कशाले काय म्हनूं नही ?

Submitted by अनिंद्य on 27 February, 2026 - 07:28

पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…

धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.

आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.

वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.

# तुम्ही असे करु शकतात

- तुम्ही असे करू शकता.

# तो मला घरी जाउनच देत नाही

- तो मला घरी जाऊच देत नाही

# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?

जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे

# माझा तसा असा उद्देश्य नव्हता

- माझा तसा उद्देश नव्हता

उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन

उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण

# मी त्यांना कायच म्हणत नाही

- मी त्यांना “काही”च बोलत नाही

तसेच

# तो बाहेरचं कायच खात नाही

- तो बाहेरचं काहीच खात नाही

# मी तिकडेच जातीय.

- मी तिकडेच जात आहे.

किंवा

सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.

# तुम्ही असे का करतात ते मला सांगा

- तुम्हीं असे का करता ते मला सांगा

# परवाच त्यांच्याशी भेट झाली

- परवाच त्यांची भेट झाली

इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.

# फोन नंबर देताल का त्यांचा ?

- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?

# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.

- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.

फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :

“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.

# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?

- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?

दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.

# कथेचा मतितार्थ असा की …

कथेचा मथितार्थ असा की …

( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)

ते “मतित” ला मातीत घाला रे..

# सध्या कामात व्यस्त आहे.

- सध्या कामात व्यग्र आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.

# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.

- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.

# माझ्या सोबत लग्न करशील का ?

- माझ्याशी लग्न करशील का ?

# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो

- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो

# तिथे मोठी सभा होती आहे

- तिथे मोठी सभा होते आहे.

# सर्वांचे धन्यवाद

- सर्वांना धन्यवाद

# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)

- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.

# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)

- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)

# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.

उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात

या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.

परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.

# जेवण चविष्ठ होते

- जेवण चविष्ट होते

# पुन्हा एकदा सांगती आहे

- पुन्हा एकदा सांगते आहे

# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये

- मला ते आवडतेय / मी सांगते.

# भेट म्हणून सोन्याची चैन दिली

- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.

चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.

# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.

- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.

हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.

# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे

- सणानिमित्त सुट्टी आहे

# ते आता आमचे शेजारी “बनणार”

- ते आता आमचे शेजारी होणार.

# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?

- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?

# मी तुमचे पुस्तक विकत घेईल

- मी तुमचे पुस्तक विकत घेईन

# यासाठी एक योजना राबवली जातीय

- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.

# कुठे निघालीस आणि ?

- कुठे निघालीस ?

# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.

- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.

दुसरा प्रयोग :

बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.

# लेख मुद्देसूत आहे

- लेख मुद्देसूद आहे

# मऊसूद कणिक

- मऊसूत कणिक

# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला

- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.

# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू

- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू

# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?

- सुरूए ? सिरीयसली ?

# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो

- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.

# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला

- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली

(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)

# तो कोणे माहित नाही

- तो कोण आहे माहित नाही

# उत्कृष्ठ चव आहे

- उत्कृष्ट चव आहे

कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)

बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?

रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.

मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.

तर मंडळी,

  • वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
  • तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
  • आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
  • तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
  • तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
  • शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.

    Disclaimers :

    १} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.

    २} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.

    ३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.

    अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.

    आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजदार हा शब्द योग्यच आहे आणि शब्दकोशांमध्ये सुद्धा आहे. जुन्या (वझे, बापट पंडित) तसेच नव्या (झांबरे) शब्दकोशातही हा शब्द आहे.
समजूतदार हा शब्द काही शब्दाकोशांमध्ये दिसत नाही.

<<माझी मदत कर हे जास्त योग्य आहे>> हे कसं काय?

