Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज, लावणी Lol
अनिंद्य Lol तरूणच असावा असं वाटतंय.
माझेमन Lol

@ अस्मिता, बरं झालं आलात. मी विचार केला की सरड्यावर फारसा “आरडा- ओरडा” न करता शांतपणे declutter सुरु केले की काय ? 😀

@ मंजूताई,

आता ही प्रतिभा कोण ?

@ माझेमन

… परिस्थितीनुसार नॉमिनी बदलणे महत्वाचे आहे….

अनुमोदन.

@ अ'निरु'द्ध

… सरडीणीला साडी-चोळी.. 😀

>>> त्यात एक सरडा गराजमधे शिरला आहे >>>

सरड्याची धाव गराज पर्यंत ...

मायबोलीने मराठी साहित्याला दिलेली नवीन म्हणीची भेट.

विषयांतरासाठी क्षमस्व अनिंद्यदा

@ चामुंडराय,

होय. हा सरडा कुंपणापर्यंत धाव न घेता पुढे firm steps घेऊन गराजमधे आला आहे. म्हणून नवीन म्हण स्वीकार्य व्हावी 🙂

BTW, तुमचे सदस्यनाम वाचल्याबरोबर ते लहानपणी वाचलेले .. श्री चामुंडराये…. श्री गंगराये सुत्ताले करवियले .. असे स्वत:शीच मोठ्याने म्हणतो. खूप दिवसांपासून तुम्हांला सांगायचे होते.

@ टॉपिक

.. तुम्ही आवरा आवर नाही केलीत तरी मागे त्याची विल्हेवाट लावली जातेच…

हे खरे असले तरी ते फक्त एक काम नसून एक emotionally draining अनुभव असतो. दु:ख, वियोग, कटु-गोड आठवणी, भावभावना दाटून येणारा.

मागे रहाणाऱ्यांसाठी आवराआवर सोपी करून जाणे चांगलेच आहे.

>>> श्री चामुंडराये…. श्री गंगराये सुत्ताले करवियले .. >>>

अब्बी बातां निकलीच है तो...

माझे व्यवहारातील नाव ठेवताना मला कुणी विचारले नव्हते, त्या निर्णय प्रकियेत माझा काहीही सहभाग नव्हता. माझ्यावर थोपवलेले नाव जन्मभर बाळगणे भाग होते. इथे आयडी नाम धारण करताना मात्र मला नाम निवडण्याचा पर्याय उपलब्ध होता.

माझ्या माहितीप्रमाणे "चामुंडराय" ने पहिला मराठीतील शिलालेख लिहिला होता, आता ह्या माहितीत काही बदल झाला असल्यास कल्पना नाही.

त्यामुळे त्याकाळच्या सोशल मीडियावर म्हणजे शिलालेखावर लिखाण करणारा पहिला आयडी म्हणून चामुंडराय नावाचा आयडी धारण केला.

इति आयडी नामकरण उत्पत्ती कथा संपूर्णम्.

अधिक विषयांतरासाठी पुनःश्च क्षमस्व.

इथे एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे.
वस्तू कमी करणे आणि वस्तूंमधला मोह कमी करणे , या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

जर वस्तूंमधला मोहच नष्ट झाला असेल, तर वस्तूंविषयी वेगळ्या अर्थाने डेथ क्लीनिंग करण्याची गरज उरत नाही. अशा अवस्थेत त्या वस्तू ठेवाव्यात की द्याव्यात, वापराव्यात की टाकाव्यात , हा निर्णय मृत्यूनंतर वारस सहज घेऊ शकतात. त्यातून मानसिक गुंतागुंत निर्माण होत नाही, कारण वस्तूंबद्दलची आसक्ती उरलेली नसते. अर्थात पाश्चात्य पद्धतीप्रमाणे डेथ क्लीनिंग करूच नये हा आग्रह नाही. कल्पना पसंत असेल तर करावी. मोह नष्ट करणे हाच वानप्रस्थाश्रम आहे. प्रत्यक्षात जंगलात जाण्याची, संन्यास घेण्याची गरज नाही.

