
पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…
धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.
आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.
वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
# तुम्ही असे करु शकतात
- तुम्ही असे करू शकता.
# तो मला घरी जाउनच देत नाही
- तो मला घरी जाऊच देत नाही
# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?
जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे
# माझा तसा असा उद्देश्य नव्हता
- माझा तसा उद्देश नव्हता
उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन
उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण
# मी त्यांना कायच म्हणत नाही
- मी त्यांना “काही”च बोलत नाही
तसेच
# तो बाहेरचं कायच खात नाही
- तो बाहेरचं काहीच खात नाही
# मी तिकडेच जातीय.
- मी तिकडेच जात आहे.
किंवा
सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.
# तुम्ही असे का करतात ते मला सांगा
- तुम्हीं असे का करता ते मला सांगा
# परवाच त्यांच्याशी भेट झाली
- परवाच त्यांची भेट झाली
इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.
# फोन नंबर देताल का त्यांचा ?
- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?
# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.
- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.
फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :
“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.
# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?
- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?
दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.
# कथेचा मतितार्थ असा की …
कथेचा मथितार्थ असा की …
( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)
ते “मतित” ला मातीत घाला रे..
# सध्या कामात व्यस्त आहे.
- सध्या कामात व्यग्र आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.
# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.
- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.
# माझ्या सोबत लग्न करशील का ?
- माझ्याशी लग्न करशील का ?
# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो
- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो
# तिथे मोठी सभा होती आहे
- तिथे मोठी सभा होते आहे.
# सर्वांचे धन्यवाद
- सर्वांना धन्यवाद
# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)
- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)
- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)
# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.
उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात
या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.
परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.
# जेवण चविष्ठ होते
- जेवण चविष्ट होते
# पुन्हा एकदा सांगती आहे
- पुन्हा एकदा सांगते आहे
# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये
- मला ते आवडतेय / मी सांगते.
# भेट म्हणून सोन्याची चैन दिली
- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.
चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.
# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.
- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.
हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.
# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे
- सणानिमित्त सुट्टी आहे
# ते आता आमचे शेजारी “बनणार”
- ते आता आमचे शेजारी होणार.
# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?
- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?
# मी तुमचे पुस्तक विकत घेईल
- मी तुमचे पुस्तक विकत घेईन
# यासाठी एक योजना राबवली जातीय
- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.
# कुठे निघालीस आणि ?
- कुठे निघालीस ?
# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.
- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.
दुसरा प्रयोग :
बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.
# लेख मुद्देसूत आहे
- लेख मुद्देसूद आहे
# मऊसूद कणिक
- मऊसूत कणिक
# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला
- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.
# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू
- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू
# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?
- सुरूए ? सिरीयसली ?
# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो
- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.
# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला
- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली
(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)
# तो कोणे माहित नाही
- तो कोण आहे माहित नाही
# उत्कृष्ठ चव आहे
- उत्कृष्ट चव आहे
कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)
बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.
मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.
तर मंडळी,
- वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
- तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
- आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
- तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
- तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.
Disclaimers :
१} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.
२} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.
३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.
कुणाच्या चुका सुधारायच्या
कुणाच्या चुका सुधारायच्या नादी लागायचं नाही हे काही अंशी खरं आहे. कारण सांगून उपयोग होईल असं नाही. पण वाचून वैताग्/चीडचीड टाळता येत नाही. काही ऐकताना कानावर पडलं तर ते न ऐकणं, वाचताना दिसल्यास त्या पोस्ट्स ओलांडून जाणं हेच करता येण्यासारखं आहे.
वावे, मी माझी मदत कर ही नवीन
वावे, मी माझी मदत कर ही नवीन वाक्यरचना नाही, तर मराठीतच 'योग्य' वाक्यरचना का आहे (माझ्या मते) ते उदाहरणांसहित लिहिलं आहे. त्यात काही खोट दिसली, तर जरूर लिहा. हिंदीत तसं म्हणतात, म्हणून मी मराठीत म्हणणार नाही, असा पर्सनल अट्टाहास तुम्ही धरू शकता, पण इतरांसाठी दुसऱ्या भाषांचा दुस्वास ही व्हॅलिड आर्ग्युमेण्ट होत नाही.
