
पूर्वी कधीतरी बहिणाबाई चौधरींची कविता वाचली होती, हो तीच : बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं…
धागा ती कविता किंवा त्यातल्या त्तवज्ञानाबद्दल नसून सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्द/वाक्यप्रयोगांबद्दल आहे.
आपल्या कानांवर पडून पडून अनेक चुकीचे शब्दप्रयोग सवयीचे होतात. खटकेनासे होतात. अनेकदा त्यात काही चुकते आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कुणी लक्षात आणून दिले नाही तर चुकीचे शब्द/ वाक्य तसेच आपणही वापरत रहातो, अनेकदा ते जस्टिफ़ायसुद्धा करतो. समाजमाध्यमातून आपल्या कानांवर पडणारी, नजरेखाली येणारी चुकीची भाषा आणि शब्द आपण नकळत तसेच वापरू लागतो.
वानगीदाखल काही नित्यपरिचित चुकीच्या शब्द-वाक्यरचना आणि त्या खाली योग्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
# तुम्ही असे करु शकतात
- तुम्ही असे करू शकता.
# तो मला घरी जाउनच देत नाही
- तो मला घरी जाऊच देत नाही
# जाऊन द्यात आपल्याला काय करायचे त्याचे ?
जाऊ द्या, आपल्याला काय करायचे त्याचे
# माझा तसा असा उद्देश्य नव्हता
- माझा तसा उद्देश नव्हता
उद्देश = हेतु, आशय, कारण, प्रयोजन
उद्देश्य = ज्या विषयीं संकल्प करावयाचा ते कारण
# मी त्यांना कायच म्हणत नाही
- मी त्यांना “काही”च बोलत नाही
तसेच
# तो बाहेरचं कायच खात नाही
- तो बाहेरचं काहीच खात नाही
# मी तिकडेच जातीय.
- मी तिकडेच जात आहे.
किंवा
सोलापुरला “जातीय” दंगल पेटली.
# तुम्ही असे का करतात ते मला सांगा
- तुम्हीं असे का करता ते मला सांगा
# परवाच त्यांच्याशी भेट झाली
- परवाच त्यांची भेट झाली
इथे परवाच “आमची” भेट झाली हे जास्त योग्य वाटते. कारण दोघेही एकमेकांना भेटत आहेत. जाणकारांनी अधिक सांगावे.
# फोन नंबर देताल का त्यांचा ?
- फोन नंबर “द्याल” का त्यांचा ?
# कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहेत.
- कुमारी वत्तमा प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांची बहीण आहे.
फारच आदर द्यायचा असेल आणि कुमारी वत्तमाला अहो-जाहोच करायचे असेल तर :
“कुमारी वत्तमा या प्रसिद्ध अभिनेते टुखार टिनपत्रे यांच्या भगिनी आहेत” असे लिहिता येते.
# तुम्हाला चालणारे का मी गेलेलं ?
- तुम्हाला चालणार आहे का मी गेलेलं ?
दुसरे उदाहरण: मी रोज १५ किलोमीटर पायी “चालणारे” लोक बघितले आहेत.
# कथेचा मतितार्थ असा की …
कथेचा मथितार्थ असा की …
( साय-दही घुसळून मिळते त्या लोण्याला “मथित” म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित. तसेच विचार-चर्चा यातून निघणारा निष्कर्ष = मथित अर्थ = मथितार्थ)
ते “मतित” ला मातीत घाला रे..
# सध्या कामात व्यस्त आहे.
- सध्या कामात व्यग्र आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मी सुद्धा लिहित असे. मराठीत व्यस्त म्हणजे busy नाही हे लक्षात आले आणि चूक लिहिणे बंद झाले.
# त्यांच्यापासून मला खूप शिकता आले.
- त्यांच्याकडून मला खूप शिकता आले.
# माझ्या सोबत लग्न करशील का ?
- माझ्याशी लग्न करशील का ?