भारतीय परंपरेतही हाच विचार दिसतो. हळूहळू मोह-माया सैल होत जाणे, आसक्ती कमी होणे, आणि मी. माझे ही भावना कमी होणे , ही मुक्तीची दिशा आहे. इथे वस्तूंचा प्रश्न दुय्यम ठरतो, मानसिक मुक्ती प्राथमिक ठरते. त्यामुळे डेथ क्लीनिंग केली किंवा नाही केली, यापेक्षा मन मोकळे झाले आहे का हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो.

मात्र याचा अर्थ असा नाही की सगळीच जबाबदारी टाळावी. काही कर्तव्यं ही करावीच लागतात. विशेषतः कायदेशीर आणि आर्थिक बाबी ( बँक खाती, विमा, चल-अचल संपत्ती, नामनिर्देशन किंवा मृत्युपत्र), जे वरच्या काही प्रतिसादात आले आहे .
या गोष्टी स्पष्ट करून ठेवणे अत्यावश्यक आहे. यात मोह नाही, तर जबाबदारी आहे. यामुळे मृत्यूनंतर वारसांमध्ये गोंधळ, गैरसमज किंवा वाद निर्माण होत नाहीत.

मानसिक मुक्ती साध्य आहे, डेथ क्लीनिंग हे साधन असू शकते. पण कायदेशीर गुंतागुंत कमी करणे हे कर्तव्य आहे.
डेथ क्लीनिंग केलं तर उत्तमच न केलं तरी, मोह नसेल आणि कर्तव्य पार पाडलेलं असेल, तर तेही तितकंच समजूतदार आणि भारतीय विचाराशी सुसंगत वाटतं.

अकाली मृत्यूचा उल्लेख वर झालेला आहे. अशा वेळी तुम्हाला डेथ क्लीनिंग साठी किंवा मुक्ती साठी आधीच तयार व्हावे लागेल. म्हणजे आजपासूनच मोह माया यातून मुक्तीचा प्रवास सुरू करावा. तुम्हाला आवरा सावर करायला वेळ मिळणार नाही कदाचित पण आसक्ती कमी करत गेले आणि वेळेत कर्तव्ये पार पाडली तर गुंतागुंत टाळणे शक्य होईल.

<@ चामुंडराय,

इस्टोरी पसंद आया मेरे कू. लॉजिक भी. 👍

@ राज अज्ञानी,

.. वस्तू कमी करणे आणि वस्तूंमधला मोह कमी करणे , या दोन वेगळ्या गोष्टी आहेत…..

बरोबर. पण या एकमेकात गुंफलेल्या आहेत. सर्वच वस्तूंमधला मोह नष्ट झालेला असेल तर संतपदी पोहोचलो, तसे सहसा, सहज घडत नाही. माझ्यासारख्या सुखलोलुप लोकांसाठी तर नाहीच.

“सततचा गृहपाठ” म्हणून पसारा कमी करत राहिलो तर अतिरिक्त संचयाचा फोलपणा नीट समजत जातो आणि उपलब्ध, खूप आवडणाऱ्या सुखसुविधांचा उपभोग जास्त चांगल्याप्रकारे घेता येतो. अनावश्यक वस्तुंमधे जास्त अडकणे होत नाही, overall मोह कमी होण्यास मदत होते. Use the best you have, let go the rest हे तत्व (मलातरी) कामी येते.

तुमचा “आसक्ती कमी करत जाणे” हा मुद्दा योग्यच परंतु तशी prerequisite नाही. “कमी- मोजक्या वस्तूंवर जास्त आसक्ती” असे केले तरी जमते. मूळ लेखातला मुद्दा क्र.५.

मागे ठेवलेल्या पसाऱ्याचे जे करायचे ते वारसदार करतीलच. न करून जातात कुठे ? त्यांचे काम थोडे सोपे करणे हा Döstädning चा उद्देश आहे.

उत्तम मुद्दे मांडल्याबद्दल आभार 🙏

आसक्ती कमी करण्याची सक्ती नसल्यानेच या धाग्यावर येणं होतं.
'आसक्ती कमी करा' वगैरे विचार असते तर कदापि धाग्यावर पाय टाकला नसता. कारण ती करण्याची जराही इच्छा नाही. Happy

अमितव, तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा. एकमेवाद्वितीय आहात. Wink

अनिंद्य, तुम्ही इतरांचे विचार "खोडून" का काढताय ? तुम्ही धाग्यात तुमचा पॉईण्ट मांडला. सहमत असा किंवा नसा. कुणाला वेगळं काही म्हणायचं असेल तर ते मान्य नाही का ?