मराठीत अशा बर्याच खटकणार्या
मराठीत अशा बर्याच खटकणार्या गोष्टी आहेत म्हणून काही त्या चूक आहेत असं नाही >>> हे या धाग्यातल्या अनेक सो कॉल्ड 'चुकां'ना लागू पडतं ना? >>>> नाही. मी नियमाला अनुसरून किंवा प्रमाणीकृत पण खटकणार्या शब्दांबद्दल बोलत होतो.
मोरोबा, दुस्वास वगैरे नाही
मोरोबा, दुस्वास वगैरे नाही मला वाटत अजिबात हिंदी किंवा इंग्रजीचा. दुस्वास कशाबद्दल?
जे 'माझी मदत करा' म्हणतात, ते तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानुसार विचार करून म्हणतात का? नाही. ते हिंदीसारखी वाक्यरचना मराठीत आणतात. यात ही वाक्यरचना 'हिंदीसारखी' आहे म्हणून माझा विरोध नाही, तर ती हिंदीची भ्रष्ट, अविचारी नक्कल आहे म्हणून विरोध आहे. मला वाटतं मी आता पुरेसं स्पष्टीकरण दिलं आहे.
(तुमच्या स्पष्टीकरणात खोट काढण्याइतकं व्याकरणाचं ज्ञान मला नाही. हा उपहास वगैरे नाही. प्रामाणिकपणे लिहिलं आहे.)
मोरोबांचा प्रश्न यॉर्कर आहे.
मोरोबांचा प्रश्न यॉर्कर आहे. प्रयत्न करतो.
क्ष हा य ला मदत करतो. इथे य हा मदत घेण्याच्या परिस्थितीत आहे. क्ष हा य ला मदत देतो. - संप्रदान - चतुर्थी.
क्ष हा य ची शुश्रूषा करतो / चंपी करतो / पूजा / आरती करतो यात क्ष हा कर्ता , शुश्रूशा, चंपी , पूजा , आरती ही कर्मे. य चा संबंध सरळ क्रियापदाशी येत नाही. तर शुश्रूषा / चंपी / पूजा / आरती या कर्मांशी येतो म्हणून षष्ठी.
बोडका हे विशेषण आहे. बोडका करणे ही क्रिया. ती ज्याच्यावर झाली ते कर्म. म्हणून द्वितीयेची विभक्ती
चमनगोटा हे नाम व वाक्यातले कर्म. ज्याचा केला त्याचा क्रियापदाशी सरळ संबंध न येता कर्माशी येतो म्हणून षष्ठी.
चांगलं स्पष्टीकरण.
चांगलं स्पष्टीकरण.
कर्तरी आणि कर्मणी क्रियापदे असतात ना/का? वेडगळ प्रश्न असेल तर राहुदे.
कर्तरी आणि कर्मणी प्रयोग.
कर्तरी आणि कर्मणी प्रयोग.
कर्तरी - क्रियापद कर्त्याप्रमाणे चालते. - मी व्यायाम करतो / करते.
कर्मणी - क्रियापद कर्माप्रमाणे चालते. मजकडून व्यायाम केला जातो / व्यायाम प्रकार केले जातात.
एका श्रद्धांजलीची चिरफाड
एका श्रद्धांजलीची चिरफाड
या धाग्यावर काही आयडींनी इतका गदारोळ केला कि मला असे वाटून गेले की मायबोली सारख्या प्रगल्भ संकेतस्थळावर सकृतदर्शनी सूज्ञ वाटणार्या आयडींनी केवळ असहमती न दाखवता तो धागाच काढून टाकावा असा "घोशा" लावला. त्यांच्या आक्रमक भाषेवरुन मला यांना मानसोपचाराची गरज आहे असे क्षणभर वाटून गेले. मग त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आशय तोच ठेऊन मी बोली भाषेतुन प्रमाण भाषेत व कर्मणि प्रयोगाचा वापर केला. बोली भाषेतील अवतरणे काढली जी चॅट मधे होती. व एडिट करुन पुन्हा तो लेख प्रकाशित केला.