# आम्ही ह्या दागिन्याला बांगडी बोलतो
- आम्ही ह्या दागिन्याला बांगडी म्हणतो
# तिथे मोठी सभा होती आहे
- तिथे मोठी सभा होते आहे.
# सर्वांचे धन्यवाद
- सर्वांना धन्यवाद
# जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवूनच रहातो. (हो, असे डायलॉग लिहितात प्रसिद्ध लेखक)
- मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
# तो प्रतिथयश कलाकार (हे भरपूर लोक लिहितात)
- तो प्रथित कलाकार (प्रथितयश हा शब्द कोषात नाही !)
# परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द ठार चुकीचे वापरणारे हजारो लोक आहेत.
उदा: त्यांच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल वाईट बोलतात
या वाक्यात अपरोक्ष म्हणजे “अनुपस्थिती” असा अर्थ होत नाही. त्याच्या नेमका उलट अर्थ आहे.
परोक्ष = एखाद्याच्या पाठीमागे, गैरहजेरीत.
अपरोक्ष = समोर, साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष.
# जेवण चविष्ठ होते
- जेवण चविष्ट होते
# पुन्हा एकदा सांगती आहे
- पुन्हा एकदा सांगते आहे
# मला ते आवडत्येय / मी सांगत्ये
- मला ते आवडतेय / मी सांगते.
# भेट म्हणून सोन्याची चैन दिली
- भेट म्हणून सोन्याची चेन chain दिली.
- महागाईत रोज काजू खायची चैन परवडत नाही.
चेन या इंग्रजी शब्दासाठी “सोन्याची साखळी” असा मराठी पर्याय आहे, तोही वापरता येतो.
# सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला.
- सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला.
हे काही फार कठिण नाही पण प्रचंड मोठ्या वारंवारतेने ही चूक मराठी लेखनात दिसते. निश्चित तारीख लिहित असतांना “रोजी”, फक्त वर्षच लिहितांना “साली” आणि अंदाजे कालावधी माहित असेल तर अमुक वर्षाच्या “सुमारास” इतके सोपे आहे तरी ही चूक फार नजरेस पडते.
# सणा निमित्य/ निमित्त्य सुट्टी आहे
- सणानिमित्त सुट्टी आहे
# ते आता आमचे शेजारी “बनणार”
- ते आता आमचे शेजारी होणार.
# असे भांडून तुम्हाला काय “भेटणार” आहे ?
- असे भांडून तुम्हाला काय “मिळणार” आहे ?
# मी तुमचे पुस्तक विकत घेईल
- मी तुमचे पुस्तक विकत घेईन
# यासाठी एक योजना राबवली जातीय
- यासाठी एक योजना राबवली जात/ जाते आहे.
# कुठे निघालीस आणि ?
- कुठे निघालीस ?
# त्यांचे कार्यालय आज पाच वाजता बंद होणारे.
- त्यांचे कार्यालय पाच वाजता बंद होणार आहे.
दुसरा प्रयोग :
बंद “होणारे” दुकान उघडायला लावले.
# लेख मुद्देसूत आहे
- लेख मुद्देसूद आहे
# मऊसूद कणिक
- मऊसूत कणिक
# आंगावर अक्षदा पडताच कामावर रुजू झाला
- अंगावर अक्षता पडताच कामावर रुजू झाला.
# सर्व शेतकरीसोबत चर्चा करू
- सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करू
# काय चालुए / चालुये/ सुरूए / सुरुये इथे ?
- सुरूए ? सिरीयसली ?
# त्याच्यापर्यंत आला की जाग्यावर थांबतो
- त्याच्यापर्यंत आला की जागेवर थांबतो.
# त्यांना मंत्रीपदाचा शपथविधी दिला
- त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली
(हे फार कॉमन आहे मराठी वृत्तपत्रात आता)
# तो कोणे माहित नाही
- तो कोण आहे माहित नाही
# उत्कृष्ठ चव आहे
- उत्कृष्ट चव आहे
कोणतीही भाषा शक्य तितकी अचूक लिहावी- बोलावी असे नेहेमीच वाटते (forgive the old school guy here)
बोलतांना एकवेळ दुर्लक्ष केले तरी लिहितांना भाषा नीट लिहिली तर काय वाईट ? किमान तसा प्रयत्न केला तर ?
