
पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…
धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.
आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.
वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
# तुम्ही असे करु शकतात
- तुम्ही असे करू शकता.
# तो मला घरी जाउनच देत नाही
- तो मला घरी जाऊच देत नाही
# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?
जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे
# माझा तसा असा उद्देश्य नव्हता
- माझा तसा उद्देश नव्हता
उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन
उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण
# मी त्यांना कायच म्हणत नाही
- मी त्यांना “काही”च बोलत नाही
तसेच
# तो बाहेरचं कायच खात नाही
- तो बाहेरचं काहीच खात नाही
# मी तिकडेच जातीय.
- मी तिकडेच जात आहे.
किंवा
सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.
# तुम्ही असे का करतात ते मला सांगा
- तुम्हीं असे का करता ते मला सांगा
# परवाच त्यांच्याशी भेट झाली
- परवाच त्यांची भेट झाली
इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.
# फोन नंबर देताल का त्यांचा ?
- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?
# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.
- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.
फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :
“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.
# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?
- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?
दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.
# कथेचा मतितार्थ असा की …
कथेचा मथितार्थ असा की …
( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)
ते “मतित” ला मातीत घाला रे..
# सध्या कामात व्यस्त आहे.
- सध्या कामात व्यग्र आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.
# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.
- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.
# माझ्या सोबत लग्न करशील का ?
- माझ्याशी लग्न करशील का ?
# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो
- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो
# तिथे मोठी सभा होती आहे
- तिथे मोठी सभा होते आहे.
# सर्वांचे धन्यवाद
- सर्वांना धन्यवाद
# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)
- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)
- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)
# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.
उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात
या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.
परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.
# जेवण चविष्ठ होते
- जेवण चविष्ट होते
# पुन्हा एकदा सांगती आहे
- पुन्हा एकदा सांगते आहे
# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये
- मला ते आवडतेय / मी सांगते.
# भेट म्हणून सोन्याची चैन दिली
- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.
चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.
# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.
- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.
हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.
# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे
- सणानिमित्त सुट्टी आहे
# ते आता आमचे शेजारी “बनणार”
- ते आता आमचे शेजारी होणार.
# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?
- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?
# मी तुमचे पुस्तक विकत घेईल
- मी तुमचे पुस्तक विकत घेईन
# यासाठी एक योजना राबवली जातीय
- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.
# कुठे निघालीस आणि ?
- कुठे निघालीस ?
# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.
- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.
दुसरा प्रयोग :
बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.
# लेख मुद्देसूत आहे
- लेख मुद्देसूद आहे
# मऊसूद कणिक
- मऊसूत कणिक
# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला
- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.
# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू
- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू
# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?
- सुरूए ? सिरीयसली ?
# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो
- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.
# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला
- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली
(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)
# तो कोणे माहित नाही
- तो कोण आहे माहित नाही
# उत्कृष्ठ चव आहे
- उत्कृष्ट चव आहे
कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)
बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.
मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.
तर मंडळी,
- वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
- तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
- आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
- तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
- तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.
Disclaimers :
१} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.
२} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.
३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.
उत्तर अमेरिकेत इंग्रजीत
उत्तर अमेरिकेत इंग्रजीत रुळलेले शब्दप्रयोग संग्रहित करणारा हा एक दुवा सापडला. मराठीचा नाही, अप्रस्तुत असेल तर काढतो. पण असं काही मराठीत व्हावं असं वाटलं म्हणून दिला आहे.
बरेचदा कंटेट चांगले असले की
बरेचदा कंटेट चांगले असले की भाषेच्या चुका आपण पदरात घालतो, आशय बंडल असला की सगळंच बोचते.
मला स्वतःला प्रमाण मराठी अत्यंत कृत्रिम वाटते, आम्ही बोलत नाही. आम्ही आमची निमशहरी मराठीच बोलतो. त्यात केसं, नखं असं सर्रासपणे येते. जलद आणि अघळपघळ बोलण्याची पद्धत असल्याने शब्द रोल होतात, उदा - करवली शब्द कर्वली असं म्हंटल्या जातो. असे अनेक शब्द बोलीभाषेत रोल होऊन वेगळे वाटतात. "काय करायलीस" हे कॉमन आहे म्हणजे काय करत आहेस. मी अगदी अशुद्ध बोलत असेन मग, पण मला तीन लहेजे आणि तीन भाषा जवळपास अस्खलितपणे बोलता येतात. त्यातले रंगही बदलता येतात. त्यामुळे आग्रहच राहिला नाही कशाचाच.