@मंजुताई:
१) मी गावाला गेली होती.
२) मी गावाला गेला होता.
प्रमाणभाषेनुसार दोन्ही चूक आहे. त्यातील पहिले, स्त्रीलिंगात क्रियापदे तृतीय पुरुषी चालवणे हे आमच्याकडेही (जत - विजापुरवरून आले असावे) चालते. पण पुल्लिंगात मी गावाला गेलो होतो असेच म्हणतात. पण ही चुकीची प्रमाणभाषा वापरत असल्याची उदाहरणे नसून त्या त्या प्रांतीय भाषेची उदाहरणे वाटतात.

अनेकदा चुका आमच्याकडे असंच बोलतात म्हणून खपवल्या जातात, असं वाटतं.

मी गेली होती - मी शाळेत असताना आमच्या मुख्याध्यापकांनी हे असं चुकीचं बोललं जातं , असं सांगितलं होतं. मुंबईतल्या शाळेत कुठली प्रांतिक भाषा?

तसंच ते केल्या गेले. हे म्हणे विदर्भातलं मराठी. मग मराठवाड्यातले लोक का लिहितात? आणि विदर्भा तले सगळे सरसकट तसं का लिहीत नाहीत? विदर्भातल्या लेखकांच्या आंतर्जालपूर्व = छापील लेखनात असं दिसतं का?

चुकीच्या गोष्टी वारंवार पाहून त्याच बरोबर आहेत, असं वाटू लागतं. गंमत म्हणजे आपण अशा काही चुका करायच्या आणि दुसर्‍यांच्या दुसर्‍या चुकांना नावं ठेवायची, असंही करतो.
या धाग्यावर लिहिण्यासाठी काकाजींचं हे गाणं ही अट घातली तर?
इस पापन को आज सज़ा देंगे मिलकर हम सारे
लेकिन जो पापी न हो वो पहला पत्थर मारे
हो पहले अपने मन साफ़ करो रे फिर औरों का इन्साफ़ करो
यार हमारी बात सुनो ऐसा इक नादान चुनो
जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो.

माझ्याही लेखनात चुका होतच असतील. त्या दाखवणार्‍यांचे स्वागत. पण चूक आहे हे माहीत असूनही रेटून नेण्याला काय म्हणायचं?

तर केल्या गेले.

मी मोदक केला - मोदक केले. - माझ्याकडून मोदक केला गेला - केले गेले.

मी चकली केली - चकल्या केल्या - माझ्याकडून चकली केली गेली - चकल्या केल्या गेल्या

मी लोणचे केले - लोणची केली - माझ्याकडून लोणचे केले गेले - लोणची केली गेली.

तेव्हा कर्मणी प्रयोगात कर्म स्त्रीलिंगी अनेकवचनी असेल तेव्हाच हे केल्या गेल्या योग्य.

आता र्‍हस्व दीर्घाचे नियम का पाळायचे? इंग्रजीत स्पेलिंग चुकवाल का? तिथे म्हणाल का काय फरक पडतो?
आणि हे नियम शाळेत शिकवलेले असतात. त्यावर अगदी दहावीपर्यंत प्रश्न असतात. भाषा विषयात शुद्धलेखनाच्या चुकांसाठी गुण कापले जातात. मग शाळेत शिकलेलं शाळेतच सोडून यायचं का?

मराठीत जसा उच्चार तसं लेखन हा नियम र्‍हस्वदीर्घाला लागू पडतो. मग टाइप करताना शब्दाच्या सुरुवातीचे र्‍हस्व इकार दीर्घ कसे टाइप होतात? उलट दीर्घ इकार टाइप करायला एक की जास्त दाबावी लागते. आपण लिहिलेलं आपल्या डोळ्यांना दिसत नाही का? ते आपण पुन्हा वाचत नाही का?
तेव्हा ही चलता है प्रवृत्तीच आहे.

माझी मदत हे हिंदीतून आलं.

चतुर्थी विभक्ती - प्रत्यय स ला ते - स ला ना ते
कारकार्थ -कारकार्थ (संप्रदान): ज्याला दान दिले जाते किंवा ज्याच्यासाठी क्रिया केली जाते तो घटक.

षष्ठी विभक्तीचा कारकार्थ -संबंध - मुलांची शाळा , माझा देश.