रोजचे व्हाटसपीय संदेश, समाजमाध्यमांवरच्या पोस्टी आणि लेख, वृत्तपत्रातील बातम्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लेख- निबंध, जाहिराती, फलक, अर्ज-पत्रे अशी सर्वत्र दीनवाणी भाषा बघून वाईट वाटतेच.
मी काही मराठी भाषेचा जाणकार नाही, माझे भाषाज्ञान अपुरे, तोकडे आहे याची कल्पना असल्याने मायबोलीवरील मराठी भाषेचे अभ्यासक, जाणकार आणि मराठीप्रेमी व्यक्तींचे inputs मिळवून, त्याची शहानिशा करून , लिहिण्या-बोलण्यात होणाऱ्या चुका कमी करणे आणि आपले लेखन अधिकाधिक निर्दोष करणे असा माझा प्रयत्न असतो. तोच या धाग्यामागचा विचार.
तर मंडळी,
- वरील उदाहरणांसारखे काही तुमच्या वाचण्यात-ऐकण्यात येते का ?
- तुम्हाला त्याचे वाईट वाटते की “चालतयं थोडेफार” असे वाटते? म्हणजे “खुपसारे” दागिने घातलेले खुपत नाहीत फारसे ?
- आपण वापरत असलेला शब्द/ वाक्य प्रयोग चुकीचा आहे हे तुम्हाला कसे समजते/ले?
- तुमच्या संभाव्य चुका टाळण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता ? की चुका काढणाऱ्यांचाच राग येतो?
- तुम्हाला खटकणारी काही उदाहरणे (चूक आणि योग्य प्रयोग असे दोन्ही दाखवून देणारी) इथे लिहाल का ?
शुद्धलेखनाच्या “हि माझि मूलगी” प्रकारच्या चुकांबद्दल नाही तर वर दिलेल्या उदाहरणांसारख्या लेखनातल्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीबद्दल अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी हा धागा.
Disclaimers :
१} मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेबद्दल, तीतल्या शब्दांबद्दल, ते सहज वापरण्याबद्दल आक्षेप-अनादर नाही. धाग्याचा शीर्षकावरून लक्षात आले असेल-नसेल.
२} चुकीचे-बरोबर ठरवण्याचा तज्ञपणा स्वत:कडे असल्याचा दावा नाही. चुकीचे/ अयोग्य शब्द दुरुस्त करून दिल्यास आभारी राहीन.
३} कुणाचीही टर उडवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नाही. तसे कुणाला वाटल्यास आगावू दिलगिरी + माफीची विनंती.
अरण्यरुदन सहन केल्याबद्दल आभार.
आपल्या सर्वांच्या मौल्यवान अनुभवांच्या, विचारांच्या, अनुषांगिक माहिती आणि मासले-उदाहरणांच्या प्रतिक्षेत.
मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
मला हवे/ आवडते ते मी मिळवतोच.
>>>
फोर स्क्वेअर सिगरेटच्या जाहिरातीची पञ्च लाइन होती ही
अगदी माझ्या मनातले लिहिले आहे
अगदी माझ्या मनातले लिहिले आहे तुम्ही. मी त्या पेट पीव्ह धाग्यावर हे पूर्वी मांडले होते. आणि या धाग्याच्या निमित्ताने इथे आजच मला पडलेला एक प्रश्नही विचारून घेते.
माझी मुलं इथल्या मराठी मंडळाच्या शाळेत जातात. मराठी भाषा दिनाच्या एका WhatsApp पोल मध्ये एक पर्याय होता
२. मी कार्यक्रमाला उपस्थित राहील.