आसक्ती कमी करण्याची सक्ती नसल्यानेच या धाग्यावर येणं होतं.
'आसक्ती कमी करा' वगैरे विचार असते तर कदापि धाग्यावर पाय टाकला नसता. कारण ती करण्याची जराही इच्छा नाही. >>> आसक्ती बद्दलची राज यांची पोस्ट वाचली तर ती कोणत्या कॉण्टेस्ट मधे आहे याचं आकलना करून न घेता दुगाण्या झाडल्या आहेत. जन्मलेल्या बाळाची आसक्ती कमी करावी असं मत इथे कुणी मांडलंय का ?

हा विषयच मृत्यूची चाहूल लागल्यानंतर वस्तू देऊन टाकण्याचा आहे. जर हे मान्य असेल तर मग लॅपटॉप, मोबाईल देऊन टाकलेला असेल. या केस मधे तरी या धाग्यावर येणं होणार आहे का ? इथे क्लिअर आहे ना वस्तू "कधी" देऊन टाकायच्या आहेत ? त्या टप्प्यावर आसक्ती कमी करणे नसेल असा समज झालाय कि करून घेतला आहे ? अशा प्रकारचे मूर्खात काढणारे प्रतिसाद अनेकदा वाचनात आल्याने व्यक्त झालो. साधा माणूस, स्पार्कल यांनी या गोष्टीचा राग धरून अन्यत्र स्कोअर सेटल करू नये ही विनंती. Happy

बरोबर. पण या एकमेकात गुंफलेल्या आहेत. सर्वच वस्तूंमधला मोह नष्ट झालेला असेल तर संतपदी पोहोचलो, तसे सहसा, सहज घडत नाही. माझ्यासारख्या सुखलोलुप लोकांसाठी तर नाहीच. >>
समजले नाही. एकमेकात गुंफलेले म्हणजे काय? वस्तू कुणाला देऊन टाकणे म्हणजे त्या वस्तूचा मोह सुटत नाही का? मोह धरून वस्तू कशी काय कुणास देता येईल? मला वाटते तुम्ही प्रतिसाद पूर्ण वाचला नसेल.

आले आले स्पार्कल आले. Lol
हा एकदम ओरिजिनल आयडी आहे. मी फक्त हा कुणा कुणाच्या मागे लागलाय एव्हढंच नोट केलं. Lol
राग धरू नये अशी विनंती करूनही तडफडता झणझणीत जाळ दिसला. या पुन्हा. Lol
तुमच्या सहीत सगळे माझेच ड्युआयडी आहेत. बाकिच्यांचा अनुल्लेख बरा नाही. Happy
राज अज्ञानी तुम्ही माझे किंवा मी तुमचा ड्युआयडी हे माझं भाग्य समजेन तुम्हाला चालत असेल तर Proud

एका आयडीने आक्रस्ताळेपणा करायचा. कुणी दाखवून दिले कि ड्युआयडी वापरून "बघा कसं रहस्य फोडले आता तू बाद" हे जुनं झालं. कसं आहे काही आयडी काहीही करतात त्यांना कुणी बोलू शकत नाही कारण लगेच आयडी उडतो. तरीही त्यांना ड्युआयडी बाळगावे लागतात. एव्हढी वाईट वेळ कुणावर येऊ नये. हे प्रभू त्यांना क्षमा कर.

खूप आधी पासून माहीत आहे कोण आहे ते विकृत. पण.. असो. नाव घ्यायचं नव्हतं.

जगात अनैतिक काय असतं? "एका रेपिस्ट जज्ज पुढे रेप केस चालणे. तो जज्ज आहे म्हणून त्याची मुक्ताफळे ऐकावी लागणे"
आता मात्र प्रत्येक वेळी सिक्सर हाणणार.

@ राज अज्ञानी

तुमचा टेक नीट वाचला होता, समजला असे वाटते.

… एकमेकात गुंफलेले म्हणजे काय? समजले नाही ….

