
पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…
धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.
आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.
वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
# तुम्ही असे करु शकतात
- तुम्ही असे करू शकता.
# तो मला घरी जाउनच देत नाही
- तो मला घरी जाऊच देत नाही
# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?
जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे
# माझा तसा असा उद्देश्य नव्हता
- माझा तसा उद्देश नव्हता
उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन
उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण
# मी त्यांना कायच म्हणत नाही
- मी त्यांना “काही”च बोलत नाही
तसेच
# तो बाहेरचं कायच खात नाही
- तो बाहेरचं काहीच खात नाही
# मी तिकडेच जातीय.
- मी तिकडेच जात आहे.
किंवा
सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.
# तुम्ही असे का करतात ते मला सांगा
- तुम्हीं असे का करता ते मला सांगा
# परवाच त्यांच्याशी भेट झाली
- परवाच त्यांची भेट झाली
इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.
# फोन नंबर देताल का त्यांचा ?
- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?
# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.
- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.
फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :
“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.
# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?
- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?
दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.
# कथेचा मतितार्थ असा की …
कथेचा मथितार्थ असा की …
( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)
ते “मतित” ला मातीत घाला रे..
# सध्या कामात व्यस्त आहे.
- सध्या कामात व्यग्र आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.
# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.
- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.
# माझ्या सोबत लग्न करशील का ?
- माझ्याशी लग्न करशील का ?
# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो
- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो
# तिथे मोठी सभा होती आहे
- तिथे मोठी सभा होते आहे.
# सर्वांचे धन्यवाद
- सर्वांना धन्यवाद
# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)
- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)
- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)
# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.
उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात
या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.
परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.
# जेवण चविष्ठ होते
- जेवण चविष्ट होते
# पुन्हा एकदा सांगती आहे
- पुन्हा एकदा सांगते आहे
# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये
- मला ते आवडतेय / मी सांगते.
# भेट म्हणून सोन्याची चैन दिली
- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.
चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.
# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.
- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.
हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.
# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे
- सणानिमित्त सुट्टी आहे
# ते आता आमचे शेजारी “बनणार”
- ते आता आमचे शेजारी होणार.
# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?
- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?
# मी तुमचे पुस्तक विकत घेईल
- मी तुमचे पुस्तक विकत घेईन
# यासाठी एक योजना राबवली जातीय
- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.
# कुठे निघालीस आणि ?
- कुठे निघालीस ?
# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.
- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.
दुसरा प्रयोग :
बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.
# लेख मुद्देसूत आहे
- लेख मुद्देसूद आहे
# मऊसूद कणिक
- मऊसूत कणिक
# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला
- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.
# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू
- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू
# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?
- सुरूए ? सिरीयसली ?
# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो
- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.
# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला
- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली
(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)
# तो कोणे माहित नाही
- तो कोण आहे माहित नाही
# उत्कृष्ठ चव आहे
- उत्कृष्ट चव आहे
कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)
बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.
मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.
तर मंडळी,
- वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
- तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
- आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
- तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
- तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.
Disclaimers :
१} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.
२} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.
३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.
आज मभा दिनाचं औचित्य साधून
आज मभा दिनाचं औचित्य साधून लिहिलेला छान लेख.
ह्या पूर्वी अनेक वेळा ह्यावर लिहून झालं आहे की मला फारसं काही ही खटकत नाही त्यामुळे ती पुनरोक्ती टाळते.
साबुदाण्यांना भिजवा, कोथिंबिरीला धुवा, नारळाला खरवडा, दाण्यांना भाजून कुटा इत्यादी.>> हे ऐकलं नाहीये अजून कधी मी तरी
घरटी हा शब्द आम्ही ही सर्रास वापरतो.
कोकणात सगळीकडे वापरतात की नाही माहित नाही पण आमच्याकडे विकृती हा शब्द वापरतात पण विकृती दर्शवण्यासाठी नाही तर विकण्यासाठी तयार / उपलब्ध ह्या अर्थाने. उदा. विकृतीच कुळीथ पीठ, सुकं खोबरं, हळद वगैरे. नवीन असताना ही विकृती खटकायची खूप हल्ली मी ही वापरते अगदी सहज.