मी त्या मतदानात भागच घेतला नाही . कार्यक्रमा ला जाईन असं ठरवलंय. पण तिथले काही शिक्षक ही वरील उदाहरण दिल आहे त्याप्रमाणे बोलतात उदा. ( त्यांच्या भाषेत जसं की) खूर सारे मुल येणार , मी येईल , तुम्हाला वाढदिवसाला काय भेटलं. इ इ अजून मुलांना लिखाण शिकवt नाही पण WhatsApp संदेशan वरून त्यांच्या लिखाणाची कल्पना येते.
पण त्यांना किंवा इतरांना हे नम्रपणे कसं सांगू किंवा सांगूच नको हे मला समजत नाही. नवरा म्हणतो परदेशात कोणी मराठी बोलतय तर तू त्यांच्या चुका काढू नकोस. पण महाराष्ट्र मंडळात तेही मराठी शाळेत आणि अगदी रोजच्या व्यवहारातल मराठी, त्यात अशी परिस्थिती तर मी काय करू.
चांगला उपक्रम.
चांगला उपक्रम.
हे काही नेहमीचे.
यातील काही चुका ह्या बोली
यातील काही चुका ह्या बोली भाषेमुळे/ लहेजामुळे झालेल्या आहेत का? मला वाटलं तसं. अधिकृत काही लिहायचं असेल तर प्रमाणभाषेत लिहावं, पण संभाषणात्मक काही लिहिताना ते बोली भाषेतच लिहावं. तसं केलेलं लेखन मला वाचायला ही आवडतं.
या वाक्यातही आवडते, लिहावे असे लिहिणे शक्य होते, पण ते जाणिवपूर्व टाळण्यात आले आहे. इतकं वाचुन झाल्यावर मी माझ्या मनात 'याची वाचकांनी नोंद घ्यावी' , किंवा 'हुकुमावरुन' हे ही पुढे जोडून वाचुन टाकलं. हो!!! वाचुन 'टाकलं' च.
हे असं वाक्य वाचायला किती कृत्रिम, आणि निरस वाटतं? पूर्वी मलाही प्रमाणभाषा सोडून काही केलेले चूक वाटत असे, हल्ली मी जसं बोलतो तसंच लिहायचा आवर्जून प्रयत्न करतो.
वरच्या काही उदाहरणातील. चालूए, सुरुए मी विचारपूर्वक वापरायचा प्रयत्न करतो. संभाषणात जर मी 'काय चालू आहे?' असा प्रश्न विचारत नसेन तर लिहिताना तसं का म्हणायचं? जे तसं म्हणत असतील त्यांनी तसं लिहावं.
बाकी वस्तू 'भेटणार' - भाषाशुद्धी अभियानवाल्यांशी संवाद साधताना 'भेटणार' म्हणणे ही तर जादुची छडी आहे. भेटणार म्हटलं की पेटणार हे ठरलेलं. जरा मजा.
पुन्हा एकदा सांगती आहे, माझ्या सोबत, देताल का? मी तिकडे जातीय, हे असं वाचलं आणि माझ्या डोळ्यासमोर वळू मधली वीणा जामकर किंवा अश्विनी गिरी आली. त्याचं 'पुन्हा एकदा सांगते आहे' केलं की छापखान्यातले खिळे बसवलेली विणा जामकर वाटेल ना?
परोक्ष आणि अपरोक्ष चे अर्थ खरंच वेगळे आहेत का? मी ही ते समानार्थी शब्द म्हणूनच वापरतो.
इतक व्यग्र आणि व्यस्त, निमित्त्य, मुद्देसूत, मतितार्थ इ. शी सहमतच. या ही बाबतील अजुन १०-१५ वर्षांनी हेच रुढ होईल आणि मग आपण सगळेच ते वापरू किंवा अरण्यरुदन करत राहू.
कोण जाणे.
MeghaSK, आमच्या इथल्या मराठी
MeghaSK, आमच्या इथल्या मराठी मंडळाच्या मेल्स चक्क इंग्रजीमध्ये येतात. माझं डोकं फिरतं.
