Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही हा विचार आवडला आहे !
पुस्तकांच्या बाबतीत मी हा प्रकार केव्हाच चालू केलेला आहे. त्यावर इथे सविस्तर लिहिले होते:
https://www.maayboli.com/node/72314

इतरही बाबतीत हळूहळू सुरुवात केलेली आहे

लेख आवडला. मी पण सुरूवात केलीये .... नवीन भर
तर मुळीच घालत नाही. कपडे वगळता. पण दोन माणसं आम्ही आणिक दोन सामावतील एवढंच सामान ठेवलंय. ...

कमाल आहे माझ्या सासू (हयात नाही ) सासरे (हयात आहेत) यांनी हे फार पूर्वीच करून टाकले। माझ्या सासूने मला न विचारता व सासर्यांनी मला विचारून त्यांच्याकडील बरीच भांडी-कुंडी, फर्निचर, नवीन, जास्त न वापरलेले कपडेलत्ते, मोठाल्या लगेज कॅरी करणाऱ्या ब्यागा व इतर जीवनावश्यक वस्तू आपल्या नातेवाईकांमध्ये वाटून टाकल्या। माझ्या नवऱ्याला या गोष्टींमध्ये जराही इंटरेस्ट नाही व मला जेव्हा विचारले तेव्हा मी सुद्धा काहीच हरकत घेतली नाही। या अश्या गोष्टीला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात ! असे नाव असेल असे न्हवते माहित।

पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. >>>
एक तत्व म्हणून मान्य होण्याजोगा विचार आहे. पण खरी मेख
अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. >>> मधल्या 'एका विशिष्ट वयानंतर' इथे आहे.

पसारा आवरायला सुरुवात कधी करायची !

ह्याचा विचार करणे सुद्धा कठिण वाटते. कारणे वेगवेगळी आहेत. कित्येक गोष्टींशी भावना निगडीत तर असतातच, त्यामुळे वस्तु जरी वापरात नसतील तरी देववत नाहीत. जिथे भावना नसतात त्या वस्तु सहज दिल्या जातात. पण त्याहीपेक्षा कठिण आहे स्वतःच्या मृत्युचा विचार करणे. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेला नाही. तरीही मी अगदी पुढच्या क्षणीही जाऊ शकते हा विचार खुप त्रासदायक आहे. मला अजुन खुप जगायचे आहे, अजुन वेळ आलेली नाही हेच प्रत्येकजण म्हणत असेल..

…..पण त्याहीपेक्षा कठिण आहे स्वतःच्या मृत्युचा विचार करणे. …

अ ग दी

तोच विचार नकोसा वाटतो ना Happy पण प्रयत्न केले तर living lightweight जमवता येईल असे वाटतेय.

छान लिहिलत
हळूहळू आवराआवर करावीत लागते. वस्तूच काय, नाती, माणसं यांचीही.
मी सुरुवात झाडांपासून केलीय. जड गेलच पण जमलं.
कपडे, वस्तू यांचा सोस कमीच आहे, सो ते फार अवघड नाही. पुस्तकांवर फार जीव आहे. ती नाही सोडता यायची. पण एखाद्या लायब्ररीचं नाव लिहून ठेवेन. मग झालं Happy
बाकी माणसं अन नाती हा गुंता फार अवघड आहे!

काय वेगळाच विचार आहे नाही. मस्त विषयावर लिहीता तुम्ही अनिंद्य. हे असे काही माहीत नव्हते. माझी जंक ज्वेलरी मी अज्जिबात देणार नाही बाकी काहीही देइन ;). बाय द वे किंडलवरच्या सुंदर सुंदर पुस्तकांचे करायचे काय?

त्या काय सामान काढत आहेत त्याची यादी द्या . इथे बरेच जाईल. त्यांना उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. >> ही प्रोसेस जास्त चांगली आहे अवघ ड आहे पण ऑर्गॅनिक आहे. भारतात आजकाल प्रॉपर्टी हस्तांतरणा साठी ज्येना लोकांसाठी वर्क्शॉप घेतले जातात. वकील व ट्रेन्ड लोक घेतात. मी असे एक वर्क्शॉप अटेंड केले आहे. आपापल्या परिस्थितीअनुसार असेल ती प्रॉपर्टी पहिले देउन टाकावी. त्याचे पेपर्वर्क शक्य तितके सोपे मुलांसाठी करुन द्यावे अर्थात मुले पण आजकाल पन्नाशीची अस्तात त्यामुळे काय ते बघा.

