शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही याबाबत गोंधळ होतो, त्यात हिंदीत लोमडी, गिदड, भेडीया, सियार यातील हे नक्की कुठले प्राणी आणि इंग्रजी jackal म्हणजे लांडगा असा अर्थ मी नेहमी घेतो. जम्बुक - द्राक्ष कथा बहुतेक संस्कृत मध्ये होती तरीही जम्बुकमध्ये मी गोंधळ करतो.
फसवणारा, लबाड म्हणुन मी वञ्चुक - जम्बुक = लांडगा असे लिहिले. ते कोल्हा असेल मग.

गोंधळ +१
कुत्रा कोल्हा आणि लांडगा यांचे जैविक कुळ Canidae (the dog family) हेच असल्याने बऱ्याचदा इंग्लिश आणि मराठी नावांमध्ये देखील गोंधळ होतो.
मात्र fox चे कुळ वेगळे आहे - Vulpes genus

fox =कोल्हाच
गुगल आणि शालेय पुस्तकांनुसार.
Happy

वञ्च् संस्कृत धातु. म्हणजे फसविणे.
>>>> यावरून वंचना, आत्मवंचना आठवले.

अनिंद्य+१
बनचुकेपणा हा शब्द रोचक आहे. मी काहीतरी वेगळं समजत होते, स्वतःला मोठं काहीतरी समजणे म्हणजे "आम्ही त्या त्या क्षेत्रात/ अभ्यासात 'बनचुके'" Happy

आलंबन
हा शब्द खालील वाक्यात प्रथमच वाचला :
"हिंसेच्या संदर्भात संबंधात असलेल्या हेतू, फल, आश्रय आणि आलंबन या चार गोष्टींविषयी त्यांनी सखोल चिंतन केले".

या शब्दाचे तब्बल ७ अर्थ आहेत :
१. लोंबणे, २. आधार;
३. आश्रय. ४. स्थान.
५. . मनोवृत्तीला उत्तेजक कारण. ६. . एकाग्रता.
७. जोडलेला.
. .
वरील वाक्यात पाचवा अर्थ अभिप्रेत असावा काय ?

आज विजय तेंडुलकर यांची जयंती. त्यांच्या लेखनात भरपूर अरबी/फारसी शब्द येत आणि त्यांचा वापरही चपखल केलेला असे.
आता पटकन आठवणारे तीन शब्द म्हणजे :
निहायत, अरबूजअफसोस .

निहायत
(नाम) = सीमा; पराकाष्ठा
(वि.) = अत्यंत.
. .
अरबूज
= राकट; आडदांड; खेडवळ; मठ्ठ
. .
अफसोस
= शोक; दुःख, हाय हाय!

अरबूज हा शब्द असलेले तेंडुलकरांचे हे एक वाक्य :

"त्यात जणू स्पर्धा लावून निवडलेल्या एकाहून एक अरबूज, भकास आणि केविलवाण्या चेहऱ्याच्या अभिनयरहित नट-नटींऐवजी . . . "

हे भारीय.

“मठ्ठ” म्हणण्याऐवजी “अरबूज” म्हटले तर काहीतरी कॉम्प्लिमेंट दिल्यासारखे वाटते ऐकायला 😀

‘मंथन’वरून आलेले ताक घुसळण्यासंबंधीचे रोचक शब्द :
माथण/ णी
= ताक घुसळण्याचा डेरा

माथला/वा
= घुसळण्याच्या रवीचा फुगीर भाग

माथवीय
= डेऱ्यातील पाणी

मथितार्थ हा शब्द पण मथ/मंथ = घुसळणे यावरून आला आहे. मथित अर्थ म्हणजे घुसळून काढलेला अर्थ. ताक घुसळून ज्याप्रमाणे लोणी वर यावं, तसं वाङ्नवनीत म्हणजे मथितार्थ. तो अनेकदा चुकून मतितार्थ असा लिहिला जातो.

अम्ब श्राम्यसि तिष्ठ गोरसमहं मथ्नामि मन्थानकं
प्रालम्ब्य स्थितमीश्वरं सरभसं दीनाननो वासुकिः ।
सासूयं कमलालया सुरगणः सानन्दमुद्यद्भयं
राहुः प्रैक्षत यं स वोऽस्तु शिवदो गोपालबालो हरिः ll
असा एक टी म वी च्या षष्ठी परीक्षेत श्लोक होता. सारांश: यशोदा ताक घुसळत आहे आणि दमली आहे कृष्ण तिला म्हणतो आई थांब मी घुसळतो आणि आवेशाने उठतो. हे ऐकून (समुद्र मंथन पूर्वीचा अनुभव आठवून) वासुकी नाग घाबरून (त्याला वाटते आता परत आपली सालटी निघणार), देव खुश होऊन (त्यांना वाटते आता पुन्हा रत्ने निघणार), लक्ष्मी असुयेने (अजून एखादी लक्ष्मी आली तर काय घ्या), आणि राहू घाबरून (आता हे एक धड तरी धड राहू दे) ज्याच्याकडे बघतो आहे असा तो गोपाल कृष्ण तुमचे रक्षण करो. Happy

हरपा गोरस म्हणजे दूध दही ताक सगळेच. इथे दही अर्थ घ्यावा. अनिंद्य सुभाषिताच्या ह्या प्रकाराला काव्यशास्त्रविनोद म्हणतात. टी म वी च्या सगळ्या परीक्षा पुस्तकात ह्यावर दहा बारा श्लोकांचा एक पाठ नक्की असतोच असतो. असे पुराणातले संदर्भ लावून ती ती देवता तुमचे रक्षण करो असा सारांश असतो. फारच गमतीदार असतात हे मात्र नक्की.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : हे मराठी/ इंग्रजी/ संस्कृतच्या पाठ्यक्रमाव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत असे. त्याबद्दल असावे.

आमच्या शालेय जीवनात काही गुरुजी टिमविच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न वर्गात आम्हाला समजावून सांगत असत.
. .
उत्तम विचारमंथन
सर्वांना धन्यवाद !

गोरस = दूध

पूर्व दिशेला गुलाल उधळुन
ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन
गेले यमुनेला
धूप, दीप, नैवेद्य असा हा
सदुपचार चालला
स्वीकारावी पूजा आता, उठी-उठी गोपाला

Pages