मला बोली भाषेतील, चुकत माकत लिहिलेली मराठी कधीही प्रिय आहे. कारण त्याला पर्याय हा शुद्ध/ प्रमाण मराठीचा येत नाही तर चक्क मराठीला तिलांजली देऊन इंग्रजीचा येतो. सगळ्यांना मराठी वाचता येत नाही, इथे वाढलेल्या मुलांना मराठी वाचता येत नाही इ. खरं असलं आणि सर्वांना सामावुन घ्यायला इंग्रजीची गरज असली तर दोन्ही भाषांत लिहावे, पण ते न होता मराठी मंडळातच मराठी गायब होते. हे लाजिरवाणं आणि खरंच केविलवाणं आहे.
तुम्हाला सुधारणा हवी असेल तर कोणाला सांगण्यापेक्षा (कारण ते विनयशीलपणे करणे, आणि इतरांनी ते तसं स्विकारणे सोपे नाही) स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन ती जबाबदारी तुम्ही घ्या. हाच सोपा पर्याय मला दिसतो.
>>पण महाराष्ट्र मंडळात तेही
>>पण महाराष्ट्र मंडळात तेही मराठी शाळेत आणि अगदी रोजच्या व्यवहारातल मराठी, त्यात अशी परिस्थिती तर मी काय करू.>>
कुठल्याही भाषेबाबत बोलायचे तर योग्य शब्द, वाक्य रचना सातत्याने कानावर पडणे, वाचनाच्या निमित्ताने डोळ्याखालून जाणे फार गरजेचे. परदेशात/परप्रांतात रहात असाल तर हे सहज घडत नाही. त्यातून आत्ता जी नवी पिढी परदेशात रहात आहे त्यातल्या बहूसंख्य पालकांचे स्वतःचे शिक्षणच इंग्रजी माध्यमात झालेले आहे. योग्य मराठी बद्दल त्यांचाच मनात संभ्रम असू शकतो. तुम्हाला सवड काढून मराठी शाळेसाठी वेळ देता आला तर हळूहळू अपेक्षित बदल नक्की घडेल. बाकी घरात मराठीत बोलणे, कानावर चांगले मराठी पडेल यासाठी प्रयत्न करणे हे आपल्या हातातले सोपे उपाय आहेतच. मुलं इंग्रजी भाषा असलेल्या देशात वाढत असली, त्या भाषेत व्यवहार करत असली तरी चांगली इंग्रजी यासाठी देखील प्रयत्न करावेच लागतात.
>>> अधिकृत काही लिहायचं असेल
>>> अधिकृत काही लिहायचं असेल तर प्रमाणभाषेत लिहावं, पण संभाषणात्मक काही लिहिताना ते बोली भाषेतच लिहावं.
)
'लिहावं' असं म्हणणार नाही, पण अनौपचारिक संभाषणात चालवून घेता येतं. (घेते आहे / घेत्ये / घेतेय आताशा.
तरीही 'वगैरे' हा शब्द इतर कोणत्याही प्रकारे (वैगरे, वै इत्यादी) लिहिलेला वाचला की मला एकदम डोळ्यांवर ओरखडा उमटल्यासारखं वाटतं अजूनही.
'अपरोक्ष' चुकीच्या अर्थाने रुळला आहेच. बहुधा 'वर्दी', 'अंदाज', 'बहुदा', 'खूप सारे'/'खूप जास्त' वगैरे शब्दप्रयोगही रुळण्याच्या मार्गावर आहेत.
>>> अधिकृत काही लिहायचं असेल
.
<<<
<<<
यातील काही चुका ह्या बोली भाषेमुळे/ लहेजामुळे झालेल्या आहेत का? मला वाटलं तसं.
>>>
मलाही तसेच वाटले.
आणि तसे असेल तर चालतंय की असेही वाटले.
धाग्याचा हेतू छान
परदेशात किंवा खरे तर आता भारतातही कोणाची मुले चुकीचे मराठी बोलत असेल तर आधी त्यांच्या मराठी बोलण्याचे कौतुक करावे. ते देखील हातचे न राखता करावे म्हणजे त्यांना स्वतःलाही आपल्या मराठी बोलण्याचे कौतुक वाटू लागेल. जेणेकरून ते स्वतःच आपली मराठी अजून छान कशी होईल हे बघतील.