तर मदत शब्दाआधी षष्ठीचा प्रत्यय केव्हा येईल? तुला माझी मदत हवी आहे का? मला तुझी मदत हवी आहे.

वस्तू भेटणे इ.सारख्या असल्या तर चुका या त्यामानाने सौम्य वाटतात.

भरत, प्रतिसाद आवडला.
बातम्या देताना, माहिती देताना, घोषणा करताना, मुलाखत घेताना, थोडक्यात औपचारिक प्रसंगांमध्ये, तसंच पाठ्यपुस्तकांमध्ये प्रमाणभाषा वापरली गेली पाहिजे आणि ती शुद्ध, अचूकच असली पाहिजे असं माझं मत आहे. ( मराठीच्या पाठ्यपुस्तकातले उतारे अर्थातच मूळ स्वरूपात, बोलीभाषेत असतील तर तसे).
ललितलेखनात, कथांमध्ये, टीव्हीवरच्या मालिकांमधे प्रमाणभाषेचा आग्रह नसावा. मात्र अशुद्धलेखन, व्याकरणाच्या 'चुका' (माझी मदत कर वगैरे भयंकर मराठी) नसाव्यात.

मी गेली होती, मी गेला व्हता, मी बोलली, मी बोलला (ही सगळी स्त्रीलिंगी कर्ता असलेली वाक्यं आहेत. ) ही बोलीभाषा आहे, तिला मी अशुद्ध म्हणणार नाही. जवळजवळ असलेल्या दोन गावांमधल्या, जातींमधल्याही बोलीभाषा वेगवेगळ्या असू शकतात.

< मी बोलली, मी बोलला (ही सगळी स्त्रीलिंगी कर्ता असलेली वाक्यं आहेत. ) ही बोलीभाषा आहे> नक्की कुठली?

ललित लेखन , कथांमध्ये पात्रांच्या तोंडचे संवाद त्या पात्राच्या भाषेत असावे. पण निवेदन जर प्रमाणभाषेत असेल तर संपूर्ण प्रमाणभाषेत असावं. मध्येच बोली आणि मध्येच ग्रांथिक नको. निवेदनही बोली भाषेत असेल तर त्या बोलीशी प्रामाणिक असावं. नाहीतर मराठी चित्रपटांतून आपण शिकतो ती ग्रामीण मराठी कुठल्याही पात्राच्या तोंडी दिसते.
याबाबत नागराज मंजुळेंना मानायला हवं.त्यांनी त्या त्या भागातली बोली, तिथले हेल वापरले. साबर बोंडा मध्येही हे दिसलं.

मालिका चित्रपटांतली पात्रे मालवणी म्हणून जे आमच्या तोंडावर मारतात ते ऐकून माझ्या मनात हिंसक विचार येतात.

अनेकदा चुका आमच्याकडे असंच बोलतात म्हणून खपवल्या जातात, असं वाटतं.>>
भरत मी आमच्याकडे बोलतात म्हटलंय त्याबद्दल हे असेल तर: ते फक्त निरीक्षण आहे. ते बरोबर आहे असे म्हटले नाही की तसं खपवून घेतलं पाहिजे म्हटलेलं नाही. मंजुताईंनी ते कुठंतरी ऐकलं आणि त्या त्या प्रांताची भाषा वाटली असं त्या म्हणाल्या. त्यात एका प्रांताची मी भर घातली आहे.
मी म्हटलं त्याबद्दल नसेल अथवा त्यावरून आठवलं व पुढे लिहिलं असेल तर वरील परिच्छेदाकडे दुर्लक्ष करा.

मागे एकदा एका लेखात कुणीतरी हिंदी क्रियापद मराठीत वापरलं होतं. त्यावर काहींनी आक्षेप घेतला आणि कुणीतरी हा शब्द कुठून आला असं विचारलं होतं. त्यावर हा विदर्भात वापरतात अशी माहिती मी पुरवली होती. त्याचा अर्थ तसं लेखात लिहिण्यास, औपचारिक बोलण्यास, अथवा प्रमाण भाषेत ते घुसडण्यास समर्थन आहे असं होत नाही. पण तेव्हा तसा अर्थ काढला गेला असे वाटल्याने हे नमूद करतोय.

बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

नाही. स्पेसिफिकली तुमच्याबद्दल नाही.

मी आला, मी आली याबद्दल ना?

मी आधी लिहिलं तसं आमच्या मुख्याध्यापकांनी "मी आली" याबद्दल चाळीसहून अधिक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. ते मुंबईचे . मुली मुंबईच्या. तिथे कुठली बोली. "मी आला " तोवर आलं नव्हतं.

मला वाटतं, हे इंग्रजीतून आलं असावं. इंग्रजीत क्रियापदांची भूतकाळाची रूपं तिन्ही पुरुषांसाठी सारखीच होतात. तू आला पण म्हणतातच की आता. तू आलास हवं.

< मी बोलली, मी बोलला (ही सगळी स्त्रीलिंगी कर्ता असलेली वाक्यं आहेत. ) ही बोलीभाषा आहे> नक्की कुठली
Happy मी माझ्या गावात ही आणि अशी अनेक वाक्यं ऐकलेली आहेत! माझं गाव श्रीवर्धन तालुक्यात. पण मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, गावागावांमधेही फरक पडतो. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातल्या दुसऱ्या एखाद्या गावात हे असंच असेल असं नाही.
मी मागे 'येष्टी' नावाची कथा लिहिली होती. त्या कथेत मी ही बोलीभाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. मला स्वतःला बोलीभाषांमधलं वैविध्य महत्त्वाचं वाटतं आणि ते टिकायला हवं असंही वाटतं पण आता ते कठीण आहे.
ललित लेखन , कथांमध्ये पात्रांच्या तोंडचे संवाद त्या पात्राच्या भाषेत असावे. पण निवेदन जर प्रमाणभाषेत असेल तर संपूर्ण प्रमाणभाषेत असावं. मध्येच बोली आणि मध्येच ग्रांथिक नको. निवेदनही बोली भाषेत असेल तर त्या बोलीशी प्रामाणिक असावं. शंभर टक्के अनुमोदन.

मानव, उत्तरा करता धन्यवाद ! मुलीला हाक मारली की ती ‘आली’ म्हणायची. ‘आली’ काय ‘आले’ म्हण असं सारखं सांगून ती आले म्हणायला लागली. वावे, हे नागपूरमधलं उदाहरण आहे.

… इंग्रजीत स्पेलिंग चुकवाल का? ते चालेल का ? …

… लिहिलेलं आपल्या डोळ्यांना दिसत नाही का? ते आपण पुन्हा वाचत नाही का? तेव्हा, ही चलता है प्रवृत्तीच आहे….

+ १

भरत, अगदी हेच लॉजिक देतो. त्याने राग येतो अनेकांना आणि अनेकदा संबंध ताणले जातात.

Grammar Nazi नाही मी पण सुधारणा शक्य तितक्या नम्रतेने एक-दोनदा सुचवून बघतो. बाकी पुढे हरीइच्छा, अब्बा-डब्बा-झब्बा.

भरत, वावे
छान पोस्ट.
अनिंद्य,
अब्बा-डब्बा-झब्बा>>>>>>>अब्बा-डब्बा-चब्बा Lol Light 1

दिलेली वाक्य वाचून लक्षात आलं की कोणती वाक्य बरोबर ,तश्या लक्षात यायच्या चूका वाक्यातल्या, ऑनलाइन संस्थळावर तरी खूपच चांगली परिस्थिती आहे. ऑनलाइन पेपरातली भाषेची तर फारच वाईट परिस्थिती आहे,वाचवत नाही.
माझ्याकडूनही करतेस च्या ऐवजी करतेयस असं होत.चूकाही होत असतील भाषेच्या पण शुद्ध लेखखानाच्या चूका होणार नाहीत याची काळजी घेते चूका लगेच सुधारते.

