या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
उगाच डेव्हिल्स अॅडव्होकेट,
उगाच डेव्हिल्स अॅडव्होकेट, पण समजा हाच त्यांचा आनंद असेल तर?

म्हणजे मी काही बिंजवर्दी मिळालं की ते तासंतास बघायला मिळावं म्हणून बाकीच्या सगळ्या कामांत शॉर्टकट शोधून आनंदाचे काम कसं जास्त करायला मिळेल ते बघतो. पण असं आनंदाचं काम नसेलच तर?
… हाच त्यांचा आनंद असेल तर?…
… हाच त्यांचा आनंद असेल तर?…
It’s a bit personal and by extension anecdotal, पण हे वर्षानुवर्षे केले आहे. टापटीप रहाणे, स्वच्छ नेटके घर, वर्कप्लेस आवडते. अन्य कुणी केले नाही तरी त्याचासाठी स्वत: खपण्याची तयारी असते. ते करतो.
पण होते काय की “हक्काचा सफाईकामगार” म्हणून माझ्याकडून सर्वांच्या भरपूर अपेक्षा वाढतात आणि त्यांना पुरा पडण्यासाठी खूप खटपटही करावी लागते. मूड असो, नसो.
सदासर्वकाळ याला साफसफाईच करायला आवडते, करूदे त्यालाच असा अन्य (आळशी- disinterested) लोकांचा सोयिस्कर समज होतो आणि आपण इमेज टिकवण्यासाठी perpetual cleaner बनून रहातो. 😀
म्हणूनच म्हटले, it’s a trap. पूर्णवेळ होम मेकर असाल तर stronger+ thankless trap.
आणि म्हणोन … सिमरन म्हणतात तसे सुटसुटीत पसाराविहीन घर असेल तर दोन्ही पक्ष एकसाथ जिंकतात. 😜
BTW, माझेमन यांना हा मुद्दा चटकन समजलाय असे जाणवले.
.. पण असं आनंदाचं दुसरं काम
.. पण असं आनंदाचं दुसरं काम नसेलच तर?…
तर मात्र तो जीव दुर्दैवी म्हणावा 😂
अनिंद्य, तुमच्याशी पूर्ण सहमत
अनिंद्य, तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.
मुद्दलात क्लटर कमी असेल तर पसारा कमी होण्याची शक्यता फार वाढते.
…मुद्दलात क्लटर कमी असेल तर
…मुद्दलात क्लटर कमी असेल तर पसारा कमी …
अलबत ! पते की बात 👍
… घर शिफ्ट करत राहायचं किंवा कलर काम काढायचं….
खरेखुरे नाही तरी mock drill म्हणून हे नक्कीच करून बघायला हवे.
रहाते घर बदलतांना एक फार मोठी संधी असते पसारा - स्टाडा कमी करण्याची, ती वाया घालवता नये.
याबाबतीत “नंतर बघू” कधीही होत नाही; later means never होते आणि मग नवीन जागा जुन्यापेक्षा जास्त “पसारामयी” होते 🙈
BTW, एक फेमस डीक्लटरवाला बाबा आहे, त्याचा फंडा असा की समजा तुम्हाला उद्याच रहाते घर सोडून दुसरीकडे जावे लागणार आहे; तुमच्या घरापेक्षा एक बेडरूम कमी असलेल्या घरात. आणि सर्व सामान “स्वतःच उचलून” न्यायचे आहे … हं, आता करा सुरुवात packing ला. … काय सोबत नेणार, काय मागे राहू देणार?
खूप मजेमजेच्या करामती होतात ती चर्चा सुरु झाली की.
मस्त चर्चा सुरू आहे. अनिंद्य,
मस्त चर्चा.
मस्त चर्चा.
घरच्या छापील पुस्तकांच्या संग्रहातील एक पुस्तक दर तीन वर्षांनी काढून टाकण्याचा माझा शिरस्ता. यंदाचे ते पुस्तक रद्दीत न देता एका प्रिय इच्छुक माबोकराला दिले - १ फेब्रुवारीच्या पुणे गटगच्या निमित्ताने. गटगचा असाही एक फायदा !
@ हेमंतकुमार, योग्य कृती.
@ हेमंतकुमार, योग्य कृती. 👍
मी ६ छापिल पुस्तके नुकतीच एका छोट्या ग्रंथालयाला दिली. चार-पाच वर्षात ५-६ नवीन पुस्तके विकत घेतली म्हणून टोटल काउंट काही बदलला नाही.
@ अस्मिता,
@ अस्मिता,
सरडा शिरला म्हणजे येण्याचा रस्ता नि-सरडा नाही. राइट?
