कशाले काय म्हनूं नही ?

Submitted by अनिंद्य on 27 February, 2026 - 07:28

पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…

धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.

आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.

वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.

# तुम्ही असे करु शकतात

- तुम्ही असे करू शकता.

# तो मला घरी जाउनच देत नाही

- तो मला घरी जाऊच देत नाही

# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?

जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे

# माझा तसा असा उद्देश्य नव्हता

- माझा तसा उद्देश नव्हता

उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन

उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण

# मी त्यांना कायच म्हणत नाही

- मी त्यांना “काही”च बोलत नाही

तसेच

# तो बाहेरचं कायच खात नाही

- तो बाहेरचं काहीच खात नाही

# मी तिकडेच जातीय.

- मी तिकडेच जात आहे.

किंवा

सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.

# तुम्ही असे का करतात ते मला सांगा

- तुम्हीं असे का करता ते मला सांगा

# परवाच त्यांच्याशी भेट झाली

- परवाच त्यांची भेट झाली

इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.

# फोन नंबर देताल का त्यांचा ?

- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?

# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.

- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.

फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :

“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.

# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?

- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?

दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.

# कथेचा मतितार्थ असा की …

कथेचा मथितार्थ असा की …

( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)

ते “मतित” ला मातीत घाला रे..

# सध्या कामात व्यस्त आहे.

- सध्या कामात व्यग्र आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.

# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.

- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.

# माझ्या सोबत लग्न करशील का ?

- माझ्याशी लग्न करशील का ?

# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो

- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो

# तिथे मोठी सभा होती आहे

- तिथे मोठी सभा होते आहे.

# सर्वांचे धन्यवाद

- सर्वांना धन्यवाद

# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)

- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.

# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)

- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)

# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.

उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात

या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.

परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.

# जेवण चविष्ठ होते

- जेवण चविष्ट होते

# पुन्हा एकदा सांगती आहे

- पुन्हा एकदा सांगते आहे

# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये

- मला ते आवडतेय / मी सांगते.

# भेट म्हणून सोन्याची चैन दिली

- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.

चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.

# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.

- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.

हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.

# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे

- सणानिमित्त सुट्टी आहे

# ते आता आमचे शेजारी “बनणार”

- ते आता आमचे शेजारी होणार.

# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?

- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?

# मी तुमचे पुस्तक विकत घेईल

- मी तुमचे पुस्तक विकत घेईन

# यासाठी एक योजना राबवली जातीय

- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.

# कुठे निघालीस आणि ?

- कुठे निघालीस ?

# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.

- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.

दुसरा प्रयोग :

बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.

# लेख मुद्देसूत आहे

- लेख मुद्देसूद आहे

# मऊसूद कणिक

- मऊसूत कणिक

# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला

- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.

# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू

- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू

# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?

- सुरूए ? सिरीयसली ?

# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो

- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.

# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला

- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली

(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)

# तो कोणे माहित नाही

- तो कोण आहे माहित नाही

# उत्कृष्ठ चव आहे

- उत्कृष्ट चव आहे

कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)

बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?

रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.

मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.

तर मंडळी,

  • वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
  • तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
  • आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
  • तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
  • तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
  • शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.

    Disclaimers :

    १} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.

    २} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.

    ३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.

    अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.

    आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकु, इथे न्युमरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने लोक आपल्या नावाचं स्पेलिंग बदलतात.
ही घ्या AI ने सांगितलेली उदाहरणं Rajkummar Rao , Hrithik Roshan , Ayushmann Khurrana

राष्ट्राध्यक्ष......
राष्ट्रपती.... हा अजूनही बर्याच प्रमाणात प्रचलित आहे >>> काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी मराठी पेपर्स मधे "अध्यक्ष" व "राष्ट्रपती" हे त्या त्या देशातील व्यवस्थेप्रमाणे लिहीत. अमेरिकेचा अध्यक्ष व भारताचा राष्ट्रपती. याबद्दल मी आपल्या नागरिकशास्त्रात वाचल्याचे लक्षात नाही. पण इंगजीत हेड ऑफ स्टेट व हेड ऑफ गव्हर्नमेण्ट असे दोन प्रकार वाचले आहेत. अमेरिकेत हे दोन्ही एकाच पदात आहे - तेथे अध्यक्ष. भारतात (व इंग्लंड मधे) पंतप्रधान हा निवडून आलेला प्रमुख (हेड ऑफ गव्हर्नमेण्ट) व राष्ट्रपती (हेड ऑफ स्टेट) - इंग्लंड मधे राजा/राणी - हा काही औपचारिक अधिकार असलेला पण प्रत्यक्षात देशाचा प्रमुख नसलेला - असतो. इंग्रजीत "सेरेमोनियल" असे विशेषण कायम वाचले आहे.

