शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चर्चा. आज मंथरपणे वाचतोय. Happy

"भूतभावन” हे शिवाचे नाव आहे हे माहीत नव्हते. >> हे विष्णूचे नाव असावे ना? विष्णू सहस्त्रनामाची सुरुवातच ह्या श्लोकाने होते.
ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।
भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १॥

त्यातली बरीच नावं शंकराची पण आहेत. सर्वः शर्वः शिवः स्थाणु:… ईश्वरः …. इत्यादी. ती सगळी विशेषणं असल्याने ज्या ज्या देवांना लागू होतात त्या सर्वांना ती देता येतात.

भूत काही पिच्छा सोडत नाही आपला 😀

@ अमितव, अगदी परफेक्ट संदर्भ.

.. त्यातली बरीच नावं शंकराची पण आहेत ..
+ १

भूतभावन म्हणून शिवशंकर जास्त फेमस आहेत मात्र.

@ मंथर

मंथरगती = slow moving या अर्थाने वाचलाय. प्रचुर या अर्थी कमीच.

मंथरबुद्धी / मंथरमती (= येडचाप/ dumbo) हे तर मोलाचे विशेषण आहे हिंदीत. मातोश्री चिडल्या की बहाल करत अस्मादिकांना 😀

मंथरबुद्धी मराठीतही चालावे. वेडपट लोक तर सर्वत्र असतात.

अनादि, सनातनचिरंतन
या तिघांचे अर्थ कोशात पाहिले असता एकमेकांत मिसळून गेलेले आढळतात. ते एकमेकाचे पर्यायी शब्द सुद्धा दाखवलेले दिसतात.

अर्थात संदर्भानुसार आपण त्यापैकी योग्य तो शब्द निवडतो.
उदा. :

  • अनादि काळ
  • सनातन धर्म
  • चिरंतन मूल्य

नुकतेच मराठीत ष (मूर्धन्य) आणि श (तालव्य) वापरायचा नियम म्हणून हे वाचले :

ष :

“ट” अक्षरापूर्वी (यथा कष्ट, स्पष्ट)
“ऋ” किंवा “कृ”अक्षरानंतर (यथा ऋषी, कृषी, कृष)
उपसर्गानंतर (यथा अभिषेक, विषम )

श:

“च” अक्षरापूर्वी (यथा आश्चर्य, निश्चय, निश्चित)
दुसऱ्या भाषेतून आयात केलेल्या शब्दात (यथा शहर, स्टेशन)

हे बरोबर आहे का? असा काही नियम मराठी व्याकरण शिकवतांना शिकवतात का? असे ष आणि श च्या वापरासाठी अजून काही नियम आहेत का ?

सोर्स फारसा विश्वसनीय वाटला नाही म्हणून ही विचारणा.

जाणकारांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे

असा काही नियम आठवत नाही.
पण कृश (अशक्त, बारीक) हा शब्द नियमात बसत नाही मग.
जाणकारांनी सांगावे

>>>
असा काही नियम आठवत नाही.
पण कृश (अशक्त, बारीक) हा शब्द नियमात बसत नाही मग.
<<<
+१

>>> उपसर्गानंतर (यथा अभिषेक, विषम )
हेही कळलं/पटलं नाही.
विशिष्ट/विशेष, अभिशप्त, इ.

बोरकरांच्या (माझ्या अत्यंत आवडत्या) 'स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा' कवितेत

तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा

अशा ओळी आहेत. त्यांतला अर्थ खोल आहेच, पण नाद आणि अनुप्रासही पहा!

काही उदाहरणे संधी नियमांची वाटतात.
उपसर्गापुढे नव्हे तर विसर्गापुढे च किंवा छ आल्यास विसर्गाचा श् होतो.
त्यानुसार निश्चय, निश्चित. पण याच उपसर्गापुढे कर्म, पाप आल्यास विसर्गाचा ष् होऊन निष्कर्म, निष्पाप.
अभि या उपसर्गानंतर श येत असल्याची उदाहरणे स्वाती यांनी वर दिलेली आहेतच. अभिषेक व विषममध्ये व्यंजन संधी आहे आणि स चा ष झालाय, याचा विशिष्ट नियम आठवत नाहीय.
ट च्या आधी मूळ (हलन्त) श् येत असल्याचे उदाहरण आठवले नाही, ष् च येतो तेव्हा हे निरीक्षण बरोबर असावे.

असे काही नियम नसावेत. त्यांनी त्यांना माहिती असलेली काही उदाहरणं जणू हे नियमच आहेत अशा प्रकारे लिहिली आहेत. मानव यांचा प्रतिसाद बरोबर आहे.

संस्कृतात श चा ष कधी करायचा याचे बरेच नियम आहेत. सगळे आठवत नाहीत पण खालील

मूर्धन्य उच्चारांच्या जोडीला प्रत्ययात श येत असल्यास त्याचा ष होतो. उदा. बाल शब्दाचं सप्तमी एकवचन बालेशु असं होतं पण राम ज्यात र मूर्धन्य आहे त्याचं रामेषु होतं. शिवाय न चा ण होतो. बालेन रामेण असं.