मला वाटतं लेखाचा मूळ हेतू
मला वाटतं लेखाचा मूळ हेतू चुकीचे (अर्थाच्या दृष्टीने)/ अनर्थ होणारे प्रयोग संग्रहित करुन ते टाळणे हा आहे. त्यात भाषेच्या लहेज्याची (माझ्या मते) उदाहरणे आल्याने थोडा घोळ झाला आहे.
>>> मराठीत पुजा आणि पूजा
>>> मराठीत पुजा आणि पूजा दोन्ही आहेत. दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत.
अर्थ (पूजन) सारखाच आहे की. 'पूजा' नंतर किंवा हिंदीबहुल प्रदेशांतून रुळला असावा असा माझा एक अंदाज आहे.
(काव्यांत वृत्तपूर्तीसाठी र्हस्वदीर्घाची ओढाताण सर्रास केली जाते, तेव्हा ते प्रमाण मानता येत नाही.)
एकूण 'पुजा' चूक नाही हे नक्की.
अशुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका
अशुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका, शब्दाचे योग्य रूप आणि प्रमाण मराठी, बोलीभाषा हे खूपच वेगवेगळे मुद्दे आहेत. मी पहिल्याबाबत आग्रही आहे पण दुसऱ्या बाबतीत शिथिल किंवा आता ओपन माईन्डसेटने बघू शकते. हो, मलाही सरमिसळ वाटली.
@ अस्मिता, कसलाच आग्रह राहिला
@ अस्मिता, कसलाच आग्रह राहिला नाही ही फेज मधेमधे मलाही येते. पण (अजूनतरी) ती जातेही. मग असे धागे विणता येतात. 😀
>>> बरेचदा कंटेट चांगले असले
>>> बरेचदा कंटेट चांगले असले की भाषेच्या चुका आपण पदरात घालतो, आशय बंडल असला की सगळंच बोचतं
हे ललितलेखनाच्या बाबतीत खरं आहे.
कागदोपत्री प्रमाणभाषेचा आग्रह हा - प्रमाणिततेसाठीच (स्टॅन्डर्डायझेशन) - आवश्यक आहेच.
>>> अशुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका, शब्दाचे योग्य रूप आणि प्रमाण मराठी, बोलीभाषा हे खूपच वेगवेगळे मुद्दे आहेत
अगदी!!
मी अलीकडेच कुठल्याश्या धाग्यावर लिहिल्यानुसार 'अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून नीट लिहावं' आणि 'अर्थ कळला ना, मग काय अडचण आहे?' या दोन टोकांतला सुवर्णमध्य मला अजून काढता आलेला नाही.
एकूण 'पुजा' चूक नाही…
एकूण 'पुजा' चूक नाही…
अरे दैवा ! पुजा चूक आणि पूजा बरोबर या समजुतीत अर्धं आयुष्य संपलं !
पुजा हे बरोबर आहे हे मलाही
पुजा हे बरोबर आहे हे मलाही पचनी पडत नाही आहे. डोळ्यालाही खटकतं आहे.
चांगले आहे ना अनिंद्य, चर्चेत
चांगले आहे ना अनिंद्य, चर्चेत भाग घ्यायला/ वाचायला मलाही आवडतेच. भाषेच्या वापरात उत्क्रांती होतच असते. नवे पैलू कळतात.
पुजा - धक्कादायक माहिती आहे बुवा.
अशक्य सुंदर.
अशक्य सुंदर.
तू अशक्य आहेस.
ह्या वाक्यरचना शहरी मराठीत आता बऱ्यापैकी रुळल्या आहेत. English expression चे टुकार शब्दश: भाषांतर वाटते.
बस, कप, टेबल सारख्या शब्दांना दीड-दोनशे वर्षातही चांगले सुटसुटीत पर्याय निर्माण झाले नाहीत. मग impossibly beautiful ला कधी व्हायचे? No correction possible here. Or is this a right expression ? Someone enlighten me please.
असेच एक जनप्रिय expression :
घरटी दोन माणसे जेवायला आलीत
मला शिकवण्यात आलेले / माहित असलेले :
- दर घरातील दोन माणसे जेवायला आलीत.