<<माझी मदत कर हे जास्त योग्य आहे>> हे कसं काय?>>

मदत शब्द क्रिया म्हणून किंवा फिजिकल मदत या दोन अर्थांनी वापरला जातो. दोन्ही केसेसमध्ये 'मला मदत कर' हे चूक आहे.
अ पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची देणगी देतो तेव्हा तो पूरग्रस्तांना मदत देत असतो. ब प्रत्यक्ष जाऊन सर्च-रेस्क्यु, जखमींची शुश्रूषा करतो तेव्हा तो पूरग्रस्तांची मदत(क्रिया) करत असतो.
कर हे क्रियापद क्रियेसाठी येतं तेव्हा त्या क्रियेच्या रेसिपियंटला षष्ठी लागते.
माझी शुश्रूषा कर
माझी पूजा कर
याऐवजी
मला शुश्रूषा कर
मला पूजा कर
मला आरती कर
मला लग्न कर
मला चंपी कर असं वाचायला कसं वाटतं?

अ ने पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत केली, हेसुद्धा चूक आहे. कुठलीही फिजिकल गोष्ट ही दिली जाते, केली जात नाही. अ ने पूरग्रस्तांना एक लाख रुपयांचा चेक केला, किंवा काकूंनी पाहुण्यांना केलेला पाहुण्यांसाठी बनवलेला चहा काकांनी दिवाणखान्यात जाऊन पाहुण्यांना केला, हे कसं वाटतं?

आता काही लोक म्हणतील मला चहा कर, मला चार चपात्या कर हे बरोबर कसं? खरं म्हणजे कट्टर भाषाशुद्धीवाद्यांच्या मते ते बरोबर नाहीच. माझ्यासाठी चहा बनव, स्वयंपाक बनव म्हणायला हवं. आपण तितके कट्टर न बनता बनव च्या जागी 'कर' चालवून घेतलं तर तिथेच चतुर्थी चालेल.
(नवरा मेल्यावर गंगूच्या निर्दय सासऱ्याने) गंगूला बोडकी केली
न्हाव्याने गंगूचा चमनगोटा केला.
इथे घटना एकच असली तरी चमनगोटा हि क्रिया असल्याने गंगूला चमनगोटा केला असं होत नाही, तर बोडकी केली मध्ये बोडकी ही क्रिया नाही, इथे केली हे बनवली या अर्थाने आलं आहे. त्यामुळे गंगूला बोडकी केली हे चालवून घेता येईल.
मला मदत कर मध्ये कर हे बनव या अर्थाने येत नाही, म्हणून मला मदत कर हे चूक आहे. माझी मदत कर हे बरोबर आहे.

मोरोबा, प्वाइंट आहे. पण मराठीत अशा बर्‍याच खटकणार्‍या गोष्टी आहेत म्हणून काही त्या चूक आहेत असं नाही. उदा. अं अ: हे अयोगवाही उच्चार काही कारण नसताना स्वर म्हणून शिकवले जातात (आणि मग आं इं उं आ: ई: वगैरे उच्चार स्वर होतील की एका स्वरावर दुसरा स्वर स्वार होतो ह्याबद्दल कुठे अवाक्षर नाही, अशा स्वरसंधींचे कुठलेही नियम नाहीत. नसायचेच, कारण अनुस्वार आणि विसर्ग हे काही स्वर नाहीत). क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे उगीच मुळाक्षरे आहेत म्हणून शिकवली जातात.

>>> इंग्रजीत स्पेलिंग चुकवाल का? तिथे म्हणाल का काय फरक पडतो?
अनेक शब्दांची उदा. ब्रिटिश आणि अमेरिकन स्पेलिंग्ज निराळी असतातच. ब्रिटिश colour अमेरिकन color असतो.
काही काळानुसार बदलली आहेत. Prioritise आता सर्रास prioritize असं लिहिलं जातं.
बोली इंग्रजी तर मराठीसारखीच दर बारा कोसांवर बदलते.

>>> जिथे sleep लिहायचं तिथे slip लिहू का?
नाही.
म्हणजे लिहिताना तरी नाही, अजूनतरी.