'घरटी चार डोकी' असं ही ऐकलं
'घरटी चार डोकी' असं ही ऐकलं आहे. माणसं ही नाही डोकीच.
>>> कोकणात सगळीकडे वापरतात की
>>> कोकणात सगळीकडे वापरतात की नाही माहित नाही पण आमच्याकडे विकृती हा शब्द वापरतात
घ्या! माझी (कोकणात वाढलेली) आई 'घरगुती की विकृती' म्हणून विचारते तर आम्ही हसतो तिला!
>>> माणसं ही नाही डोकीच
'तोंडं' इतकं स्पष्ट म्हणत नाहीत हे काय कमी आहे?!
डोकी नसलेल्या माणसांना कुणी
डोकी नसलेल्या माणसांना कुणी जेवायला बोलवत नाही एकंदरीत.
तुझ्या मागे लागलेत विभक्ती प्रत्यय.
साबुदाण्यांना भिजवा>>>>
छान चर्चा सुरूये. खालील दोन
छान चर्चा सुरूये. खालील दोन वाक्य (वाक्ये) चूक की बरोबर सांगा. फार खटकली होती… त्या त्या भागातली भाषा म्हणून सोडून दिले..
१) मी गावाला गेली होती.
२) मी गावाला गेला होता.
पूजा पुजा चर्चा गमतीशीर आहे.
पूजा पुजा चर्चा गमतीशीर आहे.
जर मायबोली वरील अभ्यासू लोकांमध्ये इतक्या साध्या आणि नेहमीच्या वापरातील शब्दाबाबत जर मतभिन्नता असेल तर विचार करा ज्या सर्वसामान्य मराठी लोकांना ज्यांना संवाद साधण्यापुरते कामचलाउ मराठी बोलायचे आणि लिहायचे आहे ते शुद्धलेखनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे लोड का घेतील? त्यामुळे आग्रह असावा हट्ट नसावा हाच सुवर्णमध्य!
विशेष नामाला शुद्धलेखनाचे नियम लागू नाही हे सुद्धा योग्यच. त्यावरून आठवले, चारच दिवसांपूर्वी आमच्या घरात हा वाद पेटला होता. मुलाने मराठीच्या पेपरात आपले नाव ऋन्मेष लिहावे की ऋन्मेश लिहावे यावर चर्चा चालू होती
बायकोचे म्हणणे होते की सुरेश रमेश नरेश सारखे शहामृगातील श असायला हवा.
माझे म्हणणे होते की आपण ठेवलेले नाव आहे तर त्याचे नियम आपणच ठरवणार कोणी सुरेश रमेश नाही.
अभिषेक मध्ये जो ष आहे तोच मुलाच्या नावात असू दे म्हणालो तेव्हा ते पटले
तज्ञ >> तज्ज्ञ पाहिजे (तत् +
तज्ञ >> तज्ज्ञ पाहिजे (तत् + ज्ञ = ते जाणणारा)
खालचा भाग, जो की हिरव्या रंगाचा आहे >> खालचा भाग, जो हिरव्या रंगाचा आहे. (जो की, जेव्हा की वगैरे की उगाच येत आहेत मराठीत)
(जो की, जेव्हा की वगैरे की
(जो की, जेव्हा की वगैरे की उगाच येत आहेत मराठीत)
>>>
“कुठे ना कुठे” तुमचे म्हणणे बरोबर आहे “कुठेतरी” हरचंद पालवजी
मला वाटतं ह्यात प्रांतीय
टवणे सर
मला वाटतं ह्यात प्रांतीय बोलीत प्रचलित असणारे शब्दप्रयोग चुकीचे ठरवून प्रमाण शब्दच वापरा असा आग्रह नसावा. पण जर एक ठराविक बोली बोलत असाल तर निदान ती तरी नीट बोला अशी अपेक्षा असायला हरकत नाही.
खेळीमेळीच्या वातावरणात, वाद न
खेळीमेळीच्या वातावरणात, वाद न होता फार चांगले मुद्दे मांडले आहेत सर्वांनी. त्यासाठी आभार, कारण अत्यंत अलोकप्रिय विषयांच्या यादीत असलेला विषय आहे हा.