समजून घेण्याचा प्रयत्न करतो
समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
क्ष हा य ची शुश्रूषा करतो / चंपी करतो / पूजा / आरती करतो यात क्ष हा कर्ता , शुश्रूशा, चंपी , पूजा , आरती ही कर्मे. य चा संबंध सरळ क्रियापदाशी येत नाही. तर शुश्रूषा / चंपी / पूजा / आरती या कर्मांशी येतो म्हणून षष्ठी.>>> यात मदत ला का वगळलं आहे? मदत हे देखिल कर्म नाही का?
चमनगोटा हे नाम व वाक्यातले कर्म. ज्याचा केला त्याचा क्रियापदाशी सरळ संबंध न येता कर्माशी येतो म्हणून षष्ठी.>>> पुन्हा वरचाच प्रश्न. मदत हे नाम आणि वाक्यातले कर्म नाही का? ज्याची केली त्याचा क्रियापदाशी सरळ संबंध न येता कर्माशी येत नाही का? क्रियापदाचा कर्माशी संबंध येतो का यावरून क्रियापदाचं रुप ठरतं. य ची विभक्ती सुद्धा ठरते का? माझा व्याकरणिक आयक्यु फार लो आहे. लेमन्स टर्म्समध्ये लिहितो.
मला दिसलेला पॅटर्न असा- वाक्यातली क्रिया (किंवा तुमच्या व्याकरणिक भाषेत कर्म) ज्याला केली तो इनव्हॉल्व असल्याशिवाय करता येत नसेल तर षष्ठी वापरली गेलेली आहे. जिथे 'य़' शिवाय क्रिया होऊ शकते तेव्हा चतुर्थी. (हे स्पेसिफिकली 'कर' या क्रियापदाबद्दलच)
अ हा ब ला नमन करू शकतो, अभिवादन करू शकतो पण ब ला अभिनंदन करू शकत नाही, कारण अभिनंदन ही क्रिया होण्यासाठी करणारा आणि करून घेणारा दोघेही त्यात इन्व्हॉल्व्ह असणे जरुरीचे आहे.
तुम्ही 'मी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतो' असं म्हणू शकता, पण डॉ. आंबेडकरांची शुश्रूषा, अभिनंदन, चंपी, चमनगोटा करू शकत नाही. कारण डॉ. आंबेडकर सध्या या गोष्टी करून घेण्याच्या स्थितीत नाहीत.
आता तुम्ही डॉ. आंबेडकरांना/ची मदत करू शकता का? असा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि 'ना' बरोबर की 'ची' ते ठरवा.
मोरोबांचा पॉइण्ट कळाला. पण
मोरोबांचा पॉइण्ट कळाला. पण वावेंशी सहमत. एखाद्याने व्याकरणानुसार बरोबर आहे म्हणून आग्रह धरणे वेगळे आणि हिंदीतील वापर मराठीत आणणे वेगळे. हिंदीचा काही राग नाही. पण मराठी बोलताना मराठीतील प्रचलित वापर नसेल तर ते खटकते. यात थोडा हिंदीचा अवास्तव वरचष्मा आणि मराठीबद्दल उदासीनता असण्याचेही कारण आहे. त्याचीही ही प्रतिक्रिया आहे.
एखाद्याची मदत केली असे जर योग्य असेल तर एखाद्याची मदत झाली चा अर्थ एकदम उलट होतो. तेथे कर्तरी व कर्मणी कन्सिस्टंट नाही. याउलट एखाद्याला मदत केली/झाली हे कर्तरी व कर्मणी प्रमाणे बरोबर वाटते. फक्त क्रियापद बदलून प्रयोग बदलतो. अर्थ नाही.