आत्ताच एका प्रमोशनमध्ये ऐकलेलं धन्यवाद मराठी. तरुण मुलगी म्हणतेय हे सांगाय्ला नकोच. Wink हां, तर काय म्हणाली…
‘वूमन्स डे येतोय तर एक साडी बनतेच नां?’ (एक लाईक बनतोच तसंच हे).

साडी तर बनतेच ना? Lol
स्पेलिंग्ज अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्रजीत वेगवेगळी असणं वेगळं आणि स्पेलिंग चुकीचं लिहिणं वेगळं.

मुद्दा समजलाच, पण जरा डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट:
>>स्पेलिंग्ज अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्रजीत वेगवेगळी असणं वेगळं आणि स्पेलिंग चुकीचं लिहिणं वेगळं. >> ते आज! कधीकाळी ते अमेरिकन स्पेलिंग चुकीचेच असेल ना? Happy
'साडी बनतेच ना', 'लाईक बनतोच ना' हेच मराठीचे भविष्य आहे. यात दु:ख, खेद, चांगले, वाईट काही नाही. हे आहे ते असं आहे. बस्स!

मराठीत अशा बर्‍याच खटकणार्‍या गोष्टी आहेत म्हणून काही त्या चूक आहेत असं नाही >>> हे या धाग्यातल्या अनेक सो कॉल्ड 'चुकां'ना लागू पडतं ना? Happy

>> साडी बनतेच ना', 'लाईक बनतोच ना' हेच मराठीचे भविष्य आहे. यात दु:ख, खेद, चांगले, वाईट काही नाही. हे आहे ते असं आहे. बस्स!>> हो, हेच भविष्य आहे हे खरं आहे पण त्याचं वाईट वाटू नये असं काही नाही. मला तरी वाटतं आणि चीडही येते.

मोरोबा, असलेले व्याकरणाचे नियम पाळावेत एवढी माफक अपेक्षा आहे. तेही बोलीभाषेत नाही ( असं माझं मत आहे.). असलेल्या नियमांमधल्या चुका काढण्याइतकं माझं ज्ञान नाही.
'माझी मदत कर', 'साडी तर बनतेच ना' अशा वाक्यांना विरोध आहे तो ही नवीन वाक्यरचना आहे म्हणून नाही, तर हिंदीची भ्रष्ट नक्कल केल्यामुळे. ही अविचारी, बिनडोक नक्कल आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर पुलंचे रावसाहेब नवनवलनयनोत्सवाची चाल बदलण्याबद्दल जे बोलतात, ते. तिथे भ्रष्ट नक्कल नव्हती अर्थात. पण असा काही बदल करण्याचा 'अधिकार' असण्याबद्दल ते जे बोलतात, त्याची आठवण झाली.
इथून पुढे

चिड येत नाही म्हंटल्यावर काय अद्वातद्वा बोलणार. आता शांतम् पापम् स्टेज झाली, माणसं जितकी ढ तितका अहंकार/ आग्रह जास्त. कुणाच्या चुका सुधारायच्या नादी लागायचं नाही. Proud

ते बनवणं कायम फसवणं या अर्थाने घेतलं जातं. मी पुरणपोळी बनवली चुकूनही लिहीत नाही. केली/ केल्या.

वरचं फा ने लिहिलेले प्रति मला नेहमी झेरॉक्स या अर्थाने डोक्यात येतं. तुमच्या प्रति म्हणजे तुमची झेरॉक्स.‌ Lol माझी मदत/ मला मदत हे मात्र माझंही कुठेतरी चुकलं होतं. मी बऱ्याच जणांना पिव्हळवून सोडले असेन. पण प्रमाण भाषा फक्त वाचून जमवली आहे, कानावर पडलीच नाही कधी ! हिंदीचे मराठी सहज आणि नैसर्गिक वाटत नाही खटकतंच. सोशल मीडिया मुळे हाताबाहेर गेले आहे. फारच कृत्रिम वाक्यरचना वाटते, मेंदूला ताण येतो.

Pages