नव्याने मराठी भाषा शिकणाऱ्यांचे भरपूर कौतुक करावे(च) विशेषत: जेन झी, तरुण- लहान मुलांचे. त्यांचा हुरूप वाढवावा कारण चुकत- माकत का होईना ते एक नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे.
खुद्द मराठी कुटुंबातल्या ५ ते २० वर्ष वय असलेल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या जवळपास सर्वच मुलांसाठी मराठी बोलणे-लिहिणे एक challenge आहे, घरी आवर्जून मराठीत बोलले तरी. (शिकत असलेल्या अन्य भाषांमधे ते प्रवीण आहेत असेही नाही, तिथेसुद्धा चांगले इंग्रजी / हिंदी/ अन्य भाषा लिहिता-बोलता येण्यासाठी संघर्ष आहेच.)
म्हणून सुरवातीला कौतुक करणे, प्रोत्साहन देणे, चुका न काढणे हे अगदी योग्य. “तू छान बोलते/तो, छान लिहिले” असे कौतुक कुणी केले तर ती व्यक्ती जास्तीचे प्रयत्न करून मराठीत बोलण्याची-लिहिण्याची शक्यता वाढते.
किंतु, पण, परंतु ….
भाषापरिचयाच्या याच टप्प्यावर रेंगाळत रहायचे/ थांबायचे की त्यांना पुढची पायरी गाठायला उद्युक्त करायचे हा मात्र विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे.
चांगली भाषा हे महत्वाचे, उपयोगी कौशल्य आहे आणि ते गाठण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे की नको हा चॉइस मुले-माणसे-आपणा सर्वांकडे आहे.
सरकारी अध्यादेशांत, कामकाजांत
सरकारी अध्यादेशांत, कामकाजांत, निवेदनांत, माहितीच्या आदान प्रदानात, मराठी पाठ्यपुस्तकांमधे पाठांखालील प्रश्नांसाठी, वर्तमानपत्रांत, दुरदर्शनसंचावर दाखवण्यात येणाऱ्या बातम्यांत इत्यादी इत्यादी ठिकाणी (प्रमाणित मराठी भाषेला वाहिलेले काहीही असेल त्या ठिकाणी) लिखाणात/वाचनात प्रमाणभाषेचा आग्रह असायला कुणाचीच ना नाही आहे. पण एकीकडे आपणच कौतुकाने म्हणायचं की दर १२ मैलांवर भाषेचं रुप बदलतं, शब्दांचा लहेजा बदलतो, परंतु समाजात वावरताना मात्र त्या संदर्भात त्याच्या विपरीत अव्यवहारी मानसिकता आणि आग्रह ठेवायचा हे कितपत बरोबर आहे? आधी १२ मैल ओलांडून गेल्यावरच फरक जाणवत असेल पण शहरीकरणामुळे सध्या १२ मैलांवर असलेलीच नाही तर ५०० मैलांवरील मराठी व्यक्ती ही पोटापाण्यासाठी शहरात माझ्या आजूबाजूला रहाते, तिची लहानपणापासूनची अंगवळणी पडलेली भाषा बोलते ही बाब देखिल मी माझ्या अपेक्षा बनवताना(?) गृहीत धरायला नको का?
तू छान बोलते, लिहिते असे
तू छान बोलते, लिहिते असे अलीकडे बरेच जण म्हणतात.. बरोबर असेलही .. नक्की माहिती नाही पण तू छान बोलतेस, लिहितेस अधिक योग्य वाटते
@ स्वाती,
@ स्वाती,
…साबुदाण्यांना भिजवा, कोथिंबिरीला धुवा, नारळाला खरवडा, दाण्यांना भाजून कुटा… विभक्ती प्रत्यय.
हे असे अजून वाचण्यात नाही आले पण sounds so good ! अमितव म्हणतात तसे ह्युमनाईज झाले आहेत.
मी फक्त इथे मायबोलीवर “सारणात टाकण्याआधी भाजके तीळ थोडे दुखावून घ्या” असे एका पाककृतीत वाचले होते.