रिक्त हस्ताने पण भरल्या मनाने मृत्यू ला सामोरे जाता यावे ह्यासाठी त्यांना शुभेच्छा.

इच्छा असल्यास सेवा भावी संस्थांना देणग्या देता येतील.

सर्व इतर वैयक्तिक गोष्टिंचे वर्गिकरण करुन रद्दी / फर्निचर नेणार्‍या माणसास बोलवल्यास अर्ध्या दिवसाचे काम आहे.
अनाव श्यक फर्निचर असेच एका दिवसात उडवता येते. कपडे तर बॅगा पिशवीत भरले व बाहेर ठेवले की सोसायटीचा गार्बेज स्टाफ घेउन जातो.

न्युज लाँड्री किंवा तत्सम साइट वर क्राउड फंडिं ग प्रॉजेक्ट वर्गणी असतात ते भरू शकतात. परदेशातील मुलांना भारतीय चिल्लर ची गरज नसते अशी सुखद परिस्थिती असल्यास.

सुखांत साइट वर आपल्या फ्युनरलची नोंद करुन आगावु पैसे पण भरता येतात. परदेशस्थ मुलांना वेळेत येणे न जमल्यास त्रास नको त्यांना.
https://antimsanskar.co/default.html

वापरलेल्या गोष्टी घ्याय्च्या नाहीत कारण त्याबरोबर त्या व्यक्तीचे गुणधर्म येतात असे मला वाट्ते व ते मला नको असते. म्हणून मी अश्या व्यक्तीचे काही घेणार नाही. आजकाल सोसासोसाने तांबे पितळीच्या जुन्या वस्तू घ्यायचे फॅड आहे. त्याने घरातील अडगळ वाढते. किचन मध्ये अगदी कमी सामान ठेवावे.

इलेक्ट्रोनिक सामान पण रद्दीवाला नेतो.

पुण्यात आजकाल घरातले देव ही घेउन जाणार्‍या व्यवस्था आहेत.

त्यांनी कमी केलेल्या पसार्‍याचे बिफोर आफ्टर फोटो टाका. म्हणजे जनतेला कल्पना येइल.

शी शुड हॅव डन धिस लाँग बॅक दो अँड मुव्ह्ड टु अ नर्सिन्ग होम. जीवनात मरेपरेन्त हवे अशी एकच गोष्ट आहे वाय फाय.

शी शुड हॅव डन धिस लाँग बॅक दो अँड मुव्ह्ड टु अ नर्सिन्ग होम....

Her life her choice.

मरेपरेन्त हवे अशी एकच गोष्ट आहे वाय फाय....
True that, ha ha !

डॉक्टर कुमार, तुमची पुस्तकांची कथा छान आहे. आपण पुस्तकांच्या प्रेमात वगैरे असतो, पण पुस्तक वाचून झाले की परत वाचण्यासाठी त्याचा नंबर अनेक वर्षांनी येतो. मोठा संग्रह असला तर आपण पुस्तक घरी आहे हेही विसरून जातो अनेकदा. त्यामुळे Owning books is different than reading and enjoying the books हे मी माझ्यापुरते नीटच समजून घेतलेले आहे Happy

अगदीच पटाण्याजोगं. त्याला असलं काही नाव असेल असं वाट्लं नव्हतं. वृद्धांचे पालकत्त्व नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे. तिथे हा विषय वारंवार येत असतो.
यातला एक फ्लॉ मला लक्षात आलाय. अशी क्लिनिंग करणारी व्यक्ती कुणा जिवलगाला तुला अमुक तमुक देऊ का विचारते. जिवलगाला त्या वस्तूचा उपयोग असतोच असं नाही. पण नाही कसं म्हणायचं,आपल्या कडे आठवण म्हणून ती घेतली जाते आणि मग तिथल्या अडगळीत भर पडते.

... पण जिवलगाला नाही कसं म्हणायचं.....

याला उपाय आहे भरत, आपल्या जीवलगांशी 'खरे' बोलावे. बाकी जगात तर मुखवटे असतातच सगळीकडे. काही लोकं अशी नक्कीच जोडावी ज्यांच्याशी मनातले, खरेखुरे बोलता यावे. समोरचा जज करणार नाही असा विश्वास वाटण्याइतपत मोकळेपणा असल्याशिवाय 'जिवलग' तरी कसे म्हणावे त्यांना ?