- प्रत्येक घरातून दोन माणसे जेवायला आलीत.
दुसरा प्रयोग:
- आंब्याच्या झाडावर पोपटांची घरटी आहेत.
- चिमण्यांनी घरटी काड्यांनी विणलेली आहेत.
“घरटी” दोन माणसे हे अयोग्य वाटते. खूप लोक वापरतात हाच criteria की हे बरोबर आहे ?
>>> पुजा हे बरोबर आहे हे
>>> पुजा हे बरोबर आहे हे मलाही पचनी पडत नाही आहे.
उच्चाराचा 'थंब रूल' लक्षात घ्या.
'आमच्या गणपतीची पुजा केव्हाच झाली' आणि 'हमारे घर में गणेशजी की पूजा होती है' ही वाक्यं मोठ्याने म्हणून बघ.
स्वाती, अर्थ सारखेच हे बरोबर.
स्वाती, अर्थ सारखेच हे बरोबर.
संस्कृतमध्ये पूजा आहे, त्यामुळे तिथून मराठी व हिंदीत आला असावा. पुजा रूढ झालेला बदललेला शब्द असावा, असं माझं मत.
पुजा असं छापलेलं वाचल्याचं आठवत नाही.
अनिंद्य यांनी अगदी मुद्देसूद
अनिंद्य यांनी अगदी मुद्देसूद लिहिले आहे म्हणून त्यांची प्रशंसा करायचं राहिलं म्हणून संपादन करायला आले तर इतके प्रतिसाद!
असे 'वेगळे ' मराठी ऐकले की मला कसेतरीच होते. अनिंद्य यांनी एकदम व्यवस्थित मांडणी केलेली बघून खरंच बरं वाटले.
पुजा नव्यानेच समजले. जेवण बनवणे हा प्रकार माझ्या आसपास खूप वापरतात. मी अर्थात टाळते .
मी मालवणी भाषिक घरात वाढले आहे. माझं स्वतःच मराठी यथातथाच आहे याची जाणीव असल्याने मी जड किंवा क्वचित वापरण्यात येणारे शब्द टाळते. पण जे बोलतो ते व्यवस्थित बोलावे असे वाटते. शुद्धलेखन पुढची पायरी. मला कोणी माझी चूक दाखवून दिली ( अगदी कुठल्याही प्रकारे) तरीही मी पुन्हा ती होणार नाही याची काळजी घेते. ( अगदी अपमानित करून सांगितले असेल तर त्या माणसाच तोंड पुन्हा बघणार नाही पण ती चूक मात्र करणार नाही .)
माझ्या स्वतःच्या बहिणीला गेल्या वर्षी एकदा मी पेन्सिल भेटत नाही तर मिळते असे सांगितले तेव्हा तिने चक्क दुर्लक्ष केले होते. तिच्या मुलालाही सातत्याने काही न काही ' भेटत ' असते. ते ऐकत नाहीत तर बाकी कोणी ऐकेल असे वाटत नाही. पण मी शक्यतो आता जर कोणी माझ्यासमोर वेगळं मराठी वापरले तर तिथल्या तिथे जाणीव करून देणार असा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
एक निरीक्षण असे आहे की जे आवडीने, जाणीवपूर्वक दुसरी ( किंवा तिसरी) भाषा शिकतात, ते शब्द आणि भाषेच्या बाबतीत जास्त सजग असतात.
मराठी मंडळात मराठी भाषा जोपासण्याचे प्रयत्न करत आहेत, इतरही बरेच चांगले उपक्रम आहेत ( सगळीकडे मी सहभागी होत नाही), तर तिथे जमेल तसे (जास्त बाचाबाची होणार नाही याची काळजी घेणे आलेच) बोलावे असे मनात आहे. जमलं तर इथे येऊन निरीक्षण ( किंवा अनुभव) लिहीन.
>>> संस्कृतमध्ये पूजा आहे,
>>> संस्कृतमध्ये पूजा आहे, त्यामुळे तिथून मराठी व हिंदीत आला असावा. पुजा रूढ झालेला बदललेला शब्द असावा, असं माझं मत.
तसंही शक्य आहे.
संस्कृतमध्ये 'पूजा' असं रूप होतं का? ('पूजन', 'पूजित' वगैरे श्लोक/स्त्रोत्रांमधून कानावर पडलं आहे.) माझा अभ्यास नाही.