@ टवणे सर, हरपा, फार्स,
होय. “कुठेतरी” मनात (म्हणजे मनातच) खंत असते. कुठेतरी, जसे की, जो की, कुठे ना कुठे, अशाप्रकारची/ याप्रकारची भूमिका घेणे (ही भूमिका लिहिले तर काय बिघडते?) हे सर्व कॉमन आहे - आधी फक्त बोलण्यात येई आता लिहिण्यातही येते. टीव्ही वाहिनींवरच्या बातम्या-चर्चा आणि वर्तमानपत्रात सुद्धा. And they are biggest influencers, त्यांच्या भाषेचे सर्वाधिक अनुकरण होते.
मागील काही वर्षात नव्याने आलेली १ ते १० वी ची मराठी विषयावरची क्रमिक/ पाठ्यपुस्तके वाचा (कठोर मन:संयम नसेल तर नकाच वाचू) त्यातली भाषा शिकण्या-शिकवण्यासाठी योग्य आहे असे वाटत असेल तर …
तर प्रॉब्लमच मिटला.
सत्सद्विवेकबुद्धी/
सत्सद्विवेकबुद्धी/ सद्सद्विवेकबुद्धी >> दोन्ही चुकीचे. सदसद्विवेकबुद्धी (= सत् + असत् + विवेकबुद्धी)
मराठीभाषिक >> मराठीभाषक
मराठीभाषिक >> मराठीभाषक
अल्पसंख्यांक >> अल्पसंख्याक
लघूत्तम >> लघुतम
कोष >> कोश
मराठीभाषक हा तूच कधीतरी
मराठीभाषक हा तूच कधीतरी सांगितला होता तेव्हा पासून मी स्वतः पुरता सुधारून लिहायला सुरुवात केली होती. अल्पसंख्याक कसं? अल्प संख्या अक - अक ला काय अर्थ आहे. अल्पसंख्याक - autocorrect मधे आहे.
अक नाही नुसता क. भाषक शब्दात
अक नाही नुसता क. भाषक शब्दात पण क येतो ना तसा. फक्त तिथे करणारा या अर्थाने येतो आणि इथे संबंधी किंवा असणारा या अर्थाने. संख्या म्हणजेच अंक त्यामुळे संख्यांक ही द्विरुक्ती झाली.
समजले. क करणाऱ्याचा!
समजले. क करणाऱ्याचा!
Submitted by हरचंद पालव on 28
Submitted by हरचंद पालव on 28 February, 2026 - 19:43>>> हपा मस्त फोड करून सांगितलंत. धन्यवाद.
(No subject)
टीव्ही वाहिनींवरच्या बातम्या
टीव्ही वाहिनींवरच्या बातम्या-चर्चा आणि वर्तमानपत्रात सुद्धा. And they are biggest influencers, त्यांच्या भाषेचे सर्वाधिक अनुकरण होते.>> हा मुद्दा योग्य आहे कारण किमान ही माध्यमे प्रमाण मराठीत व्यवहार करावीत असे अभिप्रेत असताना (आणि कळत नकळत सर्वजण या माध्यमांकडून समोर ठेवली जाणारी भाषा हीच प्रमाण मराठी हेच मानत असताना), सर्वच ठिकाणच्या शब्दांची भेळ करुन ठेवतात, त्यामधे ना प्रमाण भाषेचे नियम पाळले जात, ना कोणत्या एका प्रांतातील भाषेचा/शब्दांचा लहेजा, यामुळे समोर येणाऱ्या भाषेचा बाज प्रमाण मराठी सारखा असला तरी असते ती भेसळच.
Submitted by मोरोबा on 28
डपो
छान चर्चा...
छान चर्चा...
माझी (कोकणात वाढलेली) आई 'घरगुती की विकृती' म्हणून विचारते >>> स्वाती, हे वाचून धन्य झाले मी...
साबुदाण्यांना भिजवा,
साबुदाण्यांना भिजवा, कोथिंबिरीला धुवा, नारळाला खरवडा, दाण्यांना भाजून कुटा इत्या
ते ह्युमनाईज करताहेत. >>> पण ह्युमनाइज करून काय करतात तर भिजवा, धुवा, खरवडा, कुटा. त्यापेक्षा भाजीरूपातच बरे वाटत असेल त्यांना
इंटरेस्टिंग चर्चा आणि आवडता विषय.