अनिंद्य,
अनिंद्य,
अगदी समायोचित लेख. मस्त.
मी सुद्धा यातील बऱ्याच चुका केल्या आहेत. कदाचित अजूनही करतोय.
माझी मदत करा/ मला मदत करा.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
अनिंद्य,
.
अपरोक्षचा तिसरा अर्थ
अपरोक्षचा तिसरा अर्थ मोल्स्वर्थही 'चुकीचा पण रुळलेला' या खाली तो अर्थ देतो.
अपरोक्ष aparōkṣa a (S अ, पर, अक्षि) Not invisible or imperceptible. 2 Present; before the sight or view. 3 (Commonly, but inaccurately.) Absent or away: or as ad or prep In the absence of; behind the back of.

आता तो बरोबर आहे म्हणून मान्य करुन पुढे चालावे का तो चुकीचा आहे हे सांगात रहावे?
हे आता मोल्सवर्थ काळापासून रुळलेलं आहे का त्यात काही हल्ली सुधारणा झाल्या आहेत मला कल्पना नाही. पण एकुणच नवं काही मान्य करण्याची, सामावुन घ्यायची आपली आस्था बघता, मोलस्वर्थ काळापासून अपरोक्षचा तो रुळलेला अर्थ असावा.
इंग्रजीत असे विरुद्धार्थी शब्द समानार्थी म्हणून रुळलेले अनेक आहेत आणि ते तसे शब्दकोशाने आणि भाषा वापरणार्या बहुतेकांनी मान्य केलेले आहेत. एकच शब्द विरुद्ध अर्थानी वापरण्याची ही अनेक उदाहरणे इंग्रजीत आहेत.
हे आपलं उदाहरण म्हणून मराठी भाषा किती समॄद्ध आहे याचे गोडवे गाऊ या की!
सध्या माझ्या डोक्यात गेलेले
सध्या माझ्या डोक्यात गेलेले दोन शब्द म्हणजे . भले भले मराठी लोक सुद्धा आजकाल समजूतदार या शब्दाऐवजी समजदार असा शब्द वापरतात . दुसरं म्हणजे धनत्रयोदशी हा शब्द सुद्धा लोप लावला आहे , मराठी लोक सुद्धा आजकाल धनतेरस म्हणतात . खूप त्रास होतो .
सकाळ मधलं कोडं सोडवताना सुद्धा हे दोन शब्द आले होते ते हि एकाच दिवशी .
माझी मदत...
माझी मदत...
वस्तू भेटली...
हे रोज आढळणारे
परवाच व्हाट्सॅप वर एक लग्न
परवाच व्हाट्सॅप वर एक लग्न पत्रिका आली, वधूचे नाव चक्क 'पुजा' असे लिहिले होते !
मतितार्थ चूक आहे आणि मथितार्थ
मतितार्थ चूक आहे आणि मथितार्थ बरोबर आहे?
बाकी खूप ‘सारे’, ह्याच्या ‘सोबत’, बनवणार वगैरे शब्द वाचवत नाहीत आणि ऐकवत नाहीत. एकूणच धन्यवाद मराठी कानावर पडत असतं हल्ली. आणि लोकं म्हणणार त्या मागच्या भावना समजून घ्या. डोंबल!!
>>> मतितार्थ चूक आहे आणि
>>> मतितार्थ चूक आहे आणि मथितार्थ बरोबर आहे?
हो.
>> वधूचे नाव चक्क 'पुजा' असे
>> वधूचे नाव चक्क 'पुजा' असे लिहिले होते !>> लोल. मायबोलीवरही हे असं लिहिणारे बरेच जणं आहेत. शुद्धलेखनाचा क्लास काढता येईल.
सांगितल्या गेले असे ले च ल्या
सांगितल्या गेले असे ले च ल्या करणं ही कॉमन आहे.
