ठेवत आहात.
खूप जुनी चांदीची भांडी-समया
दिवाळी भेटींची आवरा आवरी आवडली. लगेच ऍक्शन घेतली हे ही आवडलं
खूप जुनी चांदीची भांडी-समया-दिवे वगैरे समृद्ध अडगळ विकून घसघशीत पैसे मिळवले, चांदीचे गगनाला भिडलेले भाव त्यांना लाभी ठरले >> त्यांना त्या पैशाची फारच गरज असेल तर ठीक आहे, हा प्रत्येकाचा विचार आहे हे ही मान्य आहे, पण जुन्या घाटाची , विकली तर पुन्हा बघायला ही न मिळणारी, सगळ्या कुटुंबाचा ऐतिहासिक ठेवा असलेली चांदीची भांडी विकणे पटले नाही. अश्या जुन्या ऐतिहासिक दृष्ट्या मौल्यवान असणाऱ्या , जास्त जागा न व्यापणाऱ्या गोष्टींचे क्लटरिंग वाटत असेल ही माझ्यासाठी कल्पने पलिकडची गोष्ट आहे. अर्थात त्या बाई हे विकायला तयार झाल्या ह्या मागे काहीतरी स्ट्राँग कारण असेल, घरातल्या इतरांचा ही विचार घेतला असेल हे ही मान्य आहेच. नक्की काय ते माहित नाही. असो.
अनिंद्य,
अनिंद्य,
खूप छान अपडेट्स.
तुमचे अपडेट्स वाचून हुरूप येतो.
कालच रद्दी काढली. घरातली जुनी, न लागणारी, मुदत संपलेली औषधे, मलम, क्रीम यांची विल्हेवाट लावली. कॉन्फरन्स मध्ये मिळालेल्या एकदोन हँडबॅग, पाउच मदतनीस ताईंना दिले.
दिवाळीच्या लायटिंग माळा, कंदील इत्यादी काढून ठेवले. त्यातील दोन आता सतत तेच ते नको म्हणून काढून टाकले.
@ धनवन्ती
@ धनवन्ती
थँक्यू .
@ मनीमोहोर,
बाई चोखंदळ आणि हौशी आहेत. त्यांनी काय काय विकले ते मी प्रत्यक्ष पाहिले नाही, विचारलेही नाही. परंतु त्यांनी सांगितले की त्यांच्या वापरात नसलेल्या जुन्या आणि साधारण ३० वर्ष लॉकरबंद असलेल्या वस्तू होत्या. एकुलत्या कन्येसोबत जाऊन विकल्या म्हणजे कुटुंबाचे internal buy-in झालेच असावे.
मला तर त्यांच्या पहिल्यावहिल्या विदेश प्रवासाचे अनुभव त्यांच्याकडून ऐकण्याची उत्सुकता लागली आहे.
@ ऋतुराज.
Power to you 👍
मला रिकामा बसलेला बघून >>
मला रिकामा बसलेला बघून >>
ज्येनांना समजावू शकलात म्हणजे तुमची convincing power अफाट आहे. आम्ही ज्येना झाल्यावर तुमच्याकडेच येऊ.
छान विचार आहे. मी असाच एखादा
छान विचार आहे. मी असाच एखादा लेख वाचून सुरुवात केली.
पहिली सुरुवात नवीन पुस्तके न घेण्याची कारण ह्याचीच ज्यास्त आवड होती/आहे तशी अजुनही. मग साड्या, पर्फ्युम्स वगैरे काहीच नवीन घ्यायचे नाही. फर्निचर हि मोजकेच ठेवलेय. ह्यात साफसफाईचा वेळ वाचतो आणि अडगळ वाटत नाही.
बरेच कपडे , पुस्तकं, पर्सेस , शोपीस वाटून टाकले. मग ईलेक्टोनिक्स साफ केले. खुप जुना कॅसेट्स(हो कॅसेट्स) होत्या आणि एक कॅसेट्स प्लेअर. बरीचशी भिंतीवरची घड्याळं( अर्धी अधिक भेट, आठवण वगैरे म्हणून जमा) देवून टाकली. मग स्वंयपाकघरात उगाच भरपूर डाळी, पीठं , मसाले बंद केले. पाव पाव किलो आणायचे. काही गोष्टीच खाणं बंद केलं मग आणणं बंद झालं. आधी कुठेही फिरायला गेले की, काही ना काही तिथले उचलून आणायची आणि ते असच कुठेतरी पडून असायचे(कपडे, वगैरे). कंगवे किंवा केसाची स्टाईलिंग करण्याचे बरेच उपकरणं होती. हेअर स्ट्रेटनिंग आयन, ब्लोअर, कंगवे लाकडाचे, रोलर वगैरे... सर्व दिले मुलींच्या अनाश्रमात.
मला तरी खुपच हलकं वाटतं. खरे तर सुरुवात डिक्ल्टर म्हणून होती मग असाच एक लेख वाचला आणि मग वाटले बरोबरच करतोय. त्यात पॅन्डेमिक आलं आणि पटलच की आता काही रोज नवीन कपडे , २ गाड्या वगैरे घ्यायची गरज नाही.
सुटसुटीत घर छान वाटते.
मुळात बर्याच लोकांनी ह्याचा हाच अर्थ घेवुन सुरुवात करायची गरज नाही.
डिक्ल्टर, सुटसुटीपणा हा विचार केला तर जड जाणार नाही. किंवा मिनिमिलॅस्टीक म्हणून केले तर बरं.
खेळणी चा बॉक्स
खेळणी चा बॉक्स
काल बराच आवरला
तुटकी खराब झालेली खेळणी ची विल्हेवाट लावली
आणि कपडे सुद्धा आवरले.. जे मी वापरत नाही ते, घरातल्या सर्वांचे, वेगळे sort करून मदतनीस ना दिले
आता एक वर्ष तरी एकही नवीन कपडा घ्यायचा नाही असं ठरवलं आहे.
अनिंद्य, तुम्हच्या पोस्ट
अनिंद्य, तुम्हच्या पोस्ट वाचून एक काहितरी खूप छान फिलिंग येते बघा

मस्त वाटले वाचून.
चांदी भांडी विकून विदेश वारी हे तर भारी आवडले.
खरं तर अशी किती तरी पडीक मंडळी असतात घरी, चांदी चे जुने वाकलेलग्लास्/वाटी कानातले, वाळे, तोरडी. ह्यांना मुक्ती देऊन अशी ट्रिप करायला मला तर नक्की आवडेल
Pages