राज्यघटना- संविधान बद्दल स्वातीशी सहमत. पूर्वी नुसता "घटना" असा सोपा शब्द प्रचलित होता. त्याचे संविधान कधी झाले माहीत नाही.

बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
बोलताना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहिताना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?

कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगाऊ दिलगिरी + माफीची विनंती.

आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषंगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतीक्षेत

संविधान, प्रधानमंत्री, वगैरे शब्द आले तर एकवेळ भाषा समृद्ध होत आहे म्हणून स्वीकारता येइल.
हरकत, अंदाज, हैराण वगैरे मराठीत असणारे शब्द अगदी वेगळ्या अर्थाने घुसतात ते पहावत नाही.

हा 'आमचा तो धूर, तुमचे ते प्रदुषण!' प्रकारचा विरोध झाला. हैराण आणि अंदाजला वेगळे अर्थ प्राप्त झाल्याने भाषा समृद्ध का होत नाही? पहिले अर्थ आहेतच, नव्या प्राप्त झालेल्या अर्थांचे मूळ शब्द ही आहेतच. भरीस एका शब्दाला दोन भिन्न अर्थ प्राप्त झाल्याने आम्हा फाकोकरांना नवी पर्वणी मिळते. आणखी मजा येते.
नवे शब्द हे भाषेच्या भिंतीवर मारत रहावे, तुम्ही नाही तर लोक मारतातच. जे चिकटतील ते चिकटले. बाकी गळुन जातील. हिंदेचे आक्रमण आहे तर आहे. फारसी, उर्दचे न्हवते का? त्यातले शब्द आता का वापरता? तेव्हा ते शब्द (त्यातले काही शब्द) कशाला तरी रिप्लेस करुन आलेच आहेत ना? तुमच्या दॄष्टीने अशुद्ध भाषा तुमच्या कानावर येते आहे, म्हणजे ती वापरात आहे, लोक वापरत आहेत. शुद्ध शुद्ध करुन कोणी ऐकणार नाही. हो! हे शब्द आळशीपणामुळे आले असतील, अंधानुकरणाने आले असतील, मराठी सिरियल मुळे आले असतील, भष्ट नक्कल म्हणून आले असतील. शब्दांना मान द्या. शब्दांचा मान ठेवा. तुम्ही वापरू नका, पण उंटवरील शहाणे का बनता?

अमितव, 'जो जे वांछील तो ते करो' हाच दृष्टिकोन असेल तर ज्यांना हैराण, अंदाज, साडी तर बनतेच ना, या सगळ्याला विरोध करायचा आहे तर तोही करू द्या. त्यांनी गप्प बसावं, ही अपेक्षा तरी का ठेवता?