Happy अवघड आहे!
कधी सुरु करायचे हीच खरी मेख आहे.
आणि एक....
घरी नवरा, मुलगा, सासूबाई असताना.......काय भरल्या संसारात अवदसा आठवली सामान काढून टाकायची.!! ..असा वाद होण्याचीच शक्यता वाटते मला तर.
थोडक्यात म्हणजे...सगळ्या स्टेक होल्डर्स ची परवानगी नको का?

सुरुवात कधी करावी असा मुद्दा आलाय वर. खूप वय झाल्यानंतर किंवा एकाच झटक्यात करण्याचे काम नाही वाटत हे. स्टेप- बाय-स्टेप करत थोडे थोडे जमेल असे वाटते.

महत्वाची कामे अपूर्ण न ठेवणे एव्हढे जमले तरी खूप. याचे एक उदाहरण बघितले, ते लक्षात राहिले माझ्या :-

भारतीय शेयर मार्केटचे 'बिगबुल' राकेश झुनझुनवाला यावर्षी १४ ऑगस्टला गेले. रविवारी पहाटे ! वय ६२. त्यापूर्वी काही दिवस ते आजारी होते तरी स्वतःच्या नवीन 'आकाशा एयर' विमानसेवेच्या उदघाटनाला हजर होते, रोज काम करत होते. $ ५ बिलियन एव्हढ्या संपत्तीचा हुशार मालक मागे व्यवसाय-वारसांची सर्व सोय नीट लावून जाणार हे साहजिकच.

भारतीय शेयरबाजारात T +2 म्हणजे केलेल्या सौद्याच्या दोन दिवसात position square off (पैसे-शेयर यांची घेवाण देवाण पूर्ण करण्याचा) चा नियम आहे. झुनझुनवालांनी त्या गुरुवारी केलेल्या सौद्यांचे सर्व व्यवहार शुक्रवारीच पूर्ण केलेले होते. रविवारी ते गेले तेंव्हा त्यांच्या अकाउंटला एकही अपूर्ण सौदा नव्हता !!!!!!

असे सर्व आवरून ठेवणे माझ्यासारख्या सामान्यांना कधी जमायचे ...

जुने काही दागिने असल्यास नक्की फोटो टाका. ट्रेडिशनल पीसेस चे फोटो बघायला छान वाट्ते. ती दागिना शॉर्ट फिल्म एक आहे. त्यातही म्हातारी आजे सासू घे घे करते पण नातसुनेला काहीही नको अस्ते. पिढी नुसार आवडी बदलतात. आय अँम रिअली क्युरीअस टु सी व्हॉट शी वॉट्स टु गिव्ह अप. माझ्या साबांनी ८९ वयाच्या होउन वारल्या सर्व दागिने वस्तु मुलीस देउन टाकल्या होत्या. नातीच्या लग्नात कामी आल्या.

आजकाल ज्येना ंचे वादि पण फार उत्साहाने करतात तेव्हा नकोतेवढ्या गिफ्ट जमा होतात ज्याची त्यांना गरज नसते. दहा बारा शाली, मग त्याचे बनवलेले स्वेटर शोपीस गणपती लामण दिवे. भावुक पत्रे वगैरे.

असे सर्व आवरून ठेवणे माझ्यासारख्या सामान्यांना कधी जमायचे ... >>>> अपरिग्रह !

छान लिहिलंय.
जमवलं पाहिजे असं.
८० तर पण हव्यास संपत नाही अशी परिस्थिती असेल‌तर हे होणं नाही.

@ अमा,

इथे फोटो वगैरे मला योग्य वाटत नाही, मी स्वतः सुचवणार नाही. हा प्रवास ज्यांचा त्यांनी करावा, मदत मागितल्यास जरूर करीन.

.... जेष्ठांना आलेल्या भेटी आणि त्याची विल्हेवाट.....

