या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
पुस्तके असोत की अन्य वस्तू,
… वडिल प्राध्यापक होते त्यामुळे माझे बालपण पुस्तकांनी भरलेल्या कपाटाच्या सान्निध्यात गेले…
@ धनवन्ती,
डिट्टो !
@ ऋतुराज.,
@ प्रकाश घाटपांडे
पुस्तके असोत की अन्य वस्तू, “सत्पात्री” जावी अशी आपली इच्छा असते. पण हे “सत्पात्र” शोधण्यात फार जास्त प्रयत्न, वेळ घालवू नये असे वैयक्तिक मत. त्याने घोळ होत रहातो, नेमकी “कृती” घडत नाही.
मी घरची जुनी पुस्तकं वाचनालया
मी घरची जुनी पुस्तकं वाचनालया ला देते.
मी काही वर्षांपुर्वी गाव व घर
मी काही वर्षांपुर्वी गाव व घर सोडले. त्यापुर्वी मी 3 पिढ्यांच्या असंख्य वस्तू भंगारात दिल्या. पत्र व्यवहाराची तारेला बांधलेले गठ्ठे मात्र जाळून टाकले. काही भाग वाचला. काही गुप्त गोष्टी समजल्या होत्या. त्यातच खूप वेळ जायला लागला. नंतर मी पुढ्चे पत्रव्यवहार न वाचताच जाळून टाकले. परत वाडा चिरेबंदी नाटक नको
काल नागपूरहून परत आले तिथल्या
काल नागपूरहून परत आले तिथल्या घराचं डिक्लटरिंग करून. बरीच वर्षे उन्हाळ्यात पुणे थंडीत नागपूर अशी ये-जा करत होतो . करोना काळानंतर गेलोच नाही. उर्मिला (मदतनीस) सहा महिन्यांपूर्वी देवाघरी गेली ती घराची साफसफाई करत होती. आता घर भाड्याने दिलेय त्यामुळे रिकामे करणे भाग होते. भांडीकुंडी उर्मिलेच्या मुलाला दिली त्याच्या नवीन संसाराला. बाकी सामान एका संस्थेला दिलं. पस्तीस वर्षे ज्या घरात संसार बहारला ते रिकामं घर बघून दाटून आलं … मुलांच एक काम कमी केलं म्हणून बरं ही वाटलं.
पस्तीस वर्षे ज्या घरात संसार
पस्तीस वर्षे ज्या घरात संसार बहारला ते रिकामं घर बघून दाटून आलं
>>> खरंच कठीण आहे हे. पण तुम्हाला हे जमले याबद्दल कौतुक केले पाहिजे.
ग्रेट मंजुताई. खरोखर
ग्रेट मंजुताई. खरोखर कौतुकास्पद. दाटून येणं स्वाभाविक आहे.
पस्तीस वर्षे ज्या घरात संसार
पस्तीस वर्षे ज्या घरात संसार बहारला ते रिकामं घर बघून दाटून आलं … मुलांच एक काम कमी केलं म्हणून बरं ही वाटलं. >> मंजू, अगदीच समजू शकते ह्या दोन्ही भावना...
मंजूताई, अभिनंदन.
मंजूताई, अभिनंदन.
भावनाकल्लोळ आणि Practicality यांचा दोलायमान झुला ओलांडून पुढे आलात. आठवणीदाखल काही थोडक्या विशेष आनंद देणाऱ्या वस्तू ठेवल्या असतील स्वत:पाशी तर तेही योग्यच.
पुढच्या पीढीसाठी काम सोपे करण्यासारखे सुख दुसरे नाही.
आदर्श कृती, नमस्कार स्वीकारा. 🙏
सततचा गृहपाठ म्हणून गेल्या
सततचा गृहपाठ म्हणून गेल्या काही आठवड्यात दोन कामे पूर्ण केलीत.
१} बाग आणि झाडे फार ममतेनी जपतो. पण १५+ वर्षांची झाडे कुंडीत प्रसन्न दिसेनात, त्यांची वाढ खुंटली हे एक आणि वजनी कुंड्या सरकवून बागेचे deep cleaning करणे कठीण होत चालले हे दुसरे कारण ; म्हणून मग मोठी २७ झाडे जमीनीत लावायला इच्छुक लोकांना देऊन टाकली, काही रिकाम्या कुंड्या संकुलातल्याच बागप्रेमींना दिल्या आणि एक पूर्ण टेरेस रिकामी केली.
आता काही पिटुकली शोभेची झाडे तिथे राखली आहेत. दृष्टीसुख आहे आणि त्यांची फारशी उस्तवार करावी लागत नाही हा फायदाही आहे.
२} माझ्या declutter Movement च्या वरवंट्यातून आतापर्यंत समहाऊ वाचलेली भांडीकुंडी /गृहोपयोगी वस्तू एकगठ्ठा एका सहायकाला दिले, त्याच्या नवीन संसाराला त्या वस्तू उपयोगी पडल्या.