चांगली चर्चा. आता आमच्या जुन्या वाडामालकांच्या मुलाच्या लग्नात घडलेल्या किश्श्याने चर्चेचा समारोप करुयात. आम्ही तेव्हा मुंजाबाच्या बोळात रहात होतो. वाडामालकांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेलो. थाटाचे लग्न होते. शेकडो लोक आले होते. नवऱ्या मुलीवर लोकांची नजर ठरत नव्हती. 'या ध्यानाला एवढी हॉट बायको कशी मिळाली रे?' माझ्या पुढच्या रांगेत बसलेल्याने दबक्या आवाजात शेजाऱ्याला विचारले. उत्तरादाखल त्याने वरपित्याकडे बोट दाखवले. मालकांच्या दोन्ही हातांत मिळून पाचसहा अंगठ्या, कानात हिऱ्याची भिकबाळी. 'बुधवारात तीन घरं, पेंटिंगसहित बरेच व्यवसाय. शिवाय सासूची कटकट नाही' त्याने माहिती पुरवली. मालक मात्र चिंतेने येरझाऱ्या घालत होते. कारण मुलगा परिक्षेचा रिझल्ट बघून मंडपात येतो म्हणाला होता, त्याचा अजून पत्ता नव्हता. लोक वाट पाहून थकले. मुहुर्ताची वेळ केव्हाच टळून गेली होती. शेवटी तिथेच असलेल्या एका वीजय नावाच्या होतकरू मुलाशी वधूचे लग्न लावून दिल्या गेले. मालक तरातरा घरी निघून गेले. बघतात तर मुलगा घरातच बसलेला.
'बाबा हे घ्या पेढे. प्राज्ञ परिक्षेत पास झालो. शुद्धलेखन विभागात शत प्रतिशत मिळाले' मुलाने सांगितले.
'शिंदळीच्या, हॉलवर आला का नाहीस ते सांग आधी' पेढ्यांचा बॉक्स फेकून देत आपल्या कैलासवासी कुटुंबाचे अकारण चारित्र्यहनन करीत थोरल्या गटण्यांनी विचारले.
'बाबा, मी कार्यालयात आलो होतो ना! पण तिथे 'सखाराम WEDS पुजा' असा बोर्ड लावला होता. माझ्या बायकोचे नाव पूजा आहे म्हणाला होतात ना? मला वाटले दुसऱ्या कोणाचेतरी असेल लग्न. म्हणून परत आलो'

"प्रा. माळीचा हॉट अंदाज, पाहून व्हाल हैराण!'

ही लिंक पाहिली, आजूबाजूला कुणी नाही याची खात्री केली आणी हळून लिंक उघडली तर इचलकरंजीचे प्राध्यापक जांबुवंत माळी यांनी लिहिलेला आगामी विधानसभा निवडणुकीचा अंदाज निघाला.

नाही नाही. गप्प वगैरे बसायची अपेक्षा बिलकुल नाही. प्रश्न विचारले आहेत फक्त. जो जे वांछिल सगळ्यांना लागू आहेच.

मोरोबा प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. विकांताला जमल्यास त्यावर लिहीन अथवा नाहीही.

आता एवढे सगळे हिंदी शब्द मराठीत घेत आहेत तर चेष्टा हा शब्द घेऊन टाकावा आणि "भाषा समृद्धीची चेष्टा, हीच सेवा महाराष्ट्रा" असे ब्रीदवाक्य ठेवावे. शोभून दिसेल.