व्यञ्जन संधी होताना स् नंतर ट ठ ड ढ ण पैकि काहीही आल्यास सचा ष होतो. पदान्तर्गत संधीलाही हा नियम लागू होतो.

यावरून आठवले. भांडारकर संस्थेने लक्षात राहण्यास दिलेला णोपदेश: नियम आणि दोन अपवाद :
नियम: शब्दांत र्, ऋ किंवा ष् येत असल्यास न चा ण होतो.
अपवाद १: शब्दात क्रमाने शेवटल्या र्, ऋ, ष् नंतर च, ट, त या तीन वर्गातील कुठलेही व्यंजन येत असेल तसेच ल, स, श या तीन व्यंजनांपैकी कुठलेही व्यंजन येत असेल तर
अपवाद २: न शेवटी असून तो हलन्त असेल तर

तृतीयेत 'रामेण' आणि षष्ठीत 'रामाणाम्' तसेच छात्रेण, छात्राणाम् (र्) वृक्षेण, वृक्षाणाम् (ऋ आणि ष् दोन्ही. क्ष हे क + ष् पासुन बनलेले जोडाक्षर आहे.) विषयेण, विषयाणाम् (ष्) यांत नियमानुसार न चा ण झालाय.
कर्ज हा शब्द चालवला तर ज हे च वर्गातील व्यंजन शेवटल्या र् नंतर आल्याने पहिल्या अपवादामुळे न चा ण होत नाही व कर्जेन, कर्जानाम् अशी रूपे होतात.
द्वितीया बहुवचनात 'रामान्, वृक्षान्, छात्रान्, विषयान्' अशी रूपे होतात- इथे दुसऱ्या अपवादामुळे न चा ण होत नाही.

जरा किचकट आहे पण कुठली व्यंजने कुठल्या वर्गात आहेत हे लक्षात असेल तर लक्षात ठेवण्यास सोपे वाटल्याने इथे दिले. पहिल्या अपवादासाठी मी भजनाच्या चालीवर 'चटत करत नियमभंग, सशल व्यंजनियां' असे लक्षात ठेवले आहे.

@ मानव, हपा,

भारीच माहिती.

.. चटत करत नियमभंग, सशल व्यंजनियां..

हे ठुमक चलत रामचंद्र … च्या चालीवर ना ?

हो. 'व्यंजने'चे 'व्यंजनियां' हे गेयतेसाठी. सशल 'व्यंजनियां' नमूद केल्याने ही तीन व्यंजने फक्त आणि चटत - त्या वर्गातील सगळी व्यंजने.

@ स्वाती

… नाद आणि अनुप्रासही पहा… हो, सुंदर.

@अनिंद्य आज इतर कुठल्या लिंकसाठी फेसबूक उघडले तिथे खालील पोस्ट सजेशन्समध्ये दिसली. हेच बहुतेक व्हायरल झाले असावे.
https://www.facebook.com/mohana.desapande/photos/d41d8cd9/25693030513697...

“अटकी”

“भुताटकी” शब्दशोधावरून समजलेला नवीन शब्द

अटकी = खेळ
भुताटकी = भुतांचा खेळ

अर्थात इथे अनेकांना माहिती असेल, माझ्यासाठी नवीन होता शब्द.

छान शब्द, अनिंद्य.
शब्दाटकी म्हणायला पाहिजे या धाग्याला मग!

रच्याकने,

पाचावर धारण बसणे...हा वाक्प्रचार कुठून आला असेल?

* पाचावर धारण बसणे
>>>
धारण म्हणजे धान्य भाव.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी, तांदळाचा भाव जो आधी रुपयाला 16 मण असायचा तो रुपयाला पाच मणापर्यंत खाली आला. त्यावरून >>>> महागाईने लोकांची धाबी दणाणली >>>> लोकांच्या मनात भीती घर करून बसली, हा अर्थ

बापरे!
हा अर्थ खरेच माहिती नव्हता! छान माहिती.
फक्त...
तांदळाचा भाव जो आधी रुपयाला 16 मण असायचा तो रुपयाला पाच मणापर्यंत खाली आला. त्यावरून >>>

भाव खाली आला की वाढला?

शब्दाटकी 😀

नवनवीन शब्द कॉइन करण्याचा तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे स्वानंदी.

भुताटकीला rhyme करणारा एकच शब्द माहिती आहे - मुंबई महाबळेश्वर रोड ट्रिप करतांना येणारा “खंबाटकी” घाट

.. धारण म्हणजे धान्य भाव.…

नवीन माहिती.

धारण कधी सुटा वाचला नाही आहे, त्याचा काटा “पाचावर“ अडकलाय समहाऊ 😀

नळी फुंकली सोनारे यात सोनाराचा काही विशेष संदर्भ आहे का तो फक्त एक प्लेसहोल्डर आहे - म्हणजे लोहारे असले तरी काही फरक पडला नसता?

धन्यवाद हर्पा. पण सोनार जेंव्हा नळी फुंकतो, तेंव्हा हवा इप्सित कार्य साध्य करते. पण त्या म्हणीचा अर्थ मात्र याच्या उलट आहे म्हणून त्यातल्या सोनार या शब्दाबद्दल उत्सुकता होती.

Pages