टीव्ही वाहिनींवरच्या बातम्या-चर्चा आणि वर्तमानपत्रात सुद्धा. And they are biggest influencers, त्यांच्या भाषेचे सर्वाधिक अनुकरण होते >>> हो. मराठी सिरीयल्स या बाबतीत बेकार आहेत. अनेकदा मूळ हिंदी सिरीजमधली वाक्ये भाषांतरित होताना त्यातील हिंदीच्या खाणाखुणा तशाच राहतात. त्यामुळे त्या माझ्या "सोबत" अशा का वागतात हे तर आता खूपच कॉमन झाले आहे पण "माझ्या दरवाजासमोर उभे राहून तू मला बोलतोयस" छाप हिंद्याळलेली मराठीही खूप ऐकू येते. पेटले ऐवजी जळाले चा वापर वगैरे.
अल्पसंख्याक व लघुतम - हे माहीत नव्हते. कदाचित शाळेत बरोबर शिकलो असेल पण नंतर बोलीभाषेतील वापरातून लेखीही बिघडली. कोश - बद्दल - याचा "कोष" असा कोणत्याच अर्थाने बरोबर नाही का मराठीत? शब्दकोश मधे तो श बरोबर वाटतो. पण किडे/फुलपाखरे ज्यातून बाहेर येतात तेथे कोश की कोष?
आजकाल मराठीत अचानक "प्रति" चा वापर खूप होउ लागलेला दिसतो. हिंदीतून विचार करून मराठीत लिहीणार्यांमुळे असेल का? "त्यांच्याप्रति माझे विचार" वगैरे संदर्भाने. "बद्द्ल" वगैरे सारखे सोपे शब्द सोडून लोक प्रति वापरू लागले आहेत.
याठिकाणी बरीच साधकबाधक चर्चा
याठिकाणी ....बरीच साधकबाधक
याठिकाणी ....बरीच साधकबाधक चर्चा होते आहे. जी की आजच्या तारखेला होणे आवश्यक आहे.

मला वाटतं कर्णकर्कश्य हा शब्द
मला वाटतं कर्णकर्कश्य हा शब्द (मी काल नीलम गेम मध्ये लिहीलेला) चूकीचा आहे. तो कर्णकर्कश्श असा हवा का?
हपांनी दिलेल्या शब्दांत फक्त
>>>
मराठीभाषिक >> मराठीभाषक
अल्पसंख्यांक >> अल्पसंख्याक
लघूत्तम >> लघुतम
कोष >> कोश
हपांनी दिलेल्या शब्दांत फक्त कोश माहीत होता बाकीचे मी चूकीचेच वापरत होते.
शब्दाचे योग्य रूप कोणते?
शब्दाचे योग्य रूप कोणते?
भले भले मराठी लोक सुद्धा
भले भले मराठी लोक सुद्धा आजकाल समजूतदार या शब्दाऐवजी समजदार असा शब्द वापरतात>> हे बरोबरच आहे ना? समजूत शब्दाचे दोन अर्थ मला समजतात ते असे. चुभुद्याघ्या.
एखाद्याची समजूत ghalane यामधला आणि
Opinion किंवा understanding या अर्थी. ही बरोबर किंवा चुकीची ही असू शकते. उदा. पृथ्वी सपाट आहे अशी काही लोकांची समजूत आहे.
समज हा शब्द समजूत या अर्थी किंवा विचारात आलेला परिपक्वपणा या दोन अर्थांनी वापरला जातो. इथे समजदार या शब्दात त्यातला दुसरा अर्थ अभिप्रेत आहे, त्या अर्थी समजदार हाच शब्द योग्य वाटत नाही का? समजूतदार हा खरंतर निरर्थक शब्द आहे. समजूतदार म्हणजे समजूत घालणारा, की समजूत असलेला?
मराठीत दुसऱ्या भाषांतून शब्द येताना अनेकदा, अर्थ, विभक्ती इ. ची मोडतोड करून आले आहेत. 'मला मदत कर' हे त्यांपैकीच (माझी मदत कर हे जास्त योग्य आहे) मग जर लोक चुकीची रचना त्यागून योग्य वापरायला लागले तर ती भाषेची दुरुस्ती म्हणून किंवा कमीतकमी एक alternate शब्दप्रयोग म्हणून स्विकारता येणार नाही का? की ऐवजी केवळ परंपरेने वापरला जातो म्हणून चुकीच्या शब्दाचा अट्टाहास धरत राहायचा?
Pages