Sorry, पण फाको करण्याची संधी का घालवा असा विचार केला
कल्पना चांगली आहे, पण नक्कीच
कल्पना चांगली आहे, पण नक्कीच कठीण आहे. आयुष्यभर वाढवलेल्या पसार्यात गुंतलेल्या चित्तव्रुत्ती काढून घेणे सोपे नक्कीच नाहिये, पण प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. मला तरी आवडलीय ही कल्पना.
दोन वर्षांपूर्वी आई गेली.
दोन वर्षांपूर्वी आई गेली. जाण्यापूर्वी तिच्या संग्रहातली सगळी पुस्तके (जवळपास दिडेक हजार) स्थानिक वाचनालयांना देवून टाकायची इच्छा व्यक्त केली होती तिने. आणि जायच्या आधी देवून ही टाकली अगदी सहज.
आभार @ विशाल कुलकर्णी.
आभार @ विशाल कुलकर्णी.
शिर्षकावरून / वरकरणी वाटते तसे फार काही निगेटिव नाहीये या विषयात. जे जे प्रिय ते हवे तेव्हढे तोषणे-मनसोक्त वापरणे; पण संग्रह-पसारा सीमित करणे आणि योग्यवेळी / वेळोवेळी “आपल्याच हातांनी” तो कमी, वापरयोग्य, सुटसुटीत करणे एव्हढेच.
…..जायच्या आधी देवून ही टाकली अगदी सहज … ❤
उत्तम कृती. अनुकरणीय.
>>> रस्ता नि-सरडा
>>> रस्ता नि-सरडा

@ स्वाती, सरडास्वामिनीकडून
@ स्वाती, सरडास्वामिनीकडून काहीच अपडेट आले नाही म्हणून, नाहीतर पुढचा सवाल तयारच होता मनात :
तो सरडा रंगीत(न) आहे की करडा ?
सरडा रंग बदलण्यात पटाईत असतो म्हणून विचारायचे होते. Curious.
या बाफवर सरडा आला म्हणजे
या बाफवर सरडा आला म्हणजे त्याला रंगाचा पसारा नको वाटत असणार. म्हणजे तो करडाच असावा.
आले, आले. रस्ता नि-सरडा >>>
आले, आले. रस्ता नि-सरडा >>>
माझ्या आवराआवरीतली खूप मोठी बाधा आहे ती. इथे सगळ्या रंगाचेढंगांचे सरडे आहेत. हा नेमका आत शिरलाय.
करडाच आहे. डाकारान्त शब्दांनी यमक जुळवा आता.
डाकारान्त शब्दांनी यमक
माधव 😀
डाकारान्त शब्दांनी यमक 😀
BTW, सरडा तरुण आहे का ?
मला तर कधी कधी आपणच घरात अडगळ
मला तर कधी कधी आपणच घरात अडगळ झालो आहोत असा फील येतो. आयुष्याचा पसारा हा जगण्याच्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे. कमतरतेचा सूड अतिरिक्त संचयाने घेतला जातो हे मागील प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे. ते देखील समजून घेतले तरी कधी सामानाच्या गदारोळात वस्तु वेळेवर न सापडणे, विस्मृतीत गेल्या मुळे वस्तू अडगळीत पडणे व सापडेल तेव्हा निरुपयोगी अवस्थेत असणे, म्हणजे असून नसल्यासारखेच असते.
माझ्या सिमीत गरजांमुळे वाचलेला अवकाश जर अतिरिक्त संचयाने भरुन निघत असेल तर त्याचा काय उपयोग? ही तर इष्टापत्ती झाली. हाव व अतिरिक्त संचय यात फरक आहे. म्हणून हा विषय मला मानसशास्त्राशी निगडीत वाटतो. असो
सरडे को रहने दो
सरडे को रहने दो
सरडा ना हटाओ
सरडा जो हट गया तो
सामान फैल जाएगा
अल्लाह मेरी तौबा
अल्लाह मेरी तौबा
विषय मला मानसशास्त्राशी
विषय मला मानसशास्त्राशी निगडीत वाटतो,,,
तो तसा नक्कीच असावा.
पण अतिरिक्त संचयाचा फोलपणा जसजसा समजत जातो तसतसे उपलब्ध -आवडणाऱ्या सुखसुविधांचा उपभोग जास्त चांगल्याप्रकारे घेता येतो असे नाही वाटत ?
माझेमन
माझेमन 😂
@ अस्मिता तो सरडा अगदी तरुण नसला तरी किमान “थेरडा” नसावा ही अपेक्षा
तुमच्या decluttering energy ला बाधा आहे हा सरडा.