संस्कृत पूजा
संस्कृत पूजा
धन्यवाद.
धन्यवाद.
पुजा हा शब्द चूक की बरोबर असे
पुजा हा शब्द चूक की बरोबर असे सरळ सांगता येत नाही, संदर्भाची गरज आहे.
"गणरायाला सर्वांनी पुजा" आणि "गणरायाची पूजा केली. " हे दोन्ही बरोबर पण "पुजा केली" या अर्थाने वापरला तर ते चुकीचे रूप आहे. तिथे 'पूजा ' बरोबर. ( माझ्या माहितीप्रमाणे)
पूजा, पुजा शब्दाचं वृत्तांत,
पूजा, पुजा शब्दाचं वृत्तांत, वृत्तान्त सारखं झालं. योग्य रूप कळण्याऐवजी कायमची कन्फ्युज झाले.
दीपावलीची दिवाळी,
दीपावलीची दिवाळी, सुग्रीष्माचा शिमगा, प्रतिपदेचा पाडवा, धुलीवंदनाची धुळवड आधीच झाली आहे...
बरेचदा बरोबर काय नि चूक काय ते कळत नाही.
घरटी दोन माणसे... हा शब्दप्रयोग आमच्याकडे वापरतात.
अशुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका, शब्दाचे योग्य रूप आणि प्रमाण मराठी, बोलीभाषा हे खूपच वेगवेगळे मुद्दे आहेत. >>>>>बरोबर.
खूप झाले पूजा पुजा...आता जरा निजा
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे
कन्फ्युज करून सोडावे, सकळ जन
पूज्य आणी पुज्य या शब्दांचे
पूज्य आणी पुज्य या शब्दांचे अर्थ मात्र वेगळे आहेत.
अस्मिता
अस्मिता
मराठीत आकारांत अक्षराआधी दीर्घ ऊकार आल्याचं आणखी उदाहरण आठवतं का?
हिंदी ‘झूला’ मराठीत ‘झुला’ का होतो?
पूज्य आणी पुज्य शब्दांचे अर्थ
पूज्य आणी पुज्य शब्दांचे अर्थ …
अलमोस्ट विरुद्धार्थी. 😀
सध्या अकलेने पुज्य असलेले जास्त पूज्य झालेले दिसतात सर्वत्र 😀
सद्या कानाला खटकणारा शब्दांचा
सद्या कानाला खटकणारा शब्दांचा प्रत्यय म्हणजे 'वाला/ वाले' याचा अतिवापर.
रिक्षावाला, दूधवाला असे नेहमी वापरले जाणारे शब्द खटकत नाहीत.
पण ' तो लालवाला पेन माझा आहे.' किंवा ' हे शाळेवाले लोक पालकांनाच कामाला लावतात .' हे कदाचित हिंदी भाषेच्या प्रभावाने होत असावे.
मालिनी राजुरकरांचा 'लालवाला
मालिनी राजुरकरांचा 'लालवाला जोबन' टप्पा आठवला
घरटी दोन व्यक्ती हे एकदम काव्यात्म वगैरे आहे की! माणसाचे घरटे नाही म्हणायचं का?
ती निळीवाली साडी दाखवा. फक्त
ती निळीवाली साडी दाखवा. फक्त निळी पुरे. वाली, सुग्रीव राहू द्या रामायणात.
मला हल्ली मराठी पाककृतींमधले
मला हल्ली मराठी पाककृतींमधले विभक्ती प्रत्यय खटकतात.
साबुदाण्यांना भिजवा, कोथिंबिरीला धुवा, नारळाला खरवडा, दाण्यांना भाजून कुटा इत्यादी.
ते ह्युमनाईज करताहेत.
ते ह्युमनाईज करताहेत.
घरटी दोन माणसे बोलीत आहे आणि
घरटी दोन माणसे बोलीत आहे आणि लेखनातही पहिला आहे. चुक वाटत नाही
हो, 'घरटी दोन माणसं' ऐकला आहे
हो, 'घरटी दोन माणसं' ऐकला आहे. एकत्र कुटुंबं / extended family एका छपराखाली राहात त्या काळातलं असावं ते. 'प्रत्येक कुटुंबातून दोन' म्हटलं तर घरातले आईवडील आणि चार मुलं + चार सुना जेवायला येतील अशी भीती वाटत असेल.
Pages