वस्तू कमी करणे; त्यातला मोह कमी/ नामशेष झाल्याशिवाय हे होईल का ?

In smaller steps आपण हे सतत, वारंवार करत गेलो तर मोठ-मोठे मोह कमी करण्याची net practice होते असे म्हणायचे आहे. There is tangible, identifiable link between the two things, isn’t there?

.. अनिंद्य, तुम्ही इतरांचे विचार "खोडून" का काढताय ?..

मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न नाही. Affirmative प्रतिसादांतून लक्षात आले असेल-नसेल, विषयाशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुभवांचे आणि विचारांचे धाग्यावर स्वागत आहे.

“विचार खोडणे” असे intention माझ्या लिहिण्यातून डोकावत असेल तर तो माझ्या भाषेचा दोष समजावा.

मधे आलेल्या ड्युआयडीने करमणूक केली. आपण मुद्द्यावर येऊ.

माझ्या वाचनानुसार ही संकल्पना खूप जुनी नाही. हिची माहिती तुम्ही दिलीत हे योग्य केलंत. पण यात जे अपेक्षित आहे त्याच्या पुढची पायरी आपल्याकडे आहे असे राज यांना म्हणायचेय. वस्तू देऊन टाकणे यापेक्षा मोह काढून घेणे. मग ती वस्तू तुम्ही ठेवली काय आणि देऊन टाकली काय . तुमच्या संकल्पनेत वस्तू देऊन टाकणे म्हणजे आवरा आवर आहे. पण ही आवरा आवर आपल्याकडे वारसांना करावी लागणे खूप कष्टाचे काम नाही. एवीतेवी लोक जमलेले असतातच. तिथे एव्हढे विधी असतात, त्यात वस्तू देऊन टाकणे सुद्धा असते. हा विधी आमच्याकडे आहे. जर वस्तू स्विकारायला नकार दिला आणि ती ठेवायची नाही असा निर्णय झाला तर मग नष्ट केली जाते. शक्यतो चांगले कपडे, फर्निचर याला खूप मागणी असते. चप्पल फक्त कुणी नेत नाही. कारण काय ते ठाऊक नाही. तेव्हां चप्पल तुम्ही देऊन टाका, पण मग बाहेर कसे जाणार ? जाण्याची वेल ठरलेली नसते.

पुढे त्यांनी म्हटलंय कि तुम्ही आवरा आवर केली तरी हरकत नाही, नाही केली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हे समजलेलं आहे. त्याच्यात एक वेगळा विचार अ‍ॅड केला आहे. मग पुन्हा भोपळे चौकात जायची गरज नाही म्हणून खोडून काढू नये असे सांगितले होते.

आता स्पार्कल यांना शोध लागलाय कि आम्ही दोघे एकमेकांचे ड्युआयडी आहोत तर त्यांच्या मन की बात मला ठाऊकच असणार. नाही का ?
उद्या भाजप , काँग्रेस किंवा एकाच पक्षाला व्होट देणारे सगळे एकमेकांचे ड्युआयडी आहेत असे म्हटले तरी नवल वाटणार नाही. Lol

भौतिक अपरिग्रह वेगळा आणि भावनिक अपरिग्रह वेगळा. थोडंफार परस्पर कनेक्शन असल्याने गुंता होतो हेही खरे. पण सगळ्याच्या सगळ्या वस्तूंमधे जीव गुंतलेला असणं शक्य नाही, असेल तर मात्र कुठल्यातरी मानसिक आधाराची गरज वस्तूंमधे शोधत आहोत. थोड्याफार वस्तूंमधे जीव गुंतलेला असणं खूप नॉर्मल आहे, तेही वय होईल तसं हळूहळू देऊन टाकून विलग होणं हे पुढच्या पिढीला आपल्यामुळे कमीतकमी त्रास व्हावा म्हणून करायचे आहे. एकदम निरासक्त व्हायचं नाही, जबाबदारी कमी करत जायची आहे.
कुठलाही सहृदय माणूस आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं वागत नाही. हेही करायचं आहे, आयुष्यातली एक स्टेज म्हणून. ती आनंदाने तशी स्विकारून करता आली तर उत्तमच आहे. सर्वसंगपरित्यागाचे टोक गाठायचे नाहीये, आणि संसारी माणसाने एवढे टोकाचे ध्येय ठेवणे मला तरी फार हेल्दी आणि रिअलिस्टिक दोन्ही वाटत नाही. एवढं सरळसोपं सार आहे ह्या धाग्याचे. अनिंद्य जे सांगत आहेत ते मला तरी असंच वाटलं.