एक अनुभव :-

पिताश्रींच्या ७५ व्या वाढदिवसाला मोठाच मित्रपरिवार जमला होता. सर्वांना भेटवस्तू आणू नका असे बजावले होते, तरी आल्याच. फुले / बुके सुकेपर्यंत घरात सजली, मग कंपोस्ट. चॉकलेट्स वगैरे सगळ्यांनी खाऊन संपली. फोटो छापलेले मग्स छोटे succulent plants लावण्यासाठी मी वापरले. १-२ वापरासाठी ठेवून बाकी शाली-फेटे त्यांनी वाटून टाकले आहेत. पुस्तके वाचून झाली की वाचनालयाला दिली. पेन वगैरे विद्यार्थ्यांना. चेसबोर्ड, ते ताबडतोब खेळायला कामी आले. भावुक पत्रे ठेवलेली आहेत. त्यांना सगळ्यात जास्त आवडलेले गिफ्ट म्हणजे आमची 'क्रोएशियाची यात्रा', त्याबद्दल मी लिहिले आहे इथे Happy

कळत नकळत हे माझ्या आईने सुरू केलंय हळूहळू. घरातली बरीचशी पुस्तकं नगरवाचनालयाला दान केली. न लागणारी भांडीपण ओळखीच्यांना विचारून देते, हवी ती ठेवून पसारा आवरते. दागिने आम्हाला देऊन झाले. बाबांचे कपडे देऊन झाले. बाबांच्या न लागणार्‍या वस्तू मार्गी लावून झाल्या. त्यांची दुचाकी योग्य व्यक्तीला योग्य कामासाठी अशीच दिली. स्क्रू ड्रायवर, छोट्या सिमेंट थाप्या वगैरे हौशी सुतारकाम-गवंडीकामाचं सामान असलेली पेटी ताईने नेली. बँकेचे व्यवहार बरेचसे सॉर्टेड आहेत आता. साड्या हव्या त्या घेऊन जा अशी आम्हा मुलींना, भाच्यांना, भाचेसुनांना वगैरे कायमची ऑर्डर आहे.
बाबांच्या नंतर हे तिला हे फार सोपं नाही या जाणीवेने आम्हालाच वईट वाटतं.

असे सर्व आवरून ठेवणे माझ्यासारख्या सामान्यांना कधी जमायचे ... >>>> अपरिग्रह !>>>>+१
माझ्या एका बहिणीचे सासरे मागच्या वर्षी गेले वय वर्षे १००.६
मुलाकडे राहत होते . चार धोतर जोडी, शर्ट व अंतर्वस्त्रे , जुजबी आयुर्वेदिक औषधे, पेटी,बासरी वै. एवढेच होते. काही आवराआवरी करावी लागली नाही. पूर्ण आयुष्यात एकदाही हाॅस्पिटलाझेशन नाही. पिकलेली पाने अलगद गळून पडावं तसं घरीच शांतपणे मृत्यू आला. त्यांचा आदर्श ठेवून जगायचा प्रयत्न करतेय .

डेथ क्लीनिन्ग म्हणजे वस्तुं मधल्या भावना काढून घेणे ते वरील केस मध्ये झालेले दिसत नाही. संपली उत्सुकता. जान्देव बडी अम्न्मा क्या तोबी रखती होगी.

<<<लेख केस बद्दल नाही, कन्सेप्ट बद्दल आहे. >>>
सहमत..
वरील बहुतांश प्रतिसाद सुद्धा विषयाला अनुसरून आहेत.

खरोखर विचार करून ठेवून त्याप्रमाणे सुरुवात करावी अशीच कन्सेप्ट आहे. माझ्या आईने हे अनुसरले होते. नंतर सविस्तर लिहीते यावर.
उत्तम आणि उपयुक्त विषय अनिंद्य.

@ मंजूताई,

... नवीन भर मुळीच घालत नाही. ... .. अति उत्तम !!

@ हर्पेन,
.
..अपरिग्रह...

माझ्यासारख्या सुखलोलुप लोकांसाठी दोन्ही कठीण टार्गेट्स आहेत. संचय थोडा कमी करण्याचा एक मार्ग शोधला आहे. कितीही मोह झाला तरी खूपच आवडल्याशिवाय कुठलीही नवीन वस्तू विकत न घेणे. याला मी 'WOW फीलिंग येणे' असे म्हणतो. पाहून-पारखून WOW फीलिंग आले तरच, नाहीतर स्वतःसाठी काही विकत घेत नाही.

तसेच स्वतःकडे असलेल्या वस्तूंपैकी 'सर्वोत्तम' तेच वापरणे. १२ जॅकेट्स असतील तर त्यातले सर्वोत्तम ४ ठेवून उरलेले इतरांना असे करण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

यश कमीच आहे, पण सुरुवात तरी झाली याचा आनंद आहे.

Pages