सांगितले गेले
विशेष नामाला व्याकरणाचे नियम
विशेष नामाला व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत, हे इथल्या चुका काढणार्या लोकांना माहित नाही का?
पूजा पुजा पिजा पेजा काहीही नावं असेल की त्या व्यक्तीचे.
मराठीत 'पुजा'च बरोबर आहे.
मराठीत 'पुजा'च बरोबर आहे. हिंदीत 'पूजा' असा उच्चारही करतात आणि लिहितातही.
(अनिंद्य, तुमच्या मथळ्यात 'म्हनूं'मधल्या 'नू'वर अनुस्वार का आहे?)
पिजा, पेजा असतं नाव तर
पिजा, पेजा असतं नाव तर पत्रिकेत तसंच लिहिलं असतं ना?
हो! अर्थातच! म्हणुनच 'पुजा'
हो! अर्थातच! म्हणुनच 'पुजा' लिहिलं आहे.
… तुमच्या मथळ्यात 'म्हनूं
… तुमच्या मथळ्यात 'म्हनूं'मधल्या 'नू'वर अनुस्वार का आहे?…
कारण मी तसेच वाचले आहे. बरोबर नाही का ? अहिराणी भाषा प्रभाव असेल असे वाटले. नॉट शुअर
My bad !
My bad !
का कुणास ठाऊक, 'पुजा' हे वधूचे नाव वाचून हे चूकच आहे असे वाटले !
Now I know better.
My bad !
.
स्वाती, मराठीत पुजा बरोबर आहे
स्वाती, मराठीत पुजा बरोबर आहे??
नवल आहे!
बाकी
जेवण बनविणे
साडी घालणे
केसं मोकळे सोडणे
वरणाला डाळ म्हणणे...
...
असे ओरखडे उमटत रहातातच
अमितव +१
अमितव +१
"खेडेगावात शाळेच्या सान्निध्यात राहून मुलगा जर प्रमाण भाषा बोलायला लागला तर घरचे लगेच म्हणतात," जरा साळंत जायला लागला त लगीच वान्या बाम्हनावानी बोलायला लागला का?" भाषा, मराठी शब्द,व्याकरण, शुद्धलेखन, प्रमाणलेखन, बोली अशा भाषाविषयक असलेले अभ्यास गट फेसबुक वा वॉट्सपवर आहेत. तिथही मी हीच प्रतिक्रिया दिली होती. ती जातीवाचक म्हणुन काढून टाकली गेली. न आणी ण यातील वापराविषयी असलेले निरिक्षण या बाबत ती चर्चा होती. भाषा विषयक गुपवर अशा गोष्टी बर्याचदा मांडल्या जातात. अर्थहानी होउ नये म्हणून तो आग्रह प्रमाणभाषेसाठी योग्यही आहे. परंतु भाषेकडे केवळ संवादाचे माध्यम असे पहाता येत नाही. तो लोकसंस्कृतीचा इतिहास आहे. लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा त्यात दिसतात. मी खेड्यात वाढलो. खेड्यात बहुजनांची संस्कृती असते. शाळेमधे पुस्तकातील प्रमाण भाषा व घरी, व्यवहारात बोली भाषा यामुळे डोक्यात एक भाषिक गोंधळ तयार होतो. संस्कारक्षम वयात जेव्हा पुस्तकाचा, नागरी भाषेचा प्रभाव व आकर्षण असते त्यावेळी स्वत:मधे आपल्या नकळत होणारा बदल इतर लोक टिपत असतात. माझ्या शाळेतल्या एका मित्राशी जेव्हा शुद्धलेखन व पुस्तकी भाषा याविषयी बोलत होतो . तेव्हा त्याने घरात आई त्याला जे म्हणाली ते त्याने मला सांगितले. " लागला का वान्याबाम्हनावानी बोलायला " हे सुनावताना तिला हे सांगायच असत की अरे ती अभिजनांची भाषा. आपण आपल्या भाषेत॒ बोलावे. तुझ ते शाळेत वगैरे ठीक आहे. इथे ती भाषा कशाला? हा आशय वर्गवाचक आहे. जातीवाचक नाही. भाषेचे कट्टर अभिमानी अभिजन लोक भाषेला एका चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतात. बोली भाषा त्यात बसत नाही. त्यांचा हा शिस्तीचा वा बिंदुगामीपणा एका भाषिक तर्कटता वा दुराग्रहाकडे नेतो. अर्जुनाला जसा माशाचा डोळाच फक्त दिसतो तसे यांना भाषेतील व्याकरण, प्रतिशब्दाचा अट्टाहास, प्रमाणीकरण वा काटेकोरपणा दिसू लागतो त्याचेच भिंग लावून ते पहात असतात. मग भाषिक विद्रोही लोकही अभिजनांची टिंगल उडवताना दिसतात. एकदा एक व्यक्तिचित्रण करताना मी दत्तू बाम्हन असे लिहिले. ते प्रूफरिडर ने दत्तू ब्राह्मण असे केले. त्यामुळे व्यक्तिचित्रणाच्या पार्श्वभूमीचे भाषिक सौंदर्यही हरपले. शिवाय आशयहानी झाली. एका नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे..... असे श्रावणातल्या कहाण्या वा कथासार मधील शब्दरचना ही साहित्यातील नागर संस्कृतीचा पगडा दर्शवते. त्या ठिकाणी बाम्हन शब्द वापरुन चालणार नाही. जातीवाचक या शब्दाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक भांडवल करताना त्याचे अर्थ बदलले जातात. त्या अर्थात एक कडवटपणा चिकटतो. ब्राह्मण्य या शब्दाचे असेच अर्थ विद्रोही चळवळींनी बदलले आहेत. भाषेकडे " लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा " म्हणून कसे पहायचे याचे तारा भवाळकरांच्या पुस्तकात अतिशय उत्तम रित्या विवेचन आहे. वाचनीय पुस्तक आहे.
छान मुद्दे आले आहेत वर, नीट
छान मुद्दे आले आहेत वर, नीट वाचतो.
… विशेष नामाला व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत …
हे मान्य.
दिपिका, दीपिका, दीपीका, दिपीका - सर्वच नाम असल्याने बरोबर. दिपक, विर, सुनिल, जित, मित ही नावे चालवून घेतो, मुलांचे नाव काय ठेवावे व ते कसे लिहावे हा आईबापाचा अधिकार.
तुप, कुल, फुल, आता सर्वमान्य झालेच आहे परंतु तो माझा मुद्दा नाही. Punctuation शुद्धलेखन वायलं, अयोग्य शब्दवापर वायला.
स्वाती, पुजा हा शब्द मला
स्वाती, पुजा हा शब्द मला माहीत नव्हता.
पण मराठीत पुजा आणि पूजा दोन्ही आहेत.
दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत.पुजा (p. 2063) pujā ...पूजा) देव, मोठी विभूति इ॰ चा आदर- सत्कार, अर्चा; मानसन्मान; उपासना; भक्ति. २ पूजेचें साहित्य व पूजा करतांना करावयाचे विधि. ३ भूतबाधा झाली असतां शूद्र लोक करितात तो संस्कार. [सं. पूजा] (वाप्र.) ॰करणें-घालणें-१ (ल.) बडविणें; चोप देणें; मारणें; पिटणें. २ भोसडणें; खरडपटी काढणें. ॰बांधणें-देवाच्या मूर्तीस, पुष्पादिकांनीं सजविणें; देवाला शृंगार.
पूजा (p. 2081) pūjā पूजा —स्त्री. १ पूजन; अर्चा; उपास्य दैवताची आराधना. पूजेचे पंचोपचार व षोडशोपचार असे प्रकार आहेत. २ पूजना- साठीं गंध, फुलें इ॰ रूप आणलेली सामग्री. ३ सत्कार; सन्मान; आदर ठेवणें; भक्ति. ४ (ल.) द्रव्यरूप सत्कार; पैसा. 'पै कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ।' -ज्ञा
Pages