मानव Lol

मानव Rofl

मोरोबा Lol
मस्त ( रचित!) किस्सा .
फक्त तेव्हढे, वीजय चे विजय करणार का? Happy

उत्तम धागा आणि उत्तम चर्चा...
यातल्या बऱ्याच चुका मी सुद्धा केल्या आहेत त्यामुळे यापुढे नक्कीच त्या टाळता येतील. हिंदी, इंग्रजी, फारसी या भाषांनी मराठीवर पूर्वीपासून आक्रमणे केलीत, आजसुद्धा करताहेत. इतर भाषांमधले शब्द सामावून घेतले तर भाषा समृद्ध होते असं म्हणतात पण मला हे काही पूर्णपणे मान्य नाही. एखाद्या भाषेत एखादा रूढ शब्द नसेल तर एक वेळ चालेल. माझं यावर एकाशी कडाक्याचं भांडण झालंय.
लिहितांना, बोलतांना मुद्दाम दुसऱ्या भाषेतला शब्द वापरला तरी ठीक पण तो अस्थानी वाटायला नको. कोटी ऐवजी करोड वापरला तर कानाला लगेच बोचतो. मराठी वाहिनी वर "सबळ पुरावा" ऐवजी "ठोस पुरावा" असं ऐकलं की बोलणाऱ्यालाच ठोसा द्यायची प्रबळ इच्छा होते. असो. असे कानाला खटकणारे अनेक शब्द आजकाल सतत कानावर पडले की वाटतं हवेच्या "AQI" सारखाच "भागुनि - भाषा गुणवत्ता निर्देशांक" रोज रात्री त्याच वाहिनीवर प्रसारित करावा.
सावरकरांचं "भाषाशुद्धी" हे पुस्तक वाचून तर डोळे आणखीनच उघडले. मराठीत असे शब्द असूनही आपण वापरत का नाही याची खरोखर खंत वाटली. मराठी भाषेत नसलेले शब्द तयार करून त्यांची भर घालणाऱ्या सावरकरांची भूमिका फार मोलाची आहे. अंदाज (अटकळ), जबाबदारी (कर्तव्य), अहवाल (इतिवृत्त), कुस्ती (मल्लयुद्ध), किंमत (मूल्य) असे अनेक हिंदी फार्सी शब्द आपण सहज वापरतो त्याऐवजी मराठी शब्द कटाक्षानं वापरले पाहिजेत. इस्पितळ (रुग्णालय), कचेरी (कार्यालय) असे आणि अनेक शब्द सावरकरांनी मराठीला अर्पण केलेत.
इतर भाषांचं आक्रमण केवळ भाषेवर नाही तर अस्मितेवरही आहे. मुंबईला अजूनही बॉम्बे किंवा बंबई म्हणणे, पुणे ला पूना, शिव ला सायन म्हणणे वगैरे... एकदा मुंबईच्या "बेस्ट" मध्ये "एक वांद्रे द्या" असं म्हटल्यावर कंडक्टर आणि आजुबाजूच्या आठदहा वांद्रांनी माझ्याकडे पाहून असं काही तोंड केलं की मला परत एकदा "एक बँड्रा" असं म्हणावं लागलं. लोकमान्य टिळकांना "लोकमान्य तिलक" म्हटल्यावर माझ्या तळपायाची आग, मस्तकावर जिथे "तिलक" लावतात त्याहीपेक्षा वर जाते. अशी उदाहरणं लिहित बसलो तर एक दीर्घ लेख बरबटून काढता येईल.
मराठी प्रेक्षकाला गळाला लावायला बॉलिवूड चित्रपटात उगाच चुकीची मराठी टाकायची पद्धत सुरू झालीय. पण अमराठी आडनाव असलेला सिंघम जेव्हा " आली रे आली...आता माझी बारी आली" असं किंचाळतो तेव्हा सगळ्यात जास्त माझीच सटकलेली असते...

माझ्यावर हसू नको>>> मला हसू नको.
एखाद्यावर आरोप 'लावणे' >>> आरोप 'करणे'.
तुझ्या'वर' हे शोभून दिसेल >>>> 'तुला' हे शोभून दिसेल.
भाता'सोबत' हा पदार्थ "जाईल" >>> भाता'बरोबर' हा पदार्थ छान लागेल.
तुम्ही "येणार आहे" का? (करणार आहे का, खाणार आहे का... वगैरे) >>> तुम्ही "येणार आहात" का?

हे चटकन आठवले. बाकी लेख अगदीच पटला.

कर्तव्य, इतिवृत्त , मूल्य, रुग्णालय , कार्यालय हे शब्द संस्कृत आहेत किंवा संस्कृत शब्द वापरून बनवले आहेत. संस्कृत शब्द चालतात तर फारसी उर्दू का नको? उलट पब्लिकला कोणते शब्द जवळचे आणि वापरायला सोपे होतील?

सावरकरांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन शासकीय मराठीत कायच्या काय अगडबंब शब्द भरलेत.
बाळ सामंतांचा लेख आठवला. अंडर सेक्रेटरीसाठी अवर सचिव .

@ किल्लेदार

"AQI" सारखाच "भागुनि - भाषा गुणवत्ता निर्देशांक"…. धमाल कल्पना.

@ प्रज्ञा९,

होय. ही उदाहरणे तर पायलीला पन्नास Happy दुरुस्ती सुचवली(च) तर राग येतो लोकांना.

@ भरत,

“शासकीय मराठी” म्हणजे सामान्य माणसाला मराठी भाषेची तीव्र नावड निर्माण व्हावी असा trap वाटतो कधीकधी. अधोहस्ताक्षरीत काय, उपर्र्लेखित (नीट टंकता आला नाही) काय, अवसानालयात जाणे काय, निर्वेधीकरण काय, मूल्यवर्धन, अनुमापन, ज्याअर्थी-त्याअर्थी काय…. डोकं गरगरतं ती भाषा वाचून. फार क्लिष्ट. बरं, असे भारी शब्द वापरले तरी व्याकरणाच्या बेसिक चुका भरपूर असतात.