सर्वसंगपरित्याग, संन्यास किंवा विरक्त होणे ही function at() { [native code] }इशयोक्ती आहे. वरचे प्रतिसाद मी नीट वाचलेले आहेत. आपण या वस्तू कधी देणार आहोत ? जाण्याची चाहूल लागल्यावर ना ? म्हणजे आवरा आवर करायची वेळ झाली हे जाणवल्यावर. बरोबर ?

त्या वेळी आपण मोह कमी करणे हे शहाणपणाचेच आहे. खरे तर वयानुसार असा मोह कमी होणे नैसर्गिक आहे . यात कुणाला त्रास होण्याचे कारण नाही. असो. याशिवाय अशी केस नसताना वरचेवर साठलेल्या वस्तू देऊन टाकणे हे आपल्या सोयीचे असते. घरातला कचरा साफ होतो. याला चीन मधे कोंडलेली "ची" मोकळी करणे असे म्हणतात. ची म्हणजे एनर्जी. घरात जेव्हढ्या वस्तू वाढतील तेव्हढी मोकळी उर्जा वाहत नाही. ही ची म्हणजे उन्हं, खेळती हवा यामुळे घरात होणारे वायुवीजन. तुम्ही वस्तू वाढवत नेल्या कि त्यामागे, खाली कचरा साठतो, हवा जी घरभर फिरते तिचं क्षेत्र कमी होतं. त्या भागातून ती अशुद्ध हवा, जीवजंतू वाहून नेत नाही. त्यामुळे वरचेवर जी सफाई आपण करतो ती वेगळी.

वरचे प्रतिसाद अजून तिथेच आहेत. त्यामुळे ते वाचून मत ठरवता येते. मी इथे थांबतो.

आपण या वस्तू कधी देणार आहोत ? जाण्याची चाहूल लागल्यावर ना ?
>>> चाहूल लागण्याची गरज नाही. काही अशाही व्यक्ती ओळखीच्या आहेत त्यांनी काही गोष्टी सहज सोडून दिल्या, मग त्या उत्तम वस्त्रं असो किंवा पुस्तकं. आयुष्य खूप बाकी होतं पण मन भरलं होतं.

मला धाग्याचं सार असं वाटत की जो संसार एकत्र केलाय त्याकडे विचक्षण दृष्टीने पहा. त्यातील काय हवं नको हे पहा आणि त्याप्रमाणे वागा आणि हे ठराविक काळाने सतत करत रहा. तुम्हालाच कदाचित जाणीव होईल की आपण किती फापटपसारा एकत्र केला आहे.

एक लेखक, Happy होऊ देत की चर्चा. बोलत बोलतच क्लॅरिटी येत असते. आपण नक्की कशासाठी काय करतोय हे कळणं महत्त्वाचे. प्रत्येकाचे वेगवेगळे असले तरी....रादर ते वेगळेच असते. तुम्ही वरच्या पोस्टीत लिहिलेय ते योग्यच आहे, स्वच्छता आणि आवराआवर ( नको असेल ते फेकून देणं)जन्मभर, सातत्याने करावेच लागते. त्यात मोहमायेचा संबंध नाही, आपल्या घरात प्रसन्न वाटावं म्हणूनच असतं बरेचदा. अडगळ असली की विंचूकिडे येतात, कोंदट - रोगट वाटते. आवराआवर ही गरजा बदलत जाण्याने, मुलं मोठी होत जाण्याने सुद्धा always evolving असते. त्यामुळे ती सगळ्याच स्टेजेस मधे आपण करतच असतो. शेवटची स्टेज सुद्धा अशीच समजायची. फक्त थोडा जास्त अवेअरनेस आणि ॲक्सेप्टंस हवा एवढंच.

ओके.