अनिंद्य, हो काही वस्तू
अनिंद्य, हो काही वस्तू आणल्या आठवण म्हणून …
तुम्ही वरचेवर हे काम करत असता.. कौतुक तुमचं
^^पुढच्या पीढीसाठी काम सोपे
^^पुढच्या पीढीसाठी काम सोपे करण्यासारखे सुख दुसरे नाही.^^
माझ्या आई बद्दल इथे खूप खूप लिहिण्यासारखे आहे पण माझीच अजून मानसिक तयारी झाली नाही. तिने इतके सगळे sort करून ठेवले होते की ती गेल्यावर मी आणि वहिनीने अर्ध्या तासात सगळे आवरले. ती फारच निरपेक्ष होती आणि तिची गीता आणि छोटी जप माळ सोडून बाकी सगळे तिने आधीच दिले होते किंवा कोणाला द्यायचे हे सांगितले होते.
तिने लिहून ठेवलं होते की मला व्हेंटिलेटर किंवा तत्सम कृत्रिम प्रकारे जीवंत ठेवू नये, अग्रेसिव ट्रीटमेंट देऊ नये, शांतपणे जाऊ द्यावे. गेल्यावर फार वेळ ठेऊ नये, गावाकडे नेऊ नये, जिथे जाईन त्या ठिकाणीच अंतिम क्रिया करावी...
हे तिने मला, भावाला, वहिनीला व्हॉट्सअँप केले होते, खूप
वेळ फोन वर सांगितले होते. पपांसाठी कागदावर लिहून ठेवलं होते कारण त्यांना नीट ऐकू येत नाही.
कपडे, जास्तीची भांडी, वस्तू आधीपासून देत होती. बास करते लिहिणे....
ती एकमेव होती... अगदी एकमेव....
… इतके सगळे sort करून ठेवले
… इतके सगळे sort करून ठेवले होते की ती गेल्यावर मी आणि वहिनीने अर्ध्या तासात सगळे आवरले.….
@ धनवन्ती, प्रणम्य आहे अशी Clarity आणि Action 🙏
अनुकरणीय.
…. परत वाडा चिरेबंदी नाटक नको… 🙂
@ प्रकाश घाटपांडे, हे मिसले होते
धनवन्ती , अगदी सेम माझेच
धनवन्ती , अगदी सेम माझेच विचार! हे वाचायला कसंतरीच वाटेल पण तरी लिहीते “ माझी बॅाडी एका गावावरून दुसऱया गावाला नेऊ नका. जिथे मृत्यु झाला तिथेच विधी करा“ मला मात्र लिहीताना हसू येतंय.. माझं विल मी लिहून आणि सांगून ठेवलंय..
धनवन्ती, इतके स्वच्छ आणि
धनवन्ती, इतके स्वच्छ आणि स्पष्ट विचार आणि नुसते विचार नाही तर कृतीही.
नक्की लिही, थोडे दिवसांनी लिही. हवंतर लगेच पब्लिश नको करुस, कदाचित तुलाच छान वाटेल.
मी डिक्लटर करतो ते परत नवी भर घालण्यासाठी असं हल्ली वाटू लागलंय. सध्या फक्त पसारा आवरावा इतक्यावर आलो आहे + जे सामान आहे ते पूर्णपणे वापरावे. ज्या काही घरात वस्तू आहेत त्या सगळ्यांचा वापर झालाच पाहिजे हे फक्त बघत रहातो.
धनवन्ती, नमस्कार. /\ शांत
धनवन्ती, नमस्कार. /\ शांत आणि सहज स्वीकार दिसला यात. स्वभावात आसक्ती नव्हती म्हणून हे जमले..!
मंजूताई, खूप कौतुक. भावनांचा कल्लोळही नॉर्मलच आहे. आयुष्यातल्या स्टेजेस असतात त्या तशा-तशा स्विकारायला हव्यात, खरं आहे. आपल्या नंतर सुद्धा इतरांचं आयुष्य सोपं व्हायला हवं हा विचार पटलाच.
>>> धनवन्ती, इतके स्वच्छ आणि
>>> धनवन्ती, इतके स्वच्छ आणि स्पष्ट विचार आणि नुसते विचार नाही तर कृतीही.
हो ना, असं जमायला हवं.
धनवन्ती >> अतिशय क्लिअर,
धनवन्ती >> अतिशय क्लिअर, प्रॅक्टिकल विचार आणि ते अंमलात आणण्याची क्षमता हे दुर्मिळ आहे. तुमच्या आईंना प्रणाम.
मंजूताई, खूप कौतुक.
आवडता धागा आणि विषय.
आवडता धागा आणि विषय.
मंजूताई, खूप कौतुक.
अनिंद्य, छान. तुम्ही सतत declutter Movement चालवत असता. मी ही करतो पण मग त्यात काहीतरी add होत राहतं.
तिने इतके सगळे sort करून ठेवले होते की ती गेल्यावर मी आणि वहिनीने अर्ध्या तासात सगळे आवरले.>>>>>> धनवन्ति, दंडवत. किती clear विचार.
धनवन्ती, तुमच्या आईंना हॅट्स
धनवन्ती, तुमच्या आईंना हॅट्स ऑफ! त्या पिढीत इतकी क्लॅरिटी खूप कमी वेळा सापडते.