>>> आता तुम्ही डॉ.
>>> आता तुम्ही डॉ. आंबेडकरांना/ची मदत करू शकता का?
लॉजिक चुकतंय. आता तुम्ही आंबेडकरांनाही मदत करू शकत नाही आणि आंबेडकरांचीही. पण आंबेडकर मदत घेण्याच्या परिस्थितीत असते तर / होते तेव्हा ती त्यांना मदत झाली असती, त्यांची नव्हे.
धन्यवाद/आभारांची निराळी गंमत आहे. आंबेडकरांचे आभार आणि आंबेडकरांना धन्यवाद दोन्ही त्यांच्या परोक्ष मानता/देता येतात.
'मदत'चं मूळ फारसी 'मदद' हे असलं तरी मराठीच्या आराखड्यात तो शब्द बसवताना मराठीच्या व्याकरणाचे नियम पाळतो.
'मला मदत करा / केली' हे 'मला साहाय्य करा / केलं' असं वाचून बघा म्हणजे लक्षात येईल.
आंबेडकरांचे हयात असणे/नसणे इज
आंबेडकरांचे हयात असणे/नसणे इज नॉट द पॉइण्ट. त्यांच्याजागी हयात असलेली कोणतीही व्यक्ति घ्या. तुम्ही तिला अभिनंदन/शुश्रूषा करू शकता का?
मराठीच्या व्याकरणाच्या नियमांशी मला मदत/सहाय्य कंझिस्टन्ट नाही हाच मुद्दा आहे.
धन्यवाद/आभारांची निराळी गंमत आहे. आंबेडकरांचे आभार आणि आंबेडकरांना धन्यवाद दोन्ही त्यांच्या परोक्ष मानता/देता येतात.>> मी वर लिहिल्याप्रमाणे फक्त कर आणि 'कर' याच क्रियापदाबद्दल बोलत आहे. मदत 'देण्याबद्दल' ओरिजिनल प्रतिसादात लिहिलं आहे.
>>> यात मदत ला का वगळलं आहे?
>>> यात मदत ला का वगळलं आहे? मदत हे देखिल कर्म नाही का?
नाही ना, मदत हे 'दान' (संप्रदान) आहे.
संप्रदानानंतर 'देणे' क्रियापद
संप्रदानानंतर 'देणे' क्रियापद येतं. इथे मला चतुर्थी मान्य आहेच (पुन्हा एकदा)
मदत दिली, शिक्षण दिले, भेट दिली
hmm. आलं लक्षात.
hmm. आलं लक्षात.
आणखी असं अन्य उदाहरण आठवायचा प्रयत्न करते आहे.
ज्ञानवर्धक चर्चा. कितीतरी
ज्ञानवर्धक चर्चा. कितीतरी नवीन मुद्दे, perspectives समजत आहेत.
मराठी वृत्तपत्रीय भाषेतल्या
मराठी वृत्तपत्रीय भाषेतल्या ह्या expression बद्दल नेहेमीच शंका वाटत आली आहे :
पूर्ण रस्ता तरुणाईने ओसंडून वाहत होता
तरुण+ आई = तरुणाई ? असे नसावे.
तारुण्य, तरुण, तरुणी हे शब्द शिकलोय, नियमित वापरतो.
परंतु वरची “तरुणाई” ही शब्दरचना बरोबर की कसे ? जाणकारांनी समजवावे.
“खूप लोक वापरतात” हा एवढाच निकष असेल तर मग प्रॉब्लम इल्ले.
'तरुणाई' शब्दाची व्युत्पत्ती
'तरुणाई' शब्दाची व्युत्पत्ती मला माहिती नाही, पण गोलाई, निळाई, तशी तरुणाई. हा शब्दप्रयोग चूक वाटत नाही. तारुण्य या अर्थाने.
पुजा हा शब्द चूक की बरोबर असे
पुजा हा शब्द चूक की बरोबर असे सरळ सांगता येत नाही, संदर्भाची गरज आहे.