माझे म्हणणे आहे कि डेथ क्लीनिंग ( जपानी भाषेत डानशाई) ही कल्पना २०१७ साली कुणी स्वीडीश माणसाने मांडली आहे. त्या मागे तेव्हढाच विचार आहे. यापेक्षा सखोल विचार चीन, भारत अशा जुन्या सिव्हिलायझेशन मधे आहे. पर्शिया किंवा ग्रीस मधे आहे का हे आत्ता तरी माहिती नाही. ज्याला आपण स्वच्छता म्हणतो त्या अर्थाने ची नाही. या विषयाचे जे काही ज्ञान आहे ते आर्किटेक्ट मित्राकडून आहे. त्याने पुस्तक लिहीले आहे. फेंगशुई आणि आधुनिक वास्तुशास्त्र यावर.

ची म्हणजे काय समजून घेऊ.
Clearing space to restore Qi ही चिनी कल्पना आहे. आपण ती कशी स्विकारतो ?
Decluttering for Qi circulation हा व्यवहार आहे. आपल्या रोमन वास्तुशास्त्रात पण आहे हे.
Qi (ची) ही संकल्पना आहे. ती केवळ गूढ नाही; ती हवा, उष्णता, प्रकाश, हालचाल, प्रवाह अशा भौतिक गोष्टींशी जोडलेली आहे. त्यामुळे “उन्हं, खेळती हवा, वायुवीजन” असे जे वर सांगितले, ते चीच्या भौतिक (functional) अर्थाशी सुसंगत आहे. इतर अर्थ मी इथे देत नाही. कारण विषयाला फाटे फुटतील.

ही जी "स्वच्छता" आहे, ती डेथ क्लीनिंगच वाटेल पण यामागे आपल्याला आपला अधिवास सुखकर व्हावा ही इच्छा असते. इथे मृत्यूचा विचार नाही. मी पंधरा वर्षांपूर्वी घर कमीत कमी वस्तूचे केले होते. पण पुन्हा घर भरले. जेव्हढे ते भरते तेव्हढे दडपण, ओझे जाणवते.

जेव्हां शरीर साथ देत नाही त्या आधीच आपला प्रवास कुठे चालला आहे हे ओळखून वस्तू, नाती यातला मोह कमी केल्याने मृत्यू सुद्धा स्विकारता येतो. हे डेथ क्लीनिंगच्या पुढे एक पाऊल आहे. असे मला वाटते.

.. शरीर साथ देत नाही त्या आधीच आपला प्रवास कुठे चालला आहे हे ओळखून वस्तू, नाती यातला मोह कमी केल्याने मृत्यू सुद्धा स्विकारता येतो….

Bang on !

माझ्यापेक्षा जास्त चांगल्या शब्दात आपण मांडले आहे. मी net practice वगैरे उथळ प्रतिमा वापरल्या.

आपल्या शब्दांचा गाभा (hopefully) एकच असल्याने प्रतिसाद विशेष भावला.

हे डेथ क्लीनिंगच्या पुढे एक पाऊल आहे. असे मला वाटते.
>>>> हो, आहेच. पण त्या आधी हे जमवायचं आहे, मग तेही जमेल कदाचित. नाही जमले तरी मृत्यू तर येणारच आहे. ते तर अटळच आहे. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू शकतो, यश मिळेल न मिळेल. निरासक्त होण्यापेक्षा प्रयत्नवत रहाणं सोपं आहे. एकेदिवशी माणूस म्हणून तितकं मोठं झालो तर तेही चुटकीसरशी जमेल. एकावर एक दगड ठेवतच ही उंची गाठायची आहे त्यामुळे प्रत्येक दगड तितकाच महत्त्वाचा! खूप अवघड ध्येय ठेवून आज हातचं घालवण्यापेक्षा मी मार्गातील प्रत्येक दगड महत्त्वाचा समजते. मी "अपरिग्रह मनाचा" असा लेख लिहिला आहे, त्यामुळे तुम्ही काय म्हणताय हे मला समजले आहे.

… आवरा आवर आपल्याकडे वारसांना करावी लागणे खूप कष्टाचे काम नाही.…

हे असे असेल तर उत्तमच आहे. माझ्या बघण्यातले अनुभव तसे नाहीत.

Pages