हाकलण्यासाठी त्याला तिखट मिरच्यांचा “खरडा”खाऊ घाला, तो परत येणार नाही आणि तुम्हाला आवराआवरी नीट करता येईल.
What say ?
इथे मजा मजा चालू आहे
इथे मजा मजा चालू आहे
माझेमन भारीच....
अस्मिता, हे माझे चाराणे
स्प्रिंग क्लिनिंगची मशाल हाती
गॅरेज क्लिनिंगच्या सफाई साठी
क्रिकेट उड, किरकिर करं, ग्रास हॉपर उड्या मारी.
पसाराच पसारा जिकडं तिकडं काही सुचना मला.
गं बाई बाई काही सुचना मला.
इथं पसारा च्च च्च.. तिथं पसारा च्च च्च...
इथं पसारा तिथं पसारा
मन झालं घाबरं घाबरं...घाबरं घाबरं...घाबरं घाबरं...
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
गराजमधे एक सरडा दिसला गं बाई दिसला...
अनिंद्य, सॉरी तुमचा धागा भलतीकडे नेल्याबद्दल
भारी लावणी
भारी लावणी

BTW, सरडा तरुण आहे का ? >>>>अनिंद्य
मायबोलीवर कशालाही ग्लॅमर येऊ शकतं . सरड्यावर चारोळी ,लावणी ,धन्य झाला असेल सरडा.
ऋतुराज
ऋतुराज
ऋतुराज,
ऋतुराज,
इथं पसारा च्च च्च.. तिथं पसारा च्च च्च... यातल्या “च्च-च्च” सकट तालासुरात गाऊन बघितले, लावणी झक्कास 👌
या धाग्यावर अवांतराचा दोषी मीच, तुम्ही नाही 😀
सरड्यावर चारोळी ,लावणी …
थोडी मजा हो. नाहीतर गंभीर चर्चा बोअर होईल
माबोकरांनी बराच पसारा आवरायला
माबोकरांनी बराच पसारा आवरायला घेतला असा समज झाला म्हणून इथे आले तर प्रतिभेला आवरा म्हणायची वेळ आली....
चारोळ्या,लावणी धमाल !
सरडा-नि सरडा, करडा- खरडा
तो सरडा थेरडा असेल
सरड्यावर लावणी
सरड्यावर लावणी
लेख कसा निसटला माझ्याकडून ?
लेख कसा निसटला माझ्याकडून ? बहुतेक मायबोलीवर सक्रीय नसतानाच्या काळातला आहे.
सुरूवातीच्या काही प्रतिक्रिया वाचल्या. बहुतेक सर्व विषयाला धरून आहेत. अश्विनीमामींचा प्रतिसाद आवडला. अंजली १२ यांचाही प्रतिसाद आवडला.
या लेखातला सातवा मुद्दा मला पटला. बाकीचे मुद्दे हे ठीक आहेत. म्हणजे तुम्ही आवरा आवर नाही केलीत (आणि मागे कुणी असेल तर) त्याची विल्हेवाट लावली जातेच. पण कायदेशीर गोष्टी या जिवंतपणीच केलेल्या बर्या. अजूनही मृत्यूपत्राची कन्सेप्ट आपल्याकडे तळागाळात पोहोचलेली नाही.
ओळखीतल्या काहीजणांच्या मृत्यूनंतर त्यांचे बँकेचे व्यवहार सुरळीत करून देण्यासाठी हेलपाटे मारले आहेत. नॉमिनीचं नाव लावलेलं नसतं. संयुक्त खातं नसतं. त्यासाठी नंतर मग मॅरेज सर्टिफिकेट , ते नसल्यास अॅफिडेव्हिट आणि लग्नाचे फोटोज घेऊन जा, खातं नावावर करून घ्या असे उपद्व्याप करावे लागतात. एका केस मधे तर तिथल्या स्टाफने सांगितले कि भारतियांची मानसिकता माहीत असल्याने शक्यतो बँकेत खाते पुढे नावावर केले जाते. उद्या नियम कडक झाले तर मॅरेज सर्टीफिकेट नाही, नॉमिनीचं नाव नाही, संयुक्त खातं नाही आणि मृत्यूपत्रही नाही अशा केस मधे बँक काहीच मदत करू शकणार नाही. त्यात कॉम्प्लिकेशन्स सुद्धा असतात.
याच बरोबर ऑनलाईन म्युच्युअल फंड , शेअरबाजाराच्या खात्याचे पासवर्डस, अकउंट युजर नेम हे सुद्धा कुठेतरी लिहून ते आपल्या वारसांना नीट सांगितलेले असले पाहीजे. नाहीतर ते गेलेच समजायचे.