पण एक मात्र आहे, काही इंग्रजी शब्दांना फार चपखल मराठी शब्द शासकीय मराठीवाले वापरतात. उदा. Presentation ला सादरीकरण.

मुळात मराठीच संस्कृतोद्भव असल्यामुळे संस्कृत वापरून केलेले शब्द अस्थानी वाटत नाहीत. आपल्या भाषेत क्लिष्ट किंवा फार मोठा शब्द असेल तिथे दुसऱ्या भाषेतला एखादा सोपा शब्द वापरायला काहीच हरकत नाही. बरेच लोक उर्दूला वजनदार भाषा म्हणून मान देतात. फर्जंद, वालिद, दगाबाज असे शब्द ऐकायला चांगले तर पुत्र, पिता, कपटी हे सोपे शब्द पुळचट असंही काही लोकांना वाटतं. सावरकरांनी दिलेले शब्द अगडबंब वाटतील कदाचित पण प्रचलित झाले तर तेवढे मोठे काही वाटणार नाहीत.

<मुळात मराठीच संस्कृतोद्भव असल्यामुळे > एवढीही नाही. महाराष्ट्री आणि प्राकृत यांचा हा पुढचा प्रवाह असं वाचलं आहे. वडील वालिदवरूनच आला मा?.

याबाबत माझं एक असं मत नाही. म्हणजे जे शब्द आधीच आले आहेत, त्यांना हाकलायची गरज नाही. पण ज्या गोष्टींसाठी मराठीत रुळलेले शब्द आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा दुसर्‍या भाषेतून शब्द आयात करायची गरज नाही. उदाहरण देऊन स्पष्ट करतो. मुंबईच्या महापौर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना म्हणाल्या - तुम्ही या सभागृहाची गरिमा राखा. आता गरिमा हा शब्द मराठी शब्दकोशात आहे. पण मान राखा म्हटल्याने अपमान होणार आहे का?

---
दुसरा मुद्दा - उच्चारावरून हसण्याचा, नावे ठेवण्याचा. आताच्या मराठी भाषा गौरवदिना निमित्त च किंवा ज च्या दोन उच्चारांतला फरक कळणार्‍यांनाच मनापासून शुभेच्छा असं काहीतरी व्हॉट्स अ‍ॅपला दिसत होतं. हे मला क्लासिस्ट वाटलं. मी त्यांना दिलेलं उत्तर - हे कळणार्‍यांची मुलं मराठी भाषा बोलत , लिहीत, वाचत असतील का? उलट हे न कळणारेच मराठी भाषा टिकवत असतील. मग मी माझ्या स्टेटसला मराठीची कोणतीही बोली बोलणार्‍यांचा गौरव केला. एकजिनसीकरणापेक्षा सर्वसमावेशकता मला महत्त्वाची वाटते.
तसंच उर्दू , हिंदीमध्ये एकाच वर्णाच्या दोन उच्चारांतला फरक दाखवायला नुक्ता वापरतात, तो आणावा मराठीत. हिंदीत ड साठी असतो ना नुक्ता?

तिसरं - माझा संबंध मराठवाडा विदर्भातल्या लोकांशी फार कमी येतो. त्यांचं मराठी बोलताना एक वेगळा अ‍ॅक्सेंट , काही शब्दांची वेगळी रूपं चटकन जाणवतात. उदा: तुम्ही करशाल की करताल. मला तर फार आवडलं आहे. तर या लोकांना मी तुम्ही तुमचा हा अ‍ॅक्सेंट आणि हे प्रादेशिक रूप अजिबात सोडू नका, असं सांगायला सुरुवात केली आहे.

अरुणा ढेरे याबद्दल नुकतंच काहीतरी म्हणाल्याचं वाचनात आलं. ते शोधून इथे लिहेन.