"गणरायाला सर्वांनी पुजा" आणि "गणरायाची पूजा केली. " हे दोन्ही बरोबर पण "पुजा केली" या अर्थाने वापरला तर ते चुकीचे रूप आहे. तिथे 'पूजा ' बरोबर. ( माझ्या माहितीप्रमाणे)
Submitted by maitreyee on 27 February, 2026
_____
मैत्रेयी यांचे वर दिलेले म्हणणे बरोबर असून त्याचा संदर्भ असा आहे...
"पुजणे" या क्रियापदाचे एक रूप म्हणून "पुजा" हा शब्द बरोबर आहे. (मुतणे - मुता, बुडणे - बुडा, उठणे - उठा, उडणे - उडा, घुसणे - घुसा, थुकणे - थुका , फुलणे - फुला, लुटणे - लुटा इत्यादी)
"आता आधी गणपती पुजा, मग गौरीची पूजा करा" हे वाक्य बरोबर आहे. पण आपण "पुजा" हा शब्द क्रियापद म्हणून फार क्वचित वापरतो त्यामुळे आपल्या नेहमीच्या लिखाणात पूजा असा दीर्घ शब्दच असला पाहीजे.
_____
ललितलेखनात, कथांमध्ये, टीव्हीवरच्या मालिकांमधे प्रमाणभाषेचा आग्रह नसावा. मात्र अशुद्धलेखन, व्याकरणाच्या 'चुका' (माझी मदत कर वगैरे भयंकर मराठी) नसाव्यात.
मी गेली होती, मी गेला व्हता, मी बोलली, मी बोलला (ही सगळी स्त्रीलिंगी कर्ता असलेली वाक्यं आहेत. ) ही बोलीभाषा आहे, तिला मी अशुद्ध म्हणणार नाही. जवळजवळ असलेल्या दोन गावांमधल्या, जातींमधल्याही बोलीभाषा वेगवेगळ्या असू शकतात.
Submitted by वावे on 2 March, 2026
'साडी बनतेच ना', 'लाईक बनतोच ना' हेच मराठीचे भविष्य आहे. यात दु:ख, खेद, चांगले, वाईट काही नाही. हे आहे ते असं आहे. बस्स!
Submitted by अमितव on 2 March, 2026
माझे मत देखील हळूहळू वर दिलेल्या वावे आणि अमितव यांच्या मतासारखे बनत गेले आहे. खाली दिलेली सर्व वाक्ये प्रमाण भाषेने स्वीकारली पाहीजेत असे मला वाटते.
भयंकर सुंदर
अशक्य सुंदर
तू अशक्य आहेस
घरटी दोन माणसे जेवायला आलीत
हे शाळेवाले लोक पालकांनाच कामाला लावतात
ती मला बोलली
नोकरी भेटत नाही, राहायला ब्लॉक भेटत नाही तर बायको कुठून भेटणार?
इतकेच नव्हे तर याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की, "मी गावाला जाणार आहे" हे वाक्य बोलताना याचा शॉटफॉर्म म्हणून "मी गावाला जाणारे" असे सुद्धा म्हणू शकतो आणि शुद्धलेखनाचे सॉफ्टवेअर ते क्रियापद अशुद्ध म्हणून दाखवत नाही.
_____
दिपिका, दीपिका, दीपीका, दिपीका - सर्वच नाम असल्याने बरोबर.
Submitted by अनिंद्य on 27 February, 2026
पण वर दिलेले मत मला अजिबात मान्य नाही. "दीक्षित" हा शब्द तसाच लिहिला पाहीजे. जर दिक्षीत, दिक्षित, दीक्षीत असा कसाही लिहिला तर वाचनाचा वेग आपल्या नकळत मंदावतो. तसेच मशिन लर्निंग , युनिकोड वगैरे नवीन आयुधे अशा अनागोंदीमुळे गोंधळतात आणि आपल्याला तंत्रज्ञानाचा फायदा घेता येत नाही.