एक शिक्षक होते. त्यांचं अकाली निधन झालं. पण त्यांनी डायरीत सर्व तपशील लिहीले होते त्यामुळं त्रास झाला नाही. इन्शुरन्स ची कागदपत्रे जवळच्यांना माहीत नसणे तर खूप कॉमन आहे. एकदा क्लेम एक्सपायर झाला होता. एजंट कोण माहिती नाही. मग त्यांच्यासोबत जाऊन गणेशखिंड रस्त्यावरच्या ब्रँच मधून पुढची सर्व प्रोसिजर केली. त्यांनी खूप सहकार्य केले. शक्यतो सहकार्य मिळतेच. पण कुणी आडदांड असला आणि नियमावर बोट ठेवले तर गेले समजायचे सगळे.
घराची कागदपत्रे आता नियमानुसार बायकोच्या नावावर करावी लागतात. पण जुने घर किंवा प्रॉपर्टी असेल तर ही कामे वेळीच करावीत.
ही कामे सर्वात महत्वाची आहेत. त्यामुळे या गोष्टीला प्राधान्य दिले पाहीजे. एका केस मधे भावाचे निधन झाल्यानंतर घरच्यांनी स्वतःहून त्याच्या बायकोचे आणि मुलींचे नाव लावले. पण प्रत्येक ठिकाणी असं होत नाही. तर एका केसमधे व्यक्ती गेल्यावर त्याच्या बायकोने मोबाईल सुद्धा बंद केला. सिम परत केलं आणि नंतर बँकेत खूप हेलपाटे मारावे लागले. अजून बायकांना बँकेचे व्यवहार करण्याची सवय नसते. खूप प्रॉब्लेम्स होतात.
वस्तूंच्या बाबतीत कायदेशीर पंचाईत होणार नाही. पर्सनल गोष्टी मृत्यूनंतर लोक स्विकारत नाहीत. काही वेळा काही गोष्टी आठवण म्हणून ठेवण्याकडे कल असतो. तरीही ज्याच्या त्याच्या निर्णयाचा आदर आहेच.
बँकेत गेले असताना एक केस अशी
बँकेत गेले असताना एक केस अशी आली की कर्त्या पुरुषाचे निधन झाले होते आणि त्याचे नॉमिनेशन आईच्या नावे होते.
यात गैर काही नाही. पण कधी कधी लग्नापूर्वीचे नॉमिनेशन बदलायचे राहून जाते. व नॉमिनीचे निधन झाले असल्यास कोर्टाकडून ऑर्डर आणावी लागते. अर्थातच वेळ जातो आणि पैश्यांची तातडीची गरज असेल तर प्रश्न निर्माण होतात.
या केसमध्ये त्या माणसाची वृद्ध आई गावात राहत होती. तिचे कुठल्याही बँकेत खाते नव्हते. पॅन कार्डही नव्हते. त्यामुळे नवीन खाते उघडता येत नव्हते. त्या आईचा जन्मदाखला घेऊन त्याचे भाऊ बँकेत तिला पैसे देण्याची विनवणी करत होती पण अर्थातच बँक कर्मचारी काही करू शकत नव्हते. तर आपल्या नॉमिनीचे महत्वाचे कागदपत्र व्यवस्थित असणे आणि परिस्थितीनुसार नॉमिनी बदलणे हे ही महत्वाचे आहे.
@ रानभुली, you have grocery
@ रानभुली,
you have grocery bags and सरडा to thank… त्यांच्यामुळे हा धागा चर्चेत आला 😀
थोडीफार गंमत, टवाळक्या, not-so-glum प्रतिसाद सोडा पण एकूण सर्वांनीच खूप चांगले इनपुट्स दिले आहेत प्रतिसादांतून, अवश्य वाचा.
स्त्रियांना आर्थिक व्यवहाराची फारशी सवय नसते हे तुमचे निरीक्षण दुर्दैवाने खरे आहे. शहरी, उत्तम शिकलेल्या, स्वत: चांगले अर्थार्जन करणाऱ्या हुशार महिलासुद्धा समहाऊ याबद्दल गाफ़िल-उदासीन असतात आणि सर्व मोठे आर्थिक निर्णय घरातल्या पुरुषांनीच घ्यावे याकडे त्यांचा कल असतो.
आता चित्र थोडे बदलते आहे पण पुरेसे बदललेले नाही. “कर्ती” स्त्री हा कंसेप्ट जास्त रुळायला हवा आहे. After all, it’s about 50% of world population.
Pages