अनिंद्य, झाडांच्या बाबतीत मी तुमच्या मार्गावर वाटचाल करते आहे. अॅटॅचमेंट कमी करतेय. किती गुंततो आपण झाडांच्यात. अगदी मरत चाललेली असली तरी आटापिटा करतो त्यांच्यामागे. नको वाटतं आता. माझी बाल्कनीतली बाग आटोपशीर करते आहे सध्या.
@अनिंद्य, सुरवातीला माळ्यावर
@अनिंद्य, सुरवातीला माळ्यावर धूळ खात पडलेले तारेत ओवलेले पत्रांचे गठ्ठे सुटे करुन वाचत बसलो. काही काळ स्मृतीत हरवलो पण काही पत्रे नात्यांतील गुंत्याचे रहस्य उलगडवणारी होती. मग विचार केला अज्ञानात आनंद राहू द्यावा व बाकीची पत्रे न वाचता सरसकट जाळून टाकली
…मी तुमच्या मार्गावर वाटचाल
…मी तुमच्या मार्गावर वाटचाल करते आहे …
Power to you 👍
सर्वोत्तम, आवडते आणि practical ते ठेवून बाकींना अलविदा असे माझे चाललेय.
धनवंती किती क्लॅरीटी होती
धनवंती किती क्लॅरीटी होती तुमच्या आईची, अजिबात गुंतणे नाही कशात आणि कोणाला त्रास नाही. माझे बाबा तसे होते.
धनवंती आईचे व्यक्तीचित्रण करा
धनवंती आईचे व्यक्तीचित्रण करा जमल्यास. काळाच्या मानाने खूपच पुढे होत्या.
आईबद्दल भावना व्यक्त करणाऱ्या
आईबद्दल भावना व्यक्त करणाऱ्या सर्वांना धन्यवाद...
अमित, samo, नक्की प्रयत्न करेन...
पण अजूनही तिची जास्त आठवण काढली की डोळे भरतात, त्यामुळे तो मनाचा कप्पा फार खुला करत नाहीय...
वरचे सर्व प्रतिसाद बघून खूप gratitude वाटला तुम्हा सर्वांचा, _/\_
आईवर एक लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्स मध्ये. त्यांची लिंक सापडली तर देते इथे. मला समाधान हे आहे की तिला तो लेख वाचायला मिळाला होता.
मला हा लेख आणि प्रतिक्रिया
मला हा लेख आणि प्रतिक्रिया वाचून फार शांत वाटते. असे निर्मोही, साधे जगणे आणि ओझे हलके करत आस्ते निरोप घेणे जमावे असे फार वाटते.
@ पुंबा,
@ पुंबा,
…मला हा लेख आणि प्रतिक्रिया वाचून फार शांत वाटते…
हे तुमच्या high level of maturity चे लक्षण. दुःख- निराशा, काहीतरी निसटण्याची भावना न वाटता शांत वाटणे. Sign of living/ having lived a happy and non-regretful life.
Wishing you great times ahead !
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/chaturang/life-lesson-on-hobbies-attachments-an... चतुरंगमध्ये आलेला लेख ह्याच विषयावरचा
मंजूताई, थँक्यू लेख
मंजूताई, थँक्यू लेख शेयरल्याबद्दल.
रेलवे प्रवासाचा metaphor चपखल वापरला आहे लेखात. गंतव्यस्थान जसजसे जवळ येईल तसे आवरायला सुरुवात. बेस्ट.
मंजूताई आज हा लेख वाचला आणि
मंजूताई आज हा लेख वाचला आणि हाच धागा आठवला
सततच्या गृहपाठातील गमतीजमती.
सततच्या गृहपाठातील गमतीजमती.
घरातील सर्वांचे कंगवे महिन्यातून एकदा साबणपाण्यात टाकून नंतर ब्रशने deep clean करून देण्याची thankless जबाबदारी साधारण २५ वर्ष सांभाळतो आहे.
नेहेमी २-३ batches मधे हे काम करतो, यंदा एकाचवेळी केले तर सर्व मिळून एकूण ५९ कंगवे-फण्या-hair brush घरात आहेत हा साक्षात्कार झाला !! 🙈
त्यातले ९ तर आता डोक्यावर जेमतेम ४-२ केस असलेल्यांचे pocket combs. 😀
माझे एकूण ३.
कंगव्याचा एकही दात (दातच म्हणतात ना?) तुटला / छोटेसे जरी imperfections दिसले तर कंगवा बाद असे करून ११ बाद केले.
Internal Buy-in process च्या अंतर्गत प्रत्येकाला सर्वोत्तम तीन कंगवे वापरात ठेवायला दिले; ४ कोरे कंगवे house guests साठी ठेवले आणि उरलेले सर्व deep clean करून वाटून टाकले. Luckily, थोडे कुरकुरत का होईना कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केले.
जाणते-अजाणतेपणी आपण किती hoarding करतो याची जाणिव घरातल्या सर्वांनाच झाली नीट. हेतू तोच होता.
Pages