@ भरत - चपखल उदाहरण दिलंत. गरिमा शब्द जरी मराठी शब्दकोशात असला तरी "मान" जरा सोपा आणि जवळचा वाटतो तो मूळचा मराठी असल्यामुळे. त्यामुळे आयात केलेल्या शब्दाची गरज नाही. मी मूळचा विदर्भातला आणि माझ्या मते तिथल्या मराठीवर हिंदीचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. "मी जेऊन राहिलो" हेच मुळात "मैं खाना खा रहा हू" या हिंदी वाक्य रचनेवरून उचललं आहे. सुरवातीला माझ्या बोली भाषेवर होणाऱ्या टिंगल टवाळीचा राग यायचा खरा पण हे चालायचेच. पण शब्द, शब्दोच्चार आणि त्याचं लिखित स्वरूप याचं काहीतरी प्रमाण असावं असं मनापासून वाटतं. अर्थात हेही व्यक्तिसापेक्षच आहे. त्यामुळेच "हेराफेरी" चित्रपटातला बाबूराव गणपतराव आपटे जेव्हा "मराठी मानसा जागा हो" म्हणतो तेव्हा त्यातला "न" आणि "ज" खटकतात. "लक्ष्य" चित्रपटात कर्नल दामले जेव्हा " स्वतःचं घर सांभाडता येत नाही आणि निघाले जग जिंकायला" अशी म्हण आपल्या तुकडीला बोलून दाखवतात ते सुद्धा खटकतं. कर्नल दामले हे जडगाव चे असतील तर त्यांना तेवढी सूट आहे. इथे कुणी जळगावचा असेल तर मनापासून क्षमा असावी. टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही.
गंमत म्हणून एक किस्सा सांगतो. माझ्या मामाच्या बँकेत एक जळगावचा कर्मचारी होता. तो फार हळू हळू काम करायचा. एकदा काउंटरसमोर वैतागून उभ्या असलेल्या खातेदाराला म्हणाला, " तुम्ही जरा बसून घ्या. तुम्हाला वेड लागेल." त्यावर मामा चटकन म्हणाला, " अरे एवढा वेळ लावलास तर त्यांना खरंच वेड लागेल."

@ मानव - Happy Happy Happy लहानपणी "चेष्टा" या हिंदी शब्दाने मला पार बुचकळ्यात टाकलं होतं.

रेड लेबल नॅचरल केअर चहाची नवी जाहिरात, हसरी शहाणे-राणा व राकेश बेदी,

यावेळी जर मी सोसायटी इलेक्शन जिंकलो तर हिवाळ्यात "जमलेले" पाईप बदलून टाकीन.

https://www.youtube.com/watch?v=Tl1JIqGGBGI

जमलेले पाईप 😀

.. जे शब्द आधीच आले आहेत, त्यांना हाकलायची गरज नाही ….

हे पटेबल आहे. नवीन पर्यायी शब्द सोपे असले तर रुळतात, नाहीतर नाही.

सरकारी मराठीतले शब्द/ वाक्यरचना मुद्दाम क्लिष्ट ठेवत असतील का ? कारण legal drafts आणि सरकारी आदेशांची भाषा इंग्रजी असली तर तिथेही हाच pattern दिसून येतो.

@ चेष्टा

मराठी आणि हिंदी एकाचवेळी शिकलो असल्याने फार तारांबळ होत असे. ज्योति- ज्योती, जागृति- जागृती, संस्कृति - संस्कृती हे issues तर होतेच चेष्टा, शिक्षा, प्रेषित वगैरे शब्दांचे दोन्हीकडचे वेगवेगळे अर्थ आणि वापर ! डोक्याचे भजे व्हायचे. पुढे सराव + स्वाध्यायाने चुका कमी होत गेल्या पण निर्दोष लेखन अजूनही स्वप्नच आहे कारण दोन्ही भाषांचं jumbling होतेच.

गप्पांमध्ये 'आजी' असं लिहिताना मी अनेकदा आज्जी लिहितो कारण ते तसच म्हणतो. जसं मज्जा पण लिहितो, अर्थात संदर्भ बघुन.
प्रत्यय लावायची वेळ आली की आजीच लिहिलं जातं. जसं बोलायचं तसं लिहायचं स्कूल ऑफ थॉटने मला अनेकदा सिंह लिहिताना सिंव्ह लिहावं असं ही वाटतं.
हे अर्थात माझ्या आजीच्या संदर्भात असेल तरच. दुसर्‍या कोणाच्या आजी ला आज्जी नाही म्हणणार, त्यामुळे लिहिणार ही नाही.

Pages