
पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…
धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.
आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.
वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
# तुम्ही असे करु शकतात
- तुम्ही असे करू शकता.
# तो मला घरी जाउनच देत नाही
- तो मला घरी जाऊच देत नाही
# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?
जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे
# माझा तसा असा उद्देश्य नव्हता
- माझा तसा उद्देश नव्हता
उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन
उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण
# मी त्यांना कायच म्हणत नाही
- मी त्यांना “काही”च बोलत नाही
तसेच
# तो बाहेरचं कायच खात नाही
- तो बाहेरचं काहीच खात नाही
# मी तिकडेच जातीय.
- मी तिकडेच जात आहे.
किंवा
सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.
# तुम्ही असे का करतात ते मला सांगा
- तुम्हीं असे का करता ते मला सांगा
# परवाच त्यांच्याशी भेट झाली
- परवाच त्यांची भेट झाली
इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.
# फोन नंबर देताल का त्यांचा ?
- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?
# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.
- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.
फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :
“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.
# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?
- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?
दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.
# कथेचा मतितार्थ असा की …
कथेचा मथितार्थ असा की …
( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)
ते “मतित” ला मातीत घाला रे..
# सध्या कामात व्यस्त आहे.
- सध्या कामात व्यग्र आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.
# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.
- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.
# माझ्या सोबत लग्न करशील का ?
- माझ्याशी लग्न करशील का ?
# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो
- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो
# तिथे मोठी सभा होती आहे
- तिथे मोठी सभा होते आहे.
# सर्वांचे धन्यवाद
- सर्वांना धन्यवाद
# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)
- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)
- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)
# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.
उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात
या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.
परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.
# जेवण चविष्ठ होते
- जेवण चविष्ट होते
# पुन्हा एकदा सांगती आहे
- पुन्हा एकदा सांगते आहे
# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये
- मला ते आवडतेय / मी सांगते.
# भेट म्हणून सोन्याची चैन दिली
- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.
चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.
# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.
- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.
हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.
# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे
- सणानिमित्त सुट्टी आहे
# ते आता आमचे शेजारी “बनणार”
- ते आता आमचे शेजारी होणार.
# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?
- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?
# मी तुमचे पुस्तक विकत घेईल
- मी तुमचे पुस्तक विकत घेईन
# यासाठी एक योजना राबवली जातीय
- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.
# कुठे निघालीस आणि ?
- कुठे निघालीस ?
# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.
- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.
दुसरा प्रयोग :
बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.
# लेख मुद्देसूत आहे
- लेख मुद्देसूद आहे
# मऊसूद कणिक
- मऊसूत कणिक
# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला
- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.
# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू
- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू
# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?
- सुरूए ? सिरीयसली ?
# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो
- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.
# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला
- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली
(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)
# तो कोणे माहित नाही
- तो कोण आहे माहित नाही
# उत्कृष्ठ चव आहे
- उत्कृष्ट चव आहे
कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)
बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.
मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.
तर मंडळी,
- वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
- तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
- आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
- तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
- तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.
Disclaimers :
१} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.
२} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.
३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.
लाडिक उच्चारांमुळे बहुतेक.
लाडिक उच्चारांमुळे बहुतेक.
)
मजाचं मज्जा होतं, पण माजीचं माज्जी नाही होत. (माजी कोण ते लाडाचे असले तरी.
एक वांद्रे द्या>>
एक वांद्रे द्या>>
मुलुंडचं खरं नाव मुळुंद आहे. हे माहीत असलेला कोणी आज मुलुंड मध्येतरी उरला असेल का शंका आहे.
आपल्या लोकांनी सॅंडहर्स्ट रोडचे संडास रोड करून इंग्रजांचा माफक सूड उगवला ते बरं झालं
आमच्यात आजीशी लाडात यायची
आमच्यात आजीशी लाडात यायची पद्धत नव्हती. आजी काही वर्षांतून एकदा काही दिवस भेटायची.
माझ्या मावसबहिणीची मुलं आजोबांना आजो म्हणत असं आठवतंय.
सँडहर्स्ट रोडचं आता डोंगरी झालंय.
आपल्या लोकांनी सॅंडहर्स्ट
आपल्या लोकांनी सॅंडहर्स्ट रोडचे संडास रोड करून इंग्रजांचा माफक सूड उगवला >> हे माहीत नव्हतं. बिहाइंड दि बझारचं भेंडीबझार झालंय इतपत ऐकून होतो.
आज्जी मलाही कन्फ्यूज होतं.
आज्जी मलाही कन्फ्यूज होतं. आजी - आजोबा असेच लिहितो.
मज्जा ला मजा.
प्रेषित ?
प्रेषित ?
Submitted by vijaykulkarn ….
याबद्दल माझा गोंधळ होण्याचे कारण 👇
मराठी : येशू ख्रिस्ताला प्रेषित मानणारे आणि मुहम्मद पैगंबराला प्रेषित मानणारे अनुक्रमे ख्रिस्त आणि मुस्लिम.
हिंदी : अनिंद्य ने पत्र लिखकर माधव जी को नववर्ष की शुभकामनाएँ प्रेषित कीं
काय काय लक्षात ठेवणार ? 😀
तसा हल्ली मराठीत '<>मधून जाणे
तसा हल्ली मराठीत '<>मधून जाणे' हा वाक्प्रयोग बराच ऐकू येतो.
उदा.'तो काय (कुठल्या) दु:खातून जात असेल काय माहीत!' - हे बहुधा इंग्रजी 'We don't know what pain he must be going through'चं भाषांतर असावं, जे माझ्या अजून नीट पचनी पडलेलं नाही.
माझी एक मैत्रीण 'मला आधी या ईमेल्समधून जाऊ दे' असं म्हणाली चक्क परवा!
तसंच 'होत आलं आहे'ला 'राहिलं आहे' हे एक नवीन भावंड हिंदीतून आलं आहे. उदा. 'माझा नेहमीच हा विचार राहिला आहे' अशा प्रकारची वाक्यं.
>> 'मला आधी या ईमेल्समधून जाऊ
>> 'मला आधी या ईमेल्समधून जाऊ दे >>
लेट मी गो थ्रू इमेल्स.
पूर्वी आम्ही मराठी मिडियम मधली मुलं इंग्रजी बोलताना असं मराठीचं शब्दशः कर्ता कर्म क्रियापद भाषांतर करुन वाक्य तयार करत असू. आता बरोबर उलटी गंगा झाली!
>> हा विचार राहिला आहे'>> हे असं मराठी आपले नेते भाषणांत म्हणतात ना?
मला आधी या ईमेल्समधून जाऊ दे
मला आधी या ईमेल्समधून जाऊ दे …. बरोब्र.
सर्व फाइल्स मधून जाण्यापेक्षा ईमेलमधून गेलेलं बरं.
पण तुम्ही त्यांच्या लक्षात आणून देता की कसं ?
>>> पण तुम्ही त्यांच्या
>>> पण तुम्ही त्यांच्या लक्षात आणून देता की कसं ?
हो हो तर!
Pages