.. पण गोलाई, निळाई, तशी
.. पण गोलाई, निळाई, तशी तरुणाई...
अच्छा. असा विचार नव्हता केला.
हिंदीत ई इता ताई आवट आहट
हिंदीत ई इता ताई आवट आहट वगैरे प्रत्यय आहेत ते अनेक मराठी शब्दांनाही लागू होतात. तरुणाई, सुबत्ता, सजावट, बनावट वगैरे
प्रधानमंत्री..... हिंदीतून
प्रधानमंत्री..... हिंदीतून आलेला आणि आता सर्रास वापरला जाणारा शब्द..... मूळ पंतप्रधान
तसेच
राष्ट्राध्यक्ष......
राष्ट्रपती.... हा अजूनही बर्याच प्रमाणात प्रचलित आहे
… तरुणाई, सुबत्ता, सजावट,
… तरुणाई, सुबत्ता, सजावट, बनावट…
थँक्यू हरपा.
बघू - बघुया- बघुयात
बघू - बघुया- बघुयात
करतो आहे - करतोय- करतोयस
दोन्ही उदाहरणांत तिसरे रूप अनावश्यक वाटते. ते बरोबर की नाही हे माहिती नाही पण लिहिण्यात स्वाभाविकपणे येत नाही हे निश्चित.
@ प्रधानमंत्री,
हे हिंदीतून आयातीत आहे हे बरोबर. first among the equals, prime among the minister - prime minister तसेच मंत्रीगणात प्रधान, प्रमुख = प्रधानमंत्री. त्याला “पंतप्रधान” हा शब्द मराठीत रूढ असतांना “प्रधानमंत्री”ची गरज नाही, पण आता मराठीत जास्त करून प्रधानमंत्री वापरतात हे खरे.
मी एका विद्वान राजकारणी (हो, असायची-असते ही जमात) व्यक्तीला विचारले असता त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात “पंत” हे जातीविशेष संबोधन / पदवी असल्याने आताच्या युगात प्रधानमंत्रीच जास्त योग्य शब्द असल्याचे ठासून सांगितले होते.
>>> प्रधानमंत्री.....
>>> प्रधानमंत्री..... हिंदीतून आलेला आणि आता सर्रास वापरला जाणारा शब्द..... मूळ पंतप्रधान
राज्यघटनेसाठी संविधानही.
करतोयस - करतो आहेस. द्वितीय
करतोयस - करतो आहेस. द्वितीय पुरुष.
बरोबर.
बरोबर.
मी करतोय
तू करतोयस, ती करत्येय, ते करतायत
चूक बरोबर माहित नाही. असे बोलतो त्यामुळे असेच लिहितो.
पुन्हा एकदा माझे आकलन,
पुन्हा एकदा माझे आकलन,
पूजा : नाम , मुलीचे नाव असणे योग्य.
पुजा : आज्ञार्थी , शिजवा, तळा, भाजा अशा प्रकारचे, मुलीचे नाव असणे अयोग्य.
विशेषनामाना नियमच नसतील तर माझे नाव वीजय असे लिहू शकेन ?
चुकीची दुरुस्ती करावी.
करतोयस - करतो आहेस. द्वितीय
करतोयस - करतो आहेस. द्वितीय पुरुष.
नवीन Submitted by भरत. on 4 March, 2026 - 15:59
बरोबर.
मी करतोय
तू करतोयस, ती करत्येय, ते करतायत
<<<<
बरोबर
तू काय करतो, तू छान बोलते हे चूकच वाटते
तू काय करतो आहेस => तू काय करतोयस
तू छान बोलतेस हे बरोबर असावं आणि प्रमाण मराठीत असेच ऐकलेले आहे
माझे नाव वीजय असे लिहू शकेन ?
माझे नाव वीजय असे लिहू शकेन ? >> हो! पूर्वी विजय लिहिले असेल तर सरकार दरबारी बदला की झालं.
Pages